मुंबईचे आगळे रूप पाहताना - ३

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
15 Aug 2013 - 6:13 pm

मुंबईचे आगळे रूप पाहताना - १

मुंबईचे आगळे रूप पाहताना - २

tower2

आता माझगाव डॉक्स वरून आणखी पलिकडे भायखळा परिसरात व लालबाग परळ कडे बघितले तर सर्वत्र टॉवरच दिसत होते.पैकी डोक्यावर घुमट असलेला टॉवर म्हणजे भायखळयाचा फॉर्च्युन टॉवर आणि मधोमध उभी असलेली उंच इमारत जे जे उड्डाणपूलाच्या अलिकडे मुंबई सेंट्रल कडे जाणार्‍या डीमटीमकर मार्गावरची. इथुन पुढे तो रस्ता बेलासिस रस्त्याला मीळतो. बेलासिस रोड म्हटल्यावर डोळ्यापुढे येतात ते घोड्याचे तबेले, पिला हाउस आणि अलेक्झांड्रा सिनेमा. अलेक्झांड्रा ही एक अफलातुन चीज. आता 'लाल बत्ती' परिसरात कामाच्या सुट्टीच्या दिवशी 'चैन' करायला येणारे मुंबईबाहेरचे पण पोटाची खळगी भरायला बायकोपासून दूर असणारे जीव घटकाभर जीव रमवायला येणार म्हणताना इथे लागणारे सिनेमेही रंगेल व देमार असायचे. या चित्रपटगृहाचे वैशिठ्य म्हणजे इथे लागणारी 'प्रती पोस्टर्स'. येणारं पब्लिक सॉलिड, त्यांना भाषेशी काही देणे घेणे नसते, त्यांना दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला हवा असतो. मग तो अलिकडच्या पठ्ठे बापुराव मार्गावरचा सौदा असो वा अलेक्झांड्राचा सिनेमा असो. पोस्टरवर मारामारीचे दृश्य वा अनावृत्त मदनिका दिसली की इंग्रजी सिनेमाला देखिल गर्दी होणार. अशी गर्दी जमवायला या चित्रपट गृहाच्या त्या काळातल्या म्हणजे ७०-८० च्या दशकातल्या ख्रिश्चन म्यानेजरने भन्नाट शक्कल लढविली होती आणि ती खूप गाजली होती. पोस्टर होर्डिंगवर अर्ध्या भागात इंग्रजी चित्रपटाचे पोस्टर आणि बाकी अर्ध्या भागात कोर्‍या पोस्टरवर झोकदार अक्षरात त्या चित्रपटाचे हिंदी नाव! मग रायडर ऑन दी रेन व्हायचा 'बरसात मे तक धीना धीन, स्कॉर्ची व्हायचा 'लाल छडी मैदान खडी' आणि थर्टी सिक्स्थ चेंबर ऑफ शाओलिन व्हायचा 'एक चीना के छतीस कमरे'. काळाच्या ओघात तो मॅनेजर गेला आणि अलिकडे ५-६ वर्षांपूर्वी अल्केझांड्राही बंद पडले.

