भीतीच्या भिंती:२. जिवंत असण्याचा पुरावा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
12 Dec 2014 - 12:52 pm

(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)

भाग १: एक तास जास्तीचा

‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’. दोन्ही पुस्तकं वाचल्यावर आपण काबूलला चाललोय म्हणजे रम्यनगरीत नाही जात आहोत याची पुनश्च प्रकर्षाने जाणीव झाली होती. या पुस्तकांचा परिणाम म्हणून की काय पण मी एक भली मोठी प्रश्नावली माझ्या ऑफिसला पाठवून दिली होती. राहण्याची व्यवस्था काय; सुरक्षितता कशी असते; रोज ऑफिसला जायला वाहनाची व्यवस्था असणार का; इंटरनेट उपलब्ध आहे का; सेलफोन चालतात का; संवादाची भाषा काय; ड्रेस कोड काही आहे का; सर्वसाधारणपणे अफगाण लोक भारतीयांना स्वीकारतात का; – असे असंख्य प्रश्न मी विचारले होते. ‘तुमच्यापैकी कुणाला तालिबानी हल्ल्याचा दुर्दैवी अनुभव आला आहे का’ असा एक आगाऊ प्रश्नही मी विचारला होता.

इथं आल्या आल्या लगेच मला एका बंदूकधारी सैनिकाच्या दहशतीची झलक मिळाली आणि त्यात भर पडली जॉर्जसोबत घालवलेल्या तासाभराची. जॉर्ज माझ्या ऑफिसचा मुख्य सुरक्षा अधिकारी. हा निवृत्त सैनिक; युरोपियन देशातला. मी गाडीत बसताक्षणी. त्याने अगदी शांतपणे मला एकेक सूचना द्यायला सुरुवात केली.

पहिल्यांदा हातात दिला तो सेलफोन. त्यात आवश्यक ते सगळे नंबर आधीच घालून ठेवले होते. त्यात पुरेसे पैसे होते फोन करायला.
दुसरी वस्तू आली हातात ती थोडी अपेक्षित होती – पण काळजी वाढवणारी होती.

vhf

हा आहे Very High Frequency Radio. मराठीत "वॉकी-टॉकी"! त्याच्या सोबत एक जादा बॅटरी. एक बॅटरी नेहमी चार्जड असायला हवी पूर्णपणे. अनेकदा सेलफोनला रेंज नसते, अशा वेळी संपर्कासाठी हा फोन हमखास उपयोगी पडतो म्हणे. तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण मला उद्या दिल जाईल असंही जॉर्ज म्हणाला. ती बॅटरी जड वाटली मला आणि तसं मी बोलूनही दाखवलं. त्यावर ‘ही कायम सोबत घेऊन हिंडायचं’ असा आदेश देऊन जॉर्जने माझ्या हाती आणखी एक चीज सोपवली.

ते होतं बुलेटप्रुफ जाकीट. अत्यंत जड. एका हाताने मला ते पेलता येत नव्हतं. ‘हे जाकीट सदैव, अगदी चोवीस तास हाताशी ठेवायचं’ जॉर्जचा आणखी एक हुकूम. गोळीबार झाला तर या जाकिटामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑफिसात, घरात, प्रवासात सदैव हे जाकीट जवळ पाहिजे. माझा चेहरा पाहून जॉर्ज म्हणाला, “ मी तुला ऑफिसात वापरायला (!) वेगळं जाकीट देतो, पण मीटिंगसाठी इकडून तिकडे जाताना ते तू घेऊन जायचं.” मी फक्त मान डोलावली, काय करणार दुसरं? त्यानंतर त्याने आणखी एक गोष्ट मला दिली – हेल्मेट.

”झालं? की अजून काही?” मी किंचित धास्तावत विचारलं.

