साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी. गरीब भरपूर, पण शिकणारे कमी. ह्या काळानंतर तब्बल दोनेक दशकांनी मी शाळेत गेलो तेव्हाही "अव्वा! मुलींशी बोलतो का काय हा " असे म्हणत आम्ही पोरींशी बोलणार्यांना चिडवू. मिसरूड फुटून , कंठ फुटून दहावी-बारावीतही गेलो तरी अभिमानाने "आमचा हा कध्धी कध्धी म्हणून मुलींशी बोलत नाही हां" असे कौतुकानं आत्या-मावश्या सांगायच्या. ती भूषणाची गोष्ट होती. हे सगळं कधी? तर नव्वदच्या दशकाच्या मध्यावर. १९७५ तर साली तर काय अवस्था असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.
आणि ह्या अशा देवभोळ्या, सात्त्विक, कर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण , परमपवित्र भारतीय मनावर एकादिवशी सूं सूं करत धम्मकन बॉम्बगोळा आदळला. "लव्ह इन प्यारिस" मध्ये पोरींनी टांगा उघड्या दाखवणं वगैरे ठीक होतं, पडद्यावर नायकाशी "असं तसं" करायलाही लोकांची हरकत नव्हती. पण इथे थेट ते "असं तसं" केल्यावर "जे काही" स्त्रीच्या पदरात पडतं ते दाखवलं तेव्हा मात्र तेच सीन चवीचवीनं बघणार्यांना कसंसंच झालं, मळमळलं. लग्नाआधी स्त्रीला चक्क मूल झालं होतं!!
पिक्चर होता "ज्यूली". अँग्लो इंडियन (ब्रिटिश्-भारतीय मिश्रवंशीय) ख्रिश्चन घरातल्या पोरीला एका मित्रापासून दिवस जातात. होणारं मूल मारून टाकवत नाही, पण कुठे तरी "टाकून देऊया" म्हणून एका अनाथाश्रमासम ठिकाणी ते "टाकले जाते". त्याची आई कुमारिका बनून पुन्हा परत(लग्नाच्या बाजारात??) येते. राहवत नसले तरी इच्छा मारत राहते. दरम्यान पुनश्च नवरा परगावाहून परत येतो, त्याच्या परंपराप्रिय,धार्मिक हिंडू घरात ही बातमी फुटून गजहबही होतो. हो- नाही करत शेवटी त्याच्या घरचे मुलीचा स्वीकार करतात असं दाखवलंय; उगीच सुखांत दाखवायचा म्हणून. खरोखर सांगा, ह्याच्या एक शतांश जरी त्या काळात घडलं असतं तर किती आणि काय झेलावं लागलं असतं? सुखांत झाला असता?
पिक्चरची तेव्हाच्या प्रिंटमिडियात, उच्चभ्रू वर्तुळात बरीच चर्चा झाली. गाणी हिट्ट असल्यानं, मांडणी रंजक असल्यानं गल्ल्याचाही प्रश्न मिटला. संगीताचं फिल्मफेअरही नवखा राजेश रोशन घेऊन गेला. काही शिक्षित घरातही त्याबद्दल चर्चाविषयही निघे, पण तेवढ्यापुरताच.
शांतम् पापम्... कसं व्हावं आता? बिघडलेली चार दोन तरुण पोरपोरी त्या सिनेमाला गेलीत म्हणून पिक्चर तेवढ्यापुरता चालतोय असं म्हणत सात्त्विकांनी आपलं समाधान करून घेतलं. पुन्हा सगळं कसं शांत शांत झालं. जणू काही झालंच नव्हतं.
चौकटितलं जीवन पुन्हा चौकटीत परतलं. दोन्-अडीच दशके झाली.
.
.
.
ज्यांनी ज्यूली रिलीज झाला तेव्हा अडनिड्या वयात नुकताच प्रवेश केला होता त्यांची आता पोरे होऊन ती पोरे अडनिड्या वयात प्रवेश करू लागली होती. आणि तेव्हाच अजून एक फटाका फुटला. "क्या केहना".
