मुंबईचे आगळे रूप पाहताना -१ येथे वाचा
मरिन लाईन्स पुलापलिकडे समुद्रालगत थेट समुद्राकडे पाहणाऱ्या मरिन लाईन्स ते चर्चगेट मध्ये असलेल्या बहुतेक रहिवासी इमारतींमधे इन्टरकॉन्टिनेन्टल सहज सामावले होते. पुढची रांग साधारण ४०-६० वर्ष जुन्या ५-७ मजली इमारतींची तर मागे उंचच उंच व्यापारी इमारती. मनोऱ्यावर गोल डबी ठेवल्यासारखी दिसणारी इमारत म्हणजे हॉटेल ऍम्बेसेडर आणि त्याच्या माथ्यावरचे ते सुप्रासिद्ध स्वतः भोवती फिरणारे उपाहारगृह. हे रिवॉल्विंग रेस्टॉरंट नव्याने उघडले तेव्हा त्याचा बराच बोलबाला होता. (सध्याचे पर्ल ऑफ ओरिएन्ट). हे हॉटेल कुख्यात तस्कर मनु नारंग याचे. ७० च्या दशकात हाजी मस्तान, युसुफ, पटेल, सुकर नारण बाखिया, ढोलकिया हे गाजलेले स्मगलर होते. पैकी नारंग व पटेल बांधकाम व्यवसायात उतरले होते. ऍम्बेसेडरच्या समोर उजवीकडे खालच्या अंगाला ब्रेबॉर्न स्टेडियम आहे, ज्याचे दिवे लावायचे मनोरे चित्रात दिसत आहेत. सी सी आय आणि एम सी ए यांच्यातले वाद चिघळले आणि १९७३ च्या मालिकेतील भारत इंग्लंड सामना हा वानखेडेचा अखेरचा ठरला. एम सी ए चे अध्यक्ष आणि क्रिकेटप्रेमी बॅ वानखेडे यांच्या पुढाकाराने एम सी ए ने वानखेडे स्टेडियम झटपट उभा केला आणि ब्रेबॉर्न संपला. १९७५ भारत विंडिज मालिकेतील अखेरचा सामना हा वानखेडेच्या उद्घाटनाचा सामना होता. ह्या सामन्याचा उल्लेख होताच आठवणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे नाबाद २४२ ठोकणारा लॉईडचा हातोडा, आपल्या अखेरच्या सामन्यातला फारुख इंजिनियरचा दुहेरी भोपळा आणि अरुणा भट ने घेतलेले ब्रिजेश पटेलचे चुंबन! ब्रेबॉर्नच्या अलिकडे समुद्राकाठच्या फिकट अबोली इमारतीच्या तळात आहे नाना चुडासामांचे पिज्जा बाय दी बे. अगदी सुरुवातीला याचे नाव होते टॉक ऑफ दी टाउन, मग ते झाले जाझ बाय दी बे. प्रचलित विषयावर टिका-टिप्पणी करणारा नानांचा बॅनर ही त्या जागेची ओळख होती. ब्रेबॉर्नच्या मागे असलेल्या तीन इमारती म्हणजे - पहिली; रिवॉल्विंग रेस्टॉरन्टला चिकटुन असल्यागत भासणारी इमारत म्हणजे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय. त्याला लागुन उजवीकडे शिपिंग कॉर्पोरेशनची इमारत आणि तिला लागुन आहे ती पांढरी इमारत स्टेट बॅंकेची. अगदी उजवीकडे विधान भवन आणि विधान भवनाची सावली पडलेली मागची इमारत बहुधा मित्तल कोर्ट.