towers
त्या पलिकडे म्हणजे प्रभादेवी वरळीच्या दिशेने नजर फिरली असता दिसले ते टॉवरच टॉवर. अलिकडे निदान जवळ असल्याने छोट्या कौलारु इमारती, चाळी दिसत होत्या. टॉवरच्या उंचीपलीकडे पुढे इतर काहीही दिसत नव्हते. मदोमध किंचित उजवीकडे असलेली उंच इमारत पटकन ओळखीची वाटली. 'गोदरेज बे व्ह्यू'. वरळी समुद्र किनार्‍याच्या अगदी पलिकडच्या टोकाला असलेली ही उंच इमारत. एकेकाळी वरळी सी फेस हा बड्यांचा आणि सितार्‍यांचा भाग होता, त्याकाळी जुहूची महती नसावी. या इमारतीचे वैशिष्ठ्य म्हणजे तिची मोक्याची जागा. जणु महादेवापुढचा नंदी. ते अशा अर्थाने की मस्त खारा वारा अंगावर घेत सागरी सेतुवरुन वांद्रा वरळी सफर संपली की थेट उजवीकडे वळुन दक्षिण मुंबईकडे जाता येत नाही. पूल संपल्यावर डावीकडे जावे लागते. डावीकडे जायचे, आय एन एस त्रापुढील वर्तुळाला अर्ध प्रदक्षिणा घ्यायची आणि मग या इमारतीवरुन वरळी सी फेस मार्गाने लोटसच्या दिशेने जायचे. वरळी आणि प्रभादेवी, महालक्ष्मी भागात आता अशा प्रचंड उंच इमारतींचे साम्राज्य आहे. मुंबईत उंच इमारतींची सुरूवात झाली अल्टा माऊंट रोडच्या उषा किरण पासुन. ७० च्या दशकात अडीचशे फूटी - पंचवीस मजली इमारत हा मोठा कौतुकाचा विषय होता. जेव्हा इमारतीची घोषणा झाली तेव्हा म्हणे अवघ्या अवघ्या दोन लाख रुपयात ३००० चौरस फुटांचे अलिशान फ्लॅट विकले गेले होते. आज समुद्राचे दर्शन घदविणार्‍या फ्लॅटची किंमत अवघी २५ कोट रुपये आहे. मात्र हळुहळु बांधकामाचे प्रगत तंत्र, मुंबईकडे येणारा ओघ, जागेची गरज आणि आलेली पैसा यातुन अशा इमारती सर्रास उभ्या राहिल्या. उषा किरण हे नाव आज कुणाला फारसे माहित नसेलही. या शतकाच्या सुरुवातीलाच श्रीपती हाईट्सने तब्बल ४८ मजल्यांचा मनोरा रचत सर्वांना मान झुकवयला लावली. मात्र हा दरारा एक दशकही टिकला नाही. २०१० मध्ये तब्बल ६० मजली ईम्पिरिअल टॉवर्स ताडदेवच्या एम पी मिल संकुलात उभे राहिले आणि तमाम टॉवर खुजे ठरले. ह्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना एकदा बांधकाम कंपनीच्या लोकांना भेटायचा योग आला. सहज बोलताना विषय निघाला, इतकी उंच इमारत म्हणजे वाहनतळ व अन्य सुविधा हव्यात. शिवाय झपाझप वर जाणारी वेगवान उद्वाहने हवीत. आणि मग इतक्या उंच आणि डोक्यावर कळस असलेल्या इमारतीच्या डोक्यावर पाण्याच्या टाक्या कशा बांधणार? नाही. इतक्या उंचावर लाखो लिटर पाण्याच्या आणि शेकडो टन वजनाच्या पाण्याच्या टाक्या शक्य नाहीत. मग पाणी पुरवठा? त्यासाठी दर आठ मजल्यावर एक पुरवठा टाकी असेल आणी उदंचनाने स्वयंचलीत पद्धतिने वरच्या आठ मजल्यांना पाणी पुरवठा केला जाईल. म्हणजे पर्यायाने एका पंपाला पर्यायी पंप, पर्यायी वीज पुरवठ्यासाठी मोठ्या क्षमतेचे जनित्र संच........ मी खास मध्यमवर्गीय प्रश्न विचारला, 'इथे महिना देखभाल खर्च चौरस फूटामागे म्हटला तर किती यावा? साधारण रुपया ते पाच-सहा रुपये अन्य सामान्य इमारतींना यायचा. उत्तर मिळाले 'तो खर्च दर महिन्यावर न ठेवता एकदाच सुरुवातीला २५-३० लाख रुपये घेतले जातील.

