एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 9:49 am

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

व्यक्तिरेखन
कोणत्याही नाटकातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट.. नुसते संवाद उत्तम असून उपयोग नाही, ज्या माणसांची ही कथा आहे, ती माणसं खरी हवीत.
कमी पात्रांच्या चेकॊव्हच्या एकांकिका, दिवाकरांच्या नाट्यछटा यातून अत्यंत कमी वेळात व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
तेंडुलकरांनी खास दिलेली उदाहरणे...
१. क्रॅश सिनेमामध्ये ( आधीच्या दृश्यात वंशभेद करणारा ) गोरा इन्स्पेक्टर वडिलांच्या आजाराने गांजलेला आहे, तो अगतिकपणे वडिलांसाठी हॊस्पिटलमध्ये भांडतो आहे....माणूस प्रत्येक वेळी पूर्ण दुष्ट / सुष्ट नसतो, ते एक मिश्रण असते, याचे उत्तम उदाहरण.... त्यामुळे तो माणूस म्हणून जास्त खरा भासतो.
२.मिस्टर ऎंड मिसेस अय्यर या सिनेमातील बसमधील पात्रे..कमी वेळात व्यक्तिरेखा सुस्पष्ट....

भावना :
प्रत्येक माणसाला कशासाठीतरी असुरक्षित वाटत असतं आणि स्वत:चं महत्त्व वाढावं असं वाटत असतं..( कोणी बोलून दाखवतं, कोणी नाही).
म्हणून माणूस आपल्या चुकांसाठी कोणीतरी दुसर्याला जबाबदार धरतो, आरोप करतो.... असुरक्षितता ही सर्व मानवी भावनांमधली मूलभूत भावना आहे, इतर सर्व भावना यातूनच येतात.कोणीच स्वत:वर पूर्ण समाधानी नसतो.म्हणून प्रत्येकजण आपापल्या कमीपणावर मात करण्यासाठी इतर भावनांचा आधार घेतो.
( उदा. १ प्रतिकारास असमर्थ माणसं छोट्या टीकेबद्दलसुद्धा अतिसंवेदनशील असतात
२. मोठी महत्त्वाकांक्षा कोणत्यातरी कमीपणाच्या भावनेतून येते.).

व्यक्तिरेखेला आकार देणे..
आज आहे तशी ही व्यक्तिरेखा का घडली असेल? तिचा भूतकाळ आणि वर्तमान पडताळून पाहणे हा एक इन्ट्रेस्टिंग प्रकार असतो.
कोणत्याही व्यक्तिरेखेला तीन महत्त्वाची अंगे असतात... सम्पूर्ण त्रिमितीय व्यक्तिरेखा तयार करण्यासाठी त्यांचा अभ्यास फ़ार महत्त्वाचा आहे.
१. शारीरिक
दिसणं. आरोग्य...डोळे, कांती, केस, रंग, लठ्ठ / बारीक,सुंदर / कुरूप, अपंग , बहिरा, अंध, वगैरे..
...निरोगी माणूस आजारी माणसापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देतो . दिसणं हे मानसिक जडणघडणीसाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्त्वाचं असतं ज्यातून न्यूनगंड किंवा अहंगंड तयार होतात.
२. सामाजिक
वातावरण.... आजूबाजूची परिस्थिती. श्रीमंती/ गरीबी / पालकांची स्थिती/शांत सुखी स्थैर्य असलेलं आयुष्य...घटस्फ़ोटित पालक, एकपालकत्व,.... मित्रपरिवार, शाळा कॊलेज, शिक्षण, आवडते अभ्यासाचे विषय, सामाजिक जीवन.. वगैरे.
३.मानसिक
पहिल्या दोनातून ही मानसिक जडणघडण होते. व्यक्तिरेखांच्या महत्त्वाकांक्षा, वैफ़ल्य,चक्रमपणा,ऎटिट्यूड, गंड यात येतात..
व्यक्तिरेखांच्या कोणत्याही कृत्याची कारणमीमांसा करण्यासाठी , मोटिव्हेशन समजण्यासाठी हे आवश्यक.

protagonist : प्रोटॆगनिस्ट
ही गोष्ट कोणाची या प्रश्नाचे उत्तर काय??
कथेतलं मुख्य पात्र...कोणत्याही कथेतला संघर्ष सुरुवातीपासून शेवटापर्यंत जी व्यक्ती (किंवा सारख्या विचारसरणीचा समुदाय) पुढे नेते , ती व्यक्ती असते प्रोटॆगनिस्ट म्हणजे रूढार्थाने गोष्टीचा नायक किंवा नायिका....)

मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..त्याचा जो स्वभाव असेल, कंपल्सिव्ह ट्रेट असेल तो अगदी भन्नाट असावा...
आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय..इथे संघर्ष सुरू होतो...आणि संकटं वाढत वाढत जातात...त्यातून बाहेर पडतापडता धडपड करत करत तो आत आत रुतत जातो...
मुख्य पात्र कशासाठीतरी असमाधानी आहे, परिस्थिती बदलायची धडपड करत आहे... ध्येयासाठी वाट्टेल ते करणारा ,सार्‍यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी झटणारा आहे, आणि कोणी बरोबर नाही आले तर एकटा लढणारा आहे....या ध्येयामध्ये जो तुल्यबळ परंतु सामान्यत: वाईट विचारांचा माणूस अडथळे आणतो, तो ऎंटागनिस्ट...( ही झाली प्रोटॆगनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी)

ऎंटागनिस्ट

अर्थात प्रोटॆगनिस्टच्या विचारांना विरोध करणारा , रूढार्थाने खलनायक....
( कधी कधी याच्या विचारांमधून गोष्ट सुरू होते.... ऎंटागनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी .....
उदा. जेम्स बॊंडचे बरेचसे सिनेमे... किंवा मिस्टर इंडियातला मोगॆम्बो वगैरे.... जगावर राज्य करण्यासाठी यांच्या कारवाया वगैरे चालू असताना त्यांच्या मनसुब्यामध्ये येणारा हीरो)

इतर पात्रे :
नाटकासाठी इतर पात्रांची गरज पडते, मनातले गुंतागुंतीचे विचार सांगायचेत तर पात्रांची कोणाशीतरी चर्चा होणे आवश्यक... मात्र ही पात्रे कथानकाशी आणि प्रेमाईसशी सुसंगत हवीत.उगीचच येणारी जाणारी अनावश्यक पात्रे कंटाळा आणतात....(ही लेखकाची सोय असली तरी प्रेक्षकाला आराखड्याच्या यंत्रांची खडखड जाणवू नये यात लेखकाचे कौशल्य)

नाट्यसाहित्यिकतंत्रविचारमाहितीआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 11:39 am | अरुण मनोहर

पहिल्या भागासारखाच मननीय लेख.

मनिष's picture

1 Jul 2008 - 11:45 am | मनिष

व्यक्तिरेखा लिहितांना खरच असा विचार झालेल दिसत नाही बर्‍याच वेळा....खासकरून मानसिक अंगाचा...त्यात लेखकाची 'इनसाईट' महत्वाची. नाहितर त्या कथेची विश्वासार्हता गमावून बसतात....उदा. गजेंद्र अहिरेच्या बर्‍याच व्यक्तिरेखा...त्याची समज खूपच वरवरची, भाबडी वाटते. तसेच "सातच्या आत घरात" मधे वाटले. त्या उलट सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांच्या व्यक्तिरेखेचा आलेख खूप नेटकेपणे, तसेच तपशीलात मांदलेल वाटतो -- त्या व्यक्तिरेखा जिवंत वाटतात. मला वातते - ह्यात लेखकाची जाण खर्‍या अर्थाने दिसून येते!

अवांतर - मधे प्रख्यात मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (त्यांची नाटक, सिनेमा ह्यांची जाणही चांगलीच प्रगल्भ आहे) ह्यांचे 'तुझ्याविना' नाटक पाहिले...ते व्यक्तिरेखा कशा दखवतात ह्याबद्द्ल साहजिकच उत्सुकता होती...काही डिटेल्स खूप चांगले होते, पण तरीही नाटक नाही परिणामकारक वातले...ते असे का ह्याचा अजून विचार करतोय....

मास्त्र - लिहित रहा....चर्चा मस्त रंगते आहे! :)

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 1:03 pm | विसोबा खेचर

मास्तर, छान लिहिले आहे. आत्ताच दोन्ही भाग वाचले. फारसे समजले नाहीत व अंमळ बोअर वाटले. मात्र नाट्यलेखन क्षेत्रात येऊ घातलेल्या मंडळींकरता/विद्यार्थ्यांकरता हे लेखन नक्कीच उपयोगी ठरेल असे वाटते.

आम्हाला आपली नाटके पाहायला मात्र मनापासून आवडतात! :)

तात्या.