परसूंकीच बात है...

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
24 Oct 2011 - 2:51 pm

"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"

जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.
कोणी तुम्हाला परसूंचा वायदा केला तर समजा की अजून दिल्ली भौत दूर है.
कोणी तुम्हाला परसूं घडलेली घटना सांगितली तर समजा की ती आदिकालापासून ते खर्‍या कालच्या कालपर्यंत साचलेल्या भूतकाळात कुठेतरी जमा झालेली 'गोष्ट' आहे.
आणि तुम्ही स्वतः जर तो शब्द वापरत नसाल तर तुम्ही 'जुने' हैदराबादी नाहीच.

असे का? अगदी परवापर्यंत (म्हणजे हैदराबादी परसूंपर्यंत) हे 'शहर' म्हणजे एक अवाढव्य खेडे होते. माझ्या डोळ्यांदेखत इथं लोक घरासमोरच्या कट्ट्यावर बसून येणार्‍या-
जाणार्‍याला 'खैरियत?' असे विचारत असत. कधीकधी तोही कट्ट्यावर बसून हवापाण्याच्या-नातेवाईकांच्या चौकशा करत असे. वाळ्याचे पडदे लावलेल्या डेझर्ट कुलरमधून येणारी थंड हवा खात, जाड भिंतीच्या घरात बसून तासंतास गप्पा मारत असत. दोन मिनिटांसाठी 'ऐसेईच' आलेला माणूस दोन-तीन दिवस राहून जात असे. उन्हाळ्यातल्या रविवारी रस्त्यावर क्रिकेट खेळण्याइतका शुकशुकाट असे. तब्बेतीने शिजणारे पदार्थ तितक्याच निवांतपणे संपवले जात. कोपर्‍यावरील इराणी हॉटेलात एकदा शिरले की दोन-तीन तास हळूहळू निघून जात. वेळ आपोआप जात नसे, तो घालवण्याचे अनेक उत्तमोत्तम मार्ग हैदराबादने शोधून काढले होते.

अशा वातावरणाची सवय झालेल्या हैदराबादला कोणतीही गोष्ट या क्षणी, आत्ता, आता, आज अशा वर्तमानकालात किंवा उद्यापर्यंतच्या भविष्यात घडेल याची खात्री नव्हती. आणि भूतकाळात झालेली कोणतीही गोष्ट तारीख-वाराने लक्षात ठेवण्याची गरज नव्हती आणि इच्छाही! म्हणूनच हा 'परसूं' - अनंत कालाप्रवाहातील अनिश्चित बिंदू .

हे सारे आठवायचे कारण म्हणजे 'परवा' पेपरमध्ये आलेलं एक स्फुट. गंमत वाटली. एकीकडे हैदराबाद भराभर बदलत आहे, आपली जुनी कात टाकून नव्या वेगानं सळसळत आहे तर दुसरीकडे काही शहरे प्रत्यक्षात त्या निवांतपणाचा अंगिकार करत आहेत. अशाच एखाद्या गावात जाऊन सावकाशीनं जगावे असे मनात येते.

कार स्टेरिओवर लागलेले 'दिल ढुंढता है फिर वही फुर्सत के रात दिन' हे गाणे ऐकून नॉस्टाल्जिक झाल्यावर ग्रीन सिग्नल लागला तरी फर्स्ट गियर लगेच पडत नाही. लगेच मागून हॉर्नचा गोंगाट ऐकू येतो, मुलगी म्हणते,"बाबा, चल नाही तर ट्रॅफिक जाम होईल". मी तिला म्हणतो - "अगं, खरंतर परवापर्यंत इथं सिग्नलच नव्हता. अं... परवा म्हणजे तुझा जन्म व्हायच्या आधी!" - ती जुन्या हैदराबादची नाही, नव्या हैदराबादची आहे.

राहती जागासमाजराहणीमौजमजामाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 Oct 2011 - 3:30 pm | मदनबाण

मस्त लेख... :)
अशाच एखाद्या गावात जाऊन सावकाशीनं जगावे असे मनात येते.
अगदी माझ्या मनातली इच्छा ! किती दिवस घडाळ्याच्या काट्यावर जगायच ?

जाता जाता :--- द अंग्रेज चित्रपटातला एक संवाद आठवला...
सलीम मेरुकु आईस्क्रीम होना ! ;)

प्रचेतस's picture

24 Oct 2011 - 3:18 pm | प्रचेतस

अता परसूंच हैदराबादेला येत आहे. परसूंच बोलेता ११ तारखेला. तुमची भेट घ्यायला आवडेल.

पैसा's picture

24 Oct 2011 - 3:52 pm | पैसा

ते हैदराबाद आयटीच्या मार्‍यात हरवलं की काय? आणि तेलंगणाचे दंगे चालूच आहेत ना? अब्बी परसूं, म्हणजे १३ ते १६ ऑक्टोबरला आमची एक कॉन्फरन्स हैदराबादला व्हायची होती, मस्त बिर्याणी खाऊ म्हणून सगळे खूष होते, आणि दंग्यांमुळे ती कॉन्फरन्स कॅन्सल झाली . :(

मी ऋचा's picture

24 Oct 2011 - 4:44 pm | मी ऋचा

खूपच छान!