imp

उजव्या बाजुने उन असूनही प्रकाशाविरुद्ध जाऊन ईम्पिरिअल टॉवर्सचा फोटो टिपायचा मोह आवरला नाही. असो. ह्या २५० मिटरचे कौतुकही लवकरच संपणार आहे. श्रीराम मिल परिसरात ३०० मिटर उंचीची ६५ मजल्यांची पॅलेस रोयाल लवकरच येत आहे. तीचे दिवसही मोजकेच आहेत. तिकडे परळ मध्ये, चुकलो 'अपर वरळी' मध्ये श्रीनीवास मिल आवारात जगातली सर्वात उंच रहीवासी इमारत लवकरच उभी राहात आहे. अवघे ११७ मजले आणि साधारण ४५० मिटर उंची. इथल्या अगदी उंचावरच्या प्रशस्त फ्लॅटचा भाव काय असावा अशा अजागळ प्रश्नाला विनयाने उत्तर मिळाले - फक्त ८५ कोटी. आंतर सजावटीसाठी आर्मानी, स्वयंपाकघरात जर्मन बुल्थॉप मॉड्युलर किचन, न्हाणीघरात स्नान व स्वच्छता उपकरंणांसाठी जर्मन विलरॉय अ‍ॅण्ड बॉ, डॉम्ब्राख्त, इटालियन गेस्सी, आंतोनियो लुपी, जमीनीवर इटालीचा महागडा दुर्मिळ संगमरवर... मग ८५ कोटी असणारच.

tall

ह्म्म्म्म्म. उंचीची ही स्पर्धा सुरूच राहणार.

west

कॅमेरा तसाच प्रकाशाविरुद्ध दामटत इंम्पिरिअल च्या अलिकडचे ताडदेव, ग्रँट रोड परिसरातले एक दृश्य टिपले. जुन्या कौलारु इमारती आणि नवे मनोरे.

malabar hill

त्या पलिकडे हे चौपाटी आणि मलबार हीलचे दृश्य. चौपाटीवर लोकमान्यांचा पुतळा पाठमोरा आला आहे.

old new

पुन्हा एकदा चौपाटी, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि वाळकेश्वर असे नव्या जुन्याच्या संगमाचे दृश्य समोर आले.

कठड्यापाशी उभे राहुन डावीकडे पाहताना एक अतिशय सुंदर दृश्य दिसले आणि आश्चर्य वाटले की हे मघाशी नजरेतुन सुटले कसे? दाट वस्तीचे गिरगाव, भेंडी बाजार, मदनपुरा, अगदी थेट समुद्रा पर्यंत भिडलेली वस्ती व निळे आकाश आणि दाट वस्तीच्या गिरगावातुन गोलदेवळाकडे जाणारा रस्ता व त्याच्या कडेची दाट हिरवी झाडी. जुनी वस्ती आणि नवी बांधकामे बेमालुमपणे मिसळलेली दिसली. आणि लक्षात आले, की 'दिव्याखाली अंधार' म्हणतात तसे अगदी पायाखाली टिपण्यासारखे, पाहण्यासारखे बरेच आहे.

sprdiew

खरं सांगायचं तर कुणी मुंबईबाहेरचा पाहुणा आला तर विचारतो की मुंबईत बघण्यासारखे काय आहे? आता अनेकांना प्रश्न पडतो के एखाद गेट्वे वा चौपाटी सोडलं तर खरोखर इथे आहे तरी काय? मात्र मी सांगतो, 'मुंबई'. संपूर्ण मुंबई हाच एक बघण्यासारखा विषय आहे. कुठे उलगडत गेलेला रस्ता. कुठे कौलारु घरे, त्यातुन डोकावणारे नारळाची झाडे. सांगुन विश्वास बसणार नाही की हे दृश्ये मुंबईत टिपली आहेत.

