जीवाची पोकळी - ५

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
19 Sep 2011 - 10:01 pm

जीवाची पोकळी-१
जीवाची पोकळी-२
जीवाची पोकळी-३
जीवाची पोकळी-४

लग्नाआधी दहा वर्षं बेसुमार आणि लग्नानंतर चोरून दोन वर्षं सिग्रेटी फुंकूनही एवढा दाब सहन करण्याएवढा दम आपल्या छातीत अजून आहे हे ऐकून माझा आनंद त्या हॉलमध्ये मावेना. त्या आनंदात बाहेर जाऊन एखाद्-दोन झुरके मारून यावं असं मला वाटलं. पण इतक्या वर्षांनी आणि एवढा दाब पडल्यावर एखादा झुरका घ्यायचो आणि छाती पिचायची अशी भीती वाटल्याने मी तो बेत रहित केला.
त्या नंतर दर तासाला एक अशा चार-पाच फेर्‍या मारल्या. प्रत्येकवेळी वजनरहित अवस्थेचा वेळ वाढला की काय असे वाटत होते. नंतर नंतर तर दाबाचं काहीच वाटेनासं झालं आणि वजनरहित झाल्यावर पट्टे सोडून कार्टमध्ये बागडावं असंही वाटू लागलं. आजची शेवटची फेरी संपली असं जाहीर केलं गेल्यावर, रस्लन आणि डुशा लॉबीपर्यंत आम्हाला सोडायला आले तेव्हा मी रस्लनला पट्टे सोडण्याबद्दल विचारलंच. तो हसला.
"तुमचा जोश मला समजतो, मिस्तर करबुदे, उद्या तुम्ही कार्टमध्ये झोपून नाही तर उभं राहून आपण सिम्युलेशन करायचे आहे. आणि परवा तर फक्त कमरेला एक दोर बांधून सराव करायचा आहे.", तो म्हणाला.
मी आनंदाने मान डोलावली. बायकोने छातीवर हात ठेवून "अगं बै" वगैरे म्हणून माफक भीती व्यक्त केली. रस्लन आणि डुशाला रात्रीच्या शुभेच्छा देऊन आम्ही रजा घेतली. दमल्यामुळे कुठेही न जाता खोलीतच बसून टीव्ही मुका करून दिवसभराच्या अनुभवांची उजळणी करत पाहिला, रात्र झाल्यावर फोनवरून मिळालेल्या आचार्‍याच्या सल्ल्याने चेरी नालिवका पीत गरमागरम स्वितानाक आणि काशा चापला आणि साडेनवालाच दुलईत शिरलो. पुन्हा एकदा बरीच प्रतीक्षा केल्यावरही झोप आली नाही म्हणून मी शवासन केले आणि डोळे गच्च मिटले. कानात बासरीचे मंद सूर ऐकू येताहेत असा भास होऊ लागला. हळू हळू डोळे जड होत गेले आणि अलगद मी झोपेच्या खोल डोहात उतरत गेलो.
पुढचे दोन दिवस असेच धामधुमीत गेले. उभ्याने पट्टे बांधून फेर्‍या मारून झाल्या. नंतर नुसता कमरेला दोर बांधून फेर्‍या मारून झाल्या. आम्ही आता अगदी सराईतासारखे तरंगू लागलो होतो. दाब वाढायला लागला की कार्टच्या भिंतीला चिकटणे आणि वजनरहित अवस्था आली की पटकन बागडून घेणे आम्हाला चांगलं जमायला लागलं. इतकं की शेवटच्या फेरीपर्यंत आम्ही त्याच त्याच उड्या मारून कंटाळलो. इथेच असं झाल्यावर प्रत्यक्ष स्पेस हॉटेलात काय करणार अशी एक कुशंका माझ्या मनात येऊन गेली पण माझा अनुभव वापरून मी ती बायकोसमोर प्रकट न करता गिळली.
अखेर ज्या दिवसासाठी इतके पैसे, इतका वेळ खर्च करून, इतक्या लांब येऊन आम्ही राहात होतो, तो दिवस उजाडला. आदल्यारात्री स्वप्नात मोरपंखी रंगाच्या समुद्राच्या, रुपेरी वाळूच्या किनार्‍यावर मनसोक्त हुंदडून घेऊन मी सकाळी मोठ्या प्रसन्न मनाने जागा झालो. आजपर्यंत लक्षात राहिलेल्या काही चेहर्‍यांनाही स्वप्नात मी पाहिल्याचे मला अंधुक आठवत होते.
