'जग्वार लॅंडरोव्हर' हस्तांतरण: पाच वर्षे

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
2 Jun 2013 - 7:43 pm

2 जून 2013.
आज बरोबर पाच वर्षं झाली. भारताच्या आणि जगाच्याही औद्योगिक इतिहासात अत्यंत महत्वाच्या घटनेची नोंद झाली. ती म्हणजे टाटा नी जग्वार लॅंडरोव्हर खरेदी केली.
फोर्ड समूहातली ही कंपनी. अमेरिकेतल्या वाहन उद्योग मंदीचं निमित्य झालं आणि तिथला मोठा तोटा भरून काढण्यासाठी फोर्ड ला हे पाऊल उचलावे लागले होते. तशी त्यांच्याकडे ही कंपनी फार वर्षे नव्हतीच. हे दोन समूह पूर्वी बी एम डब्लू आणि वोल्वो कडे पण होते. आणि सहा सात वर्षेच काय ती एकत्रपणे फोर्ड समूहाकडे होते.

या बातमीने जगभरातल्या ऑटो उद्योगाच्या भुवया उंचावल्या. दोन हजार साली टेटली आणि आता आधीच्या वर्षीच टाटांनी ब्रिटीश स्टील खरेदी करून त्या उद्योगात जगातील तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. पण स्वस्तातली टाटा न्यानो येणार अशीही बातमी आली होती. मग बाराशे डॉलर ची कार बनवणारी कंपनी चौसष्ठ हजार डॉलर्स ची कार पण बनवणार हे लोकाना झेपलेलं नव्हतं.

कंपनी कोण घेणार अशी चर्चा एक वर्षभर चालू होती. स्पर्धेत अजून एक भारतीय महिंद्र उद्योग समूह आणि एक ब्रिटीश कंपनी- जे. सी. बी. पण होती. प्रत्येकाच्या आपल्या अटी होत्या. महिंद्र आणि महिंद्र ला फक्त लॅंडरोव्हर घेण्यात रस होता. कारण त्यांच्या सुरु असलेल्या वाहनाच्या मालिकेसाठी फायदा उठवणे इतकाच उद्देश होता. त्याउलट टाटा ला वाहन उद्योगात अग्रेसर ठेवणारी प्रत्येक गोष्ट हवीच होती. फोर्ड ला संपूर्ण उद्योग एकाच व्यवहारात विकायचा होता. शेवटी टाटा बरोबर २.३ बिलियन डॉलर्स ला हा करार निश्चित झाला.

हा करार अतिशय कल्पकतेने केला गेला. नुसती किंमत दिली आणि घेतली कंपनी असे तर हे करार होत नसतात. पुढे तो उद्योग चालू ठेवण्यासाठी लागणारे घटक आणि त्यासंबंधीचे ज्ञान-माहिती, सोफ्टवेअर प्रणाली याचे आदानप्रदान सुद्धा होते. शिवाय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा काही भाग तसेच सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांचा कर्जपुरवठा पुढील काही वर्षे फोर्ड ला सुरु ठेवावा लागणार होता. त्यामुळे करारातले मुद्दे आणि टाटा व्यवस्थापन म्हणजे पुढील यशाची जणू खात्रीच झाली आहे असं आर्थिक मूल्यांकन करणाऱ्या कंपन्यांनी म्हटलं होतं. यासाठी आधार म्हणून समूहाच्या एकूण उद्योगाचा जगभरातला पसारा आणि व्यवस्थापनाचा एकत्रित अनुभव पहाण्यात आला होता.

अखेर दोन जूनला निर्णय जाहीर झाला. याबरोबर सुमारे सोळा हजार इंग्रज कर्मचारी टाटा समूहात वाढले. टाटा ब्रिटन मधील खासगी क्षेत्रातले सर्वांत मोठे उद्योजक झाले.

बऱ्याच ब्रिटीश लोकाना मनापासून वाईट वाटत होते की एक भारतीय कंपनी जग्वार विकत घेतीय. आता मात्र तेच समाधान व्यक्त करतात. आधीच मूळ ब्रिटीश असलेल्या कंपन्यांची अधोगती झाली होती. त्यातून जग्वार बद्दल कमालीचा अभिमान सामान्य नागरिकाना वाटे. फोर्ड च्या काळात वीस टक्के कर्मचारी कपात करणार अशी चर्चा होती. मग टाटा पण तसे करेलच अशी लोकांची खात्री होती. कंपनीतल्या काहींनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली होती. तयारी म्हणजे काय जवळ जवळ निवृत्तीचीच तयारी- कारण इतकी चांगली वाहन कंपनी इंग्लंडात नाही आणि ज्या आहेत त्याही संकटातून जात होत्याच. त्यामुळे त्या कंपन्या याना घेऊ शकत नव्हत्या. जर्मनीला या क्षेत्रात माणसांची गरज नेहमी असते. पण इंग्रजाना तिथे जाण्यातही कमीपणा वाटे .. एकूणच निराशा पसरली होती.

