बालगंधर्व...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 May 2011 - 1:33 pm

नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत.

"नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.."
"हो, चालेल. एवढं अत्तरांचं बील चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका.."
"किती झाले अत्तरांचे..?"
"२५०००..!!"

याला म्हणतात रसिकता, याला म्हणतात षौक..!

गडकरी मास्तर तसे जरा आजारीच वाटताहेत. नारायणराव त्यांना भेटायला आले आहेत. "मास्तर, मला एक नाटक द्या.." नारायणरावांच्या चेहेर्‍यावर मास्तरांबद्दलची भक्ति आणि आदर..!

मास्तर म्हणतात, "अहो नारायणराव, द्रौपदी, सुभद्रा, भामिनी या सगळ्या तुमच्या नायिका. भरजरी वस्त्र नेसणार्‍या. माझ्या नाटकाची सिंधू गरीब आहे. चालेल तुम्हाला?"

"मास्तर, तुमच्या नाटक मिळणार असेल तर फाटक्या वस्त्रातली नायिकाही मी करायला तयार आहे. पण मला नाटक द्या."

'ठीक आहे' असं म्हणून गडकरी मास्तर 'एकच प्याला'ची वही नारायणरावांच्या हाती ठेवतात.
एकच प्याल्याच्या तालमी सुरू होतात आणि त्याच वेळेला गडकरी मास्तर गेल्याची बातमी येते. नारायणराव हात जोडत आभाळाकडे पाहात 'मास्तर....!" असा टाहो फोडतात. अक्षरश: गलबलून येतं असं दृष्य.

ऐन प्रयोगाच्या वेळेस स्वत:च्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही 'शो मस्ट गो ऑन..' या न्यायानुसार 'रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही..' असं म्हणत रंगमंचावर 'नाही मी बोलत..' हे पद लडिवाळपणे रंगवणारे नारायणराव बालगंधर्व आणि सुबोध भावेचा त्यावेळचा अप्रतिम अभिनय..!

रंगमंचावर 'रवी मी..' रंगलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसल्यांच्या भूमिकेत असलेला वसंतरावांचा नातू राहूल देशपांडे मस्त झुपकेदार मिश्या, फेटा वगैरे बांधून धैर्यधर झाला आहे. रंगमंचावर त्याच्यासोबत साक्षात नारायणराव बालगंधर्वांची भमिनी उभी आहे. संयुक्त मानापमानाचा प्रयोग सुरू आहे. राहूल 'रवी मी' त मस्त फिरतो आहे. श्रोत्यांमधून मनमुराद दाद येते आहे. 'खर्चाची पर्वा नाही, रसिकांकरता जे जे उत्तम, उदात्त, उच्च असेल तेच मी देईन..' या सततच्या ध्यासापायी आमचे नारायणराव नेहमी कर्जात बुडालेले. संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे बर्‍यापैकी रक्कम जमते. पण स्वत:च्या कर्जाची पर्वा न करता नारायणराव ती रक्कम टिळकांच्या स्वराज्य फंडाला देतात. पण उदार, उमद्या मनाचे केशवराव नारायणरावांना म्हणतात, "तुम्ही काळजी कशाला करता? मी आहे तुमच्यासोबत. आपण अजून प्रयोग करू आणि तुमचं कर्ज फेडू!" पण नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या नशीबी काही वेगळंच. हे सगळं ठरतं आणि खुद्द केशवराव भोसलेच निवर्ततात...!

बोलपटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो. मराठी रसिकांच्या पदरात अलौकिकतेचं, संपन्नतेचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं दान टाकणार्‍या, एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या नारायणराव बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांचं एक वचन आहे - 'जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे..' तेच खरं..!

... आणि अखेरीस वार्धक्याने झुकलेले, थकलेले, खचलेले, किंचित लंगडणारे बालगंधर्व मावळत्या सूर्याला नमस्कार करताहेत आणि पडदा पडतो. नो रिग्रेटस्!

जा बाई नियती, तुला माफ केलं मी..!

मंडळी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बालगंधर्व' या सिनेमाबद्दल मी काय अन् किती बोलू? शुक्रवार ६ मे, २०११ या दिवशी मराठी रजतपटाच्या पत्रिकेत उच्चीचे सारे ग्रह एकवटले आणि नितीन देसाई कृत बालगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला...!