हे मुंबईचे एक अत्यंत विलोभनिय चित्र. सुबक इमारतींची एक कमानबद्ध रांग. विधानभवनाची डौलदार इमारत. पुढ्यात समुद्राकाठी निळ्या काचा लावलेली पांढरी इमारत दिसते ते हॉटेल मरिन प्लाझा. विधान भवनाच्या रांगेत उजवीकडे युनियन बॅंक, मफतलाल हाउस, एअर इंडिया, सेंट्रल बॅंक, ट्रायडेंट, ओबेरॉय, एन सी पी ए अपार्टमेंट्स, टाटा थिएटर...समोर पसरलेला अथांग सागर. प्रत्यक्ष हा फोटो घेताना मात्र का कुणास ठाऊक पण मला १२ मार्च १९९२ चा दिवस आठवला. माझे ऑफिस तेव्हा वरळी येथे ग्लॅक्सोच्या मागे होते. दुपारी दोनचा सुमार. मला साडेतीन वाजता नरिमन पॉईंटला पोचायचे होते. मी टॅक्सी पकडली. टॅक्सी निघणार तोच प्रचंड असा स्फोटाचा आवाज आला. आपोआप मी आणि टॅक्सीवाला दोघेही बाहेर आलो. ऱ्होन पॉलेंक (पूर्वीची मे ऍन्ड बेकर) च्या वर एक धुराचे उदी-पिवळसर वलय तरंगताना दिसले. बहुधा सचिनम च्या मागच्या झोपडपट्टीत कसला तरी रसायनांचा स्फोट झाला असावा असे वाटले. उगाच विषारी वायुची बाधा नको म्हणुन आम्ही पटकन टॅक्सीत बसलो आणि निघालो. ग्लॅक्सोच्या डावीकडुन ऍनी बेझंट रोडवर येण्यापूर्वीच रक्ताने माखलेली माणसे भरलेल्या ३-४ टॅक्सी वेगाने पळताना दिसल्या. आम्ही वरळी नाका, हाजी अली, ताडदेव, नाना चौक करत नेताजी सुभाष रस्त्याला लागलो. विल्सन डावीकडे राहिले आणि अगदी समोर उजवीकडे नरिमन पॉईंट. अचानक माझी नजर उजवीकडुन येणाऱ्या धुराच्या लोटांकडे गेली. बघितले तर एअर इंडीयाच्या इमारतीतुनच धूर येत होता. वेगाने पुढे सरकताना मरीन लाइन्स ओलांडल्यावर डावीकडुनही धूर दिसला. पुढे चर्चगेटचे वळण सोडुन सरळ वर जाताना धूर हुतात्मा चौकाच्या परिसरातून येत असावा असे वाटले. पुढे जरासे अंतर जाताच अडथळे लावलेले दिसले. उतरुन हवालदाराला विचारले तर ’रस्ता बंद आहे, गाडी थेच सोडा. कुठे जायचे आहे?’ असे हवालदाराचे उत्तर आणि प्रश्न आला. मी उतरुन नरिमन पॉईंट कडे निघालो आणि काही वेळाने लक्षात आले की मी एकटाच त्या दिशेने जात असून सगळी जनता माझ्या विरुद्ध दिशेने स्टेशनकडे जात आहे. तसाच चालत तुलसियानीमध्ये आमच्या नरिमन पॉईंट ऑपिस मध्ये पोचलो आणि बातमी मिळाली की मुंबईत मालिका स्फोट झाले आहेत. अफवा आली की व्ही टी (पुढे ९६ मध्ये ते सी एस टी झाले) स्टेशनालगतच्या रेल्वेच्या कचेरीच्या इमारतीत स्फोट झाला आहे! सुदैवाने ती अफवाच होती आणि गाडी मिळुन सुखरुप घरी पोचलो. दूरदर्शनवर अखंड स्फोटाच्याच बातम्या येत होत्या.
टेली लेन्सने टिपल्यावर परस्परापासून दूर असलेल्या वस्तु/ वास्तु एकमेकांच्या अगदी जवळ असल्यागत भासतात. एका विशिष्ठ जागेवरुन वेगवेगळ्या ठिकाणच्या वास्तूंचे संदर्भ बदलतात आणि चार ठिकणच्या चार वास्तु सलग एकत्र दिसतात. त्यात आणखी जुन्या आणि नव्या वास्तू इतक्या बेमालूम मिसळल्या गेल्या आहेत आणि हिरवीगर्द वृक्षराजीही या विलक्षण दृश्यात सहभागी झालेली आहे. एकाच चौकटीत एकाच वेळी प्रतिष्ठा भवन, आयकर भवन, पश्चिम रेल्वे मुख्यालय, ए सी सी मुख्यालय, वानखेडे स्टेडियम, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, मुंबई शहर व दिवाणी सत्र न्यायालय, ताज महाल टॉवर, ताज महाल पॅलेस असे सगळे सामवले आहे; मधले प्रचंड अंतर, अगदी संपूर्ण ओवल मैदान गायब झालेले आहे. ताज महाल हॉटेल म्हणजे मुंबईचा मानबिंदु. अत्यंत