मुलांना कार आणि मुलीना बाहुल्या खेळायला आवडतात असा एक समज असतो . मला लहानपणी गाड्या फार आवडत. पुढे या क्षेत्रात मागील काही वर्षे काम करायला मिळतंय तेव्हाचा आनंद काय विचारता! या मालिकेची सुरुवात खरं तर जून २०१३ ला जाग्वार वरील लेखाने केली होती. त्यावेळी मिपा अचानक बिघडल्याने उत्साह जरा कमी झाला अन नंतर राहून गेलं. तिथले अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद पण उडून गेले. असो. आता पुन्हा प्रयत्न करतोय.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
दुकानात नारळ पण वाजवून घ्यायचा आणि खराब निघाला तर परतीच्या बोलीवर आणायचा. अशा काळात आम्ही लहानाचे मोठे झालो. आता दुकानदार बहुतेक चौधरी आहेत, आणि हुशार झालेत. खराब नारळ बदलून देतात आणि बाकीच्या भाजीविक्रीतून वसूल पण करतात. सगळेच खूष.
इतकंच काय, बिग बाजारात रद्दीला पण काय भाव आलाय! अशा बदलत्या मार्केटचा परिणाम आतां वाहन उद्योगावर पण झालाय. गाडीला दोष आहे? मग बोलवा परत, द्या सुधारून- तेही मोफत! रिकॉल.
टोयोटा ने साडेआठ लाख गाड्या परत बोलावल्याने ऑटो उद्योगाच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. अरे, किती वेळा? नुकतंच सस्पेन्शन डिफेक्ट साठी पण त्याना असं करावं लागलं होतं. या एकाच कंपनीने गेल्या वर्षभरात अशा विविध कारणानी पन्नास लाख गाड्या मोफत सुधारून दिल्या आहेत.
मागच्या आठवड्यात सुझुकी ने 'डिझायर' परत बोलावल्या आणि आता टोयोटा इनोव्हा वगैरे.
यात फक्त एअर ब्याग वाल्या गाड्यांचा समावेश आहे. त्यात पुन्हा बर्याच मॉडेल्स ला फक्त ड्रायवरलाच एअर्ब्याग आहे.
आता बाजारात विश्वास टिकवून ठेवायचा तर हे आवश्यकच आहे. दिसायला वरकरणी सरळ वाटणारा हा विश्वास संपादनाचा प्रकार इतका खर्चिक की कंपनीच्या मालकांचे डोळे पांढरे होतील. मग कसे करत असतील हे सगळं? हा खर्च नफा मोजताना हिशेबात धरला होता का? थेट कंपनीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह म्हणजे संबंधितांच्या नोकऱ्या जाणार का काय? असा प्रश्न छोट्या गुंतवणूकदाराला पण पडतोच. म्हणजे एकूण हा सारा प्रकार त्रासाचाच. रिकॉलमध्ये अनेक खर्च येतात . दुरुस्तीचा खर्च, कायदेशीर बाबींवर होणारा खर्च, आणि प्रतिमा सुधारण्यासाठी आणि जाहिरातबाजीचा खर्च. हा बहुतेक कंपन्या नियोजनाने बाजूला ठेवतात.
महागड्या गाड्या घेणाऱ्या ग्राहकाला आराम आणि सुरक्षितता हे दोन्ही हवेच हवे. मग खर्चिक फीचर्स सुधा बेसिक होऊन बसतात. स्पर्धेमुळे एकाने केले ते सगळे करू पहातात. आधीचे ऐकलेले/ पाहिलेले गाड्या बंद पडण्याचे आणि अपघाताचे प्रसंग आठवतात. मग मर्सिडीज किंवा टोयोटा सर्वात सुरक्षित वाटायला लागतात. त्यांच्या क्लबात जाण्यासाठी मग इतरांची पण धडपड!
गाड्या परत बोलावण्याचा पहिल्यांदा थेट परिणाम पुढील विक्रीवर होतो- दोन्ही प्रकारे!
पहिला संदेश जातो की डिझाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग नंतर विचार होतो की हरकत नाही, चला, पण प्रॉब्लेम आहे हे लक्षात आल्यावर तरी दुरुस्त करून देताहेत हे काय कमी आहे?
