एक होती नदी. नाजुकशी चिमुकली, अवखळ. तारुण्याने मुसमुसलेली, सतत ताजीतवानी असलेली. सागराच्या ओढीने सतत धावतणारी. या अखंड धावण्याचा तिला कधी कंटाळा आला नाही. ना कधी ती दमली थकली. सतत वहात रहाणे हा जणु तिचा धर्मच होता आणि सागरा बरोबर एकरुप होणे हा तिचा ध्यास होता. निळ्याशार आभाळाने तिला कधी भुरळ घातली नाही कि आजूबाजूची हिरवीगार वनराई तिचा निच्श्रय कधी मोडू शकली नाही. खोल दरीत स्वतःला झोकुन देताना ती कधी कचरली नाही की मार्गात दगड धोंडे आले म्हणुन ती कधी अडली नाही. त्यांना एक सफाईदार गिरकी मारुन ती डौलात पुढे जात असे. अनेक लहान मोठे झरे, ओढे, तिच्या मधे येउन मिळत असत. त्यांना बरोबर घेउन ती सतत, अखंड, अविरत, अविश्रांत वहातच राही.
एखाद्या रुपगर्वीतेच्या चालण्यातला डौल तिच्यात होता. नाजुक पैंजणांसारखा खुळखुळ आवाज करत, हरिणीच्या चपळाईने ती जेव्हा वहात असे तेव्हाचे तिचे रुप एखाद्या अप्सरेसारखेच भासत असे. डोंगरा वरुन खोल उडी मारताना तिच्यात एकप्रकारचे आव्हान येत असे.घनगंभीर आवाज करत ती बेछुटपणे डोंगरावरुन उडी मारत असे तेव्हा ती एखाद्या रणरागिणी प्रमाणे दिसायची निर्भय, बेछूट, बेगूमान. सागराच्या समिप आल्यावर ती एखाद्या प्रयणोत्सुक ललने प्रमाणे अधिर झालेली दिसायची. सागर नजरेच्या टप्प्यात आला की हिची लगबग वाढायची. नव्या नवरीचा उत्साह तिच्या मधे संचारायचा. मोठ्या आवेगाने ती सागरामधे स्वत:ला लोटुन द्यायची. सागराच्या पोटात लांबवर घुसुन आपले अस्तीत्व टिकवुन ठेवण्याची धडपड करण्यात तिला फार मजा यायची. सागरही मग तिच्यावर तेवढ्याच जोमाने तुटुन पडायचा. तिला कवेत घेण्या साठी मोठ्या मोठ्या लाटा उसळवायचा. एकमेकांवर कुरघोडी करताना ते दमून जायचे. त्यांचा हा लटका खेळ स्ंपला की की मग समर्पित भावाने ती सागरामधे विलीन व्हायची.
तिच्या आजुबाजुला अनेक घनदाट जंगले होती. अनेक प्रकारची झाडे तिच्या काठावर डवरायची. अनेक वड पिंपळ तर तिला वर्षानुवर्षे साथ देत उभे होते. उन्हाळ्यात सुध्दा या झाडांना पाणी कमी पडणार नाही याची ती काळाजी घ्यायची. या जंगलातले अनेक प्राणी तिचे पाणी पिउनच मोठे झाले होते. अनेक प्रकारचे जंगली प्राणी जसे वाघ, सिंह, कोल्हे, हत्ती, हरणं, माकडे, पिटुकले धिटुकले ससुले रोज तिच्या कडे पाणी प्यायला यायचे. ती पण मोठ्या मायेने त्यांना पाणी पाजुन त्रूप्त करत असे. पाणी पिताना ते पाय घसरुन पडूनयेत याची काळजी घेत असे. मधेच कधितरी एखाद्या प्राण्याच्या अंगावर पाण्याचे तुषार उडवुन त्याला दचकवत असे.या प्राण्यां सारखे अनेक पक्षीही तहान भागवायला तिच्या कडे येत असत. आकाशात उंच उंच उडत तिच्या बरोबर स्पर्धा करत असत. दमले की तिच्या काठावर बसुन पाणी पिउन ताजे तवाने होत असत. खंड्या सारखा एखादा पक्षी जेव्हा आकाशातुन उडता उडता तीच्या पोटामधे सुर मारुन चपळाईने मासोळी पकडत असे तेव्हा त्याचा तो डौल तिला पहात बसावासा वाटत असे. तिच्या पोटातही काही कमी जीव आश्रयाला नव्हते. अनेक प्रकारचे मासे, बेडुक, साप, मगरी, कासवे, शंखशिंपले यांची नुसती गर्दी होती तिच्या पोटात. त्यांच्याशी खेळताना बागडताना तिला मोठी मौज यायची. अनेक प्रकारच्या पाणवनस्पतीही तिच्या पोटात ठाण मांडुन बसल्या असायच्या. त्यांना प्रेमाने कुरवाळताना ती एक मायाळु आई होत असे.
