(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२)
’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’
मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही. आणि शहरही(?) इतके मोठे नव्हते की कुणी टॅक्सी वापरेल. त्यामुळे दादरला आजी आजोबांकडे जाण्यातले टॅक्सी हे आणखी एक आकर्षण होते. दादर टी टी च्या बाजुला उतरायचे, बाहेर मस्त कमानदार चार खांबी छत होते, तिथे येऊन उभे राहीले की दूर रांगेत उभी असलेली टॅक्सी पुढ्यात येऊन उभी राहायची. मग सरदारजी दरवाजा उघडुन उतरायचे आणि पुढुन वळसा घेत ’बैठिये जी’ असे म्हणत डावा हात गाडीच्या झाकणावर ठेवत उजव्या हाताने गर्रकन मिटरचा झेंडा फिरवायचे आणि क्रिंग-खण्ण असा आवाज यायचा. त्या काळी प्रवाशाला कुठे जाणार असे विचारायची पद्धत नव्हती, प्रवाशाने टॅक्सीवाल्याला ’ अमकीकडे येणार का?’ असे आर्जव करायची वेळ आलेली नव्हती. मग डौलदार वळण घेत टॅक्सी आंबेडकर रस्त्याच्या दिशेने निघायची आणि लगोलग डावे वळण घेत टिळक पुलावर यायची. मग कोतवाल उद्यानावरुन डावे वळण घेत पुढे मारुती-मागे चर्च असलेल्या देवळाला उजवे घेत ऍंटोनिया डिसिल्वा शाळेवरुन पुढे यायची आणि घर यायचे. वास्तविक दादर स्थानकात उतरल्यावर टी टी ला न जाता पूल पार करुन फुलबाजारात उतरले की चालत दोन मिनिटांवर घर! मात्र ठाण्यात टॅक्सी नव्ह्ती आणि देवाच्या दयेने श्रीमंत नसले तरी मुलाच्या टॅक्सीच्या हट्टाला वडील उधळपट्टी समजणारे नव्हते, त्यामुळे आमची चैन बिनबोभाट पार पडायची.
मध्यमवर्गाच्या चैनीच्या सर्वोच्च कल्पनांपैकी एक म्हणजे टॅक्सीत बसणे. गाडी आपल्याकडे असू शकते हा विचारही मध्यमवर्गाच्या मनाला शिवला नव्हता. गाडी म्हणजे डॉक्टर, बडा वकील, व्यापारी वा सरकारी उच्च्पदस्थ यांचीच असू शकते हे समिकरण मनात पक्के होते. मुंबईकराला बेस्टची खास सवय. घरातुन खाउन बाहेर पडायचं, खाली रस्त्यावर आलं की थोड्याच वेळात बस हजर व्हायची, साहजिकच टॅक्सी ही चैन होती तरीही मुंबईकराच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग होती. लग्न प्रसंग, लांबच्या प्रवासासाठी सामानासह गाडीवर जायला, खरेदी, क्वचित सिनेमा या सगळ्यांसाठी आणि हो, गावाहुन येताना बोजे मोजुन उतरवुन घेतल्यानंतर टॅक्सी ही हवीच. आणखी एका गोड प्रसंगी टॅक्सी हमखास लागायची - साखरपुडा झाल्यानंतर लग्ना आधीच्या मधल्या काळात आपल्या वाग्दत्त वधूला चित्रपटाला वा फिरायला चौपाटीवर न्यायला. म्हटलं तर चैन आणि तेव्हढाच जरा एकांत. तो जमाना टॅक्सीच्याही परिवर्तनाचा होता. स्वातंत्र्य मिळुन दशक ओलांडले होते. इंग्रजी जमान्यातल्या व इंग्रजी बनावटीच्या डॉज, प्लायमाऊथ, वॉक्जॉल, मॉरिस वगैरे गाड्या हळु हळु सरत आल्या होत्या. त्यांनी लोणावळा, पांचगणी-महाबळेश्वरचा रस्ता धरला होता. जमाना होता तो बेबी हिंदुस्थान, अँबेसेडर आणि फियाट्चा. फियाट मध्ये पुन्हा दोन प्रकार - नेहेमीची फियाट आणि मागुन त्रोटकी दिसणारी डुक्कर फियाट. फियाटचा आकारही वेगळा, जरा कमानदार आणि चेहेरा थोडा हसतमुख. मग नकळत एक दिवस नवी फियाट आली आणि सत्तरच्या दशकात एके दिवशी वर्तमानपत्रात अर्ध पान भरुन जाहिरात झळकली ’जुन्या दोस्तांनो, रामराम’. फियाट ११०० डी चालली होती आणि प्रिमिअर पद्मिनी रुबाबात प्रवेश करत होती. मात्र बनविणारे हात बदलले, मालकी बदलली तरी फियाट ही फियाटच राहिली.