मग ती कंपनी माझ्या दृष्टीने चांगल्या यादीत जाते आणि असे न करणारे आपले दोष झाकून तसेच विकतात का काय? असा संशय निर्माण होतो.
अजून एक प्रश्न रहातोच, की तोच तो प्रॉब्लेम परत येतोय का दर वेळी नवा काहीतरी आहे? तोच असेल तरी यांना अजून कायम स्वरूपी उपाय मिळाला नाही ? असा प्रश्न येतो. आणि दरवेळी वेगळे काही दोष असतील तरी यांचं काहीच खरं नाही असाच संदेश जाणार! त्यातून जपानी कंपन्या म्हणजे '' प्राण जाय पार वचन ना जाय'' अशा बाण्याच्या. आणि जर्मन पण त्यांचे भाउबंद '' जस्ट इन टाईम'' पासून आतापर्यंत टोयोटा म्हणजे दर्जा, आणि त्यांच्या दर्जा नियंत्रण- उत्पादन पद्धती म्हणजे इतरांनी अनुभवाचे बोल म्हणून घ्यायच्या. मग लहानसा दोष दिसला तरी गाड्या परत बोलवायच्या म्हणजे मग असा संदेश जातो की बाजारात मिळणारी प्रत्येक गाडी सर्वोत्तमच आहे. आणि कंपनी आपल्यासाठी 'कायपण' करायला तयार आहे.
आता टोयोटा चा या वेळचा मुख्य दोष तरी काय होता? तर स्टीयरिंग सिस्टीम जवळील एअरब्याग कंट्रोल मोड्यूल वर पाणी गळून शोर्ट सर्किट होण्याची शक्यता लक्षात आली. मग आधी नाही का कळलं? तर नाही. जगभरात काही मोजके अपघात झाले आणि त्याचं विश्लेषण करताना हे लक्ष्यात आलं. मग सुरु- हे मोड्यूल अजून आपल्याच कुठल्या कुठल्या मॉडेल मध्ये जाते? बरं, ज्या गाडीत हे जात नाही तिथे त्या ऐवजी दुसरं काय बसवले आहे? त्याला काय धोका असू शकतो? कुठल्या कंपनीचं मोड्यूल होतं? वगैरे वगैरे. बरं, सुटे भाग कुठलेही असले तरी गाडीत ते सुटसुटीत मावणे, बसवणे महाकठीण. कशालाच जागा नसते, इतकं गच्च भरलेलं. आणि वेळेचा सतत दबाव. यातून अशा थोड्या गोष्टी राहून जातात. डिझाईनरकडून त्या परत होणं हा अपराध मानला जातो! आणि टीम मध्ये कुणाची तरी दुसरी वेळ असतेच.
यां व्यतिरिक्त वायपर मोड्यूल, सीट रेल या सर्व सुरक्षिततेच्या संबंधित भागांचाच समावेश एकूण दोषांमध्ये आहे. संदेश एकदम स्वच्छ स्पष्ट आहे- आम्ही सुरक्षिततेशी तडजोड करत नाही.
गेल्या वर्षी फियाट सिएना मध्ये एक वेगळा दोष होता. ड्रायव्हरने पेडल न दाबताच गाडी आपोआप पार्क मोड मधून बाहेर येत असे. म्हणजे गाडीतली इतर मोड्यूल्स गाडीच्या ''सध्याच्या स्टेटस'' प्रमाणे वागतात, त्यामुळे या दोषामुळे त्यांचे काम नको तेव्हा मधेच सुरु होणार! सारंच धोकादायक. मग? बोलवा परत, बदला सोफ्टवेअर.
आता आपल्याला वाटेल यातला खर्चिक भाग म्हणजे खराब असलेले सुटे भाग आणि ते बदलणे! त्याचा खर्च होत असेल. पण गम्मत तिथेच आहे. मुख्यत्वे हे दोष सोफ्टवेअरशी संबंधित आहेत. एका गाडीत वेगवेगळी जवळ जवळ पन्नास मोड्यूल्स. अपडेट फक्त दोषी मोड्यूल करायचं. गाडी येणार, नवे सोफ्टवेअरवर्जन टाकून, ऑटो टेस्ट करून बाहेर!
