आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे.
आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली. मामा ताट घेऊन आला. तो पुन्हा माघारी वळतो तोच ‘मामा दो स्पून्स भी लाना... और अचार भी’ अशी दुसरी ऑर्डर सोडली. मामा तेही बिनबोलत घेऊन आला. मला ते फार खटकत होतं. मी माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीकडे बघून तसं दर्शवलं. ती व्यक्तीही माझ्याच विचाराची असल्याने तिने नजरेतूनच सहमती व्यक्त केली. हा घडणारा प्रकार तसा नवीन नव्हता. अनेक जणांकडून ही अशी फर्मानं सर्रास सोडली जातात आणि ती आम्हाला खटकतात. परंतु आमच्या टेबलावर हे असं कधीच झालेलं नाही. आमचा लंच ग्रूप असं वागणारा नाही. आम्ही ठरवून असं वागतो असं नव्हे. अंगवळणी पडलेलं आहे ते. अॅफिसचं कॅंटीन झालं तरी आपलं ताट आपण आणणं, नंतर ते उचलून सिंक मधे ठेवणं, आपला चहाचा पेपरग्लास कच-याच्या डब्यात टाकणं, आम्हाला कधीच कमीपणाचं वाटत नाही.
कॅंटीनचे आमचे मामा. साउथ इंडियन व्यक्ती. सडसडीत शरीरयष्टी; पण पोट सुटलेलं; केस विस्कटलेले आणि काळ्या पांढ-या रंगांची मिश्र छटा असलेले. डोळ्यावर एक जाडया फ्रेमचा चश्मा, आणि चेह-यावर सतत एक मंद हास्य; जे ‘अशा’ ऑर्डरींनीही ढळत नसे. मी कंपनीत लागल्यावर मला आमच्या खात्यातील एक कर्मचारी मजेत म्हणाला होता, ‘मामा इज द मोस्ट इंपॉर्टंट पर्सन इन द कंपनी’. ते वाक्य खरंच आहे, हे जेंव्हा जेंव्हा मामा सुट्टीवर गेला तेंव्हा तेंव्हा पटत गेलं. मामा नसला की चहा-नाश्ता, जेवण, चार वाजता मागवलेली बिस्किटं, किंवा मॅगी, केबिनवाल्यांना नियमित लागणारे चहा-कॉफीचे डोस, या सगळ्या गोष्टींचे बारा वाजतात. असा हा माणूस अव्याहत ऑफिसभर फिरत असतो, अर्थातच ऑर्डरी पूर्ण करत.
मी आमच्या ग्रूपबरोबर दुपारी कॅंटीन मधे गेलो होतो. ‘मामा एक बिस्किट चा पुडा देता प्लीज?’ आमच्यातल्या एकाने मामाला विचारणा केली. ‘आ देताय ना... ए लो’ त्याने गुड डे चा पुडा आणून दिला. मी हसलो. मी म्हणालो, ‘कुठल्या अधिकाराने ही लोकं मामाशी आज्ञार्थी बोलतात?, मामाला कंपनी पैसे देते; ही माणसं नव्हे.’ ‘नाहीतर काय!, अरे आपण कुणाशीही बोलताना नम्रपणे बोलतो; बोलावं.’, तो म्हणाला. ‘ते झिजत नाहीत रे, शिपायाला विनंती केल्याने! आणि शिपाई असो किंवा कुणीही असो, माणूस आहे ना; जनावर नाही.’ आणखी एकाने त्या विचाराला जोड दिली. आमची ही चर्चा बराच वेळ चालली. पण माझ्या मनातले विचार मात्र त्याहून अधिक वेळ.