टॅक्सी या प्रकाराचा पगडा मुंबईकरावर आणि अर्थातच चित्रपट सृष्टीवरही होता. अनेक चित्रपटात या टॅक्सीनं भूमिका केल्या आणि अनेक दिग्गज नायकांना आपलसं करुन घेतलं. साधु और शैतान, आरपार, टॅक्सी ड्रायव्हर, हसते जख्म, जानेमन, वॉरंट, खुद्दार असे अनेक चित्रपट या काळी पिवळीने गाजवले. मात्र डोळ्यापुढे उभा राहतो ’आर पार’ मधला टोपीच्या पुढची झाप खाली आलेला आणि व्ही के मुर्तींनी दरवाजाच्या चौकटीत बंदिस्त केलेला गुरुदत्तचा चेहेरा. गाडीतुन पळणाऱ्या खलनायकाचा पाठलाग करायला नायकाने टॅक्सीला हात करुन घाईघाईने आंत शिरत ’ड्राईवर, सामने वाली गाडी का पिछा करो, चलो, जल्दी चलो’ हा संवादही नित्याचा झाला होता. एकुण काय तर टॅक्सीचा एक रुबाब होता. चकचकीत गाडी, आतल्या मऊ गाद्या, वर छतावर सामान बांधायला फलाट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुढे झाकणावर उजवीकडे असलेली चकचकीत घडीची नळकांडी - त्या टॅक्सीत आकाशवाणीवरची गाणी ऐकायची सोय असल्याची निदर्शिकाच जणु. सगळ्या टॅक्सींचा रंग एकसमान, काळा आणि पिवळा. पिवळा सुद्धा ठरलेला, किंचित केशरी छटा असलेला. पुण्यातल्या टॅक्सी मात्र फिकट पिवळा रंग वापरायच्या. पुढे ऐंशीच्या दशकात जेव्हा दिल्ली वा कलकत्ता येथे जावे लागले तेव्हा कलकत्त्याच्या ड्बड्या ऍंबेसेडर गाड्या पाहुन आणि दिल्लीतले लुच्चे टॅक्सीवाले पाहुन मुंबईकर आपल्या टॅक्सीची आठवण मनोमन काढायचा. परगावाहुन येणाऱ्या कचेरीतल्या सहकाऱ्याला वा नातेवाइकाला मुंबईकर छातीठोकपणे सांगायचा, "अरे मुंबई सेंट्रलला उतर, टॅक्सी पकड आणि ये इथे. आमचे टॅक्सीवाले सरळ आहेत, आणि मुंबईत टॅक्सी मापकावर चालतात, इथे मापात पाप नाही".
