मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)
" How much human life lost in wait" या वाक्यावर Indiana Jones (& the kingdom of Crystal Skull) येऊन थांबतो. सिनेमागृहाबाहेर पडताना स्टिवन स्पिलबर्गसारख्या दिग्दर्शकाने एकाच सिनेमात इतक्या घोडचुका कराव्या याचंच राहून राहून आश्चर्य वाटू लागतं? त्याची बखोट पकडून विचारावंसं वाटलं, "बाबा रे, पेरुवियन जंगल दाखवलंस, त्यात तुला केचुआ बोलणारी लोक कुठे भेटली?" पेरुच्या जंगलात हवाईयन धबधबे, माणूस खाणार्या मुंग्या आणि सुप्रसिद्ध नाझ्का (Nazca) लाईन्ससुद्धा? एकवेळ सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली या चुका माफ. पण मायांच्या "चिचेन इत्सा" ला सरळ मेक्सिकोमधुन उचलून थेट पेरुत ठेवलंस ? मायांनी जर का हे बघितलं असतं तर नक्कीच त्याच चिचेन इत्सावर स्टिवन स्पिलबर्गला साग्रसंगीत बळी दयायला कमी केलं नसतं. :-) उद्या कुणी ताजमहाल उचलून श्रीलंका नाहीतर बांग्लादेशात दाखवला तर?
'चिचेन इत्सा' माया संस्कृतीचा मुकुट्मणी. इतिहासप्रेमींच्या दृष्टीने तर पाकालचं पालेंके जर मक्का असेल तर चिचेन इत्सा हे मदीना. दोन्हीचं दर्शन घडणारा भाग्यवान! या लेखात एक सफर माया बांधकामशास्त्र आणि गणित या दोघांचा अद्भभूत मिलाफ असलेलं "चिचेन इत्सा"ची.
चिचेन इत्सा बघण्याआधी थोडं "इत्सा" या माया जमातीबद्दल. इत्सा(Itza) हे युकातान प्रांतात बाहेरुन आलेले लो़क. माया इतिहासात त्यांचं वर्णन 'आई बापाविना", "धोकेबाज" असं केलं आहे. ते नक्किच स्थानिक भाषा जाणत नव्हते कारण काही ठिकाणी त्यांचं वर्णन "People who use our tounge brokenly" असही केलं आहे. ऊत्तरेच्या ताबस्को (Tabasco) कडून आलेले हे लोक युकातानमधे साधारणपणे १२०० च्या सुमारास आले.१२२४-४४ मधे ते Uucil-abnal (Seven Bushes) इथे ते स्थायिक झाले आणि या ठिकाणाचं नामकरण त्यांनी Chichen Itza (Opening of the wells of Itza) असं केलं. Chichen Itza या शब्दाची फोड अशी होते. Chi (Mouth) + Chen (Well) + Itza
मेक्सिकोच्या युकातान प्रांताच्या राजधानीजवळ म्हणजेच मेरिदाजवळ (१) चिचेन इत्सा आहे. पालेंकेच्या र्हासानंतर या माया राजधानीचा उदय झाला. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या भागात त्याकाळी साधारपणे पंचवीस हजाराहूनही जास्त वस्ती असल्याचा अंदाज आहे. हे धर्मिक केंद्र असल्याने या ठिकाणी अनेक धर्मिक समारंभ होत असत.
ही चिचेन इत्साची प्रतिकृती. सुरवात करुया "बॉल कोर्ट" पासुन.
बॉल कोर्ट : चिचेन इत्साचं बॉल कोर्ट हे मेक्सिकोमधलं सर्वात मोठं व सुस्थितीत असलेलं बॉलकोर्ट आहे, 'आय' अक्ष्ररासारखी रचना असलेल्या या बॉलकोर्ट्च्या दोन्ही बाजूला भिंतीवर चित्रं कोरली आहेत. बॉलगेम हा फक्त मनोरंजनासाठी खेळला जात नसून या खेळाला धार्मिक महत्त्वही होत. खेळाच्या शेवटी हरणार्या गटातल्या लोकांचा बळी दिला जाई. (२) बळींमुळे भरभराट होते असा समज असल्याने आपल्या मृत्यूनंतरही आपण आपल्या समाजचं भलं करत आहोत या भावनेतून खेळाडूही बळी जाण्यास उत्सुक असत.
बॉलकोर्टच्या समोरच भिंतीवर खेळाडूंची डोकी कोरलेली आहेत.
Temple of Jaguar - बॉलकोर्ट्च्या शेजारी असलेल्या या मंदीरात काही लढाईची चित्रं कोरलेली आहेत. बहुदा तोल्तेकांबरोबर झालेल्या मायांच्या लढाईची हि चित्रं असावीत. (३)
Sacred Cenote : तिथूनच पुढे दिसणारं निळ्या रंगाचं पाणी म्हणजे पवित्र विहीर. या नैसर्गिक विहिराचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जात असे, धार्मिक कार्यात वापरलेल्या नरबळींचे देह या विहिरीत आणून टाकत असत. या विहिरीत केलेल्या पुरातत्वीय उत्खनात अनेक सांगाडे, सोनं, जेड्च्या वस्तू, मातीची भांडी, शंख, रबर, कपडे अशा अनेक वस्तू मिळाल्या आहेत.
Platform of Venus : शुक्र हा सर्वात जवळचा जवळचा त्यामुळे महत्त्वाचा तारा. त्याचा संबंध पुर्न्जन्माशी जोडलेला. त्यामुळे या ठिकाणी शुक्राच्या तोंडातून माणूस जन्माला येताना कोरला आहे.
आता मुख्य इमारत, "एल कास्तिलो' -
धार्मिक कामासाठी बांधलेला हा पिरॅमिड. तोल्तेकांच्या प्रभावाखाली आल्यानंतर इथे मायांनी कुकुलकानचं (४) मंदिर बांधलं. माया बांधकामशास्त्र आणि गणित यांचा अद्भभूत मिलाफ म्ह्णून या पिरॅमिडकडे पाहीलं जात. मागच्या लेखात आपण माया कॅलेंडर पाहीलं. या कॅलेंडरचा वापर या पिरॅमिड्मधे कसा केला गेला आहे ते पाहू.
या पिरॅमिडचे नऊ टप्पे आहेत. पिरॅमिड्च्या चारही बाजूंना मधून छेदणार्या पायर्या या नऊ टप्प्यांचे २ भाग करतात. त्यामुळे एकूण भाग झाले अठरा. हे वर्षाचे १८ महीने. या चार जिन्यांना प्रत्येकी ९१ पायर्या. त्यामुळे एकूण पायर्या झाल्या ९१ X ४ = ३६४ आणि वरची १ धरुन ३६५ पायर्या. हे झाले वर्षाचे ३६५ दिवस. पिरॅमिडच्या दर्शनी भागात ५२ फरश्या बसवल्या आहेत. मायन्स दर ५२ वर्षांनी नवी कालगणना करीत असत. दर ५२ वर्षांनी आधीच्या पिरॅमिडवर नविन पिरॅमिड बांधला जाई.
या पिरॅमिडचे चार कोपरे पुर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशा अचुकपणे दाखवतात. या अशा रचनेमुळे दर २१ मार्च आणि २१ सप्टेंबर या दोन दिवशी (१२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र) इथे दिसणारा छाया-प्रकाशाचा अद्भभुत खेळ बघायला मिळतो. चित्रात दिसाणार्या जिन्याची कड नीट पाहीली तर ती सरळ नसून उतरत्या जिन्यासारखी असल्याचं आपल्याला दिसेल. तसंच पिरॅमिड्च्या पायथ्याशी सापाचं तोंड कोरलेलं दिसेल. वर उल्लेख केलेल्या दोन दिवशी प्रकाश जेव्हा इथे पडतो तेव्हा ही रचना नागिण असल्यासारखा भास होतो. ऊन जसंजसं खाली येत तसंतसं ही नागिण सळ्सळ्त खाली आल्याचा भास होतो. (खरंतर हा नजारा प्रत्यक्षात पाहिला तर जास्त स्पष्ट होईल) हे खालचं चित्र सळसळत खाली येणार्या नागिणीचं. या रचनेचा वापर धर्मगुरू करित. नागिण पहिल्यांदा खाली आली की पेरणी सुरु होत असे आणि दुसर्यांदा खाली आली की कापणी.
Temple of Warriors : या देवळाचं वैशिठ्य म्हणजे त्याच्यासमोर असलेले १००० खांब. हे Temple of Warriors आणि त्याच्यासमोर असलेले १००० खांब.
