प्रादेशिक परिवहन अधिकारी यांस पत्र

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
23 Jan 2014 - 7:19 pm

प्रति,

प्रादेशिक परिवहन अधिकारी

विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार

a

माननीय महोदय,

सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे. या सप्ताहानिमित्त जागोजागी वाहतुक नियमांची जाणीव व माहिती करून देणारे फलक आपण उभारता, रस्त्यांवर वाहतुक नियंत्रकांची नेहमीपेक्षा जास्त संख्या असते, ते नियंत्रक वाहतुक नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु आपण माझ्या या मताशी कदाचित सहमत असाल की त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. याला कारण ते नव्हेत; तर बेशिस्त वाहन चालवणारी असंख्य जनता आहे, जिला नियंत्रित ठेवता ठेवता त्यांच्याही नाकी नऊ येत असावेत.

नुकताच माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो. मी एकदा एका सिग्नल वर गाडीत बसलेला होतो, तेथील वाहतुक नियंत्रक हाताने त्या सिग्नल वरील एका बाजूस थांबण्याचा इशारा करत होता, तरीही जवळपास प्रत्येक गाडीचालक, व दुचाकीस्वार नियंत्रकाला न जुमानता सिग्नल तोडत होते, आणि तो एकटा नियंत्रक त्या ठिकाणी ते थांबवण्यास हतबल ठरत होता. मला त्याची खरोखर दया आली आणि कौतुकही वाटलं, कारण तो तरीही हताश न होता तिथे वाहतुक नियंत्रित करत होता, आपली जबाबदारी पार पाडत होता.

आज लोकांना खरंच शिस्त लावायची नितांत गरज आहे, किंबहुना जर तसं झालं नाही, तर कदाचित पुढे सगळाच गोंधळ माजेल, असं चित्र आहे. मला बरेचदा असं जाणवतं, की कुठेतरी वाहतुक नियमांची अंमलबजावणी, किंवा त्यांच्या उल्लंघनाबद्दलचा असलेला दंड याच्या अंमलबजावणीत ढिलाई होत आहे. तसं कदाचित नसेलही, मी चुकीचा असेन, परंतु तसंच नेहमी बघायला मिळतं म्हणून हे पत्र.

कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले अनेक सिग्नल अनेकदा बंद असलेले बघायला मिळतात. ते चालू रहाणं अत्यंत गरजेचं आहे. तरंच ते पाळले जाऊ शकतात. तसंच आजकाल सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंगला कुणीच थांबलेलं दिसत नाही. त्यामुळे म्हातारेच नव्हे तर तरुणांनाही गोखले रोड, तीन हात नाका, टेंबी नाका यासारखे भाग पार करणं महाकठीण झालंय. तिथे नियंत्रकांचा जाच नसल्यामुळे कुणालाच तिथे थांबायची बुद्धी, बंधन, होत नाही. जर आर.टी.ओ. कडून सुरक्षा सप्ताहापुरतेच नाही, तर आणखी प्रदीर्घ काळ काही बोधपर फलक लावण्यात आले; जेणेकरून लोकांना कुठेतरी मनात असं वाटेल की आपण वाहतुकीचे नियम खरंच पाळायला हवेत, तर फार बरं होईल. त्यांनी ते न पाळल्यास त्यांना ते समजावण्यासाठी, दंड करण्यासाठी नियंत्रक असतीलच.

केवळ वाहतुक नियंत्रकांची भीती म्हणून नियम पाळले जाऊ नयेत तर ती शिस्त स्वयंशिस्त असावी असं मला मनापासून वाटतं. यासाठी वाहन चालवायचा परवाना देतेवेळी एक लेखी परीक्षा, जिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, जिथे कुणालाही सूट नसेल अशी असायला हवी असं माझं मत आहे. किंवा परवाना पुनर्वैध करतेवेळीही काही उजळणीपर चाचण्या व्हाव्यात असंही वाटतं.

दंडाची रक्कम देऊन, पावती घेऊन, जर वाहनचालक सुटू लागला, तर केवळ नियमांचं उल्लंघन, त्याचा दंड, आणि पुन्हा उल्लंघन अशी प्रक्रिया चालू रहाते. तिथे त्या नियमाची, तो न पाळल्यास असलेल्या धोक्याची जाणीव होतच नाही. तेंव्हा नियंत्रकाने नुसता दंड न करता, त्या नियमाची माहिती, त्याचं महत्व, मैत्रीपूर्वक, एखाद्या सल्लागारासारखं त्या उल्लंघनकर्त्याला समजावलं, तर खरोखर लोकांच्या मनात ही स्वयंशिस्त जागृत करण्यास खूप मदत होईल, असं मला वाटतं. वाहतुक नियंत्रक हा तुमच्या आमच्यातलाच जर सर्वांना वाटला, तर हे अधिक प्रभावीपणे शक्य होईल.