अनेक प्रकारच्या आठवणी तिच्या कडे होत्या या सगळ्याच्या. अनेक प्रकारचे चांगले वाईट प्रसंग तिच्या साक्षीने घडले होते. अनेक नवेजीव जन्माला येताना लहानाचे मोठे होताना तिने पाहीले होते. अनेकांच्या तारुण्यापासुन वार्धक्या पर्यंत ती साक्षीदार होती. तेच जीव नंतर देवाघरी जातानाही तिने पाहीले होते. अनेक महापुर आणि अनेक भीषण दुष्काळांची ती साक्षीदार होती. उन्हाळ्याच्या दिवसात ती सुकुन पार बारीक होउन जात असे. तर पावसाळ्यात तिच्या कडे भरभरुन पाणी असायचे. बोचरी झोंबरी थंडी तिने अनेक वेळा अनुभवली होती. प्रत्येक वेळचा अनुभव तिला वेगळे काहीतरी देउन जायचा.
पण या सगळ्यात एक गोष्ट कधीही बदलली नव्हती. आणि ते म्हणजे तिचे अविरत धावणे. दिवस रात्र अखंड वाहाणे अणि वहातच राहाणे हा तीचा धर्मच होता. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, बारा महीने चोवीस तास अविरत अखंड वहाणे यात कधी बदल झाला नाही. अमावस्येच्या रात्री ती कधी घाबरली नाही की पौर्णिमेचे टिपुर चांदणे तीला खिळवुन ठेउ शकले नाही, निळ्या आकाशाचा तीला कधी मोह झाला नाही, की काळे कुळकुळीत मेघ तिच्या साठी कधी आकर्षणाचा विषय ठरले नाहीत, इंद्रधनुष्य पहात कधी तीला रेंगाळावेसे वाटले नाही, की आकाशात चमचमणार्या तारका पहात ती कधीही क्षणभर उभी ठाकली नाही. बस, वहाणे, वहाणे आणि फक्त वहात रहाणे. अथक, अखंड, अविश्रांत, निरंतर. तसे म्हटले तर तिला अनेक मित्र मैत्रीणी होते. पण एकटा सागर सोडला तर कोणा मधे तिचा जीव रमला नाही. आपले तन मन धन तिने सागराला अर्पण केले होते. सागर हाच तिचा सखा होता, प्राण होता. सागरात समर्पित होणे हा तिचा जीवन धर्म होता.
माकडे झाडावरुन खाली उतरुन त्यांचे मानवात रुपांतर होण्याच्या प्रवासाची ती एक महत्वाची साक्षीदार होती. तिची साथ लाभली नसती तर माकडाचा माणुस कधीच झाला नसता. मानवाच्या बुध्दीचे त्याने केलेल्या प्रगतीचे तिला नेहमीच आकर्षण वाटत आले होते. मानवाच्या जंगला पासुन ते चंद्रावरच्या प्रवासामधले अनेक महत्त्वाचे टप्पे तिने पाहीले होते. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणे सरळ पाण्यात तोंड घालून पाणी पिणारा माणुस आता शुध्दपाण्याच्या बाटल्या जवळ बाळगताना पाहिला की तिला हसु येत असे. तिच्या पाण्यात पाउलही टाकायला घाबरणारा माणुस जेव्हा तिच्या पाण्याने शॉवर खाली अंघोळ करत असे तेव्हा तिच्या डोळ्या समोरुन मधल्या कळातले अनेक बदल सरकन सरकुन जात असत.
जंगली माणुस जेव्हा समुदायात रहायला लागला तेव्हा पाण्याची गरज भागवण्या साठी त्याने नदीजवळच वस्ती करणे पसंत केले. मग हळुहळु तो मासे पकडायला शिकला. पाण्यात पोहायला शिकला. समाजीक जीवनाचे अनेक नियम बनताना मोडताना आणि पुन्हा बनताना नदीने पाहीले. अन्नाची गरज भागवण्या साठी चाललेली माणसाची धडपड ती कौतुकाने पहात रहायची.
