"थेरडे! थेरडे सोड तिला. अगं दम काढशील तिचा. मरेल ती. सोड! सोड म्हणतेय ना मी.", हवालदारीण मंजुळाला पकडून खेचत होती. पण आज मंजुळा दोन पोलिसांना ऎकत नव्हती, एवढी तिच्या हाती ताकद आली होती. सवित्रीला जाऊ द्यायचेच नाही असे तिने ठरवलेले. आज शनिवारची नामी संधी मिळाली होती तिला. कपड्यावरचे डाग नीट धुतले गेले नाहीत म्हणून सकाळी सावित्री आली अन तिने मंजुळाशी वाद घातला. मंजुळानेच साऱ्याजणींचे कपडे धुतले होते. सावित्रिचे मात्र मळलेले होते. मग काय दोन रान मांजरी भिडल्या. आपल्या बापाचं ज्यांनी कधी ऎकलं नाही त्या एकमेकींचं काय ऎकून घेतील? झालं मग द्वंद्व. सावित्रीचा गळा आवळण्यात मंजुळाला जो आसूरी आनंद मिळत होता त्याचा मध्येच येऊन हवालदारिणींनी बेरंग केल नसता तर ... आज आणखी तीस वर्षांची खुनाची नवी शिक्षा मंजुळाची पक्की झाली असती.
बऱ्याच प्रयत्नानंतर मंजुळाच्या हातांचा फास सुटला अन दोघी वेगळ्या झाल्या. "मोघेबाई सोडा मला. ह्या हायवानेला कापून तिचं मटण शिजवून न्हाय खाल्लं तर नावाची मंजुळा नाय.", दोन लेडी कॉन्स्टेबलनी पकडून ठेवलेल्या मंजुळाच्या अंगात दैत्य संचारलं होतं. सावित्री जीभ ओकून तिचा गळा साफ करीत कशीबशी श्वास घेत होती. त्याच जोरात मंजुळाने तिला एक दोन लाथा झाडून घेतल्याच. एका थोराड दिसणाऱ्या पोलिसी बाईने मंजुळाच्या पाठीत दांडा हाणला.
"बराच माज चढलाय आज तुला? जिरवते तुझी. बघच तू. आमच्या राज्यात मारामारी करते. बापाचा खून करणारी तू अजून तहान संपली नाही वाटते...", जेलर मोघे चिडली. तिने आणखी दोन दांडुके मंजुळाच्या पाठीत हाणले. तिकडे कॉन्स्टेबल फर्नांडीस सावित्रीला मुस्काटात मारीत होती. सावित्री आधीच अर्धमेली झालेली होती.
"घेऊन जा तिला.", मोघे चिडून फर्नांडिसला म्हणाली, "मरायला आली असेल तर डॉक्टरांना फोन लाव. तोवर मी हिला बघते.", असं म्हणून मोघेने जळजळीत नजरेनं मंजुळाकडे पाहिलं. मंजुळाची आज धडगत नव्हती.
न्हाणीघर, धोबणहौद अन विझिटर रूम मागे पडल्या तसं मंजुळाला कळू लागलं की तिला काळकोठडीत न्हेताहेत. आजूबाजूला काम करणाऱ्या मंजुळाच्या जेलच्या इतर भगिनी भेदरलेल्या डोळ्यांनी मंजुळाला दंडाला पकडून फरफटत नेणाऱ्या मोघेबाईंकडे बघत होत्या.