देखणी वास्तू. अनेक परदेशी व्यावसायिक/ पर्यटक ताज महागडं असलं, विमानतळापासून दूर असलं तरी आवर्जुन ताजलाच राहायचा आग्रह धरतात. दगडी बांधकामाच्या वास्तुमध्ये अंतरंगात लाकुडकामही मुबलक आहे. या हॉटेलला एक प्रतिष्ठा आहे, मान आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस जमशेटजी टाटांनी आपण मुंबईत एक सर्वोत्कृष्ठ हॉटेल बांधणार आहोत असे घोषीत केले. कुठे पोलाद कारखाने, कुठे जलविद्युत प्रकल्प, कुठे विज्ञान संस्था आणि कुठे हॉटेल? पण दूरदृष्टी असलेल्या जमशेटजींनी काळाची गरज ओळखुन मुंबईसाठी आवश्यक अशा आधुनिक व सुसज्ज हॉटेलची १८९८ साली पायाभरणी केली आणि १९०३ साली ते पूर्ण केले. त्या पूर्वी मुंबईमध्ये वॉटसन हे एकमेव चांगले हॉटेल होते. अर्थात गोऱ्यांनी टाटांना त्या हॉटेलात काळे म्हणुन प्रवेश नाकारला आणि म्हणुन जमशेट्जींनी हे हॉटेल काढले ही मात्र केवळ दंतकथाच आहे. असो. ताज ची शान वाढली ती नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्यांमध्ये ताजच्या कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापनाने जे धैर्य दाखविले, जी कर्तव्यबुद्धी जागृत ठेवली आणि प्राणांची पर्वा न करता पाहुण्यांचे रक्षण केले त्यामुळे. आज व्यवस्थापन जगतात ’इतके कर्तव्यदक्ष व प्रेरित कर्मचारी टाटा व्यवस्थापनाने कसे घडविले’ हा चर्चेचा विषय झाला आहे. ताजमध्ये राहावयाचे तर काही निर्बंध पाळावे लागतात असे ऐकुन आहे. टाटा समूह आपल्या नफ्यापैकी विशिष्ठ रक्कम दानधर्म/ सामाजिक जाणिवांसाठी खर्च करतो हे तर सर्वश्रुतच आहे मात्र असेही म्हटले जाते की आजही ताजच्या नफ्याचा काही भाग टाटा मेमोरियलला जातो. याच ताज विषयी आणखी एक गोष्ट, जी बऱ्याच जणांना माहीत नसावी. गेटवे समोर दिसणारी सलग इमारत ही हॉटेल ताज पॅलेसची मागची बाजू आहे! दर्शनी बाजु आत आहे. म्हणजे जर ताज चे खरे रुप समोरुन पाहायचे असेल तर ताजच्या मागील बाजुने प्रव्रेश करुन जावे लागेल. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने मला सांगितलेली हकिगत अशी, की एका इंग्लिश वास्तूविशारदाने खऱ्या ताज प्रमाणे या ताजचे आरेखन केले होते. मधला घुमट, चारी बाजुंनी मनोरे व छोटे घुमट अगदी सगळे ताज सारखे. जलमार्गाने येणाऱ्या परदेशी नागरीकांना आग्र्याच्या ताज आधी हा ताज दिसला पाहिजे. त्याने बनविलेल्या आराखड्यानुसार इथे काम सुरू झाले. अर्थातच उदघाटनप्रसंगी त्याला मानाचे बोलावणे हे होतेच. तो जलमार्गे आला. जेव्हा बोट मुंबईच्या जवळ आली अणि त्याला ताज दिसले,त्याचा घोर अपेक्षाभंग झाला. त्याच्या नकाशानुसार समोर समुद्राभिमुख असलेली दर्शनी बाजु मुंबई अभिमुख झाली होती आणि सरळसोट भिंतीसारखी दिसणारी मागची बाजु समुद्राकडे होती. भयंकर निराश झालेल्या त्या वास्तूविशारदाने वैफल्यग्रस्त होऊन बोटीतुन समुद्रात उडी घेतली आणि जीव दिला. अर्थात ही दंतकथा बरीच पसरली असली तरी अधिकृत रित्या अशा प्रकारे काही घडले असल्याचा इन्कार केला गेला आहे. अधिकृत माहितीनुसार मुख्य शोभिवंत बाजुची योजना मुंबईकडेच होती, कारण येणारे पाहुणे शहराकडून येतील आणि त्यांच्या बग्ग्या ते उतरल्यावर वेलिंग्टन म्यूजला धाडता येतील. अर्थात हा खुलासा पटत नाही आणि नकाशा समाजण्यात दिशेचा घोळ झाला यावर विश्वास ठेवावासा वाटतो. इथे