कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
4 Jul 2011 - 11:36 am

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्तं
कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमकविता
कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
कवितेची पाककृती ४: मधुशाला व रूपकक प्रणाली

सामान्य माणसाने आसपास बघितलं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहात नाही. ती म्हणजे जग हे थोर थोर व्यक्तींनी भरलेलं आहे. जगात नावाजलेले बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या आहेत. जाणकार व बिनजाणकार (पक्षी: नुसतेच भुकेले) लोक हौशीने त्यांच्या हातचे पदार्थ खाऊन त्यांच्या पाककौशल्याला दाद देतात. अनेक निष्णात गायकांची गाणी ऐकण्यासाठी त्यांचे हजारो-लाखो चाहते वेडे होतात. त्याचप्रमाणे थोर थोर कवी व गजलकारांच्या रचना ऐकून दर्दी व बिनदर्दीदेखील वाव्वा म्हणून माना डोलवतातच. अशा थोरामोठ्यांकडे बघितलं की आपणा सामान्य लोकांना आपणही काहीतरी करावं असं वाटतंच. आता संगीत वगैरेसाठी प्रचंड रियाज लागतो. पदार्थ हुकमी चांगला करण्यासाठी चुलीसमोर घाम गाळावा लागतो. वर आपल्याला फारसे आवडत नसलेल्या लोकांना खायला देखील घालायला लागतो. त्यांनी वा वा म्हटलं तरी ती दाद खरीच असेल असंही नाही. आता आपण नाही का लोकांकडे गेल्यावर 'वैनी भेंडीची भाजी फक्कड' म्हणतो. मग त्यांच्या घरनं बाहेर पडल्यावर बायकोला म्हणतो 'थोडी कमी शिजली होती नै भाजी? आणि मीठही थोडं कमीचहोतं. तुझीच मस्त होते.' यातलं खरं कुठचं हे कसं ओळखायचं? त्यामुळे दुसऱ्यांकडून येणारी स्तुती ही थोडी चिमूटभर मिठासकटच घ्यायची असते.

त्यामानाने कविता किंवा गजल करणं तसं आकर्षक आहे. आता प्रत्येकच माणूस जगतो, त्यामुळे अनुभूती का काय म्हणतात तिचा कच्चा माल सगळ्यांकडेच असतो. कागद-पेन किंवा कळफलक इतकी सोपी उपकरणंही पुरतात. फक्त मराठी भीडस्त स्वभाव, कचखाऊ बाणा व न्यूनगंड आड येतो. पण चिंता करू नये. पुलंनीच तालासुरात विचारलेलं आहे - 'राजहंसाचे चालणे, जगती जालिया शहाणे, म्हणौन काय कवणे, चालोचि नये? राजहंसाचे चालतो मोठ्या डौलदार चालीने, म्हणून इतर कोणी चालूच नव्हे की काय? निजामपुरकर बुवा, कवीश्वरबुवा असतील मोठे कीर्तनकार, म्हणून या दिगंबरबुवा कडमडेकर जोश्यानं कीर्तन करूच नये की कांय?' तो प्रश्न पुलंनी विचारलेला असल्यामुळे वजन प्राप्त होऊन तुम्ही मान डोलावलेली लक्षात आली बरंका. आमच्यासारख्या कुडमुड्या लेखकाला पुलबुवांचा दाखला द्यावा लागतो. त्यामुळे मूळ प्रश्न पुन्हा अधोरेखित होतो. तो म्हणजे 'बदकाने कैसे राजहंसावे?' बल्लवाचार्य किंवा गायक होण्यासाठी आपल्या समाजात शिक्षण देण्याची सोय व्यवस्थित सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे अनेक बदकं निव्वळ पदन्यास घोटवून, घोटवून राजहंसाप्रमाणे चालू शकतात. मग त्यांच्यात व खऱ्या राजहंसात फरक काय हे फक्त खऱ्या जाणकारालाच ओळखू येऊ शकतं. पण पुन्हा जाणकारांमध्येदेखील बदकं कुठची हे ओळखण्याचा मार्ग नसल्यामुळे तिथेही घोळ आहेच. (हम्म्म - जाणकारक किंवा समीक्षक प्रणाली निर्माण करावी काय?) असो. थोडा भरकटलो.

