मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
12 May 2012 - 9:20 am

मी इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय ही नाही. परंतु इतिहासाची प्रचंड आवड आणि बरीचशी उत्सुकता यातून जे वाचन घडते त्यातील काही माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या लेखात काही त्रूटी आढळल्यास नजरेस आणून देणे. हा लेख कुठल्याही एका मेसोअमेरीकन समाजाची विस्तृत माहिती नसून मेसोअमेरिकन जगाची छोटीशी तोंडओळख आहे.
****************************************************************

स्पॅनिश सेनानायक आर्नान कोर्तेसने मेक्सिकोत आस्तेकांचा पराभव केल्यानंतर सोनं, दुर्मिळ खजिने, पिसांचे सुंदर भरतकाम केलेल्या वस्तू युरोपात पाठवायला सुरवात केली. स्वप्नातही न पाहिलेल्या अशा अमूल्य वस्तू, हिरे, खजिने पाहून युरोपात आश्चर्याची लाट पसरली. कोर्तेसच्या या भेटींनी युरोप खंडाला नव्या मेसोअमेरिकन जगाची ओळख करून दिली. तर मग नक्की कोण होते हे मेसोअमेरिकन’?

मेसोअमेरिका’ – तज्ज्ञांनी “मेसोअमेरिका” हे नाव दोन गोष्टींना दिले आहे.

१) ऐतिहासिक दृष्टीकोनातून – मेसोअमेरिका अंतर्गत सुमारे २२००० हजार वर्षांचा कालखंड विचारात घेतला जातो. ख्रिस्तपूर्व २१००० वर्षांपूर्वी जेव्हा पहिला मनुष्य या भागात स्थलांतरित झाला ते आस्तेकांच्या पाडावापर्यंत म्हणजेच इसवी सन १५२१ पर्यंतचा कालखंड.

२) भौगोलिक दृष्टीकोनातून - अमेरिका खंडातील प्रदेश जेथे प्री-कोलंबियन समाज उदयास आला. भौगोलिकरित्या साधारणपणे यात मेक्सिको, बेलीसे, ग्वाटेमाला, साल्वादोर, होन्डुरास, निकारागुआ व कोलोम्बिया हे देश येतात. मेक्सिको हा मेसोअमेरिकेतील एक महत्त्वाचा प्रदेश मानला जातो.

या लेखात मेसोअमेरिका समाजातील रुढी, धार्मिक समजुती, संस्कृती, समाजजीवन याची आपण ओळख करून घेणार आहोत. परंतु त्या आधी जाणून घेऊया मेसोअमेरिकन जमाती नक्की होत्या तरी किती आणि इतक्या वर्षांनंतरही आजच्या जगाला त्यांची माहिती कशी ठाऊक झाली .

प्रमुख मेसोअमेरिकन जमाती खालील प्रमाणे :

१) ओल्मेक (१५००-१२०० ख्रिस्तपूर्व) - साधारणपणे आपल्याकडे ऋग्वेद, उपनिषदे लिहिल्याचा काळ.
२) त्सापोतेक (साधारपणे ख्रिस्तपूर्व ५००) - साधारपणे आपल्याकडे गौतम बुद्धाचा काळ
३) माया (४०० ख्रिस्तपूर्व – २०० इसवी सन ) - पाणिनीने संस्कृत व्याकरण लिहिल्याचा, चंद्रगुप्त मौर्य, राजा अशोकाचा, अजिंठा लेण्यांचा काळ
४) तोल्तेक (साधारणपणे इसवी सन ९००)
५) चीचीमेक (साधारपणे इसवीसन ११५०)
६) तोतोनाक
७) आस्तेक (इसवी सन १२००-१५२१) - साधारपणे आपल्याकडे ज्ञानेश्वर, गुरु नानकसिंग, पानिपतची पहिली लढाई , बाबरचा काळ
(वरील सनावळी/कालखंडात चूक आढल्यास कृपया चू.भू.दे.घे.)

या सर्व जमातीमध्ये माया आणि आस्तेक खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांच कामही तितकच अतुलनीय आहे.

