अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
7 Oct 2011 - 1:30 am

अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.

वास्तविक हा माणूस कपिल देवच्या अस्तानंतर भारतीय गोलंदाजीचा एकखांबी तंबू होता. कधी त्याने श्रीनाथला बरोबर घेउन भारतीय गोलंदाजीची धुरा वाहिली तर कधी वेंकटेश प्रसादला खांद्यावर घेउन. अध्ये मध्ये अ‍ॅबी कुरुविलापासुन हरभजन सिंग पर्यंत सग्ळे टिनपाड / मान्यवर गोलंदाज हजेरी लावून गेले पण हा माणूस अखेरपर्यंत प्रतिस्पर्धी संघाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरला.

अझहर, सचिन, गांगुली, द्रविड कधी हरभजन तर कधी लक्ष्मण सगळेच कधी ना कधी भाव खाउन गेले पण कुंबळे एखाद्या विरक्त संन्यासाचा भाव चेहेर्‍यावर ठेवुन एकांड्या शिलेदाराची भूमिका निभावत आला. त्याच्याही आयुष्यात ते मोमेंट्स ऑफ फेम आले. नाही असे नाही. पण कुंबळेला जी काही प्रसिद्धी मिळाली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिद्धीचा आणी लोकप्रियतेचा हक्क त्याला नक्कीच होता, निवृत्तीनंतर २-३ वर्षांनी अजुनही आहे.

अनिल कुंबळेने त्याचे कसोटी पदार्पण १९९० मध्ये केले इंग्लंड विरुद्ध. या सामन्यात त्याने ३ बळीही मिळवले. त्यातला एक अ‍ॅलन लॅम्बचा होता. पण तरीदेखील त्याला पुढच्या सामन्यातुन डच्चु मिळाला आणि किस्मत उसपे इतना रुठी की नंतर २ वर्षे तो संघाबाहेर राहिला. त्यावेळेस जर सिलेक्टर्सना हे माहिती असले असते की हा माणूस भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५०+ बळी मिळवणार आहे आणि जिथे सगळे दिग्गज फलंदाज नांग्या टाकतील त्या खेळपट्टीवर टिच्चुन उभा राहुन शतकही ठोकणार आहे तर कदाचित तो संघाबाहेर गेलाच नसता.

अगेंस्ट ऑल ऑड्स ही टिच्चुन राहण्याची त्याची जी विजिगिषु वृत्ती होती तिच त्याला यशस्वी करायची. एकदा साहेबांनी ठरवले की मग भलेही करंगळी मोडु दे की जबडा हा माणूस चेंडु हातात उड्वत गोलंदाजी साठी ह्जर व्हायचा. त्याची जिद्द अफाट होती आणि कुवत असामान्य. याच जिद्दीच्या बळावर या पट्ठ्याने ९२ साली झिंबाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावर स्वतःची वर्णी लावली. यातल्या दक्षिण अफ्रिके विरुद्ध पहिल्या कसोटीत त्याचे बकरे होते केपलर वेसल्स, जाँटी र्‍होड्स आणि सलामीवीर जिम्मी कूक. पण दुसर्‍या कसोटीत मात्र एका आगामी सुपरस्टारचा उदय लक्षात घेउन बहुधा सगळ्याच्या सगळ्या अफ्रिकन संघानेच कुंबळेसमोर लोटांगण घातले. यात त्याचे बळी होते हडसन, कर्स्टन, क्रोन्ये, मॅकमिलन, जॉटी र्‍होड्स (दोन्ही डावात) आणि रिचर्ड्सन (दोन्ही डावात) . तरीदेखील ९८ धावा काढणारा आणि ४ बळी घेणारा मॅकमिलन सामनावीर ठरला हे वेगळे. अफ्रिकन भूमीवर, वेगवान खेळपट्ट्यांवर या फिरकी गोलंदाजाने ८ बळी घेतले आणि मग त्यानंतर कधी मागे वळुन नाही बघितले. कदाचित त्यामुळेच कुंबळे हा फिरकी गोलंदाज होता यावर फार लोकांचा विश्वास बसत नाही :)

त्याच्या १८ वर्षाच्या कारकीर्दीत चेंडु वळला असे ठामपणे, छातीठोकपणे सांगता येइल असे चेंडु त्याने फार कमी टाकले असावेत. ९६ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळपट्टीवर भगदाडे पडली होती. मुरलीचे चेंडु हातभर वळत होते. त्याचे वर्ण करताना एक मित्र म्हणाला "अरे बॉल एवढे वळत होते की कदाचित कुंबळे गोलंदाजी करत असला असता तर त्याचा बॉल सुद्धा वळल्याचा भास होउ शकला असता." . मित्राच्या या वक्तव्यावर आक्षेप घ्यायचे कुठलेही कारण आम्हाला सापडले नाही. कारण कुंबळे आमच्या लेखी फिरकी गोलंदाज नव्हताच. अहो ज्या माणासाच्या गोलंदाजीचा वेग वेंकटेश प्रसादच्या गोलंदाजीच्या आसपास पोचणारा असेल त्याला फिरकी गोलंदाज कसे म्हणावे? उद्या वेंकटेश प्रसादला ऑल राउंड स्पिनर घोषित कराल तुम्ही. :) . पण तरी ही कुंबळॅ मध्यमगती गोलंदाज होता की फिरकी याच्याशी मला काडीचे घेणेदेणे नाही. अहो जो माणूस पोत्याने बळी मिळवत होता त्याने पायाने , दाताने, केसाने, चालत, पळत. रांगत, झोपत कशीही गोलंदाजी केली तरी त्यावर आक्षेप घेणारे आम्ही कोण फुकणीचे? नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? त्याची लाइन आणि लेंथ मॅक्ग्राच्या तोडात मारेल इतकी बिनचूक होती यात काही अतिशयोक्ती नाही ना? एका इनिंग मध्ये ७२ षटके टाकण्याइतका त्याचा स्टॅमिना अफाट होता हे कळते आहे ना? आणि कारकिर्दीत कधीही चेंडु न वळवता जर हा माणूस कसोटीत ६००+ आणि एकदिवसीय सामन्यात ३००+ बळी मिळ्वत असेल तर मरो ती फिरकी आणि खड्यात जावो तो राँग वन (त्याचा जो बॉल वळतो तो राँग वन असतो असे एक अतिशय साधे समीकरण आमच्या एका महान मित्राने ठरवले होते). कोणाला कौतुक आहे त्याचे?

कुंबळेने जेव्हा पदार्पण केले तेव्हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडुंचे त्याच्याबद्दल फार काही चांगले मत नव्हते. "तो एक किफायतशीर गोलंदाज आहे " असे हातचे राखुन मत बिन्नी ने दिले होते तर प्रसन्नाने तर चक्क सांगितले होते की " अनिल कुंबळॅ काही चंद्रशेखरच्या तोडीचा नाही आणि जर त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला बॉल वळवणे शिकले पाहिजे" त्यानंतरच्या ज्ञात इतिहासात कुंबळेने चेंडु वळवुन बळी मिळवल्याची फारशी उदाहरणे सापडणार नाहीत. मग असे काय होते या शामळू दिसणार्‍या चष्मीश माणसात की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकाचे बळी मिळवले?

उत्तर हवे असेल तर २००२ सालच्या मे महिन्यात खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यातल्या तिसर्‍या दिवसाच्या शेवटच्या सत्रातला खेळ पहावा. पहिल्या डावात फलंदाजी करताना कुंबळेच्या जबड्यावर डिल्लनचा एक चेंडु आदळला आणि कुंबळेचा जबडा फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करायला लागणार हे नक्की होते. तरीही जेव्हा गेल, हाइंड्स आणि सारवान समोरच भारतीय गोलंदाजी ढेपाळली आणि अजुन लारा, हूपर आणि चंदरपॉल तर बाकीच आहेत हे दिसत होते तेव्हा कुंबळेला राहवेना. त्याने जबड्यावर भले मोट्ठे बँडेज चढवुन सलग १४ षटके गोलंदाजी केली आणि त्यात लाराचा, सगळ्यात महत्वाचा बळी मिळवला. फ्रॅक्चर एवढे नोठे होते की कुंबळेला त्या दिवसाचा खेळ संपवुन भारतात परतवावेचे लागले आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजीचे हाल कुत्र्याने देखील नाही खाल्ले. गांगुलीची अवस्था एवढी केविल्वाणी झाली होती की त्याने त्या सामन्यात सगळ्याच्या सगळ्या ११ खेळाडुंना गोलंदाजी दिली. अजय रात्रा आणि राहुल द्रविडने आलटुन पालटुन यष्टीरक्षण आणि गोलंदाजी केली. गांगुलीला शक्य असले असते तर त्याने विमान अर्ध्या रस्त्यातुन वळवुन कुंबळेला बोलावुन परत गोलंदाजी दिली असती. कारण तो एकच होता जो जबडा तुटलेला असुनदेखील चवताळलेला होता. शेर जख्मी है तो क्या हुआ फिर भी शेर है. त्याच्या या अफाट साहसाबद्दल क्रिकेटक्षेत्रातले दिग्गज काय म्हटले हे वाचण्यासारखे आहे:

"Cricket has a way of producing inspiring tales of valour for the country and this ranks at the top,"
- सुनिल गावसकर

"It was one of the bravest things I've seen on the field of play," - व्हिवियन रिचर्ड्स

'He is a champion player and a very committed one which we saw here itself. He is a man with a big heart,'' - सचिन

आणि एवढे सगळे प्रशंसोद्गार ज्याच्यबद्दल काढले जात होते तो कुंबळे मात्र स्थितप्रज्ञ योग्यासारखे म्हणाला:

"There was a bit of risk but I though the risk was worth it, at least I can now go home with the thought that I tried my best."

खेळात झोकुन देण्याच्या या समर्पित वृत्तीमुळे, विजीगिषु साहसामुळे, प्रखर इच्छाशक्तीमुळॅच शेन वॉर्नसारखा स्पिन किंवा मुरलीसारखा दुसरा नसुनदेखील कुंबळे प्रचंड यशस्वी ठरला.

प्रत्येक महान खेळाडुच्या कारकीर्दीत असा एक उत्तुंग क्षण येतो जो त्या खेळाडुच्या कारकीर्दीचे रुपक बनून राहतो. कुंबळॅसाठी तो क्षण माझ्यामते पाकिस्तानविरुद्ध एकाच डावात १० बळी मिळवुन किंवा वयाच्या ३६ व्या वर्षी जिथे तमाम श्रेष्ठ फलंदाज अपयशी ठरले त्या मालिकेत शत़क ठोकणार एकमेव फलंदाज बनूनही नाही आले. माझ्यामते २००२ च्या अँटिग्वा टेस्टमधली ती १४ षटके अनिल कुंबळेचे सगळे व्यक्तिमत्व प्रकट करुन जातात.

विक्रम त्याने आधीही केले आणि नंतरही. पाकिस्तान विरुद्धच्या एका कसोटीमधला स्कोरबॉर्ड सबकुछ अनिल कुंबळेच दाखवतो. तो सामना पाकिस्तान कॉट & बॉल्ड कुंबळेच होता. हीरो कपचा सामना ६ बळी घेउन त्याने असाच गाजवला. सर्वात जास्त पायचीत असोत की कॉट & बॉल्ड, विक्रम त्याच्याच नावावर जातो. एका डावात सर्वाधिक बळींचा विक्रमही असाच त्याच्याच नावावर शोभतो. पण एवढे होउनही कप्तानपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी त्याला १७ वर्षे वाट बघावी लागली. त्या पदाचे त्याने सोने केले. त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही.