”पासपोर्ट, युएनचं ओळखपत्र आणि एक आंतरराष्ट्रीय तिकीट स्वत: काढता येईल एवढे डॉलर्स सतत जवळ बाळगायचे. तिकिटाचे पैसे यासाठी की कधी आम्ही कुणी सोबत नसू आणि तुला देशाबाहेर पडायला लागलं तर असावेत पैसे जवळ. लक्षात ठेव, कोणत्याही क्षणी बॉम्बहल्ला होऊ शकतो, अशा वेळी किमान या तीन गोष्टी सोबत घेऊनच पळ काढायचा. म्हणून या गोष्टी सतत हाताशी हव्यात. जेवायला तर चाललेय असं म्हणत ऑफिसात पासपोर्ट ठेवून बाहेर पडायचं नाही. आणि हो, अत्यावश्यक वस्तूंनी (कपडे, औषधं वगैरे) भरलेली एक छोटी प्रवासी बॅग सतत जवळ बाळगायची, रोज ऑफिसात पण घेऊन यायची ती ” असं म्हणून त्याने मला त्याची बॅग दाखवली. हा गृहस्थ त्यावेळी फक्त मला घ्यायला विमानतळावर आला होता आणि मला राहण्याच्या जागी सोडून त्याच्या घरी परत जाणार होता. एक ते दीड तासाचा काय तो प्रश्न. पण नाही, शिस्त म्हणजे शिस्त.

“ही कशासाठी?” मी गोधळले होते.

“परिस्थिती अचानक गंभीर होऊ शकते कधीही, तुला सामान आणायला तुझ्या राहत्या जागेत परत जाता येईलच असं नाही. काही वेळा इवॅक्युएशन (स्टाफला देशाबाहेर हलवणं) तातडीने करायला लागतं. तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला उचललं जाईल – म्हणून ही बॅग सोबत ठेवायची.”

जॉर्ज अतिशय शांतपणे मला हे सगळं सांगत होता.

बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यांचा इशारा मिळाला की त्या क्षणी हे जाकीट चढवायचं, हेल्मेट घालायचं, व्हीएचएफ, सेलफोन आणि कागदपत्र घ्यायची सोबत आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा; हे सगळं करायला वेळ मिळणार तो जास्तीत जास्त तीन मिनिटांचा! ‘आपण युद्धभूमीवर आलो आहोत’ याची एव्हाना मला खात्री पटली होती.

मग त्याने माझ्या हातात काही कागद सोपवले. सुरक्षाविषयक अनेक सूचना होत्या त्यात – ‘ते सावकाश वाच रात्री, मग उद्या बोलू त्यावर’ असं तो म्हणाला.

मी जरा हुश्श करून खिडकीतून इकडेतिकडे पाहायला लागले. “ते हिरवं कापड पाहिलंस?” एका इमारतीकडे बोट दाखवून त्याने विचारलं. असं कापड बांधकाम अथवा दुरुस्ती चालू असलेल्या इमारतीभोवती नेहमी दिसतं. “त्याला छिद्र दिसताहेत ना, ती बंदुकीच्या मा-याने पडलेली आहेत.” जॉर्ज एकामागून एक धक्के देत होता मला.

कसलीही पाटी नसलेल्या एका पोलादी दरवाजासमोर आमची गाडी थांबली. मग गाडीची शिस्तशीर तपासणी झाली; ओळखपत्रं पाहिली गेली. माझ्याकडे ओळखपत्र नव्हतं, पण माझ्या नावाचं ऑफिसने दिलेलं पत्र जॉर्ज सोबत घेऊन आला होता. मग तसाच दुसरा दरवाजा, पुन्हा सगळी तपासणी. रिसेप्शनवर नोंद केली. मी खोलीत गेले. ‘उद्या सकाळी आठ वाजता तुला घ्यायला गाडी येईल, तयार रहा’ असं सांगून जॉर्ज निघून गेला.

हॉटेल ठीकठाक आहे. मुख्य म्हणजे स्वच्छ आहे. बाहेरचं दृश्य तर एकदम मस्त आहे.
hotel 1
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वायफाय कनेक्शन आहे. त्यामुळे संपर्क ठेवणं सोपं जाईल. खोलीत टीव्ही आहे – एरवी मी तो फारसा पाहत नाही (माझ्या घरी टीव्ही नाही) – पण आता इथं बातम्या पाहाव्यात आणि जमल्यास काही चित्रपटही. हॉटेलचा माणूस वायफायचा पासवर्ड द्यायला आला होता - एकदम म्हणाला 'बारिश..' त्यावेळी बाहेर पाऊस पडायला लागला होता. दुस-या एकाकडून पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडून घ्यायला मला हातवारे करावे लागले - भाषा उपयोगी नाहीच पडली. आता ‘दरी’ शिकायला हवी.

