रामचंद्र पुरुषोत्तम जोशी

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
14 Oct 2013 - 7:42 pm

रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो..

शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही.

रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते.
चित्रपट सुरु झाला तोच मुळी नरकाच्या दृष्याने! हल्ली मी कुठल्याही नाटक-सिनेमाला गेलो की पहिल्यांदा कानांत रबराचे इयर प्लग्ज घालतो. कारण आवाजाचा व्हॉल्युम इतका मोठा ठेवलेला असतो की, एकतर बहुसंख्य लोक बहिरे असावेत किंवा मला इतरांच्या कैक पटींनी आवाज ऐकू येत असावा.तर ते नरकाचे भव्य आणि भीषण दृश्य पाहिल्यावर, हल्ली संगणकाने कॉय कॉय करता येते, असा एक आजोबा टाइप आ वासला. नक्कीच काहीतरी वेगळे बघायला मिळणार होते. पण संवाद सुरु झाल्यावर, तो अपेक्षांचा बुडबुडा फुटला. अत्यंत पोरकट संवाद ऐकून हंसू यायच्या ऐवजी (माझीच) कींव यायला लागली. ते, कसल्यातरी अज्ञात रसायनात पोहणारे आत्मे, त्यांना स्वच्छ धुणारी ती अजस्त्र यंत्रे आणि हे सगळे रापुंना आणि प्रेक्षकांना समजावून सांगणारा तो नावीन्याची आवड असलेला नव-यम !

रापु नांवाच्या वर्षापूर्वी मेलेल्या आत्म्याला, त्याची अल्प पापे धुतल्यावर स्वर्गात पाठवायचे असते. पण तत्पूर्वी, त्याला एकदा सदेह, त्याच्याच घरी थोडा वेळ पाठवून, आपण करत असलेल्या यमलोकांतील सुधारणा त्याने खालच्यांना सांगाव्या, अशी त्या नव-यमाची इच्छा असते. त्याचा हा एक नवीन प्रयोग असतो. तो रापुंचा आत्मा, देह धारण केल्यावर प्रभावळकरांसारखा दिसायला लागतो त्यामुळे प्रेक्षकांना, आता तरी अभिनयाची पातळी सुधारेल असा धीर येतो. पण नव-यम म्हणजे चक्क राता असल्यामुळे, कधी एकदा वरचा भाग संपून खालचा सुरु होतोय, असे वाटू लागते. (माझा व्यक्तिशः राता वर काही राग नाही. पण त्यांचा अभिनय नाही आवडत!) शेवटी एकदाचा रापु, एका यमदूताबरोबर आपल्या घराशी येतो. तिथे त्याचे वर्षश्राद्ध घातलेले असते.

यापुढील गोष्ट ही, घिसीपिटी असली तरी दिग्दर्शकाने एकदम, (वरचा) पोरकट मूड ऑफ आणि खालचा गंभीर मूड ऑन केल्यामुळे प्रेक्षकांना, प्रभावळकर आणि सुहास जोशी यांचा उत्कट अभिनय तरी बघायला मिळतो. इतर पात्रांद्वारे कधी तो पोरकट मूड ऑन होतोही, पण या दोघांमुळे, (दिग्दर्शकाच्या) प्रतिष्ठेचे बुरुज सांभाळले जातात.

शेवट, हा अपेक्षेप्रमाणेच मेलोमेलो ड्रामॅटिक असला तरी, मुख्य पात्रांच्या अभिनयामुळे सुसह्य होतो. परन्तु, शेवटी रापुंना स्वर्गात न्यायला आलेला यांत्रिक देवदूत, आमीरखानसारखा का दिसत होता, हे कोडे शेवटपर्यंत उलगडले नाही.

मुक्तकचित्रपटप्रतिक्रियाआस्वादमतशिफारस

प्रतिक्रिया

छोटेखानी परीक्षण छान झालंय.

(माझा व्यक्तिशः राता वर काही राग नाही. पण त्यांचा अभिनय नाही आवडत!

हे राता कोण?

मी चित्रपट पाहिलेला नाही पण माझ्या सामान्य ज्ञानानुसार राता हेच असावेत. यांनी चित्रपटात बहुदा यम साकारला आहे.
माहिती चुकीची असल्यास तिमाकाका/मिपाकर यावर जास्त प्रकाश टाकतीलच.

तिमा's picture

14 Oct 2013 - 8:25 pm | तिमा

जसे बीजे म्हणजे एकेकाळचे बाबूभाई जगजीवनदास तसे
रा. ता. म्हणहे राजन ताम्हाणे!

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 7:58 pm | मुक्त विहारि

दुनियादारी पाहिला आहे,अद्याप त्या धक्यातूनच सावरलेलो नाही.ह्रुदय थोडे मजबूत झाले की धाडस करीन.

दुनियादारी पाहिला आहे,अद्याप त्या धक्यातूनच सावरलेलो नाही

तुम्ही दुनियादारीच्या पीढीतील दिसता. :)

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 8:17 pm | मुक्त विहारि

जेमतेम ५/६ मिनिटे म्हणजे आता नक्की सांगायचे म्हणजे साईनाथच्या एंट्री पर्यंत तग धरली.

त्याला बघीतले आणि गब्बरला पण बिंधास्त बघणारा मी... जो झोपलो तो "सिनेमा संपला" असे ओळखीचे वाक्य कानी पडले आणि उठलो.पॉप कॉर्न पण न खाता बघीतलेले सिनेमे फार कमी.त्यात हा पहिला...

आतिवास's picture

14 Oct 2013 - 8:31 pm | आतिवास

टोलेबा़जी आवडली.

रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते.

पण या दोघांमुळे, (दिग्दर्शकाच्या) प्रतिष्ठेचे बुरुज सांभाळले जातात.

शेवटी रापुंना स्वर्गात न्यायला आलेला यांत्रिक देवदूत, आमीरखानसारखा का दिसत होता, हे कोडे शेवटपर्यंत उलगडले नाही.

ही तीन वाक्यं विशेष आवडली आहेत :-)

पैसा's picture

14 Oct 2013 - 10:20 pm | पैसा

थोडक्यात आणि छान लिहिलंत. टीव्हीवर फुकटात लागेल तेव्हा बघण्याचा प्रयत्न करीन. (त्यातल्या २ नावांमुळे)
लिखाण एकदम खुसखुशीत!

प्रचेतस's picture

14 Oct 2013 - 10:41 pm | प्रचेतस

तिमांची ऑफबीट परिक्षणे जाम भारी.

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2013 - 12:19 am | संजय क्षीरसागर

कधी एकदा वरचा भाग संपून खालचा सुरु होतोय, असे वाटू लागते.

...पुन्हा एकदा नीट वाचल्यावर गैरसमज दूर झाला.

मदनबाण's picture

15 Oct 2013 - 1:56 pm | मदनबाण

ह्म्म...