कॉलेजकुमारी प्रिटी झिंटा कॉलेजातल्या आकर्षणातून एका मुलाला जन्म देते. पण प्रिटी झिंटाची पिढी बरीच धीट होती. ज्यूली सारखं तिला आपलं मूल टाकून द्यावंसं वाटलं नाही. ते मूल घेऊन मी जगेन अशा विचारांनी उभं राहिलेलं ते पात्र चित्रपटात दाखवलं गेलं. ज्यूलीला पहिल्याच आठवड्यात ब्लॅकनं तिकिट काढलेल्या आणि आता आई-बाबा झालेल्यांनी आता मात्र नाकं मुरडली! त्यांची मुलं अगदी दहावी-बारावीतलीही शेवटी पिक्चरला गेलीच, आई बाप गेले होते त्यांच्या आई बापांना चुकवून, तसंच काहीस. ज्यूली कुमारी माता बनल्याबद्दल लज्जित, घाबरली होती, लपवू पहात होती. तिचाच दोन दशकांनी आलेला अवतार मात्र तुलनेनं निश्चिंत होता, विचारात ठाम होता. "हे मूल माझं नाही" असं म्हणून पुरुष कधीही पितृत्व नाकारु शकतोच. "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही; मातृत्व नाकारता येत नाही" म्हणून कित्येकांना तसं मनातल्या मनात वाईटही वाटतं. पण प्रिटिला मात्र "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही;" असं वाटायच्या ऐवजी वाट्तं ते "स्त्रीनं मातृत्व नाकारायची गरजच काय" असा काहीसा तिचा पवित्रा आहे. इतके दिवस बाळाच्या होणार्या बाबाला "हे तुझंच आहे" म्हणून एक स्त्री विनवण्या करते हे सामान्य दृश्य. पण "हे माझं मूल आहे" (read:- "तुझं नाही. तू झिडकारलंस तेव्हाच हा गर्भ केवळ माझा झाला.")हे ठासून ती चित्रपटाच्या शेवटी सांगते तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटतं. इथेही सुखांत शेवट करायचा म्हणून दगा देणार्या आणि नंतर पस्तावणार्या सैफला सोडून ती सरळ चंद्रचूड सिंगला होकार देताना दाखवलंय.(एरवी कुमारी मातेला कोण होकार देणार हा माता पित्यांना पडलेला प्रश्न. इथे कुमारी माताच दोघांपैकी कुणाला होकार देणार यावर आख्खा शेवटचा सीन आहे.)
अर्थातच हाही कमर्शिअल पिक्चर वगैरे आहे म्हणून लोकांनी सोयीस्कर रित्या सोडून दिला. तसंही "बॉलीवुडी धंदे पिक्चरातच होत असतात. आपल्या लोकांच्यात कुठं असतं का तसं." असं म्हणत पांघरूण घेऊन पुन्हा सगळे निवांत.
.
.
.
पण ...पुन्हा एकदा सात्त्विक समजल्या जाणार्या प्रादेशिक/मराठी चित्रपटातच सई ताम्हणकर - सुबोध भावे अभिनित "सनई चौघडे" अवतरला. चित्रपट पाहून शेवटी दोन चार जणांना दोन पाच सेकंदांसाठी का असेना वाटलच "कुमारी माता हे प्रकरण इतकं दडवण्यासारखं आहे काय? तिला चार चौघांसारखं जगायचं असेल तर "तिचं तिनं" काहीतरी बघून घेऊन, एखाद्याला पटवलंच पाहिजे का? कुणीतरी फार मोठा त्याग करतोय म्हणूनच तिला स्वीकारलं पाहिजे का? ती अरेंज मॅरेज म्हणतात त्या प्रकारानी तसं सर्व साधारण चार चौघे जर लग्नाच्या बाजारात उतरतात तसं उतरायला हरकत काय? जोडिदाराचा अजून एक ऑप्शन म्हणून consider करता येणार नाही का हिला ? की जगावेगळ्ं केल्यासारखच दिसलं पाहिजे?"
चित्रपट समाजसुधारणेसाठी, विचारप्रवर्तनासाठी वगैरे बनत नाहीत, धंद्यासाठी बनतात. पण बदलाचे वारे कुणीकडे वाहणार ह्याचा हल्कासा अंदाज ते देउनही जातात.
.
.
.
दोनेकशे वर्षांपूर्वी काही काही ठिकाणी सती जात. हळूहळू पाच-सात दशकातच ते बंद झाले. मग समाजानं प्रचंड खळखळ करुन का असेना स्त्री शिकली. शिकूनही बहुसंख्येने घरातच राहिली. परावलंबी राहिली.दरम्यान कुठे कुठे विधवा विवाह होताना दिसले. त्यानंतर आजवर कधी फारसे दिसत नसलेले दृश्य दिसले. चक्क काडीमोड्/घटस्फोट हा शब्द नव्यानेच शब्दकोशात आला. तोवर नवरा कसाही अगदी दारूडा, अर्धवट, खुनशी , बाहेरख्यालीही असला तरी तोच उत्पन्नाचे साधन असल्याने त्याच्याचकडे आपल्या एकनिष्ठपणाचे इमान सिद्ध करणे भाग होते. आता अशा काही केसेसमध्ये तरी कर्तबगार स्त्री हक्काने तथाकथित एकनिष्ठेला नि परावलंबनाला नकार देउ लागली. विधवा विवाह झाले तसे शहरांतून घटस्फोटिंतांचे अल्प का असेना विवाह सुरु झाले.