अनिल कुंबळे हा असाच होता. शांत, सिन्सियर, स्टुडियस, प्रसिद्धीपासुन, झगमगाटापासुन दूर राहणारा. त्यामुळेच इतक्या प्रचंड योगदानानंतरदेखील त्याला त्याच्या वाट्याची प्रसिद्धी नाही मिळाली. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी शेन वॉर्न त्याच्याबद्दल काय म्हणातो बघा:

“I have been lucky enough or unlucky enough to play against Anil for nearly 20 years. We are still playing against each other in the IPL. We all know what a gentleman he is, how humble he is - and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody. More than the statistics, I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person. He is a giver no matter what the situation."

अगदी असेच काहीसे सचिनही त्याच्याबद्दल बोलतो: "He is a man with a big heart"

बहुधा त्यामुळेच, त्याच्या "बडे दिलवाला" असण्यामुळेच कदाचित कुंबळेला जंबो म्हणत असावेत. त्याच्या गोलंदाजीचा वेग एका फिरकी गोलंदाजासाठी जंबो जेटसारखा आहे हे दुय्यम कारण असावे बहुधा. :)

तळटीपः सर्व छायाचित्रे जालावरुन विनापरवानगी साभार

क्रीडामौजमजाप्रकटनसद्भावनाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणपा's picture

7 Oct 2011 - 1:35 am | गणपा

ज ब ह र्‍या.

भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी

+१

पैसा's picture

7 Oct 2011 - 1:44 am | पैसा

कुंबळेने खेळायला सुरुवात केली ती जलदगती गोलंदाज म्हणून आणि नंतर तो फिरकी टाकू लागला असं काहीतरी वाचलेलं आठवतंय. नक्की सांगू शकत नाही.

पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या मॅचमधे कुंबळे बँडेज बांधून गोलंदाजीला आला तेव्हा लाराच्या चेहर्‍यावरचे भाव अजून आठवतायत!

क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत नाही. किबहूना काहीच कळत नाही. परंतू हा लेख आवडला. खुप रोचक आणि रंजक पद्धतीने जंबोची ओळख करुन दिली आहे. आणि मुख्य म्हणजे लिहिताना अभिनिवेश टाळला आहे.

इतकं तटस्थ आणि तरीही छान असं कुणी सचिनवर लिहू शकेल काय? त्याचा चुकूनही देव असा उल्लेख न करता? ;)

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2011 - 2:06 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख, एका फ्लोमध्ये चांगले लेखन केले आहे.

मेघवेडा's picture

7 Oct 2011 - 2:11 am | मेघवेडा

मस्त लेख रे मृत्युंजया! काही माणसं आपापल्या क्षेत्रातल्या कौशल्याबाबतच नव्हे तर एकूणच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल, एकूणच वागण्याबद्दल जगाला बरंच काही शिकवून जातात. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. जसं सचिनच्या सिडनीतल्या २४१* खेळीने 'प्रतिकार न करता हार पत्करता कामा नये, वेळेस संकटे अंगावर झेलावी' हे आम्हांला शिकवलं, राहुलनं अनेकदा खंबीरपणाची प्रात्यक्षिकं दिली तसंच अनिलनंही नेहमीच लढाऊ बाणा, खंबीर मनोवृत्ती आणि संतुलित वर्तनाचे वस्तुपाठ घालून दिलेले आहेत.

बाकी सगळं तू लिहिलंच आहेस. अजून काही लिहत नाही पण एक गोष्ट इथं मनापासून नमूद करावीशी वाटते - ६१९ कसोटी बळी म्हणजे काही चेष्टा नाही. अलिकडे आपले गोलंदाज १००-१५० होईतो दुखापतींनी अर्धे मेलेले असतात. उद्या कुणी एखाद्या जय/वीरूने हा विक्रम मोडलाच तर त्याचा नक्कीच कारकीर्दीच्या अखेरीस इमामसाहब झालेला असेल! :D भविष्यात कुणा भारतीय गोलंदाजास अनिल कुंबळेला काही ट्रिब्युट द्यायचंच असेल तर 'भारतीय गोलंदाजीची मदार कुणा एकाच खांद्यावर मी राहू देणार नाही' हे वचन हेच कुंबळेला देता येईल असं सर्वोत्तम ट्रिब्युट असेल! :)

शेखर काळे's picture

7 Oct 2011 - 4:26 am | शेखर काळे

नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना?

"गूगली" हा न वळणारा चेंडू आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय ?

- शेखर

मृत्युन्जय's picture

7 Oct 2011 - 9:42 am | मृत्युन्जय

तेवढ्या छोट्या मोठ्या चुका माफ करा हो. कुंबळे चेंडु फिरवत नाही हा आक्षेप अगदी लिटरली नसतो घ्यायचा. :)

तरी नशीब तुम्ही मुख्य प्रश्न नाही विचारला की टॉप स्पिन आणि गुगली मध्ये मुख्य फरक काय? ;)

ते फरकाचं सोडा. आधी टॉप स्पिन आणि गुगली म्हणजे काय ते सांगा बरं ;)

शेखर काळे's picture

8 Oct 2011 - 1:37 am | शेखर काळे

श्री. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कामगिरी आणि नैपुण्याचा मी चाहता असल्यामुळे ते चेंडू वळवत नाहीत हे जरा झोंबले.
बाकी लेख चांगलाच झाला आहे.
मला वाटते की कुंबळेंची आणखी एक बाजू तुम्ही समोर आणली नाहीत - ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला ओळखून त्याला बाद करण्यातली चतुराई. आपल्या चेंडूचा वेग, वळण आणि फिरक कमी-जास्त करून त्यांनी कितीतरी नामांकित फलंदाजांना बाद केलेले आहे. दोन-तीन साधे, हळूच वळणारे, फलंदाजाला गाफिल करणारे चेंडू कुंबळेंनी टाकले, की पुढचा चेंडू हा वेगवान जरा आखूड टप्प्याचा टॉप स्पिनर असणार हे नक्की. आणि मग मागे वळून आपल्या ऊध्वस्त यष्टींकडे पाहतानाचा फलंदाजाचा गोंधळलेला चेहरा. 'इतका वेळ तर नीट चेंडू पडत होते .. मग हा अग्निबाण कुठून आला' .. असा विचार करत तो बिचारा परत निघणार.
कुंबळेंच्या चेहर्‍यावर नेहमीचे विजयी हास्य ! .. हे मी कितीतरी वेळा पाहिलेले आहे.
आताच हा लेख वाचल्यावर त्यांचे पाकिस्तानविरुद्ध दहा बळींची चित्रफीत पाहिली. सलीम मलिक ..
हा याच गमतीने बाद झाला होता !

राहता राहिले गूगली आणि टॉप स्पिन ..
गूगली हा चेंडू करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाने धरून फिरवून सोडायचा .. टॉप स्पिन हा चेंडू मधले बोट व पहिले या बोटांनी धरून फिरवून सोडायचा .. लेग स्पिन मधले बोट व अनामिका .. (मुख्य अनामिका) या बोटांनी धरून फिरवायचा.

कळले नसल्यास श्री. अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची चित्रफीत जरूर पहावी.

- शेखर काळे

सोत्रि's picture

7 Oct 2011 - 5:23 am | सोत्रि

भारी रे मृत्युन्जय!

जम्बोबद्दल अस आपलं वाटणारं कोणी आहे हे समजल्यावर एकदम भरून आले.
हॅट्स ऑफ टु जम्बो ! विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडु.

- (जम्बोचा जम्बो फॅन) सोकाजी

नन्दादीप's picture

7 Oct 2011 - 8:36 pm | नन्दादीप

<<विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडू.
+१

स्वानन्द's picture

7 Oct 2011 - 11:40 am | स्वानन्द

खासच!!

असाच एखादा फक्कड लेख आमच्या धोनी बद्दल येउ द्या राव. :)

श्रावण मोडक's picture

7 Oct 2011 - 12:13 pm | श्रावण मोडक

शीर्षक बदला. अनिल कुंबळे हे शीर्षक असते तरी लेख वाचला गेला असताच. ते उगाच '... तुंबले' असे केल्याने अधिक लोक लेख वाचतील असे नाही. अशा शीर्षकाखाली वाचनीय लेख असू शकतो, असेच येथे सिरियसली काही चांगले वाचण्यासाठी येणाऱ्यांना वाटण्याची शक्यता आहे. मीही धागा उघडला तो मृत्युन्जय काय पालथे धंदे करू लागला, असा विचार करतच.
काळं मीठ अननसासारख्या फळांवरच रुचीला वेगळा खुमार देतं. कैरीवर किंवा आंब्यावर नाही.

मृत्युन्जय's picture

7 Oct 2011 - 12:24 pm | मृत्युन्जय

प्रतिक्रिया पटली. त्यामुळे शीर्षक बदलले.

पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते. ज्या फ्लॉ मध्ये लेख लिहिला त्यात हेच टायटल बरोबर वाटले होते. नविन शीर्षक फारच अनाकर्षक वाटते आहे.

कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय?

श्रावण मोडक's picture

7 Oct 2011 - 12:40 pm | श्रावण मोडक

पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते.

मान्य. माझे शब्द मागे. :)
सध्याचे शीर्षक अनाकर्षक आहे हे पटते. बदलता येईल. जंबो!

<< कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय? >>

हे पटतंय का पाहा :-

अनिल : आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा

तळटीप :-

१. मला क्रिकेट मधलं फारसं कळत नाही, पण त्याला जेंटलमन्स गेम (सभ्य लोकांचा खेळ) म्हणतात एवढं ऐकून आहे. सचिन तेंडूलकर, स्टीव वॉ, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड हे विशेषण सार्थ करतात असं वाटतं.

२. शीर्षक catchy जरूर असावं की ज्यामुळे mass मधील वाचक त्याकडे आकर्षित होतील पण cheap असू नये, की ज्यामुळे class मधले वाचक पळून जावेत. (मी ज्यावरून ह्या वाक्याची प्रेरणा घेतली आहे ते मूळ वाक्य असे आहे - वक्त्याचे भाषण स्त्रियांच्या वस्त्राप्रमाणे अंग झाकण्यापुरते लांब परंतू उत्सुकता निर्माण करण्याइतके आखूड असावे.)

किसन शिंदे's picture

7 Oct 2011 - 12:59 pm | किसन शिंदे

श्रामो यांच्याशी सहमत..

............तुंबले हे शिर्षक पाहुन बराच वेळ धागा उघडायचा धीर होत नव्हता. शेवटी धीर करून धागा उघडला आणी एका झटक्यात वाचून संपवला. :)

आत्मशून्य's picture

7 Oct 2011 - 12:22 pm | आत्मशून्य

.

किसन शिंदे's picture

7 Oct 2011 - 12:50 pm | किसन शिंदे

आमच्या जंबोवर एवढा चांगला लेख (आणी तो ही जे.पी मॉर्गनच्या लेखांच्या तोडीचा) टाकल्याबद्दल मृत्यंजय यांचे विशेष आभार.

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2011 - 1:11 pm | अप्पा जोगळेकर

जंबो किंगबद्दल छान लेख लिहिल्याबद्दल आभार.

मैत्र's picture

7 Oct 2011 - 1:27 pm | मैत्र

आम्ही त्याला त्याचं पूर्ण नाव " अनिल सरळ कुंबळे" आहे असं म्हणायचो... :)

जगाला गंडवण्यासाठी तो लेग स्पिनर ... खाजगीत मीडियम पेसर आहे हाही एक मुद्दा प्रचलित होता :)
बरेच फलंदाज त्याचा बॉल आता वळेल मग वळेल अशी करत राहायचे किंवा ऑफला खेळायला जायचे आणि चेंडू बिचारा वेगात आणि सरळ निघून जायचा कधी पॅड्स तर कधी यष्ट्यांचा वेध घेऊन :)