मुंबई नगरी मायानगरी. आलेल्या प्रत्येकाला काम देणार. बघता बघता लांबच्या राज्यातुन आलेल्या लोकांनी टॅक्सीचा व्यवसाय स्विकारला आणि वाढत्या गर्दी बरोबर टॅक्सीही वाढल्या. वडाळा, गुरु तेग बहादुर नगर म्हणजे तेव्हाचे कोळीवाडा, वरळी, गोवंडी, चेंबुर, मुंबई सेंट्रल ही जणु टॅक्सींची माहेरघरे. टॅक्सी दुरुस्ती म्हटली म्हणजे एकतर कोळीवाडा नाहीतर मोरलॅंड रोड. पसारा वाढत गेला, मुंबई विस्तारत गेली आणि चाकरमानेही वाढले, घराघरातुन स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पड्ल्या. आणि मध्यमवर्गीय संसारगाडीला दुसरे इंजीन लागल्यावर टॅक्सी परवडु लागली’. अशीच एक दिवस भागीदारी सेवा सुरू झाली. सुरुवात कुठे झाली ते सांगणे कठिण आहे पण तेव्हाचे व्हीटी/ चर्चगेट ते कुलाबा/ नरिमन पॉइंट, दादर - पारपत्र कचेरी- लोटस, मुलुंड - अंधेरी - गोरेगाव ह्या त्या सेवा. गाडी सारखे या भागीदारी टॅक्सीचे प्रवासी गट आपोआप झाले आणि एखादा/एखादी जर एखाद्या दिवशी दिसला/ दिसली नाही तर एकमेकांकडे पाहत व क्रम लागल्यावर नाईलाजाने रांगेतुन येइल तो चौथा प्रवासी घेत टॅक्सीत शिरायचे. मुलुंड - अंधेरी माणशी पाच रुपये असे सुरु झाले तेव्हाचे भाडे होते आणि तरीही ते जास्त होते, लोक ३९६ च्या रांगेत विनातक्रार पाऊण एक तास उभे राहात होते. बदलत्या काळाबरोबर टॅक्सीचे हे बदलते आणि भावलेले रुप होते. याच कल्पनेने मोठी झेप घेतली आणि मुंबई/ठाणे - पुणे, दादर- नाशिक-शिर्डी, मुंबई सेंट्रल-सुरत असा लांबचा पल्ला गाठला. प्रवासी नेताना दादर पुणे टॅक्सी हमरस्त्यावर असलेल्या बजाज, थर्मॅक्स यांच्या फाटकावर टपाल वा किरकोळ सामानही नेऊ लागल्या. आणि एके दिवशी सर्वांना सुखावणारी गारेगारे निळी - रुपेरी आली आणि मुंबईकर सुखावले. टॅक्सीचा रुबाब होता आणि क्वाड्रोससाहेबाचा दरारा होता.
कुठुन आणि कसा पण कली शिरला. टॅक्सीवाल्यांनी आपला नेम सोडला आणि लबाडी, अरेरावी सुरू झाली. मापक बिघडविणे वा गतिमान करणे, यायला नकार देणे, अवाजवी भाडे मागणे हे प्रकार सर्रास घडु लागले. पाउस व पावसाने पाणी भरल्यावर रेल्वे वाहतुक कोलमडताच दाम दुपटीने पैसे मागण्याची वृती बळावली. इकडे पैसा मोठा होत होता, मुंबईकर हळु हळु टॅक्सी गरजेची करुन बसला होता, नाइलाजाने सगळे सहन करीत होता. विमानतळावरुन घेतलेले भाडे म्हणजे टॅक्सीवाल्यांना पर्वणी झाली होती. तेव्हा आगाउ पावतीची सोय विमानतळावर नव्हती. गाडी निघाल्यापासून सुरुवात व्हायची "साब, छे घंटे बाद नंबर लगा है, समझके दे देना". मग पोचल्यावर हुज्जत. प्रवाशाने दाराला हात घातल्यावर उर्मटपणे"किधर जानेका है?" असे विचारत व मग मान हलवत "नही जाना है" असे त्रस्त चेहेऱ्याने सांगायला सुरूवात झाली होती. एकीकडे टॅक्सी व्यवसाय मेहेनती आणि प्रामाणिक लोकांच्या हातातुन लबाड व झटपट पैसा कमावु पाहणाऱ्यांच्या हातात जात असतानाच उपनगरांमध्ये रिक्षासूर प्रकटला. दिवसागणीक पेट्रोल वाढत होते. पेट्रोल ऐवजी डिझेल वा इंधनवायुवर चालणारी यंत्रे आली. मात्र नवे यंत्र म्हणजे अधिक पैसा. तो घातला नाही तर चाकाला खीळ ही बसणारच. मुळात टॅक्सी हा व्यवसाय केवळ मेहेनतीचा न राहता ती गुंतवणुक झाली, धनिकांनी टॅक्सी खरेदी केल्या आणि त्या चालवायला द्यायला सुरुवात केली. बदलत्या परिस्थितीने टॅक्सीवाला गांजु लागला. खरा फटका दिला तो रिक्शाने. जवळपास अर्ध्या किमतीत जाणाऱ्या त्या वाहनाने टॅक्सीला टक्कर दिली आणि जेरीसही आणले. जनतेची सहानुभुती गमावलेली होती. बघता बघता उतरतीची कळा लागली. आणि टॅक्सीची उतरण सुरु झाली. मुंबईकराचा तोरा मावळु लागला. इथल्या कोऱ्या करकरीत टॅक्स्या वाढत्या वयाबरोबर जराजर्जर होऊ लागल्या.
