थोडे मर्मबंधातील ...

ढालगज भवानी's picture
ढालगज भवानी in जनातलं, मनातलं
6 May 2013 - 1:09 pm

खरं तर थोडा बायकी विषयच.

मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय.

आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते. तिच्याकडे सर्वात आधी एक हाडामासाची माणूस म्हणून बघता येते आणि नंतर स्त्री, बायको, मुलगी ,बहीण अगदी सून, नणंद अन भावजयसुद्धा या तिच्या नात्यांना, त्यातील संघर्षांना आता समजून घेता येते. या सर्व संघर्षातूनही तिने आपल्याकरता जपलेले केवळ, निव्वळ दैवी ममत्व आता कुठे समजू लागते. कारण आता मुलीला वाढवताना, शहाणी करताना आपण त्या भूमिकेत शिरलेलो असतो.... अक्षरक्षः "इन युवर ओन मदर्स शूज."

आई रागावली की पूर्वी ज्या इन्टेन्सिटीने, प्रखरतेने आपण तिच्याक्डे पहात मुकाट ऐकलेले असते त्याच कारणासाठी, त्याच प्रखरतेने आता आपल्या मुलीचे निरागस डोळे आपल्यावर वरचेवर रोखले जातात. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते.

आई रागावल्यानंतर काही वेळाने आपल्याला जवळ घेताना ज्या वैषम्ययुक्त रागाने आपण तिचा हात झिडकारलेला असतो अगदी तस्साच आपला हात आपली मुलगी झिडकारत असते. अन कुठेतरी आईची कळकळ आपल्याला आयुष्यात पहील्यांदा समजून येत असते. तीच गोष्ट परत परत "सुरक्षिततेच्या टीप्स" देण्याबद्दल. आपली मुलगी म्हणते "ममा हाऊ मेनी टाइम्स यु आर गॉना टेल मी? आय अ‍ॅम नॉट अ बेबी एनीमोअर" अन पूर्वीच्या आपण अगदी हेच मराठीतून बोललेलो आपल्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते.

आई अन मुलगी दोघींना व्यवस्थित समजण्याचा हा काळ. एक साक्षात भूतकाळातील आपणच तर दुसरी आपलीच कार्बन कॉपी... वेड्या नाईव्ह आत्मविश्वासात, जग जिंकायला निघालेली. "अगं! थांब जरा ऐक माझं. जग तुला वाटतं तितकं विश्वासार्ह ना...." पण ती आहे कुठे ऐकायला? अन खरच हेच शब्द ऐकायला आपण तरी कुठे थांबलो होतो जागेवर मग आपली लेक मात्र थांबेल ही अपेक्षा कशी करावी?

आईकडून खूप काही स्ट्रेन्थ्स मिळालेल्या असतात, तिच्या पुण्याईचं, संस्कारांचं कवच मिळालेलं असतं. पण आपलं वेडं मन मात्र विचारत राहतं - ही सर्व पुण्याई व सुकृत , हे संस्कार मी पुढच्या पीढीला, माझ्या लेकीला दिले का? मी कुठे चुकले तर नसेन, आपल्या आईइतका "परफेक्ट जॉब" आपण करु शकलो का? व्यावहारीक भाषेत सांगायचं झालं तर माझी लेक सर्वार्थाने, तिची काळजी घेऊ शकेल का? अन याचं रेडीमेड उत्तर कोणाकडेच नसतं कारण ते उत्तर फक्त काळच देणार असतो. हा तीनपदरी वेणीसारखा नाजूक तिढा काळच सोडवणार असतो. आपण मनातल्या मनात प्रार्थना करत, संयम ठेवून,पिलाला धडपडत पण तेजस्वीपणे भरारी घेताना पहाणार असतो.

हा संयम, हे वाट पहाणे खरच खूप अवघड असते.

समाजजीवनमानराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

6 May 2013 - 1:14 pm | स्पंदना

सहमत. अगदी मनापासुन सहमत.
त्यात मुली तश्या प्रखर असतात. मुल त्यांच्या कोषात जातात, बोलतच नाहीत तर मुली खडे बोल सुनवायला लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत,"मी करते" असा एक जोरदार आत्मविश्वास असतो. आणि खर सांगायच तर आपणही जरा जास्तच हळव्या असतो.

