फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 8:06 pm

नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?"
माझ्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम."
यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते. आणि यात मला तरी काही वावगं वाटत नाही."
नीलू परत एकदा विचारमग्न चेहरा करत उत्तरली - "शुचि खरं सांग दिवसांतले किती तास तू फेसबुकवर पडीक असतेस? रात्री मधेच उठलीस तर तू फेसबुक रिफ्रेश करतेस असं तूच म्हणतेस मग हे बरोबर का?"
नीलू न्यायाधीशी भूमिकेत शिरल्याने मीदेखील आता डिवचले गेले होते - "वेल तुझे म्हणणे खरे आहे. माझ्याकरता फेसबुक हे व्यसन होऊन बसले आहे पण त्यामागचं कारण तर समजाऊन घे" मी इरेला पेटून म्हटले "तुला मानवी गरजांची मास्लोची चढती भाजणी माहीतच असेल. पैकी तीसरी गरज आहे एखाद्या समूहाचा घटक बनणे/ नाळ जोडणे (कनेक्टेडनेस)/ प्रेम आणि मैत्री. तर चवथी गरज आहे स्वप्रतिष्ठा."
नीलूने तिचा मोर्चा आता चहाकडून लाडवाकडे वळवला होता.लाडवाचा तुकडा मोडत ती म्हणाली - "बरं मग? मास्लोच्या चढत्या भाजणीचा इथे काय संबंध?"
"नीलू संबंध आहे. जर फेसबुकमुळे मला एखाद्या गटाशी, माझ्या मित्रमैत्रिणींशी घट्ट वीण जोपासल्यासारखी वाटत असेल तर माझी तीसरी गरज पूर्ण होत नाही का? : )
शिवाय कोणी माझे फोटो, प्रतिक्रिया "लाईक" केल्या तर स्वप्रतिष्ठा, अहं सुखावण्याची चवथी गरजही पूर्ण होते."
नीलू आता बारीच वैतागलेली दिसत होती. "शुचि तू ऑफीसात जातेस तेव्हा या गरजा पूर्ण नाही होऊ शकत का?"
मी - "अगं कसं शक्य आहे? ऑफीसच्या आवारात एकदा प्रवेश केला की कोणी कोणाचा मित्र नसते अथवा शत्रू नसते. तेव्हा कनेक्टेडनेस, मैत्री या गरजा ऑफीसात कशा पूर्ण होतील ?"
नीलू तिचाच मुद्दा पुढे दामटत म्हणाली - "शुचि फेसबुक हे भावनिक गरजा अप्रत्यक्षरीतीने पूर्ण करण्याचे साधन आहे/असावे याच्याशी मी तरी असहमत आहे. कारण हे म्हणजे तुम्ही एक समांतर आयुष्य जगू लागता असे मला दुर्दैवाने म्हणावे लागेल."
नीलूने एव्हाना लाडू संपवला होता आणि मी देखील या न संपणार्‍या वादसत्राला कंटाळले होते.
"बरं समांतर आयुष्य तर समांतर आयुष्य. एकटेपणापेक्षा ते बरे." म्हणून मी आमची भेट आवरती घेतली.

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

प्रास's picture

30 Aug 2011 - 9:10 pm | प्रास

मैत्रीणीबरोबर झालेल्या डायरेक्ट टॉकच्या अनुभवाचं प्रकटन आवडलं.

समजून उमजून "फेसबूक" खातं सुरू न केल्याने बाकी गोष्टींबद्दल काही लिहू शकत नाही.

फेसबूकात नसलेला :-)

रेवती's picture

30 Aug 2011 - 10:15 pm | रेवती

सहमत.
मीही (समजून उमजून) फेसबुकात नाहिये पण बाकिचे असल्याबद्दल मला काही म्हणायचे नाही.
तो त्यांचा निर्णय आहे.

नगरीनिरंजन's picture

30 Aug 2011 - 10:05 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ

मला आपला प्रतिसाद आवडला होता. आपण काढून टाकायला नको होता. त्यात एक वेगळा दृष्टीकोन होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 9:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचि, फेसबुकावर खातं असावं का नसावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
मला फेसबुकावरून मिळालेली ही विनोदी लेखाची लिंक पहा. npr ची वेबसाईट मी इतःपर पाहिली नसती.

पैसा's picture

30 Aug 2011 - 9:56 pm | पैसा

फेसबुकवर खतं असावं की नाही हा प्रत्येकाचा निर्णय आहे. पण फेसबुक नाही तर गुगल प्लस, ते नाही तर ऑर्कुट, फार काय मिसळपाव हे सुद्धा त्यांचंच भावंड आहे ना! आता घरबसल्या अनेक वेबसाईट्स उपलब्ध असतात म्हणून आपल्याला व्यसन लागलंय असं लक्षात येऊ शकतं. पण ज्या क्षणी व्यसन आहे हे लक्षात येईल, तेव्हाच त्यापासून लांब कसं रहावं हेही लक्षात येऊ लागेल. खूप लांब अंतरावर रहाणार्‍या सुहृदांच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडी कळतात, हा फेसबुकचा फायदाच आहे.

जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही! फेसबुकवर वेळ घालवला म्हणून गिल्टी वाटायचं कारण नाही, (कारण घरची टेन्शन्स विसरून इतरांबरोबर टाईमपास करणे ही पण प्रत्येकाची गरज आहेच!) थोडं सीरीयसली सांगायचं तर घरातल्या प्रत्येकाला एक आपली स्वतःची अशी "स्पेस" असणं आवश्यकच आहे. ती नसेल तर नात्यातली गुंतागुंत वाढू शकते.

तू घरात अजून लाडू करतेयस ना? म्हणजे तुझं घराकडे पण लक्ष आहेच! अगदीच काही तू समांतर जगात गेलेली नाहीस. झालं तर! थोडे लाडू इकडे पाठव बघू! (फोटो अपलोड केलेस तरी पुरे, आम्हाला कळेल कसे झालेत ते!)

जाई.'s picture

31 Aug 2011 - 12:00 am | जाई.

+१

फेसबुकमुळे ज्या मित्रमैत्रिणीशी नियमित संपर्क साधता येत नाही वा रोज भेटणे शक्य नसते त्यांच्या टचमध्ये राहणे शक्य होते.
फेसबुकच कितपत व्यसन लावून घ्यायच हा ज्याचा त्याचा प्रश्न.
अति झालच तर a/c deactivate करायचा पर्याय असतोच.

आत्मशून्य's picture

30 Aug 2011 - 10:22 pm | आत्मशून्य

शूचीताइ आता वेळ आली आहे आपल्या लेखांबाबत अंतर्मूख होऊन विचार करायची.... बाकी चालूदे, नेहमीप्रमाणे लिखाण छान आहे.