आणखी एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते, ती अशी, की जो नियम मोडतो त्याला नियंत्रकामार्फत शासन होतं; परंतु जो वाहतुकीचे नियम पाळतो त्याचं जर कौतुक केलं, उदाहरणार्थ, एखाद्या गाडीवाल्याने सिग्नलचं काटेकोरपणे पालन केलं, सिग्नल हिरवा होईपर्यंत तो झेब्रा क्रॉसिंगच्या आत थांबून राहिला, आणि तेथील वाहतुक नियंत्रकाने जर त्याचं कौतुक केलं, तर हे बघून कदाचित तो नियम मोडणा-यांनाही कुठेतरी नियम पाळायची इच्छा होईल; आणि अशी भावना अधिकाधिक लोकांच्या मनात जागृत होणं हेच परिवहन नियंत्रण कार्यालयाचं खरं यश असेल.

एक सामान्य वाहनचालक म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आणि सुचवायचं आहे; की कुठेतरी, वाहतुक नियंत्रकाची भूमिका बदलायला हवी, त्यात एक सकारात्मक वृद्धी व्हायला हवी, ज्यायोगे लोकांच्या मनातील वाहतुक नियंत्रकाची प्रतिमा आणखी आदराची होईल, अभिमानाची होईल, आणि त्यातूनच रस्ता सुरक्षा, किंवा वाहतुक नियमन, या गोष्टींना ख-या अर्थाने गती मिळेल.

आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि आपण अव्याहत करत असलेल्या कार्याबद्दल अनेक आभार.

आपला नम्र,

समाजजीवनमानविचारअभिनंदनलेखमत

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Jan 2014 - 7:26 pm | कंजूस

आता शामच्या आईनेच शामला सांगितले तर काही शिस्त येईल .

अनिरुद्ध प's picture

23 Jan 2014 - 7:35 pm | अनिरुद्ध प

हे पत्र आपण प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना खरेच पाठवले आहे का?

सूड's picture

23 Jan 2014 - 7:47 pm | सूड

असेच म्हणतो.

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 9:17 am | वेल्लाभट

पाठवलंय

विटेकर's picture

24 Jan 2014 - 10:47 am | विटेकर

वेल्लाश्री , अभिनंदन !
Thousand miles journey starts with first step !

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 8:07 pm | वेल्लाभट

धन्यवाद....

सूड's picture

24 Jan 2014 - 5:05 pm | सूड

तुमच्या पायांचा फोटु पाठवा. __/\__

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 8:08 pm | वेल्लाभट

अहो का...य!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 7:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाहतूकीत केवळ दंडाने शिस्त येईलच असे नाही... विषेशतः सांपत्तिक परिस्थिती चांगली असली तर १००-५०० रु (किंवा त्याएवढे इतर चलन) लोक सहज मोजतात आणि परत शिस्त तोडायला सुरुवात करतात. हा पैशाचा माज कमी करण्यासाठी अनेक देशांत कायदाभंग केल्यास दर नियमभंगामागे परवाना धारकाच्या नावे दंडाबरोबर ठराविक उणे गुणही नोंदवले जातात. माझ्या माहितीतल्या काही देशांत सलग २४ महिन्यांत असे २४ उणे गुण झाले की परवाना आपोआप रद्द होतो आणि सर्व प्रक्रिया पहिल्यापासून करून नव्याने परवाना काढावा लागतो. सगळा प्रकार संगणीकृत असतो. अगदी पोलिसाने गुन्ह्याबद्दल तिकीट दिले की ऑनलाईन प्रक्रियेने मुख्य ऑफिसमधल्या संगणकावर नोंद होते. विनापरवाना गाडी चालवायला जबर दंड असतो आणि शिवाय परवाना परिक्षा देण्यासाठी गुन्ह्याच्या स्वरुपाप्रमाणे ठराविक महिने किंवा वर्षभर थांबावे लागते. पैशाचा माज आणि डोक्यातली मस्ती खाली आणायला ही अत्यंत उपयोगी व्यवस्था ठरली आहे.

