काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.
एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन... काय राव, सचिन तेंव्हाच आउट! आजी वराडते. नातू समजावतो, सचिनची सेंचुरी सिरियसली घ्यायची नाही म्हणून. हिकडे खुर्चीत बघतोय तर आजोबा पण आउट! ट्युब पेटते. सर्व विधी पार. अस्थिकलश दोन. एक गंगेत बुडवायचा आन दुसरा रामेश्वरला! आज्जी जाणार गंगेच्या मोहिमेवर, नातवाने जायचे रामेश्वरला! गोवा ट्रीप व्हायची कशी ? मित्र डायरेक्ट इंडियाचा नकाशा काढतात आन त्यांना कळतंय की गोव्याचा समुद्र रामेश्वरच्या समुद्राला मिळतोय. म्हणजे अस्थि गोव्याला टाकायच्या, समुद्र त्या रामेश्वरला पोचवेल! नातू लटके आढेवेढे घेतो. मग प्लान ठरतो. कुठल्यातरी साउथच्या गाडीत बसायचं आन आज्जीची पाठ वळताच कल्याणलाच उतरुन गोव्याला पळ काढायचा. पण आजीचे जी.के.जास्त चांगले. चेन्नईची गाडी रामेश्वरला जात नाही हे तिला ठाऊक! नातू म्यँ म्यँ करुन वेळ मारुन नेतो. दर सेकंदाला नाक फुगवले नाही आणि मर्कटचेष्टा केल्या नाहीत तर तो हिरो कसला? पण आज्जी त्याचं बारसं जेवलेलीच असते ना! ती एकदम इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. हिरो(नातू) गाडीत. दोन दोन महिने कायम वेटिंग लिस्ट दाखवणार्या चेन्नई एक्सप्रेसमधे, निम्म्याहून जास्त बर्थ रिकामेच दिसतात. कल्याणला नातू बाहेर. अस्थिकलश आंतच. नातू पुन्हा आंत, गाडी सुटते. नातू उतरायच्या बेतात. हिरवीण गाडी पकडायला धावते. ती स्लो मोशनमधे, नातू पाघळतो. (नाहीतरी गोव्याला हुंगेगिरी करायलाच जायचे असते ना?) नातू हात देतो. ती आंत. नातू उतरायला बघतो. एका पाठोपाठ चार पांच लुंगीवाले गाडी/हिरवीण पकडायला धांवत असतात. हिरो बथ्थड, सगळ्यांनाच हात देतो. गाडी स्पीडमधे. उतरायचा चान्स जातो. हिरवीण आणि लुंग्या यांच्यामधे कडकडकड! हिरो मधे पडायला बघतो. एक महाकाय लुंगी त्याला लिटरली चेपतो. हिरोचे कॉमेडी अॅक्टिंग. हिरवीण आणि लुंगी फौज हिरोच्याच कंपार्टमेंटमधे. हिरवीणीला हिंदी येतं. लुंग्यांना नाही. हिरोला कळतं, ती साउथच्या गॉडफादरची पोरगी! सगळ्या लुंग्या म्हणजे त्याचे गुंडी. हिरवीणीचे मनाविरुद्ध लग्न ठरवले असते! म्हणून ती पळत असते.ती हिरोला बाहेर पाठवते. हिरो 'नेचर्स कॉल' ला कॉल लावत बाहेर. पाठोपाठ हिरवीण. तिला मोबाईल हवा असतो. सुटकेसाठी काँटॅक्ट करायला. हिरो ला आठवण येते की हा कॉमेडी पिक्चर आहे. तो मोबाईलची कमर्शियल टाकतो. किंमत फक्त ३४२४८ रु. हिरवीण मो. घेते. पण गुंडी लोक हजर. मोबाईल ट्रेनबाहेर. हिरो भडकिंग, पण विळे, कोयते गळ्याशी पाहिल्यावर हिरो टरकिंग! पुन्हा जागेवर. टी.सी. येतो. हिंदी सिनेमातला म्हणजे आगाऊ आणि विनोदी असणारच. लुंगी लोक त्याला भीक घालत नाहीत. डायरेक्ट बाहेर फेकतात. हिरो विटनेस, म्हणून त्याला चेन्नै पर्यंत किडनॅप्. (आयला, मजाच आहे मॅडकॅपला किडनॅप) . वाटेत एक स्टेशन येते. हिरो रेल्वे पोलिसात धाव घेतो. इन्स्पेक्टर दाद घेतच नाही. कारण डॉनचा एरिया सुरु. हिरवीणीचे गांव येते. पूल, धबधबा. गाडी तिथेच थांबते. रिसिव्हिंगला लुंगीधारी बाप. पुन्हा आपसांत कडकडकड! ठरल्याप्रमाणे हिरवीणीच्या बोलण्याला हिरो मुंडी हलविंग. तमिल इल्ले. राष्ट्रपतींपेक्षा मोठा लवाजमा घेऊन सगळे डॉनच्या घरी. हिरवीणीने ज्या थापा मारलेल्या असतात त्यामुळे हिरोचे टेंपररी पण भव्य स्वागत. दुसर्या दिवशी ठरवलेला राक्षस्(नवरा) हजर. भाषेचा वांधा. हिरो प्रत्येक तमिल कडकडला मुंडी हालविंग. अजाणता दोघांमधली बिग फाईट ठरते. जो जिंकणार तोच हिरवीणीचा हात धरणार. हिरोला हे सत्य एक सरदार पोलिस इन्स्पेक्टर सांगतो.पण तो ही विना असरदार! हिरवीण बिनधास्त, तिचा पळून जायचा प्लान रेडीच असतो. हिरो एका एक्स्ट्रॉबरोबर नाचतो आणि दारु पितो. मग ओव्हरअॅक्टिंग क्रमप्राप्तच. बाईकचा स्टंट दाखवताना पळ काढतो. हिरवीणीबरोबर डॉनच्या कारमधून पळतो. पाठलाग. हिरोच्या हातात फक्त कोयता! तेच चित्रपटातले प्रमुख हत्यार, हे नंतर कळते.