कविता कशी करावी? हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कवितक प्रणालीला जन्म दिला. हेतू असा होता की सामान्य माणसाला कविता करणं सोपं जावं. सामान्य माणूस - म्हणजे अर्थातच मध्यमवर्गीय हा या उत्पादनाचा ग्राहक. ते डेमोग्राफिक समजून घेतलं पाहिजे. आजचा सामान्य माणूस नक्की कसा आहे? चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या सामान्य माणसापेक्षा तो जरा बऱ्या परिस्थितीत आहे. खाऊनपिऊन अगदी भरपूर सुखी नसला, तरी पोट पाठीला लागण्याची भ्रांत नाही. किंबहुना स्कूटरवर डबलसीट जाताना पोट पुढच्याच्या पाठीलाच लागण्याचा सध्या प्रश्न निर्माण झाला आहे. या आधुनिकोत्तर मध्यमवर्गीयाला पोटाचे प्रश्न कमी असले तरी मनाचे प्रश्न मात्र भरपूर आहेत. नोकरी करणाऱ्या गृहिणीला काम व घरकाम, करीअर व कुटुंब यांच्यामध्ये स्वतःला वाटून देण्याची ओढगस्त होते. आधुनिकोत्तर पुरुषांना आपल्या अनेक अस्मिता सांभाळताना भंजाळायला होतं. नोकरी, मुलांची शाळा, ट्यूशन, क्लासेस, झालंच तर त्यांच्यावर अधूनमधून थोडे संस्कार वगैरे करणं, सगळ्यांच्या सुट्ट्या साधून एखादी लांबची ट्रिप करून येणं... या सगळ्यात स्व चा प्रश्न बाजूला पडतो. या स्व ला इमेल, सेलफोन, फेसबुक, आयपीएल वगैरेंमधून अभिव्यक्ती साठी दिवसातून जेमतेम वीसेक मिनिटं मिळतात. त्या मोकळ्या वेळात त्या अभिव्यक्तीला कुठेही जाण्याची मोकळीक असली तरी रस्ताच माहीत नसेल तर? हा रस्ता सुकर करण्यासाठी कवितकचा खटाटोप. रस्त्यांवर आपल्याला जायची जागा शोधत व्यर्थ पायपीट करून त्याच त्याच वर्तुळांमध्ये भ्रमंती करत राहाण्यात काय अर्थ आहे? कवितक ही या अभिव्यक्तीक्षेत्रातली जीपीएस असलेली गाडीच आहे.

कवितक प्रणालीला सुरूवात करून हा हा म्हणता एक वर्षदेखील होऊन गेलं. हॉस्पिटलमध्ये हातात घेतलेल्या मांसाच्या गोळ्याने मोठं होत होत उपडं वळावं, बसावं, व बघता बघता दुडुदुडू चालायला लागावं - हे बघताना पहिलटकर बापाच्या मनाला जसे आनंदाचे धुमारे फुटावे, तशी आमची गत झालेली आहे. खरंच, हा आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. (हम्म्म - आनंदमय कविता असा पुढचा एखादा भाग लिहायला हरकत नाही.) या प्रणालीला भन्नाट यश मिळालं. त्या वर्षभरात वेगवेगळ्या संस्थळांवर ज्या शेकडोंनी कविता येऊन गेल्या त्यापैकी अनेक कवितांमध्ये कवितकची तत्वं वापरलेली उघड उघड दिसत होती. अर्थातच एक वर्षाच्या लहानग्या मुलाप्रमाणेच कवितक प्रणालीला देखील वाढायला अजून भरपूर वाव आहे. हे लक्षात घेऊन व कवी बनण्याचा अनेकांमधला अजून टिकून असलेला उत्साह पाहून आम्ही कवितक प्रणालीत अधिक क्षमता आणण्याचं ठरवलं आहे. आता तुम्ही कवितकची नवीन व्हर्जन वापरली तर तुम्हाला 'गजल लिहा' हे सेटिंगदेखील सापडेल. ते वापरून छान छान गजला तुम्हालाही लिहिता येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. तुमचीही खात्री पटावी म्हणून पुढील लेखनप्रपंच.

