दक्षिण मुंबईत एका बांधकाम पूर्णत्वाला आलेल्या इमारतीमध्ये अगदी थेट गच्चीवर जायची संधी मिळाली. मुळात वर जाणे हासुद्धा एक थरारक अनुभव होता - अजुन काम बरेच बाकी असल्याने उद्वाहन कार्यरत झाने नवह्ते. इमारतीच्या बाहेरुन लोखंडी मनोरा बांधुन त्यात तात्पुरते उद्वाहन म्हणजे चक्क एक पिंजरा बसविला होता. एखाद्या हॉटेलच्या बाहेरुन लावलेल्या कॅपसूल लिफ्ट मधुन बाहेर पाहणे वेगळे. इथे फट फट फट फट आवाज करत सरळ्सोट वर चढत जाणार्या पिंजर्यातुन लहान होत जाणार्या इमारती आणि आपण केवळ एका कप्पीवर आहोत ही धास्ती क्षणभर का होईना पण जाणवली. वर गच्चीत एसी पासुन ते सर्विस ट्रॉलीपर्यंत कामे चालु होणी आणि प्रचंड पसारा होता. त्याच पसार्यात मचाणावर चढलो आणि समुद्राकडचा तुफान वारा अंगावर आला आणि पाठोपाठ मुंबईचे एक वेगळेच रुप दिसले. विमानात उडाण घेताना खालच्या इमारती, रस्ते सगळे बारीक बारीक दिसते पण ते अल्पकाळ. शिवाय आपण बंदिस्त असतो. आणि अर्थातच मुंबई म्हणताना जे डोळ्यापुढे येते त्यातले काहीच दिसत नाही. इथे साक्षात दक्षिण मुंबई समोर पसरली होती. अगदी डावीकडे असलेल्या कफ परेडच्या आवळ्या जावळ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर - आयडीबीआय टॉवर्स पासुन ते थेट उजवीकड्च्या वाळकेश्वरच्या राजभवनाच्या परिसरापर्यंत.
खरेतर जे दृश्य डोळ्यात मावत नाही ते लेन्समध्ये काय सामावणार? त्याला मस्तपैकी फीशआय पाहिजे, वाईड अँगलचा निभाव लागणार नाही. डावी बाजु आणि उजवी बाजु स्वतंत्रपणे पाहावी हे बरे. अर्थात उजवीकडे सूर्य असल्यामुळे तिकडे फारसा वाव नाही हे लगेच लक्षात आले. उजवीकडे टोक म्हणजे वाळकेश्वर. अलिकडे चौपाटी बॅण्ड्स्टॅण्ड, चौपाटी, दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांना व इमारतींना छेद देत गेलेला सरदार वल्लभभाई पटेल मार्ग - हा थेट लोकमान्यांच्या पुतळ्यापुढे नेताजी सुभाष मार्गाला मिळतो, समोर सरळ नाकासमोर चर्नीरोडकडे जाणारा राजा राममोहन रॉय मार्ग. या सर्व देखाव्यात नजरेत भरत होत्या दोन उंच संलग्न इमारती - हेच ते सुप्रसिद्ध 'पंचरत्न'. जिथे प्रत्येक गाळ्यात, पेढीत दिवसागणिक कोट्यावधींची उलाढाल होते तीच ती जवाहिर्यांची पंचरत्न. खरेतर पहिले सहा मजले व्यापारी व सातव्या पासुन वरचे पंचवीस मजले निवासी असा मूळ आराखडा. मात्र पहिल्या सहा मजल्यावर हिरे व्यापारी येताच हळुह़ळु त्यांनी पाण्यासारखा पैसा फेकुन निवासी मजल्यांवरची घरे विकत घेतली व तिथे हिर्याच्या कार्यशाळा उघडल्या. आणि यातुन नवी समस्या उभी राहीली आणि ती म्हणजे इमारतीत खोल्यांमधुन असलेले गॅस सिलिंडर आणि सल्फ्युरिक अॅसिड! या शतकाच्या पहिल्याच दशकात मुंबईत पंचरत्नला 'अॅसिड बाँब' ही नवी ओळख मिळाली. जीव मुठीत धरुन राहणार्या रहिवासींनी पालिकेत, सरकारकडे तक्रारी केल्या, पाठपुरावा केला पण नवकोट नारायण हिरे व्यापारी आपल्या जागी अढळ आहेत. गेली १२-१४ वर्षे बीकेसी मध्ये उभे असलेले 'डायमंड बोर्स' संकुल अजुनही हिरे व्यापार्यांच्या प्रतिक्षेत आहे.