आत्मशून्य आपल्याला काय आवडले नाही ते मनमोकळेपणाने लिहावे. आपल्या सूचवण्या योग्य रीतीने घेतल्या जातील याची खात्री असावी.

चित्रा's picture

30 Aug 2011 - 10:53 pm | चित्रा

"शुचि, फेसबुक हे भावनिक गरजा अप्रत्यक्षरीतीने पूर्ण करण्याचे साधन आहे/असावे याच्याशी मी तरी असहमत आहे. कारण हे म्हणजे तुम्ही एक समांतर आयुष्य जगू लागता असे मला दुर्दैवाने म्हणावे लागेल."

समांतर आयुष्य कसे? प्रत्यक्ष आयुष्यात हे एक विश्व छेदून जाणारे. एवढेच म्हणता येईल. कधी ते प्रत्यक्ष भेट होते, कधी होत नाही. नीलूच्या गरजा काही दहा-पंधरा लोकांकडून पूर्ण होतात तर 'मी' च्या गरजा काही शेकडा लोकांनी पूर्ण होतात हा फरक आहे. कदाचित मी ला लोकांबद्दल 'क्युरिऑसिटी' असेल, नीलूला त्याची गरजच वाटत नसेल. मुळातच असलेला हा फरक प्रत्यक्ष आयुष्यातच आहे. प्रत्यक्ष आयुष्य नसले तर समांतर किंवा छेद देणारी कितीही विश्वे असली तरी काय फरक पडतो?! तेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात काय घडते आहे हे महत्त्वाचे.

याच्याशी संबंध नाही, किंवा असला तरी लांबूनच, पण यावरून दिवंगत गुणी अभिनेत्री रसिका जोशी यांचे गेल्या वर्षी पाहिलेले 'व्हाईट लिली आणि नाईट रायडर' आठवले.

मुक्तसुनीत's picture

30 Aug 2011 - 11:31 pm | मुक्तसुनीत

हा मला (पुन्हा एकदा) व्यक्तीगत निवडीचा मामला वाटतो.

माझ्या ओळखीच्या काही व्यक्तींना ब्लॉगिंग पासून सोशल नेटवर्किंगपर्यंत आणि डिस्कशन फोरमपासून ऑनलाईन कॉन्व्हरसेशन्स पर्यंत सर्व काही अनावश्यक वाटते. काही लोकांना ते ठराविक लोक आणि विषया पुरते मर्यादित ठेवावेसे वाटते. काहीना ते अतिशय महत्त्वाचे वाटते. काहीना ते रंजक वाटते परंतु सहभागी व्हावेसे वाटत नाही. यापैकी कुणी इतरांच्या सहभागाबद्दल किंवा सहभागाच्या अभावाबद्दल , गरज वाटण्याबद्दल किंवा गरज न वाटण्याबद्दल कमेंट्स करणं मला मजेशीर वाटतं. हे म्हणजे तुला अमुक भाजी अमुक इतकीच का आवडते किंवा तू शाकाहारीच का आहेस किंवा का नाहीस असं म्हण्टल्यासारखं आहे.

धनंजय's picture

30 Aug 2011 - 11:32 pm | धनंजय

चांगले ललित लिखाण आहे. त्यातील मुद्देही विचार करण्यासारखे.

नीलूने तिचा मोर्चा आता चहाकडून लाडवाकडे वळवला होता.

मुद्दा बदलण्याकरिता आणि भावना बदलण्याकरिता चांगले तंत्र!

- - -

(प्रतिक्रियांपैकी "अमुकतमुक व्यक्तिगत मामला आहे" हे समजले नाही. व्यक्ती खाद्य म्हणून तोंडात काय टाकते, हासुद्धा व्यक्तिगत मामला आहे. तरी खाद्यपदार्थांबाबत कितीतरी गमतीदार गप्पागोष्टी मी ऐकलेल्या आहेत. मिसळपावावर पाककृतींचा विभाग तर मला फार आवडतो. "मी अमुक प्रकारे कोलंबी शिजवतो", "त्यापेक्षा तमुक प्रकारे शिजवलेस, तर स्वाद छान येईल..." वगैरे चर्चा तर अगदी मस्त चालतात. फेसबुकवर खाते असणे हा व्यक्तिगत मामला असण्याचेही पूर्णपणे मान्य. पण या तथ्याचा या चर्चेत संदर्भ समजला नाही. "मी" पात्राशी "नीलिमा" पात्राने याविषयी बोलायलाच नको होते, असा संदर्भ आहे काय? पण मग व्यक्तिगत->->पासून->->बोलायला नको येथपर्यंत साखळी नीट जोडायला हवी.)

मुक्तसुनीत's picture

30 Aug 2011 - 11:39 pm | मुक्तसुनीत

नीलूचे पात्र फेसबुकबद्दल मतभिन्नताच व्यक्त करत नाही तर निवेदिकेच्या निवडीवर चांगलेच खमंग असे जज्जमेंट देते. ही गरज कशी लेजिटिमेट गरजच नाही असंही ती वारंवार सांगते. जेव्हा असं वर्तन दिसतं तेव्हा आपापल्या निवडीचं सार्वभौमत्व अधोरेखित करणं गरजेचं बनतं. म्हणूनच वैयक्तिक आवडीचा उल्लेख.

धनंजय's picture

31 Aug 2011 - 12:36 am | धनंजय

म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय?

पण खमंग जज्जमेंटांविरोधात वाद घालणे, आणि वारंवार "गप्प बस" म्हणण्याऐवजी वाद घालणे, हा निवेदिकेचा व्यक्तिगत स्वभाव असू शकेल.

तिच्या व्यक्तिगत पातळीपेक्षा जज्जमेंटची वारंवारिता फार झाल्यानंतर निवेदिका शेवटी म्हणते :

मी देखील या न संपणार्‍या वादसत्राला कंटाळले होते.
"बरं समांतर आयुष्य तर समांतर आयुष्य. एकटेपणापेक्षा ते बरे." म्हणून मी आमची भेट आवरती घेतली.

म्हणजे बघा. वाद आवरता घेतला पण सपशेल पराभव वगैरे नाही. आत्मसन्मान राखून वाद संपवला, असे मला वाटते. निवेदिका नीलिमाबरोबर पुन्हा चहाफराळ करेल, किंवा तेव्हा कुठल्या विषयांबाबत बोलेल, त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. (कथन संपल्यामुळे.)

निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय?

सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे. माझ्या दृष्टीने हे ठीक आहे. निवेदिकेने निवेदन केले, तर वाचकाने जज्जमेंट करून "नीलिमेशी वागणे बदल" असा सल्ला देण्याबाबत माझी कुठलीच आडकाठी नाही :-)

मुक्तसुनीत's picture

31 Aug 2011 - 12:48 am | मुक्तसुनीत

म्हणजे निवेदिकेने नीलिमाशी वाद न घालता तिला "हे फार वारंवार झाले, यापुढे हा मुद्दा बोलू नकोस" असे सांगायला हवे होते, असा सल्ला प्रतिसादक देत आहेत काय?
प्रतिसादक कुणालाही कुठलाही मुद्दा बोलू नकोस असा सल्ला देत नाहीत. प्रतिसादकांचे म्हणणे इतकेच की ज्याला त्याला आपापली पर्सनल स्पेस मिळण्याचा हक्क आहे. निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला.

निवेदिकेने या प्रकारे नीलिमाला वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे होते, असा निवेदिकेला सल्ला आहे काय?
कुणीही कुणाला "हाताळावे" यांप्रती प्रतिसादक काही म्हणतो आहे असे प्रतिसादकाला स्मरत नाही. काही मुद्द्यांचा प्रतिवाद कसा केला जाऊ शकेल याबाबते प्रतिसादकाने आपले चिमूटभर म्हणणे मांडले. ते काय होते ते उपरोक्त विवेचनात आले असे प्रतिसादकाला वाटते.

सल्ला ठीक असेलही, पण निवेदिकेच्या नीलिमेशी मैत्री-व्यवहाराच्या व्यक्तिगत मुद्द्याबाबत जज्जमेंट करून तो सल्ला दिला जात आहे.
प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2011 - 1:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या सगळ्याबरोबरच, प्रतिसादकांनी दिलेले सल्ले, नीलू-निवेदिकेच्या वादातले इतर काही मुद्दे जे निवेदिकेला तेव्हा महत्त्वाचे वाटले नाहीत/सुचले नाहीत ही सुद्धा त्यांची व्यक्तिगत मतंच आहेत. कुणी फार ठामपणे मांडत असेल तरीही निवेदिकेने तिचे निर्णय स्वतःच्या मनानुसार घ्यावेत ही एक सूचना त्यात आहे.

(माझ्या मूळ प्रश्नात "प्रतिसादक" अनेकवचनात आहे, कारण अनेक प्रतिसादकांनी "व्यक्तिगत" मामला सांगितला आहे. एकाच प्रतिसादकाला छद्मीपणे त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता. खरेच.)

- - -
"हक्क" म्हणजे काय? बहुधा बजावता येतात, अशाच गोष्टींना "हक्क" संबोधण्यात काही हशील आहे. "बजावणे" म्हणजे हक्काचे उल्लंघन झाल्यास ते उल्लंघन निस्तरणे, होय. नाहीतर "अमुकतमुक हक्क आहे" असे म्हणण्याचे प्रयोजनच नसते. (It is not a right if there is no redress.)
- - -

निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंकेपोटी प्रतिसादकाला पर्सनल स्पेसचा - थोडक्यात वैयक्तिक आवडीनिवडीचा - मुद्दा उपस्थित करावासा वाटला.

कुठल्याही वैयक्तिक आवडीनिवडीबाबत गप्पा झाल्या म्हणजे पर्सनल स्पेसच्या हक्कांचे उल्लंघन होत नसावे. कारण प्रत्येक आवडीनिवडीबाबत चर्चेत अशी शंका उपस्थित करण्याचा व्यवहार समाजात दिसत नाही. मिसळपावावरील पाककृती विभागाचे उदाहरण दिलेलेच आहे. तुमचा प्रथम प्रतिसाद अधिक समर्पक स्पष्टीकरण देतो : "खरमरीत.. वारंवार... जज्जमेंट." अशा प्रसंगीच समाजात काही चुकल्याबद्दल बोलणे होते.

"खरमरीत... वारंवार... आवडीनिवडीबाबत जज्जमेंट म्हणजे हक्कांचा भंग आहे काय?" असा तुमचा पूर्ण प्रश्न असावा. या प्रश्नाची ढोबळमानाने दोन उत्तरे संभवतात. आणि नेमके काय ते उत्तर निवेदिकाच देऊ शकेल.
(अ) "होय, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत आहे."
(आ) "नाही, खरमरीत वारंवार वक्तव्याने निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या हक्काचे उल्लंघन करीत नाही."

या दोन उत्तरांपैकी जर पहिले उत्तर निवेदिका देईल, तर निवेदिकेच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. निवेदिकाच्या हक्काचे उल्लंघन होऊ नये, असे मला तरी वाटते. तुम्हालाही वाटते. तर हक्कभंग निस्तरण्याबद्दल कारवाई व्हावी. कोणीतरी करावी. कोणी करावी? (मी असे मानले, की निवेदिकेने कारवाई करावी. मला वाटले, की तुम्हीसुद्धा तेच म्हणत होता. पण निवेदिकेला सल्ला दिलेला नाही, असे वर म्हटलेले आहे. पण मग हक्काच्या भंगाबद्दल शंकानिरसन झाल्यावर नेमके काय करावे, हे कोडे आहे. हक्काच्या भंगाबद्दल काही करायचेच नसेल, तर शंका काय कामाची?)

प्रतिसादकाच्या विवेचनात निलू-निवेदिका यांच्या मैत्री-व्यवहाराच्या संदर्भात वैयक्तिक मुद्द्याबाबतचे जज्जमेंट प्रश्नकर्त्याला कुठे दिसले हे ऐकणे रोचक होईल.

निलू हे पात्र निवेदिकेच्या पात्राच्या प्रस्तुत हक्काचे उल्लंघन तर करीत नाही ना ? या शंके...

एक मैत्रीण दुसर्‍या मैत्रिणीच्या हक्कांचे उल्लंघन करते, ही शंका हे त्यांच्या मैत्रीविषयी (शंकेसह) जज्जमेंट आहे, असे मी ढोबळपणे मानले. मैत्री आणि एकमेकांच्या हक्कांची चाड असणे या गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्याचा व्यवहार खूपदा दिसतो. हक्कासह हित बघणारे ते मित्र असा व्यवहार करून मला आजवर फारच सोय झालेली आहे. पण कदाचित या ठिकाणी असा संबंध अध्याहृत धरणे योग्य नव्हे. तुम्ही स्पष्टच म्हणता, तर या प्रसंगी ते अध्याहृत टाळतो, आणि मानतो, की येथे निलू आणि निवेदिका यांच्या मैत्रीबाबत जज्जमेंट नाही. परंतु हे अध्याहृत कधी टाळायचे, कधी घ्यायचे, त्याबद्दल मला समाजातील वावरातून नीट कल्पना येत नाही, अशी कबुली देतो.

- - -
पुन्हा शंका : व्यक्तिगत नेमके काय आहे? (अ) फेसबुकवर खाते असणे/नसणे, (आ) त्याविषयी मैत्रिणी-मैत्रिणींनी एकमेकांच्या उदाहरणातून साधकबाधक गप्पाही न मारणे, की (इ) गप्पा मारता-मारता अति-वारंवार वादविवादाने पर्सनल स्पेसचे त्रासदायक उल्लंघन न करणे?
पर्सनल स्पेसचा मुद्दा (काही स्पष्टीकरणांसकट*) समजला, मान्य आहे. आधीपासून मान्य होता. पण तो सुरुवातीच्या संक्षित "व्यक्तिगत" प्रतिसादांत उल्लेखलेलाच नव्हता.
उलट संक्षिप्त प्रतिसादांत फेसबुक खाते असणे/नसणे हेच व्यक्तिगत म्हणून सांगितलेले आहे. ते अजूनही समजले नाही.
- - -
*(उगीच विस्तार नको. पण हस्तांदोलन करणे, सलामीचे उद्गार उगाचच नव्हे तर प्रामाणिकपणे बोलणे, कुणी घसरून पडल्यास त्यांना हात धरून उठण्यास मदत करणे, आपण पडल्यास दुसर्‍याला मदतीला बोलावणे... वगैरे प्रकार म्हणजे लोकांच्या पर्सनल स्पेसच्या आत शिरत असूनही त्यांच्या हक्काचे उल्लंघन मानत नाही.)

शुचि's picture

31 Aug 2011 - 2:11 am | शुचि

मी धनंजय यांच्याशी सहमत आहे - माझ्या पर्सनल स्पेस चे उल्लंघन झालेले नाही कारण निलूशी माझे लग्न झालेले नाही की ती माझ्यावर दबाव आणू शकेल.

मी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे - आपले फेसबुक इंटरॅक्शन ही वैयक्तीक आवडीनिवडीचीच गोष्ट आहे.

प्रियाली's picture

30 Aug 2011 - 11:34 pm | प्रियाली

सर्वप्रथम वादसत्र सुरू का व्हावे असा प्रश्न पडतो. नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो.

व्यसनी लोक व्यसनांच्या मागची अनेक कारणे देतात. दारू पिऊन दु:ख हलकं होते, सिग्रेट ओढून डोकं हलकं होतं, ड्रग्ज घेतल्यावर कूल वाटतं इ. इ. फेबु हे एकदा व्यसन आहे हे मान्य केले की त्याचे वरवरचे फायदे सोडले तर खोलवरचे दुष्परिणाम गर्तेत नेण्यास कारणही ठरू शकतात हे ही मान्य करावे लागेल.

सोशल गॅदरिंगला एखादा ग्लास हातात घेऊन फिरणारे आणि रोज संध्याकाळी ग्लास रिचवल्याशिवाय राहू न शकणारे यांत फरक आहे.

"शुचि खरं सांग दिवसांतले किती तास तू फेसबुकवर पडीक असतेस? रात्री मधेच उठलीस तर तू फेसबुक रिफ्रेश करतेस असं तूच म्हणतेस मग हे बरोबर का?"
नीलू न्यायाधीशी भूमिकेत शिरल्याने मीदेखील आता डिवचले गेले होते - "वेल तुझे म्हणणे खरे आहे. माझ्याकरता फेसबुक हे व्यसन होऊन बसले आहे पण त्यामागचं कारण तर समजाऊन घे"

प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनांची कारणे देऊन सहानुभूती मिळवण्यास उत्सुक असतो आणि आपण जी कारणे देतो ती सर्व वॅलिड कारणे आहेत असा समजही असतो. व्यसनात बुडून राहायचे आहे असेच ठरवले असेल तर अशा व्यक्तींना पुढे सांगण्यात काही फायदा नसतो कारण त्यांच्याकडे कारणांची यादी तयार असते.

शेवटी नीलूची मैत्री महत्त्वाची की फेबु हे ठरवणे निवेदिकेवर आहे.

असो. वर पैसा यांची एक प्रतिक्रिया आहे त्याबद्दल दोन पैशे ;)

जेव्हा हे फेसबुक नव्हतं तेव्हा पुरुष दोस्ताना गोळा करून पार्ट्या वगैरे जास्त करत असावेत आणि बायका शेजारणींकडे जाऊन गॉसिप करत असाव्यात असा माझा अंदाज आहे! त्यात आणि फेसबुकमधे फार फरक नाही!

फरक आहे आणि हा फरक नवरा आपल्या गैरहजेरीत ऑफिसातल्या बाईबरोबर फिरतो किंवा आपला टीनेजर मुलगा अचानक २५-३५ च्या बाईचा घनिष्ठ मित्र बनतो या प्रकारचा आहे. या प्रकारांचा जोडीदारांना किंवा पालकांना त्रास होऊ शकणे शक्य आहे. फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या घरातील संख्या पाहिली की एखाद्या व्यक्तीला इतके मित्र मैत्रिणी कशा असू शकतील असा प्रश्न पडतो. बरे असतील तर यांच्याशी मैत्री करण्यास वेळ आणि एनर्जी कशी मिळते असा पुढला प्रश्न पडतो. याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही. मित्रांचे मित्र किंवा मित्रांच्या मित्रांचे मित्र वगैरे वगैरे करत तुम्ही अनोळखी लोकांशी संबंध वाढवून घेत असाल आणि कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही हे घडूच शकते पण फेबुचा स्कोप फार मोठा वाटतो.

>> फेसबुकवर मित्र मैत्रिणींची १००० च्या ....... याचा अर्थ, या सोशल नेटवर्किंग साइटवर दिसणारे सर्वच तुमचे मित्र असतील असे नाही.>>

हा लेख जरूर वाचावा. लिंकड इन या साईट्बद्दल हा लेख असून यात हे म्हटले आहे की लिंकड इन वर ५०० किंवा अधिक कॉन्टॅक्ट असणे म्हणजे तुमचे काहीतरी चुकते आहे.

The perception that having 500+ connections on LinkedIn means that you are well connected is false. In fact, it hurts your credibility factor.

अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे.

>> कदाचित त्या मार्फत चुकीच्या मार्गावर जात असाल अशी काळजी तुमच्या आप्तांना वाटणे शक्य आहे >>
ही काळजी समजण्यासारखीच आहे.

>> नीलू निवेदिकेशी वाद घालताना वैतागलेली दिसते. थोडीशी बॉसीही वाटते. याचाच अर्थ नीलूच्या निवेदिकेकडून काही अपेक्षा आहेत असा होऊ शकतो. >>
प्रियाली, आपले नीरीक्षण आचूक आहे.

प्रियाली's picture

31 Aug 2011 - 1:31 am | प्रियाली

अर्थात हाच न्याय मला फेसबुकबद्दल लावायचा नाही पण माझे एक नीरीक्षण होते की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट पाठविणार्‍याची विश्वासार्हता आपण त्याच्या आणि आपल्या मध्ये सामाईक असणार्‍या लोकांवरून बांधतो आणि ती विश्वासार्ह असेलच असे नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेन्ड लिस्ट मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले की आपण ऐर्‍या गैर्‍या कोणालाही आपल्या वर्तुळात शिरकाव करू देतो का हे ज्याने त्याने ठरवायचे.

हाच न्याय फेबुवरही लावावा लागतो. इंटरव्यूला येणार्‍या कँडिडेटची छाननी फेबुवर जाऊन करणारा सुपरवायजर मला ठाऊक आहे. ;) ५००-१००० मित्र मैत्रिणी असणारे महाभाग कामं कधी करणार असा निरागस प्रश्न त्याला पडत असे.

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2011 - 1:17 am | भडकमकर मास्तर

फेस्बुकवगैरेकायअसते?प्रश्नसंपला

Nile's picture

31 Aug 2011 - 3:12 am | Nile

शरदीनी:मिपा :: आयुष्यःफेसबुक. ;-)

तिमा's picture

1 Sep 2011 - 2:58 pm | तिमा

स्वतःचा इगो जर गोंजारुन घ्यायचा असेल तर फेसबुकवर जा आणि तुमची वॉल सजवा.

अभिजीत राजवाडे's picture

31 Aug 2011 - 3:16 am | अभिजीत राजवाडे

मला लेख आवडला आणि लेखाचा विषयही आवडता. बर्‍याच महिन्यांपुर्वी मी माझ्या ब्लॉग वर याविषयी माझे मत मांडले होते ते इथे देत आहे.

==================================================================
""मी येत्या ३ ते ४ महिन्यांमधे Facebook, Orkut यावरिल माझे account बंद करणार आहे", असे मी जेंव्हा म्हणालो, तेंव्हा माझे मित्र "काय गावंढळ आहे" अशा चेहर्‍याने माझ्याकडे पाहु लागले. पण आपण कधी खरच विचार केला आहे का, कि आपण Facebook आणि Orkut किंवा कुठलीही Social Networking ची Site वापरुन आपल्या मित्राबरोबर खरोखर संवाद होतो का? Facebook Orkut वरुन आपल्याला मित्रांच्या बित्तबातम्या कळतात पण संवाद होत नाही. आधी आधी Orkut खुप छान वाटले होते, तेंव्हा Facebook भारतात एवढे प्रचलित नव्हते. सध्या एक दोन वर्षापासुन भारतात Facebook प्रचलित होत आहे. भारतात म्हणजे भारताच्या मुख्य शहरात.

एकदा आमच्या ओळखीच्या एका घरी गेलो असता तिथे एक लहान मुलगी आपल्या बाबाला संगणक Login करुन द्यायचा हट्ट करत होती, मला वाटल काही गेम वैगरे खेळायची असेल, पण तिला तिचे Orkut पहायचे होते. वय १२ ते १४ वर्षे.

हा Social Networking चालु करण्याचा प्रवाशी interesting असतो. मी Orkut आजपासुन ६ वर्षापुर्वी वापरायला सुरु केले. तेंव्हा ते नवीन आले होते. आणि Google ची मोहिनी होतिच. पण मी Social Networking का वापरायला सुरु केले याचे उत्तर अजुनही माझ्या जवळ नाही. उत्सुकता हे उत्तर असु शकते. नंतर कॉलेज मधिल सर्वच Orkut वर आल्यावर "Scrap" टाक हा परवलीचा शब्द बनला. जर आपण Orkut वर नाही म्हणजे काही तरी चुकते आहे असे काहीसे Peer Pressure वाढिला लागते. आणि मग एकदा Orkut वर आलो की जुने मित्र शोधण्याची मोहिम सुरु होते. त्यातुनच कोणाचे किति मित्र आहेत यावर शर्यत सुरु होते. भले ३ वर्षे एखाद्या मित्राला भेटले नसाल पण Orkut वर त्याला Add करुन ठेवणार.

मग वेगवेगळ्या राजकिय, बौद्धिक, सामाजिक, साहित्यिक community join करणे हेही सुरु होते. असे होता होता यासर्वांचा पसारा एवढा वाढतो की कधी कधी ज्याचे updates कळायला पाहिजे ते कळतच नाही. नुसता गोंधळ.

नीट समजाऊन, वेळ देऊन काळजीपुर्वक पाहिले तर सर्व updates कळु शकतात पण मग तेवढा वेळ देवा लागतो. त्यात लोकांना Social Networking Site वर कसे वागावे याचेही भान नसते, आपली व्यक्तिगत माहिती बिंधास्तपणे site टाकतात. खासगी निरोप सार्वजनिक फोरम मधे टाकतात. कधी कधी ते वाचुन फार अवघडल्यासारखे वाटते. हे सर्व काही कमी होते म्हणुन आता Mafia आणि फार्मविले सारखे online गेम आले आहेत. त्यात किती वेळ जातो याची तर गणतीच नाही.

मला माहित आहे कि फार नकारार्थी बोलतो आहे, पण सकारात्मक बाजु तर बहुतेक लोकांना माहित आहे म्हणुनच तर दिवसेंदिवस Social Networking Sites चे मेंबर्स वाढत आहेत. शेवटी "सौ बातों की एक बात".

"अति तेथे माती"

चर्चा अतिशय सुरेख, अन माहिती पुर्ण.

शेवटी ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज नाही का? मी तरी निलु होउन दुसर्‍याला जाब ही नाही विचारणार, अन आली एखादी निलु विचाराय्ला अन जर तिला माझ्या लेव्हलन विचार नाही करता आला, तर चर्चा ही नाही वाढवणार.

नितिन थत्ते's picture

31 Aug 2011 - 7:49 am | नितिन थत्ते

५०० फ्रेंड्सबद्दल सहमत. अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो.

श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही.

फेबु/ऑर्कुटवर फ्रेण्ड लिस्ट मुळे सुरक्षा यंत्रणांच्या दुर्बिणीखाली येण्याची शक्यताही लक्षात घ्यायला हवी.

अर्धवट's picture

31 Aug 2011 - 10:24 am | अर्धवट

>>श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही.

केवळ तुम्ही मानव आहात ही समानता तुम्ही मानत नाही का. ;)

प्रियाली's picture

31 Aug 2011 - 3:02 pm | प्रियाली

अनेक फ्रेण्डरिक्वेस्ट आपण ती का नाकारायची याचं सयुक्तिक कारण मिळालं नाही म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतो.

हम्म! फेबुवर माझे अकाउंट हे माझे मोठ्ठे कुटुंब (माहेर-सासर), माझे शाळामित्र, लहानपणीचे सवंगडी आणि कॉलेज मित्रमैत्रिणी यांना बांधून ठेवण्यासाठी आहे. या खेरीज काही मोजकी मिपा-उपक्रमी मंडळी आहेत. त्यांची निवड कशी करायची हे मी ठरवते. मला फेबुवर जाऊन काहीतरी कॉमेंट्स लिहिण्यापेक्षा "लाइक"चे बटण दाबणे आवडते. त्यामुळे आपण संवादात खेचले जात नाही आणि संपर्कही राहतो.

मी कोणाही नेटकराला आतापर्यंत फ्रेंडरिक्वेस्ट पाठवलेली नाही पण अनेकांच्या रिक्वेस्ट्स नाकारल्या आहेत कारण नाकारून त्यांचा अपमान करायचा नाही तर त्यासाठी मी माझे खाते तयार केलेले नाही. ओळखदेख नसताना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार्‍या मंडळींचे मला आश्चर्य वाटते.

मिपावरील एका काकांनी (जे मला ओळखत नाहीत) मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती की "मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही काही मिपाकरांच्या फ्रेंडलिस्टमध्ये दिसलात म्हणून मीही रिक्वेस्ट पाठवली." मी इमाने इतबारे ती डिनाय केली. :)

दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता.

परंतु अशा लोकांची मानसिकता मला कळत नाही हे खरे.

श्याम मानव यांनी माझी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकार करण्याचं कारण मला अजून कळलं नाही.

श्याम मानव हे पब्लिक फिगर आहेत त्यांना आपले किती फॅन फॉलोइंग आहे हे दाखवण्यात रुची असावी. अशाच प्रकारची गर्दी मी कविता महाजन वगैरेंच्या खात्यावर पाहिली आहे.

असो,

खाली परा म्हणतो

सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही.

याच्याशी १००% सहमत आहे. मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार

मागे एकदा उपक्रमावर म्हटले होते - सोशल नेटवर्किंग साइटवर माझे अकाउंटच नाही हे मी मोठ्याने जाहीर केले आणि माझ्या नावाचे अकाउंट काढून एखादा तोतया लोकांशी बोलू लागला तर ते अतिशय धोकादायक आहे.

हे मी सांगायला विसरलो. तुमचे खाते असो वा नसो त्याचे जाहिरातीकरण करणे टाळा.

मिपावरील एक जेष्ट सदस्यांना नुकताच फेसबुकवर असा अनुभव आला आहे. त्यांच्या नावाने खाते उघडून काही विचित्र टिपण्या करणे, अश्लाघ्य मजकूर लिहीणे असे प्रकार झाले. तेंव्हा प्रियालीतै म्हणते तशी थोडी सावधगिरी बाळगाच बाळगा.

दुसरे एक जालावरील गृहस्थ, ज्यांच्याशी माझा ३३६६ चा आकडा आहे त्यांनीही मला फेबुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हा माझ्यासाठी मोठ्ठा विनोद होता.

ह्यात विनोद नाहीचे तै.
ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते ;) अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच.

अनक्नोन पर्सनला अ‍ॅड करण्यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुमच्या खाजगी फोटोंचा त्याला मिळणार अ‍ॅसेस. ह्यातून पुढे बर्‍याचदा नको ते प्रसंग घडतात आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते. शक्यतो (निदान स्त्रीयांनी तरी) आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देणे टाळावेच. मधे फेसबुक वरती फ्रेंडस कॉन्टेक्ट बुकच्या नावाखाली आपण अ‍ॅड केलेल्या सर्वच फ्रेंडसचे फोन नंबर आपण सहजपणे बघू शकत होतो, त्यांनी ते पर्सनल ठेवलेले असले तरी. अजुनही हा बग अध्ये मध्ये कार्यरत होतोच. म्हणूनच योग्य ती काळजी घ्यायलाच हवी हे नक्की.

प्रियाली's picture

31 Aug 2011 - 5:11 pm | प्रियाली

ह्यात विनोद नाहीचे तै.
ह्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सतत तुमच्या पाळतीवर राहणे सोपे जावे हा उद्देश. मग तुमच्या फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्किंग वरील वावरात घडणार्‍या घटनांचा कुच्छीत उल्लेख मिपा किंवा इतर संस्थळांवर करणे, तुमचा सतत ट्रॅक ठेवणे, तुम्हाला तिथे कोणाच्या आणि काय कॉमेंट मिळतात त्याची माहिती घेत राहणे सोपे जाते अजुनही अशा मैत्रीचे बरेच फायदे आहेत, जे आत तुझ्या लक्षात आले असतीलच.

अगदी अगदी! १०००% बरोब्बर! विनोद असा की मला या गोष्टी म्हैतीच नाहीत असा या गृहस्थांचा ग्रह झाला असेल काय या कल्पनेने हसू आले. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

अशा लोकांना इग्नोर फिल्टरला टाकायचे.

त्यांनी कितीही प्रयत्न केले, सर्च केले तरी त्यांना ना तुझे प्रोफाईल दिसते ना तुझी अपडेटस. तुमच्या कॉमन फ्रेंडसच्या लिस्ट मध्ये सुद्धा त्यांना तुझे प्रोफाईल दिसत नाही. बरं त्यांनी तुला रिक्वेस्ट पाठवलेली असल्याने तुला मात्र बसल्याजागी त्यांची अपडेटस दिसत असतात ;) असा मस्त तडफडाट होतो ना समोरच्या माणसाचा.

ह्या माहिती बद्दल धन्यवाद रे परा!

शिल्पा ब's picture

31 Aug 2011 - 10:14 am | शिल्पा ब

खरं सांगू का... माझे आधी ओर्कुट किंवा फेसबुक किंवा माय स्पेस वगैरे अकौंट नव्हते. माय स्पेसवर अजूनही नाही. ओर्कुटवर एकदोन ओळखीच्या लोकांनी फारच request पाठवल्या म्हणून अकौंट बनवले तेच फेसबुकाच्याबाबतीत. दोन चार सोडले तर सगळे मिपावरचे लोक आहेत फेस्बुकाच्या अकौंटमध्ये. तेवढाच टाईमपास. शिवाय लोकं काही व्हीडीओ, लिंका देतात त्याही बरेचदा मजेदार, ज्ञानवर्धक वगैरे असतात.

गवि's picture

31 Aug 2011 - 10:38 am | गवि

असंख्य जुने शाळेतले शाळूसोबती, चाळीतले चाळूसोबती आणि हरवलेली अगणित माणसं मला ज्या फेसबुकमुळे परत मिळाली त्या फेसबुकचा मी आजन्म ऋणी राहीन.

व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.

स्वानन्द's picture

31 Aug 2011 - 1:04 pm | स्वानन्द

व्यसन कशाचंही लागू शकतं कारण व्यसनीपणा हा व्यक्तीचा गुण आहे, फेसबुकचा नव्हे. टेंप्टिंग गोष्टी जगात बर्‍याच असतात. आणि कमीजास्त प्रमाणात अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल कशातही असतंच. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणा, नीरसता, ताण असं काहीही आलं की व्यसनीपणा डोकं वर काढणारच. हे अपरिहार्य आहे.

सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार

सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही.

बाकी फेसबुक आणि तत्सम सोशल नेटवर्कसचा उपयोग 'गझाली करणे' ह्यापेक्षा कित्येक पटींनी वेगळा आणि उपयुक्त आहे असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. फेसबुकवरती तुम्ही फेसबुक कंपनी साठी टेस्टर म्हणून काम करु शकता, विविध संस्था, उद्योग ह्यांना योग्य मोबदल्यात त्यांची इन्फो पेजेस बनवून देऊ शकता, नवोदित कलाकारांना (सर्वच क्षेत्रातील) त्यांची पेजेस बनवणे, ग्रुप सुरू करून देणे, त्यांच्या प्रोफाइलचा सेटअप बनवून देणे ह्यासाठी देखील मोबदला घेऊन मदत करू शकता. बरं ही सगळी खूप कष्टाची आणि वेळखाऊ कामे आहेत असेही नाही. ह्याला प्रचंड तांत्रिक ज्ञानाची आवश्यकत आहे असे देखील नाही. उलट ह्या कामांमुळे तुमच्या ज्ञानात अजून भर पडते, चार ओळखी होतात, लोकांच्या सोशल नेटवर्क कडून नक्की काय अपेक्षा आहेत त्या कळतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज फेसबुक किंवा तत्सम साइटचा उपयोग किती चांगल्या कार्यासाठी करू शकतात ह्याचे मौलिक ज्ञान मिळते.

इच्छा असणार्‍यांनी श्री. पांडुरंग तावरे (अ‍ॅग्रो टूरिझमचे प्रणेते) , श्री. अनिकेत आमटे ह्यांची प्रोफाईल नक्की बघावीत.

शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.

शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.

झक्कास !!!

Nile's picture

31 Aug 2011 - 1:44 pm | Nile

शिंचे विचारजंत कूठचे! कान खाजवायला 'रीफील' बेस्ट असते!

नगरीनिरंजन's picture

31 Aug 2011 - 2:03 pm | नगरीनिरंजन

उत्कृष्ट दृष्टीकोन!

स्मिता.'s picture

31 Aug 2011 - 3:16 pm | स्मिता.

सोशल नेटवर्कवरती कार्यरत असणे ह्यात काही कौतुकाचे नाही आणि त्यावरती खाते नसणे ह्यात देखील काही कौतुकाचे नाही.

आणि

शेवटी कुठल्याही गोष्टीचे महत्व तुम्ही त्याचा वापर कसा करता ह्यावर अवलंबून असते. मी अशिक्षित असीन तर पेन्सिलीच उपयोग कान खाजवायला करीन आणि सुशिक्षीत असीन तर काहीतरी लिहायला, नविन गिरवायला करीन.

याच्याशी १००% सहमत. इतक्या नेमक्या शब्दात लिहिलंय की आणखी काही बोलायची गरजच नाही.

आपल्याला अनोळखी व फारशी गती नसलेल्या विषयात काम करणारांची फ्रेन्ड रीक्वेस्ट स्वीकारून अथवा त्याना तशी रीक्वेस्ट पाठवण्यात तरी काय मतीतार्थ आहे कोण जाणे.
फेसबुक काय किंवा मिपा काय यांचे अ‍ॅडिक्षन होते.
सोशल नेटवर्किंग साइट्स या ठराविक व्यवसाय वा॑ढीसाठी किंवा मित्र परीवार वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. पण त्यांचे व्यसन हा चिंतेचा विषय आहे.
या साईट्स वर अनेक लोक भेटत असतात. त्यांच्याशी मैत्री क्वचित दुश्मनी देखेले होत असते.
अर्थात जालावरील मैत्री ही काही मुद्द्यांवर आधारीत मैत्री असते तशीच दुश्मनी देखील.
मराठी आंतार्जालावर एखाद्या मुद्द्यावर एकमेकांचे कधीनाकधी खटके उडतातच पण म्हणून ज्यांच्याशी खटके उडालेत त्यांच्याशी मी सदोदीत सर्वत्र वैरच पत्करायचे हा मूर्खपणा झाला.
फेसबुक हा टाईमपास म्हणून बरा आहे.

शानबा५१२'s picture

31 Aug 2011 - 5:49 pm | शानबा५१२

ऑफीसमधे न भेटणारे फेसबुकवर भेटतात म्हणुन फेसबुकचे महत्व आहे.

मुक्तसुनीत's picture

31 Aug 2011 - 6:13 pm | मुक्तसुनीत

सद्यकाळात घडून गेलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने "सोशल मिडिया"ने निभावलेल्या भूमिकेबद्दलचे विवेचन : http://moklik.blogspot.com/2011/08/blog-post_31.html

विशाखा राऊत's picture

31 Aug 2011 - 6:33 pm | विशाखा राऊत

फेसबुक चांगले की वाईट हा खर तर वादाचा मुद्दा आहे. आपले मित्र, नातेवाईक भेटतात पण त्यातले कितीजणां सोबत आपण बोलतो किंवा संपर्क असतो हे महत्वाचे.
संख्या कीती आहे ते महत्वाचे नसावे तर खरच आपल्याला भेटुन त्यांना आनंद होतो की नाही हे असावे. उगा आपले हा माझ्या लिस्ट मध्ये आहे सांगायला हवे मग तुम्ही ऑर्कुट, फेसबुक, गुगल+, मिसळपाव काहीही वापरा पण त्याचा काहीच उपयोग नाही.
एक विरंगुळा, सर्वांशी जोडले जाण्याचा सोप्पा मार्ग म्हणुन सोशल नेटवर्किंग साईट्स कधीही उपयोगी आहेत. पण बसा शेती करत (farmville) तर काय उपयोग :)... ती सगळी शेती खरच कोणी प्रत्यक्षात केली तर काय फायदा होईल :)

बाकी ज्याला जसे आवडते तसे फेसबुक समजुन घ्यावे

प्रकटन ठीक वाटले. लाडू कुठले होते?

कॉमॅ.