चित्रा's picture

24 Oct 2011 - 6:42 pm | चित्रा

अशा वातावरणाची सवय झालेल्या हैदराबादला कोणतीही गोष्ट या क्षणी, आत्ता, आता, आज अशा वर्तमानकालात किंवा उद्यापर्यंतच्या भविष्यात घडेल याची खात्री नव्हती. आणि भूतकाळात झालेली कोणतीही गोष्ट तारीख-वाराने लक्षात ठेवण्याची गरज नव्हती आणि इच्छाही! म्हणूनच हा 'परसूं' - अनंत कालाप्रवाहातील अनिश्चित बिंदू .

सुरेख. लेख/स्फुट आवडले.

फेसबुकांवरील आपण अमूक ठिकाणी आईस्क्रीम खाऊन आलो अशी अपडेटं वाचण्याच्या काळात असे सुटसुटीत, निर्भर, शांत हवे तसे जगता येणे म्हणजे स्वप्नरंजनच झाले आहे.

बाकी नंतर.

मी-सौरभ's picture

24 Oct 2011 - 7:45 pm | मी-सौरभ

क्या मस्त लिखतें!!
परसूं पेराडाईज मे मिलते क्यां??
मस्त बिर्यानी खिलातें तुमको यारों!!

प्रभो's picture

24 Oct 2011 - 7:49 pm | प्रभो

मस्त लेख!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2011 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसुनाना, मस्त लेख. परसूंकीच बाते आवडली.

-दिलीप बिरुटे

मस्त लेखन!
लवकर संपल्यासारखे वाटले.
हैद्राबाद बदलतय.
तरीही अजून कुठे कुठे निवांतपणा पहायला मिळतो.

मैत्र's picture

25 Oct 2011 - 10:34 am | मैत्र

"अपना हैदराबाद का परसूं रे" -- परफेक्ट एकदम अस्सल हैद्राबादी..
परवा येतोय हैद्राबादला .. भेटू बावर्ची मध्ये ;)

अर्धवट's picture

25 Oct 2011 - 1:05 pm | अर्धवट

लै भारी...

अन्या दातार's picture

25 Oct 2011 - 1:09 pm | अन्या दातार

मराठीतसुद्धा अगदी असाच 'परवा' असतो आणि त्याला गाव, पाडा, वाडी याचे काहीही बंधन नसते ;)

तिमा's picture

26 Oct 2011 - 10:18 am | तिमा

इतके छान छान लेख, चर्चाविषय येत आहेत, दिवाळीनिमित्त सगळ्यांना नवीन पालवी फुटली की काय?

पाषाणभेद's picture

26 Oct 2011 - 10:29 am | पाषाणभेद

एकदम झकास लेख

सन्जोप राव's picture

28 Oct 2011 - 11:21 am | सन्जोप राव

सुस्त, निजामी हैदराबाद आता कदाचित आयटी सुपरफास्ट झाले असावे. तशी सगळीच नगरे, शहरे कात टाकून फास्ट लेनमधून सळसळत आहेत. तरीही हैदराबादच्या गतीत एक आळसावलेला मंद मोहकपणा आहेच. एखाद्या शांत गावात जाऊन जगण्याची कल्पना आकर्षक असली तरी आता ती वास्तवात येणे अवघड आहे. तुमची इच्छा असो की नसो, काळ तुमच्या ढुंगणावर फटके टाकून तुम्हाला पळायला लावणार आहे. पळता पळता एखाद्या कोपर्‍यावर थांबून एखादा मोठा श्वास घेणे - फारतर इतकेच करणे आता शक्य आहे.

भडकमकर मास्तर's picture

28 Oct 2011 - 2:07 pm | भडकमकर मास्तर

आयटी सुपरफास्ट ... आळसावलेला मंद मोहकपणा ...

सहमत...

या दिवाळीमध्ये हैद्राबादेस भेट देता आली, शहर आवडले...ते जे काही आउटर रिन्ग रोड म्हणून जे काही पाच लेनचे प्रकरण बांधलेले आहे, त्यावर भन्नाट फिदा झालो... उत्तम लांबलचक रूंद रस्ता आणि त्यावर टोल नाही, हे पाहून गहिवरलो.... ( साला आपल्याकडे पाच किलोमीटर रस्र्ता बांधून झाला तरी टोल सुरू होतो..)

इथल्या या भाषेचा अ‍ॅक्सेन्ट इतरांकडून पूर्वी ऐकला तेव्हा विचित्र वाटत असे... का कोण जाणे प्रत्यक्ष भेटीत कानावर पडला तेव्हा गोड वाटला...

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 11:56 am | नगरीनिरंजन

मस्त लेख!