मैत्र !

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Aug 2011 - 8:01 pm

एक जवळचा मित्र !

आपल्या आयुष्यातील कितीतरी, म्हणजे कितीतरी तास आपण या लाकडाच्या अडीच फूट बाय ३/४ फूट तुकड्यावर घालवतो. टेबलाशी निगडीत अनेक चांगल्या वाइट आठवणींचा आपल्या डोक्यातल्या हार्डडिस्कवर एक वेगळा ड्राईव्ह केला तरी चालेल एवढ्या आठवणी सहज असतात. कामाचा पहिला दिवस, मधल्यावेळेचा डबा, मित्रांचे कोंडाळे, साहेबाची बोलणी, पडलेला चेहरा, बढती, बढतीची मेजवानी....शेवटचा दिवस.... अशा अनेक आठवणी आपण या टेबलाशी बोलू शकतो. अशा अनेक टेबलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांप्रमाणे आपली सोबत केलेली असते. जरा आठवून पहा आणि तुम्हाला आढळेल किती महत्वाचा आणि जवळचा मित्र होता हा !

मलाही असे अनेक मित्र होते आणि आता एक शेवटचा मित्र आहे तोही माझ्याच घरात.

माझे टेबल.

समोर एक सहा फूट रूंद आणि ६ फूट उंच दरवाजा. त्याबाहेर नजर टाकली की पिचकारीच्या आणि कडूलिंबाच्या फांद्याची सरमिसळ झालेला एक मोठा दाट पडदा, त्याच्या मागे लालभडक फुलांचा गुलमोहोर.

या मित्राला मी जागाच अशी दिली की आमची मैत्री बहरतच गेली. मी जास्तीत जास्त काळ या मित्राबरोबर घालवू लागलो. मला समोर दिसणार्‍या वृक्षांनी चारही ऋतूत निसर्गाला दिलेली दाद हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. पण आज या निसर्गखिडकीतून दिसणारे पक्षी हा माझ्या लेखनाचा विषय आहे.

मी सकाळी लिहायला माझ्या मित्राबरोबर बसलो की ऐकू येतात असंख्य पक्षाचे आवाज, आवाज कसला, एखाद्या स्त्रियांच्या संमेलनात चाललेला गोंधळच म्हणाना. काही नाजूक काही कर्कश्य, काही किणकिणणारे असे अनेक ध्वनी.......

गुंडांसारखे जोरजोरात पंख फडकवत, ओरडत उडणारे पोपट, पिचकारीच्या शेंगांच्या टोकावर बसून त्या शेंगा खालून सोलताना होणारी त्यांची गडबड फारच विनोदी असते. फांदीवर बसून तीच फांदी कापण्याचीच तर्‍हा ती. त्यावेळी उलटे होऊन शेपूट आकाशाकडे व चोच खाली पण वरच्या दिशेन वाकलेली हे दृष्य फार मजेशीर ! त्याच वेळी त्याच्या डोळ्यांची होणारी हालचाल तर कुठल्याही नटश्रेष्ठाला मागे टाकेल याची मला खात्री वाटते.

गुंड

चिमण्यांच्या जोड्यांची एकत्र राहण्याची धडपड पाहून मला त्यांचे कौतूक वाटते. चिमण्या गायब झाल्या आहेत असे म्हटले जाते पण आम्ही नशिबवान म्हणायला हरकत नाही. आमच्या येथे त्या भरपूर आहेत. त्या बघतांना मला माझे लहानपण (जेव्हा ’या’ घरातही घरटे करायच्या) आठवतेच.

दररोज संध्याकाळी साधारणत: सात वाजता टेरेसमधे वाईनचा ग्लास हातात घेऊन बसले की समोरच असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर असंख्य भूंगे फिरत असताना दिसतात. का ते शोधून काढायचे आहे अजून. हे भुंगे त्या झाडावर घिरट्या घालत असताना चुकून कधीकधी आमच्या टेरेसमधेही शिरतात आणि शांतपणे बाहेर पडतात. गंमत म्हणजे हा सगळा खेळ साधारणत: अर्धा तास चालतो. त्यानंतर एखाद्या प्रसंगावर पडदा पडावा तसे सगळे एक्झिट घेतात.