शिल्पा ब's picture

31 Aug 2011 - 10:28 pm | शिल्पा ब

बरेचदा लोक ओळख नसताना रीक्वेस्ट पाठवतात आणि आपण रेफरन्स मागितला की गायब...खासकरुन मिपा वगैरे सायटींवरच्या लोकांनी एकमेकांना रीक्वेस्टी पाठवताना रेफरन्स दिला पाहीजे नाहीतर कळणार कसे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 1:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि कळलं तरीसुद्धा ज्यांच्याशी आपण काहीही बोलत नाही त्यांच्याशी फेसबुकावर मैत्री काय करायची? फक्त हाय-हॅलो करायला??

असो. प्रभ्या, तू एकदम लैच बेक्कार टाकला आहेस रे! आणि सहजमामांची प्रोफाईल भयंकर से***** आहे राव!

मला फेसबुक एका मर्यादेपर्यंत आवडते. अर्थात व्यसन नाहीच लागलेले.( मिपाचे ही नाहिच)
मला माझे अनेक शाळकरी सोबती फेबुमुळे परत भेटले. ..संपर्कात आले. इतकेच काय माझ्या वयस्कर वडिलांना त्यांचा बालमित्र फेबु मुळे भेटला. ..ज्याच्या ते अनेक वर्षे शोधात होते. हा मित्र परदेशी रहात असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही पण फोनवर मात्र बोलणे झाले. त्यांना बराच काळ रुखरूख लागून राहिलेला शोध संपला.
फेबु कसे वापरायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. उदा. फोटो , विडीओ वगैरे आपण अपलोड केले तरी ते कोणाला दाखवायचे कोणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. आपल्या लिस्ट मधील सर्वच मित्रांना नसले दाखवायचे, काही ठराविक लोकांनाच दाखवायचे असतील तर 'hide from these people' , 'Show only to these people' , 'only me' असे पर्याय त्यात आहेत. शिवाय इतरही बरीच प्रायव्हसी सेटींग्ज त्यात आहेत. ती सर्व व्यवस्थित वापरली तर फेबू अजिबात धोकादायक नाही. पब्लिक फिगर असलेले लोक प्रायव्हसी सेटींग्ज पब्लिक ठेवतात ..आपल्यासारखे प्रायव्हसी जपणारे लोक त्यांना पटेल तेवढीच माहिती प्रकाशित करतात.

दुसरे असे की मला माझ्या मित्रांमधे एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर प्रत्येकवेळी फोन करून सांगायला वेळ नसतो आणि फोन करुन सागण्याएवढी ती गोष्ट तेवढी महत्वाची ही नसते. उदा. आमच्याइथे १५ ऑगस्टला एक छान कार्यक्रम झाला. मला वाटले की मित्रमंडळींना त्याबद्दल सांगावे पण सर्वांना फोन करून सांगण्यासारखी ती काही महत्वाची बातमी नव्हती. फेबु वर त्या कार्यक्रमाविषयी लिहिताना मला त्या कार्यक्रमाचे फोटोज ही टाकता आले. जे एरवी मुद्दाम कोणाला दाखवले नसते.

@ शुचि , लेख छान जमला आहे.

पिवळा डांबिस's picture

31 Aug 2011 - 11:10 pm | पिवळा डांबिस

मागे विकासने लिहिलेली एक ओळ आठवली....

"मेरे पास फेसबुक है, माय स्पेस है, ओर्कुट है, तुम्हारे पास क्या है?"
"मेरे पास काम-धंदा है!!!!!"
:)

असो. बाकी तुमच्याशी जर वितंडवाद घातला तर लाडू-चहा मिळतो इतकेच उमजले. वाचून उत्साह वाटला!!!!
;)

प्रभो's picture

31 Aug 2011 - 11:15 pm | प्रभो

फेसबूक कसे वापरावे यावर सहज रावांनी एक लेख लिहावा अशी मी विनंती करतो. :)

मुक्तसुनीत's picture

31 Aug 2011 - 11:23 pm | मुक्तसुनीत

पुलित्झर पारितोषिकास पात्र प्रतिसाद. मी मिपा तर्फे या प्रतिसादाची शिफारस करतो :)

प्रियाली's picture

31 Aug 2011 - 11:25 pm | प्रियाली

सहमत आहे. :)

मग काय?

सहजराव हे चेपू वरचे अण्णा आहेत ;) स्वच्छ + कोरे करकरीत...

* सहजमामा, ह घ्या हो...सुपारी द्याल माझी नाहीतर कुणालातरी :)

मुक्तसुनीत's picture

1 Sep 2011 - 1:33 am | मुक्तसुनीत

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 1:34 am | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

अवांतरः यालाच अप अगेन्स्ट द वॉल असे म्हणत असावेत काय? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 4:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभो, पाय कुठे आहेत रे तुझे? _/\_ चेपुवरचे अण्णा काय ...

मला उगाच व्हर्जिनिटी इज नॉट ... ते आठवलं.

सन्जोप राव's picture

1 Sep 2011 - 4:36 pm | सन्जोप राव

म्हणजे हे काय?
बाकी मगरीप्रमाणे पाण्यातून उसळी मारुन काठावर मजा बघत उभ्या असलेल्या गरीब बिचार्‍या हरीणांना पाण्यात खेचण्याच्या कृतीचा निषेध! लोक वाचनमात्र आहेत ही श्री गणरायाची कृपा मानावी!

पुष्करिणी's picture

2 Sep 2011 - 1:19 am | पुष्करिणी

चेपुआण्णा...:) :) :) लै भारी

आण्णा चिंबोरी's picture

1 Sep 2011 - 12:11 am | आण्णा चिंबोरी

भाजणी नव्हें हो काकू. भांजणी.

धन्यवाद. मी तो शब्द विसरले होते.

पिवळा डांबिस's picture

1 Sep 2011 - 4:57 am | पिवळा डांबिस

तरीच ती नीलू वैतागली!!!
तुम्ही भाजणी, भाजणी म्हटल्यामुळे तिला वाटलं असेल की तुम्ही छान गरमागरम थालिपीठ वगैरे करून द्याल म्हणून!!!!
तुम्ही दिलंच नाहीत, मग कोण नाही वैतागणार?
:)

तुम्ही आपले फिरुन फिरुन लाडु- चिवडा, चहा आणि थालिपीठावरच का!!! ;)

पिवळा डांबिस's picture

2 Sep 2011 - 1:43 am | पिवळा डांबिस

नैसर्गिक ओढा, दुसरं काय!!!
:)

आम्हाला तर बुवा "ओढा" हा नैसर्गिकच माहीत आहे. कृत्रिम ओढा माहीत नाही. मग ही द्विरुक्ती कशाला? ;)

प्रियाली's picture

16 Sep 2011 - 6:12 am | प्रियाली

आताच एक नवीन म्हण वाचली:

बाहेर नाही विचारत कुत्रं आणि फेसबुकावर हजारो मित्र. ;)