कुणाशीही बोलताना आपण प्रथमत: विद्यर्थातच बोललं पाहिजे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून आदराची अपेक्षा करत असाल तर तो तुम्हीही त्याला द्यायलाच हवा. समोरच्या व्यक्तीला एखादी विनंती करा, की ती व्यक्तीही त्याच आदराने तुमची विनंती मान्य करायला तयार असते. पण उद्दामपणे एखादी आज्ञा करा; त्या व्यक्तीच्या भुवया उंचावल्याच म्हणून समजा, आणि मग कलह. ‘जरा दोन मिनिटं गाडी इथे पार्क करू का?’ असं विचारा; चारापैकी दोन वॉचमन तुम्हाला गाडी पार्क करायला देतील, तिच्याकडे लक्षही ठेवतील. पण ‘तुझ्या मालकीचा रस्ता आहे का?’ चा सूर लावा की भांडणात तुमचा वेळ, मूड, आदर गेलाच म्हणून समजा. हा नियमच म्हणावा लागेल मनाचा. आणि या नियमाला असलेल्या प्रत्येक अपवादाचं मूळ हे एक तर पैशात, गरजेत किंवा उपकारात असतं.
हे चांगलं वागणं का जमत नाही लोकांना? का ते स्वत:ला जगज्जेते समजतात? का दुस-याचा अपमान म्हणजेच आपला मान हे समीकरण त्यांना योग्य वाटतं? दुस-याशी नम्रपणे बोलणं, म्हणजे दुसरा आपल्याहून वरचढ, असं नसतं.. हे का कुणाला कळत नाही? लहानपणीचा विद्यर्थ मोठेपणी हरवतो का? असे अनेक प्रश्न बराच वेळ माझ्या डोक्यात चमकत राहिले.
आमच्यावर झालेल्या संस्काराचाच हा भाग आहे; की प्रथमत: आज्ञार्थी बोललंच जात नाही कुणाशीही. ही चांगली सवय अंगी बाणवलेली आहे आणि त्यानेच कामं होतात बरेचदा. यात कुठलीही प्रौढी नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला स्वाभिमान असतो, आणि प्रत्येकाची ती भावनिक गरज असते. असाच ऑफिसमधला एक प्रसंग आठवला जेंव्हा कुणीतरी मला म्हणालं होतं, ‘यार मामा तेरेको बराबर चाय ला के देता है, बाकी सबको नही’. आठवून मला हसू आलं.
टेबलावर बसून ऑर्डर सोडण्याचा असाच किस्सा पुढच्याच दिवशी एका दुस-या सहकर्मचा-याच्या बाबतीत झाला. आणि नंतर जरा निवांतपणे मी त्याच्याशी बोलताना आडूनच या विषयाला हात घातला, जेणेकरून त्याला त्या गोष्टीची आठवण व्हावी आणि योग्य तो संदेश मिळावा. उत्तर निराश करणारं होतं. तो म्हणाला,‘तुला सांगू, या लोकांशी असंच बोलायचं असतं. नाहीतर डोक्यावर बसतात साले. अॅंड, वन शुड बिहेव अॅकॉर्डिंग टू द लेव्हल व्हेअर ही इज अॅट’ ही ‘अॅकॉर्डिंग टू’ वाली संकल्पना मला तरी जमणारी नव्हती. त्यामुळे हसतच मी विषयाला बगल दिली. तो फोन आल्यासरशी उठून निघून गेला. माझ्या लक्षात आलं, की त्याला नुकतीच बढती मिळाल्याची घोषणा झालीय, आणि आता तो काही दिवसांत केबिनवाला होणार आहे. ‘कुणाला काय सांगायला गेलो’ अशा विचारात मी असतानाच हातात चहाचा कप घेउन मामा आले, म्हणाले, ‘साब चाय चाहिये?’
प्रतिक्रिया
4 Nov 2013 - 7:59 pm | पैसा
सहमत आहे. अनेकदा दुसर्याला गोड बोलण्यापलीकडे आपण काही देत नसतो, देऊ शकत नसतो. तरीही आपले श्रेष्ठत्व दाखवण्याची काहीजणांना सवय असते. त्यालाही काही इलाज नाही. आणि वयाच्या ३५ वर्षांनंतर माणूस काहीही शिकत नाही असेही म्हटले जातेच ना! तेव्हा दुसर्याच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नये हे उत्तम. शिवाय तो उलट काहीतरी बोलला तर आपल्याच डोक्याला त्रास व्हायचा.
4 Nov 2013 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर
पराकोटीची विनम्रता किंवा पराकोटीचा उद्दामपणा, दोन्ही घातक.
विनम्रपणाने बोलणार्याला हल्लीच्या जगात गृहीत धरलं जातं. तर सतत आज्ञार्थी बोलून माणूस आपल्या उद्दामपणाचे प्रदर्शन मांडत असतो.
हाताखालच्या लोकांकडून कामे करून घेताना, अंगी जास्त विनम्रपणा असेल तर हाताखालची माणसे खुपवेळा तुम्हाला 'फाट्यावर' मारतात. तर सतत आज्ञार्थी बोलून कामे करून घेतली तर संबंधात ओलावा राहात नाही. माणसे मनापासून नाही तर नोकरी टिकवायला तुमचं ऐकत असतात. तुमची पाठ वळली की तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा. शिवाय तुमचा विश्वासघात करण्यात त्यांना कांही गैर वाटत नाही उलट ती तुमच्या विरुद्ध वापरलेली त्यांची 'हुशारी' आहे असे त्यांना वाटत असते. ह्यात सुवर्णमध्य साधणं म्हणजे तारेवरची कसरत असते. मी माझ्या कर्मचार्यांशी विनम्रच बोलतो पण माझ्या भूमिकेवर ठाम राहतो. मला माझ्या कर्मचार्यांनी मनापासून आणि जीव ओतून काम करावे अशी अपेक्षा असते. ते त्यांना अपमानकारक बोलून साध्य होत नाही. अधिकाराचा वापर करून समोरच्याला अपमानकारक वागणूक दिल्याने दोघेही दुखावतात. अपमान करणारा आणि ज्याचा अपमान होत असतो तो.
5 Nov 2013 - 6:00 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी
5 Nov 2013 - 7:01 pm | अग्निकोल्हा
आपला परप्रान्तियांसोबत विशेष संबध आला नसावा माणनेस जागा बरीच आहे.
5 Nov 2013 - 8:08 pm | वेल्लाभट
आलाय ना राव... बराच आलाय. पण त्या दिशेला विषय नेला ना, की मग भाषा सुधा तिच्या वेगळ्या वळणाने जाते.
हे कळलं नाही. समजावाल का जरा?
5 Nov 2013 - 10:56 pm | रेवती
लेखन आवडले पण लोक फार गृहित धरतात हो. अजून असं कोणाशी उद्दामपणे बोलण्याची वेळ आली नाहीये अगदी घरी भांडी घासणार्या बाईशीही नाही पण तशी ती येणारच नाही असे नाही. तुम्ही परप्रांतीय लोकांचा विषय मुद्दाम होऊन टाळलाय पण मला तर ते मेले नेहमीच मग्रूर वाटत आलेत. हामेरिकेतून भारतवारीला गेलेला एक (बहुतेक) दिल्लीवाला बुवा त्याच्या बायकोबरोबर पुण्यातल्या शिवसागर हाटेलात आला असताना बघितला. आम्ही पलिकडच्या टेबलावर बसलो होतो. तो त्याच्या मित्रासमोर हामेरिकेच्या बढाया मारत होता आणि वेटर असणार्या मुलाला असभ्य भाषेत ऑर्डरी सोडत होता. त्याची बायको इतका भयानक मेक अप करून आली होती की विचारायला नको. आम्ही त्यांच्याकडे बघतोय हे त्यांना समजल्यावर त्याने आणखीनच बढाचढाके बाता सुरु केल्या. आता यांना काय कप्पाळ सांगणार? आणि इथं हामेरिकेत यांना कोण काळं कुत्रं विचारतय? इथं असं हाडहाड करून दाखवा मग कळेल. नुकताच एक मग्रूर हामेरिकनही भेटला होता. कामचुकार मेला!
5 Nov 2013 - 11:14 pm | वेल्लाभट
तेच... म्हणूनच टाळला ना विषय. राग राग होतो.