अनेक वर्षे साधना करुन मानवाने ज्ञान मिळवले. मग हे ज्ञान पुढच्या पिढीला देण्या साठी मानवाने गुरुकुल चालवायला सुरुवात केली. एका लयीत ॠचा, आर्या म्हणणारे आश्रमकुमार फारच गोजीरवाणे दिसायचे. आश्रमातुन निघणारा यज्ञाचा पवित्र धुर पहाताना, मंत्र ऐकताना तिला ईश्वर भेटल्याचे समाधान मिळायचे. आश्रमात चाललेला मंत्रघोष ती तल्लीन होउन ऐकत रहायची. कमरेएवढ्या पाण्यात उभे राहुन आर्घ्य देणार्या आश्रमवासीयांची प्रार्थना सूर्या पर्यंत पोचेल असा मनापासुन आर्शिवाद त्यांना द्यायची.
माणसानेही तीला मातेचा दर्जा दीला होता. जीवनदायीनी म्हणुन मानव तीचा गौरव करायचा. हात जोडुन तिची प्रार्थना करायचा. नंतर तर त्याने नदीची पुजा करायलाही सुरुवात केली. अशा अनुभवाची खरेतर तिला सवय नव्हती. इतर प्राणी पक्षी झाडे देखील तिच्यावर प्रेम करायची पण त्यांना ते अशा प्रकारे कधी व्यक्त करता आले नाही. स्वतःच्या प्रगती मधे मानवाने नदीलाही सामिल करुन घेतले होते.
तोपर्यंत मानवाने होडी बनवायची कला शोधली होती. मग तो होडीत बसुन नदीच्या एका किनार्या वरुन दुसरी कडे जायला लागला. जाळी टाकुन मासे पकडायला लागला. नदी हे सगळे बघुन मनातल्या मनात मानवाचे कौतुक करायची. मानवाचा तिला अभिमान वाटायचा. कधी तरी महापुर आला तरी ती दु:खी होत असे. माणसाची घरे पाण्यात वाहुन जात याचे तिला फार वाईट वाटायचे. कडक उन्हाळ्यात पाण्या साठी वणवण करणार्या स्त्रीया पाहुन तीच्या मनाची तडफड व्हायची. तिच्या कडुन घेता येईल तेवढी ती त्यांची काळजी घ्यायची. उन्हाळ्यातही मानवाला पाणी कमी पडुनये म्हणुन ती जीवाचा आटापीटा करायची. जहाजात बसुन सागरालाही पार करणार्या मानवा बद्द्ल बोलण्यात तिचा आणि समुद्राचा बराच काळ जात असे. समुद्राच्या बोलण्यातही तिला मानवा बद्दलचे तेच कौतुकच जाणवायचे.
अनेक विद्वान मह, राजे, साधुसंत तीचेच पाणी पिउन मोठे झाले होते. जेव्हा जेव्हा ते नदी बद्दल बोलायचे ते मोठ्या आदराने, प्रेमाने आणि गौरवनेच बोलायचे. इतर माणसांना ते नदीचा आदर करायला सन्मान राखायला शिकवायचे. नदीला ते जीवनदायीनी माता म्हणायचे. नदीलाही या लोकांबद्दल तितकाच आदर वाटायचा. मानवाने नदीच्या काठावर अनेक घाट बांधले होते. देवळे बांधली होती. या देवळांमधुन होणारा घंटा नाद, आरत्या नदी तल्लीन होउन ऐकत रहायची. माणसाने विसर्जीत केलेली गणपती बप्पाची मुर्ती ती मोठ्या सन्मानाने स्वीकारायची. बप्पाचा मान कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही याची ती काळजी घ्यायची. घाटांमुळे, देवळांमुळे नदीच्या पात्राची शोभा अजुनच वाढली होती. नदी पूर्णपणे माणसात गुंतून गेली होती.
नदी ओलांडण्या साठी हळुहळु मानवाने पुल बांधायलाही सुरुवात केली होती. लाकडी पुलांनंतर दगडी पुल आणि आता तर सिमेंटचे भक्कम पुल बांधण्या पर्यंत त्याने प्रगती केली होती. मानवाने तिच्या पात्रामधे छोटेछोटे बांध बांधायला सुरुवात केली. या बांधांच्या सहाय्याने तो पाण्याचा साठा करुन ठेवत असे. खरे तर नदीला हे अजिबात आवडले नव्हते. कारण त्या मुळे तिला मनसोक्त वहाता येत नसे. पण माणसापुढे तिचे काहीही चालले नाही. मग माणसाने मोठी मोठी धरणं बांधली. त्यावर महाप्रचंड असे विद्युत निर्मितीचे प्रकल्प काढले. नदीला त्याने करकचुन बांधुन, आवळुन, जखडुन टाकले. तिच्या खळखळाटावर, मनमुराद वहाण्यावर आता बंधन आले होते. सागरापाशी पोचेपर्यंत तिच्यामधले जवळजवळ सगळे पाणी मानवाने काढुन घेतलेले असे.