सकाळ, संध्याकाळी सोबत करणारी तुरेवाल्या बुलबुलाची जोडीशी तर माझी वैयक्तिक ओळख आहे. माझ्या टेबलासमोर जो खाली जाणार्‍या जिन्याचा कठडा आहे तेथे नियमीत येऊन बसणे हा यांचा छंद आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एवढ्या जवळून यांना पहाणे हा एक अनूभव आहे. तो तुरा, रुबाब, चोच, आणि कानाखाली असलेला वेगळाच लाल रंग आणि रंगात आले की मस्त शीळ घालणे..... व्वा !

ज्याच्या दर्शनाने धनलाभ होतो असे म्हणतात तो भारद्वाज बघून बघून, हे खरे असते, तर मी टाटा बिर्लां पेक्षाही श्रीमंत झालो असतो. इतरवेळी त्याच्या काळ्या अंगावर त्याने चॉकलेटी रंगाचे मखमली ब्लेझर घातला आहे की काय असे वाटते. सकाळी झाडाच्या टोकावर पंख पसरवून कोवळे उन खात बसलेल्या या पक्षाला बघताना मला नेहमी गंमत वाटते तर त्याला चालताना बघून वाइट वाटते. असे वाटते की याला आकाशात का उंच उडता येऊ नये ? ती बुलबुलांची जोडी याला सारखी फांद्यांवरून हुसकावून लावत असते पण हा शांतपणे दुसर्‍या फांदीवर जाऊन बसतो आणि काहीच करत नाही. मी बघितलय, तसा अत्यंत घाबरट पक्षी आहे हा. उघड्यावर कधी येणार नाही सदासर्वदा पानांच्या आड. पण याच्याशीही आमची दोस्ती जमलीय बरका ! सकाळी न्याहारीच्या वेळी फोडणीची पोळी कठड्यावर टाकली की हळूच कठड्यावर अवतीर्ण होतात हे महाराज ! पण ते सुद्धा कुंडीच्या आडून. त्याला घारींसारखे उडावे असे तीव्रतेने वाटत असेल का ?.....त्याला काय वाटते हे आपल्याला कळायचे नाही पण मला एकदा त्याला उंच उडतांना बघायचय हे खरे !पण सदानकदा सावलीत, असल्यामुळे याचा चांगला फोटो काही मिळत नाही. कधितरी मिळेलच !

एकदा मी माझ्या मशीनवर काम करत बसलेलो असताना मला एकदम गोंगाट ऐकू आला. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केले पण जास्तच आवाज येऊ लागला म्हणून बघितले तर दोन घारींच्या मागे दोन टिटव्या लागल्या होत्या. त्या पाठलागात त्या एवढ्या कर्कश्य ओरडत होत्या की बस्स ! गंमत म्हणजे घारीसारखा एवढा मोठा पक्षी जिवाच्या आकांताने पूढे उडत होता आणि या मागे. शेवटी घारींनी उंची गाठल्यावर या खाली जमिनीवर उतरल्या. बहूदा त्यांची अंडी त्या तेथे खाली झुडपात असावीत. इतरवेळी त्यांचे उंच पाय ही एक लक्षात येणारी गोष्ट.

घारींवर मी काही लिहीत नाही कारण त्यांच्याबद्दल मी माझ्या एकात्म या कथेत लिहीले आहे. अर्थात ही कथा मला या निसर्गखिडकीतून घारींकडे पहात असतानाच सुचली हे ही खरं. आता मला घारी एकामेकांना जी साद घालतात तीही ओळखू यायला लागली आहे. ती साद ऐकताना मला काहीतरी गूढ वाटते. म्हणजे ती साद अगदी क्षितीजापर्यंत जात असणार अशी माझी खात्री आहे. यातच एकात्मच्या जन्माचे रहस्य आहे असे मला वाटते.

ब्राह्मणी मैना आणि साधी मैना यांच्यातला व यांच्या स्वभावातला फरक त्यांना दोघांनाही एकदम बघितल्याशिवाय उमगणार नाही. यांच्यात सामाजिक नियम फार कडक असावेत असे वाटते कारण या त्यांच्या भाइबंदांना चोचीने मारत असताना मी अनेक वेळा बघितले आहे. कर्मठ लेकाचे ! जग कुठे चालले आहे हे यांना केव्हा कळणार कोणास ठावूक !

या झाडांच्या मधून दोन केबल्स जातात एकामेकांना समांतर. ही जागा एका पक्षासाठी राखीव आहे म्हणाना ! त्याचे नाव कोतवाल किंवा ड्रॅंगो. त्या तारेवर बसून हा आजूबाजूचा आसमंत न्याहाळीत असतो ते बघून मला का कोणास ठाऊक तूंगी या किल्ल्याची आठवण येते. तोही असाच उंचच्या उंच आणि खाली नजर ठेवून असतो. याचे लालबूंद डोळे, दुभागलेली शेपटी आणि वेगात उडणे बघून असे वाटते की हे महाराज मांसाहारी असावेत. आहेत का नाहीत हे माहीत नाही, पण असणारच. असं म्हणतात की हा पक्षी दुसरा पक्षी ओरडत असताना त्याची हुबेहूब नक्कल करू शकतो. पण मला हा अनूभव अजून यायचाय.

ड्रँगो / कोतवाल

साधारणत: सकाळची उन्हे पडली की पिचकारींच्या झाडावर एकदम गर्दी उडते. त्या फुलातील किडे खाण्यासाठी. त्यातच फुलपाखरांप्रमाणे त्या फुलांवर पिंगा घालणारे छोटे शिंजीर इतके वेगाने पंख हलवातात की त्यांचा फोटो काढणे मुष्कील. आकार तर इतका लहान की त्या फुलातही गायब होऊ शकतात ते.

सूर्यपक्षी/शिंजीर.

शिंजीरचे शहरी घरटे.

कुहू कुहू असा आवाज काढणार्‍या कोकीळ आणि सौ. कोकिळा यांची जोडी बघतांना कोकीळ एवढा सूंदर गातो आणि कोकीळा इतकी सूंदर का असते याचा उलगडा होतो. या दोन जोड्या दिवसातून संध्याकाळी एकदा तरी हमखास दर्शन देतातच.

झोक्यावर कोकिळा...

दयाळाचे सकाळचे गाणे ऐकत उठताना परमेश्वराचे या जन्माबद्दल आभार मानावेत का दयाळचे आभार मानावेत हे समजत नाही. पण मी दोघांचेही आभार मानतो.

दयाळ

एक दिवस पाऊस पडून गेल्यावर त्या झाडांच्या इथे जमिनीवर एक गंमत बघितली. त्या डबक्याच्या एका कडेला एक झाड आहे आणि एका बाजूला तारेचे कुंपण. पावसाळ्यात या डबक्यात बरेच पाणी साठते इतके की एकदा याच्यात मी बदकेही बघितली. असो. तर हा खंड्या डबक्यात काही हालचाल दिसली की झाडावरून निघायचा सूर मारायचा आणि इकडच्या काठावर कुंपणावर यायचा. शिकार फस्त केली की पुन्हा पाण्याकडे लक्ष. परत सूर आणि पलिकडे त्या झाडाच्या फांदीवर लॅंडींग. असे जवळजवळ अर्धा एक तास तरी चालले असेल. शेवटी मीच कंटाळून बाजूला झालो. रंग तर डोळ्याचे पारणे फिटवणारे !

खंड्या

एकदा मला याच झाडावर कधीही न आढळणारा पक्षी आढळला......

मुनीया, रॉबीन, कावळे, कबूतरे, तांबट हे पण नित्य दर्शन देतात पण यांचे चांगले फोटो अजून काढायचेत.

तांबट

एक दिवस मात्र त्या डबक्यात मलबार ग्रे हॉर्नबील बघून मी थक्क झालो. आता पुढच्या मोसमात येतात का ते बघायचय !

जयंत कुलकर्णी.
सर्व फोटो मी काढले आहेत.

मौजमजाछायाचित्रणस्थिरचित्रविचारलेखआस्वाद

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

24 Aug 2011 - 8:14 pm | स्मिता.

सर्व फोटो आणि वर्णनाची पद्धत, दोन्ही आवडले. आणखी फोटो येवू द्यात.
सुरुवात वाचून टेबलावर 'टेबला'वर असावा असं वाटलं होतं.

सहज's picture

24 Aug 2011 - 8:19 pm | सहज

फोटो व वर्णन दोन्ही छान!

प्लीज फोटो पिकासा वरुन येथे दिल्यास दिसतील बहुतेक.
फोटो दिसत नाहियेत मला म्हणुन निराशा झाली.. बाकी वाचतो आहे...

पप्पु अंकल's picture

24 Aug 2011 - 8:20 pm | पप्पु अंकल

फोटो सुंदरच, पण फोकसिंग आणि टायमिंग लाजबाब.
असा मित्र प्रत्येकाला असावा.
'विंडोज' ला धन्यवाद...
पुढील फोटोंसाटि शुभेच्छा

तिमा's picture

24 Aug 2011 - 8:28 pm | तिमा

धन्यवाद, जयंतराव. फोटो अप्रतिम. फोटो व वर्णन वाचून प्रसन्न वाटले. खंड्या पक्षी इतका स्पष्ट कधी पाहिला नव्हता.

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2011 - 8:53 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
स्वाती

प्रास's picture

24 Aug 2011 - 9:30 pm | प्रास

तुमच्या लेखनाचा, तुमच्या चित्रकारीचा, तुमच्या छायाचित्रकारीचा (फोटोग्राफीचा) फ्यान होतोच.

आता तुमच्या टेबलाचाही फ्यान बघा! नाही नाही, फक्त टेबलाचाच नाही, ते टेबल, बाजूची सांगीतिक अवजारं, तो कॅमेरा, ती खिडकी, त्या खिडकी बाहेरची वृक्षसंपदा आणि त्या वृक्षसंपदेवरील पक्षीसृष्टी.... सार्‍या सार्‍याचाच.....

मला तुमचा प्रचंड हेवा वाटतोय....

सुंदर लिखाण, मस्त फोटोज.....

तुमचा फ्यान :-)

माझ्या टेबलासमोर जो खाली जाणार्‍या जिन्याचा कठडा आहे तेथे नियमीत येऊन बसणे हा यांचा छंद आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

व्वा:!! मजा आली.
:)

फोटो खुप सुंदर.

मिसळपाव's picture

24 Aug 2011 - 9:43 pm | मिसळपाव

सुंदर छायाचित्रे आणि तितकेच सुंदर विवेचन. वाचन खूण साठवली आहे..

अवांतर - ब्राम्हणी मैनेला तेव्हढ्यात टोच का मारून घेतलीत बुवा? !!

प्रचेतस's picture

24 Aug 2011 - 10:24 pm | प्रचेतस

फोटो आणि लिहिण्याची शैली अतिशय सुरेख. तुमचे हे मैत्र आमच्याही जीवाला भावले.

पिवळा डांबिस's picture

24 Aug 2011 - 10:29 pm | पिवळा डांबिस

फोटोही आवडले!
ब्राह्मणी मैना आणि साधी मैना यांच्यातला व यांच्या स्वभावातला फरक त्यांना दोघांनाही एकदम बघितल्याशिवाय उमगणार नाही.
क्या बात है!
अगदी अगदी!!!!
;)

पिडां काकाला नेमके हेच वाक्य सापडले दाद द्यायला.
एनी वे.
शिंजीर (पिवळा) या फोटोनंतर जो काळसर निळा पक्षी दिसतो तो देखील शिंजीरच आहे का?

पिडां काकाला नेमके हेच वाक्य सापडले दाद द्यायला.
एनी वे.
शिंजीर (पिवळा) या फोटोनंतर जो काळसर निळा पक्षी दिसतो तो देखील शिंजीरच आहे का?

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2011 - 9:58 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

हो तोही शिंजीर कुळातलाच आहे. शिंजीरच म्हणातात त्याला पर्पल सनबर्ड असे नाव आहे. म्हणजे मराठीत आपण "काळसर निळा शिंजीर" म्हणू शकतो

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2011 - 10:35 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

हेवा वाटला!

अन्या दातार's picture

24 Aug 2011 - 10:55 pm | अन्या दातार

अगदी असेच म्हणतो

विशेष करून खंडोजीराव,खारूताई, आणी तांबटमहाराज आवडले,,, :smile:

पैसा's picture

24 Aug 2011 - 11:08 pm | पैसा

जयंत कुलकर्णींचं लिखाण छान असतंच. फोटो पण खूप आवडले!

स्पंदना's picture

25 Aug 2011 - 5:04 am | स्पंदना

अहा शिंजीर!!

हे दोन्ही फोटो अत्त्युत्तम , कारण एका मध्ये पक्षी कसा आहे ते स्पष्ट दिसत तर दुसर्‍यात तो फुलात ही कसा गडप होउ शकतो ते कळत.
बाकि तुमचा हेवा वाटला आहे तेंव्हा वाईट दृष्ट लागु नये म्हणुन उपाय करुन घ्या!

नंदन's picture

25 Aug 2011 - 5:20 am | नंदन

वर्णन, शैली आणि फोटो - सारेच आवडले.

५० फक्त's picture

25 Aug 2011 - 7:00 am | ५० फक्त

जयंत सर, तुम्हाला एकदा भेटायचंच आहे, तुमचा हेवा वाटतो, तुमचा फॅन आहे वैग्रे गोष्टी इथ सांगुन उपयोग नाही.

किसन शिंदे's picture

25 Aug 2011 - 9:44 am | किसन शिंदे

लिखानाप्रमाणेच तुमची फोटोग्राफीही अतिशय सुंदर आहे...तुमचं टेबल पण जाम आवडलं. :)

तेवढे जरा अल्बर्ट स्पिअरचे राहिलेले भाग मनावर घ्या..!

जयंत कुलकर्णी's picture

25 Aug 2011 - 9:55 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

सर्वांना मनापासून धन्यवाद.
बर्‍याच वाचकांनी अल्बर्ट स्पिअर बद्दल विचारले, पण मी ते मागे टाकले आहे. कारण इतर धाग्यावर असे वाचले की "जे नियमीत लिखाण करतात, म्हणजे एका पाठीमागून एक असे भाग टाकले तर वाचकांना आवडत नाहीत" म्हणून मी ते लिखाण थांबवले आहे. अर्थात जर सगळ्यांना ते पाहिजे असेल तर परत चालू करू ! त्यात काय एवढे !

प्यारे१'s picture

26 Aug 2011 - 11:46 am | प्यारे१

जे के (हरकत नसावी )

तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत नितळ आणि पारदर्शी तितकाच तटस्थ असावा असे वाटते.
'बाकी शून्य' या पुस्तकात कुणाबद्दल तरी 'जगातल्या चांगुलपणावर त्याचा प्रचंड विश्वास होता' असं काहीतरी म्हटलेलं तुमच्याबद्दल तंतोतंत खरं वाटतं. याबरोबरच जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते उचलायचं, माहिती घ्यायची आणि ती स्वतःकडे न ठेवता लोकांपर्यंत पोचवायची असा तुमचा एक चांगला प्रयत्न जाणवतो.