डावी बाजु म्हणजे अगदी समोर प्रत्येक मुंबईकराला माहित असलेला सुप्रसिद्ध 'राणीचा हार' - नेताजी सुभाष मार्ग. अलिकडे गिरगाव, तेच ते मराठी टक्का घसरत चाललेले गिरगाव. गजबजलेल्या चाळी आणि नवे उत्तुंग मनोरे यांचा संगम इथे ठायी ठायी दिसतो. उजवीकडे समुद्राच्या अलिकडे दिसते ती घुमटांची ईमारत म्हणजे सैफी रुग्णालय. मी आणि सैफे यांच्या मध्ये किंचित डावीकडे उंचावलेला आहे तो श्रीपती टॉवर. सैफीच्या रेषेत सरळ पुढे समुद्रालगत पण रस्त्याच्या अलिकडे जवाहर भवन, गव्हर्नमेंट सेंट्रल प्रेस, मित्तल आयुर्वेदीक महाविद्यालय/ इस्पितळ, मरिन लाइन्स स्थानकाकडुन/ गिरगावाकडुन म्हणजे डावीकडुन अल्गद उजवीकडे समुद्रालगत उतरलेला मुंबईतला दुसरा उड्डाणपूल. पहिला मान डहाणुकर मार्गाच्या म्हणजे पेडर रोडच्या केम्प्स कॉर्नर बाजुला असलेल्या उडाणपुलाचा. तिथुन पुढे चंद्रकोरीप्तमाणे पसरत गेलेली मायानगरी. एकुण पसारा अथांग, एका दृश्यात सगळे काही सामावणे अशक्य.
सैफीच्या पलिकडे थेट समुद्रावर नजरे गेली आणि सूर मारायचा तिमजली मनोरा व खाली निळाई दिसताच समजले, हा तर मफतलाल तरण तलाव.
तिथुन थोडे पुढे, आण्खी डाव्या अंगाला पाहिले असताना गजबजलेल्या मुंबापुरीचे एह अनोखे, निवांत रूप दिसले. निळ्या शांत पाण्यात पर्यट्कांना फिरविणार्या आणि तुरळक कुठे मच्छीमारी होड्या संथपणे पाणी कापीत चालल्या होत्या.
अलिकडे नव्यानेच मुंबईत अवतरलेला पॅरासिलिंगचा खेळ समुद्रात रंगला होता.
पुन्हा एकदा राणीचा हार. उड्डाणपूलाच्या अलिकडे दिसत असलेली मोकळी मैदाने म्हणजे मुंबई पोलिस जिमखाना, विल्सन जिमखाना, हिंदू जिमखाना, पारसी जिमखाना, इस्लाम जिमखाना, सुदैवाने मुंबईत आजही शिल्लक असलेली ही काही प्रशस्त मोकळी मैदाने. अशाच एखाद्या मैदानात उंच यारी दिसली तरी चिंता करायचे कारण नाही, ही यारी बांधकामाची नसून चित्रणाची असते. मुंबईतल्या धनिकांना थाटामाटाने लग्न करायचे, सर्व व्यावसायिकांना - सरकारी अधिकार्यांना वगैरे आमंत्रित करायचे तर हॉटेलचे हॉल कसे पुरे पडणार? त्यासाठी प्रशस्त जागा दुसरी कुठे मिळणार? आणि असे दणदणीत लग्न म्हणजे चित्रण आलेच. सर्वसामान्यांच्या लग्नागत इथे काय एक व्हिडीओवाला आणि मागे एक सहायक असे थोडेच असणार? इथे अनेक कोपर्यांमध्ये अनेक कॅमेरे चित्रण करत असतात, काही कॅमेरे अश्या यार्यांवर बसविलेले असतात जे क्षणात इकडे तर क्षणात तिकडे झुलतात आणि सर्व दृश्यांचे बेमालूम मिश्रण करुन एखाद्या चित्रपटागत चित्रफीत बनविली जाते. पुलाखालुन पुढे पुन्हा राणीचा हार पसरलेला. या भागाचे वैशिष्ठ्य म्हणजे थेट चर्चगेट पर्यंत सर्व इमारती ५-७ मजल्यांच्या, बहुतेक निवासी इमारती. मध्ये काहींचे रुपांतर व्यापारी गाळ्यांत झालेले, मध्येच एखादी वेगळी इमारत - हॉटेल इंटरकाँटिनेंटलची मोठ्या हिरव्या काचा बसविलेली फिकट पिवळसर रंगाची इमारत. डावीकडे रस्ता चर्चगेट कडे वळतो आणि समोर उजव्या कोपर्यात दिसते 'जाझ बाय द वे' म्हणजेच पूर्वीचे नाना चुडासमांचे 'टोक ऑफ दी टाउन' आणि त्याबाहेरचा तात्कालिन घटनेवर भाष्य करणारा फलक.
क्रमश:
प्रतिक्रिया
15 Jul 2013 - 12:46 am | विजुभाऊ
झकास...
