मागील भाग : "मेसोअमेरिका(६) - आस्तेक "
२५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं.
'झोकालो'(१) च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. युनेस्कोने या स्थळाला १९८७ मध्ये आपल्या यादीत स्थान दिलं. मेक्सिको सिटीच्या भूभागात लपलेली ही जागा होती आस्तेकांनी वसवलेलं शहर 'तेनिच्तीत्लान'.
खोदकाम करतांना सापडलेला दगडी अवशेष होते एका मंदिराचे, 'तेंप्लो मायोर'चे (२). त्याचं झालं असं, स्पॅनिशानी सत्ता काबीज केल्यावर धर्मप्रचाराचा भाग म्हणून आस्तेकांच्या सर्व खुणा पुसून टाकायला प्रारंभ केला. यातच बळी पडलं आस्तेकांचं सुंदर शहर तेनिच्तीत्लान. कोर्तेसने त्याच्या बाजूने हरतऱ्हेने प्रयत्न करून या शहरची धूळधाण उडवली. पण या शहराचं बांधकाम इतकं प्रचंड होतं की ते संपूर्ण नामशेष करणं त्याला शक्य झालं नाही. शहराचा बराचसा भाग जमिनीत गडप झालेला होता किंबहुना आजही बराचसा भाग अज्ञात आहे.
तेंप्लो मायोर :
हे तेंप्लो मायोरचं कल्पनाचित्र आहे. प्रत्यक्षात त्याचे फारच कामी अवशेष शिल्लक आहेत. आस्तेकांच्या धार्मिक कार्याच्या दृष्टीने तेंप्लो मायोरचं महत्त्व फार. तेंप्लो मायोर हे खरं तरं स्पॅनिशांनी दिलेलं नाव. आस्तेक या देवळाला 'कोतेपेक' म्हणजेच 'सर्पांची टेकडी असं संबोधत. देवळाचा मधोमध गोल आकारात 'केत्झ्ल्कोत्' या सर्पदेवाचं देऊळ होतं आणि त्यापुढे Huitzlipochtli म्हणजेच सुर्यदेवाचा भलामोठा पिरॅमिड. आतून मातीने बनलेल्या या पिरॅमिडवर वरून विविध रंगाच्या फारश्या बसवलेल्या होत्या. साधारण १०० फुट उंच असा हा पिरॅमिड एकावर एक असा सात टप्प्यात बांधला गेला. प्रत्येक आस्तेक राजा सत्तेवर आल्यावर जुन्या पिरॅमिड्वर नवीन पिरॅमिड बांधून विस्तार करत असे. पिरॅमिड्च्या आसपास बोल कोर्ट तसंच धर्मगुरुंच्या निवासची सोय होती.
या पिरॅमिडच्या डाव्याबाजूस कवट्यांची भिंत होती तिला 'त्सोम्पान्त्मी" अस म्हणतं. नरबळीचे मस्तक या भिंतिंवर खोचले जाई. ही तेंप्लो मायोर मधली खर्या कवटयांची भिंत.
तेंप्लो मायोरचं आस्तेक समाजजीवनातलं महत्त्व अधिक जवळून समजून घेण्यासाठी आस्तेकांच्या धार्मिक परंपरा समजून घेऊ. आस्तेक लढवय्ये, शूर होतेच पण त्यांच्यावर धर्माचा पगडा खूपच जास्त होता. धर्मगुरू हे सर्वेसर्वा. अगदी राजावर ही त्यांची सत्ता चाले. मूल जन्माला आल्यापासून धार्मिक रीतीरिवाज चालू होत असत. जन्मलेलं मूल जर मुलगा असेल तर त्याला लहानपणापासून सैनिकी शिक्षण देण्यात येई. कारण समाजात सैनिकाचा मान मोठा. धार्मिक रीतीरिवाजांचं शिक्षण देवळात धर्मगुरुंच्या देखरेखीखाली होई. त्यामुळे एकूणच धार्मिक गोष्टी लहानपणापासुन मनावर बिंबवल्या जात. सैनिकी शिक्षण घेताना शारीरिक यातना सहन करण्याचं शिक्षणही त्यांना देण्यात येई.
आस्तेक मुख्यत्वे युद्ध राज्यविस्तारासाठी न करता युद्धकैदी मिळवण्यासाठी करीत. युद्धात हारजीत महत्त्वाची नसून जास्तीत जास्त युद्धकैदी पकडून आणणाऱ्या सैनिकास मान मिळत असे. युद्ध करताना शत्रुपक्षातील सैन्याला ठार न मारता शक्य तितक्या इजा करून जेरबंद करायचं अशी योजना असे. मग असे जायबंदी झालेले युद्धकैदी देवापुढे बळी देत असत. मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आस्तेक समजुतीनुसार आजवर पाच सूर्य झाले. त्यातले चार सूर्य इतर देवांशी लढताना नाश पावले. आताचा सूर्य हा पाचवा सूर्य आणि त्याचं रक्षण करणं हे आदयकर्तव्य. सूर्याला जास्तीत जास्त बळी देऊन सामर्थ्यवान बनवणं हे प्रत्येक आस्तेकाचं जीवितकार्य मानलं जाई.
तेंप्लो मायोरच्या मधोमध असणार्या पिरॅमिडवर सूर्यदेवाचं देऊळ होतं. युद्धकैद्यांचे बळी तिथे दिले जात. बळी देण्याचा विधी धर्मगुरुंच्या आज्ञेप्रमाणे व रितिरिवाजांनुसार होत असे. पकडून आणलेलं युद्धकैदी खास सणांसाठी राखून ठेवत ज्या सैनिकाने युद्धकैदी आणला असेल त्याच्या घरी साध्या सैनिकी वेशात कैदयाला पिंजर्यात डांबून ठेवलं जाई. त्याचा मालक त्याची देखभाल करे. त्याच्या जखमा भरल्या जात, त्याला भरपूर खायला देत. असा कैदी घरात असणं ही प्रतिष्ठेचं बाब. कैद्याची योग्य ती देखभाल केल्यानंतर सणाच्या दिवशी त्याला सजवून वाजतगाजत यात्रा काढून त्याला मुख्य पिरॅमिडवर नेत. तिथल्या एका मोठ्या चौथऱ्यावर त्याला आडवं झोपवलं जाई. धर्मगुरू मंत्रपठण करीत. चार धर्मगुरू बळीचे हातपाय पकडीत तर पाचवा धर्मगुरू डोकं. सहावा धर्मगुरू युद्धकैद्याची छाती फाडून त्याचं हृद्य बाहेर काढी. हे थडथडतं ताज हृद्य सुर्याला अर्पण केलं जाई.
ह्र्दय काढल्यानंतर उरलेला देह पिरॅमिड्वरून खाली ढकलून देण्यात येत असे, ज्यामुळे शरीरातील रक्त जमिनीवर सांडून धरणी सुजलांसुफलां होईल असा आस्तेकांचा समज होता.
हे मृत शरीर पिरॅमिड्च्या पायर्यांवरुन गडगडत खाली आलं की ते पुन्हा वाजत गाजत मालकाच्या घरी नेलं जातं असे. त्याचे रीतसर तुकडे केले जात. धड वेगळं करून नरभक्षक पशुपक्ष्यांना दिलं जात असे. शीर वेगळं करून भिंतीत लावण्यासाठी देवळात देत असत आणि हातपाय मालकाच्या घरी मेजवानीसाठी वापरात असत. पंजाचा मांसल भाग चवदार म्हणून खास पाहुण्यांसाठी राखून ठेवला जाई. आता उरलं ते प्रेताचं कातडं. मालक ते स्वत:भोवाती गुंडाळत असे. या सर्व प्रकाराला Cannibalism असंही म्हणतात.
निरनिराळ्या प्रसंगासाठी बळी राखून ठेवले जात. सुर्यग्रहणच्या दिवशी ग्रहण लवकर सुटण्यासाठी अपंग, कुबड आलेल्या माणसाचा बळी देण्यात येत असे तर Tezcatlipoca या देवासाठी तरुणाचा. या देवाला बळी देण्यासाठी वर्षभरआधी सुंदर, तडफदार तरुणाचा शोध घेण्यात येत असे. त्याला अकरा महिने राजासारखं वागवत. उत्तमोत्तम खाणंपिणं, तैनातीला सेवक अशी उत्तम बडदास्त ठेवण्यात येत असे. बाराव्या महिन्यात त्याच्या दिमतीला चार सुंदर स्त्रिया दिल्या जात आणि बाराव्या महिन्याच्या शेवटी वाजतगाजत त्याला बळी देण्यासाठी देवळात नेण्यात येत असे.