सतीबंदी,स्त्रीशिक्षण,आधुनिक स्त्रीपोषाख आजवर ह्यातली हरेक गोष्ट, हरेक घटना निव्वळ अशक्य, निदान पुढच्या पाच-सात शतकात तरी "ह्या देशात होणे नाही " अशा क्याटेगरीतली वाटायची. आवाक्याबाहेरची वाटायची. आज मला कुमारी मातेचा सर्वसाधारणपणे विवाह होणे, समाजस्वीकृती मिळणे ह्या देशात कधीही शक्य होणार नाही असेच वाटते; आवाक्याबाहेरचे वाटते. हे कधीही होणार नाही ह्याबद्दल मी ठाम आहे.........
प्रतिक्रिया
6 Jul 2012 - 12:21 am | रेवती
लेखन आवडले.
तुमचा शिनेमांचा अभ्यास चांगला आहे.
प्रतिसाद वाचण्यास उत्सुक. ;)
6 Jul 2012 - 12:29 am | शिल्पा ब
लेख आवडला. सविस्तर सवडीने.
6 Jul 2012 - 12:56 am | अर्धवटराव
>> हे कधीही होणार नाही ह्याबद्दल मी ठाम आहे.........
--हिंदी चित्रपटात बरेचदा "दि एण्ड" ऐवजी "टु बी कंटिन्युड" दाखवतात :)
बाकी लग्नसंस्थेत मागच्या ५०० वर्षात झाले नाहि इतके बदल पुढील ५० वर्षात होतील. कौटुंबीक सहजीवनाच्या जाणिवेचा पाया भारतीय जनमानसात फार खोलवर रुजलाय. तेंव्हा हे बदल सकारात्मकपणे स्विकारले जातील अशी आशा आहे.
अर्धवटराव
6 Jul 2012 - 1:13 am | शुचि
मी भारताबाहेर राहून जास्त काळ लोटला असल्याने आणि मैत्रिणींकडून पुढील वाक्य की "भारत फार बदलला आहे" हे चिंतायुक्त / कौतुकमिश्रीत देखील स्वरात वारंवार ऐकल्याने विचारते - भारतात कुमारी माता दिसतात का?
दिसत असल्यास का नाही लग्न होणार? गरज ही शोधाची जननी आहे. जर अनेक कुमारी-माता निर्माण झाल्या तर त्यांची लग्नेदेखील होतीलच की.
6 Jul 2012 - 1:21 am | आबा
लेख आवडला,
तुमचं मत मात्र पटलं नाही
6 Jul 2012 - 3:09 am | वीणा३
भारतीय लोक नेहमीच भारतात कुटुंबसंस्था कशी भक्कम आहे, लग्न कशी टिकतात, आणि कुटुंबसंस्था भारतीय समाजाला कशी टिकवून धरणार आहे याचे दाखले देत असतात. पण जस जश्या बायका आर्थिक आणि वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र होत जातील तसे कुटुंबसंस्थेला मोठे हादरे बसू लागतील (हल्ली तशीही सुरवात झालेली आहेच). सध्या जरी कुटुंबसंस्थेला आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे ते येत्या काही वर्षात खूपच कमी होणार आहे.
कुमारी माते बद्दल:
मला असं वाटतं कि योनिशुचीतेच्या अवास्तव कल्पनांमुळे कुमारी मातेचं लग्न होणं हा प्रश्न फक्त त्याच मुलींच्या बाबतीत राहील ज्या आर्थिक दृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत. ज्या स्वताचा व मुलाचा सांभाळ करू शकतात अश्या कितीतरी मुली (किमान शहरी भागात) एकटी आई (single mother ) होणं स्वीकारतील.
आणि त्यांच्या सारख्या मोकळ्या विचाराचा जोडीदार मिळणं खूप कठीण नाही राहणार. आत्ता जर सनई चौघडे सारखा चित्रपट बहुसंख्य लोकांना आवडू शकतो तर अजून काही वर्षांनी हा विचार प्रत्यक्षात यायलाही लोकांची हरकत नसावी.
6 Jul 2012 - 8:16 am | किसन शिंदे
लेख आवडला.
बाकी मान्यवरांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सूक.
6 Jul 2012 - 8:46 am | प्रचेतस
मनोबा बर्याच दिवसांनी लिहिते झाले.
6 Jul 2012 - 9:24 am | रणजित चितळे
आपला लेख आवडला.