या खांबाच्या प्रवेशालाच चॅक या पर्जन्यदेवतेची मुर्ती आहे. युकातान हा पावसाचं दुर्भिक्ष असलेला प्रदेश त्यामुळे बरेच ठिकाणी चॅकचे पुतळे आढळतात. ही चॅकची मूर्ती.
थोडिशी मागे रेलून बसलेली, गुडघे पोटाशी घेतलेली. नरबळी दिल्यावर प्रथम सुर्याला त्याच ह्र्द्य अर्पण केलं जाई आणि त्यानंतर ते चॅकच्या पुतळ्यावर, गुडघ्यावर (तिथे एक सपाट जागा दिसेल) ठेवलं जाई.
El Caracol : ही गोल इमारत म्हणजे वेधशाळा. काराकोल म्हणजे गोगलगाय. या इमारतीच्या चारही दिशांना चॅकचे पुतळे आहेत. चित्रात दिसत असलेले झरोके अवकाश निरिक्षणासाठी वापरले जात. याच झरोक्यांतून धर्मगुरू, ज्योतिषी जनतेला संदेश देत असत.
अकाब स्तिब : या भागातली ही अजून एक रहस्यमय इमारत. साधारणपणे दुसर्या शतकात बांधलेली ही इमारत "अकाब स्तिब" म्ह्णजेच "अबोध लिखण" या नावाने ओळखली जाते. याचं कारण या इमारतीच्या एका दरवाजावर कोरलेलं चित्र. या चित्रात एक धर्मगुरु हातात भांड घेउन उभा आहे, या भांड्यावर कोरलेली अक्षरं हे अजुन पर्यंत न उकललेल एक कोडंच आहे.
चिचेन इस्ताजवळच 'तुलुम' या ठिकाणी मायांचे एकमेव सागरी अवशेष आहेत. तुलुम हे समुद्र्किनारी वसलेलं शहर. तुलुमचा अर्थ "भिंत". हे शहर बंदोबस्तासाठी वसवलेलं. शहरातल्या किल्ल्यावरुन टेहाळणी करता येत असे. समुद्रावरुन हल्ला होण्याची भीती असल्या कारणाने या ठिकाणी काही महत्त्वाच्या कुटुंबांनाच रहाता येई. इथल्या किल्ल्यावर दिसणार्या ज्योतीचा उल्लेख स्पॅनिशांनी आपल्या दस्ताऐवजात केला आहे. हा तो किल्ला.
साधारणपणे इ.स. ९ शतकाच्या सुमारास दक्षिणेकडच्या माया प्रांतात लोकसंख्या वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करण्यासाठी अमाप जंगलतोड सुरू झाली. तसंच त्यांच्या धार्मिक कल्पनांमुळे मोठ्मोठे पिअॅमिड, देवळं बांधण्यासाठीही बरीच जंगलतोड झाली. याची परिणीती अर्थातच निर्सगाचा तोल ढळला. हवामानात झालेल्या मोठ्या बदलांमुळे बरेच रोग पसरले. त्यातच भूकंप, वादळे या सारख्या इतर नैसर्गिक आपत्तींमुळेही लोकसंख्येत मोठी घट झाली आणि हळूहळू ही संस्कृती लोप पावायला सुरवात झाली. मायन्सच्या र्हासाचं अजून एक कारण दिलं जातं ते म्हणजे अंतर्गत युद्ध . वेगवेगळ्या माया जमातींमधे सतत युद्ध सुरु असत. युद्धात माणसं मारली जात तसंच हरणार्या टोळीचाही नरबळी जात असे, सतत होणारी युद्ध, उपसमार, अन्नाची कमतरता यामुळे काही मायन्स सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले. बरेच माया ग्रंथांची स्पॅनिशांनी जाळपोळ केल्याने माया संस्कृतीतल्या अनेक गोष्टी न उलगडणारी कोडं बनून राहीली आहेत. इतर संस्कृतींबरोबर तुलना केल्यास कदाचित मायन्सच्या कल्पना, देव, समजुती थोड्या अघोरी, रानटी वाटतील पण प्राचीन जगातली ती एक अदभूत संस्कृती होती. खरंतरं मारुतीच्या शेपटीसारख्या न संपणार्या त्यांच्या अनेक कथा. अनेक माया राजधानी , शहरे, कलाकृती यांच अपरिमित भांडार आंतरजालावर उपलब्ध आहे. उत्सुकतेपोटी जे काही वाचन झालं ते तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न या तीन लेखात मी केला. तुर्तास मायांना इथेच विराम देऊ.