नितीन देसाईने हे अवघड, अजोड शिवधनुष्य फार सुरेखरित्या पेललं आहे. अक्षरश: भव्यदिव्य, आभाळाएवढं मोठं काम नितीनने आणि त्याच्या सार्‍या टीमने केलं आहे. नितीन देसाई हा स्वत: एक उच्च दर्जाचा कलादिगदर्शक. त्यामुळे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सारं काही आपल्या चित्रपटात हवंच हा नितीनचा अट्टाहास, हे वेड. परंतु या वेडापायीच 'बालगंधर्व' हा उच्च दर्जाचा चित्रपट निर्माण होतो. चित्रपटातील बालगंधर्वांच्या उंची, भरजरी पैठण्या, दागदागिने, केशभूषा, वेशभूषा हे सगळं अतिशय नेत्रसुखद! चित्रपटात दाखवल्या गेलेल्या गंधर्व नाटक मंडळींच्या त्या रोजच्या शे- दिडशे माणसांच्या चांदीच्या ताटातल्या त्या जिलबीयुक्त जेवणावळी..! काय सांगू? किती बोलू..?

दिगदर्शक रवी जाधव, पटकथा संवादकार अभिराम भडकमकर, महेश लिमयेची अप्रतीम सिनेमॅटोग्राफी, चित्रपटातले सारे कलाकार. खूप खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यांनी.

चित्रपटात जरी नारायणरावांचीच जुनी पदं घेतली असली तरी त्याचं उत्तम संगीत संयोजन कौशलने केलं आहे आणि या कामात त्याला मोलाची मदत झाली आहे या चित्रपटाचा सह-संगीत संयोजक आदित्य ओक याची. डॉ विद्याधर ओक यांच्या घरात अभिजात शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत याचीच पूजा केली जाते त्यामुळे आदित्य या त्यांच्या चिरंजिवाकडे ही परंपरा चालतच आलेली. अगदी पदं निवडण्यापासून ते ऑर्गनची साथसंगत करण्यापर्यंत आदित्यने या चित्रपटाकरता परिश्रम घेतले आहेत..!

नारायणरावांच्या पदांव्यतिरिक्त कौशलची स्वत:चीही तीन गाणी या चित्रपटात आहेत तीही सुंदर. खास करून 'परवर दिगार..' ही प्रार्थना. 'नाथ हा माझा..' हे पद आणि बालगंधर्व हे समानार्थी शब्द आहेत. अभिजात संगीतातली आजची आघाडीची तरूण गायिका वरदा गोडबोलेने हे पद फार सुरेख गायले आहे. सुरेल आवाज आणि सुंदर तान ही वरदाची खासियत..! बेला शेंडेही नेहमीप्रमाणे छानच गायली आहे. खूप गुणी मुलगी आहे ती.

आनंद भाटे! सॉरी, आनंद भाटे नव्हे, आनंद गंधर्वच तो..! नारायणरावांची पदं गाणं हे या चित्रपटातलं सर्वात मोठं आव्हान. आणि तेच आनंदने लीलया पेलंलं आहे. या मुलाच्या गळ्यातून नारायणराव खूप छान उतरतात. सुरेल, भावपूर्ण, लडिवाळ गायकी असलेला आनंद..!

आनंदा, जियो रे...!

आणि सुबोध भावे? हे माझ्या महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनो, दृष्ट काढा रे त्या पोराची..! नारायणराव बालगंधर्वांच्या स्त्री वेषातला, भरजरी पैठणी नेसलेला, सुरेख, सुंदर, अप्रतिम, देखणा असा सुबोध भावे..! सुबोधच्या रंगमंचावरील सिंधू, द्रौपदी, भामिनी, सुभद्रा एकापेक्षा एक देखण्या जमल्या आहेत..!

बाबारे नितीन देसाई, अरे तू किती मोठं काम केलं आहेस हे तुझं तुला तरी महित्ये का रे? नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात साक्षात बालगंधर्व आणि त्या निमित्ताने मराठी संगीत, मराठी कला, वैभवशाली असलेली मराठी संगीत रंगभूमी, मराठी माणसाची कला आणि त्याची कलासक्ति याची समर्थ ओळख तू आजच्या तरूण पिढीला करून दिलेली आहेसच, परंतु केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सार्‍या जगालाही करून दिली आहेस..! मराठी रजतपटाची मान तू सार्‍या जगतात उंचावली आहेस. खूप धन्य वाटलं रे तुझा हा चित्रपट पाहून...!

चटकाच लावून जातात बालगंधर्व. स्वयंवरात 'दादा ते आले ना..? अशी एन्ट्री घेत जगाला 'नाथ हा माझा'चं स्वरामृत भरभरून पाजणार्‍या नारायणराव बालगंधर्वांना अखेरीस रंगमंचावर संवाद म्हणताना ठसका लागतो आणि त्यांची तोंडातली कवळी खाली पडते. आणि तेव्हाचा सुबोध भावेचा तो चेहेरा..! अपमानीत, खिन्न, रडवेला..!

