मद्यप्रेमी आणि मद्यपरिणामभयग्रस्त यांच्यात नेहेमीच चकमकी झडत असतात.
दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्यच बोलत असतात. दोन घटका विरंगुळा म्हणुन वा मजा म्हणुन कधी चार दोस्तांबरोबर निवांत बसुन मैत्रीबरोबर मद्याचा आस्वाद घेणे काही गैर नाही - हे ही योग्य. एकदा पीण्याची चटक लागली तर बरबादी होण्याची खात्री हेही बरोबर. कोण आस्वाद घेईल आणि कोण व्यसनी होईल हे सांगणे अशक्य आहे.
असो. सध्या सोत्रिंच्या चावडीवरून सुरू झालेल्या चर्चासत्रावरुन मला माझा एक जुना किस्सा आठवला. मद्यविरोधक अगदी ठामपणे सदासर्वदा दारुबंदीचा पुरस्कारच नव्हे तर पाठपुरावा कसा करतात त्याचा मला आलेला हा अनुभव.
साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी कामानिमित्त आमदाबादला गेलो होतो. गुजरातेत दारुबंदी असली तरी मद्याची वानवा नाही. एकदा रिक्षाने जात असता माझा सहकारी मला 'इथे दारु नाही' असे मराठीत म्हणत असता त्याचे वाक्य पुरे व्हायच्या आत रिक्षावल्याने कचकन ब्रेक मारत रिक्षा बाजुला घेतली आणि म्हणाला कसली बंदी? तुम्हाला हवी आहे काय? आत्ता घेऊन जातो. मात्र बंदी होती हे खरे आणि अजुनही आहे. ज्या गावी जायचे तिथले नियम पाळावेत हे बरे अशा विचाराचा मी माणुस. शिवाय तसाही मी केवळ प्रसंगोपत्त बिअर घेत असल्याने मला फारशी आसक्तीही नव्हती.
तर मी आमदाबादला कामानिमित्त आठवडाभर मुक्कामाला होतो. आणि मला एकाने मौलिक माहिती दिली, आणि ती अशी की जे गुजरातेत पर्यट्क म्हणुन वा कामानिमित्त येतात त्यांना 'तात्पुरता मद्यप्राशन परवाना' मिळतो. अरे वा! हे उत्तम आहे. चार पोरे जमली आहेत, तर परवाना काढु म्हणजे माझी आणि अर्थातच बरोबतच्या पोरांचीही सोय होईल. हे सत्कृत्य साबरमतीपल्याडच्या 'कामा' नामे हॉटेलात पार पडते असे समजले. आमचा वावर अलिकडे आश्रम रोडवर. इथुन सायंकाळी नदीपल्याडचे कामा हॉटेल दिसायचे, ते इतके कामाचे असेल हे माहित नव्हते. माझा विचार ऐकुन स्थानिक मंडळीही उत्साहित झाली. सायंकाळी मी आणि माझा तिथला एक सहकारी इंद्रनिल सेन असे दोघे 'कामा'वर निघालो. इंद्रनिल विषयी कल्पना आपल्याला आलीच असेल. अगदी बरोबर. तो स्वतः तर घ्यायचाच वर त्याच्या छोट्या कुत्र्यालाही रोज रात्री बशीभर दुधात दोन चमचे द्यायचा. त्याशिवाय म्हणे तो श्वानराज दुधाला तोंड लावात नसे.
कामा वर पोचताच आम्ही लगबगीने तळमजल्याचा मद्यपानकक्षात गेलो आणि ऐटीत 'परमीट' ची फर्माईश केली. समोरच्याने हेहे असे खास गुजराती हसत मोठ्या आनंदाने सांगितले की इथे परमीट मिळणे बंद झाले!
बंद झाले? असे कसे बंद झाले?
त्यावर त्या सदगृहस्ताने सागितले की परवाना बंद झाला नसून तो 'कामा' च्या मद्यालयातुन देणे बंद झाले आहे. कारण काय तर पर्यटकांच्या नावाने स्थानिक लोकच पितात.
बर मग आता?
आता काय, आता तो परवाना दस्तुरखुद्द एक्साईज सुपरिंटेंडंट साहेब जातीने देतात.
हे कुठे सापडतील?