road

कोण म्हणतो मुंबईतल्या वाहतुकीला शिस्त नाही? डब्यातल्या तुळ्शीईतकी का असेना कुठे तरी अजुनही ती शाबुत आहे. माळेत मोती ओवावेत तशा रांगेत गाड्या जातात. हा बहुधा वाहनांचा ओघ आणि रस्त्याचे आकारमान यातुन आलेला समजुतदारपणा असावा.

roof

roof2

असेच एक घर पटकन डोळ्यात भरते. कुण्या मालकाने हौसेने बांधलेले चौमजली घर आजही टुकीने उभे आहे. जणु मुंबई सागते आहे, 'मी अशी होते'. घराला सज्जा म्हणजे गॅलरी ही हवीच. चाळीत तर गॅलरी म्हणजे अर्धे घर. या गॅलरीची मजा ज्यांनी थोडे का होईना पण चाळीत बालपण घालवले आहे त्यांना माहीत. गॅलरी म्हणजे जादुई प्रकार. इथे उभे राहील्यावर तासनतास कसे जातात समजत नाही. शिवाय दीड खोलीच्या संसाराला रात्रीसाठी हवेशीर जोड. आणि तमाम चाळकर्‍यांना एकत्र बांधणारा हा दुवा.

house

जुने मुंबईकर तसे रसिक असावेत. घर बांधताना उगाच ठोकळे न बांधता साधे पण सुबक बांधकाम असायचे. अगदी सधी गोष्ट घ्या. दोन रस्ते जिथे छेदतात तिथे कोपर्‍यातली उमारत कधी काटकोनी टोकदार नसायची तर गोलाकार असायची. वळण घ्यायला वाहनांना तेव्हढेच बरे.

golakar
golakar2
golakar3
golakar4
golakar5

एकवार भेंडीबाजारच्या दाट वस्तीकडे पाहताना वाटते, ही वस्ती इतकी दाट आणि गुंतागुंतीची आहे, हीचा विकास करायचा म्हटला तरी कसा करणार? अचानक माझी नजर एका प्रचंड तंबुवजा शामियान्यावर खिळली. अरेच्चा! हा काय प्रकार असावा? ती आच्छादित वास्तु आहे. आजुबाजुला सुरू असलेली बांधकामे, दुरुस्त्या यामुळे हानी होउ नये म्हणुन त्या वास्तुला आच्छादुन टाकले गेले आहे.
raudat
ही वास्तु म्हणजे दाउदी बोहरी समाजाचे ५१ वे धर्मगुरु डॉ. सैयदना ताहेर सैफुद्दीन यांचे अंत्यस्मारक आहे. संगमरवरी दगडाने बांधलेल्या या प्रचंड वास्तुला ताज महाल सारखा घुमट व सोन्याचा कळस आहे.

इमारतीखालुन गोलदेवळाकडे जाताना गर्द हिरव्या झालरीच्या रस्त्याकडे आणि जुन्या मुंबईकडे पाहताना मी क्षणभर अस्वस्थ झालो.

savli

रस्त्यासह कडेच्या इमारतींवर पडलेली कुण्या एका टॉवरची काळी सावली मला अस्वस्थ करुन गेली. ही मुंबईच्या जुन्या रुपाच्या/ संस्कृतिच्या उच्चाटनाची वाणी तर नसावी? गावाकडचा माणुस आपल्या गावच्या घराची आठवण करुन हळहळतो. मात्र इथला चाकरमान्या मुंबईच्या प्रत्येक वास्तूशी नाळ जोडुन आहे. त्यासाठी ती वास्तु त्याची असायची गरज नाही. वास्तू सोडा हो, जुन्या खानदानी मुंबईकराचे डोळे ट्रामच्या हकिकती सांगतानाही चमकतात.

आठवड्याचे कामाचे दिवस जा ये करण्यात घालवल्यावर रविवारी खरेतर उठुन कुठे जावे असे वाटत नाही. मात्र अचानक कधीतरी एखादा रविवार उजाडतो. मी गाडी काढतो आणि पत्नीसह मुंबईच्या रस्त्याला लागतो. शीव, किंग्ज सर्कल, युडीसीटी, पारसी कॉलनी, पाच बगीचा, खोदादाद सर्कल, परळ, लालबाग, राणीचा बाग, खडा पार्शी, जेजे, क्रॉफर्ड मार्केट, सी एस टी, बॅलार्ड पिअर, फोर्ट्, काळा घोडा, गेटवे, नरिमन पॉईंट करीत ओबेरॉयखालुन उलट वळण घेतो आणि समुद्राकाठाने चौपाटी पार करत तीन बत्ती, तिथुन मलबार हील, पुन्हा पेडर रोड, जसलोक, त्या समोरची मदन मोहन राहायचा ती मकाने मॅनॉर, मग पेडर रोड संपताना उजवी कडे लताबाईंची प्रभुकुंज कडे पाहत हाजीअलीला येतो. पुन्हा एकदा समुद्राकाठाने प्रवास. समुद्र महाल, लाला लजपतराय, लोटस असा भिरभिरत वरळी सी फेसला येतो. संध्याकाळ होत आलेली असते. मग निवांत समुद्राकडेच्या कट्टयावर बसून एकटक सूर्यास्त पाहणे. सूर्यनारायण पाण्यात शिरले की सरळ जात सी लिंकचा मोह सोडुन वरळीमार्गेच अ‍ॅनी बेजंट मार्गावरुन, प्रभादेवी, सिद्धीविनायक, पोर्तुगीज चर्च, कोतवाल उद्यान, प्लाझा, हिंदु कॉलनी, रुईया, माटुंगा पुन्हा महेश्वरी उद्यान आणि शीव मार्गे परत घराकडे. खूप जुने मित्र, नातेवाईक भेटल्याचा आनंद असतो, मन प्रसन्न झालेले असते. चाकरमान्या सोमवारी पुन्हा घाण्यावर जायला ताजातवाना असतो.

छायाचित्रणस्थिरचित्रआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

15 Aug 2013 - 7:06 pm | राघवेंद्र

खुप सुन्दर अशी मुंबईची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

पैसा's picture

15 Aug 2013 - 7:11 pm | पैसा

हा पण भाग खूप आवडला! उगीच नाही सगळ्या भारतातल्या लोकांना मुंबईचा मोह पडत!

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Aug 2013 - 7:30 pm | लॉरी टांगटूंगकर

अप्रतिम लिहिलंय...

या फोटोतली मुंबई पाहता, ट्राफिकबद्दल मुंबईबाहेरचेच लोकं जास्त कडकड करतात असं वाटतंय. मूड आय सोडला तर मुंबईला कधी आलोच नाही. लेख वाचल्या नंतर इतकी सुंदर गोष्ट जवळ असून पहिली पण नाही असं वाटतंय .

धन्या's picture

15 Aug 2013 - 7:52 pm | धन्या

सुंदर !!!

पिवळा डांबिस's picture

15 Aug 2013 - 10:06 pm | पिवळा डांबिस

ये मुंबई मेरी जान!!
हे तिन्ही लेख अतिशय सुंदर, म्हणजे अगदी डेस्कटॉपवर डाऊनलोड करून ठेऊन चवीने पुन्हापुन्हा वाचावेत इतके सुंदर उतरले आहेत. छायाचित्रांचा तर जबाब नही!!
जियो!!!

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 10:09 pm | तुमचा अभिषेक

अहो काय कराताहात काय.. आमच्या दक्षिण मुंबईच्या प्रेमात आम्हालाच पाडत आहात.. अधूनमधून येणारी माहितीही रोचक.. !!

सन्जोप राव's picture

16 Aug 2013 - 5:50 am | सन्जोप राव

पूर्वीचीच कॉमेंट कॉपीपेष्ट. मुंबई अजिबात आवडत नाही, पण या लेखाला आणि छायाचित्रांना जवाब नाही!

