मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
20 Jun 2012 - 6:03 pm

मेसोअमेरिका(४.३) - माया (The Architects)

खरंतर मागच्या भागात 'माया'पुराण संपवायचं असं ठरवलेलं. पण "मन१" यांनी विचारलेल्या काही शंका विशेषत: माया लिखाणाबाबत लिहितांना प्रतिसाद जरा मोठा होत होता. त्यामुळे सविस्तर माहिती लिहिण्यासाठी हा अजून एक लेख मायांवर. आणि हो "शिल्पाब" यांच्यासाठी कागदाच्या जन्माच्या कहाणी !
♦♦♦♦♦

मानवी विकासाच्या अनेक टप्प्यात काही महत्त्वाचे टप्पे ज्यामुळे मानवी जीवन आमुलाग्र बदललं तसचं सुसह्य झालं. त्यापैकी काही ठळक शोध म्हजे चाक आणि आगीचा शोध. याचबरोबर भाषेचा शोधही मला महत्त्वाचा वाटतो. माणसाला भाषेच्या माध्यमातून संवाद साधता येऊ लागल्यापासून माहितीचं संकलन, संग्रहण आणि पुढच्या पिढीला हस्तांतरण ही एक गरज बनली. त्यातूनच जन्म झाला माहिती साठवून ठेवता येईल अशा विविध साधनांचा. मग अगदी आदिम काळात वापरले गेलेल्या झाडाच्या साली, दगड असोत किंवा आजकालचे मोठ मोठे आधुनिक डेटा सेंटर्स. माहितीची साठवणं ही एक अव्याहत गरज बनली आहे. आज थोडी माहिती माया लिखाण पद्धतीची.

त्याआधी दररोजच्या वापरातल्या कागदाच्या शोधाची गोष्ट. कागदाचा शोध सर्वप्रथम लावण्याचं श्रेय जात चीनी लोकांना. तसंच सर्वप्रथम कागदाचा वापर टॉयलेट पेपर म्हणून करण्याचा मानही त्यांनाच जातो. :-) साधारणपणे १२ व्या शतकात युरोपात पोचलेला कागद चिन्यांनी मात्र इसवीसनाआधी १ शतक शोधला तो अचूक निरिक्षणामुळे. त्याचं झालं असं. चीनी मंत्री "त्साय -लुन" धोबीघाटावर उभा होता. धोबी आपलं रोजचं कपडे धुवायचं काम करत होते. कपडे धुतलेलं पाणी एका बाजूला डबक्यात साचत होतं. थोडयावेळाने धोब्याने कपडे धोपटायला सुरवात केली. त्याबरोबर कपडयातले तंतू सुटून सांडपाण्याबरोबर वाहू लागले आणि डबक्यात एका ठिकाणी साचले. त्साय -लुन या सर्व गोष्टींचं बारीक निरिक्षण करीत होता. साचलेल्या तंतूंचा पापुद्रा त्याने अलगत उचलला आणि उन्हात सुकवला. सुकल्यावर त्याचा सलग असा मऊ तुकडा बनला. ते बघताच त्याच्या डोक्यात या तुकडयाचा वापर लिहिण्यासाठी करण्याची कल्पना आली. आणि त्यातून कागदाचा शोध लागला. चहा, रेशीम अशा महत्त्वाच्या शोधांप्रमाणे हाही शोध चिन्यांनी व्यवास्थितरित्या गुलदस्त्यात ठेवला. पुढे पाचव्या शतकात तो जपानमार्गे अरब देशात व इतर जगात पसरला. कागदाचा शोध लावणारा "त्साय-लुन"

आता वळूया माया लेखनप्रक्रीयेकडे. मेसोअमेरिकेत सर्वप्रथम चित्रलिपी विकसित करण्याच श्रेय जातं ते ओल्मेकांकडे. झापोतेकांनी पुढे त्यात भर घालण्याचं काम उत्तम केलं. मायांनी त्यावर कळस चढवला असं म्हणता येईल. बर्‍याचशा कठीण अशा माया चित्रलिपीला "hieroglyphic" किंवा लघु रूपात "glyph" असे म्हणतात. माया लिपीची काही वैशिष्ठये म्हणजे जगातल्या गोष्टी जसे मनुष्य, प्राणी , नैसार्गिक गोष्टी तंतोतंत चितारण्याचा केलेला प्रयत्न. कोलंबसपूर्व जगातील ही मेसोअमेरीकेमधली एकमेव लिपी ज्यातून बोलीभाषेला पूर्णपणे लिहून व्यक्त करता येत असे. जगातल्या अनेक संस्कृतींमधे ज्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या गेल्या त्यामागचे कलाकार मात्र बरेचदा अज्ञात आहेत. (उदा. अजिंठा) बरेचदा या कलाकृतींच्या निर्मात्यांपेक्षा त्या काळाच्या राजांनांच त्या कलाकृतींचं श्रेय आपण देतो. परंतु काही ठराविक संस्कृतींमधे कलाकारांनी आपली नाव आपल्या निर्मितीवर कोरून ठेवली आहेत. त्यापैकीच एक माया संस्कृती. पोस्ट क्लासिक काळाच्या शेवटी तयार केलेल्या एका भांड्यावर Ah Maxam (१) त्याच्या कलाकाराचं नाव कोरलेलं आढळलं आहे. कॅलीग्राफी आणि चित्र यांचा अतिशय सुंदर मिलाफ हे अजून एक माया लिपीचं वैशिष्ठय सांगता येईल.

लेखनासाठी उच्चकुलिन लोकांच्या हाताखाली लेखनिक असत. हे लेखनिक बरेचदा शाहीकुलातली मुलं, मुली असत. माया चित्रात लेखनिक बरेचदा डोक्यात लेखनसाहित्य खोचलेले दिसतात. असे लेखनिक मोठ्ठ्या हुद्द्यावर असत. हा एक मुख्य माया लेखनिक.

लेखनिकांच्या प्रमुखाला 'ak k'u hun' (Gaurdian of Sacred books') असं म्हणत. मुख्य लेखनिकाला अनेक कामे करावी लागत. राजघराण्यातल्या लग्नामधे मध्यस्त तसेच लग्नाचा दस्ताऐवज बनवण्याचं काम मुख्य. याच बरोबर आश्रित राज्यांची व त्यांच्याकडून आलेल्या भेटवस्तूंची माहीती गोळा करणे, राजघराण्याच्या वंशावळीची माहिती संकलित करणे अशाप्रकरची अनेक कामं हे लेखनिक करीत असत. माया लेखनिक बरेचदा चित्र व शब्दांच्या सहाय्याने लेखन करीत. माया कॅलिग्राफर आणि चित्रकारांना ah ts'ib ('he of the writing') असं संबोधत. चित्रलिपीचं ज्ञान असलेल्यांना yuxul ('sculptor') असा मान मिळे. स्त्री - पुरुष दोघेही लेखनिक असत परंतु पुरुष लेखनिकांची संख्या अधिक असे. स्त्री लेखनिकांना ah ts'ib आणि पुरुष लेखनिकांना ak k'u hun संबोधलं जाई.

लेखनिकांसाठी शाळा असत आणि त्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागे कारण अतिशय गुंतागुंतीची अशी माया चित्रलिपी समजून घेणं फार अवघड होतं. शाही खानदानतली मुलं, मुली लेखनिकांसाठी असलेल्या शाळेत विशेष शिक्षण घेत असत.

लेखनिकाला लिखाणासाठी अनेक पर्याय असत. लेखनिक एखादा शब्द, वाक्य वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकत असत. कधी ते logographs (२) वापरत तर कधी उच्चार ( त्या शब्दाचा उच्चार दाखवणारे चिन्ह - phonetics). एखादा शब्द किंवा नाव दाखवण्यासाठी लेखनिक बरेचदा logographs वापरत तर उच्चारसाठी असलेली चिन्ह spelling दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ : balam ('jaguar') शब्द एक logograph म्ह्णजेच बिबळ्याचं डोकं वापरुन लिहिता येतो, तसंच त्या शब्दाच्या उच्चाराप्रमाणे ba, la आणि ma असाही लिहिता येतो. अशाप्रकारचे काही शब्द logograph आणि उच्चार दोन्हीचा वापर करुन लिहिता येत असत. अशावेळी लेखनिक तसा उल्लेख आपल्या लिखाणात करीत. आपण इंग्रजी लिहितांना २६ चिन्हांचा वापर करून वेगवेगळे शब्द बनवतो, त्याचप्रमाणे माया भाषेत जवळजवळ ८०० चिन्ह आहेत. चिन्हांचा वापर करुन अक्षरं बनतात. हा एक नमुना माया शब्दाचा.

क्लासिक काळात कोरलेली माया चित्रलिपी ही उभी व आडवी लिहिलेली आढळते. ती साधारणतः पहिल्या ओळीतला पहिला कॉलम, पहिल्या ओळीतला दुसरा कॉलम अशी वाचता येते. काही छोटया वस्तू, सिरॅमिकची भांडी, कोरिवकाम केलेली हाडं, शिंपले यावर थोड्या वेगळ्याप्रकारे लिहित. बरेचदा फक्त आडवं किंवा उभं लिहिलं जाई. काही आसनांवर व बॉलकोर्टमधे वर्तुळाकार लिहिल्याचं आढळून आलं आहे. कोपानमधे मिळालेल्या अवषेशांमधे काही ठिकाणी ती तिरपी लिहिलाची सुद्धा आढळलं आहे. काही थोडया ठिकाणी (पॅरिस कोडेक्समधली ४ पानं) उजवीकडून डावीकडे लिहिल्याचं दिसून येतं.

आतापर्यंत झालेल्या संशोधनमधे माया साधारणतः इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून लिखाणासाठी bark paper वापरायला सुरवात केली. या कागदाचं माया नाव Hu'un. अंजीर, Amate, (3) , Ficus या झाडांच्या आतल्या भागात असलेल्या पातळ साली लेखनासाठी वापरत. खरंतर या झाडांच्या सालींचा वापर अंग झाकण्यासाठी कपडे म्हणून करीत परंतु त्याच सालींचा वापर लेखनासाठी केव्हापासून करु लागले हे अजून न सुटलेलं कोडं आहे. Amate च्या सालींवर काढलेलं हे चित्र.

या झाडांच्या साली लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवत जेणेकरुन त्या मऊ होत. त्यानंतर स्वच्छ पाण्यातून काढून त्यांना muinto या दगडी हत्याराने ठोकून काढीत.त्यामुळे या साली पातळ व रूंद होत असत. या साली नंतर एकावर एक उभ्याआडव्या अंथरल्या जात त्यामुळे सालींमधे असलेले फायबरचे धागे एकमेकांत अडकून तो जाड बनत असे. त्यामुळे अशा कागदावर पाठपोट लिहिता येत असे. हा कागद उन्हात सुकवून , त्याचे छोटे छोटे तुकडे जोडून मोठा कागद बनत असे. हा कागद पोत, टिकाऊपणा, लवचिकता या बाबतीत इजिप्तच्या पपायरसशी तुलना करता अधिक वरचढ होता. पुढे स्पॅनिशांच्या आक्रमणानंतर bark paper वर बंदी येऊन युरोपियन कागद वापरायला सुरवात झाली. हा कागद लेखनासाठी वापरायला घेण्यापुर्वी एक गोष्ट करावी लागत असे ती म्हणजे या कागदाला शाई शोषून घेण्यायोग्य बनविणे. त्यासाठी लेखनिक चुनखडी आणि पाणी याच्या मिश्रणाने gesso नावाचं द्रव्य बनवून त्याचा थर कागदाच्या दोन्ही बाजूला देत असत. gesso चा थर सुकल्यावर आता लिखाणासाठी योग्य असा कागद लेखनिकांकडे असलेल्या लाकडी उपकरणाचा वापर करुन पुस्तकासारखे शिवत असत. हे शिवलेलं पुस्तक लाकूड आणि बिबळ्याच्या कातडीचा वापर करून सुरक्षितरित्या बांधून ठेवत. माया पुस्तकाची बांधणी.

लेखणी म्हणून बरेचदा प्राण्यांचे केस, पंख याचा वापर होत असे. प्राण्यांच्या केसांपासून विविध तर्‍हेचे ब्रश बनवले जात. शाई ठेवण्यासाठी दौत म्हणून बरेचदा शंखाचा वापर केला जाई. हे शंखापासून बनवलेल्या दौतीचं चित्र. त्यावर लिहिलेल्या चित्राचा अर्थ असा. ku'ch sab'ak, म्हणजे "It is an ink-carrier "

माया कोडेक्स मधे बरेचदा लेखनिकांनी काळ्या शाईचा वापर केलेला दिसतो आणि गोष्टी चिन्हांकीत (highlight) करण्यासाठी लाल शाईचा वापर केलेला दिसून येतो. काळा रंग स्वयंपाकघरातील भांडयांच्या तळाशी जमणार्‍या काजळीपासून तर लाल रंग लोखंडापासून बनवला जाई. त्याव्यतिरिक्त निळा, हिरवा, पिवळा हे रंगही वापरलेले आढळून येतात. मायांनी त्यांच्या ग्रंथात केलेला काळ्या आणि लाल रंगाच्या वापरावरुन आस्तेकांनी माया प्रदेशाला "Land of Black and Red" असं नाव दिलं होतं.

स्पॅनिशांनी धर्मप्रचाराचा भाग म्ह्णून माया ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली. या सर्व धामधुमीतून काही माया हस्तलिखिते बचावली. त्यापैकी ४ ती ज्या शहरात ठेवली आहेत त्या शहरांच्या नावावरून ओळखली जातात. ती अनुक्रमे ड्रेस्डेन(जर्मनी), माद्रिद(स्पेन), पॅरिस(फ्रांस) व ग्रोलीएर (दक्षिण अमेरिका) अशी आहेत. या हस्तालिखीतांमधून त्या वेळच्या माया संस्कृतीची बरीचशी माहिती उपलब्ध होते. जगातल्या बर्‍याच संस्कृतीच्या अगदी उलट माया हस्तलिखितात राजेरजवाडे, त्यांचं आयुष्य, कर्तबगारी या वर्णनापेक्षा आपल्या परंपरा, धर्मिक विधी, अवकाश संशोधन, देव-देवता, सूर्य-चंद्र ग्रहण, त्यावेळच्या रुढी याची सविस्तर माहीती मिळते.

अजून एक माया ग्रंथ या धुमश्चक्रीत वाचला तो म्हणजे “The Popol Vuh” (Book of Advice). दक्षिण अमेरिकेत ग्वाटेमाला जवळ वास्तव करणारे माया लोक म्हणजेच किंचे (Quinche ) या लोकांचा हा पवित्र ग्रंथ होता.या ग्रंथांचे थोर नशीब आणि किंचे लोकांचा दृढनिश्चय या दोन गोष्टी या ग्रंथाच्या बचावासाठी उपयुक्त ठरल्या. मूळ चित्रलिपीमध्ये असणारा हा माया ग्रंथ किंचे लोकांनी गुप्त रीतीने साधारण इसवी सन १५०० च्या सुमारास रोमन वर्णलिपिमध्ये भाषांतरित केला. इसवी सन १७०३ मध्ये हा भाषांतरीत ग्रंथ फ्रेच भिक्षु फ्रान्सिस्को सिमेनेस (Fransisco Ximenez) याच्या हाती लागला . फ्रान्सिस्कोला किंचे लिपी अवगत असल्याने त्याने तो स्पॅनिशमध्ये भाषांतरित केला.

स्पॅनिशांनी जरी हरतर्‍हेने या संस्कृतीची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरीही लोककथा, दंतकथा, लिपी या माध्यमातून ती नक्कीच थोडीफार जिवंत राहिली. माया लेखनपद्धतीची किंबहुना त्या माध्यमातून माया संस्कृतीच्या एका पैलूची ओळख करून देण्याचा हा लेख माझा छोटासा प्रयत्न . हा लेख वाचून अपोकॅलिप्टोमधे चितारलेल्या रानटी जीवनसरणी पलिकडे जाउन माया ही एक सुसंस्कृत आणि प्रगत जीवनशैली होती हे थोडं जरी पटलं तर हा प्रयत्न सफल झाला असं मानायला हरकत नाही. :-)

माया लेखनाचा देव - Itzamna

माया लेखनिकाची चर्चा करतांना :

माया लेखनिक

राजापुढे बसलेला माया लेखनिक, मागे दासी हातात चॉकलेट भरलेलं भांड घेऊन उभी आहे.

कोकोची बी दाखवण्याचं चिन्हः

ड्रेसडेन कोडेक्स मधली काही पानं

माया चित्राचा एक नमुना: मक्याने भरलेलं मडकं दासीच्या डोक्यावर चढवताना.

***

टीपा :

१) Ah Maxam - हा King of Naranjo आणि Princess of Yaxha यांचा मुलगा.

२) Logographs - एखादा शब्द चित्ररुपात दाखवणे. जसं '7' या चिन्हाला आपण इंग्रजीमधे Seven म्हणतो तर मराठीत 'सात'. ते ७ हा अंक दाखवण्याचं चित्र आहे.

३) Amate - हा स्पॅनिश शब्द आस्तेकांच्या नौवात्ल्मधून आला. मूळ शब्द āmatl. हे झाड मेक्सिकोच्या उत्तरेला Guerrero या भागात आढळतं.

संदर्भ :
१) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
२) Ancient Wisdoms - Gayle Redfern
३) Lost Civilization (Parragon Books)
४) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
५) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.

(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jun 2012 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

.

:)

स्मिता.'s picture

20 Jun 2012 - 7:17 pm | स्मिता.

हा ही लेख छानच. खूपच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहेत. त्यामुळे केवळ नावं माहिती असलेल्या संस्कृतींची ओळख झाली.

असेच लेख जगभरातल्या इतर संस्कृतींवर येवू द्या. भारतीय / सिंधू / वैदिक ;) / हडप्पा... जे योग्य असेल ते, संस्कृतीवरही दीर्घलेखमाला वाचायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jun 2012 - 7:21 pm | बिपिन कार्यकर्ते

नक्कीच आवडेल.

प्रचेतस's picture

20 Jun 2012 - 10:57 pm | प्रचेतस

नक्कीच लिहा त्यावरही.

बाकी ही लेखमाला एकदम अप्रतिम.

+३
नेहमीप्रमाणे छान लेख

कवितानागेश's picture

20 Jun 2012 - 7:33 pm | कवितानागेश

सगळेच लेख अतिशय सुंदर आहेत.
लिहित रहा. :)

फार मस्त लिहिले आहे..

शिल्पा ब's picture

20 Jun 2012 - 10:42 pm | शिल्पा ब

छान.

तुम्ही म्हणालात की माया ग्रंथात इतरांसारखे राजे वगैरेंऐवजी देव, अवकाशा इ. विषयी माहीती आहे.
कदाचित स्पॅनिश नासधुशीतुन महत्वाचे म्हणुन किंवा त्यांच्या समाजाची माहीती लिखित स्वरुपात जपुन रहावी म्हणुन हे ग्रंथ वाचवले असु शकतात. राजे त्यांचा इतिहास वगैरेविषयी लिहिलेले ग्रंथ स्पॅनिशांनी जाळुन टाकले असु शकतात. हा माझा एक तर्क.

कदाचित स्पॅनिश नासधुशीतुन महत्वाचे म्हणुन किंवा त्यांच्या समाजाची माहीती लिखित स्वरुपात जपुन रहावी म्हणुन हे ग्रंथ वाचवले असु शकतात. राजे त्यांचा इतिहास वगैरेविषयी लिहिलेले ग्रंथ स्पॅनिशांनी जाळुन टाकले असु शकतात. हा माझा एक तर्क.

(माझा या विषयावर अभ्यास नाही, पण जेवढ वाचलय त्यातून उत्तर लिहित आहे)

उलट, स्पॅनिशांनी नासधूस केली त्यामागच्या अनेक कारणांमधे एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना पुढच्या पिढीसाठी काहीही शिल्लक ठेवायचं नव्हतं. जगाच्या पाठीवर अशी कुठली प्रगत संस्कृती होती हे त्यांना जगासमोर येउ द्यायचं नव्हतं. त्यामुळेच बरेचदा या संस्कृतींचं चित्रण रानटी, असं करण्यात आलं. त्यांच्या नरबळीच्या प्रथा पाहून त्यांनी मुळ धर्म नष्ट करायचं ठरवलं. अर्नान कोर्तेसने त्यासाठी जंगजंग पछाडून अनेक कलाकृती , ग्रंथ यांची नासधूस केली. त्याला सर्व संस्कृती मुळापासून साफ करायची होती. जे उचलता येइल ते उचलायचं युरोपात पाठवायचं आणि उरलेलं साफ करुन टाकायचं हे त्याचं तत्त्व. धर्म बाट्वण्यासाठी अनेक युक्त्या त्याने योजल्या. मायांना वाटणारं शुक्राचं महत्त्व लक्षात घेउन त्यांनी येशू शुक्राचं प्रतिक असल्याचा प्रचार केला. पिसांच्या सापांचा देव कुकुल्कानच्या रुपात अवतरल्याचंही पसरवण्यात आलं. जे या थापांना बधले नाही त्यांना जबरदस्तीने धर्मांतरीत करण्यात आलं.

पण या सगळ्याच संस्कृती दक्षिण अमेरिकेत विखुरलेल्या होत्या. स्पॅनिश आले तेव्हा एकाच वेळी आस्तेक, माया वैगेरे संस्कृती विखुरलेल्या स्वरुपात नांदत होत्या. हे लोक शूर, लढवय्ये होते. असे विखुरलेल्या स्वरुपातले अवशेष पुर्णपणे नामशेष करणं स्पॅनिशांना शक्य झालं नाही. त्यामुळे बरेच अवशेष वाचले. ते स्पॅनिशानी नष्ट केले नाहीत म्हणण्यापेक्षा त्या त्या भागातल्या लोकांनी केलेले प्रयत्नांमुळे वाचले असं म्हणता येईल. त्यातून पालेंके सारखी ठिकाणं निसर्गानेच आपल्या पोटात दडवून ठेवली होती त्यामुळे ती वाचली. काही ठिकाणी कोर्तेसने आस्तेकांच्या कलाकृती पाडून तिथे चर्च बांधली खरी पण त्यातली काही बरीच खोलवर खणून बांधलेली असल्याने वाचली आणि नंतर उत्त्खननात सापडली.

शिल्पा ब's picture

21 Jun 2012 - 8:36 am | शिल्पा ब

<<ते स्पॅनिशानी नष्ट केले नाहीत म्हणण्यापेक्षा त्या त्या भागातल्या लोकांनी केलेले प्रयत्नांमुळे वाचले असं म्हणता येईल

मलाही हेच म्हणायचं होतं. वाक्यरचना चुकली वाटतं. असो.

पैसा's picture

20 Jun 2012 - 11:08 pm | पैसा

सगळीच लेखमालिका फार सुंदर होतेय!

ऋषिकेश's picture

21 Jun 2012 - 9:20 am | ऋषिकेश

+१ असेच म्हणतो.
लिहित रहा वाचतो आहोतच

मिपावरच्या उत्तम लेखमालांपैकी एक, अतिशय सुंदर पद्धतीनं मांडणी केली आहे धन्यवाद .

तिमा's picture

21 Jun 2012 - 7:16 pm | तिमा

नवीन विषयांवर पण लिहा. लेखन आवडीने वाचतोय.

कवितानागेश's picture

30 Jul 2012 - 7:18 pm | कवितानागेश

पुढे??

किलमाऊस्की's picture

17 Sep 2012 - 7:36 pm | किलमाऊस्की
बॅटमॅन's picture

17 Sep 2012 - 11:11 pm | बॅटमॅन

एक नंबर बघा ही लेखमाला. जियो!!!!!!! :)