अर्थातच त्यांच्या कचेरीत.
कचेरी कुठे ?
एलिस ब्रीजपलिकडे.
हेहे, ते साहेब आता कुठले साहेब सापडायला, कचेरी बंद झाली असणार.
हरकत नाही. उद्या जाऊ. दुसरे दिवशी सकाळी इंद्रनिल आणि मी कचेरीतुन ११ ला निघालो. आता ही कचेरी एलिस पुलापलिकडे नक्की कुठे आहे हे कुणाला विचारावे? आम्ही एलिसपुलाजवळ येताच इंद्रनिलने बाईक थेट पोलिसठाण्याबाहेर उभी केली. आम्ही आत शिरलो. समोर एक हवालदार बसला होता, त्याला विचारले, 'साहेब छे के?
'ओली बाजु हसे'. आपला डावा हात उजवीकडे हलवित हवालदारसाहेब उत्तरले.
आम्ही उजवीकडे शिरलो. आतल्या खोलीत एक गणवेशधारी सदगृहस्थ बसले होते.
छातीवरच्या पाटीवरुन साहेबांचे नांव पारेख होते असे समजले.
'बेसो'. साहेब शांतपणे म्हणाले. खरेतर कापड दुकान सोडुन हा सदगृहस्थ खाकी कपड्यात का आला हे आश्चर्यच होते.
'साहेब, परमीट नु ओफिस क्यां आयवो?' आतुरलेल्या इंद्रनिलचा प्रश्न.
'परमीट'? सानु परमीट? - पारेख साहेब.
उत्तरादाखल इंद्रनिलच्या आणि माझ्या चेहर्यावर माफक हसु आणि इंद्रनिलचा अंगठा ओठाकडॅ
नो! गुजरातमा प्रोहिबिसन छे. पारेख साहेब.
इंद्रनिलने साहेबांना सांगितले की बाहेरच्या राज्यातुन/ देशातुन आलेल्या लोकांना तात्पुरता परवाना मिळतो.
छे! असे होणे शक्य नाही! मग दारुबंदीला काय अर्थ? पारेख साहेब.
अहो साहेब, तसे नसते तर मोठ्या हॉटेलांमध्ये मद्यविक्री झालीच नसती ना? आम्ही.
'एमनी वात साची छे हो, साहेब एवुं कांइक मळे खरु' मगाशी आम्हाला साहेबांचा रस्ता दाखविणार्या हवालदाराने प्रवेश घेत पुन्हा नवा रस्ता दाखवला. त्याने साहेबाला समजावले की पलीकडे एक्साईज कचेरीत असे परमीट मिळते. साहेब फार कष्टी झाले.
तुम्ही कुठुन आलात?
मुंबई.
रोज पिता?
छे हो! सठी सामाशी एखाददा आपली गंमत म्हणुन.
इथे किती दिवस आहात?
सात-आठ दिवस.
इतकेच ना? मग प्यायला नाहीत तर काय बिघडेल?
आमचे मौनव्रत. पाठोपाठ थँक्यु.
सूज्ञ हवालदार मागोमाग बाहेर आला आणि त्याने एक्साइजचा रस्ता दाखवला.
पुल ओलांड्ता डाव्या अंगाला कचेरी सापडली. आम्ही आत शिरलो आणि समोर दिसलेल्या इसमाला आमच्या भेटीचे प्रयोजन सांगितले. त्याने गंभीरपणे सांगितले की हे काम 'सुपरीटेनसाहेब' पोतेच करतात.
बसा. कार्ड द्या, मी आत पाठवतो.
आम्ही कोचात.
दहा एक मिनिटांनी आम्हाला निमंत्रण आले. आम्ही साहेबांच्या खोलीत.
नाव काय? काय करता? कुठुन आलात?
वा वा वा! म्हणजे आम्ही योग्य जागी आलो होतो तर.
मी तत्परतेने हॉटेलचे पत्र, माझे जायचे यायचे तिकिट व कंपनीचे ओळखपत्र दाखवले. साहेबांनी सगळे व्यवस्थितपणे पाहुन घेतले.
तुम्ही मुंबईहुन आलात तर. साहेब.
होय साहेब.
तिकडे परमीट लागते. आता तिथे कुणीही कधीही कुणालाही परमीट विचारत नाहे हे मला सांगु नका, मला ते माहित आहे. साहेब.
आमच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह.
तुमचे महाराष्ट्राचे परमीट दाखवा, मी इथले परमीट देतो. साहेबांचा गुगली.
ते नाही हो. म्हणजे इथे चालत नाही ना, मग कशाला आणु?
किती दिवस आहात? साहेब.
पुन्हा आशेचा किरण. 'सात दिवस आहे साहेब'.
मग उत्तमच. घरच्यांना फोन लावा आणि कुरियर करायला सांगा. ते दाखवा आणि हे घ्या. साहेब
साहेब, अहो आता ते कुठे आहे ते घरच्यांना सापडणे कठिण आहे. शिवाय मी बाकी सगळी कागदपत्रे आणली आहेतच तेव्हा.........
तुम्ही दिल्ली, कलकत्ता, मद्रास असे कुठुन आला असतात तर मी विचारलं नसतं. पण मुंबईतुन आलात तर मी विचारणार.
आता?
आता काय? एक दिवसाचा तर प्रश्न आहे, उद्या कुरियरने आलेले परमीट घेउन या आणि इथले घेउन जा. साहेब.
बर आहे साहेब. आभारी आहे.
साला टीपी खूप झाला. चला ऑफिसला.
तुम्हाला हौस ना अधिकृत परवान्याची? मी सांगत होतो, हवा तर आक्खा क्रेट आणुन देतो. पण नाही ऐकलत. आता बसा. इती इंद्रनिल.
आमचे मौनव्रत.
पुढे अमदाबादेच्या आमच्या लोकांना हा किस्सा बरेच दिवस पुरला.
प्रतिक्रिया
9 Nov 2012 - 1:36 pm | प्रकाश घाटपांडे
एकदम भारी किस्सा! इथे परमीट पाहून दारु द्यायची झाली तर काय होईल?
9 Nov 2012 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त किस्सा. टेबलावर बसल्याबरोबर परवान्यासहित बील लावलं पाहिजे.
असा आटापिटा परवडत नाही. :)
-दिलीप बिरुटे
9 Nov 2012 - 1:50 pm | गणपा
पारेख साहेबांची तगमग आणि सुपरीटेनसाहेबांचा कणखर स्वभाव आवडला.
काय'द्या'ची अशीही अंमलबजावणी या कलीयुगात विरळीच.
किस्सा आवडला हे वेसांनल.
9 Nov 2012 - 1:53 pm | बॅटमॅन
आयला खतर्नाक किस्सा!!!! पारेख सायबांना नवटांग/नवटाक का काय ती एकदा प्यायला लावायला हवी होती ;)
9 Nov 2012 - 2:01 pm | संजय क्षीरसागर
कायदे देखिल कसे लॉजिकल असतात, मान गये!
आणि सुरुवात तर झकासच
9 Nov 2012 - 2:07 pm | गवि
पॉप टेट्सच्या विक्रोळी शाखेत गेलेलो असता टेबलवर बसताक्षणीच आधी दरडोई एक मद्यपरवाना आणून आमच्या हाती दिला गेला आणि मगच ऑर्डर घेतली गेली असं आठवतंय.
याउलट चेन्नईत फार कमी ठिकाणी आणि तेही सरकारमान्य दुकानांतच मद्य मिळतं असं दिसलं. रिक्षावाल्याकडे एखाद्या दुकानासमोर थांबण्याची विनंती केली तेव्हा त्याने एका अत्यंत बकाल गल्लीत खूप दूरवर रिक्षा थांबवून खूप लांबूनच एखाद्या खुनाचे ठिकाण दाखवावे तशी तर्जनी अर्धवट वर करुन रस्त्यापलीकडच्या एका कळकट्ट दुकानाकडे निर्देश केला आणि अत्यंत हळू आवाजात तिथे जाऊन लवकर काय ते घेऊन या, असं सांगितलं. मला स्वतःला अत्यंत गुन्हेगारी दर्जा प्राप्त झाला आहे असा भास व्हायला लागला. तरीही मी दुकानाकडे गेलो. कोणत्याही क्षणी चाकूहल्ला होईल अशा प्रकारचं वातावरण होतं. रेशनवजा दुकानाला जेलप्रमाणे पूर्ण गज होते. एक बियरची बाटली विकत घेऊन परत आलो. घरी येईस्तोवर आपण अवैध काहीतरी बाळगून आहोत असा फील आला. त्यातच त्या किंगफिशरच्या नेहमीच्या बाटलीवर अॅडिशनल रिमार्क छापला होता.. "मद्य संसाराला, राष्ट्राला, तारुण्याला इ इ कशाकशालातरी उध्वस्त करते अशा अर्थाचा तो भीषण मेसेज होता.
तेव्हा मात्र उरलीसुरली इच्छाही नष्ट झाली.
अरे इतकं आहे तर मात्र खरंच विकू नका बाबांनो. आमचा युक्तिवाद उताणा पडला आहे इथे..
आता चेन्नईस गेलो तर मोसंबी ज्यूसच बुवा..
तेव्हा दारुबंदी झालीच तर फक्त आमच्यासारखे एरवी अल्कोहोलिक नसलेले लोकच तेवढे सव्यापसव्य नको म्हणून प्यायचे पूर्ण बंद होतील. ज्यांना सोडण्याची गरज आहे ते खरे अल्कोहोलिक मिथाईल अल्कोहोलही पितील, पण पितीलच..
9 Nov 2012 - 2:11 pm | गणपा
सो बात की एक बात.
9 Nov 2012 - 3:38 pm | दादा कोंडके
पण दारूबंदी झालीतर प्यायला सुरवात करणार्यांची संख्या पुष्कळ कमी होइल हे तरी मान्य आहे की नाही?
अवांतरः डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीच्या घरच्यांना (परवानाधारी) बंदूका, झोपेच्या गोळ्या वगैरे हाताशी असू देउ नका म्हणून सांगतात. हे तुमच्या लॉजीकवरून चुकीचच आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती बंदूकीच्या गोळीने, चाकूने, ब्लेडने, वरून उडी मरून मरणारच आहे. मग जवळ बंदूक असली-नसली तरी काय फरक पडतोय?
9 Nov 2012 - 3:45 pm | सोत्रि
ह्यावर एक लेख टाकाणार आहे. तयारी चालू आहे.
- (चेन्नैकर) सोकाजी
9 Nov 2012 - 3:52 pm | सर्वसाक्षी
गवि
थिरुवन मियुर भागात एक मस्त, सुंदर व सुशोभित मद्य दुकान आहे. अगदी अलिशान. बाकी सगळे पिंजरे/ तरटाचे आडोसे.
9 Nov 2012 - 7:16 pm | सोत्रि
त्रिवान्मियुर मी जिथे रहातो तिथून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते सुंदर व सुशोभित मद्य दुकान नेमके कुठे आहे ते सांगाल का?
-(उत्सुक) सोकाजी
10 Nov 2012 - 11:01 pm | सर्वसाक्षी
सोत्रि,
बरीच वर्षे झाल्याने व मी मद्रासमध्ये फार न वावरल्याने पत्ता लक्षात नाही पण विचारुन कळवितो.
9 Nov 2012 - 2:11 pm | इरसाल
महाराष्ट्रात खरेच परमिट लागते काय?
जर लागत असेल तर बियरबारवाल्याच्या परमिटला आपल्याच ### परमिट समजुन पिणार्या मंडळींचे काय ?
परमिटवर पुरावा काय असतो. समजा एखादा लिवुन "लास" झाला आणी परमिट हरवले तर नवे परमिट कसे मिळते.
9 Nov 2012 - 2:37 pm | श्री गावसेना प्रमुख
आयला गुजरातच्या निवडणुका चालु झाल्यात वाटते.
एक बर आहे कि येथे हिंदीत कुणी लिहीत नाही,
महाराष्ट्रात अफु गांजावर बंदी असताना त्याच्या पुड्या कुठेही बिनदीक्कत मिळतात, गुटख्या सारख्या.कारण येथे गुटख्यावर बंदी आहे.
9 Nov 2012 - 2:46 pm | नितिन थत्ते
आमचा अनुभव वेगळा आहे.
१. गुजरातबाहेरचा पत्त्याचा पुरावा.
२. गुजरातमध्ये येऊन आठवडा झालेला नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रवासाचे तिकीट
३. गुजरातमध्ये जेथे रहात आहात त्या ठिकाणाचा पत्ता (हॉटेलमध्ये राहात असल्यास त्या हॉटेलचे पत्र)
या तीन गोष्टी दाखवल्या की आणंदमध्ये १५ मिनिटात परवाना मिळतो (२०० रु देऊन-पावती मिळते)
त्या परवान्यावर एक आक्खी बाटली रम/व्हिस्की किंवा आठ बाटल्या बिअर मिळते. परवाना आठवडाभर व्हॅलिड असतो.
बाकी सर्वसाक्षींनी सांगितलेल्या दुसर्या मार्गाने पाहिजे तेवढी मिळते.
9 Nov 2012 - 3:51 pm | सहज
मुद्याची गोष्ट, पुढच्या सात दिवसात मग काय केले, प्रश्न अनुत्तरीत???
9 Nov 2012 - 4:00 pm | सर्वसाक्षी
नाही तर नाही. परत आल्यावर उद्यापन केलं.
9 Nov 2012 - 4:59 pm | ह भ प
बारुदंदी जालीच पायजेल..
9 Nov 2012 - 6:00 pm | वरुण मोहिते
कालच अहमदाबाद वरुन परत अलो...४ दिवस होतो कामानिमित्त. पण जाताना आपलीच घेउन गेल्याने वरिल प्रश्ना उद्बभवले नाहित.तरीही तेथे सहज उपलब्ध होते हा अनुभव आहेच..बाकि चेन्नई बद्दल काय सांगावे!!!!!गविंसारखाच अनुभव आहे नंतर पुढे होटेल खालिच बार असणरे होटेल बुक करायला लागलो...
10 Nov 2012 - 12:13 am | कपिलमुनी
महाराष्ट्राचे परमीट मिळवण्याची प्रोसेस काय आहे ?
10 Nov 2012 - 12:15 am | जेनी...
कमु ???
क्यों क्यों ... ???
10 Nov 2012 - 2:08 pm | कपिलमुनी
सोमरसपानाने या अवनीवर स्वर्गसुखाचा अनुभव येतो असे मद्यर्षी सोत्रिंनी सांगितले आहे..
त्यांच्या आज्ञेचा प्रतिपाळ करताना प्रतिष्टंभ होउ नये म्हणून अनुज्ञापत्र!!
10 Nov 2012 - 11:11 pm | सर्वसाक्षी
तपस्व्यास अशक्य ते काय?
एके सुमुहुर्तावर स्वतःच्या दोन पारपत्राकार छबी, वास्तव्यपुष्ट्यर्थ पत्रांची प्रत व मूळ पत्र, चिरंतनखातेक्रमांकपत्र व त्याची प्रत, न्यायालयाभिभारार्थ रुपये पांच मूल्यमात्र राजस्वमुद्रांकित निवेदनपत्र घेउन आपण अबकारीखात्याच्या कचेरीत परवानाकक्षात कार्यदिनी प्रातःकाळी दहा नंतर व सायंकाळी तीन पूर्वी भोजनसमयाव्यतिरिक्त कालात अवतरावे. तेथील कर्मचार्यास ही सर्व पत्रे व रुपये एक सहस्त्र दिले असता अजीवल मद्य परवाना प्राप्त होतो!
आपल्या महान शुभकार्यास या पामराच्या हार्दिक शुभेच्छा!
11 Nov 2012 - 12:22 am | संजय क्षीरसागर
सायंसमयी सुखासनात स्थानापन्न होवून मद्याचा कमंडलू जवळ घ्यावा आणि अत्यंत भावमग्नतेने एकेक पळी मद्याचे विष्णुसहस्त्रनामाचे उच्चारण करत धीमेपणाने प्राशन करावे त्यामुळे आपण जगतात नसून अखिल विश्वच आपल्यात प्रकट झाले आहे आणि आपण केवळ साक्षी आहोत अशी दिव्य अनुभूती येते
10 Nov 2012 - 10:10 am | मदनबाण
बाकीचे भाग तू-नळीवर आहेतच !
तुम्ही मर्कटचाळे करता ? ;)