८ जुन २०१३
पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार..
भाऊचा धक्का..! टॅक्सी पकडली की मीटर पडायच्या आधी येते.. तरीही चार सहा महिने वर्षातूनच जाणे होते.. ते ही एखाद्याला कौतुकाने दाखवताना, म्हणे बंदर आमच्या इथून हाकेच्या अंतरावर आहे. आज त्या हाकेला ‘ओ’ द्यायला निघालो.. समुद्राच्या खार्या वार्याशी स्पर्धा करणारा सुक्या मच्छीचा वास.. नाकाभोवताली दरवळू लागला आणि घरापासून दूरवर, वेगळ्याच प्रांतात प्रवेश केलेसे वाटू लागले.. शाकाहाराचे व्रत घेतलेल्या माझ्या बायकोलाही त्या गंधाने तरतरी आली., हि देखील त्या वातावरणाचीच एक जादू.. धक्क्याला लागलेल्या प्रवासी बोटी, मच्छीमारी होड्या अन दूरवर क्षितिजाला दिसणारी मालवाहू जहाजांची रांग.. बघत बघतच आम्ही एक सोयीचा बाकडा पकडला, बंदराच्या त्या एका टोकाला जिथे तिन्ही बाजूंनी वारा मुद्दामच आमच्या अंगावर म्हणून कोणीतरी फेकतोय असे वाटावे.. समोरच दिसणार्या बोटीवर धावत जाऊन उडी मारावी अन या बोटीवरून त्या बोटीवर, जणू काही टारझन नाही तर स्पायडरमॅन अंगात संचारल्यासारखे कित्येकदा मनात येऊन गेले.. पण पुढच्याच क्षणाला त्या पलीकडे पसरलेल्या विशाल समुद्रावर नजर जाता, बसल्याजागीच सार्या कल्पना थिजत होत्या.. पण तिथे तसेच बसण्यातही एक मजा होती. अंगाला झोंबणारी थंड वार्याची लाट नकळत दोघांमधील अंतर मिटवत होती.. तळहातांची पकड सैल होता होता परत घट्ट होत होती.. संध्याकाळी जसे एकेक करत पक्ष्यांनी आपापल्या घरट्याकडे परतावे तसे एकेक बोट धक्क्याला येऊन लागत होती. एक., एकामागून दुसरी., मागाहून तिसरी.. पाण्यावर हिंदकळणार्या बोटींना पाहता, वर खाली, वर खाली.. श्वासही नकळत त्याच तालावर घेतला जात होता, ईतकी एकरुपता त्या सभोवतालच्या वातावरणाशी झाली होती.. हळूहळू बंदरावर पेट घेणार्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश संधीप्रकाशावर भारी पडू लागला, तेव्हा कुठे वेळेचे भान आले. घरी जायची नाही, तर भेळ खायचे विसरलोय याची आठवण झाली.. दोघांत एक शेवपुरी अन दोघांत एक भेळ.. हे समुद्राच्या साथीनेच खाण्यात मजा का येते हे गणित तिथे गेल्यावरच सुटावे.. बसल्या बसल्या मोबाईलच्या कॅमेर्याने क्लिकलेल्या फोटोंना बघतच आम्ही तिथून उठलो, पण डोळ्यांनी टिपलेल्या दृष्यांची प्रिंट मात्र मनातच जपायची होती.. अनुभवलेले क्षण मात्र जमतील तसे कागदावर उतरवायचे ठरून निघालो तर खरे, पण अजूनही काहीतरी राहिल्यासारखे वाटत होते..
दोनचार बस आमची वाट बघत बंदराच्याच आगारात उभ्या होत्या, ओळखीचा नंबर बघूनच एकीत चढलो.. पुर्ण बस रिकामी अन आत अंधाराचे साम्राज्य, एक सिंहासन पकडून आम्ही विराजमान झालो.. बसच्या टायरच्या अगदी वर असणारी सीट इतरांपेक्षा जरा उंचावर असते., माझ्या आवडीची, खरोखरच सिंहासनावर बसल्याचा अन सर्व प्रवाश्यांचा लीडर असल्याचा फील देणारी.. आज अनायासेच मिळाली, अन सोबतीला एकांत.. त्या अंधारात आपण दोघेच आहोत हे स्वत:लाही समजू नये म्हणूनच की काय आम्ही अबोलच बसलो होतो.. त्या शांततेचा भंग समुद्रालाही करायचा नसावा, वार्याच्या घोंगावण्याने निर्माण होणारे संगीत तेवढे कानावर पडत होते, पण अजूनही काहीतरी राहिल्यासारखे वाटत होते.. अन इतक्यात.. अचानक.. टप टप टप करत बसच्या टपावर आवाज येऊ लागला.. वाढता वाढता वाढतच गेला.. समुद्र वारा पावसाच्या धारा.. ती आणी मी फक्त, बसच्या अंधारात.. आकाशात तेवढी एक वीज चमकून आली.. मावळता मावळता एक संध्याकाळ उजळून निघाली.. स्साला सुख सुख म्हणजे आणखी काय असते..
- तुमचा अभिषेक
---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
21 Jun 2013 - 11:06 pm | पैसा
मस्त लिहिलंय! एकदम रोमँटिक अनुभव! आणि छान टिपलाय.
21 Jun 2013 - 11:58 pm | बहुगुणी
आवडलं मुक्तक.
22 Jun 2013 - 12:08 am | संजय क्षीरसागर
मस्त!
22 Jun 2013 - 2:58 pm | तुमचा अभिषेक
धन्यवाद .. प्रतिसादांचे.. वाचकांचे.. :)
22 Jun 2013 - 3:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लिहिलय. भाग्यवान आहात... सुख धरून ठेवलेली मूठ सैल होवू देवू नका !
22 Jun 2013 - 3:41 pm | अनिरुद्ध प
लै म्हन्जे लैच भारी.
22 Jun 2013 - 4:40 pm | अनन्न्या
मायबोलीवर वाचला होता, तेव्हा मिपा बंद असल्याने! छान लिहीलय!
23 Jun 2013 - 10:40 am | तुमचा अभिषेक
धन्यवाद, मलाही त्यामुळेच इथे टाकता आले नव्हते, पुढचे दोन भागही एकेक दिवसाआड टाकेन आता..
23 Jun 2013 - 6:16 pm | प्यारे१
खूप सुंदर!
24 Jun 2013 - 3:42 pm | तुमचा अभिषेक
धन्स रे :)
24 Jun 2013 - 7:34 pm | सुबोध खरे
फारच छान लिहिता. असे नाजूक अनुभव आमच्याही आयुष्यात येत असतात (अजूनही). आमचीही बायको कॉलेजची ब्युटी क्वीन होती( अजूनही आहे).
पण जसे तुम्ही शब्दात नेमके पकडता तसे आम्हाला जमत असते तर? दुर्दैवाने परमेश्वराने आमचा उजवा मेंदू रिकामा ठेवला आहे.कोणतीच कला येत नाही.
जाऊद्या निदान पुनः प्रत्ययाचा आनंद देता हे आमच्यावर अनंत उपकार. असेच लिहिते रहा.