नमस्कार. माझं नाव हेमंत बर्वे. व्यवसाय इंटेरीअर डेकोरेटर.बरीच वर्षं या व्यवसायात मी रमलो आहे. तसा मी व्हीजेटीआयचा इंजीनीयर. खटाऊ मिल मध्ये काम करत असताना मुंबईतला वस्त्रोद्योग बंद पडला तर काय करायचं हे मी मिल बंद पडण्याच्या आधीच ठरवलं होतं. त्याचं कारण फार सोपं होतं. मुंबई बदलताना मी बघत होतो. लोकं चाळीतल्या जागा विकून केवळ गरज म्हणून नव्हे तर चांगलं राहणीमान मिळावं म्हणून उपनगरात जात होते.पुरुषांबरोबरच मिळवत्या बायकांची संख्या वाढत जाताना मी पाहत होतो. घरात स्त्रियांचं आर्थीक किंवा इतर कुठल्याही बाबतीत मत विचारात घ्यायला सुरुवात झाली होती. थोडक्यात काय तर हळूहळू भक्कम असा मध्यम वर्ग तयार होताना मी पाहत होतो. म्हणून मी ठरवलं की नविन उदयाला येणार्या या वर्गासाठी कुठल्यातरी सेवा उद्योगात आपण काम करावं हे मी संप होऊन मील बंद पडण्यापूर्वी दहा वर्षं आधीच ठरवलं होतं.त्यानुसार डोंबीवली पासून वसई पर्यंत मिळतील ती कामं मी करायला सुरुवात केली आणि आता मी यशस्वी अंतर्गत सजावटकार आहे.या सर्व वाटचालीत मी जमेल तशा नोंदी करून ठेवत होतो. माझे स्नेही रामदास यांनी आग्रहानी मला लिहायला प्रवृत्त केलं.
तेरा घर -मेरा घर या लेखात गृहसजावट करताना येणार्या अडचणी आणि बर्याच वेळा वाट्यास येणारी फसवणूक याबद्दल मी लिहीणार आहे.
बघा अडचणी का येतात.अडचणी कशा येतात. कोण किती जबाबदार असतं.वगैरे वगैरे.
पहीला प्रश्न लोकांच्या मनात असतो तो सजावटकाराची मदत घ्यावी किंवा नाही.यात माझं मत असं आहे की सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आपसूक येत नाहीत. अंतर्गत सजावटीचं शास्त्र एका रात्रीत येत नाही. म्हणून बजेट लहान असू किंवा मोठं तज्ञाची मदत घ्यावीच घ्यावी.मग प्रश्न परवडण्याचा येतो.
सजावटकाराला देण्याचे पैसे वाचवून त्यात घर आणखी सुंदर करता येईल असा एक मत प्रवाह आहे.
नाहीतरी तो काय कागदावर चार रेषा काढून पैसे घेणार असा थोटा विचार पण बरेच जण करतात.
माझ्या मनात काय आहे ते त्याला नेमकं कसं कळणार असाही एक आक्षेप असतो.
पण ही सगळी मंडळी एक विचार करत नाहीत की तज्ञाची मदत घेतल्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होत असते. कसं ते पुढे कळेलच पण विषय ऐरणीवर आहे म्हणून सांगतो की चांगला सजावटकार तुमच्या बजेट मध्ये ३०%ची बचत करू शकतो .
आपण सजावट का करणार आहोत हेच बर्याच जणांना कळत नसतं.एखादं सुंदर शिल्प जसं घडवावं तसं जुन्या घरातून एक नविन घर तयार करायचं असतं. हे घराचं बदलणं सुरवंटाचं फुलपाखरू होण्यासारखं असतं. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यक्तीमत्वात सजावटीनंतर फरक पडणार असतो आणि त्याची किंमत आपण देणार आहोत याची कल्पना प्रथम सजावट करणार्या
घरात काहीजणांना असते.
