"रोश विरुद्ध अ‍ॅडम्स"च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
26 Apr 2011 - 1:54 pm

प्रस्तावना:

मानवी इतिहासात अनेक टप्पे आले. प्रथम रक्ताच्या नात्याच्या व्यक्ती एका गणात रहात असत. यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जाई. मूळचे एक कार्य - मुख्यत: शिकार, अन्नवाटप नि संरक्षण - एकाहुन अधिक कार्यात विभागून ते विविध व्यक्तींना वाटून देऊन ते साध्य करण्यात येई. हे कार्य त्या गणाच्या, समाजाच्या संदर्भात असे. आहार आणि निद्रा ही दोनच कार्ये खर्‍या अर्थाने वैयक्तिक पातळीवर असत. यानंतर गणांच्या संमीलनातून व्यापक असा समाज बनला, नि त्याचवेळी गणसंस्थेचा आधार असलेल्या बृहत्कुटुंबाचा संकोच होऊन एककेंद्री (न्यूक्लियर) कुटुंबव्यवस्थाही रूढ होऊ लागली. आता समाजाअंतर्गत गणाचे/कुटुंबाचे हक्क हा नवा प्रश्न समोर आला. त्याचप्रमाणे याच्याविरुद्ध असा कुटुंबाअंतर्गत/गणाअंतर्गत/समाजाअंतर्गत असा 'वैयक्तिक स्वार्थ' नि हक्क उपस्थित झाला. समाजव्यवस्था निर्माण होताना याबाबत काही नियम निर्माण करण्यात आले. यामुळे वैयक्तिक पातळीवरही वैयक्तिक संपत्तीचा विकास, स्वत:च्या हक्कांचे संरक्षण असे निश्चित हेतू पुढे आले. समाज जसा व्यापक होत गेला तसतसा वैयक्तिक विकास नि कार्य यांचाही विकास झाला. पुढे विभागणीऐवजी केंद्रीकरणाने मोठी कार्ये सिद्ध होऊ शकतात हे जसजसे लक्षात येऊ लागले तसे सहकाराचा जन्म झाला. जे अपत्य-संगोपन, शिकार याबाबत होत होते ते याच्या उलट होते. तिथे श्रमविभागणी होती तर आता श्रमांच्या एकजुटीतून वैयक्तिक कुवतीपलिकडे असलेली आणि यापूर्वी न कल्पना केलेली मोठी कार्ये साध्य होऊ लागली. अशा कार्यसिद्धीसाठी एका नियंत्रक यंत्रणेची निर्मिती आवश्यक ठरली. मग हा मूळ हेतू पुढे अनेक प्रकारच्या व्यवस्थांची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरला. समाजव्यवस्था, सैन्यव्यवस्था, उत्पादनव्यवस्था, उदीमव्यवस्था, धर्मव्यवस्था अशा विविध व्यवस्था निर्माण झाल्या.

