संदर्भ : जंगलकथा -१ व २
हत्तींच्या गैरकारभारावर बहुसंख्य प्राणी फार नाराज होते. त्यातून हत्ती जी कांही चांगली कामे करु इच्छित होते त्यांत कोल्हे त्यांना अडचणी आणत होते. हत्तींना जे पर्याय होते त्यांनीही याआधी गोंधळ घातला असल्यामुळे सर्व प्राणी हतबल झाले होते. जंगलातली झाडी, कुरणे कमी झाली होती, पाण्याचे दुर्भिक्ष वाढत चालले होते, वाघांची दादागिरी इतकी वाढली होती की तेही सिंहांप्रमाणे, आपला सवतासुभा मागतात की काय अशी भीति वाटू लागली होती. सिंह जरी वरवर शांत झालेले दिसले तरी मधुनमधून ते आपली नखे परजत होते. मुख्य म्हणजे कुठल्याही गुन्ह्याबद्द्ल कुणाला शिक्षा होत नव्हती आणि त्यामुळे गुन्हेगार व अतिरेकी वृत्तीचे प्राणी निर्ढावले होते!
शाकाहारी प्राणी उपासमारीमुळे जेरीस आले होते तर मांसाहारी प्राणी रोडावलेल्या शाकाहारींमुळे कंटाळले होते. जंगलाचा कारभार सुधारण्याची नितांत गरज होती.
हत्तीयाने यावर बाकीच्या हत्तींशी विचारविनिमय करुन बाहेरच्या माणसांची मदत घेण्याचे ठरवले. बहुसंख्य हत्तींना स्वतःची बुध्दी वापरण्याची संवयच राहिलेली नसल्यामुळे त्यांनी हत्तीयाच्या या निर्णयाला सोंडा उचलून संमती दर्शवली.कोल्हे संतापले व आपल्याला विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी जोरदार विरोध केला. कदाचित माणसे आल्यास आपल्या लबाडीच्या मक्तेदारीला एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल अशी त्यांना भीति वाटली असावी. माकडांना खरे तर माणसे जवळची. पण हत्तींना प्रत्येक गोष्टीतच विरोध करायचे असे 'चिंतनशिबिरांत' ठरलेले असल्यामुळे त्यांनी याला विरोध केला. शिवाय, उद्या सत्तेवर आल्यावर याच माणसांकडून अधिक लाभ पदरांत पाडून घ्यायचा ,असा धूर्त विचारही त्यामागे होता. तरसांना या विषयी कोणती भूमिका घ्यावी याचे पटकन् आकलन न झाल्यामुळे ती नुसतीच हंसत होती. पण लांडग्यांनी अनपेक्षितरीत्या हत्तींना मदत करायचे ठरवल्याने तरसे तात्काळ विरोधात गेली. बाकी अनेक अस्वले, गेंडे, रानरेडे, गवे वगैरे तटस्थ राहिले.
अशा तर्हेने हत्तींच्या विरुध्द कोल्हे, माकडे, तरसे, वाघ व सिंह अशी विळ्याभोपळ्याची मोट बांधली गेली.
'माणसांच्या मदतीने या जंगलातल्या अंधःकाराचे पर्व संपेल', या आलंकारिक वाक्याचा शब्दशः अर्थ लावून मांसाहारी प्राणी चपापले. उजेडांत शाकाहारींची शिकार करायची तरी कशी , असा सूर लावून हा ठराव मांसाहारीविरोधी आहे असा प्रचार सुरु झाला. ठरावाला प्रचंड विरोध होत असल्याचे पाहून हत्तींनी सूज्ञपणे तो 'मतास' टाकायचे आवाहन केले. कारण मते आपल्याकडे कशी वळवायची या कलेत ते अनुभवी होते.
ठरलेल्या दिवशी ठराव मताला टाकण्याची महासभा सुरु झाली. कांही अभ्यासपूर्ण भाषणे सोडली तर ,इतर कित्येक वक्ते प्राण्यांचा हा करमणुकीचा कार्यक्रम आहे ,अशी समजूत झालेली दिसली. चारा खाऊन माजलेल्या एका गव्याने तर चौफेर टोलेबाजी केली. अनेक प्राण्यांनी मूळ विषयापासून भरकटून हत्तींवर तोंडसुख घेऊन आपली हौस भागवली. हत्तुलनेही असंबध्द भाषणाची आपली प्रतिमा कायम राखली. कोल्हेकुई, तरसांचे भीषण हंसणे, हत्तींच्या तुतार्या यांनी आसमंत दणाणून गेला. या गोंधळातच मा़कडांनी ,केळ्यांचे घड हातांत नाचवत बोलायला सुरवात केली. लांडग्यांनी हे आमिष आम्हाला दाखवले, असा त्यांचा आरोप होता. पण अनुभवी हत्तींनी तो गोंधळ लवकरच आटोक्यात आणला. हत्तींच्या हिकमतींमुळे सर्व विरोधक चारीमुंड्या चीत झाले आणि हत्तींचा पुन्हा एक कलंकित विजय झाला. अर्थातच हत्तींना तो कलंकित वाटत नव्हताच!
परन्तु हत्तींच्या या आनंदाला लगेचच विरजण लागले. वख्वखलेल्या प्राण्यांनी जंगलभर ठिकठिकाणी छुपे हल्ले सुरु केले! त्यांत अनेक निरपराध प्राण्यांचा नेहमीप्रमाणेच बळी गेला. परिस्थिती गंभीर झाली, सार्या जंगलालाच 'बाहेरचा' धोका प्रकर्षाने जाणवू लागला. पण त्याचे गांभीर्य लक्षांत न घेता माकडे हत्तींवर आरोप करत सुटली. माकडे - लांडगे यांच्यात 'केळ्यांचा घड' प्रकरणावरुन जुंपली होतीच. कोल्ह्यांनी या हल्ल्यांबद्द्ल एक अवाक्षरही काढले नाही. तर हत्तींनी त्यांच्या नेहमीच्या संवयीप्रमाणे शाकाहारींनाच शांततेचा उपदेश केला.
थोडक्यांत 'माणसांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या माणसांपर्यंत' हा वर्तुळाकार चाकोरीबध्द प्रवास सर्व जंगलवासीयांच्या नशिबी होता. ते अभागी जीवही , निमूटपणे या रुढ चक्रात फिरतच राहिले!!!
प्रतिक्रिया
10 Aug 2008 - 6:22 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
सदर गोष्ट लोकसत्ता मधे दर रविवारी चतुरंग मधील " दोन फुल एक हाफ " च्या तोडीची आहे.
जबरदस्त !!!!!
( अजुन असेच काही चांगले वाचायची इच्छा असलेला )
संतोष
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
10 Aug 2008 - 6:28 pm | टारझन
मस्त रे .... जबराट घडामोडी चालू आहेत जंगलात... हॉट अँड हॅपनिंग ...
चिअर्स !!
माकडे - लांडगे यांच्यात 'केळ्यांचा घड' प्रकरणावरुन जुंपली होतीच.
गड सॉरी .. घड प्रकरणात जुंपलेला जंगली टार्या !! =))
जरा (जंगली)उंटावरून (जंगली)शेळ्या हाकता हाकता जंगल १ आणि २ ची लिंक मिळेल का ? ;)
जंगल का डॉन कोन ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
10 Aug 2008 - 7:27 pm | स्वाती दिनेश
पहिल्या २ जंगल कथांप्रमाणेच ही सुध्दा जबरदस्त!
स्वाती
टारझन, हे घे दुवे- जंगलकथा १
जंगलकथा २
10 Aug 2008 - 8:54 pm | मदनबाण
जंगलकथा आवडली !!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
11 Aug 2008 - 9:17 am | अनिल हटेला
स्ट्रेट ड्राइव्ह !!
४ रन्स !!
मस्त जमलाये लेख !!!
ताज्या घाडामोडी वर आधारीत !!!
चारा खाऊन माजलेल्या एका गव्याने तर चौफेर टोलेबाजी केली.
सही !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
11 Aug 2008 - 9:21 am | सर्किट (not verified)
थोडक्यांत 'माणसांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या माणसांपर्यंत' हा वर्तुळाकार चाकोरीबध्द प्रवास सर्व जंगलवासीयांच्या नशिबी होता.
१९८४, ऑर्वेल, वगैरे जमेस धरल्यास टुकार लेख.
वरील वाक्यच नव्हे तर, आधीचे तिन्ही भाग डोके शांत ठेवून चांगले बनवता आले असते.
द्राक्षासवाचा अंमल ????
काकांना विचारूया.
- सर्किट
12 Aug 2008 - 8:48 am | हेरंब
आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व धन्यवाद.