त्लालोक देवासाठी दोन भोवरे असलेली मुलं बळी देत असत तर काही क्वचित प्रसंगी बायकांचा बळी दिला जाई. मात्र तो गळा दाबून आणि त्यासाठी महिला धर्मगुरू असत. लहान मुलांचा बळी मुख्यत्वे पर्जन्यदेव tlaloques याच्यासाठी दिला जात असे. बळी देत असताना लहान मुलं घाबरून रडू लागत. मुलं जितक्या जोरात रडेल तितका जोरात पाऊस पडेल असा आस्तेकांचा समज होता.
आता या सर्व वर्णनावरून नकीच असा प्रश्न पडेल की हे सर्व कशासाठी? या प्रकाराला कोणी प्रतिकर का नाही केला. तर याला उतर एकच 'धर्म'. एकदा का धर्मात एखादी गोष्ट सांगितली की ती करणं क्रमप्राप्त. कुठल्याही प्रकाराला विरोध करणं म्हणजे समाजाच्याचं नाही तर देवाच्या विरुद्ध जाणं. स्वत:हून हसत हसत मरण कवटाळणं म्हणजे पुरुषार्थ. मृत्युनंतरचं जीवन म्हणजे स्वर्गात पोचणं आणि एकदा का स्वर्गप्राप्ती झाली की कोणतचं दुख: उरत नाही. आस्तेक आईवडीलांवर धर्माचा पगडा इतका जबरदस्त होता की बळीसाठी आपलं मूल देणं हे त्यांना कर्तव्य वाटत असे. एकदा का मूल त्लालोक देवाकडे पोचलं की सर्व चिंता मिटली. स्वर्गात स्तनाची फळं असणारा वृक्ष आहे त्यामुळे आपल्या मुलांची दुधाची सोय आपसूकच होईल असा सार्वत्रिक समज होता. तसचं नरबळींना देवदूत मानलं जात असे. एकूणचं समाजावर कैक वर्षे कट्टर धार्मिक विचारांचा पगडा असल्याने या प्रथा स्पॅनिश आक्रमणापर्यंत चालू राहिल्या.
क्रमशः
'Florentine Codex' मधिल आस्तेक कैदी :
खोदकाम करताना वीजकामगारांना मिळालेला दगडी अवशेष :
Cannibalism
तेंप्लो मायोर : डावीकडे मूळ तेंप्लो मायोरचं कल्पनाचित्र आणि उजवीकडे आत्ताचे अवशेष
टिपा :
१] झोकलो : मुख्य चौक. मेक्सिको सिटीमधलं हे एक मुख्य ठिकाण.
२] तेंप्लो मयोर : Templo- देऊळ Mayor- महान
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Everyday Life of Aztecs - Warwick Bray
४) Lost Civilization (Parragon Books)
५) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
६) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
प्रतिक्रिया
19 Jan 2013 - 12:21 am | वसईचे किल्लेदार
वाचतोय ...
19 Jan 2013 - 8:55 am | प्रचेतस
खूप माहितीपूर्ण.
तेंप्लो मायोर मधल्या कवटया आता अश्मीभूत झालेल्या दिसत आहेत.
अपोकॅलिप्टो आणि १०००० बीसी ची आठवण झाली.
19 Jan 2013 - 9:16 pm | धमाल मुलगा
मस्त चाललीये मालिका!
हावरटासारखं एका बैठकीत सगळे भाग वाचून काढले. खूप दिवसांनी असं काहीतरी माहितीपुर्ण आणि रंजक वाचायला मिळालं. इतक्या दिवसांनी मिपावर आल्याचं सार्थक झालं.
धन्यवाद. ही उत्तम मालिका आम्हाला वाचायला देण्याबद्दल आभार!
19 Jan 2013 - 9:34 pm | मुक्त विहारि
सुंदर...