पुढ्च्या भागात - तोल्तेक आणि मिहतेक
चिचेन इस्ताचं कल्पनाचित्रः
बॉलकोर्ट मधे असलेली रींग
बॉलकोर्ट लगतच्या भिंतीवरील चित्र :
चिचेन इत्साजवळ असलेलं अजून एक माया शहर उष्माल मधले हे चॅकचे मुखवटे:
***
टीपा :
१) मेरिदा: ही युकातानची राजधानी. प्राचीन काळापासून इथे माया वस्ती आहे. अर्नान कोर्तेसने मेक्सिकोत पाऊल ठेवलं तेव्हा त्याचं सगळं लक्ष आस्तेक साम्राज्याकडे लागलं होतं. त्यामुळे मेरिदामधे असलेल्या मायन्सवर त्याने चाल केली नव्हती. आस्तेकांचा पाडाव केल्यावर स्पॅनिशांचं लक्ष मेरिदाकडे गेलं. तिथल्या मायांमधे फूट पडलेली पाहून स्पॅनिश सेनानी फ्रान्सिस्को मोंतेहोने मेरिदावर चाल केली. हे शहर पाहून त्याला स्पेन मधल्या मेरिदा या शहराची आठवण झाली. त्याने या शहराचं 'तिहो' हे नाव बदलून मेरिदा असं केलं.
२) नरबळी : बॉलगेममधे बरेचदा जिंकणार्या टोळीचा बळी दिला जात असे परंतु काही ठिकाणी हरलेल्या टोळीचा बळी देण्याची प्रथा होती.
३) माया-तोल्तेक लढाई : चिचेन इत्सामधे असलेलं चित्र हे माया आणि तोल्तेक या दोन संस्कृतींचा मेळ दाखवणारं. तोल्तेकांचा पुढे बराच प्रभाव मायांवर पडलेला दिसतो.
४) कुकुलकान: तोल्तेकांचा र्हास व्हायला लागल्यानंतर त्यांचा राजा 'केत्झलकोएत्ल' पुर्वेला माया प्रांतात आला. मायांनी सर्पपूजेची कल्पना तोल्तेकांकडून उचलली. पुढे केत्झलकोएत्ल हा तोल्तेक पिसांचा साप मायांचा "कुकुलकान" हा देव झाला.
प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत.
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Ancient Wisdoms - Gayle Redfern
३) Lost Civilization (Parragon Books)
४) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
५) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
प्रतिक्रिया
17 Jun 2012 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! ही लेखमालिका एकंदरीतच उच्च होत आहे. आणि ती पातळी मेन्टेन करणारा हा अजून एक भाग! हेमांगीके, शतशः धन्यवाद! _/\_
18 Jun 2012 - 12:10 pm | रमताराम
असेच बोल्तो. झकास.
18 Jun 2012 - 4:54 pm | राजघराणं
मी पण
20 Jun 2012 - 6:47 am | एमी
+१ मी पण
17 Jun 2012 - 6:46 pm | ५० फक्त
पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद...
17 Jun 2012 - 7:28 pm | पैसा
वाट बघण्यासारखं लिखाण होतंय.
17 Jun 2012 - 7:39 pm | मन१
मालिका उत्तमच. काही शंका आहेत त्या शा:-
Platform of Venus : शुक्र हा सर्वात जवळचा जवळचा त्यामुळे महत्त्वाचा तारा. त्याचा संबंध पुर्न्जन्माशी जोडलेला. त्यामुळे या ठिकाणी शुक्राच्या तोंडातून माणूस जन्माला येताना कोरला आहे.
शुक्र हा सर्वात जवळचा तारा हे मानावाला नक्की कधी समजलं असावं? विशेष्तः इतर जगाशी संपर्क ना आलेल्या मायन्सना हे खरोखर समजलं असावं काय?
तुलुमचा अर्थ "भिंत". हे शहर बंदोबस्तासाठी वसवलेलं. शहरातल्या किल्ल्यावरुन टेहाळणी करता येत असे. समुद्रावरुन हल्ला होण्याची भीती असल्या कारणाने या ठिकाणी काही महत्त्वाच्या कुटुंबांनाच रहाता येई.