काळा पहाड's picture

23 Jan 2014 - 8:10 pm | काळा पहाड

ज्या देशात असले (अवैध बांधकामे वैध करण्यासाठी आंदोलन करणारे) माजोरडे नेते असतात, ते यासाठी कायदे करतील का? अशी अपेक्षाच कशी ठेवता येईल? हंटर ने फटके खाल्ल्यावरच भारतीयांकडून काम होते. माझ्या मते प्रत्येक चौकात स्नायपर ठेवावेत. सिग्नल तोडला की पाठीत गोळी घालावी. चौकातल्या नियंत्रकाने मग त्याला जवळच्या गटारात फेकून गाडी सरकारजमा करावी.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 11:18 am | मंदार दिलीप जोशी

कल्पना भयानक आवडली. माझ्याही मनात असेच क्रांतीकारी विचार येतात अनेकदा.

दाते प्रसाद's picture

24 Jan 2014 - 1:01 pm | दाते प्रसाद

आपल्याकडचे लोकं त्या स्नायपरलाच पटवुन ठेवतील . काय सांगता येत नाही.

परिंदा's picture

24 Jan 2014 - 5:26 pm | परिंदा

अगदी अगदी!!

टॉईंग वॅनच्या ऐवजी सरळ रणगाडा ठेवावा. अस्थळी गाडी पार्क करणार्‍यांची गाडी सरळ चिरडून टाकावी.
काय बिशाद मग लोकांना कुठेही कशीही गाडी पार्क करायची. :)

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 9:18 am | वेल्लाभट

मस्त आयडिया आहे इ.ए.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2014 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले

सारखं आपल्याला कोणीतरी इन्व्हिजिलेट करत रहावं असं का बरं वाटतं लोकांना ?

नकोच ते आरटीओ नको त्यांचा दंड ...फक्त सिग्नल बसवा बस्स अन रस्ते स्पीडब्रेकर व्यवस्थित ठेवा ... बाकी सर्व लोकांना स्वतःच्या अनुभवातुन शिकु दे की ....

मेली ५ - ५० माणसे तरी त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही लोकांमधे आपोआप शहानपण येईल ... ज्यांच्यात येणार नाही ते मरतील अन अजुन एक उदाहरण निर्माण करतील.

(आरटीओचा अन इन जनरल सर्वप्रकारच्या इन्व्हिजिलेटर्स चा कट्टर विरोधक )

तुम्ही "खुलभर दुधाची कहाणी" ऐकली आहे का? "सगळे सिग्नल पाळताहेत, मग मी तोडला तर काय बिघडलं" असा बाणा त्यातून निघू शकतो. यासाठीच इन्व्हिजिलेटर्स लागतात. याला ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणतात.

हर्षद मेहता प्रकरण, अमेरिकेतला सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस हे इन्व्हिजिलेटर्सच्या नाकर्तेपणामुळेच घडले.

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 9:18 am | वेल्लाभट

खरंय राव....

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

या जगातले काही थोर गैरसमज:

१. माणूस हा सारासार विवेकबुद्धिने वागणारा प्राणी आहे.

२. माणूस अनुभवातून शहाणपण शिकतो.

३. माणूस चूक केल्यावर त्यापासून काही शिकतो.

वस्तुस्थिती:

१. माणुस नेहमी फक्त सर्वात कमी धोका वाटतो तो मार्ग स्विकारतो.

२. माणुस नियम क्रमांक १ चे पालन न चुकता करतो, तो नियम असा:
"जर तुम्ही एखादी गोष्ट करून सहिसलामत सुटू शकता, तर ती करा."

३. नियमाचे पालन करणे हीच सर्वात जास्त निर्धोक गोष्ट असावे अशी व्यवस्था निर्माण करणे हेच उत्तम व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असते.

अत्रन्गि पाउस's picture

23 Jan 2014 - 10:21 pm | अत्रन्गि पाउस

परफेक्ट!!

मी_आहे_ना's picture

24 Jan 2014 - 1:05 pm | मी_आहे_ना

अगदी अगदी

प्रसाद गोडबोले's picture

24 Jan 2014 - 3:24 pm | प्रसाद गोडबोले

कोणाच्या तरी धाकधपटशाहीने असलेल्या सुव्यवस्थेपेक्षा मुक्त मोकळ्या आणि (इछेने वा अनिच्छेने )को-ओपरेटीव्ह इक्विलीब्रियमकडे जाणार्‍या अराजकतेला मी श्रेष्ठ मानतो .