कोण आहे ही नियती? काय आहे तिचा न्याय? माहीत नाही..! तुमच्याआमच्या पदरी शेवटी उरतं ते फक्त यमनातलं 'नाथ हा माझा..' आणि तेच अमृत आहे, तेच अक्षय आहे, तेच चिरंतन आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतसंस्कृतीवाङ्मयचित्रपटआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 May 2011 - 2:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गेल्या शनिवारीच पाहून आलो हा चित्रपट. तुम्ही लिहीलेला शब्दन् शब्द खरा आहे. खुप घोर लावून गेला हा चित्रपट.
माझ्यासारख्या नव्या पिढीतल्याला बालगंधर्व म्हणजे नक्की काय रसायन होते हे समजले. खुप धन्य वाटले.

प्यारे१'s picture

9 May 2011 - 3:05 pm | प्यारे१

अप्रतिम!

एक एक परिच्छेद वाचताना झर्रर्रकन रोमांच उभे राहिले तात्या.
(तुमच्याकडूनच उधार) जियो!

-चित्रपटाबद्द्ल बरीच माहिती ऐकली वाचली आहे. प्रतिक्रिया लेखाबद्दल आहे.

भारीबंडू's picture

9 May 2011 - 3:53 pm | भारीबंडू

सुबोध भावेचा कौतुक कराव तेवढं थोडचं आहे ! केवळ आप्रतिम
आणि महेश लिमयेची सिनेमॅटोग्राफी १ नंबर
नितीन देसाई - धन्यवाद

स्वाती दिनेश's picture

9 May 2011 - 5:38 pm | स्वाती दिनेश

ह्या चित्रपटाची फार उत्सुकता आहे, पाहू या कधी संधी मिळते ते..
स्वाती

या आधीच्या पिढीत जन्माला आलो नाही, याची खंत बालगंधर्वांबद्दल वाचताना नेहमी जाणवते, विशेषतः पुलं जेव्हा त्यांच्याबद्दल लिहितात. हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटातल्या सगळ्या टिमचे अभिनंदन, आणि तात्या सुरेख समालोचनाबद्दल तुमचेही आभार.

स्मिता.'s picture

9 May 2011 - 6:23 pm | स्मिता.

या चित्रपटाचं ट्रेलर काल-परवाच फेसबूकवर पाहिलं. तात्यांनी एवढी छान ओळख करून देऊन कौतुक केलंय म्हणजे चित्रपट चांगलाच असला पाहिजे. बघायला उत्सुक आहे...

श्रावण मोडक's picture

9 May 2011 - 6:48 pm | श्रावण मोडक

छान ओळख करून दिलीत चित्रपटाची.

जबराट झालाय चित्रपट...
सुबोध भावे रॉक्स....
तात्या तुम्ही पण...

मृगनयनी's picture

10 May 2011 - 12:53 pm | मृगनयनी

अतिअवांतर :

मी अजून "बालगन्धर्व" पाहिलेला नाही! पण "बालगन्धर्व" ज्या दिवशी रीलिज होणार होता...त्या "अक्षयतृतीये"च्या शुभमुहुर्तावर आम्ही आमच्या काही मित्र-मैत्रीणींबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई'च्या दर्शनाला निघालो. कराडला लन्च घेण्यासाठी "पंकज" नामक हॉटेलात गुजराथी थाळी घेण्यासाठी उतरलो! आमचे लन्च सम्पतच होते... इतक्यात तिथे "बालगन्धर्व"ची आख्खी टीम दाखल झाली!! :) :) नितीन देसाई (बालगन्धर्व'चे सर्वेसर्वा), सुबोध भावे (बालगन्धर्व), विभाताई ( मिसेस बालगन्धर्व), अभिराम भडकमकर ( पटकथालेखक), सिद्धार्थ चान्देकर ( बा.ग. चे सहकलाकार ) आणि इतर १०-१२ जण ... (ज्यांना चेहर्‍याने आम्ही ओळखतो.. पण त्यान्ची नावे आम्हाला माहित नाही).. असे सगळे कलाकार आमच्या समोर होते!!! मग काय!... पहिला मोर्चा -सुबोध भावेकडे वळवला...बर्‍यापैकी गप्पा मारल्या... "तुमचा 'विक्रमादित्य राजे-शिर्के' मस्तच होता..." वगैरे.वगैरे..सान्गून झाल्यावर आम्ही (पक्षी : मी) त्याच्या बरोबर फोटो काढण्याची इच्छा प्रकट केली.. मग सुबोध'जी थोडंसं डावीकडे सरकले.. व आम्हाला ( पक्षी : मला) बसायला जागा करून दिली... आणि आमच्या सुह्रुदांनी फोटो क्लिकले! ;) आणि माझी अनेक वर्षांची मनोकामना अतिअनपेक्षितपणे पूर्ण झाली... :) :) मग त्याचा निरोप घेताना "आमचा बालगन्धर्व जरूर पहा..थिएटर्मध्ये जाऊन-.." हे सांगायलाही सुबोध विसरला नाही! :)