ज्युली पिक्चर पाहिला नव्हता (सुटून गेला पाहायचा) आपल्या चांगल्या लेखाने आठवण करुन दिली. राजेश रोशनची गाणी हिट झाली होती....
अगदी पुर्वीच्या काळी कुटूंब संस्था नव्हती, मग ती सुरु झाली. काही दिवसानी ह्या संस्था मोडीत निघतील. त्या बरोबर जन्म घेणारे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी तरी समाज सुधारक होईल. हळूहळू लोकांना लग्न संस्था किती चांगली आहे त्याची त्या वेळच्या समाजाला कल्पना यायला लागेल व परत लग्न पद्धत सुरु होईल.......रहाट गाडगे चालत राहणार. प्रत्येक वेळेला आत्ताचा माणूस पुर्वीचा माणूस कसा जुन्या विचारांचा होता व आपण किती शहाणे झालोत हे दाखवत राहील. चालायचेच.
अवांतर ---------------------------------
मला ज्युलीतली गाणी अजून आवडतात. त्या मानाने क्या केहनातले एकच गाणे जरा बरे वाटले. (जनरेशन गॅप ह्यालाच म्हणतात का कोण जाणे)
6 Jul 2012 - 10:14 am | राजो
योगायोग म्हणजे दोन्ही चित्रपटांचा संगीतकार राजेश रोशन च आहे..
6 Jul 2012 - 12:00 pm | रणजित चितळे
:-)
6 Jul 2012 - 9:27 am | JAGOMOHANPYARE
आराधना मध्येही कुमारी माता आहे का? राजेश खन्ना, शर्मिला
6 Jul 2012 - 10:01 am | ऋषिकेश
कुमारी माता समाजमान्य व सामान्य जर झाला (आणि स्त्रीभ्रुणहत्येवर प्रभावी कायदा जर आला) तर भारतातील काही भागात आधी 'मुलग्या'ची माता हो तर लग्न करू असा ट्र्रेंड येईल असे वाटते का?
6 Jul 2012 - 3:23 pm | नगरीनिरंजन
कुमारी माता समाजमान्य होणार नाहीत कारण ते स्त्रियांना मान्य होणार नाही. ज्या स्त्रियांना लग्नाची गरज वाटत नाही आणि मूल हवे आहे अशा स्वतः कर्तबगार असलेल्या स्त्रियाच फक्त कुमारी माता स्वखुशीने होतील आणि त्यांना लग्न नकोच असल्याने तुम्ही म्हणता तो प्रकार होणार नाही. अर्थातच अशा स्त्रिया संख्येने नगण्य असतील.
बाकीच्या स्त्रियांच्या बाबतीत कुमारी माता होणे हा आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक दॄष्ट्या घाट्याच्या प्रकार असल्याने चुकून गर्भवती झालेल्या बहुतेक मुली मूल वाढवण्याचा निर्णय घेणार नाहीत.
गर्भपातांची आणि गर्भनिरोधकांच्या विक्रीची आधीच वाढलेली संख्या याचीच निर्देशक आहे असे वाटते. त्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास मनोबांच्या काळ किती पुढे गेला आहे किंवा गेला नाहीय या बाबतीतल्या सर्व शंका फिटून जातील असे वाटते.
म्हणूनच कुमारी माता समाजमान्य होणार नाहीत याच्याशी सहमत आहे पण वेगळ्या कारणांमुळे
अर्थात कुमारीमातांच्या मान्यतेचे काहीही झाले तरी स्त्रियांची घटती संख्या पाहता "अमुक अमुक कर मग लग्न करेन" असे म्हणणे भविष्यात किती मुलग्यांना परवडेल ही शंकाच आहे.
6 Jul 2012 - 10:22 am | अमृत
याचे नाव ज्युली ते चौघडे हवे होते काय? ;-)
अमृत
6 Jul 2012 - 11:40 am | मृत्युन्जय
आज मला कुमारी मातेचा सर्वसाधारणपणे विवाह होणे, समाजस्वीकृती मिळणे ह्या देशात कधीही शक्य होणार नाही असेच वाटते; आवाक्याबाहेरचे वाटते. हे कधीही होणार नाही ह्याबद्दल मी ठाम आहे.........