आस्तेकांचा पाडाव केल्यानंतर स्पॅनिश धर्माप्रचारक मेसोअमेरिकन भागात आले. सत्ता हातात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम धर्मप्रचार हाती घेतला. स्पॅनिश सेनानी आर्नान कोर्तेसचा पूर्ण पाठींबा या धर्मप्रचारास होता. त्याची ठाम समजूत होती की आस्तेकांच्या नृशंस रुढींचा बिमोड करून ख्रिश्चन धर्म प्रस्थापित करण्यासाठी आपली देवाने योजना केली आहे. स्पॅनिश धर्माप्रचाराकांनी मेसोअमेरिकन लोकांचा मूळ धर्म धाब्यावर बसवला. मंदिरे मोडून त्याठिकाणी चर्च उभी केली. लोकांना ख्रिश्चनन धर्माची सामुदायिक दीक्षा घ्यायला लावली. ज्यांनी विरोध केला त्यांची कत्तल केली. त्यांच्या नरबळी सारख्या प्रथा हिंस्त्र मानून साम-दाम-दंड-भेद हरतऱ्हेचा वापर करून त्यांच्या ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली.

या सर्व प्रकारात बिशप दिएगोची प्रतिक्रिया फारच महत्त्वाची वाटते. तो आपल्या “Report of things in Yukatan” या पुस्तकात लिहितो “These people used certain letters with which they wrote in their books about ancient subjects. We found any books written with these letters and since they held nothing that was falsehood and the work of the evil one, we burned them all.“ अशा रीतीने इतिहासातला मौलिक ठेवा लोप पावला.

या सर्व धामधुमीतून काही माया हस्तलिखिते बचावली. त्यापैकी ४ ती ज्या शहरात ठेवली आहेत त्या शहरांच्या नावावरून ओळखली जातात. ती अनुक्रमे ड्रेस्डेन(जर्मनी), माद्रिद(स्पेन), पॅरिस(फ्रांस) व ग्रोलीएर (दक्षिण अमेरिका) अशी आहेत. या हस्तालिखीतांमधून त्या वेळच्या माया संस्कृतीची बरीचशी माहिती उपलब्ध होते. या हस्तलिखितात माया देव-देवतांची चित्रे, सूर्य-चंद्र ग्रहण, शुक्राची गती, त्यावेळच्या रुढी, भविष्यात घडणार्‍या घटना इत्यादी माहिती सविस्तर दिली आहे.

अजून एक माया ग्रंथ या धुमश्चक्रीत वाचला तो म्हणजे “The Popol Vuh” (Book of Advice). दक्षिण अमेरिकेत ग्वाटेमाला जवळ वास्तव करणारे माया लोक म्हणजेच किंचे (Quinche ) या लोकांचा हा पवित्र ग्रंथ होता.या ग्रंथांचे थोर नशीब आणि किंचे लोकांचा दृढनिश्चय या दोन गोष्टी या ग्रंथाच्या बचावासाठी उपयुक्त ठरल्या. मूळ चित्रलिपीमध्ये असणारा हा माया ग्रंथ किंचे लोकांनी गुप्त रीतीने साधारण इसवी सन १५०० च्या सुमारास रोमन वर्णलिपिमध्ये भाषांतरित केला. इसवी सन १७०३ मध्ये हा भाषांतरीत ग्रंथ फ्रेच भिक्षु फ्रान्सिस्को सिमेनेस (Fransisco Ximenez) याच्या हाती लागला . फ्रान्सिस्कोला किंचे लिपी अवगत असल्याने त्याने तो स्पॅनिशमध्ये भाषांतरित केला.

वर नमूद केलेल्या सव मेसोअमेरिकन जमातींमध्ये बऱ्याच समानता आढळतात. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे कालमापन पद्धती. मेसोअमेरिकन २ दिनदर्शिका वापरत. पहिली सूर्याच्या भ्रमणावर आधारित(haab). त्यात ३६५ दिवस असत. आणि हे ३६५ दिवस वेगवेगळ्या ऋतूंशी जोडलेले असत. दुसरी धार्मिक दिनदर्शिका हि माणसाच्या गर्भधारणेच्या कालावधीवर आधारित असे(tzolkin). त्यात २६० दिवस असत. दोन्ही दिनदर्शिकेत समान दिवस येण्यासाठी साधारणपणे २६०-दिवसांच्या दिनदर्शिकेतील १८९८० दिवस किंवा ५२ वर्षे – ३६५ दिवसांच्या दिनदर्शिकेतील लागत. या परिमाणास असे संबोधले “Bundle of Years” जाते.प्रत्येक ५२ वर्षाचा शेवट हा जगाचा अंत:काल असून दिवशी जग संपणार आहे असा समज होता. खालील ३६५ दिवसांच्या दिनदर्शिकेत ५२ चिन्हे ५२ वर्षे दाखवत आहेत.