बर्याच जणांना नसते. रंग देणं ,टाईल्स बदलणं यालाच बरेच जण अंतर्गत सजावट समजतात. ही काम तर कुठलाही रामशरण /रामबचन/दशरथकुमार करू शकतो. मग माझ्यासारख्यांच काम काय आहे.
माझं काम या सगळ्या घराला सौंदर्य देण्याचं असतं.माझी सौंदर्यदृष्टी त्या घराला काय हवंय? ते सांगते .दिलेल्या बजेटमध्ये कसं करता येईल हे माझा अनुभव सांगतो.मी माझे पैसे कमावतो ते ग्राहकाच्या पैशाची बचत करून .मला मुद्दा असा मांडायचा आहे की सजावटकार हा ग्राहकाच्या डोक्यावरची लायबीलीटी नाही.तरी पण सजावटकाराची नेमणूक करताना लोकं फार खळखळ करताना दिसतात.
माझं प्रामाणिक मत असं आहे की जास्तीत जास्त दोन चार सजावटकारांना बोलावून त्यांचे मत घ्यावे.जर त्यांनी प्लॅन बनवून दिला आणि त्या सजावटकाराला काम द्यायचे नसेल तर त्याचा मेहेनताना देऊन मोकळे व्हावे.पण लोकं सजावटकाराला बोलावून प्लॅन बनवून घेतात आणि काम रामबचन किंवा रामशरण कडून करून घेण्याचा प्रयत्न करतात. बजेट च्या बाहेर कम वाढत जातं आणि भांडण सुरु होतात. हा सीन नंतर तपशीलात मी सांगणार आहेच.तरीपण असं काही काम करून घेण्यापूर्वी काय आखणी करावी याची यादी मी देतो आहे.
१ बजेट मांडताना आपल्या शिल्लकीचा अंदाज घ्या. पुरेशा पैशाअभावी कामं सहा सात महीने रखडलेले मी नेहेमी बघतो.
२ बँकेला द्यायचा डेटा हा बजेटपेक्षा वेगळा असेल तर तसे स्पष्ट सांगा.(कर्ज मिळण्यासाठी)
३ पुढच्या चार महीन्यात काही महत्त्वाचे घरगुती फंक्शन नाही आहे याची खात्री करा.
४ कारागीर तुमच्या अनुपस्थीतीत घरात असतात. बी व्हिजीलंट.सजावटकाराला निक्षून सांगा की कारागीर ही त्याची जबाबदारी आहे.
५ काम ठरल्यापेक्षा पंधरा दिवस उशीरा पूर्णं होणार आहे असे गृहीत धरून वेळेचे व्यवस्थापन करा.
६ घरातल्या वृद्धांची शक्यतो काही वेगळी व्यवस्था करता आली तर पहा.त्यांच्यावर ते चोवीस तास घरात असल्यामुळे एक दबाव येतो.आजारी पडतात.
७ कारागीर किंवा सजावटकार यांच्याशी व्यावहारीक बोलणे करण्याची जबाबदारी एकाच माणसाकडे सोपवावी
८...
९...
१०........
सूचना अनेक देता येतील पण तूर्तास एवढे पुरे.
आता बघा सजावटकाराची नेमणूक केली तर कामाची जबाबदारी त्याला देऊन भागत नाही. त्याच्याशी चर्चा करण्याचे टप्पे ठरवून ठेवा.पैसे अडकवून ठेवले तर आपोआप सगळी कामं व्यवस्थीत होतात हा गैरसमज आहे.एकमेकांसोबत विचार विनीमय केला तर कामं लवकर संपतात.
तरीही आपला एक समज असतो की वैयक्तीक पातळीवर मी सजावटीचं काम करून घेईन.
ठिकच आहे. मग कामाला लागा. प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस लागतो त्यांची यादी बनवा.ठळक पात्र मी सांगतो. सुतार. पीओपीवाला, रंगारी, इलेक्ट्र्र्शीअन,प्लंबर,पॉलीशवाला, स्लायडींगवाला, कडीया, लादीवाला.त्यांच्या कामाचे तेव्हढेच सप्लायर. ट्रान्सपोर्टर.