आता यापुढची गोष्ट डिटेलमधे सांगणं म्हणजे नुसती शब्दांची पुनरावृत्ती.तर थोडक्यांत सांगायची म्हणजे हिरो-हिरवीणचे अनेकवार पलायन आणि पुन्हा पकडले जाणे, लुंगी डान्स, हिरोने हिरवीणीला आयटेम म्हणणे, त्यांतही वेळात वेळ काढून रामेश्वरला त्या अस्थिविसर्जन करणे . शेवटी पळायचा चान्स असूनही पुन्हा डॉनच्या घरी जाऊन मेगाफाइट करणे व त्यांत कोयता हातात असतानाही व्हिलनला न मारुन त्याच्या तोंडून, तुझा दिल मोठा आहे हे वदवणे. हिरवीणीच्या बापाला महालेक्चर देणे,इत्यादि इत्यादि.
हिरोच्या आणि दिग्दर्शकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. माझी मात्र एक इच्छा अपूर्ण राहिली. मुंबईला परत येताना अजून रेल्वेट्रॅक मधेच पडलेला तो महागाचा (रु.३४२४८) मोबाईल, हिरो चालत्या गाडीतून झुकून लीलया परत मिळवतो असे एक दृश्य टाकले असते तर हिरोच्या कर्तृत्वाला चार चाँद लागले असते. शिवाय कोणाचे का असेना, नुकसान होऊ नये असे वाटणार्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला बरे वाटले असते.
अवांतरः १. जुन्या जमान्यात, एक बाप हिरो होऊन गेला. स्वतःच्या चेहेर्यावरुन एक मिनिटापेक्षा जास्त वेळ, कॅमेरा दुसरीकडे जाऊ न देण्याचे त्याचे कसब वादातीत होते. त्याच्या डुप्लिकेटला पण तीच किमया साधलेली पाहून आश्चर्य वाटले.
२. भारतासारख्या गरीब देशात मायबाप प्रेक्षकांकडे या चित्रपटाला द्यायला २०० कोटी आहेत हे वाचून महदआश्चर्य वाटले.
प्रतिक्रिया
21 Oct 2013 - 2:37 pm | उद्दाम
मी पहिला.
---
उद्दामखान
21 Oct 2013 - 2:38 pm | मी-सौरभ
तुम्हाला याच अजुनही अप्रुप वाटतं याचच आश्चर्य आहे ;)
21 Oct 2013 - 2:48 pm | अग्निकोल्हा
डाँट अंडरएस्टिमेट द पावर ऑफ कॉमन म्यान.
21 Oct 2013 - 3:42 pm | कवितानागेश
प्रतिसाद
१: बरं झालं फुकट असून नाही पाहिला. वाचले.
२: अय्या!! तुम्ही श्री आणि जान्हवीच्या लग्नाला नाही गेलात? ;)
३. चेन्नईला जाताना पूल आणि धबधबा कुठे लागतो?
४. गुंडी या शब्दाच वेगळाच अर्थ माहित होता.
५. त्या होउन गेलेल्या बाप हीरोचे वर्णन वाचून, Carson Clay आठवला Mr. Bean's Holiday मधला. :)
21 Oct 2013 - 4:15 pm | काळा पहाड
आमच्या घरात तर मिनिटा मिनिटाला च्यानेल चेंज होत होता. "जान्हवीचे लग्न" मग "चेनै एक्ष्प्रेस" की मग पुन्हा "जान्हवीचे लग्न" की मग पुन्हा "चेनै एक्ष्प्रेस". वैताग आला राव.