असो .
____

आदूबाळ's picture

24 Jan 2014 - 3:45 pm | आदूबाळ

अशा को-ऑपरेटिव्ह इक्विलिब्रियममध्ये पाप करणार्‍यावर परिमार्जन करायची जबाबदारी रहात नाही, आणि त्याची फळं दुसराच कोणी भोगतो.

असोच.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jan 2014 - 4:44 pm | प्रसाद गोडबोले

को-ऑपरेटिव्ह इक्विलिब्रियममध्ये पाप करणार्‍यावर

को-ऑपरेटिव्ह इक्विलिब्रियममध्ये पाप पुण्य असं काहीच नसतं .... पाप पुण्य ह्याकल्पना तर धर्मसत्तेने लोकांवर कंट्रोल करण्यासाठी निर्माण केल्यात ....टूल्स ऑफ मॉरल इन्व्हिजिलेशन !!

कोऑपरेटीव्ह इक्विलिब्रियम मधे एकच सोप नियम असतो .... को-ओपरेट ऑर पेरीश !

असोचच.

आदूबाळ's picture

24 Jan 2014 - 4:53 pm | आदूबाळ

"पाप-पुण्य" ही धार्मिक संकल्पना अभिप्रेत नव्हती.

हानिकारक कृती (उदा. गाडी सैरावैरा चालवून अपघात करणे, सिगरेट ओढणे) करणारा त्याची फळं भोगतो (स्वतः अपघातात मरणे, कॅन्सर होणे) असं होत नाही. निरपराध (रस्त्याने चालणारे, पॅसिव्ह स्मोकिंग करणारे) ही बळी पडतात.

(एक च वाढवू काय? ;) )

प्रसाद गोडबोले's picture

24 Jan 2014 - 5:55 pm | प्रसाद गोडबोले

हानिकारक कृती (उदा. गाडी सैरावैरा चालवून अपघात करणे, सिगरेट ओढणे) करणारा त्याची फळं भोगतोच (स्वतः अपघातात मरणे, कॅन्सर होणे) असं होत नाही. निरपराध (रस्त्याने चालणारे, पॅसिव्ह स्मोकिंग करणारे) ही बळी पडतात.

माझा रुममेट सेम लाईन ऑफ अर्ग्युमेन्ट पुढे करतो ह्या चर्चेवर ( परवाच आमची दारु पिऊन गाडी चालवणे ह्या विषयावर चर्चा झाली होती...)

"पशा तु अजुन आदिवासी लेव्हलला आहेस, अन तुला त्या लेव्हलचे फ्रीडम अपेक्षित आहे , तु अफ्रिकेत जाऊन रहा मस्त सेट होशील तिथे " असा सल्लाही मिळालेला आहे ;)

असो. ( आता शांबतो :D )

दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या विषयावर चर्चा झाली होती
का
"दारु पिऊन गाडी चालवणे" ह्या विषयावर चर्चा झाली होती
:))
(ह घेणे हिवि)

एकनाथ एका पैशाची चूक काढायला रात्रभर कसे जागे राहिले असतील हे या प्रतिसादाकडे पाहून उमगले ;)

काय करणार..."शेंवटीं आम्हीं कारकुंडेच!"

शेंवटच्या शब्दात एक अनुस्वार द्यावयाचा रांहिलां कांय रें ;)

बांकी हमाल तर सगळेच आहेत हेवेसांनल.

>>दारु पिऊन "गाडी चालवणे" ह्या विषयावर चर्चा झाली होती
का
"दारु पिऊन गाडी चालवणे" ह्या विषयावर चर्चा झाली होती

हे कहरच !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2014 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

विटेकर's picture

24 Jan 2014 - 5:02 pm | विटेकर

असहमत ..
स्वातंत्र्याबरोअबर जबाबदारी येतेच आणि ते समजत नसेल तर ते दंड्नीय करण्याची व्यवस्था असायलाच हवी. तशी व्यवस्था "पुष्कळांच्या पुष्कळ हितासाठी" अनिवार्य आहे.
अराजकतेमध्ये इक्विलीब्रियम शक्य नाही , तिथे "बळी तो कान पिळी" हाच नियम असतो.
तूर्तास एवढेच !