मी सहज खोलीच्या बाहेर नजर टाकली आणि मला हे दृश्य दिसलं.
hotel 2
माझ्या समोर दहा फूट अंतरावर संरक्षणाची ही अशी जय्यत तयारी. २४ x ७.

जाताना जॉर्ज मला गृहपाठ देऊन गेला होता. त्या गृहपाठातला एक भाग होता ‘प्रुफ ऑफ लाईफ क्वेश्चन्स’. युद्धक्षेत्रात, संवेदनशील क्षेत्रांत काम करणा-या लोकांसाठी हे प्रश्न वापरले जातात. त्यामागची कल्पना अशी आहे:

समजा ‘क्ष’ या व्यक्तीचं अपहरण झालं आणि अपहरणकर्ते खंडणी मागताहेत. अशा वेळी तुमच्या ऑफिसला दोन गोष्टींची खात्री करून घ्यायची असते. एक म्हणजे अपहरण ‘क्ष’ या व्यक्तीचंच झालं आहे – अपहरणकर्ते खोटं सांगून, दुस-याच कोणा व्यक्तीला ताब्यात घेऊन ‘क्ष’चं नाव सांगत नाहीत ना याची खातरजमा करणे. आणि दुसरं म्हणजे ‘क्ष’ जिवंत आहे, त्याची/तिची हत्त्या झालेली नाही याचीही खात्री करणे. टेलिफोन संवादावरून आवाजाची खात्री करता येईल असं नाही. व्हिडीओ क्लिप्सवर विश्वास ठेवता येत नाही; कारण व्हिडीओ आधीच कधीतरी चित्रित केला असेल आणि त्यानंतर ‘क्ष’ची हत्त्या झाली नसेल असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. मग खात्री कशी करणार? तर या ‘प्रुफ ऑफ लाईफ’ प्रश्नांवरून!

“प्रुफ ऑफ लाईफ” प्रश्न फक्त लिहून देणा-या व्यक्तीलाच माहिती असतात, थोडक्यात तुमचा पासवर्ड व्हेरीफिकेशन म्हणा ना! हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याने/तिने ते दुस-या कुणाला सांगू नयेत अशी अपेक्षा असते, कारण या माहितीचा कोण कधी दुरुपयोग करेल याचा भरवसा नसतो. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे साधारण सार्वजनिक जीवनात माहिती असलेल्या गोष्टींबाबत असू नयेत असं मार्गदर्शक तत्त्व सांगते. म्हणजे उदाहरणार्थ मी प्रश्न लिहिताना “मी काबूलला कोणत्या वर्षी आले?” किंवा “मी कोणत्या वर्षी पहिली नोकरी स्वीकारली?” किंवा “माझं घर कोणत्या शहरात आहे?”, “माझ्या मुलाचे नाव काय आहे?” असले प्रश्न लिहायचे नसतात कारण या घटना किंवा परिस्थिती इतर अनेकांना माहिती असू शकते. ही माहिती इतर माध्यमांतून काढता येते. अपहरण ज्या व्यक्तीचे होते, तिचा पुरेपूर अभ्यास अपहरणकर्त्यांनी केलेला असतो हे वारंवार दिसून आले आहे.

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं शक्यतो आनंददायक घटनांची असावीत. कारण प्रत्यक्ष जेव्हा अपहरण होते तेव्हा अपहृत व्यक्ती आधीच प्रचंड तणावाखाली असते. अशा वेळी दु:खद प्रसंगाच्या आठवणी शक्यतो काढू नयेत, येऊ नयेत; त्यामुळे मृत्यू, अपघात, नोकरी सुटणे, घटस्फोट अशा मुद्द्यांचा उल्लेख या प्रश्नावलीत करायचा नसतो. प्रतिकूल परिस्थितीत ज्या आठवणी आशा जागी ठेवतील, आनंद देतील, चेह-यावर हसू आणतील, उमेद जागवतील असेच प्रश्न द्यावेत अशी अपेक्षा असते; आणि ज्या परिस्थितीत ही प्रश्नोत्तरं होतील तिचा विचार करता हा सल्ला योग्यच म्हणावा लागेल.