मन१'s picture

6 May 2013 - 1:15 pm | मन१

चांगलं मांडलय

विसोबा खेचर's picture

6 May 2013 - 1:20 pm | विसोबा खेचर

सुंदर प्रकटन...

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2013 - 1:37 pm | प्रभाकर पेठकर

लेखात मांडलेल्या विचारांशी, भावनांशी १००% सहमत.

फक्त वाईट एवढेच वाटले की असा अनुभव 'फक्त आईलाच येतो' असा सुर जाणवला. वडिलांचेही तस्सेच अनुभव असतात. शाळकरी आणि महाविद्यालयिन वयात घरच्यांना फसवून, अंधारात ठेवून केलेल्या कांही 'धाडसी' गोष्टी, अगदी प्रसंगी जीवावर बेतणार्‍या असणार्‍याही, आता आपला मुलगा करत तर नसेल नं? ह्या विचारांनी फार अस्वस्थ होतं. पण शांतपणे विचार केल्यावर जाणवतं आपल्यावर जे घरचे संस्कार होते त्यानेच आपल्याला 'वाहवत' जाण्यापासून रोखलं आहे. तेंव्हा मुलावर प्रभावी संस्कार करणं, संवाद चालू ठेवणं हे आणि एवढेच आपल्या हातात असते. जे स्वातंत्र्य आपल्याला 'त्या' वयात आवश्यक वाटत होते ते आपल्या 'त्याच' वयात आलेल्या मुलाला द्यावं पण, जागरूक राहूनच.
मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले. कदाचित त्यालाच परिपक्वता म्हणत असावेत. आई वडिलांचे संस्कार जसे आठवतात तसेच त्यांनी आपल्या बाबतीत केलेल्या चुकाही, त्यांच्या आपल्यावरील निस्सिम प्रेमापोटीच झाल्या होत्या हे कळायचेच वय म्हणजे प्रौढत्व.

अर्धवट's picture

6 May 2013 - 8:28 pm | अर्धवट

वाहवा..

वाटाड्या...'s picture

6 May 2013 - 8:56 pm | वाटाड्या...

"मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले." ह्या वाक्याला मनापासुन दाद..बाकी लेख आणि तुमचा प्रतिसाद छानच...

- वाट्या..

नगरीनिरंजन's picture

6 May 2013 - 1:58 pm | नगरीनिरंजन

छान!

चाणक्य's picture

6 May 2013 - 2:01 pm | चाणक्य

प्रकटन.

यशोधरा's picture

6 May 2013 - 2:05 pm | यशोधरा

छान लिहिले आहेस शुचि.
पेठकरकाकांनीही दुसरी बाजू चांगली मांडली आहे, पण ते म्हणत आहेत तसा सूर वगैरे काही जाणवला नाही मला.

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2013 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

ज्या वयात आपल्याला 'आई' समजू लागते (किंवा तसं वाटतं) त्याच वयात आपल्याला आपले वडिलही समजू लागतात (किंवा तसं वाटतं). पण वडिलांचा साधा उल्लेखही न आल्याने मी तसे म्हंटले आहे. अर्थात, लेखिकेचा तसा काही उद्देश नाही/नव्हता हे ही मान्य आहेच.

हो, तुम्हांला काय म्हणायचं आहे ते समजलं मला पण जाणून बूजून ह्यात वडिलांचा अनुल्लेख केलेला आहे असं नाही वाटलं असं म्हणते आहे मी. लेखाचा फोकस आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं आणि तो लेखिकेचा स्वतःचा अनुभव आहे, असंही. तेह्वा जितकं आणि जे लिहिलं आहे ते विषयाला धरुनच आहे. :)

प्यारे१'s picture

6 May 2013 - 2:41 pm | प्यारे१

+१००
मुळातच हे प्रकटन एक स्वानुभवातून आलेलं स्वगत असावं असं वाटतं आहे.