ओझरते दिसणारे ताजचे रूप इतके मोहक आहे, तर समुद्राकडे तोंड असल्यावर मुंबईकडे समुद्रातुन येणाऱ्याला काय रुबाबदार रुउप दिसले असते. मुळात दर्शनी भाग शहराकडे करण्याचे प्रयोजन काय असावे? समोर दूरवर मोकळी जागा असल्याशिवाय खरे रुप दिसणारच नाही. बांधले त्याकाळात समोर भरपूर जागा असावी हेही खरे पण नव्याने बांधलेल्या ताज टॉवरचे प्रवेशद्वार समुद्राकडे तोंड करुन आहे हेही खरे. एकदातरी या ताजमध्ये जायचंच ही प्रत्येक मुंबईकराची मनोमन इच्छा असते, भले आग्र्याचा ताज नाही पाहिला तरी चालेल. ताजच्या इतकीच प्रत्येकाला परिचित असलेली दुसरी इमारत आणि या शहराची ओळख म्हणजे राजाबाई टॉवर. वास्तूविशारद इंग्रज असल्याने त्याचे स्फूर्तिस्थान ’बिग बेन’ होते हे सांगणे न लगे. १८७८ सानी २ लाख रुपये खर्च आला होता आणि रायबहादूर प्रेमचंद रायचंद यांनी तो केला होता आणि त्याबदली त्या मनोऱ्याला आपल्या आईचे नाव (राजाबाई) द्यावे असे सुचविले होते, म्हणुन तो राजाबाई टॉवर. २८० फूट उंचीची ही वास्तू त्याकाळात मुंबईतील सर्वात उत्तुंग इमारत होती. हे सर्व चित्र पाहत असताना लक्ष गेले ते डाव्या कोपऱ्यातील एका प्रशस्त घुमटाकाडे. या भागात इतकी मोठी मशीद कुठली? घरी येताना हा विचार डोके कुरतडत होता. बराच विचार केला, गुगल नकाशे तपासले, अन्य फोटोद्वारे जागेची निश्चिती करायचा प्रयत्न केला आणि ट्युब पेटली. हे तर जी पी ओ! मग जालावर जीपीओ च्या अनेक प्रतिमा पहिल्या आणि खात्री पटली.
त्याच जागी कॅमेरा थोडा उजवीकडे फिरविला आणि एक मस्त दृश्य मिळाले. वानखेडे स्टेडियमचे छत खेळातल्या आगगाडीच्या गोलाकार रुळांसारखे दिसत होते. डाव्या कोपऱ्यात पहिल्या झोतस्तंभामागे काहीसे झाकलेल गेलेले कळस/ मनोरे म्हणजे पश्चिम रेल्वे मुख्यालय, त्याला खेटुन उभे असलेले दिसणारे पण प्रत्यक्षात मैलभर अंतरावर असलेले मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचा भाग, आणि त्याही पलिकडे ताजचा भाग दिसत होता.बरोब्बर समोर गेरूच्या रंगाची हॅट घातल्यागत दिसणारी न्यु इंडियाची इमारत, त्या इमारतीच्या खालच्या बाजुला दिसणारा पिवळसर व गेरू रंगाचा अग्निबाणाच्या आकाराचा मनोरा म्हणजे ईरॉस सिनेमा, जो चर्चगेट स्थानकाच्या अगदी समोर आहे. पुन्हा एकदा टेली चा परिणाम. दोन टोकाला असलेल्या दोन वास्तू खेटृन उभ्या असल्यागत भासत आहेत. त्याच्याही अलिकडे असलेली पांढरी इमारत चर्चगेट स्थानकाची. उजवीकडे तळात ऐटबाज कमान असलेली उंच पांढरी इमारत म्हणजे बकली कोर्ट. ही इमारत ईलेक्ट्रिक हाऊसच्या अगदी जवळ म्हणजे कुलाब्यात आहे. कुलाब्यात अशा टोलेजंग इमारतीत जागा घेणारे करोडपतीच; इथे आणखी थोडी नवाबी होती. प्रत्येक मजल्यावर एक तरण तलाव. ’श्रीमंत चोखंदळ ग्राहक विकासकाने कितीही चांगली सजावट केली तरी ती फोडुन आपल्या आवडीनुसार सगळे नव्याने सजवणार’ हे ध्यानात घेऊन विकासकाने ही इमारत ’सपाट तळ, वीजेची जोडणी आणि पाण्याची जोडणी फक्त’ या तत्वावर विद्युतकाम, नळाचे काम, फरशा/ संगमरवर वगैरे काही न वापरता देऊ केली होता. घ्या आणि सजवा तुमचे घर तुम्हाला हवे तसे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही इमारत. अलिकडेच कफ परेडमध्ये एक फ्लॅट एक लाख रुपये चौरस फूट या भावाने विकला गेल्याचे वर्तमानपत्रात आले होते.