गजल लिहिणं म्हटल्यावरच कदाचित तुम्हाला दडपून गेल्यासारखं वाटेल. त्याच्यातले ते काफिया, रदीफ सांभाळायचे, मतला लिहायचा वगैरे ऐकून चक्रावून जायला झालं तर त्यात नवल नाही. मुळात आपणा मराठी लोकांना उर्दू ही भाषा काही फारशी नीट येत नाही. त्यात मोंगलांचं राज्य लयाला गेल्यापासून एकेकाळी जोरात चालू असलेले 'फाडफाड उर्दू' शिकण्याचे वर्ग केव्हाच बंद झाले. मग 'गजल मुसल्सल की गैरमुसल्सल असावी' असा प्रश्न ऐकला की 'साब क्या लाऊ, ठंडा या गरम?' अशा परिचित प्रश्नाऐवजी आढ्यताखोर फ्रेंच रेस्तोरां मधल्या वेटरने 'ब्वॉर द ल्यू द बीये?' असं विचारल्यासारखं वाटतं. पण काळजी करण्याचं कारण नाही. कवितकात सर्वच तांत्रिक शब्दांना फाटा मारण्यात आला आहे. अगदी त्यांच्या मराठीतल्या यमक, अंत्ययमक वगैरे यमप्राय भाषांतरांनादेखील. या लेखातदेखील आम्ही 'शेवटचा शब्द''आदला शब्द'वगैरे साधे शब्द वापरणार आहोत.

प्रथम गजल या प्रकाराविषयी थोडंसं. पण त्याआधी काव्याचाच थोडा इतिहास देणं प्राप्त आहे. काव्य शेकडो, हजारो वर्षांपासून लिहिलं जात आलं आहे. कोणाला कदाचित विश्वास ठेवायला कठीण जाईल, पण जुन्या काळी इंटरनेटच काय पण साधी छापील पुस्तकंदेखील नव्हती. (हा लेख एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला लिहिला आहे हे उघड आहे. कारण काही वर्षांनी कदाचित अशी परिस्थिती येईल की छापील पुस्तक म्हणजे काय हे सांगण्यासाठी तळटीप द्यावी लागेल) काहीही सांगायचं झालं तरी ते लिहून ठेवण्याइतकंच मौखिक स्वरूपात आपल्या शिष्यांच्या व इतरेजनांच्या मेंदूत कोरून ठेवणं महत्त्वाचं असायचं. प्रत्यक्ष विद्येची देवता सरस्वती ही देखील वाणीची देवता होती. ज्ञान म्हणजे पांढऱ्यावर काळ्या खुणांच्या रेषांमागून रेषा, पानांमागून पानं ही कल्पना नंतर आली. या अवस्थेपर्यंतचा प्रवास ही एका प्रकारची ही उत्क्रांतीच होती. या मार्गावर पाठ व्हायला सोपं असललेलं काव्य टिकलं, प्रस्थापित झालं, आणि मग काव्य म्हणजे असंच असतं अशी धारणा न झाली तरच नवल. त्यामुळेच वृत्तबद्धता, यमक, लय, गेयता वगैरे गुण जिराफाच्या लांब मानेप्रमाणेच निवडले गेले.

काव्याच्या पहिल्या सुवर्णयुगांमध्ये भलीमोठी महाकाव्यं लिहिण्याची फॅशन होती. इजिप्तमध्ये जसे पिरॅमिड्स वगैरे बांधले गेले, तसंच काहीसं, भव्य-दिव्य लिहिण्याची प्रथा होती. पण नंतर नंतर या तंत्रातल्या अडचणी लोकांच्या लक्षात यायला लागल्या. पहिली अडचण होती कवींची. महाभारतासारखं जगातलं सर्वच व्यासासारख्या एखाद्याने उच्छिष्ट करून ठेवलं, तर इतर कवींनी काय खावं? राजकवी वगैरेंना पदरी ठेवण्याऐवजी राजे लोक जुनीच पुराणं पुन्हा पुन्हा सांगू शकणाऱ्यांना नोकरीवर ठेवू लागले. कवींपेक्षा कथाकथकांची चलती व्हायला लागली. हे पाहून कवीवर्गात खळबळ माजली. 'जुना माल द्यायला काही हरकत नाही. पण तो नवीन शब्दांत द्यावा' अशी कवींच्या युनियन्सनी मागणी होती. नवीन नवीन कविता निर्मितीसाठी अधिकाधिक कवींना पोटापाण्याचा धंदा मिळावा हा त्यामागचा उद्देश. त्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या कविता लिहिण्याचा आंतर्गत ठराव केला. होलसेलमध्ये विकण्यापेक्षा रिटेलमध्ये विकणं केव्हाही फायद्याचं ठरतं. हिऱ्यांच्या खाणींच्या बाबतीत जसा सप्लायवर प्रचंड ताबा ठेवून मालाची किंमत वाढवली जाते तसं काहीसं. कविता म्हणजे शेवटी शारदेच्या खजिन्यातली रत्नंच आहेत. सगळी खाणच्या खाण एका वेळी लोकांसमोर ओतून टाकली तर हिऱ्यांना कचकड्याची किंमत नाही का येणार?