१० वर्षात चित्र बदलले नाही तर मी नाव बदलेन (अर्थात मृत्युंजय नाव बदलुन दुसर्या आयडीने आंजावर वावरेन ;) )
असो. जोक्स अपार्ट, मला नाही वाटत की हे अशक्य आहे. " चारित्र्य " या शब्दाची व्याख्या बदलत चालली आहे ( हे बरोबर आहे किंवा चुकीचे आहे यावर मी काहीच भाष्य करत नाही आहे. करु इच्छितही नाही). व्हर्जिनिटी इज नो मोअर अॅन असेट. कौमार्य आता प्रौढीने मिरवायचा दागिना उरलेला नाही. माझ्या ओळखीतल्या किमान ५ मुलींनी ते लग्नाआधी गमावले होते आणि हे मला माहिती होते याचा अर्थ ही गोष्ट जीवापाड जपण्याचे गुपितही उरले नव्हते हे ही खरे (अर्थात यापैकी कुठल्याही केसमध्ये ही गोष्ट मला त्या मुलीने सांगितली नाही पण ज्यांनी सांगितली ते खोटे बोलत असण्याची कुठलीही शक्यता नव्हती / अजुनही वाटत नाही). virginity is not the presence of character but absence of a chance असे एक वाक्य मी लहानपणापासुन ऐकत आहे. ज्या वेगाने आजकाल मुले मुली आपले तारुण्य उपभोगत आहेत ते बघता हे खरेच आहे यावर माझा विश्वास बसायला लागला आहे. तरुण मुलामुलींमधला संभोग ही आता काही विशेष गोष्ट उरली नसल्याने जेव्हा ती पिढी लग्नाच्या वयाची होइल (म्हणजे अजुन ७ ते १० वर्षात) तोपर्यंत कुमारी माता आणि त्यांचे विवाह ही एवढी जटील समस्या उरलेली नसेल.
माझ्या स्वतःबद्दल बोलाल तर मला मुलगा झाला आणि त्याने एखाद्या कुमारी मातेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मला त्यात काहीही शांतम पापम वाटणार नाही. शेवटी प्रेम महत्वाचे ते आयुष्यभर टिकते. कौमार्याच्या असण्या नसण्यात फारतर तासाभराचा फरक असतो. आज आहे उद्या नाही. प्रेमाचे तसे नसते.
बादवे लेख आवडला.
6 Jul 2012 - 10:49 am | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
6 Jul 2012 - 11:21 am | अमितसांगली
लेख आवडला.....
6 Jul 2012 - 11:51 am | मी_आहे_ना
लेख आवडला, विचार करायला नक्कीच भाग पाडणारा आहे.
6 Jul 2012 - 1:42 pm | मन१
सर्व वाचकांचे आभार. ज्यांनी आवडल्याचं कळवलय त्यांना धन्यवाद पण सहमत नाही म्हणतात त्यांचे म्हणणे काय हे ऐकायला आवडेल.
@ऋषिकेश :- शंका रास्त आहे !
@म्रूत्युंजय :- "काळ भलत्याच वेगानं पुढे जाणार आहे" असं मी समजत होतो. तुम्ही लिहिलय त्याप्रमाणं असेल तर "काळ भलत्याच वेगानं पुढं आधीच गेलेला आहे" असच म्हणावं लागेल.
@अमृत :- नाव "ज्यूलीचे चौघडे" (पक्षी ज्यूलीच्या (राजरोस)लग्नाचे , उत्सवाचे चौघडे ) असच आहे. "ज्यूली ते चौघडे" असं लिहिताना ते टायपो झालेलं नाही.
@रणजित :- वर्तुळाची कल्पना भारिच. तसं होउही शकतं. पण सध्या वर्तुळाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, हे ओळ्खलं तर पुढ्चा प्रवास दिसू श्केल. कारण वर्तुळ काही एका पिढीत पूर्ण होत नाही,तर एक पिढी हा एक बिंदू म्हणता येइल फारतर.
अजून बरच काही लिहायचय, सवड मिळताच परततो.
6 Jul 2012 - 2:08 pm | रणजित चितळे
छान विचारांना चालना देणारे लेखन. अजून वाचायला आवडेल.
6 Jul 2012 - 3:10 pm | मस्त कलंदर
लेख आवडला..
6 Jul 2012 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार
कुटूंबवत्सल लोकांना अशा गोष्टीवरती चर्चा करताना बघून मला कायम हसायला येते.
चर्चा करणे बरे असते. नुसतीच चर्चा करायची असते, कृती करणारे आपण नसणार हे माहिती असल्याने सगळे निवांत असते.
बाकी इथे कोणी अशी कन्या आहे का, की जी 'हो मी कुमारी माता म्हणून मानाने जगेन पण एखाद्याने फसवल्यावरती गर्भपात करणार नाही' असे ठामपणे सांगेल.
किंवा असा कोणी आहे का (कोण कशाला खुद्द मनोबा अजून अविवाहीतच आहेत बहूदा) की जे अशा मुलीला पत्करायला तयार आहेत ?
आधी भारतीयांची मानसिकता बदला. भारत आपोआप बदलेल.
6 Jul 2012 - 3:43 pm | मस्त कलंदर
टाळ्या....
6 Jul 2012 - 3:59 pm | प्यारे१
निवडणुका जवळ आल्या काय?????
6 Jul 2012 - 4:39 pm | रणजित चितळे
आधी भारतीयांची मानसिकता बदला. भारत आपोआप बदलेल.
वाक्य आवडले.
बरोबर आहे आपले म्हणणे. पण मानसिकता बदला म्हणजे काय करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे व कसे करायला पाहिजे. साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आपली लोकं मानसिकता बदलत नाहीत.
(थोडे अवांतर झाले पण आपल्या ह्या वाक्यावरुन आठवले - मस्त गाडीतून जात आहेत, बघायला सुद्धा शिकलेले वाटतात असे कुटूंब. छोट्या मुलीने केळे खाल्ले व त्याचे साल खिडकी खाली करुन रस्त्यावर टाकले. मागे बसलेल्या आईने किंवा शेजारच्या बाई मुलीला काहीच बोलली नाही. हे तर अगदी साधे उदाहरण झाले. ह्या पेक्षा किती तरी उदाहरणं परा आपल्याला रोज बघायला मिळत असतील).
आपल्या कडे शाळेत लहानपणा पासून सिव्हिक्स शिकवले जाते पण सिव्हिक्स सेन्स नाही शिकवला जात. कॉम्प्युटर शिकवला जातो पण मुलभूत संस्कार नाही शिकवले जात (मी शाळेतून म्हणत आहे). मग हिच पिढी मोठी होणार व मानसिकता तशीच राहणार. अजून बरेच आहे ...... सवडीने बोलू.
6 Jul 2012 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यालाच 'साक्षर झाले पण सुशिक्षित नाही बनले' असे म्हणतात.
7 Jul 2012 - 11:57 am | रणजित चितळे
परा एकदम पटले आपल्याला आपले ----- ह्यालाच 'साक्षर झाले पण सुशिक्षित नाही बनले' असे म्हणतात. आपण ह्या मॅकॅले पद्धतीच्या शिक्षणाने सगळेच साक्षर होत आहोत सध्या. सुशिक्षित कधी होऊ माहित नाही.
6 Jul 2012 - 5:09 pm | नाना चेंगट
विषय संपला !!
6 Jul 2012 - 4:27 pm | एमी
@ननि शी सहमत.
कुमारी मातांचा विचार करण्याऐवजी teens ना precautions घ्यायला शिकवणे चांगले. संधी मिळणारच नाही असे समजणे किँवा मिळाली तरी घेऊ नका असे सांगणे फारसं योग्य होणार नाही कारण तो त्या त्या स्थळ, काळ, व्यक्ति नुसार घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे prepared असणे चांगले.
आणि accidental असेल तर sentimentally पेक्षा practically विचार करुन गर्भपात कधीही योग्य आधीच १.२ बिलियन असताना अजुन कशाला हवीत unwanted मुलं.
btw जशी मुलीँच्या व्हर्जिनिटी बद्दल बोलणारी मुलं असतात तश्याच मुलांच्या (bad) परफॉर्मन्स बद्दल बोलणार्या मुलीँपण असतील नाही???
आणि 'मुलगा' झाला तर काय करणार आणि काय नाही याबद्दल बरीच दुरद्रुष्टी असते लोकांची...
6 Jul 2012 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते
लेखन आवडलं.
6 Jul 2012 - 7:00 pm | प्रीत-मोहर
मनोबा खुप छान लिहले आहेस :)
6 Jul 2012 - 7:05 pm | सूड
शिनेमांचा अभ्यास मस्तच !! प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
6 Jul 2012 - 9:47 pm | निनाद मुक्काम प...
राजनीतीचा उल्लेख केला नाही ?
पण ह्या विषयांवर क्लासिक मध्ये गणला जाणारा यश चोप्रा ह्यांचा पहिला दिग्दर्शक म्हणून सिनेमा धूल का फुल ( १९५९)
काळाच्या पुढचा सिनेमा
राजेद्र कुमार ,माला सिंन्हा प्रेमप्रकरण
मग कुमारी माता , लोकलज्जेखातर अपत्य बेवारस
पुढे त्याची वाढ एका भल्या गृहस्थाकडे
मग माला चे अशोक कुमार शी लग्न तेथे राजेद्र आपल्या संसारात सुखी
पुढे तो लहान मुलगा वाईट संगतीने बिघडतो. चोर बनतो व पुढे तुरुंगात जातो.
येथे राजेद्र कुमार जज व अशोक कुमार वकील ( कोर्ट ड्रामा )
ह्या सर्व स्टार कास्ट मध्ये लहान मुलाच्या भूमिकेला योग्य न्याय चक्क दोन स्वतंत्र गाणी. पुढे त्यांच्या शिनेमात शाहरुख वगळता बाकीचे ......
थोडक्यात सामाजिक आशयप्रधान जबरा सिनेमा व प्रसिद्ध व श्रवणीय गाणी.
अवांतर एक पंचतारांकित आठवण
आदित्य च्या लग्नात संपूर्ण हॉटेल चोप्रा ह्यांच्या बंगल्यात अवतीर्ण झाले होते. अत्यंत खाजगी व अती महत्वाच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. .आम्ही हॉटेल मध्ये शिकाऊ उमेदवार तेथे दिवसाचे १८ तास दिवसभर राबलो. यशजी ह्यांनी वयोमान झाले म्हणून अपेयपान सोडले. आता त्यांच्याकडून जातांना मोठे घबाड ( म्हणजे थप्पी कशी काढायची ) हा आमच्यापुढे यक्ष प्रश्न उभा राहिला.
तेव्हा मग जुनी चाल म्हणून जेव्हा त्यांच्या निरोप घेण्याची वेळ येईल तेव्हा तुमचे आम्ही पंखे कसे आहोत , तुमचे सिनेमे कोणते व का आवडतात हे सांगायचे ठरले. मग त्यांनी जातांना जातीने आमची चौकशी केली, आभार मानले व तुम्ही लोकांनी आज ३ शिफ्ट मध्ये काम केले. आमचे कलाकार तर एवढ्या कामात रडायला लागतात असा जोक केला. ( आम्ही मनात पापी पेंट का ...आणि आम्हाला सगळं डोळ्याने पाहण्याची खाज म्हणजे बंगला व तेथे वावरणारी माणसे वगैरे ) मग आम्ही सगळ्यांनी आवडते सिनेमे सांगायला सुरुवात केली. माझी पाळी आल्यावर मी ह्या सिनेमाचे नाव सांगितले.
त्यांनी माझ्या समोर येऊन का आवडतो हा सिनेमा म्हणून विचारले. तेव्हा मी सामाजिक व काळाच्या पुढचा सिनेमा म्हणून सांगितले. ते थोडेसे स्तब्ध झाले हे पाहून मी लगेच आजकाल असे सिनेमे बनत नाहीत असे बोलून गेलो. तेव्हा त्यांनी हसत आजकाल अश्या गोष्टींचे नावीन्य उरले नाही लोकांना.
असे सांगितले. मग उदय दादाने हजाराची थप्पी आमच्या हातात ठेवली. तेव्हा तेथे वेळप्रसंगी ताटे , चमचे उचलल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने तो दिवस. त्यांच्या बंगल्याचा साधेपणा आणि त्यांच्या मुलांचा आणि त्यांचा बॉलिवूड ला न शोभणारा नम्रपणा सारे आठवलं.
7 Jul 2012 - 12:05 pm | रणजित चितळे
आपला अनुभव वाचून मजा आली. वाईट ह्याचेच वाटते की मी आज पर्यंत कोणत्याही सेलीब्रेटीच्या १० किमी जवळ जाऊ शकलो नाहीये. नाही म्हणायला एअर पोर्ट वर एकदा गुलझार साहेब व आरके लक्षमण दिसले होते व एअरपोर्टवरच सुब्रमण्यम स्वामी दिसले होते.
7 Jul 2012 - 1:07 pm | मन१
@रेवती तै :- सिनेमांचा अभ्यास वगैरे काहीच नाही हो. (नाहीतर फारएन्ड अन परा सारखी परिक्षणं टाकत सुटालो नसतो का.) फक्त मधे टीव्हीवर कधी नव्हे ते पहायला मिळाला ज्यूली.
@शिल्पा ब :-
सविस्तर सवडिने लिहीन म्हणालात/. कधी लिहिताय?
@अर्धवटराव :- बाकी लग्नसंस्थेत मागच्या ५०० वर्षात झाले नाहि इतके बदल पुढील ५० वर्षात होतील. हे खरे असेल तर परंपराप्रेमींसाठी धोक्याचा इशारा आहे......
@शुचि :- नाही. अजून तरी कुमारी माता इकडे फारशा दिसत नाहीत.
@ आबा :- लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल थँक्स. लेखातलं मत प्टलं नाही , ठीक आहे. तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल.
@वीणा३ :- पण जस जश्या बायका आर्थिक आणि वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र होत जातील तसे कुटुंबसंस्थेला मोठे हादरे बसू लागतील (हल्ली तशीही सुरवात झालेली आहेच).
चार-दोन लॉ करणारी मंडळी पाहण्यात आहेत. एकमेकांपासून "सुटका" हवी असणार्या केसेस मेट्रो शहरात बर्याच वाढलेल्या आहे म्हणतात.
@किसन, वल्ली ,स्वातीदिनेश, अमितसांगली ,मी_आहे_ना,मस्तकलंदर , बिकाशेठ,प्रीमो,सूड :-
आ भा र.थॅं क्स.शु क्रि या.
.
.
.
@गुरुघंटाल :- योगायोग म्हणजे दोन्ही चित्रपटांचा संगीतकार राजेश रोशन च आहे.. निरीक्षणाला सलाम!
@JAGOMOHANPYARE :- हौ. आराधना,धूल के फूल वगैरे माझ्या माहितीतून सुटले.
.
@ऋषिकेश :- कल्पना भन्नाट काढलित. पण ननिंशी बराचसा सहमत.
.
@परा:- "कुटुंबवत्सल" ह्या विशेषणात माझाही समावेश केला गेला असेल तर मनापासून थँक्स.तसाही आम्ही born and brought up झालो ते "शहाणा बाळ" ह्या क्याटेगिरीतच. आत्या-मावशांना त्याचेच कौतुक होते, हे खुद्द मीच वरती लिहिलय. पण म्हणून जन्मभर इतर(जालवासी परिचित) परवानगी देतील त्याच विषयावर लिहायचं-बोलायचं का काय??!
की मग कुमारी मातेशी विवाह केल्याशिवाय कुणी ह्यावर लिहायचं नै अन बोलायचं नै असं सुचवायचय का?
किंवा आम्हाला एखादी मुलगी आवडली तर ती कुमारी माता बनेपर्यंत आम्ही वाट पहावी (केवळ ह्या विषयावर चर्चा करायचा अधिकार मिळावा म्हणून) असं काही आहे?!!! नकोच . "मनोबाही अजून अविवाहित आहेत" ह्याला प्रत्युत्तर म्हणून जे काही देइन त्यानं फारच वैय्क्तिक होतय.इथे नको. कधी भेटलो , तुला चालत असेल तर बोलू.
बाकी, "भारत बदलायलाच हवा" वगैरे नाही रे म्हणत मी; तसं म्हणायला मी काही समाजसुधारक अन् विचारवंतही नाही.
"भारत बदलतोय की काय" असं मी म्हणतोय. दोन्ही वाक्यातला एक महत्वाचा फरक अधोरेखित झाला तरी पुरे.
@ननि,पाहुणे :- शतशा: धन्यवाद. महत्वाची गोष्ट सुचवलित. मुलात पिक्चर पाहिल्या पाहिल्या जे सुचलं ते सहज इथं लिहून काढ्लं. पण लिहिताना काही गोष्टी सुचल्या, तशाचा डोक्यातले काही प्रश्न निघूनही गेले, लिखाणातून निसटले.
१९७५साली "अशा" उत्पादनांची फारशी माहिती नसणे समजू शकतो. पण अलिकडच्या काळातही असे कसे होउ शकते का हा प्रश्न मलाही पडलाच. योग्य त्या precautions घेतल्या, आणि समस्येलाच प्रतिबंध केला, तर पुढ्ला प्रश्न रहात नाही, हे ठीक. पण मुळात आपण म्हणतोय ती गोष्ट "समस्या " खरच आहे का?
@निनाद :- "धूल के फूल"चा उल्लेख इतरत्रही आढळलाच. संक्षिप्त परिचय रंजक वाटला.
तुमच्याकडे एकाहून एक अनुभव गाठिशी असलेले दिसताहेत, ते मांडायला सुरुवात केलित तर बरं होइल.
7 Jul 2012 - 6:12 pm | एमी
मला वाटतं Unwantd/accidental/unplaned मुलं/प्रेगन्सि 'समस्या' आहेच. मग लग्न झालं आहे की नाही ही दुय्यम (secondary) बाब झाली.
मुलांना काय कळतयं आणि मुलांना सगळं कळतयं या दोन्ही टोकाच्या भुमिका वाईटच. पालक आणि मुलांमधे open communication असलेलं चांगलं. म्हणजे precaution ही घेतील आणि accidetally pregnant झालेच तर चांगल्या स्वच्छ सुरक्षित ठिकाणी गर्भपात करतील (आई वडिलांच्या मदतीने).
२-३ वर्षाँपुर्वी आलेला तेरे संग पण याच विषयावर होता (मी पाहिलेला नाही). सलाम नमस्ते पण थोडाफार तसाच. पण ते क्या कहेना मधलं फोटुतुन बाळ बोलतयं वगैरे म्हणजे फारच sentimental नौटंकी झाली.