तिच्या अजुबाजुची जंगले तोडुन तिथे मानवाने मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या होत्या. अनेक प्रकारचे कारखाने त्याने नदीकाठी उभारले. मग या सगळ्या शहरांच्या, कारखान्यांच्या सांडपाण्याचे काय करायचे? मग मानवाने ते पाणी नदीच्या पात्रात सोडायला सुरुवात केली. जिथे पुर्वी अनेक प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे यायची तिथे आता डासांचे, किड्यांचे, घाणीचे साम्राज्य होते. हरणे, ससे यांच्या ऐवजी डुकरे, कावळे, उंदीरघुशी नदीच्या आसपास वावरायचे. वाघ सिंहां सारखे प्राणी तर आता दिसेनासेच झाले होते. मानवाने शिकार करुन, जंगले नष्ट करुन अनेक वन्यजीवांचा नायनाट करुन टाकला होता. तिच्या पोटात असणारे अनेक जातीचे मासे, कासवे व ईतर जीव जंतु, वनस्पती आता कायम्स्वरुपी नष्ट झालेल्या होत्या. जलपर्णी सारख्या वनस्पतींनी तिच्या पाण्यात सतत ठाण मांडलेले असे. पुर्वी पाउस आला की तीचे पात्र कसे घासुन पुसून लख्ख होत असे. पण आता महाप्रचंड धरणांमुळे पावसाचा काही उपयोग होत नसे. पावसाळ्यातही तिच्यामधुन क्वचितच पाणी वहात असे.
मानवाची माता असणारी नदी आता आगतिक पणे त्याच्या गटारांचे पाणी वाहुन नेउ लागली होती. पूर्वीचा खळखळाट आता राहीला नव्हता. आता तिच्या मधे असे ते केवळ दुर्गंधी युक्त, तेलकट, काळे घट्ट पाणी. कसेबसे पाय ओढत ती लाचार अभागिनी ते पाणी वहात असे. अताशा नदीत कोणी अंघोळीला सुध्दा येत नसे की कोणता प्राणी किंवा पक्षी पाणी प्यायला येत नसत. कारण तिच्या मधे वहाणारे पाणी कारखान्यांनी रसायने सोडुन विषारी करुन टाकले होते. अनेक मासे या विषामुळे तडफडुन प्राण सोडताना तिने पाहीले होते. तेच मासे खाउन अनेक पक्षी प्राणी सुध्दा तिच्याच काठावर तडफडुन मेले होते. नदी म्ह्णजे सांडपाण्याचा एक मेणचट, ओंगळवाणा, गलीच्छ प्रवाह बनली होती. पातळ चिखलासारखे दुर्गंधी युक्त सांडपाणी अविरत वहाणारे एक गटार हीच आता नदीची ओळख झाली होती. आईची आता मोलकरीण, भिकारीण झाली होती. मानवाच्या लेखी आता तिला काडीचीही किम्मत राहीली नव्हती. लहान बालके देखील तीच्या कडे बघुन चेष्टेने जेव्हा म्हणायची""अरे ही नदी कुठली? हे तर गटार आहे, गटार" तेव्हा तिच्या ह्रदयाला हजारो घरे पडायची. लाचारीने मान खाली घालुन ती निमुट पणे पुढे सरकायची.