20 Jan 2013 - 7:27 pm | कवितानागेश
ती कवट्यांची भिंत बघून अंगावर काटा आला.
उत्तम चालली आहे लेखमालिका.
21 Jan 2013 - 9:27 am | किलमाऊस्की
हो, त्या प्रत्यक्षात बघणं भीतीदायक वाटू शकतं. प्रत्यक्षदर्शी स्पॅनिश सैनिकांनी अशा भिंतींची वर्णनं लिहून ठेवली आहेत. अशाच एका भिंतीवर स्पॅनिशांनी जवळजवळ ६०००० कवट्या मोजल्या होत्या. कवटीच्या कानातून सळी आरपार घालून भिंतीमधे खोचत असत. या कवटया साधारणपणे युद्धकैदी किंवा बॉलगेममधे जिंकलेल्या खेळाडूंच्या असत. भिंतीत कवट्या खोचण्याची प्रथा आस्तेकांच्या आधी तोल्तेक आणि मिहतेकांपासून सुरू झाली. अशा प्रकारे बळी जाऊन स्वतःची कवटी भिंतीत खोचूण घेणं फार प्रतिष्ठेचं मानलं जाई. असं मरण म्हणजे देवाची सेवा करायची संधी मिळणं असा आस्तेकांचा समज होता. आस्तेक कोडेक्स मधलं हे एक Skull Rack चं चित्र :
21 Jan 2013 - 1:33 pm | धमाल मुलगा
ह्यापेक्षा आपल्यकडच्या क्रूर, रानटी अश्या गणल्या गेलेल्या प्रथा अगदीच फिक्या पडाव्यात.
अशा अकाली मृत्यूमुळे कमी होणार्या लोकसंख्येचा प्रश्न त्यांना पडत नसे काय? की लोकसंख्या नियंत्रणरणाचा भाग म्हुन अशा प्णथा सुरु केल्या असाव्यात? (तशी शक्यता कमीच वाटते, पण तरी प्रश्न पडलाच.)
22 Jan 2013 - 10:56 am | किलमाऊस्की
नाही, नरबळी देण्याचं मुख्य कारण धार्मिक प्रथाच. आस्तेकांच्या वैभवशाली काळात तेनिच्तीत्लानची लोकसंख्या जवळजवळ १० लाखांच्यावर होती. आस्तेक राजे बरेचदा आसपासच्या राज्यांवर आक्रमण करून भूभाग जिंकून घेत असत. मग जिंकलेल्या राजांकडून नरबळी देण्यासाठी युद्धकैदी मागून घेत असत. अनेकदा बरेच युद्दकैदी गोळा करून जिंकलेल्या राजाचं राज्य परत केलं जाई. तसचं या प्रथा आस्तेकांनी सुरू केल्या नसून त्या फार पुर्वीपासून अस्तित्वात होत्या फक्त आस्तेकांच्या राज्यात त्या जास्त फोफावल्या. सुरवातीला असे बळी क्वचित दिले जात. परंतु १५ व्या शतकात भयंकर असा दुष्काळ पडला. हा सूर्यदेवाचा प्रकोप असं मानून आस्तेकांनी शेजारच्या राज्याशी लढाई करून अनेक बळी दिले. कालांतराने ऋतुमान बदललं. परिस्थिती सुधारली आणि त्याचं श्रेय सुर्यदेवाला देऊन बळीची प्रथा तशीच चालू राहीली. पुढे स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने त्याच प्रथांचा वापर मोठ्या खुबीने आस्तेकांविरुद्ध कसा केला ते पुढ्च्या काही लेखांमधे येईलच.
24 Jan 2013 - 11:21 pm | अग्निकोल्हा
Apocalypto (2006) बघितला असल्याने... लेख रंजक वाटला.
26 Jan 2013 - 1:58 am | आनन्दिता
बापरे!! वाचून काटाच आला अंगावर!
इतक्या अभ्यास पुर्ण लेखांबद्दल तुमचं मनापासुन अभिनंदन!!!
31 Jan 2013 - 10:41 pm | किलमाऊस्की
या मालिकेतील पुढचा व अंतिम भाग - मेसोअमेरिका (६.२) - आस्तेक