ह्या नंतरचा सर्वात महत्त्वाचे काम होते ते म्हणजे आम्ही नक्की कुठली माहिती मिळवण्याच्या मागे आहोत ह्याचा शोध घेणे. आणि त्यासाठी मला अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा सुरक्षित डाटाबेस मध्ये शिरणे आवश्यक होते. कधीकाळी ग्रॅनीने FBI च्या सर्व्हर्समध्ये शिरताना वापरलेले ज्ञान आता मला कितपत उपयोगी पडेल ह्याचीच मला फिकीर होती.
----------------------------------
माझ्या हातात वेळ खूप कमी होता आणि काम मात्र जास्ती होते. बरं परिस्थिती अशी होती की कुणावर विश्वास ठेवणे देखील अशक्य होते. जे काय करायचे ते एकट्यानेच करावे लागणार होते. FBI च्या डाटाबेसमध्ये शिरणे म्हणजे काही साधे काम नव्हते. अनेक अडथळे, अनेक लेयर्स आणि अनेक तज्ज्ञांच्या नजरा चुकवायच्या होत्या. दिवसभर प्रयत्न करून झाले, मात्र मी डेटाबेसच्या पहिल्या लेव्हलपर्यंत देखील मजल मारू शकलो नव्हतो. शेवटी वैतागून मी उठलो आणि २ पेग मारून अंथरुणावर आडवा झालो.
राहून राहून मला ग्रॅनीची उणीव भासत होती. आज ती असती तर किती कमी कष्टात हे काम पूर्ण झाले असते. ग्रॅनीच्या आठवणीत हरवलो असतानाच अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. ग्रॅनीचा पर्सनल लॅपटॉप तर इथेच आहे. ऑफिसवरचे सर्व सामान आता इकडेच तर हालवण्यात आले होते. ग्रॅनीच्या लॅपटॉपमध्ये काही मदत मिळते का ते पाहायला हवे होते. मी गडबडीने उठलो आणि ग्रॅनीचा लॅपटॉप उघडला. पुन्हा एकदा घोर निराशा ... ग्रॅनीचा लॅपटॉप कोणीतरी व्यवस्थित फॉर्मॅट करून ठेवलेला होता.
क्षणभरासाठी मी पुन्हा हतबद्ध झालो. काही वेळाने डोके पुन्हा काम द्यायला लागल्यावर पहिला प्रश्न हा पडला की हा उद्योग कोणी केला असावा ? आणि ग्रॅनीकडे असा डेटा होता जो इतरांच्या नजरेला न पडण्याची दक्षता घेण्यात आली होती ? पुन्हा एकदा विचारचक्र सुरू झाले. बर्याच विचारानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीतरी मला आडून आडून मदत करत आहे. ग्रॅनीचा लॅपटॉप नष्ट देखील करता आला असता, पण कोणीतरी तो फक्त फॉर्मॅट मारून ठेवला होता. कशासाठी ? तर मला त्याचे महत्त्व कधी ना कधी लक्षात येणार ह्यासाठी. पण मग फॉर्मॅट करून तो असा निरुपयोगी करून तरी ठेवण्याची गरज काय होती ? आणि जर एखाद्याला माझ्या बुद्धीचा आणि मी कोणत्या वेळी काय करेन ह्याचा येवढा अंदाज असेल, तर मग हा सगळा देखील सापळाच नसेल कशावरून ?
विचार,विचार आणि फक्त विचार... डोके फुटायची पाळी आली होती. पण नुसते असे हातावर हात धरून बसण्याचे फायदा नव्हता, काहीतरी सुरुवात तर करायला हवीच होती. शेवटी मी आर या पार असे ठरवले आणि ग्रॅनीचा लॅपटॉप रिकव्हर करायला सुरुवात केली. बराच वेळ आणि वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरून शेवटी बर्यापैकी डाटा रिकव्हर करण्यात मला यश आले. बर्याचशा फुटकळ फाइल्स, इंटेरिअर डिझाइन्सनी खूपशी जागा व्यापली होती. मला उपयोगाला पडेल असे त्यात काहीच दिसत नव्हते. सकाळचे १० वाजायला आले होते मात्र येवढे श्रम करून माझ्या हातात काहीच पडले नव्हते.
शेवटी उठून मी सकाळचे आवरायला घेतले. त्यातल्या त्यात दिलासा एकच होता की त्या लॅपटॉप मध्ये असे काहीतरी निश्चित आहे जे लपवण्यासाठीच तो फॉर्मॅट मारण्यात आला असावा. थोडेसे खाऊन आणि डोके शांत करून मी पुन्हा कामाला लागलो. युरेका... लॅपटॉपमध्ये लपवलेली पार्टिशन हाताला लागली आणि माझे निम्मे काम झाले. रजिस्टरी एडिट करून पार्टिशन लपवलेले असल्याने मी देखील उगाच खेळत बसलो होतो आणि हाताला काही लागत नव्हते. आता लपवलेल्या पार्टिशन मधला डाटा डिकोड करण्याचे मुख्य काम करणे भाग होते. आणि डिकोडींगला बसायचे म्हणजे दोन पेग पुन्हा मस्ट होते.
मी पटापट दोन पेग मारले आणि उद्योगाला लागलो. दुपारच्या सुमाराला जेवण घेऊन कोणी ना कोणी नक्की आदळणार होते आणि त्याच्या आत मला शक्य तेवढे काम उरकायचे होते. बर्याचशा डेटासाठी MD5 ची मदत घेण्यात आली होती. जवळजवळ सर्वच टेक्स्ट Md5 Hash मध्ये कन्व्हर्ट करण्यात आले होते. Md5 हे त्यावेळी तसे दुर्बोध पण डाटा लपवण्याचे प्रभावी माध्यम होते. I Love U हे येवढे साधे वाक्य MD5 च्या मदतीने 'b2182ac3e44263f4bd92cb7f6bd9183' अशा प्रकारे हॅश मध्ये रूपांतरित होत असे. तासाभराच्या अखंड परिश्रमानंतर संपूर्ण डाटा टेक्स्ट मध्ये रूपांतरित झाला. सर्वात आधी तो डाटा मी माझ्याकडच्या पेनड्राईव मध्ये सुरक्षित उतरवून घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा ग्रॅनीचा लॅपटॉप 'जैसे थे' स्वरूपात तिच्या खोलीत ठेवून दिला. मी माझे काम संपवून विसावलोच असीन की दारावरची बेल वाजली.
मी एकीकडे स्कॉर्पिअन बरोबर जेवत होतो तर दुसरीकडे माझे विचारचक्र मात्र वेगळ्याच दिशेला धावत होते. अर्थात जेवताना आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणी कामाची चर्चा करायची नाही हा नियम असल्याने त्याने देखील काही विचारले नसावे. परतताना मात्र त्याने मनात दाबून ठेवलेली शंका बाहेर काढलीच. औषधांचा परिणाम आणि थकवा अशी कारणे सांगून मी तात्पुरती वेळ मारून नेली खरी, पण मी सराइतासारखे खोटे बोलू शकलेलो नाही हे मला जाणवतच होते. मला फ्लॅटवर विश्रांतीसाठी सोडून स्कॉर्पिअन कामासाठी पुन्हा बाहेर निघाला. आता तो आणि 'द विच' दोघांवरच संपूर्ण कामाचा ताण आलेला होता. सध्या स्कॉर्पिअन विझा मिळवण्याच्या खटपटीत होता. लवकरात लवकर 'मोंटानाला' कुच करायची त्याला घाई करण्यात आली असावी. ह्याचा अर्थ स्पष्ट होता, की लवकरच आम्हाला दिल्लीला हालावे लागणार होते. एकदा भारत सोडला की माझ्या हातात काहीच उरणार नव्हते, त्यामुळे जे काय करायचे होते ते दिल्लीला पोचण्याच्या आतच. कारण आत्ता सारखा दिल्लीत मला एकांत मिळेलच अशी खात्री नव्हती.
फ्लॅटवर आल्या आल्या मी त्वरेने ग्रॅनीच्या लॅपटॉप मधून मिळवलेला डाटा वाचायला सुरुवात केली. ह्या मिशनमध्ये ग्रॅनी अगदी पहिल्या दिवसापासून जोडली गेली असावी. कोणते लोक निवडावेत, कसे निवडावेत, त्यांना काम कसे वाटून द्यावे ह्याची अगदी पद्धतशीर आखणी ग्रॅनीने केल्याचे दिसत होते. बर्याचशा डाटा मध्ये वेगवेगळे हॅकर्स, त्यांच्या कामाची पद्धत इत्यादी माहिती भरलेली होती. ग्रॅनी रोज पाठवत असलेल्या रिपोर्ट्सची एकेक कॉपी देखील तिच्याकडे सेव्ह करण्यात आलेली होती. थोडी अजून उचकापाचक करत असतानाच मला ग्रॅनी स्वतःच्या संदर्भासाठी आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी काढत असलेली टिपणांची फाइल हाताला लागली. ती फाइल मी अधाशीपणाने वाचायला सुरुवात केली आणि जसं जसा मी पुढे पुढे सरकत होतो मला बसत असलेली धक्क्यांची तीव्रता वाढत चाललेली होती. ग्रॅनीच्या एकेक नोंदी ह्या माझ्या विचाराला पाठबळा देणार्याच निघत होत्या.
१७ मे :- आम्ही कामाला सुरुवात केली आहे खरी, पण हे काम नक्की कुठले आहे ह्या संभ्रमात मी अजूनही पडलेली आहे.
१८ मे :- 'द विच' ला सर्वरचा अॅक्सेस देण्याची सूचना मला का करण्यात आली असावी ? हेड ऑफिसला जाणार असलेल्या प्रत्येक रिपोर्टची एक कॉपी तार तिला मिळत असतेच. माऊस नक्की कोणावर अविश्वास दाखवत आहे ?
२३ मे :- अर्धा टप्पा पार झाला. का कोणास ठाऊक पण कार्पोल सारखा वासनांध माणूस इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती कार्यरत केला असावा ह्यावर माझा अजूनही विश्वास बसायला तयार होत नाहीये. आम्ही नक्की कोणाला डबलक्रॉस करत आहोत ? अमेरिकेला का रशियाला ?
२७ मे :- आज बुलडॉगच्या हाताला काहीतरी विशेष लागले, पण त्याला माझ्याशी ते फक्त खाजगीत शेअर करायचे होते. बुलडॉगच्या माहितीने माझा विश्वास अजूनच ठाम केला आहे की हे मिशन सॅटेलाईट डिस्ट्रॉयरचे नक्की नाही. आता मात्र लवकरच ठामपणे निर्णय घेण्याची हेड ऑफिसशी बोलण्याची वेळ आली असे वाटते.
२ जून :- आज बहुदा कार्पोलचा माहितीसाठा संपूर्णपणे हाताला लागेल असे वाटत आहे. मी आणि बुलडॉग मात्र आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोवर 'सायबर आर्मी' प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला दिली जात नाही तोवर कार्पोलची माहिती रिपोर्टमधून पुढे सरकणार नाही. ओह गॉड, ही माणसे जगाला कुठे घेऊन चालली आहेत?
आज 'द विच' चा अॅसेस देखील थांबवण्याची आवश्यकता आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो मात्र आजच हे नक्की.
--
इथेच ग्रॅनीची टिपणे संपत होती, कारण २ जूनलाच आमच्यावर हल्ला झाला आणि चित्रच पालटले. एका मात्र नक्की समजले की मी ज्या मिशनवर काम करत आहे ते फार वेगळे आणि अकल्पित आहे. एक मात्र बरे झाले की निदान दिल्लीला पोचण्याआधी माझ्या ज्ञानात बरीच भर पडली होती. आता शक्य झाल्यास बुलडॉगचा लॅपटॉप नजरेखालून घालणे गरजेचे होते. 'सायबर आर्मी' शब्दाने मात्र मला फारच विचलित करून सोडले होते हे नक्की.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
29 Sep 2011 - 2:23 pm | सुहास..
धन्यवाद,
निचितीने वाचतो , तुर्तास लिहिल्याबद्द धन्यवाद देवुन घेतो ब्वा ;)
29 Sep 2011 - 2:24 pm | मृगनयनी
ओह!!.. ओ... येवढं सगळं तू टंकत होतास.. म्हणून तुला खरडीन्ना प्रतिक्रिया देता आल्या नाहीत कं!!!... ;)
___
बाकी वरचा लेख नेहमीसारखाच... उत्कन्ठावर्धक!!! :)
अजून येऊ देत... "क्रमशः" ;)
29 Sep 2011 - 2:35 pm | ढब्बू पैसा
काय वेगवान आणि किती किती लिहिलं आहेस! तू वैतागलास की चांगलं लिहितोस ;) पण आता पुढचा भाग जरा लवकर टाकावा, जीव उगाच टांगणीला लागून राहतो!
हॅकर्सचं विश्व म्हणजे तुझं होमपिच हे तू पुन्हा सिद्ध केलंस.
(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत) ढब्बू
29 Sep 2011 - 2:35 pm | विनायक प्रभू
वाचन खुण जपल्या गेल्या आहेत.
29 Sep 2011 - 3:18 pm | किसन शिंदे
बर्याच दिवसांनी 'हॅकर्स...' परत आलयं. ३-४ महिन्यापुर्वी संपुर्ण कथा एकदम वाचली होती त्यामुळे पटकन लिंक लागत नव्हती.
असो. हॅकर्स पुन्हा भेटीला आणल्याबद्दल धन्यवाद पराशेठ.
29 Sep 2011 - 3:21 pm | जे.पी.मॉर्गन
भिड परा... आम्ही वाचतोय ! आतापर्यंत जबर्याच !!
जे.पी.
29 Sep 2011 - 3:40 pm | प्राजक्ता पवार
झकास !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ....
29 Sep 2011 - 4:05 pm | मृत्युन्जय
वाट बघा. मागच्या भागानंतर एका वर्षाने पुढचा भाग आला आहे. या रेटने पराचा मुलगा त्याची कथा पुर्ण करायचा.
बाकी लिहिले मस्त आहेस हो परा
29 Sep 2011 - 5:27 pm | प्रास
आणि सुमारे हजार वर्षांनंतर तेव्हाची लोकं म्हणतील जसे तीन हजार वर्षांपूर्वी पिता-पुत्र होते बाणभट्ट आणि पुलिंद तसेच आहेत हे 'हॅकर्स अंडरग्राऊण्ड' लिहिणारे परा आणि ते पूर्ण करणारे परा (ज्यु.) ;-)
बाकी पराशेठ, उत्तम जमलाय हा भाग. उत्कंठापूर्ण. पुढील भागही येऊ द्या लवकर लवकर....
29 Sep 2011 - 4:16 pm | शाहिर
छान लिहिला आहे !!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ....
29 Sep 2011 - 4:23 pm | प्रीत-मोहर
काय रे परा.. कथेचा पुढचा टाकल्याबद्दल _/\__
बाकी मृत्युन्जय शी सहमत व असहमत ही. पराची मुलगीही ही कथा पुर्ण करु शकते म्हटल ..
29 Sep 2011 - 6:16 pm | वाहीदा
अन हो पराचा मुलगाच का ? मुलगी का नाही ??
पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा काही हलणार नाही का कधी ?
29 Sep 2011 - 7:30 pm | मृत्युन्जय
अहो तुम्ही आणि प्रीमो लिहाल तेव्हा तुमची मुलगी म्हणेन वाटल्यास. ;)
29 Sep 2011 - 4:27 pm | स्मिता.
हे मी आधी कसं वाचलं नव्हतं? आता पहिल्यापासून सगळं वाचून काढलं... जबराट आहे.
29 Sep 2011 - 4:45 pm | मन१
मस्त रे! पण एकेका भागासाठी इतका वेळ घेणं म्हणजे वाचकांवर अत्याचार करणच आहे.
असला लिखाणखंड/ लेखनदरी एक सायबर क्राइमचाच भाग म्हणूनच धरण्यात यायला हवी.
पटापट टाकायचं सोडून इतका वेळ धीर धरवणं आवाक्याबाहेरचं काम आहे बुवा.
29 Sep 2011 - 6:25 pm | रेवती
छानच लिहितोस!
29 Sep 2011 - 7:27 pm | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस रे, जाम मजा आली पण गॅप थोडा जास्त वाटतोय अर्थात तुमचं कार्यबाहुल्य लक्षात घेता खुप जास्त नाही.
29 Sep 2011 - 7:36 pm | इंटरनेटस्नेही
.
29 Sep 2011 - 8:08 pm | निखिल देशपांडे
पुढचा भाग येणार आहे का????
29 Sep 2011 - 8:25 pm | इष्टुर फाकडा
जबरी लेखमाला परा....पुढचा भाग लवकर येवूद्या....नाहीतर मागचं सपाट होतंय...
29 Sep 2011 - 8:57 pm | घाटावरचे भट
व्वा!!
29 Sep 2011 - 10:41 pm | पिंगू
चला बर्याच दिवसांनी का होईना.. हॅकर्स अंडरग्राउंड होते आणि ते आता ओव्हरग्राउंड होतातेत..
- पिंगू
29 Sep 2011 - 11:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
30 Sep 2011 - 1:20 am | बिपिन कार्यकर्ते
किती मोठी गॅप रे! च्यायला! वेगवान आहे कथानक!
30 Sep 2011 - 8:08 am | स्वाती२
भन्नाट आहे!
30 Sep 2011 - 9:30 am | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच प्रभावी लिखाण
30 Sep 2011 - 11:20 am | आदिजोशी
पर्या लेका पटापट लिही की जरा.
30 Sep 2011 - 1:57 pm | स्वानन्द
सह्हीच.... हा भाग येईल ही आशाच सोडली होती.
3 Oct 2011 - 8:22 am | राजेश घासकडवी
कथानक वेगवान वाटण्यामागे मोठी कथा कमी शब्दांत, थोडक्यात सांगण्याचा हातभार आहे का? तुम्ही या कथेला न्याय देत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दुर्दैवाने मिपावर कांदबरी लिहिणं शक्य नाही, पण वीस पानांचं कथानक पाच पानांत कोंबल्यासारखं वाटलं.
जरा सुकून से लिखो, जनाब.
3 Oct 2011 - 6:23 pm | श्यामल
मस्तच ! पुढील भाग लवकर येऊ दे .
4 Oct 2011 - 12:39 am | साती
मस्तं लिहिलंय.पुढिल भाग पटापट लिहा.