मग आम्ही नितीन चन्द्रकान्त देसाईंना भेटलो! त्यांनीही आम्हाला "जरूर बालगन्धर्व पहाण्यास" सान्गितले!! मी पण त्यांच्या "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमाची स्तुती केली.. व उद्याच्या "सामना"त याच कार्यक्रमावर खरडलेल्या ४ ओळी छापून येणार असे सांगितले... तेव्हा नितीन्'जी म्हणाले, "मग आमच्या बालगन्धर्व"वर पण लिहा की! मग " मी 'नक्की नक्की' असे म्हटले.. व त्यांना शुभेच्छा दिल्या.. आणि विभावरी देशपांडे कडे वळले! महाराष्ट्र कल्चरल सेन्टर्'चे "ग्रिप्स -वर्कशॉप" मी पूर्वी अटेन्ड केले असल्यामुळे विभाताईने मला ओळखले! ;) छान बोलली..ती.. मग तिच्यासोबत फोटो वगैरे काढले.. आणि "नील" ऊर्फ "सिद्धार्थ चांदेकर" शी थोडंसं बोलले... तो बॉडीबिल्डिन्ग करतोये... की अवाढव्य सुटलाये... हे कळायला मार्ग नव्हता.. ;) ;) अभिराम'जी शेवटच्या खुर्चीवर बसलेले होते...आणि आमच्याकडे तेवढा वेळही नव्हता. त्यमुळे त्यांच्याशी सुसंवाद साधता आला नाही.

बाकी वर उल्लेखलेल्या सगळ्यांचे "ऑटोग्राफ" घेतले! आणि कोल्हापुरला प्रयाण केले! :)

टीप : आमच्या अतिअवांतर प्रतिसादास " कुणाला कश्याचं .. तर बोड्क्याला केसाचं " किन्वा.. "*(#@#$^%&^ चा क्षीण प्रयत्न" अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात... याची मनोमन जाणीव आम्हांस आहे! ;)

वपाडाव's picture

10 May 2011 - 6:53 pm | वपाडाव

मृग्गा...
लैच भारी....
बाकी : १० वर्षांपुर्वी तिथे जेवलो होतो त्याची आठौण झाली....

प्यारे१'s picture

12 May 2011 - 3:00 pm | प्यारे१

नैनी,

सुबोध भावे कुठला गं ;) डावीकडचा का उजवीकडचा ;) मागून प्रकाश जरा जास्त येतोय आणि बालगंधर्व नंतर सुबोध स्त्रीवेषात जास्त चांगला दिसतो असे ऐकिवात आहे म्हणून... ;)

मृगनयनी's picture

12 May 2011 - 6:01 pm | मृगनयनी

नैनी,

सुबोध भावे कुठला गं डावीकडचा का उजवीकडचा मागून प्रकाश जरा जास्त येतोय आणि बालगंधर्व नंतर सुबोध स्त्रीवेषात जास्त चांगला दिसतो असे ऐकिवात आहे म्हणून...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
प्यारेजी.... जोक ऑफ द डे!!!! ;)

"सुबोध भावे'चे लग्न झालेले आहे" हे मला माहित नाहीये... असा प्यारे'जी तुमचा गैरसमज झाल्याने तुम्ही मला काल एक बाळबोध खरड टाकली ;) आणि त्यानंतर ... ....मी सुबोध आणि मंजिरी (सुबोधची बायको) यांच्या बद्दल, त्यांच्या मुलाबद्दल (कान्हा) तसेच त्यांच्या पुण्यातल्या वाड्याबद्दल, मन्जिरीच्या प्रोफेशन्बद्दल, सुबोध्-मंजिरीच्या प्रेमकहाणीबद्दल.. वगैरे वगैरे.... माहिती तुमच्या ख्.व.त खरडली.... त्यामुळे.. कदाचित तुमची अस्मिता दुखावली गेली असावी... ;) ;) माझ्या ज्ञानात भर टाकायच्या ऐवजी तुमच्याच ज्ञानात थोडीफार भर पडली ...हे मी समजू शकते!!..... ;) ;) ;) ;) ;) ;)

जाऊ देत! ;) पुढल्या वेळी काळजी घ्या!!! ;) ;)

बाकी 'सुबोध' स्त्रीवेषात अप्रतिमच दिसतो!!! :) :)
______________

आपले म्हणणे स्पष्ट, स्वच्छ आणि थोडक्यात मांडा. धन्यवाद.