मूकवाचक's picture

6 May 2013 - 2:14 pm | मूकवाचक

धागा आणि पेठकर काकांचा प्रतिसाद दोन्ही आवडले.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 2:31 pm | ढालगज भवानी

पेठकर व यशोधरा यांचे तसेच अन्य सर्वांचे आभार.

आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं

+१००

तर्री's picture

6 May 2013 - 2:40 pm | तर्री

रिव्हर्स दे-जावू शी मात्र स्तब्ध राहिला गेलो होतो. तो क्षण मात्र मोठा अनाकलनीय सुन्दर होता.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 2:45 pm | ढालगज भवानी

:) क्या बात है!!! अगदी बरोबर आपलेच तरुण डोळे आपल्यावर इन्टेन्स्ली रोखलेला तो क्षण असतो. गुड कॅच.

Pearl's picture

6 May 2013 - 3:24 pm | Pearl

छान...

भावना कल्लोळ's picture

6 May 2013 - 3:47 pm | भावना कल्लोळ

शुचि ताई,सध्या मी हे सर्व अनुभवत आहे आणि या सर्व अनुभवात मला माझी आई नव्याने गवसत आहे.

काकाकाकू's picture

6 May 2013 - 4:40 pm | काकाकाकू

आई नेहेमी म्हणते मला (हो, अजूनहि म्हणते - आईला मुलं नेहमीच लहान!) की "अरे, तू त्या भुमिकेत गेलास म्हणेजे तुला कळेल". पुढे जेव्हा मुलं मुलींची फ्रॅक्चर्स झाली, एखाद्या विषयात काठावर पास झाली, 'पंधरा मिनिटं' हरवली....त्या त्या भुमिकातनं बाप म्हणून वावरताना माझ्या या अशा प्रसंगात आई-दादांचं काय झालं असेल ते नेमकं कळलं!

माझ्यापुरता तरी शेवटच्या (अतिशय नेटकेपणाने मांडलेल्या) पॅराग्राफमधे एक बदल करावा लागेल - आईकडून -> आई-वडिलांकडून.

छान लिहिलं आहेस.

राजेश घासकडवी's picture

6 May 2013 - 4:43 pm | राजेश घासकडवी

प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत रिव्हर्स दे जा व्हू चे अनुभव छान मांडले आहेत. आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो. काळ गेल्यावर टेबलं फिरतात, याच नाण्याचं दुसरं चित्र जगायला मिळतं, लागतं. हे छान दाखवलं आहे.

खरं तर थोडा बायकी विषयच.

अशी अपोलोजेटिक सुरूवात मात्र खटकली. माझ्या मते लेखन दर्जेदार असतं किंवा नसतं. चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 May 2013 - 4:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपलेच डोळे एकमेकांकडे जेव्हा रोखुन बघतात त्यांच्याकडे तटस्थ पणे पहाणारी तिसरी बाजु हि मजेदार असावी. त्या वेळी कसे बरं वाटत असेल?

हे प्रकटन आवडले हे.वे.सां. न.

(उत्सुक)

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 5:33 pm | बॅटमॅन

आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो.

नेमके आणि तंतोतंत!!! भारीच हो गुर्जी. :)

(थोडे थोडे डोळे उघडलेला) बॅटमॅन.

सुबोध खरे's picture

6 May 2013 - 8:35 pm | सुबोध खरे

चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही.
शत प्रती शत बरोबर.
बाकी लेख उत्कृष्टच आहे. प्रश्नच नाही

मुक्तसुनीत's picture

9 May 2013 - 4:11 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.

स्पा's picture

6 May 2013 - 5:00 pm | स्पा

:)

अवांतर : अबोली विभाग झाला का सुरु ? ;)

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 5:33 pm | बॅटमॅन

दवणीय नाही, वाचनीय म्हण स्पांडू. :)

स्पा's picture

6 May 2013 - 5:38 pm | स्पा

दवणीय is नॉट = to वाचनीय असे म्हणायचे आहे का तुज

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 5:44 pm | बॅटमॅन

येस्स. दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय. हा लेख तसा आजिबात वाटत नसल्याने म्हणालो इतकेच. :)

दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय

चे चे .. फारच चुकीचा अर्थ घेतलात ब्वा
असो

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 7:28 pm | बॅटमॅन

हर्कत नाही. मी हा शब्द चांगल्या अर्थाने वापरलेला वाचला नसल्यामुळे तसे वाटले, णो पिराब्ळेम :)

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:32 pm | ढालगज भवानी

:) हाहाहा .... ऐक ना मी एकदा "नंदन" यांच्या लेखावर प्रतिक्रिया दिली होती "नंदन यांचे लेख म्हनजे जणू उंबराच्या फूलासारखे दुर्मीळ व पर्वणीचे असतात" अशा टाइप. सगळ्यांनी इतकी खेचली होती की म्हणे नंदन स्वतः लेखांना "दवणीय" वगैरे म्हणतात अन त्यांच्या लेखावर अशी "दवनीय" प्रतिक्रिया यावी हाच तो पोएटीक का काय न्याय म्हणे =)) =))

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 7:33 pm | बॅटमॅन

=)) =))

अभ्या..'s picture

6 May 2013 - 7:37 pm | अभ्या..

बाकी काहीही असो, शुचितै अगदी मनापासून लिहीते. जसे डोक्यात आले तसे सरळ टाइप करते हे नक्की. :) अगदी प्रतिसाद पण मनापासून एंजॉय करणारी आहे ही.
कीपीटप शुचि. :)

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:37 pm | ढालगज भवानी

:) धन्यवाद

स्पा's picture

6 May 2013 - 8:17 pm | स्पा

भवानी मातेचा....
ुउदो उदो.....

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 8:31 pm | ढालगज भवानी

ए "उदो" नाही रे "उदे" म्हणजे "उगव" कुंडलिनी जागृत हो/उगव/माझ्या सहस्रार चक्रात चढ वगैरे ;)

धमाल मुलगा's picture

6 May 2013 - 5:40 pm | धमाल मुलगा

बेट्या,एक काम कर, वाचनखूण साठवून ठेव. अगदी शुचि (स्वारी स्वारी...भवानी) म्हणते तसं पोरं मोठी व्हायला लागल्यावर वगैरे लांबचं आहे, ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी हाच धागा काढून वाच... मग आपण बोलू! :)

प्यारे१'s picture

6 May 2013 - 5:50 pm | प्यारे१

>>>ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी
आधी लग्न कर हो ;)
सीरियसली सेम टु सेम प्रतिसाद देण्याची इच्छा होती.
अर्थात दोष त्याचा नाही, सध्या तो एका काठावर आहे. दुसर्‍या काठावर गेला की कळेलच.

स्पा's picture

6 May 2013 - 5:55 pm | स्पा

आधी लग्न कर हो

ख्याक =)) =))

धमाल मुलगा's picture

7 May 2013 - 5:16 pm | धमाल मुलगा

बापुस व्हायला अन लेकराबद्दलची काळजी जाणवायला लग्नाचं बंधन असलंच पाहिजे असंच काही नाही बरंका प्यारेभैय्या! :)

हो स्पा, विभाग सुरु झाला आणि अतिशय उत्तम रीत्य सुरु आहे. ह्या लेखाशी काय संबंध आहे त्याचा अवांतर म्हणूनही?

मॄदुला देसाई's picture

6 May 2013 - 5:25 pm | मॄदुला देसाई

ह्म्म काय बोलू...प्रत्येक वाक्याशी सहमत. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते. रोज एकादातरी हाच विचार मनात येतो.

पैसा's picture

6 May 2013 - 6:01 pm | पैसा

छान लिहिलंय.

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 6:38 pm | मुक्त विहारि

मस्त..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रकटन... पालकाचे अनुभवविश्व चपखल शब्दांत !

अभ्या..'s picture

6 May 2013 - 7:31 pm | अभ्या..

छान :)

राही's picture

6 May 2013 - 8:17 pm | राही

सुंदर प्रगटन.बालक-पालक नातं जोपासायला खरंच अवघड,त्या त्या क्षणी दोघांनाही न उलगडणारं,भूतकाळाची चिरफाड करीत भविष्यकाळ जगायला लावणारं.
पण केवळ बालक-पालकच नव्हे तर इतरत्रही भूमिका बदलताना हाच गुंता होतो. जसे सहकर्मचारी (किंवा आपण) बॉस झाल्यावर नाते बदलते,टेबलाच्या बाजूंची अदलाबदल झाली की दृष्टिकोण बदलतो.आपली आणि समोरच्याची विचारसरणी भिन्न वाटत असली तरी एकाच जीवनधारेचा तो उगमाकडचा आणि मुखाकडचा भाग आहे हे ज्या वयात जाणवू लागते, ते प्रौढत्व,ती परिपक्वता.