नरबळीची प्रथा : सर्व मेसोअमेरिकन समाजात दिसणारा हा एक अजून समान धागा. मागे वळून पाहता ओल्मेक साधारणपणे ख्रिस्तपूर्व १२०० काळात देवाला रक्त अर्पण करण्यात प्रसिद्ध होते. माया, आस्तेक युद्ध कैद्यांबरोबर स्व:ताचेही रक्त देवाला अर्पण करीत. स्त्रिया व पुरुष स्व:ताला कान, नाक, पायाला जखमा करून घेत. पुरुष बरेचदा गुप्तांगसही जखमा करीत. नरबळी दिल्यानंतर मृतदेह पिरॅमिडवरून खाली ढकलत. जेणे करून वाहते रक्त जमिनीला मिळून जमिन शक्तिमान होते असा आस्तेकांचा समज होता.

बॉल गेम : जवळ जवळ सर्व मेसोअमेरिकन समाजात बॉल गेम खेळला जाई. खेळाचे मैदान “आय” आकाराचे असे. विस्तीर्ण अशा या खेळाच्या मैदानात दोन्ही बाजूंनी उतरत्या भिंती असत. त्यापुढे पायर्‍यांवर प्रेक्षकांना बसायला जागा असे. काही मैदानात बॉल रिंग असे. चेंडू जमिनीवर पडू न देता हाताने, पायाने, मांड्यांनी , गुड्घ्यांनी न पडता या रिंगमध्ये टाकावा लागे. या खेळाचा विचित्र नियम म्हणजे विजेत्याला देवापुढे बळी जावे लागे. आस्तेकांच्या मते हा खेळ म्हणजे छाया आणि प्रकाशाचा म्हणजेच केत्झलकोएत्ल (Quetzalcoatl) व तेझ्कात्लीपोका (Tezcatlipoca) या दोन भावांमधला संघर्ष. याच बरोबर प्रसिद्ध दोन जुळ्या भावांची प्रसिद्ध कथाही याच बॉल गेमशी संबधित आहे. ती पुन्हा कधीतरी.

शेती : जवळ जवळ १४००० वर्षे मेसोअमेरिकन समाज भटक्या अवस्थेत वावरत होता. या भागात हवामानही आजच्या तुलनेत थंड होते. मुबलक पाणी, फळफळावळ, हिरवीगार राने असा हा समृद्ध प्रदेश होता.साधारणपणे ख्रिस्तपूर्व ७०००-५०० या काळात मेसोअमेरिकन समाजाने शेतीचे तंत्र विकसित केले. रानात उगवणार्‍या वनस्पती, रानटी पशु यांना मनुष्य उपयोगी बनवण्यास त्यांनी सुरवात केली. त्यातच मका या महत्त्वाच्या पिकाचा शोध लागला आणि ते जवळ जवळ सर्व मेसोअमेरिकन जमातींचे प्रमुख खाद्य बनले. त्याना मका, मिरची, कापूस, स्कॉश ही पिके माहित होती. युरोपात झालेली शेतीची ओळख आणि मेसोमेरीकानांची तिच्याशी पडलेली गाठ हा साधारण एकच कालावधी परंतु तिचा मेसोअमेरिकन जगातील प्रगतीचा वेग फारच कमी होता आणि त्याची कारणेही फार मजेशीर आहेत. ती अशी :

युरोपात शेतीच्या कामासाठी सर्वसाधारणपणे बैल, घोडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘चाक’ वापरले जाई. परंतु मेसोअमेरीकनांना कुठल्याही प्राण्याचा वापर शेतीसाठी माहित नव्हता. घोडा हे जनावर त्यांनी कधी पहिले सुद्धा नव्हते. स्पॅनिशसेनानी कोर्तेसने जेव्हा पहिले पाऊल मेक्सिको मध्ये ठेवले तेव्हा मेसोअमेरीकानांनी घोडा हा प्राणी सर्वप्रथम पहिला. धर्मभोळ्या आस्तेकांना तो अमानुष पशु वाटून त्यांनी पळ काढला.

चाकाची ओळख जरी मेसोअमेरीकनांना असली तरी त्यांनी कधी त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला नाही. चाक हे चंद्र-सूर्यासारखे गोल. ते त्याला देवाचे वाहन मानीत आणि म्हणून माणसाला वापरायला निषिद्ध. त्यामुळे शेती असो व बांधकाम ते चाकू, दगडी कुऱ्हाड, धारदार पाती (ज्वालामुखीच्या दगडापासून बनलेली) अशी हत्यारे वापरत.


लिपी : मेसोअमेरीकन संस्कृतीचा विशेष असा भाग म्हणजे त्यांनी विकसित केलेली लिपी. बर्‍याचशा कठीण अशा या चित्रलिपीला "hieroglyphic" किंवा लघु रूपात "glyph" असे म्हणतात या लिपीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खर्‍या जगातल्या गोष्टी जसे मनुष्य, प्राणी , नैसार्गिक गोष्टी बर्या च प्रमाणात सारख्या चितारण्याचा प्रयत्न. बर्‍याचदा मनुष्य आणि प्राणी संपूर्ण न चितारता डोक्यापार्यांचा भाग काढला जाई. काही भौमितिक रचना जसे वर्तुळ, चौरस ही वापरत.

माया लोकांनी स्व:ताची अंकतालिका होती. ती काहीशी अशी. बिंदू आणि रेषा यांच्या माध्यमातून अंक दर्शवले जात. काही हस्तलिखितांमध्ये आस्तेकांनी फक्त बिंदूंचा वापर अंक म्हणून केलेला आढळतो तर काही शिलालेखांमध्ये बिंदू आणि रेषा दोनही आढळतात.

तर अशी ही प्राचीन जगातील थोडी गूढ, काहीशी रहस्यमय आणि बरीचशी आश्चर्यचकीत करणारी, खिळवून ठेवणारी मानवी संस्कृती. तिचा लेखाजोखा मांडण्याचा माझा हा छोटा प्रयत्न.

****************************************************************
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व – मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Mesoamerica
३) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
४) POPOL VUH : http://www.holybooks.com/wp-content/uploads/POPOL-VUH-THE-MAYAN-BOOK-OF-...

लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.

इतिहास

प्रतिक्रिया

मन१'s picture

12 May 2012 - 10:18 am | मन१

वआचतोय.
"ग्रंथ", "पुस्त्क" ही कल्पना त्यावेळेस इतर जगाच्या संपर्कात न आलेल्या भूभागातही होती हे पाहून आश्चर्य वाटले.

सवडिने अधिक लिहितो.

मुक्त विहारि's picture

12 May 2012 - 10:30 am | मुक्त विहारि

अजून येवू द्यात..

रणजित चितळे's picture

12 May 2012 - 11:05 am | रणजित चितळे

मया पंचांगा प्रमाणे आपल्या पृथ्वीचा अंत डिसेंबर २०१२ मध्ये होणार आहे.

आपला लेख आवडला.

खुप माहिती मिळाली.

अर्धवटराव's picture

12 May 2012 - 12:29 pm | अर्धवटराव

>>स्पॅनिश सेनानी आर्नान कोर्तेसचा पूर्ण पाठींबा या धर्मप्रचारास होता.
-- माया राज्याचा एक फार लोकप्रीय राजा होता. कुठल्याश्या कारणाने/तंट्या बखेड्याने उद्वीग्न होऊन तो राज्य सोडुन गेला. पण आपण परत येऊ अशी भविष्यवाणी करुन गेला. त्याची वाट बघणे हा जनतेचा पिढीजात उद्योग होऊन बसला. स्पॅनीश सेनापतीला ( आर्नान??) जेंव्हा ही अंधश्रद्धा कळली तेंव्हा आपणाच तो भूतपूर्व राजा असल्याचा त्याने प्रचार केला. त्याचे व्यक्तीमत्व देखील राज्याच्या वर्णानाशी मिळते जुळते होते. तेंव्हा मायन्स लोकांनी त्याचा लवकर स्वीकार केला.

>>मायन्सची कालमान पद्धती...
-- मायन्स कॅलँडर सुनार डिसेंबर २०१२ ला जगाचा नाश होणार असं म्हटलं जातं.. पण खरं म्हणजे त्या कालमापनाचा डिसेंबर २०१२ ला काऊंट संपतो एव्हढच. जर यदाकदाचीत खरच डिसेंबरमध्ये जगाचं बरं वाईट झालं तर तो काक-तालीय (वा अमेरीका-ईराण-चीन-भारत-पाकीय ) न्याय म्हणावा

>> मायन्स्ची शेती आणि नगर रचना
-- मायन्स "तरंगती" शेती सुद्धा करत.. म्हणजे त्यांनी पाण्यावर मोठमोठाले अ‍ॅग्रीकल्चर बेड्स तयार केले होते. स्पेनीश सैन्याने पहाडांवरुन जेंव्हा हे दृष्य पाहिले त्यांना थक्क व्हायला झाले. मायन्सची नगर रचना देखील फार आखीव रेखीव होती. त्यांच्या नाशाचे आणखी एक कारण म्हणजे पिरॅमीड्स वगैरे बांधायला त्यांना बांधकामाला लागणारे मटेरीअल उकळायला लागायचे. त्याकरता प्रचंड जंगलतोड, मग पाऊस न पडणे, स्थलांतर करावे लागणे अश्या भानगडी झाल्या. सरते शेवटी ते दक्षीण अमेरीकेच्या समुद्र किनार्‍यालगतच्या प्रदेशात सिमीत राहिले.

>> काही मैदानात बॉल रिंग असे...या खेळाचा विचित्र नियम म्हणजे विजेत्याला देवापुढे बळी जावे लागे.
-- या नियमाचा दुश्मन जमानेने ( स्पॅनीश आक्रमकांनी) खुप गैर फायदा घेतला. नेतृत्व करु शकणार्‍या लोकांचे असे गेम्स ओर्गनाईज करुन विजेत्यांना प्रथेनुसार बळी दिले आणि हळु हळु मायन्स समाज नेतृत्वहीन झाला. शिवाय मायन्सचे युद्धाचे नियम मोठे विचित्र होते. ते नेहमी एकएकट्याने लढायचे. म्हणजे दोन-तीन स्पॅनीश सैनीक एखाद्या मायन्स सैनीकाला गाठुन मारायचे, ओर्गनाईझ्ड आक्रमणा करायचे, पण एक मायन्स सैनीक दुसर्‍याच्या मदतीला जायचा नाहि.

असो... एक निसर्गप्रेमी, त्याकाळाच्या मानाने खुपच पुढारलेली अशी मायन्स संस्कृती युरोपीय हावरटपणाला शेवटी बळी पडली. पुरातत्व वैज्ञानीकांचा एक गट असाही दावा करतो कि एक अतीप्रचंड पिरॅमीड (कदाचीत जगातलं सर्वात मोठं...) मेक्सीको सिटीच्या भुगर्भात दडुन बसलय... पण ते उकरुन काढायचे म्हणजे मेक्सीकोसिटीचा फार मोठा भाग स्थलांतरीत करावा लागेल...

संदर्भ - जसं आठवलं तसं :)

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

21 May 2012 - 6:39 pm | बॅटमॅन

>>माया राज्याचा एक फार लोकप्रीय राजा होता. कुठल्याश्या कारणाने/तंट्या बखेड्याने उद्वीग्न होऊन तो राज्य सोडुन गेला. पण आपण परत येऊ अशी भविष्यवाणी करुन गेला. त्याची वाट बघणे हा जनतेचा पिढीजात उद्योग होऊन बसला. स्पॅनीश सेनापतीला ( आर्नान??) जेंव्हा ही अंधश्रद्धा कळली तेंव्हा आपणाच तो भूतपूर्व राजा असल्याचा त्याने प्रचार केला. त्याचे व्यक्तीमत्व देखील राज्याच्या वर्णानाशी मिळते जुळते होते. तेंव्हा मायन्स लोकांनी त्याचा लवकर स्वीकार केला.

माझ्या माहितीप्रमाणे हा राजा माया नसून इंका होता आणि तो तसा प्रचार कोर्तेसने केलेला नसून पिझ्झारोने केला होता. ही लिंक बघा:

http://en.wikipedia.org/wiki/Viracocha#Controversy_over_.22White_God.22

आणि तो तसा नसून पिझ्झारोने केला होता. ही लिंक बघा: >>>>

नाही. असा प्रचार आर्नान कोर्तेसने केला होता आणि राजा माया नव्हता. तो आस्तेकांचा राजा मोन्तेझुमा(दुसरा) होता.

कोर्तेसचा विकी पाहिला, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी दिलेल्या लिंकवरून पिझ्झारोलादेखील तसा अनुभव आला होता असे दिसते, प्रचार न करता.

परिकथेतील राजकुमार's picture

12 May 2012 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतो आहे.

प्रचेतस's picture

12 May 2012 - 12:46 pm | प्रचेतस

उत्तम लेखन.

मेल गिब्सनचा अपोकॅलिप्टो हा सिनेमा आठवला.

मन१'s picture

12 May 2012 - 9:10 pm | मन१

अंगावर काटा येणारा असा आणि एवढाच नाही तर थेट
अंगावर येणारा सिनेमा :- अपोकॅलिप्टो

हारुन शेख's picture

12 May 2012 - 11:10 pm | हारुन शेख

असेच म्हणतो . नरबळी देतात तो प्रसंग खरच अंगावर काटा आणणारा आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिमा's picture

12 May 2012 - 1:17 pm | तिमा

इतिहास हा माझा आवडता विषय असल्याने वाचतोय. पुढचे भाग येऊ द्या. लेखन चांगले झाले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2012 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत! काय सुंदर विषय घेतलाय. मनापासून धन्यवाद म्हणतो. कृपया लिहित रहा.

किलमाऊस्की's picture

12 May 2012 - 1:58 pm | किलमाऊस्की

@अर्धवटराव : >>> मायन्स कॅलँडर सुनार डिसेंबर २०१२ ला जगाचा नाश होणार असं म्हटलं जातं.. पण खरं म्हणजे त्या कालमापनाचा डिसेंबर २०१२ ला काऊंट संपतो एव्हढच.>>> +१ . माझही हेच मत आहे.

>>>माया राज्याचा एक फार लोकप्रीय राजा होता. कुठल्याश्या कारणाने/तंट्या बखेड्याने उद्वीग्न होऊन तो राज्य सोडुन गेला. पण आपण परत येऊ अशी भविष्यवाणी करुन गेला. त्याची वाट बघणे हा जनतेचा पिढीजात उद्योग होऊन बसला. स्पॅनीश सेनापतीला ( आर्नान??) जेंव्हा ही अंधश्रद्धा कळली तेंव्हा आपणाच तो भूतपूर्व राजा असल्याचा त्याने प्रचार केला. त्याचे व्यक्तीमत्व देखील राज्याच्या वर्णानाशी मिळते जुळते होते. तेंव्हा मायन्स लोकांनी त्याचा लवकर स्वीकार केला. >>>> सर्व मेसोअमेरिकन जमातींवर १-१ लेख लिहिण्याचा विचार आहे. त्यात हे सविस्तर येइलच.खुप रोचक ईतिहास आहे.

यकु's picture

12 May 2012 - 2:02 pm | यकु

यातलं ओ की ठो माहित नाही
आत्ता अशात याच विषयावरचा बहुतेक श्री. अरविंद कोल्हटकर यांनी लिहिलेला ( चुभुदेघे ) एक लेख जालावर वाचला होता
पण लिंक सापडत नाहीय

चाणक्य's picture

12 May 2012 - 2:21 pm | चाणक्य

येउद्यात

हेमांगीके जी , अतिशय रोचक व वाचनीय लेख आहे हा.
अजुन अश्याच चांगल्या लेखातुन तुम्ही आम्हाला माहीती देत रहा.

सानिकास्वप्निल's picture

12 May 2012 - 3:28 pm | सानिकास्वप्निल

उत्तम माहिती देणारा व अर्थपूर्ण असा लेख:)
पुढचे भाग लवकरच येऊ द्या :)
धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा.....! पुन्हा पुन्हा वाचावा असा संदर्भासहित असलेला माहितीपूर्ण लेख.
आवडला.

अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

स्मिता.'s picture

12 May 2012 - 3:43 pm | स्मिता.

हेमांगी, सुरुवात छान झालीये. माया तसेच इतरही संस्कृतींच्या इतिहासावर आणखी लिहा.

पैसा's picture

12 May 2012 - 4:08 pm | पैसा

असेच आणखी लेख लवकर येऊ द्या!

लेखन छानच.
कृपया आणखी लिहावे.

@निश : तुमचा प्रतिसाद आवडला फक्त एकच विनंती कृपया माझ्या नावापुढे "जी" लावू नका .

माझ्यामते मराठी बोलताना / वाचताना ने "जी" थोडं विचित्र वाटत.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

कवितानागेश's picture

12 May 2012 - 7:43 pm | कवितानागेश

अत्यंत आवडता विषय. वाचतेय.............. :)

Nile's picture

12 May 2012 - 10:47 pm | Nile

विस्तारीत लिहिण्यापेक्षा थोडक्यात आढावा दिल्यामुळे लेख आणि या विषयी रस निर्माण होण्यास मदत झाली असे वाटले. माया संस्कृतीचा उदय ग्वाटेमालामध्ये झाला असे समजले जाते. त्यानंतर माया लोक उत्तरेकडे सरकत मेक्सिकोत आले. पण नुकताच मेक्सिकोतील युकाटान भागात माया आधीच्या संस्कृतीचा शोध लागल्याचा दावा एका मेक्सिकन पुरातत्त्ववेत्याने केला आहे. याविषयीची डॉक्युमेंटरी इथे पाहता येईलः http://www.pbs.org/programs/quest-lost-maya/ (सर्व देशांत दिसेल का याबद्दल शंका आहे.)

निशदे's picture

13 May 2012 - 2:20 am | निशदे

वाचन चालू आहे........ अजून येऊ देत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 May 2012 - 11:41 am | निनाद मुक्काम प...

रोचक विषयावर रंजक माहिती मिळत आहे.
वाचत आहे.

पियुशा's picture

13 May 2012 - 1:16 pm | पियुशा

मस्त , सगळ सविस्तर लिहिल आहेस.
पुढिल लेखाच्या प्रतिक्षेत :)

किलमाऊस्की's picture

13 May 2012 - 9:27 pm | किलमाऊस्की

सर्व नविन प्रतिसदांसाठी धन्यवाद.

शिल्पा ब's picture

14 May 2012 - 2:58 am | शिल्पा ब

रोचक माहीती. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.
एक शंका: बॉल गेम मधे असा विचित्र नियम का असावा? कारण जिंकणारी बाजु समर्थ असते तर तिचा बळी देवाला चांगली माणसे मिळावित म्हणुन देत असत का?

किलमाऊस्की's picture

14 May 2012 - 10:29 am | किलमाऊस्की

@शिल्पा ब : हो बरोबर तर्क केलात. आस्तेक जितके शूर होते तितकेच अंधश्रध्दाळू होते. ते शक्ती मिळवण्यासाठी सुर्यपूजा करीत. सुर्याला अधिक बलवान करण्यासाठी त्यांना सतत बळीची गरज असे. बरेचदा लढाया करून ते जिंकलेल्या राजा़कडून राज्याच्या बदल्यात खंडणी म्हणून भरपूर युध्द्कैदी मागून घेत असत. स्व:ताचं बलिदान देउन देवाची सेवा करायला मि़ळणं हे भाग्याचं मानलं जाई.

नरबळींबरोबर शिशुबळीची हि प्रथा होती. आया आपल्या मुलांना बिनधोक बळी देण्यासाठी देत असत. असा समज होता की एकदा मूल देवाजवळ पोचलं की तिथे स्तनांची झाडं आहेत आणि त्यातून भरपूर दुध येत. त्यामुळे आपल्या तान्हुल्यांच्या अन्नाची काळजी मिटेल.

सगळाच प्रकार अजब.

प्यारे१'s picture

14 May 2012 - 10:53 am | प्यारे१

मस्त लेख, मस्त माहिती.
अजून येऊ द्या! और भी आन दो!
अर्धवटरावांचा प्रतिसाद देखील माहितीपूर्ण!

अवांतरः अपोकॅलिप्टो च आठवला...
जीवनमरणाच्या लढाईत जगण्याची प्रचंड इच्छा आणि कुटुंबाची ओढ असलेला टोळीच्या सरदाराचा मुलगा!
प्रत्येक फ्रेमगणिक सर्रकन काटा आणणारा चित्रपट होता.

मी-सौरभ's picture

14 May 2012 - 1:09 pm | मी-सौरभ

प्यारे१च्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

पु. ले. शु.