बरं, राजांच्याही त्याला पूरक अडचणी होत्या. राज्यांचा विस्तार होतो, पिढ्यानपिढ्या राज्य चालतात तेव्हा हळुहळू मूळ राजपुरुषाचे कर्तृत्वगुण पुढच्या पिढ्यांमध्ये नाहीसे होतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. राजपुत्र लाडावलेले, विलासी व्हायला लागतात. काव्य-शास्त्र-विनोदांत गुंगणाऱ्या राजांची पंतवंडं रम-रमा-रमणीत रममाण होतात. काव्यासाठी त्यांच्याकडे वेळ फारसा शिल्लक राहात नाही. लाख लाख पंक्तींची काव्यं कोण वाचणार किंवा ऐकणार? एखाद्या कंपनीच्या सीइओप्रमाणे त्यांना बुलेट पॉइंट्स हवे असतात. त्यामुळे आयुष्याविषयी, मनोविकारांविषयीची बारीक निरीक्षणं अनुभवण्यासाठी पंधरावीस पात्रं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं, त्यांच्या आयुष्यात येणारे संघर्ष वगैरे वाचून त्यातून संदेशाचा अर्क शोधत बसा वगैरे कोणी सांगितलंय? 'लीव्ह द डिटेल्स. गिव्ह मी द बॉटम लाईन' 'कट टू द चेस' वगैरे तत्कालीन राजांनी अनेक कवींना सांगितलं.

एका बाजूला कवींना मोठ्या कविता करण्याचा निरुत्साह, दुसऱ्या बाजूला राजांना त्या ऐकण्याचा निरुत्साह. याची परिणती झाली ती अर्थातच लघुकवितेत. एका मिनिटाभरात वाचता येण्यासारख्या कविता करण्याची प्रथा देखील या उत्क्रांती प्रक्रियेचा परिपाक होता. पृथ्वीवर अचानक ऑक्सिजन निर्माण झाल्यावर त्याकाळी असलेले बहुतेक जीव मरून गेले. ऑक्सिजनवर जगू शकेल अशी सृष्टी टिकली, भरभराटीला आली. आता तर आपल्याला ऑक्सिजन शिवाय जीवनच अशक्य वाटतं. तसंच काहीसं काव्यविश्वात झालं. महाकाव्यं महाकाय डायनॉसॉरप्रमाणे केवळ आपली हाडं टिकवून राहिली.

पुढेपुढे तर या संक्षेपीकरणाचा अतिरेक झाला. जपानी लोक पूर्वीपासूनच मिनिच्यरायझेशनमध्ये पुढे. त्यांनी सतरा अक्षरात कविता तयार करण्याचं मनावर घेतलं, आणि ते शिस्तबद्धपणे अमलात देखील आणलं. तिला त्यांनी हायकू म्हटलं. त्यांच्या वेळचे पाश्चिमात्य म्हणजे पर्शियन वगैरे लोक देखील फार मागे राहिले नाहीत. त्यांनी फक्त दोन ओळींची एक स्वतंत्र कविता असावी असा एक नियम तयार केला. ही दोन ओळींची कविता म्हणजेच गजल, खरं तर गजलेचा एक शेर. अशा पाचदहा शेरांची जुडी एकत्र बांधली की गजल तयार होते.

(क्रमशः)

कविताविनोदतंत्रविचारसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

4 Jul 2011 - 12:11 pm | विसुनाना

(कवितक) प्रणालीला पहिल्या वाढदिवसाचा गोड-गोड पापा. :)

कवितक ही या अभिव्यक्तीक्षेत्रातली जीपीएस असलेली गाडीच आहे.

-आपली ही गाडी उत्तरोत्तर अधिकच अभिव्यक्तीक्षेत्रातील उत्तरेकडे जावो आणि या प्रवासात (अभिव्यक्तीक्षेत्रातील) उत्तर धृव हा (अभिव्यक्तीक्षेत्रातीलच) दक्षिण धृवाच्या दक्षिणेला आहे असा शोध लागो ही सदिच्छा.

अवांतर :
आम्हाला वाटलं होतं की हा विषय एक हजार शब्दमर्यादेत संपून जाईल.
हाय काय आन नाय काय? ;)

कच्ची कैरी's picture

4 Jul 2011 - 2:27 pm | कच्ची कैरी

निवांत वाचुन नग प्रतिक्रिया देईल.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2011 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

नग प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत. त्यानंतर नगाला नग प्रतिक्रीया दिल्या जाईल.