अर्थात सर्व वेळी सोफ्टवेअर चा दोष असतो असे नाही पण पूर्वीच्या काळी जेंव्हा गाडीत इलेक्ट्रोनिक्स अजिबात नव्हते त्या काळी महागडे भाग पण खराब असत, आणि बदलून दिले जात. कधी कधी तर केवळ ग्राहकाला एखाद्या गोष्टीचा '' वैताग'' येईल म्हणूनही रिकॉल्स होतात. गेल्या पन्नास वर्षात ८५०० रिकॉल्स झाले आहेत.
यांत्रिक किंवा काच, धातू- प्लास्टिक भागांमध्ये क्वचितच दोष सापडतात, कारण ते वेळोवेळी सुधारले जातात, आणि त्यांचे दर्जा नियंत्रण अधिक चांगले होते. पण सोफ्टवेअर चे तसे नाही. एका मोड्यूल च्या निर्मितीत अनेक देशातले अनेक घटक एकाच वेळी काम करत असतात. अतिशय किरकोळ बदल असेल तरी पूर्ण सोफ्टवेअर पुन्हा तपासण्याची पद्धत आणि त्यासाठी अंतरराष्ट्रीय नियमन आहे. आणि तेही तपासायचे म्हणजे संगणकावर नव्हे तर प्रयोग शाळेत- जिथे गाडीचे प्रतिरूप तयार असते आणि बाकीच्या सर्व मोड्यूल्स मध्ये अद्ययावत सोफ्टवेअरवर्जन असतो. आता हे परत परत करायचे म्हणजे तोच-तोच पणा आणि कंटाळा आलाच म्हणून समजा! मानवी चुकाना तर अक्षता देऊन आग्रहाचं निमंत्रण.
आणि सोफ्टवेअर म्हटलं की जगात कुणालाही आधी आठवतात ते भारतीय इंजिनियर्स! आज वाहन उद्योगाला इलेक्ट्रोनिक भाग पुरवणाऱ्या जगातल्या प्रत्येक कंपनीचं पुणे किंवा बंगळूरूला विकसन केंद्र आहे. शोधल्यास अपवाद सापडेल इतकंच. हे इंजिनियर्स बरीच मेहनत घेतात. बरेचदा असं म्हटलं जातं कि दुय्यम काम भारतात येतं, पण तसं नाही. अतिशय क्लिष्ट, तांत्रिक आणि महत्वाचं काम करणाऱ्या कंपन्यां पहात आहे. ऑटोमोटिव्ह आणि विमान वाहतूक क्षेत्रातले प्रकल्प करताना काटेकोर नियम पाळावे लागतात. हे करताना झालेल्या मानवी त्रुटी असे रिकॉल्स घडवून आणतात.
असं म्हटलं जातं, की टोयोटा, जनरल मोटर्स आणि फोर्ड ने जितक्या गाड्या रिकॉल केल्या तेवढ्या भारतीय कंपन्यांनी अजून बनवल्या पण नाहीत. भारताचा आताचा झपाटा पहाता ते विधान फार काळ टिकणार नाही.
असो, तर मंडळी, आपली काय टोयोटा नाय, तुमच्याकडे टोयोटा असेल तर ती रिकॉल केलीय का? हे पहायला टोयोटा वेबसाईट वर जाउन गाडीचा १७ अक्षरी VIN ( वाहन ओळख क्रमांक) टाकून पहा. तोपर्यंत मी पण जरा इथेच जाउन येतो! माझ्या इंडिकेतुन. :)
क्रमश:
प्रतिक्रिया
11 Apr 2014 - 4:27 am | खटपट्या
मारुती डीझायर परत शोरूम मध्ये बोलावल्या असे खालील लिंक वरून माहित पडले.
http://epaper.freepressjournal.in/epapermain.aspx
माझी डीझायर आहे पण अजून मारुती मधून फोन वगैरे काही नाही. अधिकृत माहितीसाठी मारुती मध्ये करून बघतो.
धन्यवाद.