अत्रन्गि पाउस's picture

23 Jan 2014 - 8:16 pm | अत्रन्गि पाउस

फक्त पायवाटा,छकडे, घोडे, पालख्या वगैरेची आहे...
आणि आधुनिक व्यवस्था असलीच तर साहेबासारखी बेशिस्ती साठी 'पार्श्वभागावर हंटर" एवढीच आहे

मदनबाण's picture

23 Jan 2014 - 10:15 pm | मदनबाण

ह्म्म... माझ्या डोक्यात केमिकल लोच्याचा वेग वाढवणारा विषय !
परत परत काय तेच तेच सांगायचे ? बेशिस्त लोकांचा रस्ते नसलेला देश ! जिथे रोज प्रवास करुन घरी सुखरुप येणे हा चमत्कार मानला जाउ शकतो.
एक दुचाकीस्वार म्हणुन इथे मत नोंदवता हे सांगावेसे वाटते की वाहतुकीला सुद्धा शिस्त असावी लागते हे इकडच्या मंडळींना ठावुकच नाही ! लेन ड्राइव्हींग कसे करु नये याचे उत्तम प्रशिक्षण इथे अत्यंत सोप्या पद्धतीने अनुभवता येते.

आता ज्यांना माहितीची हौस असते आणि विदा मागण्याची प्रबळ इच्छा होते अश्या मंडळींसाठी :-
१}जगात होणार्‍या रस्ते अपघातातील १०% अपघात आपल्या देशात होतात.
२}अपघात होउन मॄत्यु होउन मरणार्‍यांची टक्केवारी 44.2% वाढली आहे. {२००१ ते २०११}
३}110,000 लोक दरवर्षी आपल्या देशात अपघातात ठार होतात.
४}वल्ड बॅंक ? म्हणते की आपल्या देशात दर दिवशी 550 लोक अपघातात ठार होतात.
५}जसा जसा आपला देश प्रगत होतोय ? तसे तसे आपल्या देशातले रस्ते { खरे तर ते नाहीच आहेत,पण आहेत त्यांना आपण रस्ते म्हणु शकता... माझी हरकत नाही.} अधिक प्राण घातक होत चालले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर दर ३.७ व्या मिनीटाला एक अपघात.
६}जय महाराष्ट्र ! हो मला दु:खा ने सांगावे लागते की आपल्या राज्याचा नंबर इथे पहिला लागतो.{ मला वाटत होतं की टोल नाक्यांच्या बाबतीत आपला नंबर पहिला असेल,असो.कोल्हापुरकरांच्या टोल आंदोलनामुळे त्यांच्या बद्धलचा अभिमान माझ्या मनात वाढला.}
७}दर वर्षी आपल्या देशाचे या प्रकारांमुळे $20 billion चे नुकसान होते.
८} जितके लोक दर वर्षी अतिरेक्यांकडुन ठार केले जात असतील त्या पेक्षा जास्त लोक आपल्या देशात रस्ते अपघातात ठार होतात.तरी ही आपल्या देशा समोर असलेली गंभीर समस्या नाही !
९} फिरंगी लोकांना आपल्या देशात येउन व्हिडीयो शुट करण्यासाठी नवा विषया मिळाला आहे.कसा? ते खाली पहा.

जाता जाता :- वरती ज्या बसचा फोटो दिला आहे त्याचे महात्म्य सांगुन मी माझे लोच्या किर्तन आटोपते घेतो. या बसचे इंजिन मागे,धुरांडे मागे... जरा दुचाकी याच्या मागे थांबुवन तर पहाच,जिवंतपणे पेटत्या चितेवर बसल्या सारखा अनुभव घेता येइल, अगदी धुरा सकट ! बहुधा ही चायना मेड गियरलेस बस आहे.

दुवे :-
Latest India Accidents In The News
Road to hell — every 3.7 minutes, death swoops in
Taking note of road deaths in India
Crash: India’s Roads Are The Deadliest In The World

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 9:19 am | वेल्लाभट

लाखोली......येते डोक्यात. असो.

दाते प्रसाद's picture

24 Jan 2014 - 9:28 am | दाते प्रसाद

बस मेड इन मोहाली चायनीज नावाला आहे फक्त

प्रसाद गोडबोले's picture

25 Jan 2014 - 12:57 am | प्रसाद गोडबोले

अप्रतिम व्हिडीयो .... धिस इस एक्ज्यॅक्टली व्हॉट आय मीन बाय को-ओपरेटीव्ह इक्विलिब्रियम !!