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून देताना मला बराच विचार करावा लागला. एक म्हणजे आपल्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे टप्पे सार्वजनिक असतात; ते अनेकांना माहिती असतात.

दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ. म्हणजे उदाहरणार्थ मी “आवडता संगीतकार” असा प्रश्न आणि त्याचं उत्तर सहजतेने देऊ शकते. पण आनंद मोडक, श्रीधर फडके, ओ पी नय्यर, सचिनदा (बर्मन) अशी काही नावं मी लिहिली; तर माझ्या युरोपियन किंवा अमेरिकन किंवा ब्रिटीश सुरक्षा अधिका-याला (जे अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करतील) ही नावं बरोबर कळतील का? त्यामुळे केवळ माझा सांस्कृतिक संदर्भ लक्षात न घेता समोरच्या माणसात आणि माझ्यात कोणते समान धागे आहेत त्याचा विचार मला करायला लागला. बिकट परिस्थितीत, इथले लोक माझे उच्चार समजू शकतील का, आणि मी त्यांचे उच्चार समजू शकेन का – असा प्रश्न मनात आला. आपल्याकडच्या जागांची नावं, आपल्या लोकांची नावं, आपले सांस्कृतिक संदर्भ आपल्याला जितके सहज वाटतात तितके इतरांना वाटणार नाहीत हे लक्षात घेऊन काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बदलावी लागली.

तिसरं म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीत; जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवर आपल्याला खरंच काय आठवेल याचाही विचार करावा लागला. ज्या गोष्टी आत्ता महत्त्वाच्या वाटतात त्या नेहमी तितक्याच महत्त्वाच्या रहात नाहीत हे लक्षात ठेवून ‘खरोखरचं आनंदाचे क्षण’ लिहावे लागले. तसे खूप क्षण आपल्या आयुष्यात आहेत हे कळून बरं वाटलं. उच्चांरांमध्ये गडबड होऊ नये, उत्तर चुकीचं दिलं असं वाटू नये म्हणून मी सगळं कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलं.

दुस-या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास जाग आली ती पक्षांच्या किलबिलाटाने. इतक्या विध्वंसातही हा ऐकू येतो आहे याचा त्या क्षणी फार दिलासा वाटला. आणि उत्साहाने मी उठले.

ऑफिसात पोचल्यावर मी लिहून दिलेला कागद न पाहताच जॉर्जने सीलबंद केला आणि त्याच्या कपाटात ठेवून दिला. मग हसून मला म्हणाला, “ही आपत्कालीन परिस्थितीसाठीची एक व्यवस्था आहे. आजवर मला एकदाही अशा कागदाचा उपयोग करावा लागला नाही अफगाणिस्तानमध्ये. त्यामुळे काळजी करू नकोस उगाच, मात्र काळजी घे! ”

जॉर्जच्या स्वरांतली भावना ओळखून मी हसले. अखेर आपल्या जिवंत असण्याचा पुरावा फक्त कागदांवर थोडाच असतो? तो तर जगण्यात असतो. आता इथं जे काही असेल ते उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने पाहून घेतलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असं म्हणत मी पुढच्या कामाला लागले.

क्रमश:

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

समाजअनुभव

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

12 Dec 2014 - 1:08 pm | बॅटमॅन

निव्वळ अप्रतिम. _/\_ वाचूनच थरकाप होतो.

अलीकडे तालिबान्यांनी ठार केलेल्या कै. सुश्मिता बॅनर्जी यांचे 'काबुलीवालार बाङाली बोउ' नामक पुस्तक आठवले. त्यातील वर्णनेही अशीच आहेत. त्याचा सारांश कधी जमल्यास इथे डकवेन.

कवितानागेश's picture

12 Dec 2014 - 1:26 pm | कवितानागेश

हम्म.... युद्धभूमी!!