पण त्याची लढाऊ वृत्ती आणि विलक्षण झपकन आत येणारे टॉप स्पिनस आणि स्ट्रेट बॉल्स जबरदस्त होते... ज्या दिवशी तो फॉर्म मध्ये असेल त्या दिवशी तो अतिशय unplayable असायचा.
त्या मानाने त्याला मानमरातब मिळाला नाही. पण एकंदरीत क्रिकेट जगतात बॅटस्मनला जास्त भाव मिळतो. अनेक महान गोलंदाज होऊन गेले पण थोडके. त्या मानाने फलंदाज लवकर नाव मिळवतात. कुंबळेचे करिअर रेकॉर्ड पुरेसे आहे त्याची गुणवत्ता आणि महानता सिद्ध करायला.
कर्णधारपद, पद्मश्री वगैरे सन्मान त्यालाही मिळाले. पण एका डावातले दहा बळी मिळवणार्‍या या झुंजार खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड च्या काळात त्या कोणाएवढं नावाजलं गेलं नाही हेही खरं.

नम्म बेंगळूरुतलं "अनिल कुंबळे सर्कल" नक्कीच त्याच्यावर कन्नडिगांचं प्रेम दाखवतं. गेल्याच वर्षी तो कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला..

एकूणात मस्त लेख.. धन्यवाद !

स्मिता.'s picture

7 Oct 2011 - 2:01 pm | स्मिता.

आमच्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढा छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

अनिल कुंबळेला त्याच्या कर्तृत्वाच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळाली आहे असं मलाही नेहमीच वाटत आलंय. नाही म्हणायला बंगलोरात महात्मा गांधी रस्त्यावरच्या एका चौकाला 'अनिल कुंबळे सर्कल' असे नाव दिलेले आहे.

जाई.'s picture

7 Oct 2011 - 2:19 pm | जाई.

लेख आवडला

अनिल कुंबळेचे भारतीय क्रिकेटमधील योगदान वादातीत आहे

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2011 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर

मिपाचा दर्जा घसरता घसरता पुन्हा एकदा सावरला गेला आहे असे दाखवून देणारा एक अतिशय सुंदर लेख.

......... We all know what a gentleman he is, how humble he is.....and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody.......I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person......

फार फार महत्त्वाचा संदेश. चला, अनिल कुंबळे सारखे बनण्याचा प्रयत्न करूया.

५० फक्त's picture

7 Oct 2011 - 3:45 pm | ५० फक्त

मस्तच लेख आवडला,

प्रमोद्_पुणे's picture

7 Oct 2011 - 4:11 pm | प्रमोद्_पुणे

नेहेमिप्रमाणे मस्त..

जे.पी.मॉर्गन's picture

7 Oct 2011 - 4:48 pm | जे.पी.मॉर्गन

>> त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही. <<

हे शंभर हिश्शे खरं ! कुंबळे चेहर्‍यावरून जेवढा मवाळ दिसायचा तितकाच क्रिकेटपटू म्हणून आक्रमक होता. ऑस्ट्रेलियात त्या प्रचंड खुनशीनी लढल्या गेलेल्या सीरीजमध्ये कुंबळेनी मैदानातली आणि मैदानाबाहेरची प्रकरणं ज्या पद्धतीनी हाताळली - त्यावरून असंच वाटलं की ह्याला जर कप्तानपद आधी मिळालं असतं तर हा नक्कीच "ऑल टाईम ग्रेट" कर्णधारांत गणला गेला असता. त्याचं खेळाचं अचाट "रीडिंग" समजायला आपल्या सिलेक्टर्सना इतका उशीर का लागला कोणास ठाऊक.

द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होताच "He has a degree in engineering and a PhD in spin bowling."

अश्या भन्नाट खेळाडूबद्दल एवढा भन्नाट लेख लिहिलास ! हॅट्स ऑफ टू यू सर !

जे.पी.

तिमा's picture

7 Oct 2011 - 7:46 pm | तिमा

लेख अत्यंत 'आवडल्या गेलेल्या आहे' (असंच लिहायचं असतं ना ?)

प्रभो's picture

7 Oct 2011 - 8:14 pm | प्रभो

मस्त लेख रे... माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे अनिल.

लहानपणी वाटायचं हा चष्मा घालून कसं काय खेळतो क्रिकेट? फुटत नाही का बॉल लागून चष्मा.. ?

फारएन्ड's picture

7 Oct 2011 - 8:37 pm | फारएन्ड

त्या पिढीतल्या भारताच्या बिग-५ (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे) पैकी हा सर्वात दुर्लक्षित असावा. गेल्या काही दिवसांत "भारतीय संघ (व्यवस्थापनाच्या दृष्टीने) कुंबळे च्या ताब्यात द्यावा" ही अत्यंत योग्य मागणी बर्‍याच लोकांनी केली होती.

त्याच्या सुरूवातीच्या काळात तो भारताबाहेर कमी ईफेक्टिव्ह होता, पण उत्तरार्धात त्याने एकदम चांगली कामगिरी केली. त्याची बॉडी लॅन्ग्वेज, फलंदाजाकडे बघण्याची नजर हे सगळे फास्ट बोलर सारखेच होते.

२००४ नंतर दादा-राईट चा फॉर्म ओसरला तेव्हा द्रविड ला कुंबळे हा पर्याय ठरू शकला असता.

२००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे आपण ज्या कसोटीत खेळत नाही त्यात (आपण नसल्याने कॅप्टन असलेला) धोनी त्यांच्या विरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे लक्षात आल्यावर त्या दिल्ली कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा ही त्याची एकदम वेळेवर घेतलेली स्टेप. आयपीएल मधूनही असेच मानाने बाहेर पडला तो.

मी-सौरभ's picture

7 Oct 2011 - 11:58 pm | मी-सौरभ

तो एक चतुर माणूस आहे हे त्याने क्रिकेटच्या नविन घेतलेल्या जबाबदार्‍या बघता लक्षात आले असेलच :)

त्याला आपल्या टीमचा मॅनेजर करा !!!!

मृत्युन्जय's picture

8 Oct 2011 - 11:47 am | मृत्युन्जय

सर्वच वाचक / प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद.

पल्लवी's picture

8 Oct 2011 - 3:47 pm | पल्लवी

लेख आवड्ला. :)

सन्जोप राव's picture

8 Oct 2011 - 7:39 pm | सन्जोप राव

अनिल कुंबळेविषयीचा हा संयत शब्दांत लिहिलेला लेख आवडला. कुंबळेचे काही गुण इतरांनीही उचलण्याची वेळ आली आहे असे वाटते.

चतुरंग's picture

8 Oct 2011 - 8:05 pm | चतुरंग

(जंबोप्रेमी) रंगा

खटपट्या's picture

20 Mar 2014 - 3:57 am | खटपट्या

मला आठवतंय कि एका भारतीय कप्तानाने म्हटले होते कि "अनिल इतका सभ्य आहे कि मी माझ्या बहिणीचे लग्न त्याच्याशी सहज लावून देयीन"
बहुतेक वेंगसरकर होते

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 12:37 pm | बॅटमॅन

वा काय लेख आहे!!! फिरोजशहा कोटलावरच्या १० बळींचा ठळक उल्लेख नसल्यामुळे मात्र तेवढा निषेध नोंदवतो.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2014 - 3:05 pm | श्रीगुरुजी

अनिल कुंबळेचे अजून एक वैशिष्ट्य २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दिसले. दुसर्‍या कसोटीतले स्टीव्ह बकनर यांनी दिलेले व भारताविरूद्ध गेलेले अनेक वादग्रस्त निर्णय असो वा मंकीगेट प्रकरण असो, कुंबळेने सर्व प्रसंग अत्यंत संयमाने व कमालीची मॅच्युरिटी दाखवून हाताळले. भारत जरी ती मालिका १-२ असा हरला तरी कुंबळेचे नेतृत्व त्यात झळाळून उठले होते.

इशा१२३'s picture

22 Mar 2014 - 11:18 am | इशा१२३

अनिल कुंबळे आवडत्या खेळाडूंपैकी एक असल्याने लेखही आवडलाच.