म्हणजे? नौकानयन ह्यांच्यक्डं उपलब्ध होतं का? नक्की कशा प्रकारचं होतं? किती दूरवर हे जाउ शकत? ह्यांच्यावर स्पॅनिशांपूर्वीही कुणी समुद्री आक्रमणं केलित का काय? करणारे कुठून आले?
.
.
.
.
बरेच माया ग्रंथांची स्पॅनिशांनी जाळपोळ केल्याने माया संस्कृतीतल्या अनेक गोष्टी न उलगडणारी कोडं बनून राहीली आहेत
उर्वरित जगाशी काहिच संबंध न आलेल्या मायन्स कडेही "ग्रंथ" अशी संकल्पना होती काय? आय मीन, ती कशा प्रकारची होती? पुस्तके/कागद कशापासून बनवत? शाई कशाची वापरत? मुळात ही संकल्पना एका स्वतंत्रपणे नांदणार्या लोकसमूहात अगदि पॅरलली आलीच कशी हेच एक आश्चर्य वाटते.
18 Jun 2012 - 11:50 am | किलमाऊस्की
तुमच्या प्रश्नामुळे लक्षात आलं.
मेसोअमेरिका प्रांताच्या अक्षांश - रेखांशावर रोज सकाळी एक लुकलुकणारा तारा उगवतांना माया पहात. नक्कीच त्यांना तो शुक्र आहे असा ठाम माहित नसलं तरी नुसत्या डोळ्यांनी दिसणारा हा तारा त्यांना आकर्षित करीत असे.
अर्थातच. अवकाश निरिक्षणासाठी झपाटलेल्या मायांना शुक्राचं भ्रमण माहित होतं. मागच्या भागात जे कॅलेंडर आपण पाहिलं ते शुक्राच्या गतीवर आधारलेलं होतं. त्यांच्या अनेक संकल्पना शुक्राच्या भ्रमणावर आधारलेल्या होत्या. कुठल्याही साधनांशिवाय नुसत्या डोळ्यांनी केलेल्या निरिक्षणांवरुन अनेक गोष्टी त्यांनी अचूक लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या ड्रेस्डेन कोडेक्समध्ये सूर्य - चंद्र ग्रहणे, शुक्राचं भ्रमण, तसंच गुरु(३९९ दिवस) , शनी(३७८ दिवस) भ्रमणे त्यांनी अचूक लिहिलेली आहेत. त्यांना सुर्य, चंद्र, शुक्र, मंगळ, आकाशगंगा माहीती होत्या. पॅरिस कोडेक्समधे या तार्यांवर आधारलेल्या राशींचीही सविस्तर माहीती आहे.
थोडं तुलूमबद्दलः
तुलूम : तुलूम हे माया शहर हे जरा अलीकडचं म्हणजे साधारण इ.स. १२०० च्या आसपासचं. इ.स. १३-१५ व्या शतकात ते प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर होतं. पोस्ट क्लासिक माया काळातलं ते एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र. तुलुमच्या किनार्यावर व्यापारी छोट्या नावेतून (canoes) येत असत. लेखात ज्या किल्ल्याचा उल्लेख केलाय तो किल्ला खरंतर दीपगृहाचं काम करी. पोस्ट क्लासिक काळात मायांनी व्यापारासाठी या Canoes वापरायला सुरवात केली. ४० ते ५० फुट लांब असलेल्या या Canoes मुख्यत्वे महोगानी किंवा तत्सम उष्ण्कटीबंध प्रदेशात मिळणार्या कठीण अशा लाकडापासून बनवीत असत. या पाण्यावर तरंगू शकणार्या Canoes माया व्यापारी जगतात खरंच क्रांतिकारक ठरल्या. कारण या Canoes च्या शोधाआधी व्यापारासठी मुख्यत्वे वस्तू माणसांच्या खांद्यावरून वाहून नेत असत. (हत्तीसारखा प्राणी त्या भागात उपलब्ध नव्हता. घोडा स्पॅनिशांनी प्रथम या भागात आणला) या छोट्या होड्यांमुळे माया व्यापार साधाराणपणे मेक्सिकोच्या अखातातापासून युकतानपर्यंत पसरला. तसंच तो आजच्या होन्डुरास, कोस्टारिका, पनामापर्यंतही असावा असा अंदाज आहे.(तसे पुरावे मिळाले आहेत.)