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2014 - 4:42 pm | टवाळ कार्टा

"बाय को-ओपरेटीव्ह इक्विलिब्रियम"

=))

मराठे's picture

24 Jan 2014 - 1:24 am | मराठे

शिस्त लावण्यासासाठी चाबूक आणि गाजर दोन्ही गोष्टी हव्यात.

चाबूकः वरती ई.एक्का म्हणाले त्याप्रमाणे गुणांकन पद्धत सुरू करावी. सिग्नल मोडल्यास दंड करावा आणि गुणांत वाढ करावी. गुणसंख्या वाढली तर त्यावरोवर इंशुरंसचा हप्ता देखील वाढवावा. त्याच प्रमाणे तीन किंवा चार वेळा पकडला गेल्यास लायसन रद्द करावे. लायसन शिवाय गाडी चालवताना आढळल्यास त्याला/तिला अटक केली जावी (नागरी गुन्हा). ट्रॅफिक पोलिसांना फक्त दंड करण्याचा अधिकार असावा. दंड वसूल करण्यासाठी चालकाला फक्त चेक द्वारे पैसे भरता यावेत. सर्व चेक फक्त आर्टीओ च्याच नावे असावे.

गाजरः एका वर्षात एकही गुण जमा न झाल्यास त्याचा इंशुरंस हप्ता कमी व्हावा.

अर्थात कितीही प्रयत्न केला तरी भ्रष्टाचार पूर्णपणे घालवता येणं शक्य नाहीच.

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 9:20 am | वेल्लाभट

हे खरंच बेस आहे

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 11:23 am | मंदार दिलीप जोशी

अप्रतीम उपाययोजना. आमचे एक परिचित सलग पाच वर्ष बिना लायसन्स गाडी चालवत होते आणि चमत्कार म्हणजे त्यांना एकदाही पकडले नाही. आहे की नाही अजब पोलीसांची गजब कहाणी!!!

दाते प्रसाद's picture

24 Jan 2014 - 9:39 am | दाते प्रसाद

गुणांकन पद्धत खरचं चांगली आहे . पण आपल्याकडे जिथे परवान्याशिवाय गाडी चालवतात तिथे ह्याला कोण जुमानेल ?

अजून एक गोष्ट म्हणजे मोबाईल वर बोलताना गाड्या चालवणे . हा भयानक प्रकार आहे . मी अश्या लोकांना थांबवून त्यांना विनंती करतो की गाडी थांबवून बोला , पण लोकं पूर्णपणे दुर्लक्ष करतात. एकदा तर एक आई आपल्या लहान मुलीला Activaवर पुढे उभी करून गाडी चालवत चालवत फोनवर गप्पा मारताना बघून मी हरलो होतो. तिला विनंती केल्यावर ती म्हणाली "I know what I am doing, pl don't advise" !!

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 11:07 am | वेल्लाभट

she certainly knew what she was doing. All that she didn't know is the cost she'd have had to pay for doing it.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 11:24 am | मंदार दिलीप जोशी

प्रसाद, पूर्ण सहमत. हाच प्रकार मी एक माणूस तो त्याची बायको आणि दोन पोरं असे चार जण बाईकवरुन जाताना करताना पाहीलं आहे. मी सल्ला द्यायला जात नाही. अशा माणसांच्या मागे गाडी (कार) ठवतो आणि भयानक हॉर्न वाजवून त्याला हैराण करतो :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2014 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

पण आपल्याकडे जिथे परवान्याशिवाय गाडी चालवतात तिथे ह्याला कोण जुमानेल ? ही वस्थुस्थिती आहे हे खरे आहे. म्हणूनच आपल्याकडे शासनाची (गव्हर्नन्सची) कमी आहे असे म्हणतात.

उत्तम शासन म्हणजे (अ) योग्य कायदे, (आ) त्यांनुसार योग्य देखरेख व अंमलबजावणी, आणि (इ) सर्वात महत्वाचे म्हणजे ती अंमलबजावणी होत आहे याची सर्व जनांत जाणीव करून देणे (कारण कायद्याच्या अंमलबजावणीचा उद्देश "कायदा तोडला म्हणून शिक्षा करणे" यापेक्षा जास्त "कायदा तोडणे थांबावे" याकरिता असावा) या तीनही गोष्टींचे पालन.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणून सिंगापूर डोळ्यासमोर येते. भारतिय मंडळींचे भारतिय विमानतळावरचे वर्तन आणि आणि सिंगापूरच्या चांगी विमानळावरचे वर्तन यांच्या जमीनस्मानाचा फरक असतो... तोच माणूस भारतिय विमानतळावर परतला की बहुदा परत मूळपदावर येताना दिसतो. माझ्या माहितितले सर्वसाधारणपणे शिस्त-स्वच्छ्तेचे नियम पाळणारे पाश्चिमात्य देशातले नागरिकही सिंगापूरमध्ये जाताना जरा जास्तच सजग असतात ! याचे मुख्य कारण सिंगापूरमध्ये वर सांगीतलेल्या तीनही गोष्टी आहेत. आपल्याकडे पहिली बहुतेक असते, दुसरीची वानवा असते आणि तिसरी तर स्वप्नरंजन समजली जाते.