21 Oct 2013 - 4:19 pm | मदनबाण
वैताग आला राव
अगदी ! जान्हवी अन् तीची ती महालबाड,महावस्ताद आई उगाच माझ्या डोक्याची मंडई ! पण ते शाहरुखचे चाळे पाहण्यापेक्षा बायडीला गुंतवुन ठेवुन माझी सुटका करण्याचा अस्त्र ठरत ! ;)
21 Oct 2013 - 4:26 pm | मुक्त विहारि
"जान्हवीचे लग्न"
हा काय किस्सा आहे?
आयला मला सिनेमा माहीत नाही की काही नाही... संन्यास घ्यायची वेळ आली की मला वेळ मिळत नाही?
असो
कुणीतरी वेळेवर उत्तर दिलेत तर बरे होईल...
21 Oct 2013 - 4:34 pm | मदनबाण
ही जानु, सॉरी सॉरी जान्हवी ! ;)
21 Oct 2013 - 4:39 pm | मुक्त विहारि
हे असले काहीतरी टी.व्ही. वर आहे का?
गेले ३ महिने मी टी.व्ही. बंद केला आहे.
गूगल गुरु आणि विकी महागूरू असल्याने वेळ बरा जात आहे.
यु ट्युब वर बर्याच उत्तम क्लिप्स आहेत आणि हॅरॉल्ड लॉईड आणि चॅप्लीन आमची करमणूक करायला समर्थ आहेत.
असो....
जो जे वांछील तो ते लाहो.
21 Oct 2013 - 4:01 pm | कपिलमुनी
अम्ही तर ४०० कोटी वाचला होत !
असो ..
21 Oct 2013 - 4:07 pm | मदनबाण
नशिब बलवत्तर म्हणुन वाचलो आणि हा काल पाहिला नाही ! बायडी म्हणत होती बघुया म्हणुन पण नेहमीच्या ठराविक युक्त्या वापरुन हा अत्याचार करुन घेण्या पासुन वाचलो ! :)
३. चेन्नईला जाताना पूल आणि धबधबा कुठे लागतो?
माउ हा चित्रपट पाहिला नाही म्हणुन पूल आणि धबधबा पण पाहिला नाही. ;) चेन्नईला जाताना लागतो की नाही ते माहित नाही,पण हा धबधबा आहे मात्र शॉलिट्ट !
21 Oct 2013 - 4:34 pm | कवितानागेश
हा दूधसागर धबधबा आहे. पण तिरुपतीला जातना लागतो. चेनैला जाताना लागतो का माहित नाही? बघायला हवं trains between two stations मध्ये 'कैसलरॉक' ते चेनै ट्रेन आहे का?
21 Oct 2013 - 4:37 pm | चिगो
हा दुधसागर धबधबा आहे ना गोव्यातला? पिक्चर पाहीला काल टिव्हीवर.. कौतूक ह्याचे वाटले की एवढा धबाबा पैसे कमावलेला पिक्चर असूनही त्यामानाने "कमर्शियल ब्रेक्स" बरेच छोटे होते.. "बालक पालक" टिव्हीवर पाहिला असल्यास ह्याचा संदर्भ आणि कौतूक कळेल.. ;-)
21 Oct 2013 - 4:40 pm | मदनबाण
"बालक पालक" टिव्हीवर पाहिला असल्यास ह्याचा संदर्भ आणि कौतूक कळेल..
हॅहॅहॅ... "बालक पालक" म्हंटल्यावर एकच संदर्भ कळतो ! तो म्हणजे "ढिंच्याक ढिच्याक,ढिंच्याक ढिच्याक" ;)
जाता जाता :- बाणा बाणा बस्स बस्स किती करशील चा-वटपणा ? ;)
22 Oct 2013 - 2:33 pm | सुखी
दूधसागर आहे हा.
वास्को (गोवा) ते लोंधा (कर्नाटक)प्रवासात हा लागतो. अतिशय भारी स्पॉट आहे.
इथे ट्रेकिंग पण करता येते.
21 Oct 2013 - 4:17 pm | मुक्त विहारि
मी इंग्रजी सिनेमे बघत असल्याने मला माहीत नाही....
21 Oct 2013 - 4:40 pm | स्पंदना
परवा शनिवारी पार्टी करींग. माझ्याच बाजुला आज्जी बसिंग. मला म्हणींग, ५०$ किराणा घेइंग तो एक मुव्हि मिळींग. तिला मिळींग वॉन्टेड मला देइंग. मी म्हंटल परत कस करिंग? बोलते बघींग तो बघींग नाय तर भायर फेकिंग. परत नाय आणींग. पाहिंग तर ह्योच मुव्ही असिंग. आता डायरेक्ट फेकिंग. नो लुंगी, नो ताप!