सुरुवातीलाच रतन टाटांनी जाहीर केले की कुणालाही काढून टाकण्यात येणार नाही. शिवाय विस्तारीकरणासाठी नवीन भरती पण केली जाईल. एक आनंदाची लाटच पसरली जणू. जाहीर केल्याप्रमाणे होते त्या सर्वाना सामावून शिवाय दीड हजार नवीन कर्मचारी घेतले गेले. शिवाय भारतातल्या टाटा समूहातल्या हजारेक जणांना भरपूर काम मिळालं ते वेगळंच!

नव्या व्यवस्थापानात काम सुरु झाल्यावर अडचणी काही कमी नसतात. त्यावर भरीस भर म्हणून
सांस्कृतिक आव्हानं होती. एका उच्च पातळीवरच्या बैठकीत टाटांनी काही शेरा मारला की शुक्रवारी वरिष्ठ पदावरील मंडळी पण दुपारी एक वाजताच घरी जायला निघतात. हे बदलायला हवे. झालं. गोरे पेटले. दबक्या आवाजात चर्चा सुरु. हे असंच चालणार का काय आता? इथल्या नियमानुसार आठवड्यात चाळीस तासच काम केले की बस!
मग नंतर त्याना शांतीत समजावले गेले. जागतिक मंदी सुरु असताना असे आरामात काम करून चालणार नव्हते. स्पर्धक कंपन्या न थांबता काम करत आहेत ही जाणीव करून दिली गेली, काही मोठ्या ब्रिटीश अधिकार्यांनी कल्पकतेने हे काम केले. शिवाय पूर्ण दिवस काम केल्यास तेवढ्या तासांच्या वाढीव पगाराची खात्री दिली. आणि काय चमत्कार! चार आठवड्यात सगळे आनंदाने शुक्रवारी पूर्ण दिवस काम करायला लागले!

जग्वार ने गेल्या पाच वर्षांत ने केलेली ही प्रगती नक्कीच आश्वासक आहे. एक ब्रिटीश कंपनी, जिचा सर्वोच्च बॉस जर्मन आहे आणि मालक भारतीय! हे शक्य केले ते श्री रतन टाटा यांच्या दूर दृष्टीनं. आज वाहन उद्योगातल्या नफ्यात असलेल्या मोजक्या कंपन्यात ही कंपनी आहे आणि नव्या वाहनांच्या योजना घेऊन येत आहे. चीन मधील खपाचे आकडे पाहून तिथे मागच्या वर्षी चेरी समूहा बरोबर नवा कारखाना सुरु केलाय. काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की आता चीन, मग काय भारतात पण सुरु करतील हे लोक. मग ब्रिटन मध्ये काय रहाणार? त्याला दोन महिन्यात उत्तर मिळाले. इंग्लंड मधेच पस्तीस कोटी पौंड गुंतवून या वर्षी एक नवा इंजिनाचा कारखाना सुरु होतोय. एकूण सगळ्या योजनांमध्ये अजून चारपाच हजार जणांना काम मिळणार. हे सारं पहाताना एक भारतीय म्हणून आणि गेली तीन वर्षे त्या टीम चा एक भाग बनून काम करताना फार आनंद आणि अभिमान वाटतो.जग्वार लॅंडरोव्हर चे अभिनंदन आणि शुभेच्छाही!

गेल्या दोन वर्षातली यशस्वी वाहने:
जग्वार एक्स जे आणि लॅंडरोव्हर इवोक : दोन्ही चित्रे जालावरून साभार.

Jaguar XJ

Evoque

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

2 Jun 2013 - 8:01 pm | श्रीरंग_जोशी

लेखन आवडले. लेख जरा थोडक्याता आटोपल्यासारखा वाटला पण तरीही बर्‍याच महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श झालेला आहे.

यावरून आठवले - विप्रोचे माजी सह सर्वोच्च कार्यकारी अधिकारी श्री गिरीश परांजपे दुसरी कंपनी ताब्यात घेतल्यावर तिचे विप्रोमध्ये संलग्नीकरण सहजपणे करण्याबाबत नेहमी उत्कृष्ट कामगिरी करत.

बहुगुणी's picture

2 Jun 2013 - 8:27 pm | बहुगुणी

लेखात वर्णिलेल्या या दोन गाड्या खूप वेळा दिसतात, आणि दिसल्या की त्यांच्या निर्मितीत आपल्या देशाचा संबंध जाणवून अभिमान वाटतोच!

लाल टोपी's picture

2 Jun 2013 - 8:36 pm | लाल टोपी

खेडूत फारच छान आंतरराष्ट्रीय घडामोडीची माहिती करुन दिलीत.

आदूबाळ's picture

2 Jun 2013 - 8:40 pm | आदूबाळ

सुंदर लेखन! टाटा उद्योगसमूहाबद्दल वाचताना नेहेमीच अभिमान वाटतो. (मोदकरावांचा टायटनवरचा लेखसुद्धा असाच मस्त होता.)

जगातल्या सर्व ऑटो कंपन्या भारतात येत असताना* जेएलआर भारतात का नाही हा प्रश्न तरीही राहिला आहेच. सुट्या भागांच्या खरेदीसाठी किंवा जोडणीसाठी तरी?

अवांतरः खेडूतराव, तुमचा नॅनोच्या टीमशी कधी संबंध आला आहे का हो? त्याबद्दल वाचायला फार आवडेल.

*तुलनेने कमी माहीत असणार्‍या प्यूजोनेही गुजरातेत कारखाना टाकलाय म्हणे.