कॅमेरा थोडा अलिकडे घेतला आणि डोळ्यात भरली ती स्टॉक एक्स्चेंजची इमारत. स्फोटात जबर हानी होऊनही पुन्हा नव्याने उभी राहीलेली ही इमारत रोज भागधारकांची संपत्ती हजारो कोटींनी चढवत वा घटवत असते. अलिकडे तिला चिकटलेल्या इमारती आहेत सी टी ओ (सेंट्रल टेलिग्राफ ऑफीस), हुतात्मा चौक एक्सचेंज आणि टाटा कम्युनिकेशन्स म्हणजे मूळची ओवरसीज कम्युनिकेशन किंवा विदेश संचार निगमची ईमारत. उजव्या कोपर्यात सुप्रसिद्ध जी पी ओ चा घुमट. पुन्हा एकदा वेगळ्याच ठिकाणाहून घेतलेले टेली वरचे फोटो! दूरदूरच्या इमारती अगदी चिकटुन उभ्या आहेत असे भासते.
मुंबईच्या गोदीचे हे दृश्य जी पी ओ च्या अलिकडच्या भागात मिळालेले. अगदी तळात, किंचित उजव्या बाजुला दोन मिनार दिसत आहेत ते बहुधा जुम्मा मशिदीचे अथवा झकेरिया मशिदीचे असावेत आणि उजव्या मनोऱ्यामागुन वर आलेला मनोरा क्रॉफर्ड मार्केटचा.उजव्या कोपऱ्यात हाज हाऊस, ज्याच्यावरुन बराच गहजब झाला होता. या इमारतीवरुन गोदी व समुद्रातील नौदलाच्या हालचालींवर लक्ष्य ठेवणे सोपे होते. समोर मुंबईची गोदी, मालाची चढ उतार करणाऱ्या याऱ्या आणि जहाजे.
थोडे पलिकडे पाहिले तर गोदीच्या पलिकडे न्हावा शेवा दिसते होते, बंदरातल्या निळ्या, लाल रंगाच्या मोठाल्या याऱ्या दिसत होत्या, मधे एक जेट्टीही होती.
सरळ रेषेत आणखी डावीकडे कॅमेरा फिरवला तो माझगाव डॉक्स मधील सामानची हाताळणी करणारी अजस्त्र यारी दिसली. चित्रात खालच्या बाजुला पसरलेली नळबाजार भेंडीबाजार दोन टाकी भागातली दाट वस्ती, पिवळा हिरवा मिनारा दिसतो ती शेख बुऱ्हानुद्दीन कमरुद्दीन मार्गावरली म्हणजे मुख्य जेजे रस्त्याचा अलिकडची मशिद, त्यासमोर जे जे रुग्णालय आणि मधोमध पसरलेला जेजे उड्डाणपूल. हा पूल म्हणजे मुंबईला मिळालेले वरदान. किमान वीस-तीस मिनिटे यामुळे वाचली. हा पूल खालुन जाणाऱ्या रस्त्याबरहुकुम वळत जातो. हा पूल दाट वस्तीतून जात असल्यामुळे काही ठिकाणी अक्षरश: पूलावर उभे राहुन शेजारच्या इमारतीतून चहाचा कप घेता येइल इतकी घरे जवळ आलेली. पूल नव्याने सुरु झाला तेव्हा टपोरी पोरे दुचाक्या घेउन विनाकरण घरात डोकावत फिरतात आणि उपद्रव देतात अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. डावीकडे दाट झाडी दिसते आहे तो राणिच्या बागेचा मागचा भाग. उजवी कडे अबोली- विटकरी रंगाचा उंच टॉवर - पाकमोडीया लेन आणि दुसरी कूपर स्ट्रीट च्या कोपऱ्यावरचा हुसैनी टॉवर. मागे पाण्याच्या पलिकडे धूसर दिसणारी नवी मुंबई.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jul 2013 - 12:38 pm | प्रचेतस
फोटोंबरोबरच मुंबईच्या इमारतींची माहिती तसेच इतिहासही समजत गेला.
समुद्राच्या पलीकडे डोंगर दिसतात ते घारापुरीचे का?
22 Jul 2013 - 1:33 pm | मराठीप्रेमी
छान लेखमाला.
22 Jul 2013 - 2:07 pm | गवि
मस्त.. अतिउत्तम.
सुंदर फोटोज. असा व्ह्यू मिळणं दुर्मिळच.
आणखी एक गोष्ट जाणवली. दुरुन डोंगर साजरे म्हणतात तसं "दुरुन समुद्र निळे" असं म्हणायलाही हरकत नाही. एरवी इथल्या या समुद्राजवळ जाताना दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरुन आणि हिरव्यापिवळ्या घाण पाण्यामुळे डोळे न रोखताच जावंसं वाटतं.
22 Jul 2013 - 2:37 pm | प्रभाकर पेठकर
वा.. सर्वसक्षीजी, मजा आली मुंबईची चित्रसफर, रसभरीत तपशिलांसहीत, अनुभवताना. धन्यवाद.