तुम्हाला सांगीतलं तर आश्चर्य वाटेल पण या पद्धतीत प्रत्येक माणूस तुम्हाला ३० ते ३५% टक्क्याचा गंडा घालतो. सगळे प्रोफेशनल असतात. ग्राहकाला दाखवायचा चेहेरा वेगळा असतो. आता उदाहरण सुताराचं घ्या.
समजा रामबचन विश्वकर्माला तुम्ही बोलावलं . (मराठी सुतार ही दुर्मीळ जमात आहे)
पहीला तुमचा प्रश्न असतो इधर सोसायटीमे काम किया हय क्या?
नही साब , लेकीन सूरज सोसायटीमे किया है.(ही सोसायटी दहा ते पंधरा मैल दूर असते)
काम कैसा करता हय हमरेको कैसा मालूम पडनेका? तुमचा प्रश्न.
आल्बम लाया है .
ठीक है. कितना पैसा लगेंगा.महत्त्वाचा प्रश्न . याची तयारी तुम्ही दहा ठिकाणी चौकशी करून ठेवली असते.
पर्सेंटेज पे बोलो.(साधारण तीस पस्तीस टक्के अपेक्षीत)
पैतीस टका लगेगा.
हो नाही करता करता साडेबत्तीस टक्क्यावर बोलणी संपतात.
जनरली फेव्हीकॉलचा आल्बम घेऊन फिरणारी ही माणसं दुसर्या दिवशीपासून कामाला येतात.
यांचा मुखीया असतो तो मेस्त्री प्लायवूडची यादी देतो.
तुम्ही या सगळ्यात नविन. प्लायवूड, पार्टीकल बोर्ड, एमडीएफ, ब्लॉकबोर्ड,काहीही कळत नसतं.
आता बघा प्लायवूडच्या हजार एक कंपन्या आहेत. आसाम प्लाय, आसाम बोर्ड,आसाम प्लँक,एंडलेस नावं देता येतील.पार्टीकल बोर्ड म्हणजे भुशाचा बोर्ड.त्याच्या शेकडो कंपन्या.यातल्या कुठल्या कंपन्या विश्वासाच्या .सुतारालाही माहीती नसतं .पण सुतार घेऊन जाईल तिथे खरेदी कारायची नाही असा कान मंत्र कुणितरी दिला असतो म्हणून तुम्ही वेगळ्या कुठल्यातरी दुकानात जाता. सुताराला खंत नसते. माल कुठुनही घ्या त्याला मारवाडी कमीशन देतोच देतो. ओळख असू द्या किंवा नसू द्या.
याला काटशह म्हणून ब्रँडेड प्लाय मागीतला तर सुताराला जास्त बरं वाटतं.त्याची जबाबदारी कमी होते आणि कमीशन जास्त मिळतं .कारन असं आहे की पहीला लॉट जेमतेम खरा असतो. दुसरा शंभर टक्के नल्ला.
नॉन ब्रँडेड मध्ये कोअर कसला आहे हे तुम्हाला माहीती नसतं.कोअर म्हणजे प्लायचा गाभा हार्ड कोअरचा भाव जास्त. रबर कोअर फार स्वस्त. दिसायला चकचकीत. सुतारला कमीशन जास्त.
पण तुम्ही फार व्यवहारी असाल तरी त्याचा काय उपयोग . सहा बाय चार सात बाय चार सहा बाय तीन अशी यादी वाचून डोकं काम करेनासं होतं.
साधा सरळ तोडगा म्हणजे प्लायची संख्या मोजून ठेवणे. हरकत नाही. सुतार हुशार असतो. आल्या आल्या प्लायवूड पसरून ठेवतो.
चार प्लाय कापून ठेवतो. मोजणी चुकते.