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

http://mimarathi.net/smile/congrats.gifhttp://mimarathi.net/smile/congrats.gifhttp://mimarathi.net/smile/congrats.gif

अगदी हेच म्हणते. फार अवघड! फाजील आत्मविश्वास, सटासटा बोलून मोकळे होणे, सगळं काही गणितासारखे आयुष्य असावे असे वाटणे, वाद घालणे. काळजी करून रोज माझे दोन केस तरी पांढरे होत असतील. रोज शाळेत जाताना, खेळायला जाताना त्याच त्या सूचना मी देते पण मलाही आई तश्याच सूचना द्यायची तेंव्हा "आता तू काय म्हणणारेस ते समजलं, दार नीट लावून घे, पीप होलमधून बघितल्याशिवाय दार उघडू नकोस, अनोळखी माणसाशी बोलू नकोस." असे म्हणत असे, आता माझा मुलगा शाळेत निघताना "तू अमूक एक असंच सांगणारेस ना" असं विचारतो, तरी सांगत राहते. मी मुलाला हेच सांगतीये ना हे माझी आई दम देऊन कबूल करून घेते. ;) आणि हेही सांगते की अजून तर सुरुवात आहे. हैराण होतात पालक! एका मैत्रिणीची मुलं दहावी बारावीची झाल्यापासून तिचा स्वभाव भलताच बदललाय. सतत काळजी.
आपण आजकाल बोलायला मोकळेपणाही देतो म्हणून वाट्टेल ते विचारत राहणे, मग आपण रागावणे. मोकळेपणा आणि अगोचरपणा यातला फरक काय हे रोज रोज तेच सांगावं लागतय. पैश्याचे नियोजन साधे, सोपे, अवघड कसेही सांगितले तरी आपण सुलतान असल्यागत राहणे पाहून तर घामच फुटतोय.

देशपांडे विनायक's picture

7 May 2013 - 8:38 am | देशपांडे विनायक

हा दोन पिढ्यातील संघर्ष कुणालाच चुकला नाही

छान लिहिले आहे .

मुलाला ENGINEERIG COLLEGE वसतिगृहात ठेवल्यावर दोन वर्षे झोपेतून एकदम मधेच जाग येत असे. जरूर नसताना भूतकाळ आठवे. बायको विचारणार काय झाले ?

तिला सांगण्यासारखे असते तर झोप कशाला उडाली असती ?

नशीब थोर. मुलगा पहिली २ वर्षे FIRST CLASS मधे उत्तीर्ण झाला त्यामुळे तो आता नक्की ENGG होणार हि खात्री पटली

झोप चालू झाली

धमाल मुलगा's picture

7 May 2013 - 5:19 pm | धमाल मुलगा

घरी असताना रोज बापसाशी कचकून भांडणं व्हायची, पण ग्र्याज्युएशन झाल्यावर पुढं शिक्षणासाठी गाव सोडताना यष्टी ष्ट्यांडावर बसमध्ये बसतानाचा बापसाचा पाठीवरचा थरथरता हात, ओढलेला आवाज अन भिजले डोळे एकदम आठवले. आमच्या कडकसिंगला हे असं हललेलं पाहिलं ते तेव्हाच फक्त! :(

:( ढम्या वडीलांचं प्रेम आईपेक्षा वेगळच असतं ...
दिसायला कठोर दिसतं .. पण जगातलं एकमेवं हळवं ...
आई बडबड करुन काळजी दाखवते ... ते न बोलताच ....
शुचि लेख छान आहे . आईला बर्‍याचदा उलटं बोलण्याची चुक केलीये :(