दाते प्रसाद's picture

24 Jan 2014 - 1:41 pm | दाते प्रसाद

१००% सहमत

विटेकर's picture

24 Jan 2014 - 10:45 am | विटेकर

गांधीजीनी शिकवलेली कायदेभंगाची चळवळ आपण त्याच निष्ठेने अजूनही सुरु ठेवली आहे ! मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळून गेले आहे हे आपण विसरलो आहोत !
"त्यावेळी" ज्यांनी कायदा मोडला त्यांना प्रथम सामाजिक प्रतिष्ठा आणि नंतर राजकीय लाभ झाला. अजूनही आपला तोच समज आहे .. जो मोठ्ठ्यात मोठ्ठा कायदा मोडतो त्याची प्रतिष्ठा सर्वात जास्त ! तोच गुंड आणि त्याचाच
राजकीय लाभ !
आपल्या खांद्याला धरुन गदागदा हालवून सांगायला हवे की लोक हो , हा देश आपला आहे, इथे आपण आपल्याच घरी राहात आहोत, आता राज्यकर्ते आपलेच लोक आहेत . आता आंदोलन , जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेअचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे ! इंग्रज लोक निघून गेले आहेत.. उठा .. जागे व्हा !!!!

आपले राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे एक लोचा झाला आहे , किंबहुना, आपल्याला राष्ट्रीय चारित्र्यच नाही. राज्यघटनेपासून सगळ्या सरकारी व्यवस्थांचे आपण धमाल कडबोळे केले आहे ! "सर्वधर्म समभाव" , पंचवार्षिक योजना, मिळमिळित परराष्ट्रीय धोरण आणि जितके जमेल तितके अंधानुकरण ! असल्या भंप़क आणि एत्तदेशीय नसलेल्या खुळ्चट कल्पना पुचाट कॉग्रेसी सरकारने राबविल्याने आमचे स्वत्व आणि संस्कृतीच हरवली आहे. म्हणजे आमचे कमरेचे सोडले आणि शेजारच्याचे अंगाला बसत नाही .. विचित्र दिसते .....असली काही स्थिती!
बरं कोणी संस्कृती , प्राचीन परंपरा याबद्दल बोलू लागला की त्याला " भगवा दहशतवाद " करुन टाकायचे !
वास्तविक इंग्रजाना हाकलल्यावर आपली भाषा , आपली वेष- भूषा , आपली संस्कृती पुन्हा निर्माण करण्याची केवढी मोठी संधी आपण घालवली...

आता भोगा त्या कर्माची फळे ! हे फक्त रस्त्यावरच्या रहदारीला लागू नाही .. जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू आहे .. कोणती गोष्ट आपल्याला हवी तशी आहे ? शिक्षण? आरोग्य? राजकारण ? विकास ? कायदा आणि सुव्यवस्था? महिला आणि बालकल्याण ?
कॉन्ग्रेसी ( हा पक्ष नव्हे , वृत्ती आहे ) नेत्यांनी खा खा खाल्ले , आपल्या पोरांना ( त्यातून बायका, मुली आणि विधवा सूना ही सुटल्या नाहीत ) त्याच मार्गाला लावून नवी संस्थाने निर्माण केली .. यापेक्षा काहीही घडले नाही!!!
आतापर्यन्त या हरामखोरांनी देश विकून खाल्ला नाही हे आपले नशीब !
जे काही चांगले ( थोडेफार ) घडले ते या देशावर परमेश्वराची दयाळू दॄष्टी आहे आणि सामन्य माण्सातील परमेश्वर अजून कुठे कुठे थोडा जागा आहे म्हणून !
हे दयाघना , अजून तुझ्या अवताराची वेळ आली नाही काय ?