अत्यंत उत्तेजित अवस्थेत रस्लन आणि डुशाबरोबर आम्ही हॉल मध्ये आलो. तिथे एका खोलीत नेऊन आम्हाला संक्षिप्तपणे प्रवासाची माहिती दिली गेली. कापुस्तिन यार पर्यंत जाताना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून गाडीने न जाता त्यांनी तयार केलेल्या बोगद्यातून भूमिगत वाहनाने आम्हाला तिकडे नेणार होते. प्रवासात आणि हॉटेलवर पोचल्यावर घालण्यासाठी विशिष्ट कपडे आणि बूट होते. ते पूर्णपणे निर्जंतुक केले गेले होते. अंगावर कोणत्याही प्रकारची छोटी, सुटी होईल अशी धातूची किंवा प्लास्टिकची वस्तू असणार नाही याची काळजी घेतली गेली. ४४५ किलोमीटरवर असणार्‍या कक्षेत फिरणार्‍या हॉटेलात जायला फक्त दोन तास लागणार होते आणि त्यात पृथ्वीभोवतीची एक फेरी फुकट होती! शिवाय गमतीची गोष्ट म्हणजे रस्लन आणि डुशासुद्धा आमच्या बरोबर आमचे केअरटेकर कम वेटर कम चालक कम सहप्रवासी असणार हे ही आम्हाला तेव्हाच समजलं. त्यामुळे तर आम्ही अगदीच निश्चिंत झालो. ते रेडिओ किंवा काय असेल ते आपल्याला ऑपरेट करावं लागणार नाही, खाण्यापिण्याचं बघावं लागणार नाही, नुसते अंतरिक्षातले नजारे बघायचे, इकडून तिकडे तरंगायचं आणि मज्जा करायची या विचारांनी मी आणि बायको दोघेही वेडावून गेलो. शिवाय चार दिवस आंघोळीची कटकट नाही म्हणजे तर सुखाचा परमावधी!
सगळं आटोपून, ते पांढरे स्वच्छ कपडे घालून, आम्ही बोगद्यातल्या भूमिगत कार मध्ये जाऊन बसलो. त्यात चार आसनं होती. पुढच्या दोनवर आम्ही बसलो आणि मागच्या आसनांवर रस्लन आणि डुशा. सगळे डॉक्टर्स, नर्सेस आणि आचारी वगैरेसुद्धा बाहेर आम्हाला निरोप द्यायला जमा झाले. खूप आनंदाने हसत, हात हलवत, अंगठे दाखवत ते आम्हाला निरोप देत होते आणि आता निघायचं या कल्पनेने पोटात गोळा आलेले आम्ही कसबसं हसत त्यांचा हात हलवून निरोप घेत होतो. हे सगळं चालू असतानाच कारची सरकती दारं लागली आणि दोन-तीन सेकंदांतच कार भरधाव निघाली. वरच्या आणि समोरच्या काचेतून फक्त एक लांबच लांब बोगदा आणि त्याच्या छतावर झपझप मागे जाणारी दोन पांढर्‍या दिव्यांची जोडरांग एवढंच दिसू लागलं. मी आणि बायको गंभीर होऊन बघत बसलो. पाचेक मिनीटे ते एकसुरी दृष्य पाहात राहिल्यावर संमोहन झाल्यासारखे माझे डोळे जड झाले आणि मी मान मागे टाकून झोपलो.
जाग आली तेव्हा रस्लन आणि डुशा कारच्या बाहेर उभे राहून हाका मारत होते. आम्ही हळूहळू भानावर येत बाहेर पडलो. रस्लन आणि डुशाच्या मागे एक लिफ्ट दिसत होती. त्या लिफ्टने गेलं की रॉकेटला जोडलेल्या शटलमध्ये आपण पोचणार हे मला कळलं. एक अनामिक भीती माझ्या मनात दाटून आली आणि तिथून पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटावं असं मला प्रकर्षानं वाटलं. शेजारून सूं सूं आवाज आला म्हणून पाहिलं तर बायकोच्या डोळ्यातून गंगा-जमुना आणि नाकातून मुळा-मुठा वाहू लागल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे काय करावं ते न सुचल्याने बावचळलो. स्वतःची भीती महत्प्रयासाने गिळून मी तिच्या खांद्यावर माझा थरथरता हात ठेवला. तो तिने तत्परतेने झटकून टाकला. तितक्यात रस्लन हॉलीवूडच्या हिरोच्या थाटात दमदार पावले टाकत पुढे आला आणि त्याने कुठूनतरी पैदा केलेला रुमाल तिच्या पुढे धरला. तो मात्र तिने घेतला आणि डोळे-नाक पुसायला लागली.
"मिसेस करबुदे, मला समजतंय तुम्हाला किती भीती वाटतेय ते. पण आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. तुम्हाला आणि तुमच्या नवर्‍याला काहीही न होता परत आणण्याची जबाबदारी माझी. मी वचन देतो तुम्हाला. ओके? आता एका शूर मुलीसारखं हसून दाखवा बघू?", असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटले. मी बघत होतो आणि काय आश्चर्य! बायको रुमालामागून फस्कन हसली! रस्लन बद्दल मला एकाएकी फार आदर वाटू लागला. तो नसता तर मला तिची समजूत काढता काढता तोंडाला फेस आला असता हे नक्की.
मग मात्र जास्त न घाबरता वगैरे आम्ही लिफ्टने वर जाऊन शिस्तीत शटलमध्ये बसलो. शटलमधली आसनं आकाशाकडे तोंड करून होती आणि समोरच्या काचेतून वरचं निरभ्र निळं आकाश दिसत होतं. औषधालासुद्धा ढग नव्ह्ता. त्या मोहवणार्‍या निळ्या पोकळीकडे पाहात मी बायकोला म्हणालो,"लोक जिवाचं काश्मीर, जिवाचं स्वित्झर्लँड, जिवाची मुंबई करायला जातात. आपण जिवाची पोकळी करायला चाललोय. नाही?"
"हो नं," बायको हसून म्हणाली आणि माझ्या दंडाला मिठी मारून खांद्यावर डोकं टेकवून बसली. बर्‍याच वेळाने बेल्ट बांधण्याची सूचना झाली. पुढच्या सीटवर बसलेल्या रस्लनच्या समोरच्या पॅनलवर अनेक दिवे लागले. एक स्क्रीन प्रकाशमान झाली आणि त्यावर एका माणसाचा चेहरा दिसू लागला. रस्लन आणि तो त्यांच्या भाषेत आणखी अगम्य तांत्रिक जडजंबाल शब्द पेरत काही तरी बोलले. मग त्या माणसाने दोन्ही हाताचे अंगठे दाखवले आणि काऊंटडाऊन सुरू झाले.
थोडी थोडी करत प्रचंड थरथर सुरू झाली आणि एका क्षणी समोर फक्त निळाई असूनही अत्यंत वेगात आपण वर फेकले गेलोय हे आम्हाला जाणवलं. सरावाच्या नळकांड्यातल्या कार्टमधला दाब म्हणजे नवजात बाळाचं वजन वाटावं असा राक्षसी दाब आमच्या सर्वांगावर पडू लागला. तसंच शांत बसून मंदपणे खोल श्वास घेत आम्ही बसून राहिलो आणि मग काही मिनीटांत शटलचा कोन बदलू लागल्याचं कळलं. आणखी काही मिनीटांत समोरचा निळा रंग हळू हळू गडद होत होत काळा काळा होत गेला आणि एका क्षणी तो कोन असा झाला की आम्हाला काचेतून खाली निळी पृथ्वी आणि भोवताली काळ्या पार्श्वभूमीवर तारे दिसू लागले. आम्ही आधाशासारखं एकदा पृथ्वीकडे आणि एकदा त्या काळ्या पोकळीकडे पाहू लागलो. बराचवेळ असं केल्यावर मान दुखायला लागल्यावर नाईलाजाने स्वस्थ बसलो.
रॉकेटपासून शटल कधी अलग झाले ते आम्हाला कळलेही नाही. काचेतून दिसेल ते पाहात आम्ही बसून होतो. आम्हाला कल्पना नव्हती पण आजूबाजूला बरेच बारीकबारीक तुकडे आणि कचरा तरंगताना दिसत होता. खाली दूर अंतरावर पांढर्‍या ढगांमागे पृथ्वीवरचे वेगवेगळे भूप्रदेश आणि समुद्रांचं पाणी दिसत होतं. हे सगळं बराच वेळ टिपल्यावर अचानक रस्लन म्हणाला,"आपण थोड्याच वेळात डॉक होतोय. मुक्कामाच्या ठिकाणी आपले स्वागत आहे. आशा आहे की आपले इथले वास्तव्य सुखदायक असेल.", आणि तो हसला. आम्हीही हसलो.
लांबून त्याने ते हॉटेल दाखवले. एक नळकांडे आणि त्याला फुगीर गोळा बसवलेला असावा असं चंबूच्या आकाराचं ते हॉटेल दिसत होतं. त्याच्या दोन-तीन दिशांना सौरउर्जेसाठी मोठमोठे पत्रे बसवलेले दिसत होते. खाली निळी पृथ्वी आणि तिच्या पलीकडून सूर्याचा प्रकाश चमकत होता. दृष्य मोठं रोमांचक होतं. माझ्या तर डोळ्यात अश्रूच आले. मग पुन्हा कोन बदलला आणि ते हॉटेल दिसेनासं झालं. आणखी काही वेळाने स्पीकरवर आवाज आला. रस्लन काहीतरी बोलला. एक हलकासा धक्का जाणवला आणि रस्लनने आपला पट्टा सोडला. आम्ही तिथे पोचलो हे आम्हाला कळलं. मी घाईघाईत पट्टा सोडला, उभा राहिलो आणि एकदम उडून दाणकन छतावर माझं डोकं आपटलं. वजनरहित अवस्था केव्हाच सुरु झाली आहे हे माझ्या चांगलंच लक्षात आलं. रस्लनने बटण दाबून वरचं दार उघडलं. वरच्या नळकांड्यातून तरंगत वर गेलो आणि एकदाचे त्या हॉटेलात प्रवेशलो. अतिशय लहान घरासारखं ते हॉटेल आतून विमानाच्या असतात तशा भिंतींचं होतं. एका बाजूच्या त्या फुगीर गोलात चार खोल्या दिसत होत्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूला नळकांड्याच्या शेवटी संपर्काची साधनं होती. बाकी सगळीकडे भिंतींमध्ये कसली कसली कपाटं, नळ्या, डब्बे वगैरे बसवून ठेवले होते. सगळं पाहता पाहता भिंतीचा आधार घेऊन मी स्थिर झालो आणि उभ्या जागीच अलगद पाय वर घेऊन अधांतरी मांडी घालून बसलो. बायकोने ते पाहिले आणि तिला भयंकर हसू फुटले. मग काही वेळ अधांतरी वेगवेगळ्या पोझ घेऊन बसणे, झोपणे वगैरे करून झालं. हॉटेलच्या त्या खोल्यांमध्ये हळूहळू तरंगत फिरून आलो. खोल्यांमध्ये मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या. त्यातून निळी पृथ्वी, काळे आकाश आणि तारे दिसत होते. त्या काचेच्या खिडक्यांतून पाहताना जणू एलसीडी टीव्हीच पाहतोय असं वाटत होतं. खोल्यांमध्ये भिंतीला बांधून ठेवलेले बेड होते. त्यावरही पडून झालं. उणेपुरे तीन-चार तास असे निरनिराळे उद्योग केल्यावर मी तर चक्क कंटाळलो. मग डुशाला सांगून जेवण मागवलं. निर्जलीकरण केलेल्या कसल्याशा गुलाबी चुर्‍यात तिने गरम पाणी घालून आणलं, तो म्हणे साल्मन होता. गाजर-काकडीचं सॅलड मात्र ताजं होतं. खाऊन झाल्यावर तर रिकामपण आणि तिथली भयाण शांतता आणखीच अंगावर आली. अंगावर पांढरे कपडे, पांढरे शूज, पांढरे बेड, पांढर्‍या भिंती आणि काळ्या खिडक्या. डोकं फिरून जाईल असं वातावरण होतं. मग शेवटी बेडवर जाऊन पडलो का उभा राहिलो कोण जाणे आणि बायकोबरोबर गप्पा मारत बसलो. आमचा कॅमेरा आम्हाला त्यांनी आणू दिला नव्हता त्यामुळे आपल्याला याचे फोटो मिळणार की नाही हिच शंका तिला छळत होती. मग ती उठून तरंगत तरंगत डुशा किंवा रस्लनला विचारायला निघून गेली. मी पुढच्या चार रात्री पाच दिवसांचा विचार करत बसलो.
एक दिवस आणि एक रात्र संपतासंपताच आम्ही भयंकर कंटाळलो. रस्लनने नेट सर्फिंग करायचे सुचवले पण त्यातही आम्हाला रस वाटेना. रस्लन आणि डुशा संधी मिळताच आपापल्या खोलीत गडप होत होते. ते बाहेर असते तरी त्यांच्याशी तरी काय गप्पा मारणार म्हणा. नुसतं तरंगत फिरायचं, बाहेर काही दिसतंय का बघायचं, खायचं आणि झोपायचं असं चाललं होतं. आम्ही काही पुस्तक वगैरेही आणलं नव्हतं. व्यायामाला ट्रेडमिल होती पण कोण उगाच घाम काढून कागदाने पुसत बसेल?
गप्पा मारून आणि कुचाळक्या करून आम्ही दोघेही दमलो. दुसर्‍या दिवसाच्या शेवटी आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोलत नव्हतो आणि डुशा-रस्लन दिवसभर खोलीच्या बाहेर दिसले नाहीत. या असल्या मूर्खपणासाठी मी लाखभर पौंड खर्च केले असा विचार करून माझी निराशा आणखीच जीवघेणी होत होती.
अक्षरश: तासन्तास झोपा काढून स्वप्नं पाहात वेळ काढत होतो. जन्मठेपेचा कैदी ज्या आतुरतेने सुटकेची वाट पाहतो त्याच आतुरतेने शेवटच्या दिवसाची आम्ही वाट पाहात होतो. अखेर ती चौथी रात्र आली. म्हणजे तिथून निघायला फक्त १५ तास राहिले होते. झोपून झोपून इतका कंटाळा आला होता की झोपही येत नव्हती पण एकदा बासरी वाजायला लागली की ग्लानी आल्यासारखं व्हायचं. असाच ग्लानीत पडून स्वप्नातल्या स्वप्नात त्या रुपेरी समुद्रकिनार्‍यावर मी गेलो. हातात सर्फबोर्ड घेऊन पळत पळत मी पाण्यात उडी मारली. पोटाखाली सर्फबोर्ड घेऊन हात मारत बराच वेग आल्यावर हात टेकवून उठायला गेलो तर उठताच येईना. पाणी नाकातोंडात जायला लागलं. डोळे उघडले तर अंधार आणि मी बेडला पट्टा बांधून. घाईघाई पट्टा सोडून अलग व्हायला गेलो तरी जमेना. पाठीला काहीतरी बांधलंय असं वाटत होतं. पण नक्की काय आणि कुठे ते कळत नव्हतं. बायकोला हाक मारून उठवलं. ती दचकून उठली आणि घाबरीघुबरी झाली. मी तिला थोडक्यात काय झालं ते सांगितलं आणि रस्लन किंवा डुशाला बोलवायला सांगितलं. ती तरंगत बाहेर गेली. त्या दोघांच्याही केबिन्सची कॉल बटन्स बर्‍याचवेळा दाबूनही दोघांपैकी कोणीच बाहेर येईनात. बायको खूप घाबरली आणि ओरडायला लागली. मी ओरडून तिला शांत राहायला सांगू लागलो. असा दोन-तीन मिनिटं खूप गोंधळ झाल्यावर एकदम दार उघडून रस्लन आणि त्याचवेळी डुशाही बाहेर आले. तिघेही तरंगत माझ्याकडे आले आणि रस्लनने मला हात देऊन अलगद उचलले. यावेळी पाठीला काही बांधलंय असं वाटलं नाही आणि मी सहज तरंगू लागलो. माझा जीव भांड्यात पडला, पण मला तोवर दरदरून घाम सुटला होता. डुशाने लगेच ओले रुमाल पुढे केले. भिंतीला टेकून मी तोंड, मान, हात पुसू लागलो. सुस्कारे टाकू लागलो. रस्लन बायकोला धीर देत होता. मी हळूहळू गुडघे वाकवत भिंतीला टेकूनच खाली बसलो. आणखी एक रुमाल घेऊन मी चेहरा चांगला खसाखसा पुसला आणि समोर पाहिलं. जमिनीवर कोणाच्यातरी बुटाचा मातीचा पुसट ठसा उमटला होता. आकारावरून रस्लनच्या बुटाचा वाटत होता. मला समजेना की त्याचा अर्थ काय? मी तसाच बसून राहिलो.
कसे बसे ते उरलेले तास काढले. बायकोही घाबरली होतीच. येताना आमचे चेहरे खूपच तणावग्रस्त होते. त्या हॉटेलमधून शटलमध्ये आणि शटलमधून पृथ्वीकडे आम्ही निघालो. मी डोळे मिटून गलितगात्र होऊन बसलो होतो.
थोड्या वेळाने थरथर जाणवली आणि मग थांबली. मी डोळे उघडले. "आपण पोचलो.", रस्लनने जाहीर केले.
"फारच पटकन पोचलो." मी म्हणालो. रस्लनने चमकून पाहिले आणि हसला.
पुन्हा लिफ्ट, बोगदा वगैरे प्रकार होऊन आम्ही त्या हॉलमध्ये आलो. सगळे लोक वाट पाहात होतेच. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. बायको आता बरीच सावरली होती. माझं मात्र डोकं उठलं होतं.
लगेच तिथे शँपेनवगैरे फोडली गेली. सगळ्यांनी अभिनंदन करून झाल्यावर रस्लनने मला बाजूला घेतलं.
"तुमच्या अत्युत्तम सहकार्यासाठी ल्यूबोवनिक डॉल कंपनीने तुमच्याकडून घेतलेला २०% प्रवासखर्च म्हणजे एक लाख पौंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शिवाय तुम्हाला दोघांना १० दिवसांची युरोपची टूर दिली जाईल. त्या बदल्यात तुम्ही अंतराळात झालेला प्रकार कोणाला सांगू नये ही विनंती आहे." असं म्हणून त्याने मला एक लिफाफा दिला. उघडून पाहिला तर त्यात एकलाख पौंडाचा बँकर्स ड्राफ्ट होता. माझी डोकेदुखी झटकन थांबली.
"तुमच्या नव्या स्पेस ट्रॅव्हल गेमसाठी मी तुम्हाला सुयश चिंतितो." मी हसत म्हणालो.
"धन्यवाद", रस्लन मोकळेपणी हसला आणि अत्यंत आनंदाने माझा हात हातात घेऊन त्याने दाबला.
त्याच्याकडे पाहून शँपेनचा ग्लास उंचावून मी बायकोकडे गेलो आणि तिला मिठीत घेतलं.

उपसंहारः
साशाचं काय झालं?
साशाही आम्हाला फुकट मिळाली. घरी येऊन मी ती गवसणी वगैरे घालून पाहिली आणि पाचच मिनीटात काढून ठेवली. बायको माहेरी गेल्याशिवाय पुन्हा ती गवसणी घालायची नाही असा मी निर्धार केला आणि कपाटात ठेवून दिली. काही दिवसांनी बायकोच्या चुलतभावाच्या सासर्‍यांचे मित्र अंजिओग्राफी करून घ्यायला म्हणून आमच्या शहरात आले आणि आमच्याकडेच उतरले. मी आणि बायको घरी नसताना ती गवसणी त्यांना कशी कोण जाणे पण गवसली.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो किंवा पुढचा जन्म रशियात देवो. साशाला बायकोने तातडीने केराची टोपली दाखवली.

काही दिवसांनी अपेक्षेप्रमाणे ल्यूबोवनिक डॉलवाल्यांचा स्पेसट्रॅव्हल गेम आला. छोटीशी निरुपद्रवी वैद्यकीय शस्त्रक्रिया करून त्यांच्या भविष्यातल्या प्रत्येक गेमसाठी कंपॅटिबल होण्यासाठी आणि जगभरातले सगळे अनुभव घरबसल्या घेण्यासाठी बरीच आकर्षक जाहिरातबाजी चालू केली होती.
अर्बिटॉल कंपनीने त्यांच्या हॉटेलचे डिझाईन चोरले म्हणून त्यांच्यावर दावा लावला असे कानावर आले. खरे खोटे त्यांनाच माहित.
बायको स्पेस हॉटेल आणि युरोपला जाऊन आल्याने ब्रह्मानंदात आहे. तिला एक लाख पौंड आणि दहा हजार डॉलर परत मिळाल्याचे मी सांगितलेले नाही. तुम्हीही सांगू नका. बरं का?

प्रेरणा

कथाविनोदविज्ञानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

यकु's picture

19 Sep 2011 - 10:19 pm | यकु

हा..हा. हा..

बरंय..!!!! तिच्यायला!!!
चेक वटला की नाही ते सांगा!

कसली ती अंतराळ यात्रा अन कसलं काय?
आमच्या शहरात तरी असले प्रकार अजुन सुरु झालेले नाहीत.
मला तर मोठ्या मॉल मध्ये गेलं तरी जीव गुदमरून जातो... तिथल्या भपक्यामुळं नाही... कोंदड्पणा आणि कृत्रिम हवा, प्रकाश आणि झाकून टाकलेलं आकाश यामुळं!

शुचि's picture

20 Sep 2011 - 1:57 am | शुचि

छान.

नेत्रेश's picture

20 Sep 2011 - 4:46 am | नेत्रेश

आवडले.

जबराट लिहिली होती...
धमाल आली वाचायला :)

सविता००१'s picture

20 Sep 2011 - 10:27 am | सविता००१

जबरी कथा.

आदिजोशी's picture

20 Sep 2011 - 10:36 am | आदिजोशी

बुटाच्या ठशाचं काही कळलं नाही, तेव्हढं जरा समजावून सांगा

बुटाच्या ठशाचं काही कळलं नाही, तेव्हढं जरा समजावून सांगा

अरे देवा.. !!!

पूर्ण कथा वाचून प्रतिसाद देणार होतो. अफलातून सुंदर झाली आहे. तुझ्या इनोव्हेटिव्ह मनाला दाद देतो..

फार फार मजा आली वाचून. पुढच्या भागाची वाट पाहण्यातली तीव्र आतुरता क्वचित जाणवते ती इथे होती.

क्राईममास्तर गोगो's picture

20 Sep 2011 - 10:57 am | क्राईममास्तर गोगो

:-) मस्तच.