काटकोनी त्रिकोण

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Sep 2012 - 1:49 pm

'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो. अंदाज बरोबर ठरला आणि एकदाची नाटक बघण्याची इच्छा पूर्ण झाली.

हे नाटक अजिबात चुकवू नकोस, असे कुणी आधी सांगितले की, प्रत्यक्षात अपेक्षाभंग होतो असा माझा आजवरचा अनुभव आहे. हे नाटक बघितल्यावर अपेक्षाभंग वगैरे झाला नाही तरी , एक चांगले नाटक बघितल्याचे पूर्ण समाधान मिळाले नाही. नवीन लग्न झालेल्या एका जोडप्याची आणि त्यातील नवर्‍याच्या बापाची ही गोष्ट आहे. कुटुंबात पात्रे तीनच पण नाटकात पात्रे चार! कारण मोहन आगाशे यांनी डबल रोल केला आहे. ते त्या तरुण माणसाचे बापही झालेत व त्यांच्या घरी चौकशीला येणारे पोलिसही झालेत. दोन्ही भूमिकांमधे त्यांनी उत्तम अभिनय केला आहे आणि ते अपेक्षितच होते. केतकी थत्ते आणि संदेश मात्र त्यांच्यापुढे फिके पडतात.
विधुर सासरा व सून यातील संघर्ष व त्यात होणारी मुलाची फरपट, हा मुख्य विषय आहे. नेहमीप्रमाणे ठोकळेबाज संवाद व भडक प्रसंग न दाखवता त्यांच्यातील भांडण हे
खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेच्या स्वरुपात दाखवले आहे. सासरा हा जुन्या पिढीतला असल्यामुळे, त्याचा आक्षेप आहे, सुनेच्या उधळ्या व खर्चिक वृत्तीवर आणि घरी काही काम न करण्यावर. त्यामुळे आपल्या मुलाला जास्त काम पडते असे त्याचे म्हणणे असते. पहिल्या अंकात हे सर्व इतक्या हलक्याफुलक्या वातावरणात चालू असते की केवळ एका अपघाताच्या घटनेमुळे तो इन्स्पेक्टर, इतक्या खोलात का शिरत आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. पण दुसर्‍या अंकात वातावरण इतके गंभीर होते की ही एक रहस्यकथा आहे असे वाटू लागते. संवाद चटपटीत, विनोदी आणि कायम एकमेकांवर कुरघोडी करणारे होतील याची लेखकाने विशेष काळजी घेतल्याचे जाणवते. पण ते करताना काही ठिकाणी त्याची नाटकाच्या आशयावरची पकड सुटते. एकच डायलॉगचा सेट, वेगवेगळ्या प्रसंगी त्याच किंवा दुसर्‍या पात्रांच्या तोंडी घालण्याची युक्ती तशी जुनी आहे. ती एका मर्यादेत वापरली तर चांगली वाटते. पण या नाटकात लेखकाने त्याचा अतिरेक केला आहे. शेवटी खुद्द मोहन आगाशेच जेंव्हा , 'तुम्ही मंगल पांडे पाहिला आहे का हो ?' हा डायलॉग रिपीट करतात तेंव्हा नाटक एका चांगल्या उंचीवरुन अचानक कोसळल्याचे जाणवते. थोडक्यात, नाटक चांगले आहे, एकदा पहायला हरकत नाही पण चुकलेच बघायचे तरी फार मोठे काही गमावल्याचे दु:ख होणार नाही.

लेखकः डॉ. विवेक बेळे, कलाकारः मोहन आगाशे, केतकी थत्ते आणि संदेश कुलकर्णी.

नाट्यप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामतविरंगुळा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

20 Sep 2012 - 4:21 pm | दादा कोंडके

बरं झालं सांगितलत. आताच्या अलिकडच्या नाटकांपैकी काहिच उत्तम असेल्या नांटकांत या नाटकाचा उल्लेख आला नाही असं झालंच नाही. त्यामुळे मला सुद्धा प्रचंड उत्सुकता होती. पण आता असोच.

मन१'s picture

20 Sep 2012 - 4:27 pm | मन१

आपलं मत वाचलं. आदर आहेच. तरीही तिकिट काढून पहायला जाणार आहेच.

अनुरोध's picture

20 Sep 2012 - 5:38 pm | अनुरोध

अगदि सह्मत. मला वाटत कि बरेच दिवसात मोहन आगाशेंच नाटक आलं नाहि त्यमुळे लोकांनि डोक्यावर घेतलं असाव. साधारण ओव्ह्रर हाईप्ट च वाटत.

अवांतरः- हेच नाटक परेश रावल गुजरथी मध्ये आणि नासिर ईंग्रजी मधे करणार असं कानावर आलय.

माझी नाटकाची आवड ही अलिकडचीच, साधारण ४-५ वर्षांपूर्वीची. त्यामुळे अगोदरच्या मराठी रंगभूमी बद्धल माहीत नाही पण मोहन आगाशेंसारख्या कलाकाराला अभिनय करताना थेट पाहणं एक चांगला अनुभव होता. नाटकाचं कथानक, संवाद मसालाछाप वा साचेबद्ध हिंदी-मराठी चित्रपटांपेक्षा उजवं वाटलं होतं.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2012 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म...! परिक्षण नेमके लिहिलेले आहे. पण भारतात आल्यावर जमल्यास पाहिन. नाहीच जमले तरी वाईट वाटणार नाही.

आशु जोग's picture

24 Sep 2012 - 12:34 am | आशु जोग

या नाटकातला डॉ. आगाशे यांचा अभिनय आम्ही अगदी जवळून १२ फूटावरून पाहीलाय
त्यातही प्रेक्षकांमधे परेश मोकाशी, अतुलदादा कुलकर्णी, रसिकाताई कुलकर्णी इ. आजूबाजूला आमच्यासारखेच जमिनीवर बसलेले असताना.

बाकी आम्ही हे नाटक पाहीले ते केवळ डॉ. विवेक बेळे या लेखकामुळे.
त्यांचे 'माकडाच्या हाती शँपेन' आम्हाला फारच आवडले होते.

काटकोन त्रिकोण मधील लोकांचा अभिनयही आम्हाला चांगला वाटला.

स्वतः लेखक डॉ. बेळे अभिनयही करीत होते ते पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले