रचावा अभंग परि मनी मुक्तछंद
चितारु क्षणरंग एकएका
अफाट हे जग लोकही अफाट
सुटले ते सुसाट दाहीदिशा
परि एक जलाशयी जैसे येती जगपक्षी
तैसे उतरती जालस्थली रोजरोज
अवघे ते विश्व जाली प्रगटले
नगास ते नग गेले मिळौनिया
बसावे एकजागी कराव्या त्या गोष्टी
चाखावी समष्टी वेद बोले
स्थळाचे महात्म्य काय वर्णू मी पामर
हरएक जाणे गूज जेव्हा तो सदस्य स्वये झाला
जनाचे मनाचे काथ्याकुटी काठ्या
कविंच्या कविता विडंबिती दुष्ट
पाककृती शोभा कलेचे दालन
गृहे पाकगृहे सोडून सुगरणी आल्या
पायाची भिंगरी फिरविते दाही दिशा
भटकत येती आश्रया भटकंतीच्या
विषय अगम्य प्रतिसाद महान
किती कूटगूढरम्य चर्वण चाले
करीती वादावादी विषयांतरे मोठी
रंगले समस्ती मजा घ्याया
प्रतिसादी फेडीती अवघी ती धोतरे
कुणाची पितरे धन्य झाली
खरडी तैसे व्यनि जाती झडकरी
बोलायची चोरी काय सांगू
विनोद फळाया जाणा जालभाषा
न कळे त्यासी हाय काय कैसे सांगू
संपादके टेकीले टेबली ते हात
हा हंत ते करीत बैसले की हो
मालक ते सुखी गेले वनांतरी
येती कधीतरी चुकोनिया
हुतात्मे-संन्यस्त पाहती ही शोभा
न कळे कोण्या भोगा कैसे गेले
यारे कधीतरी जाल गाजवाया
पुन्हा करु मजा मागे केली
ऐसी मजामजा रोजचीच चाले
जाल हे गेले दणाणूनी
शेवटी शेवटी
कलला दिवस चढली ती रात्र
थकले ते गात्र अवघियांचे
हपिसे मिटली खुरच्या सुटल्या
जाल झाले थंड
पडा आता थंड रात्रीतरी
बैसलो हपिसी रिकामा केव्हातरी
रिकाम्या मस्तकी काव्य झाले
जैसे मनी आले तेची खरडले
फार विचारीले कधी नाही
असेल चुकलो काहीबाही बोललो
करा आता क्षमा पामरासी
प्रतिक्रिया
25 Jan 2012 - 5:32 pm | प्रचेतस
मस्त रे.
संत यशवंत महाराज की जय!!!
26 Jan 2012 - 12:58 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम रे यशवंता....सुरेख रचना !!
25 Jan 2012 - 8:15 pm | पैसा
आवडला. तुम्हा सर्वाना बिचार्या संपादकांची इतकी काळजी आहे हे पाहून अगदी भरून येतंय!
25 Jan 2012 - 10:17 pm | जाई.
_/\_
25 Jan 2012 - 10:57 pm | पाषाणभेद
हा हा हा मस्त अभंग आहेत हां
26 Jan 2012 - 12:00 am | कवितानागेश
मस्त! :)
26 Jan 2012 - 12:19 am | स्वानन्द
:) मस्तच.
26 Jan 2012 - 11:00 am | गवि
लव्हली...
26 Jan 2012 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
यकुंचा विजय असो!
26 Jan 2012 - 1:34 pm | अन्या दातार
पार्टी बदललीत की सभास्थळ बघून घोषणा देता? ;)
यकु, छान रे. आवडले अभंग
26 Jan 2012 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जैसे मनी आले तेची खरडले
फार विचारीले कधी नाही
असेल चुकलो काहीबाही बोललो
करा आता क्षमा पामरासी
नै नै, छान चालू आहे. चालू दे...! :)
-दिलीप बिरुटे
26 Jan 2012 - 7:32 pm | स्मिता.
यशवंतराव, एकदम झाक काव्य उतरलंय. चालू द्या जोरात!
27 Jan 2012 - 11:00 am | प्यारे१
खीक!
-स्प्यारे ;)
27 Jan 2012 - 12:58 pm | यकु
थँक्यू दोस्तहो.
:)
28 Jan 2012 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रतिसादी फेडीती अवघी ती धोतरे
कुणाची पितरे धन्य झाली
खरडी तैसे व्यनि जाती झडकरी
बोलायची चोरी काय सांगू>>>> य.क्कू.शेठ खतम झालो हाय...!