हे सारे मुळात माणसाला एकत्रित बळाच्या आधारे एखादे वैयक्तिक कुवतीपलिकडचे कार्य सिद्धीस नेण्याच्या मूळ हेतूने झाले. परंतु यापूर्वी मनुष्याने न कल्पिलेली अशी एक महत्त्वाची घटना यातून घडली ती म्हणजे, अशा व्यवस्थेचे स्वतःचे असे काही हक्क आणि - अपरिहार्यपणे काही - स्वार्थ निर्माण झाले. इतिहासात डोकावून पाहिले तर असे दिसून येते की हे हक्क पुढे भस्मासुरासारखे त्याच्या जन्मदात्यावरच - माणसावरच - उलटले. मनुष्याचे हित हा मूळ हेतू मागे पडून व्यवस्थेचे हित जपण्याच्या दृष्टीने माणसाची पावले पडू लागली. एखाद्या बुद्धिभेद केलेल्या गुलामाप्रमाणे या व्यवस्थेचे हित जपण्यासाठी माणसाने स्वत:च्या हितावर पाणी सोडले, प्रसंगी त्यासाठी शस्त्र हाती घेतले. यातून हिंसाचार, परस्परांचे हक्क हिरावून घेण्यासाठी व्यवस्थेचा वापर, व्यवस्थेचे हित व्यक्तिहितापेक्षा अधिक श्रेयस मानून व्यक्तिहिताचा झालेला संकोच या इतिहासाच्या पाऊलखुणा ठरल्या. धर्मसंस्थेने माजवलेला हिंसाचार नि घेतलेले हजारो बळी, त्या धर्मव्यवस्थेचा संपूर्ण धि:कार करीत उभ्या राहिलेल्या पर्यायी व्यवस्थेनेही आपली व्यवस्था रुजवण्यासाठी धर्मसंस्थांच्या पावलावर पाउल टाकत घडवून आणलेला अपरिमित नरसंहार हा तर उघड इतिहास आहेच पण त्याहून भयानक असा इतिहास - जो खरे तर अजूनही वर्तमानाचा भाग आहे - आहे तो माणसाच्या अप्रत्यक्ष शोषणाचा. अशीच एक व्यवस्था उद्योगधंद्यांच्या स्वरूपात निर्माण झाली. मूळ हेतू पुन्हा एकदा मानवाच्या व्यापक हिताकरीता एकत्रित कार्य करणे हा उदात्त हेतू ठेवून; पण हीच व्यवस्था माणसाच्या हिताचा बळी देत, त्याला चिरडत आज त्या व्यवस्थेचे हित रक्षण करण्यास प्राधान्य देते तेव्हा त्याविरोधात एका माणसालाच आवाज उठवावा लागतो.

जगात काही माणसं अशी असतात जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे नाटक करीत स्वतः त्या अन्यायाचा बाजूने उभे राहून स्वार्थ साधत असतात. बहुसंख्य माणसे अशी असतात की ते अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने बोलतात, पण त्याबाबत काही करावे अशी जाणीव त्यांच्यामधे नसतेच, नि ज्यांच्यात असते त्यांच्यात स्वार्थ बाजूला सारून इतर कोणासाठी झगडावे अशी उर्मीच निर्माण होऊ शकत नाही. यात पुन्हा अनेक निव्वळ वाचिवीर असतात ज्यांची कृती नि बांधिलकी तोंडावाटे बाहेर पडलेल्या शब्दाबरोबरच विरून जाते. पण जगात काही माणसे अशीही असतात जी केवळ स्वार्थ बाजूला ठेवून अन्यायाविरूद्ध ताठ उभे राहतातच असे नाही तर त्यासाठी बलिष्ठ अशा व्यवस्थेबरोबर एकांडा लढाही देतात, त्या लढ्याची जबर किंमतही मोजतात. अशा लढ्यांचा शेवट बहुधा सांकेतिक विजयात होऊन ही माणसे समाजातून बाजूला फेकली जातात नि अन्यायी व्यवस्था चेहरा बदलून पुन्हा आपले कार्य चालू करते. स्टॅन्ले अ‍ॅडम्स याने मात्र एका अन्यायी, भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध उठवलेला आवाज मात्र निर्भेळ विजयी झाला नसला तरी तो निव्वळ सांकेतिक विजयाहून खूप काही अधिक साध्य करून गेला.

अ‍ॅडम्सचा संघर्ष होता तो एका व्यवस्थेविरूद्ध. तो स्वतः त्या व्यवस्थेचा भाग होता. एका अर्थाने त्याचा स्वार्थ - लठ्ठ पगाराची नोकरी - त्यात गुंतलेला होता. तरीही ज्या क्षणी त्या व्यवस्थेचे भ्रष्ट नि कराल रूप त्याच्यासमोर आले त्या क्षणी त्याने स्वार्थ बाजूला ठेवला, स्वत:चे सुरक्षित नि सुखवस्तू आयुष्य पणाला लावले नि जे उघडकीला आले असता त्याचा - वा इतर कोणाचाही - 'प्रत्यक्ष' फायदा झाला नसता अशा एका भ्रष्ट नि अनैतिक व्यवस्थेचे खरे रूप त्याने जगासमोर मांडले. ज्या संस्थांनी त्याला मदत करणे अपेक्षित होते त्यांनीच केलेल्या दगाफटक्याने काही खटल्यांना, मनस्तापाला नि प्रत्यक्ष नुकसानीलाही त्याला सामोरे जावे लागले. पण अखेरीस त्या व्यवस्थेला माघार घ्यावीच लागली. हा संघर्ष आणखी एका अर्थाने लक्षणीय आहे. औद्योगीकरण नि खाजगीकरण हे हमखास यश देणारे नि जगाचे कल्याण करणारे जादूचे मंत्र आहेत ही समजूत असणार्‍यांच्या स्वप्नाळूपणाला जोरदार धक्का देण्याचे काम स्टॅन्ले अ‍ॅडम्सच्या गौप्यस्फोटाने केले. त्या अर्थाने तो त्या व्यवस्थेचा एक प्रमुख ’जागल्या’ (Whistleblower) ठरला.

भूमिका:

काही काळापूर्वी माझ्या मित्राने मला ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ (लेखक: स्टॅन्ले अ‍ॅडम्स, मराठी अनुवाद - डॉ. सदानंद बोरसे) वाचायला दिले होते. त्यावेळी चार पुस्तकांसारखे पुस्तक म्हणून वाचून ठेवून दिले होते. चार-पाच महिन्यापूर्वी नेहमीच्या कथा-कादंबर्‍या किंवा चिकित्सक पुस्तकांचा कंटाळा आला नि काही वेगळे माहितीपूर्ण असे वाचावे या उद्देशाने पुन्हा एकदा हे पुस्तक हाती घेतले. लहानसेच असे ते पुस्तक खरेतर तासा-दोन तासातच वाचून व्हायचे, पण त्या दिवशी त्यात एवढा हरवलो की सारा दिवस त्यात कसा गेला ते समजलेच नाही. असे लक्षात आले की निव्वळ एका माणसाचा लढा एवढ्यापुरतेच या पुस्तकाचे महत्त्व नाही. एक व्यक्ती एखाद्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकटा उभा राहतो नि ती एक व्यवस्था सोडाच, पण अन्य संबंधित व्यवस्थादेखील त्याच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष विरोधात काम करतात, पुन्हा पुन्हा करत राहतात; तेव्हा एकुणच व्यवस्था नि व्यवस्थांची साखळी यांच्या संदर्भात व्यक्तीचे स्थान नि हक्क यांना तपासून पाहणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर व्यवस्थेचे हित नि व्यक्तीचे हित यांचा संघर्ष उद्भवतो तेव्हा कोणाला प्राधान्य मिळावे या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर शोधण्याचीही गरज भासू लागते. सदर लेखमालेचा उद्देश औद्योगिकरण, त्यात नव्याने रुढ झालेला जागतिकीकरणाचा नि खुल्या स्पर्धेचा मंत्र इ. चा रोश विरुद्ध अ‍ॅडम्सच्या लढ्याच्या निमित्ताने उहापोह करणे हा आहे. एका अर्थी अ‍ॅडम्सचा हा लढा एक ’केस स्टडी’ मानून त्याआधारे औद्योगिक व्यवस्था, जागतिकीकरण, बहुराष्ट्रीय उद्योग नि त्यांची व्यावसायिक नीती इ. बद्दल काही भाष्य करता येईल का हे तपासण्याचा आहे. हा अभ्यास या एका केसच्या संदर्भात असल्याने त्यातून निघणारे निष्कर्ष हे व्यापक असतीलच असे नाही याची मला जाणीव आहे. कदाचित ही नाण्याची एकच बाजू असेल. अ‍ॅडम्सने आपली कैफियत या पुस्तकाद्वारे मांडली आहे. रोशकडून याबाबत काही प्रतिवाद अथवा भूमिका मांडणे झाले आहे का याचा शोध घेतला असता तसे काही हाती लागले नाही.

हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले (मूळ इंग्रजी पुस्तक १९८५ मध्ये) त्याला आता पंचवीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे आज यावर काही लिहिणे हे औचित्यपूर्णही आहे. पुस्तकातील कालखंड हा साधारणपणे १९७३ त १९८३ असा दहा वर्षांचा आहे. १९८३ साली बहुतांश खटल्यांचे निकाल आले असले तरी अ‍ॅडम्सचा लढा चालूच होता. त्या लढ्याचे फलित काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. याचे उत्तर देण्यासाठी १९८३ नंतर म्हणजे गेल्या सुमारे अठ्ठावीस वर्षात काय घडले याचा मागोवा घ्यावा लागेल. या दृष्टीने काही माहिती मिळवण्याच्या मी प्रयत्न केला. या लेखमालेचा मुख्य आधार ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ हे पुस्तक (डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेला मराठी अनुवाद) हेच आहे. परंतु १९८३ नंतरच्या कालावधीतील घटनांसाठी, माहितीसाठी मी अन्य काही लिखाणाचा आधार घेतला आहे. सविस्तर संदर्भसूची अखेरच्या भागात देईनच. (आताच न देण्याचे कारण म्हणजे जसजसे लिखाण पुढे सरकेल तसा त्यात बदल होऊ शकेल.)

मूळ इंग्रजी पुस्तक आजही उपलब्ध आहे, परंतु मराठी अनुवाद आता उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याच्याआधारे लिहायचे त्या मूळ पुस्तकातील माहिती थोड्या विस्ताराने देणे आवश्यक ठरले. अ‍ॅडम्सच्या पुस्तकात रोशच्या लढ्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील तपशीलवार लिहिले आहे. एवढा मोठा लढा लढत असता झालेली कौटुंबिक ससेहोलपट विस्ताराने येते नि आपण सुन्न होऊन जातो. परंतु लिखाणाची व्याप्ती नि उद्देश लक्षात घेता त्यासंबंधीचे उल्लेख मी थोडक्यात केले आहेत. तसेच इटलीमधे त्याने केलेल्या वास्तव्यात त्याला आलेले अनुभव, अर्थिक विवंचना, व्यवसाय उभारणीच्या प्रयत्नात खाल्लेले फटके, तेथील व्यवस्थांशी दिलेले लढे हे ही फार विस्ताराने दिलेले नाहीत. मूळ लिखाण हे साधारणपणे कालानुक्रमे केलेले आत्मचरित्रात्मक लिखाण आहे. माझ्या लेखनाचा हेतू वेगळा असल्याने इथे त्याची विषयवार वर्गवारी करून फेरमांडणी केली आहे. त्या ओघात काळात पुढे मागे घडलेल्या घटना वाचताना होऊ शकणारा गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक तिथे वर्ष/महिना यांचा उल्लेख - पुनरावृत्त होत असूनही - केलेला आहे, तर काही वेळा अनावश्यक ठरवून गाळून टाकला आहे. हे सर्व करताना त्या त्या संदर्भातील तपशील वाचताना आधी आलेल्या एखाद्या मुद्यातील तपशीलाने छेद देउ नये याचाही यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. मूळ अनुवादातील काही उच्चारांमधे बदल करून अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे (उदा. बेस्ले ऐवजी बाझल्). यातूनही काही विसंगती/चुका निदर्शनास आणल्यास तत्परतेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन.

मी अर्थशास्त्राच्या, अर्थव्यवस्थेचा अभ्यासक नाही (उलट काही जवळच्या मित्रांनी मी अर्थशास्त्राची काही पुस्तके वाचावीत म्हणून केलेला प्रयत्न मी विफल ठरवला आहे.) त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर काहीही भाष्य करणे मला शक्य नाही. त्यामुळे एका सामान्य माणसाच्या भूमिकेतूनच मी अ‍ॅडम्सच्या लढ्याचा विचार करू शकतो नि तसाच मी करणार आहे. यात कदाचित काही उघड सैद्धांतिक त्रुटी दिसू शकतील. वाचकांना विनंती की अशा त्रुटी माझ्या निदर्शनास आणून द्याव्या म्हणजे त्या ताबडतोब सुधारून घेता येतील. माझे विचार मांडण्यासाठी मी शेवटी उपसंहाराचे प्रकरण प्रामुख्याने वापरणार आहे. परंतु अनेकदा माहितीच्या ओघातही काही लिखाण येईल, पण ते स्वतंत्र परिच्छेदात लिहून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कायदेशीर बाजू:
इथे दोन बाजूंतील संघर्षाच्या विषयासंबंधी लिहिले आहे. हा संघर्ष विविध कायदेशीर पातळीवर लढवला गेला. भरीस भर म्हणजे कायद्याच्या अधिकारक्षेत्राचा, व्याप्तीचा प्रश्न त्या कायदेशीर लढाईच्या वेळीची गुंतागुंतीचा झाला होता. अशा वेळी सदर लिखाणाच्या कायदेशी वैधतेबद्दल निवेदन देणे आवश्यक ठरते. यासाठी आगाऊच हे नोंदवून ठेवतो की रोश अथवा अ‍ॅडम्सच्या भूमिकेबद्दल, प्रवृत्तीबद्दल, न्याय/अन्यायाबद्दल, दोषी/निर्दोषी असण्याबाबत मी नव्याने कोणतेही मूल्यमापन वा निष्कर्ष काढणार नाही, माझा तो उद्देश नाही. या लढ्याच्या निमित्ताने व्यक्ती-व्यवस्था संघर्ष, औद्योगिकरण, व्यवसायनीती, भारतातील सद्यस्थिती या गोष्टींसंबंधी काही सर्वसाधारण मूल्यमापन वा चिकित्सा करणे हा माझा हेतू आहे. रोश, अ‍ॅडम्स नि त्यांच्या लढ्यासंबंधीची सारी माहिती मी प्रामुख्याने ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ या पुस्तकातून, अन्यत्र आलेल्या अ‍ॅडम्सच्या मुलाखतीतून वा अन्य कायदेशीर मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेतली आहे नि त्यांचे संदर्भही दिले आहेत. माझे भाष्य नि मूळ माहिती मी स्वतंत्र परिच्छेदात लिहून वेगळे ठेवण्याच्या शक्य तितका प्रयत्न केला आहे.

(पुढील भागात: रोश आणि अ‍ॅडम्स)

जीवनमानअर्थकारणप्रकटनविचारमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Apr 2011 - 2:53 pm | सहज

लेखमाला वाचायला उत्सुक आहे.

सहमत.. लवकर येऊ दे पुढचा लेख म्हातारबा...

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2011 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढे वाचायला उत्सुक आहे. या लढ्याबद्दल ऐकले आहे बरेच. तपशील या निमित्ताने कळतील.

प्रास's picture

26 Apr 2011 - 3:07 pm | प्रास

.... पुढे वाचण्यास उत्सुक!

स्वाती२'s picture

26 Apr 2011 - 6:59 pm | स्वाती२

येऊ दे पुढील भाग !
मी हे पुस्तक पहिल्यांदा कॉलेजमधे असताना वाचले. भयानक अस्वस्थ झाले होते!

मुक्तसुनीत's picture

26 Apr 2011 - 7:36 pm | मुक्तसुनीत

उत्तम लेख. पूर्ण मालिका वाचण्यास उत्सुक आहे.

श्रावण मोडक's picture

27 Apr 2011 - 11:23 pm | श्रावण मोडक

प्रस्तावनेच्या पहिल्या दोन परिच्छेदांतील मांडणी कशाच्या आधारे केली आहे, त्यावर स्वतंत्र लिहा. :)

रमताराम's picture

27 Apr 2011 - 11:42 pm | रमताराम

हळूच आमचा सिद्धांत खपवू पहात होतो तर तुम्ही नेमके टपकलात. तुम्ही आमची खोडी काढायची नाही हे ठरलं होतं ना. छ्या:
लेखन करता येईल की नाही हा वायद्याचा प्रश्न आहे. तूर्तास लिंकाळु अथवा संदर्भासुराच्या भूमिकेमागे मागे लपतोय. सर्वसाधारण ढोबळ मांडणीसाठी तूर्तास (काही वादग्रस्त मुद्दे आहेत तरीही) 'राहुल सांकृत्यायन' यांचे 'व्होल्गा ते गंगा' पाहता येईल. त्यात पहिला समाजविस्ताराचा भाग येतो, त्यापुढची उद्योगधंद्यांबाबतची नरोटी माझी. :)

श्रावण मोडक's picture

28 Apr 2011 - 12:31 pm | श्रावण मोडक

'व्होल्गा ते गंगा' हे पटलं, वाटलं होतंच. मग कधी लिहिताय? कारण त्यात बरंच काही दडलं आहे जे इथं तुम्ही लिहिलेलं दिसत नाहीय. हां, आता रीड बिटवीन द लाईन्स असा काही प्रकार असल्यास ठाऊक नाही. :)
अशी खोडी काढल्याबद्दल इथले काही जण (ते त्या अर्थाने 'प्रगल्भ' नसले तरी) मला दुवा देतील याची खात्री आहे. ;)

रमताराम's picture

28 Apr 2011 - 11:05 pm | रमताराम

कारण त्यात बरंच काही दडलं आहे जे इथं तुम्ही लिहिलेलं दिसत नाहीय. हां, आता रीड बिटवीन द लाईन्स असा काही प्रकार असल्यास ठाऊक नाही.
नक्कीच. परंतु ते पुस्तक प्रामुख्याने समाजव्यवस्था नि धर्मव्यवस्था यांच्या विकासप्रक्रियेबाबत आहे. उदीमव्यवस्थेबद्दल ते पूर्णपणे मौन पाळते. (तसाही आपला इतिहासाचा अभ्यास व्यापार-उदीमाच्या विकासाबद्दल फारसा आस्थेवाईक असत नाही) त्यामुळे इथल्या विषयाशी ते तितकेसे सुसंगत नाही. विषयप्रवेशाचा धागा म्हणून मी समाजविकासाचे टप्पे तेवढे वापरले आहेत.

व्होल्गा ते गंगा' आणि खुद्द सांकृत्यायन यांच्याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात आहेच. एकाहुन अधिक तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास करत एकामागून एक विचारधारा अभ्यासणारा, स्वीकारणारा, चिकित्सा करणारा आणि शेवटी नाकारणारा इतका सव्यसाची आणि विचक्षण विद्वान माझ्या माहितीत तरी दुसरा कोणी नाही. अभ्यासाविनाच एखाद्या विचारधारेचा स्वीकार करून त्याबाबत अनाठायी दुराग्रह धरणार्‍यांच्या देशात हे विशेष उल्लेखनीय.

श्रावण मोडक's picture

28 Apr 2011 - 11:50 pm | श्रावण मोडक

त्यात म्हणजे त्या पुस्तकात नव्हे. तुमच्या प्रस्तावनेच्या पहिल्या दोन परिच्छेदांमध्ये. आणि अर्थातच, स्वतंत्र लेखनासाठीच मी ते सुचवले आहे. :) ते पुस्तक आणि त्याचे लेखक यांच्याविषयीही स्वतंत्र लिहा.

गणेशा's picture

28 Apr 2011 - 7:38 pm | गणेशा

मी तरी या बुक बद्दल पहिल्यांदाच ऐकत आहे...
पुढे वाचण्यास उत्सुक ...

तरीही मराठी अनुवाद कोणत्या प्रकाशन ने केला होता हे सांगता येइल का ?

संपूर्ण मालिका वाचण्यासाठी उत्सुक आहे. येऊदेत पुढचे भाग लवकर.

अर्धवट's picture

20 Aug 2011 - 10:13 pm | अर्धवट

वाचतोय..