एकिकडे रिक्षा, दुसरीकडे बेस्टने सुरु केलेल्या सीएसटी(तेव्हाचे व्हीटी)/चर्चगेट ते नरिमन पॉईंट अथक सततच्या फेऱ्या आणि दिवसागणीक वाढणारे भाडे यामुळे धंद्यावर परिणाम झाला. मुळात लोकांचा विश्वास उडाला. टॅक्सी म्हणजे मापात पाप हे मुंबईकराच्या मनात पक्के बसले आणि तो पर्याय शोधु लागला. जे शहरात तेच लांबच्या प्रवासात. फियाटच्या मागच्या बाकावर तिघांची गिचमीड अवाच्या सव्वा पैसे देउनही सहन करायला नाखुष असलेया प्रवाशांना प्रथम एशियाड आणि नंतर शिवनेरीचा पर्याय सापडला. भरीला खाजगी बसेसही वाढता राबता हाताळायला उतरल्या. दुसरीकडे रेल्वे गाड्याही वाढल्या. बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती टॅक्सीवाल्यांची झाली. निळी - रुपेरी गारवा घेऊन आली आणि धनिकांची लाडकी झाली. मुलुंड घाटकोपरचे शेअरबाजारवाले गाडी घेण्यापेक्षा रोज टॅक्सीने जा ये करु लागले. टॅक्सीवाला रोजचा बांधलेला. त्यालाही नक्कीचे काम मिळाले. टॅक्सीवाल्यांचे दुसरे खास गिहाईक म्हणजे सरकारी अधिकारी. संध्याकाळी बॅलार्ड पियरला वणवण करुनही सीएसटीसाठी टॅक्सी मिळायची नाही. बेटे रांगेने उभे असायचे पण बघायचे देखिल नाहीत. कशाला बघतील म्हणा? ओल्ड कस्ट्म हाउसमधीली रोजची ’देवळात जाउन मग घरपोच’ करायची गिऱ्हाईके बांधलेली होती. मात्र हे भाग्य १-२ टक्के टॅक्सीवाल्यापुरतेच. बदलत्या काळाबरोबर टॅक्सीवाल्यांनी हिंमत करुन कर्जे उचलली आणि मारुती, सॅंट्रो वगैरे नव्या गाड्या काळ्या पिवळ्या केल्या आणि गिऱ्हाईकाला खेचायचा प्रयत्न केला. काळ हा जालिम असतो. तुम्ही त्याच्याबरोबर बदला नाहीतर तो तुम्हाला कालबाह्य करतो. २००७ साल उजाडले आणि चकचकीत फिक्कट हिरव्या रंगाच्या आणि ’टॅक्सी’ असा प्रदिप्त मुकुट धारण केलेल्या मेरु मुंबईत दाखल झाल्या आणि मुंबईकरानी पसंतीची मान डोलावली. टॅक्सीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली, विरोध केला, निषेध केला पण ते सगळे मेरुला थांबवु शकले नाही. आगाऊ दूरध्वनीद्वारे बोलावताच इच्छीत वेळी दारात गारेगार गाडी उभी राहणार, अचूक भाडे, चालकांचे स्वच्छ रुपडे आणि नम्र वर्तन, नव्या गाड्या यांनी मुंबईकराला जिंकुन घेतले. मुळात नावडती असलेली काळी पिवळी आणखी गर्तेत गेली. यशाला वाटेकरी हे असतातच. मेरुच्या पावलावर पाऊल ठेवुन गोल्ड, मेगा कॅब आल्या. महिलांनी महिलांसाठी चालविलेली प्रियदर्शिनी आली, मग मोठ्या आकारात स्टार कॅब अवतरली. मग इजी आणि अखेर टॅब कॅब आल्या. उत्तम सेवा व चांगल्या मोटारी आणि चोख माप देणाऱ्या सेवेला लोक अधिक दाम मोजायला स्वखुशीने तयार झाले, नुसते तयार झाले नाहीत तर हौसले. दिसताना भाडे अधिक दिसले तरी गाड्या मापावर चालतात आणि प्रत्यक्षात काळी - पिवळीहुन कमी रक्कम मोजावी लागते हे ग्राहकराजा समजुन चुकला.
आवडतीची नावडती झालीच होती. आता तिला राजवाड्यातुन रस्त्यावर यावे लागले. आई जेवु घालत नाही आणि बाप भिक मागु देत नाही अशी वेळ आली. असलेली गाडी विकली तर पाच दहा हजाराहुन अधिक मिळणार नाहीत हे पक्के माहीत असलेल्या टॅक्सीवाल्यांना आता असेल तशी आणि रोज डागडुजी करुन आहे तीच गाडी चालविणे भाग पडले. आज एकेकाळी दिमाखाने फिरणारी काळी पिवळी वृद्धापकाळात मुलांनी घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्यागत जगते आहे. हात दाखवुन रिक्षा थांबत नाही तेव्हा नाईलाजाने तिला काम मिळते. हात पाय थकले तरी काम चालु आहे. अनेकदा दुसरे काही करता येत नाही तेव्हा मुलगा वडीलांची तीच गाडी पुढे चालविताना दिसतो. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा मेळ दिवसेंदिवस कठीण होत आहे नव्हे झालाच आहे. निराश झालेला टॅक्सीवाला जेव्हा इरेला पेटुन बेदरकारपणे गाडी हाकत नव्या कोऱ्या गाड्यांना छेदत जातो तेव्हा त्या राग न येता दया येते. साफ खचलेले टॅक्सीवाले आता अखेर होण्याची वाट पाहत आहेत. भाड्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत. साम्राज्य लयाला गेलाय. ज्या दादर टीटी ला ती रुबाबात उभी राहायची त्याच दादरला आता काळी पिवळी अंग चोरुन कोपऱ्यात उभी आहे, आणि तिचा मालक शहरात नव्याने आलेला बकरा शोधत भाडे लुटायला फलाटावर गिऱ्हाईक शोधत आहे. पुढच्या खणातले संगीत ऐकविणारे ध्वनिफीतयंत्र कधीच हरपले आहे, उरला आहे तो रिकामा कोनाडा - ’काप गेले आणि भोके राहिली’ या म्हणीचा प्रत्यय आणुन द्यायला. एकेकाळी मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी आता कष्टाने अखेरचे दिवस मोजत आहे. रुंद हातावर कडे वागविणाऱ्या अक्कडबाज मिशांना पीळ देणाऱ्या हसतमुख सरदारजींची जागा आता हडकलेल्या भैयांनी घेतली आहे. डाव्या हाताने लिलया चक्र पेलत उजवा कोपरा दारावर घातलेल्या रंगीत रेक्जीनवर विसावता
उजव्या हाताने दारावरच्या पन्हळीची पकड घेणारी बोटे काळाच्या पडद्या आड गेली आहेत, उरले आहेत ते पोटासाठी जड चक्र प्रयासाने वागविणारे कृश हात. एखाद दिवशी वर्तमान पत्रात कुणाचे तरी पत्र येते आणि समजते की या मुंबापुरीत एक नव्वद वर्षाचा म्हातारा आजही काळी पिवळी ओढतोय आणि ती त्याच्या संसाराचा गाडा ओढतेय. काळजात गलबलुन येतं. यांना भविष्य काय? चकचकीत नव्या गाड्या यांना का नकोत? हातावर पोट असलेले हे हात थकल्यावर पोट कोण भरेल? ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना वाहीले, त्यांचा भार पडत्या काळात कोण वाहणार? मग अचानक विचार येतो, की ते वैभवाचे दिवस कुणी घालविले? त्याला जबाबदार कोण? लोकांपासुन दूर ते का गेले? यांना पुन्हा बरे दिवस आले तर पुन्हा हे असेच करतील का?
वस्तू असो वा वास्तु, व्यक्ति असो वा संस्था असो, शंभरी म्हणजे विशेष सोहळा हा असणारच! मोठा समारंभ, आरास, सोहळा, रोषणाई, जल्लोष........मात्र हे सगळ संपन्न वार्धक्य असलेल्या म्हाताऱ्यांसाठीच! या दुर्दैवी काळी - पिवळीच्या नशिबी हे सुख नव्हत. १९११ साली मुंबईत पहिली टॅक्सी धावली त्याला गेल्या वर्षी १०० वर्षे पुरी झाली. ना कुणी दखल घेतली ना कुणाला त्याचे काही नवल वाटले ना त्या टॅक्सीच्या रडकथेत काही फरक पडला. पण वयाच्या १०१ व्या वर्षी अशा अनेक प्रश्नांचा भार वाहत काळी पिवळी आपल्या अखेरच्या क्षणाची वाट पाहत अजुनही जीवाच्या आकांताने धावत आहे.
प्रतिक्रिया
24 Dec 2012 - 6:34 pm | कवितानागेश
असलेली गाडी विकली तर पाच दहा हजाराहुन अधिक मिळणार नाहीत हे पक्के माहीत असलेल्या टॅक्सीवाल्यांना आता असेल तशी आणि रोज डागडुजी करुन आहे तीच गाडी चालविणे भाग पडले. आज एकेकाळी दिमाखाने फिरणारी काळी पिवळी वृद्धापकाळात मुलांनी घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्यागत जगते आहे.>
अश्या गाड्या दक्षिण मुंबईत दिसतात. आणि त्याचे ड्रायव्हरही तसेच, ७० च्या पुढचे असतात.
हल्लीच एकदा एका अश्याच जुन्या टॅक्सीत बसले होते तेंव्हा ड्रायव्हर आजोबा मेट्रोजवळच्या सिग्नलला बसल्या बसल्या झोपी गेले. त्यंना हाका मारुन नंतर पुढचा सगळा रस्ता मी सावधपणे लक्ष ठेवून काढला.
24 Dec 2012 - 6:44 pm | तर्री
ते आरसे , कुशन , डायवर साहेबांना हात ठेवायला रेग्झींचे कव्हर , लोंबणारे द्राक्ष चे घोस सगळे एकदम कुभे राहिले ....
काळी पिवळीतून प्रवास खुपच झाला.
24 Dec 2012 - 9:20 pm | रेवती
सुरेख वर्णन. लेखन आवडले. अगदी पिचलेल्या ट्याक्सीतून जायचा प्रसंग एक दोनदाच आला होता. सातेक वर्षांपूर्वी छा.शि.एयरपोर्ट ते गोरेगाव असे. नंतर गोरेगाव ते महालक्ष्मीचे देऊळ आहे तिथे. बाकी मुंबईतली फारशी माहिती नसल्याने (किंवा पुणे हेच जग असल्याने) उपनगरे ओळखीची नाहीत. निळ्या कॅबमधून मात्र सांन्ताक्रूझ ते पुणे जायला मिळाले होते. आता पुण्यातही अशा कॅबच्या सुविधा पुरवणारे आहेत असे ऐकले आहे. त्यांनी गाडी कोणतेही गैरप्रकार न करता चालवली तर चालेल आणि आगाऊ रिक्षेवाले मागे पडतील, नव्हे पडायलाच हवेत.
24 Dec 2012 - 10:30 pm | ५० फक्त
मस्त लिहिलंय हो,धन्यवाद. अजुनही मुंबईत गेलो की किमान ही संस्कृती टिकुन राहावी म्हणुन उगाच सिएसटी ते मंत्रालय आणि परत असं फिरुन येतो टॅक्सीतुन.
मागच्या डिकित सामान भरुन तिचं झाकण उघडं ठेवुन ड्रायव्हरला दिसतं कसं याचं अजुनही आश्चर्य वाटतं,
25 Dec 2012 - 11:55 am | वपाडाव
दादर टीटी ते कबुतरखाना हा प्रवास १९९५ साली केल्याचे स्मरते. तेव्हा ज्या नातेवाइकाकडे गेलो होतो त्यांनी टॅक्सीवाल्याने आम्हाला लुबाडले असे सांगीतले होते.
तदनंतरच्या मुंबै फेर्यांत फक्त सीएस्टी-चर्चगेट इतकाच प्रवास केला (नंतर नातेवाइकांनी मुंबै सोडली).
असो,
अवांतर :: पण मला सकाळी चर्चगेटहुन विरार हा प्रवास लोकलनेच (एकट्याने दारात उभारुन) करायला आवडतो.