रुस्तम's picture

12 Dec 2014 - 1:27 pm | रुस्तम

_/\_

स्नेहल महेश's picture

12 Dec 2014 - 1:34 pm | स्नेहल महेश

अप्रतिम. _/\_

बोका-ए-आझम's picture

12 Dec 2014 - 1:53 pm | बोका-ए-आझम

निव्वळ अप्रतिम! Proof of Life तर जबरदस्तच!

पुढच्या भागाची उत्कंठतेने वाट पाहतो आहे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it
Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin'
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'

काळा पहाड's picture

12 Dec 2014 - 2:19 pm | काळा पहाड

थरारक वर्णन. एका प्रश्न. तालिबानला संपवणं अमेरिकेला एवढं का जड जातंय? हाच प्रश्न मला पाकिस्तानच्या (सो कॉल्ड) लढ्याबद्दल आहे जो नॉर्थ वेस्ट वजिरिस्तानात चालू आहे. सर्व मशिनरी, सर्व शस्त्रे सरकारी यंत्रणेला हाताशी असताना कार्पेट न्युक्लीयर बाँबिंग करण्याची क्षमता असताना अमेरिकेला तालिबानशी तह का करावा लागतोय?

मधुरा देशपांडे's picture

12 Dec 2014 - 2:20 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम. तुमचे अनुभव/लेख नेहमीच वाचनीय असतात. पण खास करुन त्यातल्या काही वाक्यांमधुन गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन खूप काही शिकवुन जातो. 'आजच्या दिवशी एक तास जास्त मिळाला' हे किंवा याही लेखातला शेवटचा परिच्छेद. ग्रेट.
पुभाप्र

समिर२०'s picture

12 Dec 2014 - 2:50 pm | समिर२०

अप्रतिम
पुभाप्र

आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे इनसाइट दिसायला सुरूवात झालीयं. लेखाबद्दल काय बोलणार! असे अनुभव केवळ मनात खोल, कायमचे विसावले जातात. तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलंय, आम्हांला तर निव्वळ तुमचे लेखन वाचूनच तिथल्या तणावपूर्ण परिस्थितीत स्वतः असल्यासारखं वाटतंय.

अवांतर - मला नेहमी असं स्वतःबद्दल वाटतं की मी फार शूर आहे, अजिबात घाबरत-बिबरत नाही. शेकडो-हजारो शत्रू एकाच वेळी चालून आले, माझ्याकडे काहीही उरलेलं नाही, कितीही प्राणघातक परिस्थिती असेल तरी मी लढेन बेदरकारपणे. पण कधी शांत विचार करताना जाणवतं की हे शौर्य वगैरे जे काही असतं ते म्हणजे आपल्याला वाटत असलेली भीती नाकारण्याचं अमर्यादित कौशल्य आहे, दुसरं काही नाही. आणि मग फार विचारपूर्वक स्वतःला अशा परिस्थितींमध्ये झोकून देऊन आपले चांगले उद्दिष्ट साध्य करण्याची धडपड, जिद्द टिकवून ठेवणार्‍या व्यक्तींचं कौतुक वाटतं.

भीतीच्या भिंती ही लेखमालिका असो, वा बोका-ए-आझम यांची अंधार-क्षण असो किंवा स्पार्टाकस यांची नुकतीच संपलेली फाळणीवरील क्रमशः कादंबरी असो - असे लेखन मला स्वतःभोवतालच्या कल्पित रेशमी कोशाचे अस्तित्त्व तपासून पहायला भाग पाडते आणि त्यातून काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणाही देते हे या लेखांचे यश आहे. त्याबद्दल अशा सर्व लेखकांचे खरंच आभार!

अजया's picture

12 Dec 2014 - 3:21 pm | अजया

वाचतानासुध्दा ताण येतो अशा ठिकाणी जाण्याचा निर्णय कसा घेऊ शकलात तुम्ही?भिती नाही का वाटली? का थरार वाटला नवा अनुभव घेण्याच्या कल्पनेचा? तुम्हाला काही झालं तर..असं नाही का वाटुन गेलं?

लाडू's picture

12 Dec 2014 - 3:48 pm | लाडू

अप्रतिम

मित्रहो's picture

12 Dec 2014 - 5:10 pm | मित्रहो

प्रत्येक वेळेला विचार करत होतो मी या परिस्थितीत असतो तर काय केले असते काय विचार मनात आला असता.