आत्मशोध हा अध्यात्माशी निगडीत असतो. त्या नुसार गझल हे एक अध्यात्म आहे .
जेंव्हा आत्मा कॉस्मिक किरणांच्या संपर्कात येतो तेंव्हा आत्मशोध लागतो. आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. स्टेशनवर आत्म्याचे फोटो देवून आत्मशोध करता येत नाही.
कर्लीयन फोटोग्राफीने आत्म्याचे फोटो घेता येतात असे लोक म्हणतात
कर्लीयन फोटोग्राफी आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध नाही
तसा माझा आणि कर्ली हेअर यांचा संबन्ध दुरावला आहे.
ब्लाँड हेअर पेक्षा कर्ली हेअर यांचा बुद्धीशी थोडासा जास्त संबन्ध असतो
संबन्ध हा अनुअबंध आणि कबंध यांच्या तादात्म्याने बनलेला शब्द आहे
शब्द हे शस्त्र आहे
शस्त्र हे शास्त्राने निर्मिलेले आहे
निर्मिती सावंत या एक निर्मात्या आहेत
निर्मात्यामुळे निर्माण झालेली कला कृती ही लोकानी पहावी या साठी असते.
लोकाना जे दिसते ते ते पहातात
दिसते तसे नसते म्हणून जग फसते
फसलेले डाव फसलेले असतात म्हनून ते पुन्हा वापरता येतात
पुन्हा वापर करणे हा ग्लोबल वोर्मिंग टाळण्याचा उपाय आहे
ग्लोबल वॉर्मिंग साठी मानवाने आत्मभान राखून आत्मशोध करायला हवा
एवढे बोलून मी माझे दोन शब्द सम्पवतो
जय महाराष्ट्र जय मातोश्री

शरद's picture

4 Jul 2011 - 4:40 pm | शरद

शोध निबंधाच्या शेवटी एक Ph. D. देण्याचे आश्वासन आताच देतो. (दुसरा गाईड शोधू नका.)
शरद

श्रावण मोडक's picture

4 Jul 2011 - 9:51 pm | श्रावण मोडक

हा लेख म्हणजे एक गझलच आहे म्हणायचं. प्रत्येक परिच्छेद गझलेतल्या शेराप्रमाणे स्वतंत्र अस्तित्त्व असणारा आहे. उगाच कुठं तरी आलेले जोडकामदर्शक शब्द, प्रत्यय काढून टाकले की झालं...
गुर्जी धन्य आहेतच. ;)

धनंजय's picture

4 Jul 2011 - 11:39 pm | धनंजय

थोडा भरकटलेला आहे खरा. मजेदार आहे.

पुढल्या लेखाचे नाव चुकून या लेखाला दिले गेले की काय?

"कवितकाचे सिंहावलोकन, काव्याचे विहंगावलोकन" असे काहीतरी या लेखाचे शीर्षक असावे.

नाना बेरके's picture

5 Jul 2011 - 11:25 am | नाना बेरके

(लेख परत वाचून) क्लिष्टलेखावलोकन केले.
अशा प्रकारच्या लेखांच्या बाबतीत धनंजय हे राजहंस, तर गुर्जी बदक . . कि काय ?

अवांतर : आत्मशोध हा स्वतःचा स्वतःलाच करून घ्यायच असतो. :-O

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2011 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

अ ब ब!!!!

_/\_

कवितानागेश's picture

5 Jul 2011 - 1:34 pm | कवितानागेश

लेख आवडला.
बाकी हायकूला संक्षेपीकरणाचा अतिरेक म्हटल्याबद्दल निषेध!

-म्यांवकू

राजेश घासकडवी's picture

5 Jul 2011 - 7:46 pm | राजेश घासकडवी

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद.

या भागात कवितक ची पुन्हा नव्याने ओळख, गजलच्या छोटेखानी स्वरूपाबद्दल टिप्पण्या वगैरे सगळंच साधण्याच्या प्रयत्नात विस्कळित झाला आहे खरा. सर्व लेखमालेचं पुनर्लेखन केलं तर या लेखातले काही परिच्छेद प्रस्तावनासदृश लेखात जातील बहुधा. कवितकचा पहिला भाग खूप लोकांना लांबलचक वाटला होता, म्हणून या भागाचं क्रमशः केलं. लवकरच पुढचा भाग टाकतो...