सुतारानी तुमचं माप आधीच काढलेलं असतं.
मारवाडी त्याच्या सोबत असतो.
आता दोघं मिळून कसं फसवतात ते पहा.
१ मारवाडी बेरजेत नेहेमी चूक करतो.(मुद्दाम). त्याचा नोकर ती त्याच्या नजरेस आणून देतो.मारवाडी सॉरी म्हणतो. तुमचा मारवाड्याच्या नोकरावरचा विश्वास वाढतो.
२ पुढच्या लॉटच्या वेळेस तुम्ही नोकराला विश्वासात घेता. तो प्लाय मोजून तुमच्यासमोर कढून देतो. हातगाडी लोड करतो. तुम्ही ऑफीसला जाता. मागल्या वेळेपेक्षा हलका माल घरात येतो. संध्याकाळी तुम्ही येण्यापूर्वी प्लाय ठोकून झालेला असतो.
३ सहा बाय चार ऐवजी सहा बाय तीन पाठवला जातो.प्लाय कापल्यावर काय कप्पाळ कळणार त्याची साईज.
४ ब्रँडेड माल अर्धा सही आणि अर्धा नल्ला असतो.
५ चौथ्या वेळी तेवीस ऐवजी एकोणीस प्लाय घरात येतात.
अशा कमीतकमी पंधरा सोळा स्टेजेस मध्ये फसवणूक होते.उदाहरणार्थ. फेवीकॉल . सुतार जेवणाच्या डब्यात घेऊन जातात. स्क्रू ,खिळे, घस्साई पेपर असाच जातो.
सर्वसाधारण लॉस तीस ते पस्तीस टक्के.
(याच पद्धतीनं प्रत्येक कारागीर तुमची पूंगी वाजवत असतो. तुम्ही आरोप पण करू शकत नाही. मारवाड्याचं दुकान तुम्हीच शोधलेलं असतं.)
सर्वसाधारणपणे बजेट ओव्हरन चाळीस टक्के होतं.
पण कारागीर बदमाष आणि कस्टमर बिचारा असही नसतं.पण त्याची गोष्ट नंतर कधीतरी.
प्रतिक्रिया
13 Oct 2008 - 8:06 pm | मिसळ
अजून वाचायला आवडेल.
13 Oct 2008 - 8:25 pm | baba
मलाही अजून वाचायला आवडेल. ...
...बाबा
13 Oct 2008 - 8:38 pm | प्राजु
वाचायला आवडते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Oct 2008 - 9:08 pm | यशोधरा
कसला गफला!! अफलातून!! पार पोपटच बनवतात की!!!!
13 Oct 2008 - 10:41 pm | भिंगरि
खुपच माहितिपुर्ण लेख पुढ्चे भ्हग लवकर येवु द्यात.
13 Oct 2008 - 11:31 pm | शाल्मली
लेख छान..
अजून वाचायला आवडेल.
--शाल्मली.
13 Oct 2008 - 11:33 pm | लिखाळ
मस्त लेख.. विषय छान..मिपावर स्वागत.
यातला काही अनुभव घरात सुतारकाम करताना आला होता :) दुजा करे सो गोता खाय हे नंतर ध्यानात येते.
पण आपण खमके आणि मोजूनमापून व्यवहारी असलो तर गोत्याची टक्केवारी थोडी कमी होते. पण अंतर्गत सजावट आणि साधे फर्निचर बनवून घेणे हे दोन्ही प्रकार वेगळेच. सुतारांचा दृष्टीकोन बदलत असेल. असो. पण प्लायच्या जाड्या-रुंद्या आणि पार्टीकल बोर्ड वगैरे वाचून आठवणी ताज्या झाल्या म्हणून लिहिले.
(लेखात अनुक्रमांकानुसार नियम-सुचवण्या पाहता आपण धोंडोपंतांचे स्नेही असाल असे वाटले. पण नंतरची काही लहान जोरकस वाक्ये वाचून पुन्हा सुई रामदासांकडे स्थिरावली :) . हे संबंधितांनी हलके घ्यावे ही विनंती.)
