अप्पा गेले.
नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील?
नाही. खरंच अप्पा गेले.
जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले. किंबहुना जे डोकं त्याचरणी ठेवायचं ते तरी चांगल्या आणि शुद्ध विचारांनी भरलेलं असावं ही साधी अपेक्षाच खरं आमच्याकडून पुरी होते की नाही कुणास ठाऊक.
तुम्हाला वाटेल काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय ?
अप्पा.
नाव - डॉ. श्रीहरी दत्तात्रय देशपांडे.
जन्मसाल - १९३१.
मृत्यू- २८ जून २०११.
वय- ८० मृत्यूचे कारण- वृद्धापकाळ. शरीरानं सोडलेली साथ.
माहिती होतं. अप्पा आजारी आहेत आणि आता जास्त दिवस नाहीत राहिलेले म्हणून.
९ जुलैला त्यांच्या कुटुंबियांतर्फे ठेवल्या गेलेल्या श्रद्धांजलि कार्यक्रमाला उपस्थित रहाता आलं आणि कळालं आपण काय गमावलंय. ठाऊक होतं काहीतरी निसटतंय पण नक्की काय ते कळत नव्हतं. या कार्यक्रमात लोक बोलले तेच या लेखात मांडण्याचा प्रयत्न. आपल्यापर्यंत पोचलं नाही तर ती माझी चूक, माझा कमीपणा.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील उणापुर्या ४०-५० उंबरठ्याच्या हातगेघर या गावात जन्मलेले श्रीहरी दत्तात्रय देशपांडे घरात ज्येष्ठ. मधु म्हणून गावात ओळखले जात होते. १ भाऊ आणि ३ सक्ख्या बहिणी परिवार. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन डी ए एस एफ ही वैद्यकीय पदवी घेतल्यावर आपल्या गावातच दवाखाना सुरु केला.
५० वर्षापूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाना सुरु करुन तिथे स्थायिक होणं शक्य असताना जिथं दवाखाना नाही तिथं आपली सेवा द्यायची असा निर्धार करुन अप्पांनी दवाखाना सुरु केला. आधी पायपीट करत, नंतर सायकल, मग मोटारसायकल अशा पद्धतीनं आजूबाजूची गावं अप्पा करत होते. हातेघर (हातगेघर)पासून जवळ हुमगाव हे आमचं गाव. तिथं अप्पा यायला लागले आणि जणू हुमगावकरच झाले. येताना वाटेत नदी लागायची. पूल नव्हता. अप्पांना पोहता येत नव्हतं. शेजारच्या गावातल्या एका धिप्पाड व्यक्तीला बरोबर घेऊन त्याच्या हाताला पकडून अप्पा भर पावसात, पुरातही पलिकडे यायचे, रुग्णसेवा करायचे.
आज आपण सगळे डॉ. ना शक्यतो आडनावाने हाक मारताना अप्पांनी आपल्या रुग्णांबरोबर असे काय कौटूंबिक संबंध जमवले की 'मधु डॉक्टर' कडूनच औषध घ्यायला घरातली आज्जी तयार व्हायची. हातेघरहून पांचगणीला आल्यावर आप्पांनी तिथं दवाखाना आणि नंतर हॉस्पिटल सुरु केलं.
तसे अप्पा रा स्व संघाचे स्वयंसेवक. कट्टर हिंदुत्ववादी. ज्यांना संघाची कार्यपद्धती ठाऊक असेल त्यांना माहित अहेल. अप्पा संघाचं आलेलं प्रत्येक काम चोख करत. दैनंदिन शाखा कधी न चुकू देणं, सूर्यनमस्कार, व्यायाम इ. गोष्टी सातत्यानं चालू असायच्या. हिंदू धर्माबद्दल प्रचंड अभिमान आणि प्रखर देशाभिमानही. आणि तरीही सकाळी नऊ वाजता जणू पोषाखाबरोबरच आपली डॉक्टर ही पदवी अंगावर घेताना डॉक्टरकीचा धर्म अप्पांनी कधीही सोडला नाही.
पांचगणीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध शाळांमुळं तिथं निर्माण झालेलं कॉस्मोपोलिटन कल्चर. विविध धर्मीय, पंथीय लोक तिथं राहतात त्यामुळे बर्याच स्तरावरचे लोक रुग्ण म्हणून दवाखान्यात यायचे. रुग्णसेवा करताना हा आपला राजकिय, सामाजिक विरोधक आहे का हे न पाहता आलेल्या रुग्णाची रात्री अपरात्री देखील सेवा केल्याची उदाहरणे मला ठाऊक आहेत.
संघ काम आणि डॉक्टरकीचा व्यवसायच नाही तर इतर क्षेत्रात वावरताना दोन गोष्टींमध्ये कधीच गल्लत केली नाही आणि त्यामुळेच अप्पांनी समाजाच्या प्रत्येक स्तरावर माणसं जोडली.
एकदा एक विचारसरणी स्विकारल्यावर तिला अजिबात न सोडता आयुष्यभर चिकटून राहणारे, त्यासाठी १००% प्रयत्नच नव्हे तर प्रसंगी बलिदान देण्याची तयारी असलेले अप्पा समाजजीवनात काम करणार्या व्यक्तींसाठी आदर्श आहेत असं मला वाटतं. दर निवडणुकीला पक्ष बदलणारे, फोटो बदलणारे, नेते बदलणारे कार्यकर्ते बघितले की हा फरक प्रकर्षाने जाणवतो. आणीबाणीमध्येही अप्पांनी विरोध करुन तुरुंगवास भोगला. ही समर्पण वृत्ती जास्त भावणारी आहे. काँग्रेस मध्ये काम करणारे अनेक लोक पक्ष मतभेदापलिकडे जाऊन अप्पांचे सुहृद झाले होते.
वयाच्या जवळपास साठीपर्यंत अप्पांनी रुग्णसेवा केली. दोन मुले आणि मुलगी डॉक्टर झाल्यावर सुरुवातीला त्यांच्याबरोबर दवाखाना सांभाळताना हळूहळू अप्पांनी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली. या पूर्ण व्यवसाय कालामध्ये दिवसा डॉक्टरचं रुप वेगळं आणि संध्याकाळी/रात्री 'वेगळं' असं कधी घडणं शक्यच नव्हतं. वैद्यकिय व्यवसाय करणारे बरेच डॉक्टर आपल्याला 'तसे' दिसतात.
रुग्ण सेवा करताना आलेली रक्कम जमा करण्यासाठी एक छोटी डायरी अप्पा वापरायचे. जमा खर्चाची नोंद असलेली ही डायरी हीच पक्की करुन जी काही मिळकत असेल त्यावर कर भरणारे अप्पा आपल्या वागण्यातून आम्हाला कुठलीही करचुकवेगिरी करु नका हा संदेश देत होते.
गृहस्थाश्रम यशस्वीरित्या पूर्ण करुन त्यातून निवृत्त होऊन काय करायचे असा प्रश्न न पडू देता अप्पांनी ईशान्य भारताची वाट धरली. दोन अडीच वर्षे मेघालयात सपत्नीक काम करुन अप्पा परत पांचगणीला आले. ( विश्वास कल्याणकरांनी मिपावर अन्यत्र ईशान्येत चालणार्या कामाचे स्वरुप दिले आहे पुनरुक्ती नको म्हणून लिहित नाही)
पण घरी आले म्हणून दवाखान्यात जाऊ आणि पेशंट तपासू असा विचार अप्पांनी कधी केला नाही.वयाच्या पंचाहत्तरी पुढे देखील काठी टेकत टेकत दवाखान्यात येणारे डॉक्टर बघितले की अप्पांचे वैशिष्ट्य जाणवते. अतिशय चांगला चालणारा व्यवसाय स्वहस्ते मुलाहाती सोपवणारे अप्पा, अनेक रुग्णांना डॉक्टर म्हणून अप्पाच हवे असताना आपल्या निर्धारावर ठाम राहणारे अप्पा, दवाखान्यातून (खरेतर १५-२० बेडच्या हॉस्पिटलमधून) पूर्ण पणे लक्ष काढून घेणारे अप्पा, दवाखाना बंद केल्यावर अनेक लोक घरी भेटायला म्हणून आल्यावर शक्यतो वैद्यकिय सल्ला द्यायला टाळणारे आणि दिलाच तर कुठलीही फी न आकारणारे अप्पा माझ्यासाठी तरी आदर्शच आहेत.
हिंदुत्वाविषयी तीव्र मते असणारे अप्पा आता वानप्रस्थात सामाजिक कार्य कमी करुन अध्यात्मात रमू लागले होते. लहानपणी करारीपणामुळे जवळ जायला घाबरणारा मी या अध्यात्मीक अप्पांच्या प्रेमातच पडलो होतो. काही ना काही बोलून वातावरण खेळीमेळीचे ठेवणारे अप्पाआजोबा मला आवडत होते. वयोमानानुसार इंद्रियांनी साथ सोडल्यामुळे कानाने कमी ऐकू येणे सुरु झाले होते.
२००६ साली अप्पांची पंचाहत्तरी झाली. मिळेल ते हडपण्याच्या आजच्या काळात मी समाजाकडून आजपर्यंत घेत आलो, समाजाला काही देऊ नव्हे तर समाज ऋणातून उतराई होऊ अशी भावना ठेवून अप्पांनी किमान ८-१० लाख रुपयाच्या देणग्या कुठे ही वाच्यता न करता दिल्या. पुस्तक, दप्तर वाटपाची वर्तमान पत्रात पानभर जाहिरात करणारे लोक पाहिल्यावर अप्पांची थोरवी समजते.
यानंतर खरेतर सन्यासाश्रमच सुरु झाला होता. निव्वळ शरीर जगवण्यासाठी आवश्यक आहार, पूर्ण अध्यात्म आणि निरवानिरवीची भाषा. युरिनच्या काही त्रासामुळे झालेले ऑपरेशन शरीराला सहन झाले नाही आणि प्रकृती ढासळत होती. तरी सातत्याने हसतमुख आणि कुठेही त्रागा नाही. मध्ये हृदयाचे ही काही दुखणे त्रासदायक ठरले.
शेवटी २८ जूनला शरीर सोडून अप्पा गेले.
वयाने, अनुभवान, शिक्षणाने मोठे असणारे बरेच लोक असतात. पण आपल्या आचार, विचाराने मोठे अप्पा खरेच खूप मोठे होते नव्हे आहेत. हो आहेतच....!
तसा मी भावनाप्रधान नाही. गेल्या वर्षी माझे आजोबा वयोमानामुळे गेले. प्रामाणिकपणे सांगतो डोळ्यातून एकही अश्रू नाही आला. पण अप्पांच्या श्रद्धांजलि कार्यक्रमात सुरुवातीला झालेल्या ' भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद' या शब्दांनंतर सुरु झालेली अश्रुधारा कार्यक्रम संपल्यावरही सुरुच होती.
चु भू द्या घ्या.
प्रतिक्रिया
20 Jul 2011 - 12:30 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम आणि अतिशय संयत व्यक्तिचित्र. छानच!
अप्पांना श्रध्दांजलि!
20 Jul 2011 - 2:05 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
20 Jul 2011 - 3:36 pm | मूकवाचक
असेच म्हणतो.
20 Jul 2011 - 12:42 pm | स्पा
सुरेख
20 Jul 2011 - 12:50 pm | यकु
क्लास!
20 Jul 2011 - 1:06 pm | प्रचेतस
खूपच सुरेख लिहिले आहेस रे.
डोळ्यांतल्या अश्रूंनाच जणू शब्दरूप दिले आहेस.
20 Jul 2011 - 1:08 pm | धन्या
खरंच महान व्यक्ती होते डॉकटर.
लेखाचं शिर्षक लेखाला साजेसंच आहे.
- धनाजीराव वाकडे
20 Jul 2011 - 1:13 pm | किसन शिंदे
अतिशय सुंदर लेखन!
20 Jul 2011 - 1:44 pm | मृत्युन्जय
सुरेख आदरांजली आहे रे.
20 Jul 2011 - 2:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुदंर व्यक्तीचित्र!!
त्या देवमाणसाला आदरांजली.
20 Jul 2011 - 2:46 pm | स्वाती दिनेश
संयत व्यक्तिचित्रण!
ईश्वर त्यांना सद्गती देवो,
स्वाती
20 Jul 2011 - 3:04 pm | रणजित चितळे
अप्पा डोळ्यासमोर उभे राहिले.
तेथे कर माझे जुळती.
20 Jul 2011 - 6:06 pm | रेवती
अश्या व्यक्ती जगातून गेल्यावरही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात.
लेखन आवडले.
वर्तमान पत्रात पानभर जाहिरात करणारे लोक पाहिल्यावर अप्पांची थोरवी समजते.
अगदी!
20 Jul 2011 - 6:19 pm | वपाडाव
सुरेख व्यक्तिचित्रण......
देवमाणसाला आदरांजली....
20 Jul 2011 - 6:36 pm | विसोबा खेचर
सुरेख..!
20 Jul 2011 - 7:29 pm | तिमा
व्यक्तिचित्रण आवडले. अशा पुण्ण्यात्म्यांनाच या जीवन-मरणाच्या खेळातून कायमची मुक्ती मिळत असावी.
20 Jul 2011 - 8:03 pm | प्रभो
अप्पांना श्रध्दांजली!
20 Jul 2011 - 9:07 pm | आनंदयात्री
वर इतर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देवमाणसाला आदरांजली असेच म्हणतो. योग्यवेळी 'पुर्ण' निवृत्ती घेउन समाजाचं देणं कसं चुकतं करावं याचे अजून एक आदर्श उदाहरण दाखवल्याबद्दल धन्यवाद प्यारे.
21 Jul 2011 - 4:38 am | अर्धवटराव
श्रद्धांजली !!
अर्धवटराव
21 Jul 2011 - 7:34 am | ५० फक्त
सुरेख व्यक्तिचित्रण आणि डॉक्टरांना श्रद्दांजली.
22 Jul 2011 - 2:48 am | इंटरनेटस्नेही
सुरेख व्यक्तिचित्रण आणि डॉक्टरांना श्रद्दांजली.
लेखन आवडले. प्यारेंनी अतिशय उत्तम लिहिलं आहे.