हा हा हा हा.... काल आपण मला टाकललेल्या खरडीला उत्तर देताना...माझे म्हणणे..स्पष्ट, स्वच्छ आणि थोडक्यात मांडले होते... पण नेमके तेच आपल्या वर्मी लागले की!!!!! ;) ;)

__________________

कृपया गैरसमज नसावा!!!! :) :) :)

ऋषिकेश's picture

9 May 2011 - 7:55 pm | ऋषिकेश

कथा दिली असवी म्हणून संपूर्ण लेख वाचला नाही. मात्र काहि परिच्छेद वाचले. आता बघतोच चित्रपट (आणि मग वाचतो लेख)

इतरही भाषेत हा चित्रपट जावा हीच सदिच्छा.

बालगंधर्व आणि त्यांचा काळखंड यावर संवाद, परिसंवाद आणि लेख यावेत म्हणजे आजच्या पिढीला त्यांची ओळख होईल.

चित्रपटाच्या नावानेच उत्सुकता जागी केली होती. लवकरच पहाणार. :)
बाकी तात्याने करुन दिलेली चित्रपटाची ओळख आवडली हे सांगायच राहुन गलं. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2011 - 8:11 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान. अप्रतिम लेख.

चित्रपटाची छान ओळख!
पहावासा वाटतोय, कधी संधी मिळतेय कोणास ठाऊक!

वाटाड्या...'s picture

9 May 2011 - 8:29 pm | वाटाड्या...

बालगंधर्व हे प्रातःस्मरणीय नाव...अलौकिक आवाज आणि अभिनय...आमच्या पिढीला बालगंधर्व बघायला मिळाले नाहीत हे आमचं दुर्दैव..पण ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने आजच्या पिढीने हे जे शिवधनुष्य उचलेलं आहे तो प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय असावा. चित्रपट पहाणारच त्यातल्यात्यात त्यांच्या चांगल्या कामाला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच.

तात्यांच मनःपुर्वक आभार...शेवटी सार सार को ग्रहीये महत्त्वाचं आहेच....असेच जे जे उत्तम ते ते (च) मिपावर वाचायला मिळो...

- वाट्या...

तिमा's picture

9 May 2011 - 10:29 pm | तिमा

तात्या , कालच हा चित्रपट पाहून सदगदित अवस्थेत घरी आलो. माझ्या मनांत जे भाव आले ते तुम्ही शब्दांत साकारलेत. चित्रपट पहातानाच जाणवत होतं की नियतिने या सर्व संचाकडून एक अजरामर कलाकृती निर्माण करुन घेतलीये.
आजच्या पिढीला बालगंधर्वांची इतकी उत्तम ओळख करुन दिल्याबद्दल नितीन देसाईंचे शतशः आभार.
सुबोध भावेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्याला अप्रतिम साथ आनंद भाटेची.
माझे वडील आम्हाला बालगंघर्वांच्या नाटकाची वर्णने सांगत तेंव्हा आम्हाला, त्यांचा व त्यांच्या काळातील ज्येष्टांचा हेवा वाटायचा. पण या सिनेमाने ती कसर काहीशी भरुन निघाली आणि प्रत्यक्ष बालगंधर्व रंगमंचावर गाताना पाहिल्याचे अविस्मरणीय सुख मिळाले. ते सुख इतके उच्च प्रतीचे होते की प्रत्येक पदाला माझ्या डोळ्यांतून झरझर धारा लागल्या होत्या. मधेच वडिलांची आठवण येऊन त्या आनंदाश्रुंचे दु:खाश्रुंमधे रुपांतर होत होते. तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
बालगंधर्वांची ३ मिनिटांची गाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. राग हे त्यांच्या गाण्यावरुनच ओळखू लागलो. संपूर्ण
'आ' कारयुक्त गाणे, दमछाक करणार्‍या ताना लीलया घेणे, अत्यंत कठीण तालातली गाणी सहज पेलणे आणि हे सर्व सुरांचे माधुर्य जराही कमी होऊ न देता!
त्या महान कलाकाराची ओळख नवीन पिढीने जरुर करुन घ्यावी.

विनायक पाचलग's picture

9 May 2011 - 9:45 pm | विनायक पाचलग

चित्रपट पाहिलेला नाही,पण चांगला आहे याची जाणीव आहे ...
सुबोध भावे ची दृष्ट काढायलाच हवी ...
आणि थिएटरात जेवढ दाखवतात ,त्यापेक्षा बरच जास्त शुट केलय ..तेही पुढे मागे दाखवल तर लै बर होईल ....

मस्त कलंदर's picture

9 May 2011 - 11:08 pm | मस्त कलंदर

सुबोध भावे छान दिसतो. बाईपणाचं बेअरिंग त्याला छान जमलंय. त्याने गायकीच्या अभिनयावरही भरपूर मेहनत घेतलीय. लिप सिंगिंग करतोय असं जराही वाटत नाही. बालगंधर्वांचा संपन्नतेचा आणि वैभव हरपतानाचा काळ अगदी व्यवस्थित दाखवलाय. सिनेमा पाहून आल्यावर युटयूबवरचा खरोखरीच्या बालगंधर्वांचा धर्मात्मा मधला व्हिडिओ पाहिला; तो प्रसंग चित्रपटात अगदी जस्साच्या तस्सा उतरला आहे. आणि खरेच अशा वेळी मध्येच 'कट' आल्यानंतर कसा रसभंग होत असेल हे मनापासून पटते.

तरीही काही गोष्टी खटकल्या.
१. चित्रपटाच्या सुरूवातीस 'बालगंधर्व' कोण याबद्दल मराठी आणि इंग्रजीत लिहिलेली एक अशा दोन पाट्या सेकंदभर थांबून पळून जातात. एवढ्या वेळात त्यातली एक ओळही वाचून पूर्ण होत नाही.
२. सिनेमा म्हणजे काही ऐकीव कथांचे चलतचित्ररूपी संकलन वाटते. त्यात एकसंधपणा अजून असायला हवा होता.
३. बालगंधर्वांचे सगळेच समकालीन चित्रपट पाहायला जाणार्‍या सगळ्यांनाच माहित असतील असे नाही. एका प्रसंगात 'गडकरी मास्तर' समोर येतात. त्यानंतर गडकर्‍यांचं नाटक करायचं म्हटल्यावर हे कुठले गडकरी असतील याचा अंदाज येतो आणि नाटकाचे नांव ऐकून खात्री होते. म्हणजे आताच्या पिढीतल्या कुणी(यात मराठी माध्यमात शिकलेले, सध्या शिकत असलेलेही/न शिकलेले असे सगळेच आले) रा.ग. गडकरींचा फोटो पाहिला नसेल तर हा संदर्भ कळणं जरा अवघडच. हीच गोष्ट टेंबे, बोडस इत्यादी मंडळींची.
इथे टार्गेट म्हणून काही अंशी मध्यमवयीन व वानप्रस्थाश्रमातल्याच मराठी प्रेक्षकाला घेऊन चित्रपट बनवला असेल, तर याला सबटायटल्स देऊन इतर भाषांतल्या प्रेक्षकांपर्यंत तो जितका आणि जसा पोचायला हवा, तो परिणाम साधला जाणार नाही.
४. कॉस्च्युम डिझाईन चांगलं आहे. नारायणरावांना अभिप्रेत असणारा भरजरीपणा मस्त दाखवला गेला आहे. पण त्याच बरोबर जरदोसी आणि कुंदनवर्कवाल्या साड्या बघून मी चुकून एखादी टीव्हीवरची मालिका बघतेय की काय असं वाटलं.

जाता जाता, मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्टः चित्रपट संपताना श्रेयनामावलीसोबत दाखवलेला जुन्या छायाचित्रांचा खजिना!!! नेहमी बाहेर पडण्यासाठी घाईत असणारे पाय तिथेच रेंगाळत होते आनि शेवटचा नामोल्लेख होईपर्यंत कुणी बाहेर पाऊलही ठेवलं नाही!!!
थोडक्यात काय, जरी मला सगळंच पटलं नसलं तरी आवर्जून पहावा असा चित्रपट आहे!!

श्रावण मोडक's picture

10 May 2011 - 10:18 am | श्रावण मोडक

सहमत, पण...
सगळाच अभ्यास पाठ्यपुस्तकात दिला जात नाही. काही स्वाध्यायही करायचा असतो. :)

मस्त कलंदर's picture

10 May 2011 - 12:22 pm | मस्त कलंदर

'आंतरजालावर सगळ्यांनाच सगळंच माहित असत नाही' हे वाक्य खर्‍या आयुष्यातही तितकंच लागू पडतं. माझं हे मत मी मला पिक्चर्/पात्रं समजायला अवघड गेला अशा दृष्टीकोनातून न लिहिता तो सर्वसमावेशक(फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषिक व नंतर अभारतीय भाषांत देसाईंना हा चित्रपट न्यायचा आहे त्या अनुषंगाने येणार्‍या सर्व प्रेक्षकांबद्दल) लिहिला होता.
आपल्या लोकांचा मोठेपणा आपणच (आपल्यासमोर आणि) जगासमोर नीट मांडायला नको का?

कापूसकोन्ड्या's picture

9 May 2011 - 11:14 pm | कापूसकोन्ड्या

विषय बालगंधर्व! चित्रपटाचा परिचय काय छान रंगवला आहे!
खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाचे परिक्षण कसे करावे याचे धडे घ्यावे असा हा लेख आहे. तुम्ही स्वतः मिसळपाव सुरू तर केलेच पण वेळोवेळी अशी साहित्यीक भर घातलीत.
तुमचे अभिनंदन!!असेच लेख लिहीत रहा. चित्रपट पहायला केव्हा मिळतो ते बघायचे!