अजून लिहा.. वाचायला आवडेल.
--लिखाळ.
14 Oct 2008 - 12:07 am | भडकमकर मास्तर
बर्वेसाहेब, छान होतोय लेख...
अजून येऊद्या.... वाट पाहतोय....
....
गेल्या गणपतीत सुताराकडून शोकेस्,कंप्यूटर टेबल त्यात कपाट वगैरे वगैरे करून घेतलं त्यात तुम्ही लिहिलं त्याप्रमाणे बर्याच बाबतीत गंडलो, हे जाणवतंय.... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Oct 2008 - 12:07 am | चतुरंग
फार पूर्वी आमच्या जुन्या घरात बरेच फर्निचर करुन घेतले होते.
सुतार अर्थात राजस्थानीच. त्याने कामाची मोजमापे घेतली आणी प्लायची मोजमापानुसार संख्या दिली. दुसर्यादिवशी प्लाय न्यायला येणार त्याच्या आधी मी संध्याकाळी हिशोब करुन कागदावर त्याला कमीसाईजच्या प्लायमधे तेच काम कसे बसवता येईल हे दाखवून दिले होते. गडी सावध झाला मी दुप्पट सावध झालो. सगळे दुकानदार एकजात मारवाडी त्यामुळे कमिशन ठरलेले त्यात बदल होत नाही हे माहीत होते. माल आणायला मी स्वतः जायचो. प्रत्येक शीट योग्य आहे का नाही हे तपासून घ्यायचो.
दुकानातला पोर्या "तुम्ही जा, मी नीट माल पाठवतो" म्हणायचा पण मी ऐकले नाही. फेवीकॉल सकट सगळे स्वतःच्या ताब्यात ठेवून काम करुन घेतले पण त्यावेळी मी इंजिनियरिंगच्या वर्षात सुटीसाठी घरी आलो होतो त्यामुळे तेवढा वेळ होता. सर्वसाधारणपणे कामाला जाणार्यांना असे करणे अवघड असते त्यामुळे ह्यांचे फावते. ३०-३५% नक्कीच गंडवतात.
पैसे अडवून ठेवले तर फारच वाईट अवस्था होते असे मी काही जणांच्या अनुभवाला आलेले बघितलेय. मिस्त्री आणि कारागिरांना काहीही फरक पडत नाही इतकी कामे एकाच वेळी चालू असतात. अर्धवट केलेल्या कामाला दुसरा कोणी हात लावत नाही आणि शेवटी त्या कारागिराला शोधून बाबापुता करुन जास्त पैसे घे पण काम करुन जा असे विनवायची पाळी येते!
हे सगळे प्रकार गोडीनेच हाताळावे लागतात. थोडे पैसे काढणार हे माहीत असते पण फार वादात जायचे नाही, अति लुटूही द्यायचे नाही असा सुवर्णमध्य साधावा लागतो.
बर्वेसाहेब अजून लिहा वाचायला आवडेल.
चतुरंग
14 Oct 2008 - 9:05 am | महेश हतोळकर
सर्वच बाबतीत सहमत.
14 Oct 2008 - 8:17 am | विसोबा खेचर
बर्व्यांनू, येऊ द्या अजून...