चौकटराजा's picture

7 May 2013 - 6:03 pm | चौकटराजा

आम्ही आता साठ वर्षाचे झालो. वडील मित्रासारखे होते.पण शंभर टक्के मित्र म्हणता येणार नाही. आमची मैत्री १९६८ ते १९८९ या काळातली. आई मैत्रिणीसारखी पण शंभर टक्के मैत्रिण म्हणता येणार नाही. आमची मैत्री १९७५ ते २०१३ या काळातली/( नुकतीच इहलोकाची यात्रा संपविली तिने) एकूणच संस्कार या विषयात ९० टक्के वाटा ज्याचा त्याचा. १० टक्के श्रेय व अपश्रेय पालकांचे व परिसराचे असे माझे १००० टक्के मत झाले आहे.त्या ९० टक्यावर आपल्या जन्मजात " संचिता" चा फार प्रभाव असतो.म्हणूनच एकाच घरातील मुले त्याच वातावरणात वाढून सुद्धा वेगळ्या पिंडाची असतात. मी पिंड या कल्पनेला फार मानतो.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 7:00 pm | प्यारे१

>>>नुकतीच इहलोकाची यात्रा संपविली तिने

भावपूर्ण श्रद्धांजली.
मृतात्म्यास सद्गती लाभो.
(पूर्वी वाचलेल्या प्रतिसादांवरुन सुटल्या असेच म्हणावेसे वाटते. गैरसमज नसावा.)

jaypal's picture

7 May 2013 - 6:22 pm | jaypal

सुंदर लि़खाण. वाचन खुन साठवली आहे.

सहज's picture

7 May 2013 - 6:36 pm | सहज

२००८ मधे आलेला टेकन नामक इंग्रजी सिनेमा पालकांनी आपल्या शिंग फुटायला लागलेल्या पोरांना दाखवायचा. आपले वडील काही सी आय ए मधील "जेम्स बाँड" टाईप इसम नाही हे पोरांनी ओळखले असतेच, त्यामुळे आपसूक आई-वडील सूचना आपल्या भल्याकरता देतात हे त्यांना कळेल.

श्रिया's picture

10 May 2013 - 12:53 pm | श्रिया

सुरेख आणि प्रांजळ प्रकटन!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 May 2013 - 1:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खरं सांगू का शुचिताई, या मुली फार जीव लावतात हो.
खुप सुंदर लिहील्यस... खुप आवडले.

अर्धवटराव's picture

11 May 2013 - 12:12 am | अर्धवटराव

आमचे चिरंजीव, वय वर्षे साडेतीन, आतापासुनच आम्हाला मॅच्युअर्ड प्रौढत्व वगैरे बहाल करायला निघालेत. अगदी रोज, काय अर्धवटराव- कसं वाटतय बापाच्या भुमीकेतुन तुमचच बालपण... असा प्रश्न निदान एकदा येतो. आम्हि बापाला अतोनात छळलं. पण आमचा बापुस असा प्राणि आहे कि जणु आम्हाला प्रत्येक वेळी माफ करत राहावे व आमच्यावर प्रेम करत राहावे यासाठीच त्याचा जन्म. ज्यु. शिशुपाल इतके अनंत अपराध क्षमा करुन घ्यायचे वरदान घेऊन आलेले नाहित हे निश्चित. पण हे ही खरं, कि आम्हि बालपणी आमच्या चिरंजीवांइतके गोण्डस नसणार. बघु... पाळण्यातले पाय पुढे काय काय नृत्य करतील ते.

ढालगज शुचे, मर्मबंध अगदी फस्ट्क्लास उतरला हो. मिपाकर अबोलींकडे बघुन तुम्हासर्वांबद्दल अगदी १००% आशावादी आहे मी. आयला... एव्हढं मीपाचं रण गाजवता... मग या तर आपल्याच कळ्या... त्या निश्चितच उत्तम उमलतील व आयुष्य सुगंधी करतील.

अर्धवटराव

निशदे's picture

11 May 2013 - 4:27 am | निशदे

आणि प्रतिक्रियाही उत्तम...... :)

ढालगज भवानी's picture

11 May 2013 - 4:29 am | ढालगज भवानी

सर्वांचे खूप आभार :)