योगप्रभू's picture

10 May 2011 - 12:42 pm | योगप्रभू

तात्या,
माझ्या प्रतिक्रियेचा राग मानू नकोस कारण ती कुचेष्टेने देत नसून अस्वस्थतेतून दिली आहे.
चित्रपट अजुन पाहिला नाही. पण तो उत्तम असणार याची खात्री आहे.

आयुष्याच्या पूर्वार्धात संपन्नता आणि उत्तरार्धात विपन्नावस्था भोगलेल्या कलावंतांची रांगच्या रांग आहे. कलेला जीवन वाहताना या लोकांनी जीवनाच्या कठोर वास्तवाचा विचारच केला नाही. ही नियती नव्हे, तर व्यवहारशून्यता आहे.

तमाशासाठी ब्राह्मण्य सोडणार्‍या पठ्ठे बापूरावांची अखेर अशीच गेली. ज्या पवळावर जीव लावला ती लांब गेली, पैशाचे व्यवस्थापन न केल्याने आयुष्याची संध्याकाळ एकाकी अवस्थेत घालवावी लागली.

कशाला उद्याची बात? म्हणणार्‍या मैनाला (शांता हुबळीकर) वृद्धाश्रमात एकाकी जीवन घालवताना या ओळींतील विफलता नक्कीच कळली असेल.

२५००० रुपयांची अत्तरे, शालूही युडी कोलनमध्ये भिजवून मग घालणे, रंगमंचांवर अत्तरांची उधळण, रोज पंगतीला लोणकढ्या तुपाचा तांब्या आणि मनात आले की मिष्टान्न यातून कर्जाचा डोंगर उभा राहणार नाही तर काय होणार? मॅनेजर, बाजारमास्तर, कंत्राटदार आणि शिते लुबाडण्यासाठी जवळ जमा झालेली भुतावळ यावर बारीक लक्ष नको ठेवायला? जमाखर्चाचा विचार नको करायला?

दीनानाथ मंगेशकरांचेही हेच झाले. त्यांना लोकांनी लुबाडले आणि ते गेल्यावर कुटूंबाला गरीबीचे वाईट चटके सहन करावे लागले. एकेकदा नोटांनी भरलेल्या पोत्यावर बसून घोडा-घोडा खेळण्याचा लहान आशाचा हट्टही वडिलांनी पुरवला होता. पुढे त्याच मुलींना एकच साडी आलटून पालटून घालून कामासाठी घराबाहेर जावे लागत होते.

२० -२० शागीर्द बरोबर घेऊन देशभर कार्यक्रमांना जाणार्‍या, मिळालेली बिदागी समोर येईल त्याला आणि अडचणींचे पाढे वाचणार्‍याला देणार्‍या भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खॉसाहेबांनाही हे चटके बसले. त्यावर आपले अण्णाही (भीमसेनजी) वैतागून म्हणाले होते, की 'माणसाने इतके भोळे राहून काय उपयोग?'

काहीच दिवसांपूर्वी ए. के. हंगल सारख्या ज्येष्ठ कलावंतांची दयनीय अवस्था समोर आली होती.

तात्या, ही नियती खासच नव्हे रे. कोणत्या एका वेडात माणसे जीवनाचा पाचोळा करुन घेतात?

बरं रंगभूमी असो, की चित्रपट ज्यांना या हार्श रिअ‍ॅलिटीचे भान असते, असे लोकही आहेत. मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, डॅनी यांचे उदहरण घ्या. या लोकांनी वेळ पडेल तेव्हा भिकार चित्रपटांत कामे करुनही पैसा जोडला. हिल स्टेशन्सना हॉटेल्स बांधली. आज म्हातारपणी ते सुखाने राहताहेत.

विसोबा खेचर's picture

10 May 2011 - 5:04 pm | विसोबा खेचर

माझ्या प्रतिक्रियेचा राग मानू नकोस कारण ती कुचेष्टेने देत नसून अस्वस्थतेतून दिली आहे.

राग तर मुळीच मानत नाही. तुम्ही जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे, वास्तव आहे. त्यातली अस्वस्थताही जाणवते आहे..

परंतु, परंतु, परंतु......

२५००० रुपयांची अत्तरे, शालूही युडी कोलनमध्ये भिजवून मग घालणे, रंगमंचांवर अत्तरांची उधळण, रोज पंगतीला लोणकढ्या तुपाचा तांब्या आणि मनात आले की मिष्टान्न...

इथेच विषय संपतो साहेब! :)
नारयणरावांनी मराठी माणसाला रसिकता शिकवली..!

तात्या, ही नियती खासच नव्हे रे. कोणत्या एका वेडात माणसे जीवनाचा पाचोळा करुन घेतात?