सजावटकार ह शब्द आवडला! :)
14 Oct 2008 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll
हेमंतशेठ उत्तम माहीती विषेशतः आपण दुकानदार आणि कारागिराकडून होणार्या फसवणूकीबद्दल माहीती दिल्याबद्दल खरोखरच आभार. बाकी च्यायला या मारवाड्यात सरळपणे धंदा करणारे लोक नाहीतच काय? (माझ्या श्रध्देनुसार काही मारवाडी आहेत इमानदारीनी धंदा करणारे)
समजा रामबचन विश्वकर्माला तुम्ही बोलावलं . (मराठी सुतार ही दुर्मीळ जमात आहे)
हो पण या दुर्मिळ जमातीतले काही लोक पुण्यात अस्तित्वात आहेत. एक मराठी सुतार 'हिरामण तांबेकर'. या माणसाने त्याच्या भाच्यानाही या व्यवसायात आणले. पण साला मराठी माणसाला काम करायलाच नको. टिकलेच नाहीत कारण कामच करायला नको. तसा फेविकॉल, खिळे या बाबतीत हा माणूस फारसे फसवतो असे नाही कारण आमच्या घरच्या कामाच्या वेळेला आणलेले फेविकॉल, खिळे जे काही उरले होते ते त्याच्या वजनानुसार पैसे देऊन घेऊन गेला.
पुण्याचे पेशवे
14 Oct 2008 - 8:53 am | सहज
बर्वेसाहेब तुम्ही डोळे उघडणारा लेख लिहला आहे.
थोडक्यात प्रत्येक गोष्ट स्व:ता खातरजमा केल्याखेरीज गत्यंतर नाही असेच दिसतेय.
14 Oct 2008 - 9:12 am | ऋचा
अगदी माहीतीपुर्ण आणि उपयुक्त लेख आहे बर्वेसाहेब :)
अजुन येऊदेत ..
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
14 Oct 2008 - 11:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋचाशी सहमत. तुम्ही लिहाच आणखी!
अदिती
14 Oct 2008 - 10:59 am | केवळ_विशेष
बर्वे साहेब अजून येउंद्या...
अहो मला तर या गोष्टी माहितच नव्हत्या...म्हणजे फसवाफसवी वगैरे...
अजून माहीती आली तर बरं होईल...आमचं घर आता तयार होतय...माहीती खूप उपयोगी ठरेलसं दिसतंय...
14 Oct 2008 - 11:15 am | मनस्वी
वाचायला आवडेल.
मनस्वी
14 Oct 2008 - 11:16 am | विजुभाऊ
सुंदर. वेगळ्या विषयावरचा लेख.
लिहीत रहा. वाचायला आवडेल
15 Oct 2008 - 10:08 am | मनिष
सगळे नसले तरी बरेच सजावटकार देखील खूप फसवतात -- भाव तेच राहतात, पण कमिशन त्यांच्याकडे जाते, शिवाय त्यांची फी वेगळि. शिवाय ते रामचरण इ. पेक्षा बोलायला, दिसायला स्मार्ट असल्याने ते विश्वास संपदन करतात आणि जास्तच फसवतात . मी स्वतःच घराची सजावट केली - एका सजावटकाराला बोलावले तर त्याने पीओपी ७००० ते ८००० होतील ते सांगीतले - मी तेच काम ४००० मधे करून घेतले. वॉर्डरोब ७०,००० ते ८०,००० सांगितला -- तो मला ४५००० करून मिळाला -- तोही माझ्या मनासारखा - काच वगैरे लावून, ज्याला तो तयार नव्हता. प्लायवूड, ब्लॉकबोर्ड ह्या गोष्टी नीट समजवून घ्याव्यात - कुठे काय वापरणार हे ठरवावे आणि काम करावे. बाकी चतुरंगशी सहमत -- स्वतःच्या घराच्या सजावटीत स्वतःचा सक्रीय सहभाग हवाच. सजावटकार घेतलाच तर तो विश्वासू असावा.
-मनिष
14 Oct 2008 - 11:55 am | अनामिका
अतिशय योग्य आणि गरजेचा विषय हाताळताय बर्वेसाहेब्. वाचायला आवड्तय्.या बाबतीतील माझे अनुभव इथे लिहिते वेळात वेळ काढुन.