या फोटोंचे भारावलेले कथन मी प्रत्यक्ष ऐकलेले आहे
15 Jul 2013 - 1:50 am | गणपा
पुढल्या भागाची आवर्जून वाट पहातोय साक्षीदेवा.
जल्दी आंदो.
15 Jul 2013 - 2:40 am | प्रभाकर पेठकर
वा...वा...ये बंबई नगरी बडी बाँका..। मस्त चित्रण येऊ द्या अजून.
15 Jul 2013 - 3:09 am | सुहास झेले
वाह मस्त... पुढचा भाग लवकर येवू देत :) :)
15 Jul 2013 - 3:44 am | रेवती
चित्रं व त्याबद्दलचे वर्णन आवडले. रामदासांच्या बरोबरीने तुम्हीही अगदी मुंबईमय झालेला आहात.
15 Jul 2013 - 8:05 am | अर्धवटराव
तसं झालं एकदम. मुंबईबद्दल सदैव तक्रारींचा सूर ऐकुन कंटाळलो होतो... आता मस्त फ्रेश वाटलं हे प्रचि आणि लेख वाचुन.
पु.भा.प्र.
अर्धवटराव
15 Jul 2013 - 9:00 am | आतिवास
एकदम मुंबईच्या आठवणी जाग्या केल्यात तुम्ही.
लेखाचा एकाच वेळी भावनिक गुंतवणुकीचा आणि अलिप्त असा दुहेरी सूर खूप आवडला.
आणखी लिहा ही विनंती - अर्थात प्रकाशचित्रांसह!
15 Jul 2013 - 10:40 am | सौंदाळा
मस्तच...
इ है बंम्बई नगरीया तु देख बबुआ..
केवळ मुम्बापुरीचेच पुढील भाग नाही तर अन्य शहरेदेखील तुमच्या लेन्समधुन बघायला आवडतील.
15 Jul 2013 - 10:57 am | दिपक.कुवेत
तश्या ह्या सगळ्या जागा माहिती होत्याच पण आज तुमच्यामुळे त्या नविन दॄष्टिकोनातुन परत बघायला/अनुभवायला मिळाल्या. अजुन येउ द्या....
15 Jul 2013 - 11:12 am | नंदन
जुन्या, ओळखीच्या जागा पाहून बरे वाटले.
(चिखलवाडीकर :))
15 Jul 2013 - 11:45 am | मोदक
पुभाप्र!!
15 Jul 2013 - 11:59 am | स्वाती दिनेश
सगळेच फोटो मस्त..
पु भा प्र :)
स्वाती
15 Jul 2013 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
या मुंबईची शानच काही निराळी आहे.
फोटो मस्तच आले आहेत. कितव्या मजल्यावर होतात तुम्ही?
(गिरगावकर)
16 Jul 2013 - 2:46 pm | भावना कल्लोळ
रोज पाहते हा एरिया, पण असा एरीयल व्हू पहिल्यांदाच पाहते आहे, मस्त वाटले …
(मी सुद्धा गिरगावकर)
15 Jul 2013 - 12:10 pm | ऋषिकेश
छानच!
15 Jul 2013 - 12:33 pm | पैसा
पहिल्याच फोटोतली किनार्याची "चंद्रकोर" अतिशय आवडली. पुढच्या सगळ्या ओळखीच्या वास्तू तुमच्या कॅमेर्याच्या नजरेतून उंचावरून बघताना वेगळ्याच वाटल्या!
15 Jul 2013 - 1:58 pm | झकासराव
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
15 Jul 2013 - 2:51 pm | नितिन थत्ते
छान !
16 Jul 2013 - 8:10 am | सर्वसाक्षी
सर्व मिपाकरांचे आभार. लिहिताना अनेक चुका झाल्या आहेत, त्यासाठी क्षमस्व. पुढील भागात अशा चुका होऊ न देण्याचा प्रयत्न करतो.
हे चित्रण साधारण एकविसाव्या मजल्यावरुन केले असले तरी इमारत रहिवासी नसून व्यापारी असल्याने रहिवासी इमारतीच्या परिमाणात २७-२८ वा मजला असेल. जागा अर्थातच गिरगावातली आहे.
पुन्हा एकदा आभार आणि दिलगिरी
साक्षी
16 Jul 2013 - 8:45 am | पाषाणभेद
सर्व फोटो अन वर्णन आवडले.
काय रेट असेल येथील जागेचा? सात आठ गाळे सी फेसींगचे घ्यावे म्हणतोय. सालं आताशा नरीमनपॉइंटला करमत नाय.
तुमची ओळख असेल तर रेटमध्ये डिस्काउंट होईन ना?
18 Jul 2013 - 3:17 am | विजुभाऊ
सात आठ गाळे सी फेसींगचे घ्यावे म्हणतोय.
त्यापेक्षा स्काय फेसिंग. घ्याना. नव्या फॅशन चे.
18 Jul 2013 - 10:05 am | पाषाणभेद
नको. वरतून विमाने जातात की.
16 Jul 2013 - 9:44 am | अमोल केळकर
वा ! मस्त !
अमोल केळकर
16 Jul 2013 - 1:27 pm | सुधीर
लेख आणि फोटोग्राफी आवडली.
16 Jul 2013 - 8:23 pm | उपास
नॉस्टेलजिक वाटलं एक्दम..
मफतलाल बाथ मध्ये डुबकी मारुन आल्यासारखं, टिळकांना १ ऑगष्टला नमस्कार करुन आल्यासारखं वाटलं, सुखसागरची इडली आणि मागे कोबे सिझलर्झ आठवून गेलं.
खूप धन्यवाद ह्या फोटोंबद्दल आणि माहितीबद्दल, पुढच्या लेखाची वाट बघतोय!
अवांतर -
गिरगावत आताशा त्या टॉवर्समध्ये हरवून जायला होतं. आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद, काळोखे वाटतात. रस्त्यावरुन चालताना दिसणार आभाळ कमी होत चाल्लय, गाड्या प्रमाणाबाहेर वाढल्यात.. इतक्या टोवर्स मध्ये पाणी, वीज अशा नागरी आणि अग्निशमन, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सुविधा कशा पुरवणार हा प्रश्नच आहे, अॅप्रोच रोड्स नाहीयेत, असो.. चालायचच!
- (२३ वर्षे गिरगांवातला चाळकरी) उपास
16 Jul 2013 - 9:20 pm | वेल्लाभट
सहीच्च्च्च आहेत फोटो ! वा काय मजा आली बघताना! थँक्स
18 Jul 2013 - 10:24 am | नानबा
कुठला टॉवर हो? श्रीराम मिल्स च्या जागेवर उभा राहत असलेला पॅलेस रोयाल काय?
18 Jul 2013 - 11:45 am | तुमचा अभिषेक
जिओ.. कसले बेक्कार फोटो काढलेत.. आंतरजालावर आता कोणाशी "आमची मुंबई आणि तुमचे XXX" करत भांडताना (अर्थात गंमतीत हं) समोरच्याच्या तोंडावर फेकून मारायला म्हणून कामात येतील..
तुर्तास बायकोला दाखवायला म्हणून वाचनखूण :)
18 Jul 2013 - 11:58 am | तिमा
इतक्या सुंदर फोटोंमधे मधेच ते 'कॉपीराइट बळवंत' पार रसभंग करतं राव! ते जरा कोपर्यांत असतं त....र!
बाकी फोटो पाहिल्यावर गर्वाने 'आम्ही मुंबईकर' असे म्हणावेसे वाटते.
18 Jul 2013 - 11:20 pm | सर्वसाक्षी
इथे मिपावर घरच्या गणपतीबाप्पांचे फोटो पूर्वी टाकले होते, त्यातला एक एका मराठी अंकाने आपल्या एका आवृत्तीत बिनदिक्कत टाकला. खणुन काढल्यावर 'ठीक आहे, पुढच्या अंकात तुम्हाला त्याचे श्रेय देऊ' असे मोघम उत्तर मिळाले मात्र हे फोटो तुम्हाला कुठुन मिळाले असे विचारताच 'ते तुम्हीच शोधुन काढा' असे उत्तर मिळाले.
तेव्हापासून मी माझे फोटो नांव टाकल्याशिवाय प्रसिद्ध करत नाही. तुम्हाला एखादा फोटो आवडला असल्यास सांगा, वॉटरमार्क शिवाय देईन.
धन्यवाद
18 Jul 2013 - 11:42 pm | किलमाऊस्की
पण तरीही .. खर्या मुंबईकराला ...ये मुंबई मेरी जान!!!!
मस्त फोटो!!! खूप दिवसांनी बघायला मिळाली मुंबई.
18 Jul 2013 - 11:50 pm | कवितानागेश
फार सुंदर काढलेत फोटो. पहिला तर खूपच आवडलाय.
4 Aug 2013 - 9:58 am | निनाद मुक्काम प...
गेली १२-१४ वर्षे बीकेसी मध्ये उभे असलेले 'डायमंड बोर्स' संकुल अजुनही हिरे व्यापार्यांच्या प्रतिक्षेत आहे.
हे मार्केट कुर्ल्याला आमच्या घरापासून वाहनाने २० मिनिटावर आहे , व ते पूर्णतः कार्यरत झाले तर आमच्या घरांच्या किंमती डायरेक्ट दुप्पट होतील अशी गेल्या दोन दशकापासून वदंता आम्ही ऐकून आहोत.