25 Dec 2012 - 1:06 pm | चिगो
काळी पिवळीचा सुरेख लेखाजोखा.. नागपुरात ह्या अगदीच कमी असल्याने ह्यांचं खुप कौतूक होतं लहानपणी. पण नंतर मुंबईत भटकलो बर्यापैकी ह्यांत आणि ते कौतूक पार ओसरलं..
25 Dec 2012 - 2:25 pm | पैसा
फियाट टॅक्सीचा मुंबईतला प्रवास मस्त रंगवलात!
25 Dec 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त प्रवास करवलात हो काळ्या/पिवळ्या-टॅक्सीचा... :-) मला ही टॅक्सी फार वेगळी वाटत नाही,कारण आमच्या घरीच २ फियाट टॅक्सी होत्या... माझे बाबा या व्यवसायात ३६ वर्ष होते.(पुणे-मुंबई-पुणे)या ट्रॅकवर सगळ्यात जास्त वर्ष घालवली त्यांनी...त्यांनी टॅक्सीसाठी सगळ्यात पहिली कार घेतली,ती इटालियन फियाटच होती.पुढे ती निवृत्त झाल्यावर प्रिमियर पद्मिनी आली..नंतर अजुन एक आली...आणी पुढे एशियाड बस नावाचं नवं संकट या व्यवसायापुढे ऊभं र्हायलं...मग १ गाडी विकावी लागली.आणी ९२ साली आमच्याकडे असलेली शेवटची फियाट तर पेट्रोलच्या वाढलेल्या भावामुळे...बाबांनी निप्पाणीला जाऊन ५५ हजारात मित्सुबिशिचं डिझेल इंजिन बसवुन तिला पुढे ८ वर्ष चालवली...मग आंम्ही (दोघा भावांनी) बळजबरिने त्यांची मनधरणी करून ती गाडी त्यांना विकायला भाग पाडलं... ज्यांनी गाडी नेली,त्याला देताना सुद्धा बाबांनी इंजिनाला बॉनेटला हळद/कुंकू वाहून नमस्कार केला आणी चावी त्याच्या हतात दिली...
आज तुमच्या लेखनामुळे हे सगळं अठवलं...
25 Dec 2012 - 11:07 pm | जेनी...
ंमुंबई तल्या माझ्या लहानपनीच्या गोड आठवणी एकदम ताज्या झाल्या .
गावावरुन कुणीहि आलं कि पप्पा त्यांना मुंबई दाखवायला न्यायचे . सोबत घरातलेहि
असायचे म्हणजे आम्हि सगळे . छोटिशि पिक्निक . मग सर्वात पहिलं महालक्ष्मि मंदिर .
तिथपर्यंत बसने जायचो सगळे . ट्रेन पप्पा अवॉइड करायचे कारण गावाहुन येणार्या
मंडळीत स्त्रीया लहान मुलेहि असायची . ट्रेन त्यांना असुरक्षित वाटायची .
महालक्ष्मी मंदिरापासुन दोन टॅक्सी केल्या जायच्या थेट मुंबादेवी च्या मंदिरा पर्यंत .
तिथलं दर्शन आटोपुन पून्हा टॅक्सि ते सरळ राणीचा बाग :) . तिथे घरुन आणलेले
दहि धपाटी , गोड्घार्या कारेळ्याच्या वड्या .. असा. धम्माल बेत , त्यावर आम्हि
ताव मारायचो . खुप फिरुन थकुन रात्री ९ वाजेपर्यंत घरी .
चार वर्षापूर्वी. दादाची सँट्रो आली . तेव्हा आम्हि भावंडांनी आई पप्पांना स्वताहाच्या गाडीत
मुंबई दाखवायचा प्लान केला होता
सेम तसाच जसा आमच्या लहानपनी आई पप्पा करायचे . अगदि घरच्या खान्याच्या पदार्थापासुन
राणीच्या बागेत जाउन ते खाण्यापर्यंत . तेव्हा दोन टॅक्सी कराव्या लागायच्या . आता
दोन गाड्या होत्या . एक दादाची , एक जिजुंची .
ह्या पिकनिक मध्ये काळी पिवळीने फिरता नाहि आलं तेवढीच एक कमतरता होती .
बाकि भावना , जिव्हाळा तोच ... जो पप्पानी आमच्यात रुजवला .