सारी छायाचित्रे अतिशय सुरेख, शहराचे तपशिल टिपणारी आहेत. सोबत त्या त्या परिसराची, जुन्या मुंबईची छायाचित्रे (आंतरजालावरून उतरवून) टाकली असती तर आनंद आणि आश्चर्य चौगुणीत झाले असते. असो.
22 Jul 2013 - 2:47 pm | गणपा
क ड क !
हा भागही आवडला.
22 Jul 2013 - 3:17 pm | मी_आहे_ना
मस्त फोटो आणि वर्णन. मुंबईबद्दल झकास माहिती.
22 Jul 2013 - 4:34 pm | झकासराव
वाह!!! :)
22 Jul 2013 - 5:37 pm | स्वाती दिनेश
फोटो पाहताना आणि माहिती वाचताना मजा आली,
स्वाती
22 Jul 2013 - 5:44 pm | मृत्युन्जय
वा. मस्त आहे हा भागा. मुंबैइच्या ओंगळ रुपापुढे हे आगळे रुप खुप भावुन गेले.
22 Jul 2013 - 6:09 pm | सौंदाळा
'क्रमशः' बघुन अजुन भाग येणारेत याचा आनंद झाला.
तुमची फोटो+ ईमारती , स्थ्ळांचे वर्णन /इतिहास सांगण्याची पद्धत आवडली.
(हा आणि अतृप्त आत्मा यांनी लिहिलेला बेडसे लेणी फोटो + काव्य दोन्ही प्रकार खुपच आवडले)
22 Jul 2013 - 9:56 pm | खबो जाप
+११११११
22 Jul 2013 - 6:10 pm | सुधीर
खरच आगळ रूपडं. असं रुपडं अगोदर पाहिले नव्हते.
22 Jul 2013 - 7:44 pm | राघवेंद्र
खुप नवीन माहिती मिळाली.
धन्यवाद !!!
22 Jul 2013 - 10:49 pm | मोदक
+१
धन्यवाद !!!
22 Jul 2013 - 8:03 pm | प्रभो
मस्त!!
22 Jul 2013 - 8:46 pm | उपास
चित्र आणि वर्णन दोन्हीही चपखल..
केसी कॉलेज तसेच आसपासच्या सरकारी इमारतीत, मार्केट मध्ये कायम येणे जाणे असल्याने हा सगळा भाग पायाखालचा.. भातबाजार, अब्दुल रेहमान स्ट्रीट, क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट् - व्हीटी, फॅशन स्ट्रीट तिथली सगळी चित्रपटगृह अशी अनंत ठिकाणे ही शनिवार सार्थकी लावण्यात जायची एके काळी. जुन्या आठवणी विलक्षण चाळवल्या गेल्या :)
22 Jul 2013 - 9:47 pm | मराठे
'अस्सल मुबैंकर मुबैंच्या जुन्या इमारती पाहून हळहळतो' या वाक्याचा पुनःप्रत्यय घेतला.
22 Jul 2013 - 10:32 pm | किलमाऊस्की
हे वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. :-( या मालिकेतले दोन स्फोट दादरला सेनाभवनजवळच्या पेट्रोलपंपाजवळ आणि प्लाझा सिनेमाला झाले. त्यापैकी सेनाभवनचा स्फोट आम्ही स्वतः ऐकला, पाहीला. माझी शाळा सेनाभवनजवळ. चौथ्या मजल्यावर नुकताच वर्ग भरलेला. १० वीच्या परिक्षेचं सेंटर असल्याने शाळा दुपारी २:२० ला भरली आणि स्फोट २:३० च्या आसपास झाला. १० मिनीटांच्या फरकाने मोठा अनर्थ टळला. कारण शाळेत येणारी बरीचशी मुलं सेनाभवनच्या रस्त्याने यायची. प्रार्थना संपून खाली बसतो ना बसतो तेच मोठ्याने आवाज झाला आणि आकाशात धुराचे लोट ऊठले. काही मिनीटं काय चाललय याचा आमच्या बालबुद्धीला पत्ताच लागेना. काही वेळाने बाँबस्फोट झाल्याचं समजलं. तोवर आम्हाला बॉंबस्फोट म्हणजे काय हे माहीत नव्हतं. नंतर शाळा सोडण्यात आली. रानडे रोडला दंगल उसळल्याचं कळताच, आम्ही प्लाझाकडून जायच ठरवलं. आणि समोर बघतो तर काय प्लाझातही बाँबस्फोट. :-( सेनाभवनजवळच्या ठाकूर हॉस्पिटलमधल्या नवजात बाळांना फार त्रास झालेला म्हणे या स्फोटाच्या आवाजाने
माफ करा जरा जास्तच अवांतर झालं पण ही घटना लहानपणीच अशी कोरली गेलीय की बाँबस्फोट म्हटलं की पटकन हेच आठवतं.