Gayatri Muley's picture

13 Dec 2014 - 11:57 am | Gayatri Muley

असेच म्हणते...!!!

यशोधरा's picture

12 Dec 2014 - 5:22 pm | यशोधरा

गुडनेस!

सुरेख म्हणताना पण जीभ अडखळतेय. थरारक अनुभव!
सध्या गेले काही महीने ज्या रिपोर्टसचे अपहरण सुरु (परत!) झाले आहे त्यावरुन प्रुफ ऑफ लाईफ प्रश्नांबद्दल वाचुन अजुनच दाहकता जाणवली.

वर्णन थरारक आहे. फोटूंमुळे सगळं जिवंत वाटतय.

रामपुरी's picture

12 Dec 2014 - 9:20 pm | रामपुरी

आपली तर जायची छाती झाली नसती...

विनोद१८'s picture

12 Dec 2014 - 10:27 pm | विनोद१८

..छानच लिहीलय, प्रत्येक भागागणिक नाट्यमयता व उत्कंठा वाढु लागलीय.'

अर्धवटराव's picture

12 Dec 2014 - 10:31 pm | अर्धवटराव

तुम्ही नेमकं काय करता याची उत्सुकता आहे :)

प्रचेतस's picture

12 Dec 2014 - 10:58 pm | प्रचेतस

तिथले स्थानिक नागरिक कुठल्या परिस्थितीत जगत असतील ह्याची कल्पनाही करवत नाहीये.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 1:49 am | मुक्त विहारि

"काळजी करू नकोस उगाच, मात्र काळजी घे!”

हे वाक्य बरेच काही सांगून जाते.

नाखु's picture

15 Dec 2014 - 12:35 pm | नाखु

"खास टच" संयत-स्वाभाविक लेख.
थोडी नम्र सुचवणी:
"काळजी करू नकोस उगाच, मात्र काळजी घे":
ऐवजी
"काळजी करू नकोस उगाच, मात्र सतर्क रहा!”

काय म्हणायचंय कळलं नाही हो?

'काळजी करू नको, मात्र काळजी घे' हे मी पूर्वी पण ऐकलं आहे. त्यात काय झालं?

रमेश आठवले's picture

13 Dec 2014 - 9:51 am | रमेश आठवले

कायम डोक्यावर टांगती तलवार असलेल्या वातावरणात काहीतरी मोलाचे सामाजिक कार्य करायला तुम्ही गेला आहात या बद्दल तुमचे कौतुक करावेसे वाटते.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रदेश यावर गेले २५०-३०० वर्षे कोणत्याही केंद्रीय शासनाची सत्ता चालू शकलेली नाही . ब्रिटीशांनी बरेच वर्षे लढाया करून शेवटी हात टेकले . त्यानंतर त्यांनी या भागाची गणना रशिया आणि भारता मधील त्यांच्या साम्राज्या मधील सुरक्षित प्रदेश ( buffer state) अशी केली . रशियाने नुकतेच बरेच प्रयत्न केले परंतु त्यांच्या सैन्याची फरफट झाली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. आता अमेरिकनांची तीच अवस्था झाली आहे आणि ते काढता पाय घेत आहेत. ओसामाला पकडण्याचे निमित्त करून ते तेथे गेले पण त्याना ओसामा सापडला मित्र (?) देशा मधे.

स्नेहल महेश's picture

13 Dec 2014 - 12:11 pm | स्नेहल महेश

पुढच्या भागाची उत्कंठतेने वाट पाह्तेय........................

थरारक आहे. नेमकं कुठलं साल हे?
पु भा प्र

विवेकपटाईत's picture

13 Dec 2014 - 7:49 pm | विवेकपटाईत

लेखन वाचताना एका अनामिक भीतीची जाणीव झाली, आपण आपल्या देशात एक सुरक्षित आयुष्य जगत आहो, तिथली कल्पना आपण करू शकत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

13 Dec 2014 - 9:26 pm | श्रीरंग_जोशी

एकदम थरारक अनुभवकथन.