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 11:10 am | वेल्लाभट

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
अवतार कुठला घ्यावा हे कळत नसावं कदाचित.

तिमा's picture

24 Jan 2014 - 12:50 pm | तिमा

सगळी दुनिया लाल सिग्नल तोडून जात असताना, निश्चयाने हिरवा होईपर्यंत थांबणारे किती महाभाग आहेत या प्रतिसादकांमधे ?
मी असे करतो म्हणून सर्व सिग्नल तोडणारे मला शिव्या घालतात आणि वेड्यांत काढतात.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 1:01 pm | मंदार दिलीप जोशी

यात मी आहे असे अभिमानाने नोंदवू इच्छितो.

>>मी असे करतो म्हणून सर्व सिग्नल तोडणारे मला शिव्या घालतात आणि वेड्यांत काढतात.
मलाही :(

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 1:56 pm | वेल्लाभट

मी. तुमच्याप्रमाणेच मलाही शिव्या घालणारे असतात. पण एखादा चुकून माकून माझं बघून थांबणारा असतो. धन्यता त्याच्यात असते. शिव्यांनी बधत नाही आपण.

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2014 - 4:24 pm | टवाळ कार्टा

मी पण

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2014 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी पण. मी पण ! जर कोणी हॉर्न वाजवला तर लाल दिव्याकडे बोट दाखवून असा चेहरा करतो की "काय येडपट आहेस. तिकडे पहा." आणि त्यानंतर त्याच्याकडे सरळ दुर्ल़क्ष करतो... मुर्खांसाठी माझा रक्तदाब वाढवायचा नाही, हे माझे व्रत आहे ;)

विटेकर's picture

24 Jan 2014 - 5:08 pm | विटेकर

पण माझा अनुभव वेगळा आहे . मागून प्यॉ प्याऑ वाजवून देखील मी ढीम्म हालत नाही म्हट्ल्यावर मागचा नरमतो. आजू-बाजू चे ( जाऊ की नको संभ्रमात असणारे ) कौतुकपूर्ण नजरेनी माझ्याकडे पाहतात आणि "काय यडं आहे" म्हणून वाजवणाराकडे पाहतात! त्या क्षणाचा मी हिरो बनून जातो !

वेल्लाभट's picture

24 Jan 2014 - 8:06 pm | वेल्लाभट

जे ब्बात !

शशिकांत ओक's picture

24 Jan 2014 - 8:06 pm | शशिकांत ओक

वेलभट्ट आपण हे विनंतीपत्र आरटीओंच्या दप्तरी सादर केले आहेत. त्याचा संदर्भ दिला तर पुढे मागे कोणी असेच करू म्हटले तर त्याला आपले पत्र व विचार मार्गदर्शक ठरतील. समस्यांना एक वाक्यातून समाधान मिळत नाही पण विविध बाजूंनी त्यावर तोडगा काढून नंतर त्यातून पुढे येणाऱ्या समस्यांतून नवी उत्तरे शोधायला हवीत. भारतीयांची मानसिकता लक्षात घेऊन...

पैसा's picture

28 Jan 2014 - 8:11 pm | पैसा

अनेक प्रतिसादही आवडले.

सौंदाळा's picture

29 Jan 2014 - 1:48 pm | सौंदाळा

अजुन एक जालीम उपाय म्हणजे (पुर्वी कुठेतरी वाचला होता आणि आवडला होता), वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांना पकडले की २-४ तास (जेवढा तीव्र गुन्हा तेवढा जास्त वेळ) त्या ठिकाणीच स्थानबद्ध करावे आणि नंतर सोडताना दंडदेखिल वसुल करावा. बर्‍याच लोकांना सध्या पैशाची फिकीर नाही पण वेळेची (जवळजवळ) सगळ्यांनाच असते त्यामुळे हा उपाय प्रभावी ठरेल असे वाटते.

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2014 - 4:41 pm | टवाळ कार्टा

हा हा भारी...मुम्बैमधेतर हमखास लागू होईल

काळा पहाड's picture

8 Jun 2014 - 12:17 am | काळा पहाड

मोबाईल वर बोलणार्‍या आणि उलट्या बाजूने चालवणार्‍या लोकांना प्रत्येक चौकात खास नेमबाज शूटर नेमून गोळ्या घालाव्यात. रिक्षा वाल्यांना गोळ्या घालायला त्यांनी कोणताही नियम मोडला नसेल तरी चालेल.