21 Oct 2013 - 4:42 pm | मुक्त विहारि
येस्स
+ १
बाळासाहेब पण हेच म्हणत होते.
21 Oct 2013 - 4:57 pm | दिपक.कुवेत
म्हणुन चालत ना वो अपर्णाताय! मिडल ईस्ट मधे लुंगीकाच राज्य असींग. असो चित्रपट परीक्षण आणि जान्हवी दोन्हि आवडलं. म्हणुन मी हा चित्रपट आणि जान्हवीचं लग्न (हे वर्ष संपायच्या आत झालं तर) नक्कि पाहणार.
21 Oct 2013 - 5:18 pm | मुक्त विहारि
क्रुपया
सिनेमाचे नांव द्याल का?
21 Oct 2013 - 7:23 pm | दिपक.कुवेत
सध्या लुंगीचा एकमेव चित्रपट म्हणजे...."चैन्नई एक्सप्रेस"! नसेल तर जाणकार मार्गदर्शन करतीलच.
21 Oct 2013 - 9:19 pm | मुक्त विहारि
हा तर हिंदी सिनेमा दिसत आहे.
तरीच मला कळला नाही...
(महान सिनेमा नंतर मी अतिमहान हिंदी सिनेमे बघणे बंद केले आहे. प्रायश्र्चित्यच करतोय म्हणाना.)
22 Oct 2013 - 4:32 am | स्पंदना
आयला तुम्ही महान पाहिला? महानच आहात.
मी महान चुकवला पण ८८चा गंगा जमुना सरस्वती पाह्यलाचे प्रायःश्चित अजुन करते आहे. आमच्या कोवळ्या मनावर टरारा ओरखाडे काढले त्या चित्रपटाने.
22 Oct 2013 - 10:58 am | मुक्त विहारि
त्यावेळी आम्ही बच्चनचे जाम फॅन होतो.
अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो वाले.
"तशी बच्चनला उतरती कळा नसीब्,लावारीस पासून लागली होतीच पण महान ने ती पुर्णत्वास नेली."
असे माझे मत आहे.
21 Oct 2013 - 10:52 pm | धर्मराजमुटके
अहो ! हिरोने त्याच्या तोंडाने मी पस्तीस की चाळीस वर्षांचा घोडा झालोय याची कबूली दिलीय याचे कौतूक नाही का वाटले कुणाला ?
22 Oct 2013 - 4:28 am | स्पंदना
मी माझच पाल्हाळ लावुन बसले तिमा. खरतर ती तुमच्या लिखाणाच्या शैलीचीच चुक म्हणायला हवी. मी ही एकदम जोशात आले तुमच लिहीलेल वाचुन.
हं तर काय म्हणायच होतं, लिखाणाचा लहेजा आवडला, म्हणजे हे परिक्षण लिहुन तुम्ही फारएण्ड्चा भविष्यातला घास काढुन घेतलात, कारण याच्या पलिकडे त्या चित्रपटाची आणखी चिरफाड अशक्य!
आता फारएण्ड हे आव्हान स्विकारतील अशी अंधुकशी आशा. जे तुमच्या आमच्या नजरेतुन सुटत ते फारएण्डना दिसतं.
22 Oct 2013 - 9:31 am | वेल्लाभट
जागे व्हा ! हे आणि हे असंच बहुतेक मायबाप प्रेक्षकांना हवंय. चालतंय, चालवतायत.
22 Oct 2013 - 9:51 am | फारएन्ड
धमाल लिहीले आहे :)
22 Oct 2013 - 12:12 pm | तिमा
अशा प्रकारच्या समीक्षेत मी फारएन्ड ना गुरु मानतो. त्यांनी धमाल म्हटले म्हणजे भरुन पावलो.
22 Oct 2013 - 2:35 pm | मुक्त विहारि
थोडी भर
फारएन्ड ना महागुरु मानतो
25 Oct 2013 - 5:04 am | फारएन्ड
आता येथे 'विनय' नक्की कसा दाखवावा कळत नाही :)
गाडी मोकळी असणे ई. निरीक्षणे जबरी आहेत.
22 Oct 2013 - 1:27 pm | सस्नेह
महाधमाल.
बादवे, चेन्नैचे अन धबधब्याचे राहूदेत, पन हिरो-हिरविणिचे फोटू टाकले असते तर ड्वाले निवले असते थोडके...
22 Oct 2013 - 3:33 pm | संजय क्षीरसागर
एकदम दिलखुष! धमाल परिक्षण लिहीलंय.
23 Oct 2013 - 7:36 am | मन१
ह्हो ह्हो ह्हो.