योगप्रभूराव, मी नारायणरावांचा एक भक्त, तरीही सामान्यच माणूस. मला त्यांची परवड सहन झाली नाही म्हणून 'ही नियती आहे..' वगैरे बोंब मी मारली आहे, नारायणरावांनी नाही. ते या सगळ्याच्या पुढे केव्हाच निघून गेले होते. त्यांच्यातल्या असामान्य कलाकाराने केव्हाच त्या बिचार्‍या नियतीला माफ करून टाकलं होतं..!

(नारायणरावांचा भक्त) तात्या.

तिमा's picture

10 May 2011 - 1:39 pm | तिमा

खरे कलावंत हे कालही होते व आजही आहेत. पूर्वी कलावंतांना आलेला पैसा साठवणे त्याची उत्तम गुंतवणुक करणे हे व्यवहारज्ञान नव्हते व तसे मार्गदर्शनही नव्हते. अर्थात त्यालाही अपवाद आहेत. पण हल्ली हे व्यवहारज्ञान बहुतांशी कलाकारांना असते, त्यामुळे त्यांची आयुष्याच्या अखेरीला वाईट अवस्था होत नाही. पण चित्रपटातीलच एक वाक्य अशा अर्थाचे आहे की असामान्य कलाकाराला आपण सामान्य माणसाचे नियम लावायला गेलो तर ते कसे बरे होणार ?

ललित अतिशय आवडलं. हा चित्रपट अजून पाहिला नाही, अजून पहायचा आहे.

चित्रपटाची खास आपल्या शैलीत छान ओळख करून दिली आहे.
चित्रपट आताच पहावासा वाटतोय.

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 1:12 am | पाषाणभेद

जबरदस्त चित्रपट दिसतो आहे. एकुणच मराठी चित्रपटांना व त्यातील जुन्या कथानकांना सोन्याचे दिवस आलेत असे समजूया.
तात्यांची लेखनशैली (अजूनही!) जबरदस्त आहे.

धनंजय's picture

11 May 2011 - 1:40 am | धनंजय

बघायलाच पाहिजे आता हा चित्रपट.

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 9:48 am | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..

तात्या.

प्रीत-मोहर's picture

12 May 2011 - 11:54 am | प्रीत-मोहर

मला पहायचाय चित्रपट ... कधी योग आहे ते बघु

ऋषिकेश's picture

12 May 2011 - 1:56 pm | ऋषिकेश

कालच चित्रपट पाहिला.. गारुड अजून उतरलेलं नाही
आणि त्या सुबोध भावेला तर शिरसाष्टांग नमस्कार. एरवी, आताच्या काळात नाटकी-छापील वाटु शकणारे संवाद केवळ सुबोध भावेच्या अभिनयामुळे खरे-जिवंत वाटतात. मस्ट वॉच चित्रपट! तो ही थेटरमधे!!

जाता जाता (अतिशय अवांतर): चित्रपट संपलयावर पु.लंना सुनिताबाई भेटल्या हे त्यांचं (आणि महाराष्ट्राचं) भाग्य असं अधिक प्रबळतेने वाटलं.

नितिन थत्ते's picture

12 May 2011 - 4:35 pm | नितिन थत्ते

काल पाहून आलो.

आवडला.

काही घटना ऐकलेल्या गोष्टीपेक्षा वेगळ्या होत्या. (उदा. चित्रपटात गौहरबाई बालगंधर्वांना 'वापरून/पिळून घेते" असे दाखवले आहे. ऐकलेल्या गोष्टीत गौहरबाईने त्यांना आसरा दिला, त्यांची उतारवयात सेवा-शुश्रुषा केली असे होते.)

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे चित्रपट थोडे पूर्वज्ञान गृहीत धरतो.

पण एकूणात चित्रपट चांगला झाला आहे. तांत्रिक अंगानेही भक्कम आहे. (नेहमीच्या मराठी चित्रपटाप्रमाणे पात्रे ओरडून बोलत नाहीत). साऊंड, पिक्चर सगळंच चांगलं आहे.

नितिन थत्ते's picture

12 May 2011 - 4:39 pm | नितिन थत्ते

काल पाहून आलो.

आवडला.

काही घटना ऐकलेल्या गोष्टीपेक्षा वेगळ्या होत्या. (उदा. चित्रपटात गौहरबाई बालगंधर्वांना 'वापरून/पिळून घेते" असे दाखवले आहे. ऐकलेल्या गोष्टीत गौहरबाईने त्यांना आसरा दिला, त्यांची उतारवयात सेवा-शुश्रुषा केली असे होते.)

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे चित्रपट थोडे पूर्वज्ञान गृहीत धरतो.

पण एकूणात चित्रपट चांगला झाला आहे. तांत्रिक अंगानेही भक्कम आहे. (नेहमीच्या मराठी चित्रपटाप्रमाणे पात्रे ओरडून बोलत नाहीत). साऊंड, पिक्चर सगळंच चांगलं आहे.