थोडे मर्मबंधातील ...
खरं तर थोडा बायकी विषयच.
मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय.
आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते. तिच्याकडे सर्वात आधी एक हाडामासाची माणूस म्हणून बघता येते आणि नंतर स्त्री, बायको, मुलगी ,बहीण अगदी सून, नणंद अन भावजयसुद्धा या तिच्या नात्यांना, त्यातील संघर्षांना आता समजून घेता येते. या सर्व संघर्षातूनही तिने आपल्याकरता जपलेले केवळ, निव्वळ दैवी ममत्व आता कुठे समजू लागते. कारण आता मुलीला वाढवताना, शहाणी करताना आपण त्या भूमिकेत शिरलेलो असतो.... अक्षरक्षः "इन युवर ओन मदर्स शूज."
आई रागावली की पूर्वी ज्या इन्टेन्सिटीने, प्रखरतेने आपण तिच्याक्डे पहात मुकाट ऐकलेले असते त्याच कारणासाठी, त्याच प्रखरतेने आता आपल्या मुलीचे निरागस डोळे आपल्यावर वरचेवर रोखले जातात. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते.
आई रागावल्यानंतर काही वेळाने आपल्याला जवळ घेताना ज्या वैषम्ययुक्त रागाने आपण तिचा हात झिडकारलेला असतो अगदी तस्साच आपला हात आपली मुलगी झिडकारत असते. अन कुठेतरी आईची कळकळ आपल्याला आयुष्यात पहील्यांदा समजून येत असते. तीच गोष्ट परत परत "सुरक्षिततेच्या टीप्स" देण्याबद्दल. आपली मुलगी म्हणते "ममा हाऊ मेनी टाइम्स यु आर गॉना टेल मी? आय अॅम नॉट अ बेबी एनीमोअर" अन पूर्वीच्या आपण अगदी हेच मराठीतून बोललेलो आपल्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते.
आई अन मुलगी दोघींना व्यवस्थित समजण्याचा हा काळ. एक साक्षात भूतकाळातील आपणच तर दुसरी आपलीच कार्बन कॉपी... वेड्या नाईव्ह आत्मविश्वासात, जग जिंकायला निघालेली. "अगं! थांब जरा ऐक माझं. जग तुला वाटतं तितकं विश्वासार्ह ना...." पण ती आहे कुठे ऐकायला? अन खरच हेच शब्द ऐकायला आपण तरी कुठे थांबलो होतो जागेवर मग आपली लेक मात्र थांबेल ही अपेक्षा कशी करावी?
आईकडून खूप काही स्ट्रेन्थ्स मिळालेल्या असतात, तिच्या पुण्याईचं, संस्कारांचं कवच मिळालेलं असतं. पण आपलं वेडं मन मात्र विचारत राहतं - ही सर्व पुण्याई व सुकृत , हे संस्कार मी पुढच्या पीढीला, माझ्या लेकीला दिले का? मी कुठे चुकले तर नसेन, आपल्या आईइतका "परफेक्ट जॉब" आपण करु शकलो का? व्यावहारीक भाषेत सांगायचं झालं तर माझी लेक सर्वार्थाने, तिची काळजी घेऊ शकेल का? अन याचं रेडीमेड उत्तर कोणाकडेच नसतं कारण ते उत्तर फक्त काळच देणार असतो. हा तीनपदरी वेणीसारखा नाजूक तिढा काळच सोडवणार असतो. आपण मनातल्या मनात प्रार्थना करत, संयम ठेवून,पिलाला धडपडत पण तेजस्वीपणे भरारी घेताना पहाणार असतो.
हा संयम, हे वाट पहाणे खरच खूप अवघड असते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात है!
ढम्या वडीलांचं प्रेम आईपेक्षा
आमचाबी आन्भव थोडासा
>>>नुकतीच इहलोकाची यात्रा
अप्रतिम
२००८
सुरेख आणि प्रांजळ प्रकटन!
खरं
आयला...
अतिशय छान लेख
सर्वांचे खूप आभार