१९९० साली घराच्या फरश्या बदलण्याचे काम वडिलांनी सुरु करवले.दिवाळी पुर्वी काम सुरु झाले .पण काम करणार्या कडियाने पुर्ण पैसे घेवुन देखिल दिलेल्या वेळेत काम पुर्ण केले नाही,दिवाळी तोंडावर आलेली .दोन खोल्यामधिल लाद्या काढुन खोदकाम करुन कडिया आणि त्याचे कामगार परागंदा .४ दिवस त्याच परिस्थितीत जमिनीवर ताड्पत्री घालुन काम चालवले.चौथ्या दिवशी आईने रुद्रावतार धारण केल्यावर वडिलांनी त्या कडियाला शोधुन फरफटत आणले आणि त्याच मातीत लोळवले.एक अख्खा दिवस आणि एक रात्र दुप्पट कामगार लावुन काम पुर्ण करवुन घेतले.आजतागायत तो कडिया घरासमोरुन जाताना मान वळवुन देखिल पहात नाही.तेंव्हा पासुन अश्या प्रकारच्या कामांना सुरुवात करताना सगळ्या संबंधित गोष्टिंची माहीती करुन घेण्याची सवय जडली .
"अनामिका"
14 Oct 2008 - 11:57 am | घाशीराम कोतवाल १.२
वा मिपा वर आता असे चांगल्या चांगल्या सुचना आनी ईकडे लक्ष द्या येतय झक्कास
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
14 Oct 2008 - 12:01 pm | घाशीराम कोतवाल १.२
:T :W
अजून येउंद्या...
अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...अजून येउंद्या...
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
14 Oct 2008 - 2:53 pm | झकासराव
उपयोगी आहे तुम्ही देत असलेली माहिती.
लिहाच :)
अवांतर : बाकी रामदास काका भारीच आहेत. मिपा संप्रदाय वाढवण्याच्या कामात सक्रिय आहेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
14 Oct 2008 - 9:18 pm | संदीप चित्रे
च्यायला .. गफलेच आहेत सगळे.
बर्वेसाहेब -- अजून वाचायला आवडेल.. वाट बघतोय.
16 Oct 2008 - 3:54 pm | सुधा सुहास कुलकर्नी
खूप छान
कन्सल्टन्सी कराल का? :SS
19 Oct 2008 - 12:02 pm | हेमंत बर्वे
माझ्या पहील्या वहील्या लेखाचे भरभरून कौतुक करणार्या सर्व वाचकांचा मी आभारी आहे.पुढचा लेख लवकरच.
19 Oct 2008 - 2:58 pm | आशिष प्रभुदेसाई
आपला लेख खूपच माहितीपूर्ण आहे.
आणखी वाचायला आवडेल.
सावरकर चित्रपटात काम केलेले, मराठी गाण्यांच्या मैफिलीत निवेदक म्हणून असतात ते हेमंत बर्वे आपणच का?
लवकर उत्तर मिळावे.
धन्यवाद!
20 Oct 2008 - 7:06 pm | हेमंत बर्वे
मी तो नव्हे.मी आपला साधासुधा हेमंत बर्वे.
आभारी आहे.
20 Oct 2008 - 8:31 pm | डॉ.प्रसाद दाढे
उत्तम लेख व अतिशय उत्तम विषय. अश्या व्यावहारीक विषया॑वर लेखन होण॑ही अत्य॑त आवश्यक आहे. पुढील भागाची वाट पाहात आहे.
रामदासजी॑नाही धन्यू!
(डोक्यातला किडा: रामदासच हेम॑त बर्वे नाहीत ना? :) त्या॑च॑ काय सा॑गता येत नाही भाऊ
20 Oct 2008 - 10:08 pm | रामदास
नाही हो डॉक्टर,तसं काही नाही. हेमंतला लिहीतं केलं एव्हढंच काय ते काम केलं.
20 Oct 2008 - 11:49 pm | ऋषिकेश
अरेच्या?! हातोहात फशिवतात की वो! :(
अजून लिहा.. मस्त चालु आहे
बायदवे मिपावर स्वागत! भरपूर लिहा.. आम्हि आहोतच वाचायला :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश