हॅकर्स अंडरग्राउंड - ६

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 Oct 2011 - 2:10 pm

हॅकर्स अंडरग्राउंड - १

हॅकर्स अंडरग्राउंड - २

हॅकर्स अंडरग्राउंड - ३

हॅकर्स अंडरग्राउंड - ४

हॅकर्स अंडरग्राउंड - ५

२ जून :- आज बहुदा कार्पोलचा माहितीसाठा संपूर्णपणे हाताला लागेल असे वाटत आहे. मी आणि बुलडॉग मात्र आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोवर 'सायबर आर्मी' प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला दिली जात नाही तोवर कार्पोलची माहिती रिपोर्टमधून पुढे सरकणार नाही. ओह गॉड, ही माणसे जगाला कुठे घेऊन चालली आहेत?
आज 'द विच' चा अ‍ॅसेस देखील थांबवण्याची आवश्यकता आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो मात्र आजच हे नक्की.
--
इथेच ग्रॅनीची टिपणे संपत होती, कारण २ जूनलाच आमच्यावर हल्ला झाला आणि चित्रच पालटले. एका मात्र नक्की समजले की मी ज्या मिशनवर काम करत आहे ते फार वेगळे आणि अकल्पित आहे. एक मात्र बरे झाले की निदान दिल्लीला पोचण्याआधी माझ्या ज्ञानात बरीच भर पडली होती. आता शक्य झाल्यास बुलडॉगचा लॅपटॉप नजरेखालून घालणे गरजेचे होते. 'सायबर आर्मी' शब्दाने मात्र मला फारच विचलित करून सोडले होते हे नक्की.
------------------------------------------------------------------------------------------
दोनच दिवसात आम्ही दिल्लीला रवाना झालो. दोन्ही दिवस स्कॉर्पिअनचा मुक्काम फ्लॅटवरच असल्याने त्याला चुकवून बुलडॉगचा लॅपटॉप शोधणे आणि चेक करणे मला अशक्यच होते. शेवटी दिल्लीत गेल्यावर प्रयत्न करायचे ठरवून मी आता माझे सगळे विचार 'सायबर आर्मी' ह्या शब्दाभोवती केंद्रित केले. हे प्रकरण नक्की काय आहे आणि त्याची माहिती कशी आणि कुठू मिळवावी ह्याचा विचार डोक्यात पिंगा घालायला लागला. अर्थात ही माहिती मिळवणे आणि ती मिळाल्यावर जिवंत राहणे हे किती अवघड आहे ह्याची जाणीव मला नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाने आलेली होतीच.

दिल्ली एयरपोर्टच्या जवळच आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. फोन, इंटरनेट आणि घराबाहेर पडणे ह्याला पूर्णपणे बंदी होतीच. बाबला नावाचा एक माणूस आमच्या दिमतीला देण्यात आला होता. तो दिवसातून चार वेळा खाणे-पिणे आणि इतर गरजांची काळजी घ्यायला हजेरी लावून जायचा. दोन दिवस म्हणता म्हणता ४ दिवस झाले पण आमची भार सोडण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. 'द विच' अथवा हेड ऑफिसकडून कसलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला नव्हता. नक्की बाहेर काय चालले आहे ह्याची कल्पना येणे देखील शक्य होत नव्हते. लॅपटॉप, मोबाईल विमानतळावरच काढून घेण्यात आले होते. घरात टीव्ही होता पण तो सिडी प्लेयर पळवण्या व्यतिरिक्त कुठल्याच कामाचा नव्हता, त्यात स्कॉर्पिअनला देखील काहीच माहिती नसल्याने अक्षरश: जगापासून संपर्क तुटल्यासारखीच अवस्था झाली होती.

नुसते हातावर हात धरून बसण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात आल्यावर एके दिवशी मी आणि स्कॉर्पिअनने बाबलाला घोळात घेतले. कधी नव्हे ते स्कॉच सारखी दारू मिळाल्यावर बाबला देखील जोषामध्ये आला होता. मग पुढे बाबला ढोसून ढोसून लास होईपर्यंत बाबलाच्या 'मनाच्या श्लोकांनी' आमची चांगलीच करमणूक केली. बाबला कसा 'लै भारी' चोर होता, त्याने किती तिजोर्‍या कशा चुटकीसरशी साफ केल्या, तो एकदा पोलिस स्टेशनातून कसा पळाला इ. चे रसभरित वर्णन करून मग सावकाश बाबला कलंडला. या सगळ्यात हाताला माहिती अशी फारच कमी लागली. कुठल्याश्या बार मध्ये म्हणे बाबलाला अचानक एक 'भगवान का अवतार' भेटला ज्यानं बाबलाला फक्त दोन माणसांची काही दिवस सेवा करण्याच्या कामाच्या मोबदल्यात भरपूर पैशाचे आमिष दाखवले आणि चक्क त्या रात्री बाबलाला १०,००० रुपये देखील हातात पडले. तिसर्‍या दिवशी कुरिअरने बाबलाला ह्या फ्लॅटचा पत्ता आणि किल्ली मिळाली. आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या सूचना बाबला फोनवरती मिळत होत्या.

अर्थात येवढी सावधगिरी बाळगणे आमच्या संघटनेला आवश्यकच होते, आणि कदाचित नुकत्याच झालेल्या गोळीबाराने देखील त्यांना हा अतिसावध पवित्रा घ्यावा लागला असावा. त्यातल्या त्याला नशीब म्हणजे बाबला आपला फोन बरोबर घेऊन आला होता. आम्ही ताबडतोब त्याचा फोन हस्तगत केला आणि द विच ला कॉंटेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या नंबरला आऊटगोईंग फॅसेलिटी नसल्याचे ऐकून कान तृप्त करून घेतले. इनकंमींग कॉल्स मध्ये सगळे कॉलिंग कार्डसचेच नंबर असल्याने त्यांचा देखील पुढे मागे उपयोग होण्याची आशा बारगळली. आत धाडस करायलाच लागणार होते. स्कॉर्पिअनला बाबलावरती लक्ष ठेवायला सांगून मी घराबाहेर पाऊल टाकले...

दिल्ली माझ्यासाठी अगदी नवी होती. मला तर धड कुठल्या भागाचे किंवा रस्त्याचे नाव देखील ठाऊक नव्हते. शेवटी STD बूथचा पत्ता विचारत विचारत मी पुढे निघालो. मी रस्ता पार केला असेन नसेन तेवढ्यात माझ्या कमरेत काहीतरी खुपसले गेले आणि मी जागीच थबकलो. ती रिव्हॉल्वरची नळी होती आणि खुपसणारा माझ्यासारख्या दहा जणांना थोपवता येणार नाही असा प्रचंड होता. त्याने एकदा शांतपणे माझ्याकडे बघितले आणि नंतर आमच्या फ्लॅटच्या बिल्डिंगकडे मान वळवली. योग्य तो अर्थ समजून मी गपगुमान घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. फ्लॅटमध्ये परतलो तेव्हा सुजलेल्या तोंडाने स्कॉर्पिअन आणि बंद झालेल्या श्वासांनी बाबला माझीच वाट बघत होते.

बाबलाच्या मरणाचा का कोण जाणे पण स्कॉर्पिअनने प्रचंड धसका घेतला होता. अर्थात त्याला ज्या पद्धतीने स्कॉर्पिअन समोर ठार करण्यात आले, ते लक्षात घेता हे स्वाभाविकच होते. आम्ही गुन्हेगार असलो तरी बंदुका, रक्तपात, खून ह्यासारख्या प्रकाराशी आमचा संबंध कधी आलाच नव्हता. नाही म्हणले तरी झाल्या प्रकाराने मी देखील हादरलोच होतो. आमच्यावर पाळत ठेवली जात होती हे नक्की. आता ह्यापुढे कुठलीही हालचाल ही फारच सावधपणे करावी लागणार होती. स्कॉर्पिअनचा तर प्रश्न नव्हता, तो तर भांडे पडले तरी दचकून जायला लागला होता. रात्री बेरात्री दचकून उठत होता. अर्थात तो हे सगळे नाटक करत नसेल तर...

बाबलाच्या जागी आता नव्या माणसाची नेमणूक करण्यात आली होती. बाबलाचा धक्का इतका भयानक होता की आम्ही ह्या नव्या माणसाचे नाव विचारण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत. फक्त काय हवे नको ते त्याला कागदावर लिहून द्यायचे बस्स. बघता बघता आठवडा गेला आणि एक दिवस आमचे लॅपटॉप नवीन केअर टेकर बरोबर आम्हाला पाठवण्यात आले. बरोबर एक जाडजूड लखोटा देखील होता ज्यात कुठल्याशा चर्चपासून दिल्लीच्या फ्रेडरिक बॅंकेपर्यंतचा रोड सिग्नल्सचा नकाशा आणि बॅंकेच्या सिक्युरिटी व्हॅनचा मार्ग देण्यात आला होता. भारत सोडण्याची आमची तयारी पूर्ण होत आली होती, मात्र जाता जाता आम्ही येवढे काम संपवून मगच तिथून हालायचे होते. काम अर्थात सोपे नव्हतेच. संपूर्ण सिग्नल व्यवस्थेचा अभ्यास करून, कोणत्यावेळी कोणता सिग्नल चालू अथवा बंद करायचा, त्याचे टायमिंग व्हॅनला कसे जुळवायचे आणि मुख्य म्हणजे व्हॅन लुटली गेल्यावर परतींचा रस्ता मोकळा कसा ठेवायचा हे पूर्ण प्लॅन करायचे होते. अर्थात ह्या सर्वासाठी सिग्नल यंत्रणा हॅक करणे हा सगळ्यात मोठा कार्यभाग होताच होता.

हॅ़किंगसाठी का होईना आता नेट वापरायला मिळेल, निदान हे काम पूर्ण होताच इथून तरी बाहेर पडता येईल ह्या आशेनं आम्ही दोघे उत्साहाने कामाला लागलो होतो. रस्ते, सिग्नलचे नकाशे अगदी पर्फेक्ट होते. २ सिग्नल सोडल्यास बाकी सगळेच सिग्नल १२० सेकंदाचे असल्याने कामात जास्ती डोकेफोड करावी लागणार नव्हती. फक्त महात्मा गांधी रोडला जोडणारा एक मोठा रस्ता सिग्नल बंद पडलेला होता आणि त्या रस्त्यावर बर्‍याचदा ट्रॅफिक जाम असायला अशी नोंद होती. अर्थातच परतीची वाट हा रस्ता टाळून दुसर्‍या समांतर मार्गावरून आणि तेवढ्याच वेगाने असणे गरजेचे होते. वेबकॅम मध्ये माझी मास्टरी असल्याने ते काम मी आनंदाने माझ्याकडे घेतले होते, तर स्कोर्पिअन सिग्नलशी झुंजत होता.
*खरेतर रस्त्यावरचे सिग्नल्स आणि ते ही भारतातले हॅक करणे हे सगळ्यात सोपे काम. बहोतकरुन सिग्नल पॅनल्स ही लॉक केलेलीच नसतात. ती उघडली की डिस्प्ले बोर्ड आणि काळ्या रंगाचे कंट्रोल पॅड जणू तुमचीच वाट बघत असते. प्रोग्रॅमिंगमध्ये जाऊन 'इंस्टट टेक्स्ट' सिलेक्ट केले की झाले काम, मग करा हव्या त्या गंमती जमती. पण कधी कधी प्रोग्रॅम लॉक देखील टाकण्यात आलेले असते पण हरकत नाही, प्रत्येक रोड सिग्नलचा डिफॉल्ट पासवर्ड असतो DOTS. काही वेळेला काही हुशार अधिकारी हा पासवर्ड बदलून ठेवतात, मात्र त्याने काही विशेष फरक पडत असे नाही. कंट्रोल आणि शिफ्ट दाबून धरून DIPY टाईप केले की पासवर्ड पुन्हा DOTS म्हणून रिसेट होतो. आहे का नाही सोपे काम ?* पण त्यासाठी देखील आमच्या स्कॉर्पिअनने ५ दिवस घेतले. अर्थात सिग्नलचे टायमिंग मॅच करणे, कोणत्या चौकात कोणत्या मिनिटाला कोणता रंग हवा ह्याचा अभ्यास करणे ही जिकरीची कामे होती हे मान्य करावेच लागेल.

बॅंकेचे व्हॅनमधील कॅमेरे इंटरनेटला जोडलेले असल्याने माझे काम तर फारच सोपे झाले. डिस्प्ले मध्ये घुसून फक्त मोशन कंट्रोल लॉक करायचे होते. अर्थात त्या कॅमेर्‍या ऐवजी कॅमेर्‍या समोर बसलेल्या गार्डसना काय स्ट्रिम दाखवायची ते अजून ठरायचे होते. अर्थात जे मी दाखवणार तेच ते मॉनिटरींग करत राहणार होते. आठव्या दिवशी आम्ही संपूर्णपणे तयार झालो आणि आमची रवानगी एका गजबजलेल्या वस्तीतल्या गोदामात करण्यात आली. पुढचे दोन दिवस चार लोकांच्या निगराणीखाली आमचे प्रयोग सुरू झाले. पुढील दोन दिवसातच आम्ही आमच्या दिलेल्या कामात पूर्ण यश मिळवले. व्हॅनच्या मार्गावरची संपूर्ण यंत्रणा आणि व्हॅनमधील कॅमेरे आता आमच्या इशार्‍यावर नाचण्यासाठी सज्ज होते. आता आम्ही वाट बघत होतो ती बुधवारच्या सकाळची..

(क्रमश:)

(*काही पायर्‍या गाळलेल्या आहेत. तरी कृपया ह्या पद्धतीचा वापर करून कुठलेही नको ते खेळ करण्याच्या प्रयत्न करू नये.)

कथामौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मोहन's picture

5 Oct 2011 - 2:15 pm | मोहन

लवकरच पुढचा भाग टाकल्या बद्द्ल पराभाऊंचे अभार. पुभाप्र

५० फक्त's picture

5 Oct 2011 - 2:30 pm | ५० फक्त

आभार लगेच पुढचा भाग टाकल्याबद्द.

शाहिर's picture

5 Oct 2011 - 2:38 pm | शाहिर

प रा भौ ..

लय्य भारी काम केलत बगा ..

ते सिग्नल च तेव्ह्ढा सांगा कि राव , रोज लेट होतो हापिस ला ;)

जे.पी.मॉर्गन's picture

5 Oct 2011 - 2:47 pm | जे.पी.मॉर्गन

त्ये * चं शेवटी क्लियर केलं म्हणून ठीके ;)

लई भारी रंग भरतोय... पुढच भाग येऊद्या लवकर !!

जे.पी.

इष्टुर फाकडा's picture

5 Oct 2011 - 2:55 pm | इष्टुर फाकडा

पुढचे भाग येवूद्या लवकर :)

प्राजक्ता पवार's picture

5 Oct 2011 - 4:15 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

प्रास's picture

5 Oct 2011 - 4:29 pm | प्रास

हा भागही बाकींसारखाच आवडला.

ते सिग्नलचं प्रकरण पायर्‍या न गाळता दिलं असतं तरी आम्हाला काय पण कळलं नसतं हे जाता जाता नमूद करून ठेवतोय... ;-)

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 6:57 pm | आत्मशून्य

टू हॅक दी सिग्नल अरांऊड, आफ्टर टेन पि एम. पायर्‍या गाळल्याने अजून मज्या येणार हे निश्चीत ;)

इशारा आवडला !

आता असेच लवकर लवकर भाग येउ द्या पराशेठ ..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Oct 2011 - 6:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मजा येतेय... उत्कंठा वाढतेय...

अवांतरः

काही पायर्‍या गाळलेल्या आहेत. तरी कृपया ह्या पद्धतीचा वापर करून कुठलेही नको ते खेळ करण्याच्या प्रयत्न करू नये

गाळलेल्या पायर्‍या व्यनी करता कां? नाही थोडी गंमत करुन बघावी म्हणतो ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Oct 2011 - 6:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्र.का.टा.आ.
द्विरुक्ती!! :(

मृत्युन्जय's picture

5 Oct 2011 - 6:42 pm | मृत्युन्जय

मला लिंक नाही लागली नीटशी या भागात. परत वाचतो एकदा आणि मग निवांत प्रतिक्रिया देतो.

पैसा's picture

5 Oct 2011 - 7:04 pm | पैसा

पुढचे भाग असेच लवकर येऊ देत!

यकु's picture

5 Oct 2011 - 9:12 pm | यकु

मस्त!
मजा येतेय.

प्रीत-मोहर's picture

5 Oct 2011 - 10:26 pm | प्रीत-मोहर

हा भागही मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2011 - 2:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्‍या, सावकाश नीट उचकटून लिही रे. आणि ती खव बंदच ठेव.

एकदम आवडले.
पुढचा भाग टाका लवकर लवकर.जसा ५ & ६ टाकला पटापट.

अमोल मेंढे's picture

6 Oct 2011 - 2:21 pm | अमोल मेंढे

आवडेश पुलेप्र

मी-सौरभ's picture

6 Oct 2011 - 4:26 pm | मी-सौरभ

रंग भरायला आत्ता सुरवात झालीय....
पुढचा भाग अजून वेगवान आणि रंगतदार असेल अशी खात्री आहे.

पु. ले. प्र.

श्यामल's picture

6 Oct 2011 - 4:53 pm | श्यामल

सर्वप्रथम धन्यवाद !.............. त्वरित हा भाग टाकल्यावद्दल. हा भागही मस्तच !

पुढचा भाग असाच लवकर टाकण्याची कृपा करावी ही नम्र विनंती............

सुहास..'s picture

7 Oct 2011 - 12:31 pm | सुहास..

उ त्कं ठा !

राम भाऊ's picture

7 Oct 2011 - 7:15 pm | राम भाऊ

तुमचे सगले भाग अप्रतिम आहेत...

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 7:00 pm | मी-सौरभ

पुढचा भाग टंकलायत का कुठे?