पाषाणभेद's picture

16 Aug 2013 - 6:57 am | पाषाणभेद

फारच अभ्यासपुर्ण लेखन.

कवितानागेश's picture

16 Aug 2013 - 7:23 am | कवितानागेश

फारच छान माहिती आणि फोटो. मस्त चाललीये मालिका. :)

प्रत्येक प्रकाशचित्राने 'चार चांद' लावलेत लेखांना.

जपून ठेवावेत आणि पंचवीस वर्षांनी पुन्हा काढून वाचावेत इतकं संदर्भ-पूर्ण लेख आहेत, धन्यवाद!

किसन शिंदे's picture

19 Aug 2013 - 11:41 pm | किसन शिंदे

बहुगुणींशी सहमत.

अनुप ढेरे's picture

16 Aug 2013 - 9:35 am | अनुप ढेरे

भारी !!

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2013 - 10:03 am | प्रभाकर पेठकर

अतिशय सुंदर आणि तपशिलवार लेखन आणि त्याला जोड समर्पक छायाचित्रांची.
कधी जमल्यास मुंबई उपनगरांकडेही कॅमेरा वळवावा. मध्य आणि पश्चिम उपनगरे मध्यमवर्गियांची मुंबई आहे.

सौंदाळा's picture

16 Aug 2013 - 10:46 am | सौंदाळा

वाटच बघत होतो या भागाची.
अप्रतिम, सुंदर
शब्द संपले...

सुहासदवन's picture

16 Aug 2013 - 11:38 am | सुहासदवन

ज्या समृद्ध महाराष्ट्रात ही अतिशय fascinating आणि appealing नगरी आज एवढ्या मुलाबाळांना घेऊन देखील मोठ्या दिमाखात उभी आहे, तिचं जेवढं गुणगान करावं ते थोडंच.
काय दिलं नाही मुंबईने आपल्या लेकरांना. पण इतर प्रमुख शहरांची जशी तिच्या लेकरांनी काळजी घेतली, आपली आई आजारी पडणार नाही हे पाहिलं तसं आपण काहीच केलं नाही! बस.… हीच खंत आहे.

भावना कल्लोळ's picture

16 Aug 2013 - 4:14 pm | भावना कल्लोळ

आज पर्यंत रस्त्यावरून चालताना, गिरगाव चौपाटी वर बसुन दिसणारा तो मोठा बोर्ड, सगळ्या ओळखीचे रस्ते हे कधी मान उंचावुन कधी पहिलेच नाही, पण तुमच्या मुळे आज माझ्या मुंबईला अजून जवळून पाहतेय आणि खरच परत तिच्या प्रेमात पडतेय … धन्यु त्या बद्दल.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2013 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

जबरदस्त...!

चित्रा's picture

17 Aug 2013 - 4:50 am | चित्रा

सुरेख फोटो.
असे काही पाहिले की मुंबईची हवा, मुंबईच्या दुपारी, गर्दी असे काहीतरी आठवत राहते.
काय बोलावे सुचत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

17 Aug 2013 - 12:33 pm | कानडाऊ योगेशु

सर्वसाक्षी साहेब..फोटो तर मस्तच आहेत पण तुमचे लिखाण अफलातुनच.!

मात्र इथला चाकरमान्या मुंबईच्या प्रत्येक वास्तूशी नाळ जोडुन आहे. त्यासाठी ती वास्तु त्याची असायची गरज नाही. वास्तू सोडा हो, जुन्या खानदानी मुंबईकराचे डोळे ट्रामच्या हकिकती सांगतानाही चमकतात.

अगदी क्लासिक!
लेखमाला खूप आवडली हेवेसांनल!