आम्ही तुमचे ए.सी. झालो आहोत.

बाकी सिनेमात काम करतात म्हणून राखी सावंत आणि ऐश्वर्या/मधुबाला यांची तुलना होऊ शकत नाही.
अमिताभचे'च' केबीसी लागले तर'च' रोजही बघणारे आम्ही आहोत.
'मुझे गले लगाओ' म्हणावे लागणारे आम्हास कदापि आवडत नव्हते.

तेव्हा "जे नियमीत लिखाण करतात, म्हणजे एका पाठीमागून एक असे भाग टाकले तर वाचकांना आवडत नाहीत" हे वाक्य आपणास लागू नाही.

कळावे,

आ.
ए.सी

प्रचेतस's picture

26 Aug 2011 - 1:35 pm | प्रचेतस

असेच म्हणतो.
तेव्हा पुढचा भाग लवकरच येउ द्यात.

शैलेन्द्र's picture

25 Aug 2011 - 10:01 am | शैलेन्द्र

भन्नाट.. मजा आली.. अस एखाद झाड प्रत्येक घराला हवचं

मुलूखावेगळी's picture

25 Aug 2011 - 11:58 am | मुलूखावेगळी

तुमचा टेबल, मित्र आनि लेख सगळेच आवडले.

जे नियमीत लिखाण करतात, म्हणजे एका पाठीमागून एक असे भाग टाकले तर वाचकांना आवडत नाहीत"

ते तुम्हाला लागु नाहीये :)
तुम्ही लिहा

प्रकाश घाटपांडे's picture

25 Aug 2011 - 7:07 pm | प्रकाश घाटपांडे

मैत्र आवडले.
पाउस पडत असताना घोट घोट बिअर पित टेरेस मधे मला एक दृष्य दिसले होते.गर्द झाडीत काजवेही पानांवर चमकत होते. मला दृष्य टिपता आले नाही पण मनात बिंबले आहे.

मदनबाण's picture

25 Aug 2011 - 7:55 pm | मदनबाण

वा... सुंदर. :)
मी टिपलेला बुलबुल आणि धष्ट पुष्ट गवा इथे टाकायची लयं इच्छा झाली व्हती बघा...

जयंत कुलकर्णी's picture

26 Aug 2011 - 1:04 pm | जयंत कुलकर्णी

आपण शूभ कार्य झाल्यावर जे गायब झालात ते आता उगवलात. उगवलात ते उगवलात आणि फोटो टाकायची इच्चा प्रदर्शीत करता. मदनराव आपल्याला परवानगीची गरज केव्हापासून लागायला लागली आमच्या धाग्यावर ? जरूर टाका आपले फोटो.

सविता००१'s picture

26 Aug 2011 - 11:23 am | सविता००१

भन्नाट. फोटो आणि लेखन सर्वच केवळ उच्च आहे. अत्यंत हेवा वाटतोय तुमचा!

मनराव's picture

26 Aug 2011 - 12:12 pm | मनराव

झक्कास...... !!!

इरसाल's picture

26 Aug 2011 - 12:32 pm | इरसाल

कुलकर्णीसाहेब तुम्ही काढलेले फोटो अतिशय उत्तम. तुमच्या लिखाणाविषयी आणखी काय बोलणार.
आमचेही गोड मानून घ्या.

जयंत कुलकर्णी's picture

26 Aug 2011 - 1:00 pm | जयंत कुलकर्णी

मस्त !

प्राजक्ता पवार's picture

26 Aug 2011 - 1:55 pm | प्राजक्ता पवार

सुरेख लिखाण .
सर्वच फोटो आवडले .

चित्रगुप्त's picture

27 Aug 2011 - 11:46 am | चित्रगुप्त

सर्वच खूप आवडले. सुरुवातीला टेबल, कॅमेरा व खिडकीचा फोटो, मग गुल्मोहराचा पडदा, मग एक एक पक्षी .... छानच.