सागराशी मिलन होतानाही तो पुर्वीचा जोम उत्साह आता उरला नव्हता. समुद्र लांबुन दिसला तरी तिला स्वतःची भयंकर लाज वाटायची. मानखाली घालुन खुरडत खुरडत, लोचटा सारखी ती सागराजवळरहायची. त्याने काहीतरी बोलावे म्हणुन आशाळभुतासारखी त्याच्या कडे पहात रहायची. सागरालाही आजकाल आपली किळस वाटते हे तिच्या लक्षात आले होते. मोठ्या मुश्कीलीने नाक दाबुन तो तिला स्वतः मधे सामावुन घेत असे. सागराच्या तिच्यावर असलेल्या प्रेमा बद्दल तिला काही शंका नव्हती. त्याच प्रेमा पोटी सागर आपले हे हिडीस, विद्रुप, घाणेरडे रुप सहन करतो आहे याची तिला जाणीव होती. किंबहुना सागरच तिचा एकमेव आणि सच्चा सखा आहे, तिला मदत करण्या साठी तो जीवाचे रान करेल याची तिला खात्री होती. म्हणुनच स्वतःचे असे गलिच्छ ओंगळवाणे रुप तिला सागराला दाखवायची भयंकर लाज वाटत असे. मानवाने तिच्या अब्रुची लक्तरे काढुन तीला केविलवाणी, लाचार बनवले होते. तिच्या आत्मस्न्मानाच्या चिंधड्या करुन टाकल्या होत्या. जीवनदायीनी, आई ही सगळी ढोंगे होती हे तिच्या फार उशीरा लक्षात आले होते. ती फसवली, नाडली गेली होती.
सागर देखील भकास पणे तिच्या या विटंबनेकडे पहाण्याशीवाय काहीएक करु शकत नव्हता. पण डांबरट मानवाने सगरालाही सोडले नव्हते. मोठी मोठी जहाजे चालवणे, मोठ्या प्रमाणात मासेमारी करणे, सागराच्या पोटातील खनिजे, वायु काढुन घेण्या पर्यंत त्याची मजल थांबली नव्हती. आता तो सागरातही भराव घालुन नवीन जमिन निर्माण करु पहात होता. सागराला पण त्याने मागे हटवण्याचे उद्योग चालु केले होते. पण सागर मुळातच क्षमाशील असल्या मुळे तो नदीलाही सबुरीचा सल्ला देत होता. मानवाला आपल्या सामर्थ्याची जाणीव सागर आणि नदी मधुन मधुन करुन देत असत. नदी कधीकधी माणसाने तिच्या मार्गात घातलेले अडथळे, तिचा बदलेला प्रवाह याची पर्वा न करता बेफाम पणे वाहुन मानवांमधे हाहाक्कार उडवुन देत असे, किंवा सागरही सुनामी सारख्या मोठ्या लाटा उसळवुन मनुष्याला चेतावणी देत असे. पण माणसाला स्वतःच्या यशाची धुंदी चढली होती. बेगुमान पणे तो निसर्गाची लुट करत होता. आता पर्यंत स्वतःच्या गुर्मीत त्याने निसर्गाची अपरिमीत हनी केली होती. असल्या इशार्यांना तो आता घाबरेनासा झाला होता.
नदीला हे सगळे असहःय झाले होते. या सगळ्या नरक यातने मधुन सोडवण्याची ती सागराला सतत विनवणी करत असे. तिला माहीत होते की तीचा सागर मोठा बलवान आहे. तोच तिला या सगळ्यातुन बाहेर काढु शकतो. तिला दु:खात बघणे त्याला कदापीही आवडत नाही हे नदीला चांगलेच ठाउक होते. पण सागराने मात्र अजुनही आशा सोडली नव्हती. मनुष्य सुधारेल शहाणा होईल स्वतःच्या मर्यादा ओळखुन वागायला शिकेल अशी त्याची खात्री होती. पण नदीला हे अजिबात मान्य नव्हते. तिची आता खात्री पटली होती आहे की मानव आता सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे. मिळालेल्य यशा मुळे बेफाम झालेला आहे. कोणतीही मर्यादा कोणतेही बंधन त्याला नको आहे.
काही हजार वर्षांपुर्वी असेच झाले होते. पृथ्वी वरचा पापांचा भार असाच बेसुमार वाढला होता. सागराच्या सहनशीलतेनेच्या सगळ्या मर्यादा संपल्या होत्या. मग पॄथ्वीवर सागराचे तांडव सुरु झाले. वायुदेव आणि इंद्रदेव त्याच्या मदतीला धावुन आले आणि मग महाप्रलय झाला. सगळी कडे पाणीच पाणी झाले. प्रचंड प्रमाणात हनी झाली या प्रलया मुळे. सगळे होत्याचे नव्हते झाले. सगळे जीवजंतु वाहुन गेले. पृथ्वी घासूनपुसून एकदम लख्ख करुन टाकली सागराने एका झपाट्यात. परत एकदा जेव्हा निर्मळ शांत, स्वच्छ अशी पॄथ्वी त्याने पाहीली तेव्हाच तो शांत झाला. मग परत पृथ्वीवर नवे जीवन सुरु झाले. सगळी कडे शांतता शिस्त आणि आनंद पसरला. नदी पुन्हा एकदा खळखळ करत मोठ्या दिमाखात वाहु लागली.
आता पुन्हा पुन्हा एकदा नदी हीच प्रार्थना करत होती. सागराचा संयम केव्हा संपतो याची वाट पहात होती. पिंपळपानावर पहुडलेल्या बालमुकुंदाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास ती आतुर झाली होती.
प्रतिक्रिया
12 Jul 2012 - 4:36 pm | तर्री
पण नक्की काय प्रतिसाद टायपावा हे सुचत नाहीये !
12 Jul 2012 - 4:42 pm | गवि
अत्यंत चांगलं.. शेवट खासच..
12 Jul 2012 - 4:52 pm | सस्नेह
सुरेख !
पर्यावरण प्रश्नाचा अगदी हृद्य शब्दांत घेतलेला वेध. वाचता वाचता गुंगून गेले.
12 Jul 2012 - 5:02 pm | गणपा
निबंध आवडला.
13 Jul 2012 - 7:04 am | मराठमोळा
हेच मनात आलं होतं
आवडलं :)
12 Jul 2012 - 5:15 pm | बॅटमॅन
हृद्य....हाच तो शब्द. आवडेश!!!
12 Jul 2012 - 5:23 pm | स्पा
ब्वा..
भारीच लीवलत
12 Jul 2012 - 6:34 pm | मन१
मस्त मांडलत.
भाषाशैलीवरून माझ्याच काही बाही जुन्या खरडालेल्या जुन्या दोन्-चार ओळी आठवल्या.
http://www.manogat.com/node/13606
http://www.misalpav.com/node/1620
मी असं काही लिहिलं असतं तर ह्याच धर्तीवर लिहिलं असतं.
12 Jul 2012 - 6:23 pm | तर्री
+१ .
अगदी असेच म्हणायचे होते .
12 Jul 2012 - 6:24 pm | नाना चेंगट
हं... का कोण जाणे पण अरुंधती रॉयच्या 'कॅपिटलीझम : अ घोस्ट स्टोरी' या लेखाची आठवण झाली.
सुरवातीच्या भागात ती म्हणते
आणि बराच काही काथ्या कुटून ( काही समर्पक, काही निरर्थक, काही चावून चोथा, काही तरीही आवश्यक) शेवटी ती म्हणते...
का कोण जाणे पण हा लेख आठवला. लेख वाचायचा असल्यास इथे वाचता येईल.
12 Jul 2012 - 8:31 pm | गणपा
ऑ? हा प्रतिसाद देनारा नक्की नानाच ना?
की आयडी हॅक झाला?
12 Jul 2012 - 7:23 pm | स्पंदना
ट्ची!
आपण कुठ चाललोय हे समजत असुनही चालतय तोवर चालवणारे आपण!
12 Jul 2012 - 8:03 pm | रेवती
मुक्तक आवडले.
पर्यावरणाचा होत असलेला र्हास टप्प्याटप्प्याने दाखवलात.
12 Jul 2012 - 8:18 pm | प्रचेतस
मस्त लिहिले आहे, मनापासून लिहिलेले आहे..
12 Jul 2012 - 10:01 pm | अर्धवटराव
"निसर्गाकडे संयम भरपूर आहे, दयामाया नाहि" या उक्तीची आठवण झाली.
अर्धवटराव
13 Jul 2012 - 11:38 am | कवितानागेश
पृथ्वी घासूनपुसून एकदम लख्ख करुन टाकली>
हे वाक्य वाचून धस्स झाले......
13 Jul 2012 - 6:00 pm | पैसा
कालचक्र सुरूच रहाणार.
13 Jul 2012 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार
सानेगुरुजी डोळ्यासमोर उभे राहिले.
13 Jul 2012 - 10:05 pm | अविनाशकुलकर्णी
भाऊ..लेख भावला...लाइक
14 Jul 2012 - 12:44 pm | अमितसांगली
एक गंभीर प्रश्न तितक्याच चांगल्या पध्दतीने मांडलाय...आईची आता मोलकरीण, भिकारीण झाली होती हे वाक्य खूपच भावले...
14 Jul 2012 - 12:59 pm | मितभाषी
छान लेख.
आवडला. :)
14 Jul 2012 - 1:06 pm | सोत्रि
मस्तच!
- (नदीकाठी रहायची ईच्छा असलेला) सोकाजी