11 Apr 2014 - 4:31 am | बहुगुणी
वॉल स्ट्रीट जर्नल मधला याच विषयावरचा लेख नुकताच चाळला होता. टोयोटाबरोबरच फोर्ड, बीएमडब्ल्यू, फियाट, जीएम अशा बर्याच कंपन्यांनी मिळून गेल्या वर्षभरातच १५ दशलक्ष गाड्या परत बोलवल्या आहेत. रेग्युलेटर (नियामक?) संस्थांच्या रेट्यामुळे आणी कोर्टांमधल्या बदनामीकारक खटल्यांच्या भीतीने या कंपन्यांनी असे रिकॉल्स केले आहेत असं दिसतं.
(अवांतरः गाड्यांच्याच नव्हे तर औषधं, खेळणी, अन्नपदार्थ, शेतमालासंबंधित रसायनं, वगैरे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात लागू केलेले असे 'रिकॉल्स' अमेरिकेत एकाच ठिकाणी या शासकीय संस्थळावर शोधता येतात. अशी सोय भारतात आहे का माहीत नाही.)
11 Apr 2014 - 9:37 am | धन्या
तांत्रिक माहिती हसत खेळत सांगणारा हा लेख आवडला.
एक शंका, वाहनांमधील सॉफ्टवेअर एम्बेडेड प्रकारात येतं ना? यामध्ये मुख्यत्वाने १६ बीट सुक्ष्म-नियंत्रक (मायक्रो-कंट्रोलर्स) वापरले जातात असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
इंटेल ८९सी५१ आणि अर्ड्युइनो बोर्डवरील अॅटमेल अॅटमेगा ३२८पी शी छेडछाड केलेली असल्यामुळे यावर अधिक जाणून घ्यायला आवडेल. :)
11 Apr 2014 - 4:12 pm | आत्मशून्य
कार इंजीनसारख्या ठिकाणी ते तापुन जळत का नाहीत याचे मात्र कुतुहल आहे.
11 Apr 2014 - 10:40 am | माईसाहेब कुरसूंदीकर
सुंदर रे खेडूता. मध्यंतरी काही नॅनो पेटल्याची काही चित्रेही प्रसिद्ध झाली होती.त्या परत घेतल्या असतील टाटांनी. ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या बर्या म्हणते मी. उकडतय? काचा खाली करा.गाणी ऐकायची आहेत? घरी बसा व रेडियो लावा.
(अॅम्बेसेडरमधून अनेक वेळा प्रवास केलेली)माई
11 Apr 2014 - 11:22 am | धन्या
तेव्हढं तरी कशाला, मी तर म्हणतो लोकांनी बैलगाडीच वापरावी प्रवासासाठी. वेग फार नसल्यामुळे खुपच सुरक्षित. शिवाय काचा वगैरे खाली करायची भानगडच नाही. फुल्ली कन्व्हर्टीबल. आणि वारा गाणे गात असताना गाडीत गाणी वगैरे लावायचीही भानगड नाही.
11 Apr 2014 - 4:03 pm | आत्मशून्य
अॅम्बेसेडर आजही सर्वात आरामदायी, लक्सुरिअस आणी अक्षरशः प्रेमात पडावे अशीच गाडी आहे. जरासा द्रुश्यानुभव(लुक अन फिल) सुधारला तरी पुरेसे आहे. एकदम तगडी गाडी आहे.
11 Apr 2014 - 11:06 pm | शुचि
आमची भारतातील पहीली व शेवटची :D कार अॅम्बीच होती.
11 Apr 2014 - 2:49 pm | आदूबाळ
सुंदर लेख!
या रिकॉलच्या खर्चाचं काय करतात - यावर दोन पैसे:
ऑटो कंपन्या दरवर्षी "वॉरंटी प्रोव्हिजन" या नावाखाली तरतूद करून ठेवतात - मग प्रत्यक्षात रिकॉल येवो-ना-येवो. ही तरतूद भूतकाळातल्या रिकॉल/रीप्लेसमेंटच्या अनुभवावर आधारित असते.
हुषार कंपन्या या ऐवजी (कधीकधी याबरोबर) रिकॉल/वॉरंटीचा विमा उतरवतात. "स्विस री" नावाची कंपनी यासाठी प्रसिद्ध आहे. पण हे दरवेळी शक्य होत नाही - विशेषतः नवीन मॉडेल्सच्या बाबत.