तसे पुरावे तरी नाहीत अजून. स्पॅनिश हेच पहिले या प्रांतात पाय ठेवणारे. परंतु माया जमातींच्या आपापसातच लढाया होत. त्यामुळे कदाचित आपल्याच लोकांकडून आक्रमणाच्या भीतीने समुद्रावर हा किल्ला बांधला आसवा. जसं प्रत्येक सागरी किनारर्यावर संरक्षणासाठी किल्ला असतोच.
काही चित्रे :
Temple of the Warriors मधलं तोल्तेकांचं एक चित्र.
नावेचं वल्हं:
अधिक माहीती : http://www.pnas.org/content/102/15/5630.full
हो , ग्रंथ ही संकल्पना होती. कागदाचा शोध जरी सर्वप्रथम चीनमधे लागला असला तरी (आणि त्यांनी हे गुपित जगापासून जवळजवळ ४०० वर्ष लपवून ठेवलं असलं तरी) मायांकडे कागद होते, शाई होती. या प्रश्नाचं उत्तर लिहायला घेतलं पण जरा मोठं होतय. त्यामुळे सविस्तर उत्तरासाठी स्वतंत्र लेखात लिहित आहे. २-४ दिवसात पोस्ट करेन.
20 Jun 2012 - 6:05 pm | किलमाऊस्की
तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलंय.
17 Jun 2012 - 7:45 pm | मदनबाण
माझे काही भाग वाचायचे राहिले आहेत ! :(
माहितीपूर्ण लेखन मालिका... :)
17 Jun 2012 - 8:45 pm | मुक्त विहारि
सुंदर, अप्रतिम , वगैरे वगैरे...
17 Jun 2012 - 10:13 pm | शिल्पा ब
http://www.youtube.com/watch?v=yeTgt9AVMhE
हा युट्युबवर सापडलेला कुकुलकानचा व्हीडीओ. १.१६ पासुन लोकं पळापळी करतात तिथुन पहा.
लेख छानच. एक प्रश्न : तुम्ही म्हणालात की मायन्स ५२ वर्षांनी एकावर दुसरा पिरामिड चढवायचे. तसा पिरामिड कुठे सापडला का? कारण वरचा फोटोत जो आहे त्यावर दुसरा बांधला तर दोन्हीच्या मधे एक चौकोनी सपाट बेस (पहील्याचा माथा) असणार अशी माझी कल्पना. जर कुठे असेल तर त्याचं नाव किंवा फोटो वगैरे देता का?
18 Jun 2012 - 12:04 pm | किलमाऊस्की
हो. या पिरॅमिड्च्या आतही अजुन एक पिरॅमिड आहे. वरचा पिरॅमिड दुसरा आहे. पिरॅमिड्च्या आत चिंचोळी वाट जाते. अगदी खाली जॅग्वारचं एक आसन आहे. तसंच कुकुलकानचं देऊळ आहे. जे तोल्त्कांच्या प्रभावानंतर बांधलं गेलं.
हे जॅग्वारचं आसनः
आतल्या पिरॅमिड्चा फोटो नाही पण कल्पना येण्यासाठी हे चित्र :
हा एक व्हिडीयो आतल्या भागाचा: http://www.youtube.com/watch?v=JUKhfh-0W2k
18 Jun 2012 - 12:42 pm | शिल्पा ब
धन्यवाद. मला वाटलं होतं की बिल्डींगसारखं एकावर एक असलेलं पिरॅमिड की काय. हे एकाच्या बाहेर दुसरं असं आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
चीनमधे कागदाचा शोध कसा लागला, तो शोध त्यांनी दडवुन का अन कसा ठेवला वगैरे वाचायला आवडेल.
18 Jun 2012 - 8:34 am | प्रचेतस
अद्भूत आहे सगळं.
18 Jun 2012 - 9:41 am | तिमा
आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचल्याने फार आनंद मिळाला. लेखमाला संग्राह्य होत आहे.
18 Jun 2012 - 10:34 am | ऋषिकेश
हा भाग सर्वार्थाने हुच्च झाला आहे. :) नवी माहिती मिळाली!
अनेक आभार.
लेखमाला उत्तम चालु आहे.. पुलेशु
18 Jun 2012 - 12:27 pm | बॅटमॅन
निव्वळ अप्रतिम लेखमाला. पिरॅमिड्स पाहून अपोकॅलिप्टो पिच्चरची आठवण झाली आणि अंगावर काटा आला.
18 Jun 2012 - 9:30 pm | Keanu
उत्तम चालु आहे...