भन्नाट फोटो आणि भन्नाट वर्णन.
तुमच्या या लेखमालेतले सगळे फोटो डाऊनलोड करून घेतले तर चालेल का? :)

सर्वसाक्षी's picture

19 Aug 2013 - 5:17 pm | सर्वसाक्षी

तुमच्या या लेखमालेतले सगळे फोटो डाऊनलोड करून घेतले तर चालेल का?

अवश्य घ्या! माझी हरकत नाही. परवानगी घेतल्याबद्दल आभारी आहे:)

चिगो's picture

19 Aug 2013 - 10:38 pm | चिगो

इम्पिरीअल टॉवर्स आतून बघायचाही योग आला आहे, बायकोकृपेने.. तेव्हा ती "शापुरजी पालनजी"मधे काम करत होती, आणि तीचे ऑफीस ह्या इमारतीतच होते. तिथे एका मजल्यावर एका भल्यामोठ्या फ्लॅटमधे "स्विमिंगपुल" पाहून गार झालो, आणि मग त्या फ्लॅटची किंमत (रु. ९० कोटी) ऐकून गपगार झालो.. :-(

लेख आणि छायाचित्रे जबरदस्त.. मुंबई आवडतेच. आता जास्त आवडेल.. :-)

उपास's picture

19 Aug 2013 - 11:35 pm | उपास

धन्यवाद ससा.. सुंदर!
रविवारी दक्षिण मुंबईत फिरण्यापेक्षा मला स्वतःला शनिवारी दुपारी आवडते..
प्रत्येक प्रभागाचं सुंदर झालय वर्णन, फोटो तर लाजवाब.. पण त्या उंच टॉवर्सनी तर वाट लावलीच पण केबलच्या अनिर्बंध वायरींमुळे सगळी लयाच गेलेय बर्‍याचश्या दक्षिण मुंबईची, कुणीही येतो आणि ह्या टॉवरच्या गच्चीवरुन त्या टॉवरच्या गच्चीवर लोंबकाळणार्‍या वायरी सोडून जातो. पतंग उडवणार्‍यांचे तर हाल हल्ली कुत्रा विचारत नाही :( बरं सांगणार कुणाला..!! हेच फोटॉ खालून वर (रस्त्यावरुन आकाश) घेतले कीच लक्षात येईल बहुधा की मी काय म्हणतोय ते.
सुंदर झालय एकंदर काम, पुन्हा पुन्हा वाचेन चवीने!

प्रमोद देर्देकर's picture

20 Aug 2013 - 5:05 pm | प्रमोद देर्देकर

आपण जर चौपाटीवरील कमांक ६ च्या फोटोत उभे असलेलेल्या पुताळया विषयी बोलत असाल तर ते "श्री लोकमान्य टिळक नव्हेत तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे.
बाकी मुंबईची नव्याने ओळख होत आहे धन्यवाद !
जर गोदीचे पण फोटो टाकता आले तर पहा ना म्हणजे मी माझ्या मुलाला मोठ्या जहाज चे, क्रेन चे फोटो दाखवेन.

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2013 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर

मी माझ्या मुलाला मोठ्या जहाज चे, क्रेन चे फोटो दाखवेन.

त्यापेक्षा मुलाला गोदी किंवा तत्सम ठिकाणी घेऊन जाऊन प्रत्यक्ष क्रेन आणि बोटचं प्रत्यक्ष दर्शन घडविणं जास्त सोयिस्कर नाही का?

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2013 - 2:55 pm | प्रमोद देर्देकर

ते खरय
पण आत मध्ये जायला परवनगी नाही त्याचे काय?

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2013 - 3:03 pm | प्रमोद देर्देकर

प्रिय सदस्य हो,

मि लोग-इन होताना प्रत्येक वेळी सान्केतिक शब्द चुकीचा टाकला आहे असा message
का येतो.

प्रत्येक प्रकाशचित्राला साजेश्या शब्दांची जोड, फार शब्द बंबाळ नाही.
झोकात चाललय मुंबई-दर्शन.
आंदो और भी.