मग कंपन्या "एक्सटेंडेड वॉरंटी" देतात. माझ्या नॅनोला तब्बल चार वर्षांची वॉरंटी दिली होती! दोन वर्षांत मी नॅनो मनसोक्त हुंदडली. नंतर मित्राने ती माझ्याकडून विकत घेतली, आणि मी खराब केलेले (म्हणजे जवळजवळ सगळे) पार्ट बदलून आता तो ती मस्त वापरतो!
11 Apr 2014 - 3:51 pm | मुक्त विहारि
आवडला..
11 Apr 2014 - 3:55 pm | मदनबाण
मला असा माझ्या दुचाकीचा अनुभव आहे, माझ्याकडे कॉलेजमधे असताना टीव्हीएस स्पेक्ट्रा होती.तीच्या कीकच्या कुठल्याश्या पार्ट मधे दोष होता.कंपनीने फोन करुन मला बोलावुन घेतले आणि पार्ट बदलुन दिला.
हल्लीच बीएमडब्लू च्या रिकॉलवर बातमी पाहिली होती,त्या कंपनीच्या {बहुतेक} सीइओ चे कोर्टात जाब-जवाब चालु होते आणि कोर्टाच्या बाहेरुन वर्ताहर वार्तांकन करत होता.त्यांच्या 156,137 लक्सरी कार्स रिकॉल करण्यात आल्या आहेत.
बाकी अधिक इथे :-
BMW recalls popular cars, SUVs for possible stalling
BMW to recall more than 156,000 vehicles in U.S.
All the Cars Recalled So Far This Year
11 Apr 2014 - 4:58 pm | प्रमोद देर्देकर
मस्त लेख माहितीपुर्ण आहे.
ही माई कोणाचा तरी डु आयडी आहे कोण ब्ररं ? प्रत्येक लेखाला प्रतिसाद आहेच तिचा.
11 Apr 2014 - 5:23 pm | सौंदाळा
+१
हेच म्हणायला आलो होतो.
11 Apr 2014 - 5:27 pm | शुचि
लेख छानच आहे.
हे भारी!!
11 Apr 2014 - 10:57 pm | खेडूत
धन्यवाद!
@ धन्या: होय, हे एम्बेडेड सोफ्टवेर असते.८, १६ आणि ३२ बिट मायक्रो कंट्रोलर्स वापरतात. शिवाय आसिक्स पण.
@ आत्म्शून्य:
>> कार इंजीनसारख्या ठिकाणी ते तापुन जळत का नाहीत याचे मात्र कुतुहल आहे.
- ते पुढे येणारच आहे.
@ माईसाहेब: वारंटी आणि कॉल ब्याक वेगवेगळे. पण पाहिल्याचं विश्लेषण करताना कारणं कळली तर दुसऱ्या बाबत निर्णय होतो. अॅम्बेसेडर बाबत सहमत नाही. आता एखाद्या बऱ्यां गाडीतून प्रवास करा, मग बघा काय वाटते, :)
@ आदुबाळ: छान माहिती! धन्स.
इतर सर्वांचेही आभार.
13 Apr 2014 - 9:23 pm | सचिन कुलकर्णी
<< आता एखाद्या बऱ्यां गाडीतून प्रवास करा, मग बघा काय वाटते >> +१
13 Apr 2014 - 9:24 pm | सचिन कुलकर्णी
यासाठी +१
13 Apr 2014 - 9:17 pm | पैसा
खूप माहितीपूर्ण लिहिले आहे.
15 Apr 2014 - 12:15 am | विजुभाऊ
बरं आहे बॉ " तो बील गेट्स गाड्या बनवत नाही ते.
प्रत्येक वेळेस गाडी रीस्टार्ट करायला लागली असती.
15 Apr 2014 - 12:18 am | शुचि
हाहाहा
15 Apr 2014 - 12:55 am | श्रीरंग_जोशी
या निमित्ताने मायक्रोसॉफ्ट वि जनरल मोटर्स चे विनोद पुन्हा एकदा वाचले :-).
GM replies to Bill Gates
लेख आवडला. विषय रोचक असला तरी लिहायला आव्हानात्मक असावा असा अंदाज आहे.
1 May 2014 - 1:33 am | रेवती
माहितीपूर्ण लेखन आहे. आवडले.