भारतासारख्या देशात जन्माला आलो ही किती भाग्याची गोष्ट आहे हे अफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत वाचताना पदोपदी जाणवते.

या लेखनप्रपंचासाठी मनःपूर्वक आभार.

पैसा's picture

13 Dec 2014 - 10:04 pm | पैसा

अगदी नेमकं आणि ताकतीने लिहिलेलं.

ज्योत्स्ना's picture

14 Dec 2014 - 5:41 pm | ज्योत्स्ना

अतिवास तुमच्या धाडसाला सलाम.
तुमचं काम, तुमचा आसपासच्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण नेहमीच आवडतो.
सध्याच्या वातावरणात तुमच्या लिखाणातून सूचित केलेला धोका अचूक लक्षात येतोय.

सचिन कुलकर्णी's picture

14 Dec 2014 - 6:56 pm | सचिन कुलकर्णी

तुमच्या धाडसाला आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला आमचा शि.सा. नमस्कार.

चुकलामाकला's picture

15 Dec 2014 - 8:50 am | चुकलामाकला

वा! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे.

दशानन's picture

15 Dec 2014 - 12:58 pm | दशानन

थरकाप !!!!!

आतिवास's picture

15 Dec 2014 - 4:29 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

मिहिर's picture

15 Dec 2014 - 6:40 pm | मिहिर

अनुभव, लेख, शैली हे सगळेच फार आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

सुबोध खरे's picture

15 Dec 2014 - 8:21 pm | सुबोध खरे

अफघाणीस्तान सारख्या देशात तेसुद्धा एखाद्या स्त्रीने जाणे हे फार धाडसाचे काम आहे. मूळ अफगाणी लोक भारतीयांबद्दल आत्मीयता बाळगून आहेत. परंतु तालिबानी आणि परदेशी दहशतवादी हे अत्यंत कट्टर क्रूर आणि कडवे आहेत. मानवी मुल्ये हि त्यांना अजिबात मंजूर नाहीत. त्यातून कोण चांगला आणि कोण वाईट हे ठरविणे कठीण आहे अशा परिस्थितीत आपण तेथे गेलात याबद्दल आपल्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
माझा मित्र अफगाण युद्ध्च्या वेळेस तेथे नॉर्दर्न अलायन्स ला मदत करायला गेलेल्या भारतीय लष्कराच्या वैद्यकीय तुकडीत होता आणि तो मझारे शरीफ येथे काढलेल्या रुग्णालयात काम करीत असताना सांगितलेले अनुभव अंगावर काटा आणणारे होते. या पार्श्वभूमीवर आपलय धैर्याला सलाम.

एका वेगळ्या जनसमुहातुन आलेल्या व्यक्तीला वेगळाच अनुभव देतात.
ते याकडे कस पाहत असतील ?

काव्यान्जलि's picture

22 Dec 2014 - 6:16 pm | काव्यान्जलि

थरकाप उडवणारे वर्णन आहे . पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे .

मृत्युन्जय's picture

24 Dec 2014 - 1:01 pm | मृत्युन्जय

अखेर आपल्या जिवंत असण्याचा पुरावा फक्त कागदांवर थोडाच असतो? तो तर जगण्यात असतो.

_/\__/\__/\_

अप्रतिम

चिगो's picture

25 Dec 2014 - 9:10 pm | चिगो

अप्रतिम.. थरारक.. तुमच्या धैर्याला, आणि धैर्यालाच नव्हे शौर्यालादेखील सलाम.. ह्या असल्या दडपणात जगणे किती कठीण असते ह्याचा बारीकसा अनुभव आहे. तुम्ही जे दडपण झेललंत, आणि आशावादी राहून झेललंत, त्यासाठी तुमचा अभिमान वाटतो..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2014 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख लेखनशैली. वाचतोय. जगणं सुद्धा किती कठीण असू शकतं, थरारक अनुभव.

-दिलीप बिरुटे

भुमन्यु's picture

27 Dec 2014 - 11:42 am | भुमन्यु

तुमच्या कामाबद्दल आदर आणि उत्कंठा कायमच आहे. तुमच्या हिमतीला सलाम...

उत्कंठावर्धक लेखन.आवडले.पु.भा.प्र.