22 Jul 2013 - 10:52 pm | कवितानागेश
छान आलेत फोटो. वेगळाच व्ह्यू मिळालाय. :)
22 Jul 2013 - 11:21 pm | माझीही शॅम्पेन
व्व्वाह वाह निशब्द !!!!
____/|\_______
23 Jul 2013 - 1:36 am | किसन शिंदे
साक्षी काका इथे बेब्रॉर्न यायला हवंय ना?
दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचलेत. मुंबईची इत्यंभूत माहिती असणारे एक ते रामदास काका आणि दुसरे तुम्ही!:)
23 Jul 2013 - 10:39 am | सर्वसाक्षी
तिथे 'ब्रेबॉर्नचा अखेरचा सामना' असेच हवे होते. अनवधानाने वानखेडे लिहिले गेले, पेठकरसाहेबांनी हे व्य नि द्वारे निदर्शनास आणुन दिले होते. दोघांचेही आभार.
अवांतर - रामादासांच्या मानाने माझी माहिती बरीच त्रोटक आहे, त्यांना या सर्वातले अधिक तपशिल ठाऊक असतील.
साक्षी
23 Jul 2013 - 3:05 am | सुहास झेले
आपल्या मुंबईची अगदी नव्याने ओळख...... मनापासून आभार !!
पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)
23 Jul 2013 - 10:14 am | सहज
मुंबैची सचित्र गाथा, तपशील, इतिहास उत्तम!!
23 Jul 2013 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा
23 Jul 2013 - 7:01 pm | आतिवास
तुम्ही मुंबईची "गायडेड टूर" (अर्थात सशुल्क!) कधी आयोजित करताय ते नक्की सांगा :-)
23 Jul 2013 - 7:12 pm | आदिजोशी
आमची मुंबई
23 Jul 2013 - 9:22 pm | पुष्कर जोशी
खरच कल्पना उत्तम रामदास काका सुद्धा बोलवा मी येतो
24 Jul 2013 - 9:26 am | अजया
जी.पी ओ मागच्या सेन्ट जॉर्ज हॉस्पीटल्मध्ये पाच वर्ष डेंटल कॉलेजला होते.हा सर्व पायाखालचा भाग्,रोजच्या फिरण्यातला! तो आत्ता इतक्या वर्षांनी बघीतला! तो जीपीओचा घुमट आमच्या हॉस्टेलच्या कॉरीडॉरमधुन दिसायचा. रोजची सकाळ त्याच्या दिसण्याने सुरु व्हायची.तुमच्या फोटोंना जपून ठेवणार आहे! धन्यवाद!!
24 Jul 2013 - 11:45 am | कोमल
खुपच छान.. दोन्ही भाग एकत्रच वाचले.
क्रमशः वाचून आनंद झाला.. :)
सुरेख फोटो, इत्यंभूत माहिती..
__/\__ दंडवत स्विकारा
मुंबापुरीची ओढ अजूनच वाढवलीत तुम्ही :)
खरचं एखादी "मुंबई दर्शन" आयोजीत करा. नक्की येईन..
24 Jul 2013 - 12:27 pm | सोत्रि
मस्तच!
-(पूर्वाश्रमीचा मुबैकर) सोकाजी
24 Jul 2013 - 2:15 pm | ऋषिकेश
उत्तम! चालु राहु दे!
आमच्या साष्टी बेटाकडेहि लेन्सची कधितरी कृपादृष्टी होऊ दे
24 Jul 2013 - 2:38 pm | बॅटमॅन
भारीच!
काडी: पुण्याबद्दल कोणी असा प्रयोग अजून कसा काय केला नाही बॉ? पुणेकर झोपलेत काय ;) =))
26 Jul 2013 - 9:25 am | प्रभाकर पेठकर
पुणें हें अंनुभंविण्यांचे शंहर आंहें, प्रंदर्शंनांत मांडण्यांचें नांहीं.
26 Jul 2013 - 12:22 pm | बॅटमॅन
पुण्यांत बाकी कांही अनुभवायचें असों वा नसों, तें जालप्रदर्शनांत नक्की मांडण्याचें आहें ;)
26 Jul 2013 - 1:13 pm | मोदक
मुंबईचे आगळे रूप पाहताना हे शीर्षक वाचून आजचा दिवस आठवतो आणि आठवतो तो २६ जुलै चा मुसळधार पाऊस..
त्या पावसाच्या आठवणी एखाद्या नवीन धाग्यावर (धागा काढणे शक्य नसेल तर येथेच) देता येतील का..?
26 Jul 2013 - 2:53 pm | सौंदाळा
धागाच काढा.
बर्याच लोकांचे अनुभव असतील.
माझे पण आहेत २-३ अनुभव, (मुंबई +पुणे)टंकीन म्हणतो.
26 Jul 2013 - 3:00 pm | मोदक
तूच सुरूवात कर की!!!!!
26 Jul 2013 - 3:15 pm | सौंदाळा
भ्या वाटतं
सध्या फक्त प्रतिसादच देईन म्हणतो
26 Jul 2013 - 6:39 pm | मोदक
लिही ना बे...
कोणी मुंबईकर आहे का लिहिणारे..?? २६ जुलै ला कोठे होतात, किती दिवस घरी पोहोचला नाहीत, कोणत्या शाळेबे/ कार्यालयात मुक्काम केला वगैरे वगैरे लिहा की कुणीतरी.
बॉम्बस्फोटावरती पण एखादा धागा यावा असे वाटते. असे अनुभव "वाचायला आवडतील" म्हणणार नाही परंतु... लिहा प्लीज कोणीतरी.
26 Jul 2013 - 6:43 pm | कवितानागेश
वेगळा धागा काढा.
पण चारोळी नको. :)
26 Jul 2013 - 6:53 pm | मोदक
ठीक आहे.. हे शिवधनुष्य तूच पेल मग!
27 Jul 2013 - 4:23 pm | सन्जोप राव
फोटो फार आवडले. त्या मानाने मुंबई विशेष आवडत नाही...
28 Jul 2013 - 8:12 am | ओसु
छानच माहिती आणि सुंदर फोटो
सर्वसाक्षी साहेब एक कुतूहल: फोटो ज्या ठिकाणावरून काढले त्याचा पण फोटो देत येईल का? :)
29 Jul 2013 - 11:39 am | विलासराव
मस्त लेख.
फोटो नं. ५ मधे ते घुमट संग्रहालयाचे असावे.
मलबार हीलच्या बाजुने फोटो घेतल्यावर जीपीओ डाव्या बाजुस येइल.
चुकभुल माफी असावी.
4 Aug 2013 - 9:34 am | सर्वसाक्षी
विलासराव
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. मुळात संग्रहालयाचा घुमट असाच आहे हे ध्यानात अले नव्हते, आता शोध घेतो.
4 Aug 2013 - 9:52 am | निनाद मुक्काम प...
आधीच मुंबईकर त्यात हॉटेलवाला
अशी आमची गत आहे.
ताज , ओबेरॉय किंवा भारतातील पहिले बीच हॉटेल
बॉलीवूड चे हक्काचे घर सन अंड सन्स
कितीतरी आठवणी
रात्रीची निरव शांततेत दक्षिण मुंबईला शुद्धीत गाडीतून फेरफटका मारणे , मधेच चौपाटी लगत उतरून समुद्राचा खारा वारा व सायकल वरून विकणारा लुंगीवाल्याची काफी
२४ तास तळीराम त्यातही आमच्या हॉटेल क्षेत्रातील लोकांचे डेरा टाकायचे वसतीस्थान म्हणजे गोकुळ ताज व ओबेराय च्या कुशीत पहुडलेलं आहे.
मुंबईची अशीच माहिती अजून येऊ दे
मुंबईकर बोलून दाखवत नाही ,पण पूर्वीची मुंबई राहिली नाही हेच खरे
पण तो हे पण ओळखून आहे , कि भारतात सर्वप्रथम बदलाचे वारे हे येथूनच वाहतात तेव्हा ती दिवसेंदिवस बदलली नाही तरच नवल
6 Aug 2013 - 4:17 pm | तुमचा अभिषेक
सरळ रेषेत आणखी डावीकडे कॅमेरा फिरवला तो माझगाव डॉक्स मधील सामानची हाताळणी करणारी अजस्त्र यारी दिसली.
मस्तच.. रोज सकाळी डॉकयार्ड स्टेशनवरून वा विकांताला आमच्या माझगावच्या डोंगरावर जातो तेव्हा हिचे दर्शन नकळत होतच असते..
लेख .. फोटो .. आठवणी.. मस्तच..!!
8 Aug 2013 - 4:07 pm | पैसा
अतिशय मेहनतीने लिहिलेली माहिती आणि नितांतसुंदर छायाचित्रे! हा लेखही अप्रतिम झाला आहे!
19 Aug 2013 - 6:17 pm | निश
फार अप्रतिम फोटो व माहीती
18 Sep 2013 - 10:49 pm | स्नेहानिकेत
अप्रतिम फोटो. पहिला फोटो विशेष आवडला कारण त्यात दिसणारे आमचे स्टेट बॅण्क कॉरपोरेट सेण्टर..... त्याच फोटो मध्ये दुरवर दिसणारी कंपनी हि आलिबाग (थळ) ची आर्.सी.एफ. आहे का ????????