"जोर चढलाय! काय? निघेल तुझा जोर जेव्हा अंधारकोठडीत रहायला लागेल. एक आठवडा ठेवते बघच तू. विना पाणी विना अन्न. अन्नाला तरसशील. पाण्याला तहानशील. मग बघते कशी जोर लावतेस. चाळीस वर्षाची थेरडी झालीय पण जोर बघा? विशीतल्या पोरीसारखा. चल दावतेच तुला..." मोघेबाईं आपली टेप मंजुळाला ऎकवत संपूर्ण रस्ता फरफटत चालत होत्या. मंजुळा डिवचलेल्या नागिणीसारखी दंडाला हिसडे देत होती. पाच मिनिटांच्या बेसमेण्टच्या पायऱ्या उतरल्यावर पहिली अंधारकोठडी लागली. आतून कण्हण्याचे आवाज येत होते. १०१, १०२, १०३ अशा बारा अंधारकोठड्या गेल्या पण सगळ्यांची एकच गत. अन्न पाण्याविना डांबलेल्या बायका आत निपचित पडून मरणासन्न आवाजात हंबरत होत्या. चंदरपूरची ही जेल म्हणजे राज्यातली बायकांची सर्वात बदनाम जेल होती. चंदरपूरला पाठवणार हे ऎकून तर कित्येक बायका कोर्टातच घेरी येऊन पडत. जिने कुणी ह्या जेलात आपला काळ घालवलाय तिला नरकयातना म्हणजे काय ह्याचा पूर्ण प्रत्यय आलेला असे. त्यानंतर ‘भीक नको पण कुत्र आवर’ अशा आशयात कित्येक जणी आयुष्यभर पुन्हा खून-दरोड्यांच्या गावीही जात नसत.
मंजुळा मात्र इथे जन्मभर अडकली होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षी लग्न होत नाही म्हणून तिच्या बापानेच तिला भोगली. आईची माया वयाच्या पाचव्या वर्षीच हरवलेली. भाऊ बापाच्या वळणावर लागून आधीच जेलात बसलेले. मग आपलं दुःख सांगावं कुणा? आपल्यातच घुसमटलेली तिची कडकलक्ष्मी झाली नसती तर नवलंच. एका रात्री बापाने पुन्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला केला तसं तिनं कोयत्याने बापाचा गळा चिरून काढला. तोच तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. त्यानंतर शेजाऱ्यांच्या घरी दरोडा अन एका वाण्याच्या घरी चोरी न त्याचा खून. असे दोन खून आणि दोन दरोडे तिच्या नावावर जमा होते.
त्याजोरावर इथून निघणे आयुष्यभर शक्य नव्हते. पण अशा रौरवात राहूनही पुढचे सात दिवस काळकोठडीत घालवणे म्हणजे ह्या आगीतून त्या फुफाट्यात! अंधारात अडखळत चालणाऱ्या मंजुळाला एकशेतेरा नंबर आल्याचे कळले. कारण मोघे थांबली होती. काळॊखाची इतकी प्रगाढ छाया तिथे पसरली होती की सूर्याची भनकही लागू द्यायची नाही अशा पद्धतीने बनवलेला काळकोठडीचा हा भाग आधीच शिक्षा भोगणारीच्या मनात दरारा आणत असे. जेलात असताना बाकी बायांकडून ऎकल्याप्रमाणे जेवढी शिक्षा कडक तेवढा काळकोठडीचा नंबर जास्त असे.
एकशेतेरा म्हणजे शेवटून तिसरी...
मोघेबाईंनी विजेरी पेटवली. काळॊखाला चिरत प्रकाशाचा एक तीव्र झोत पसरला अन काळकोठडीचं दार दिसलं. बिजागऱ्यांना रगडत उघडलेला एकशेतेरा नंबरच्या दाराचा आवाज दालनात घुमला अन अचानक बाकी काळकोठड्यांतले कण्हण्याचे आवाज बंद झाले. आतल्या बायकांना कुणीतरी सुटतंय किंवा शिरतंय हे कळलं अन मग अचानक दारावर आपटण्याचे, मोठ्यामोठ्याने रडण्याचे आवाज येऊ लागले. "सोडवा आम्हाला!", "बाई मला बी जाऊ द्या!", "दया करा बाई!" अशा कारूण्याने भरलेल्या आरोळ्या ऎकून ह्याच त्या रांगड्या खूनी बायका का? असा प्रश्न मंजुळाला चाटून गेला.
मोघेबाईंनी मंजुळाला आत ढकललं अन दार लावून घेतलं. मंजुळा दाराच्या फटीतून पाहू लागली. मोघेबाईंनी विजेरीत फाकलेला आपला मुर्दाड चेहेरा मंजुळाला दाखवला. त्यावर हास्याची रेख होती. उपरोधाने म्हणत होता ‘आता इथून सुटका नाहीच?’.
मंजुळा अजूनही रागाने धुमसत होती पण तिथं आल्यावर समाधानाचा एक श्वास तिनं घेतलाच...
...अजूनपर्यंत सगळं प्लाननुसार होत होतं...
...हो! प्लान!! काळकोठडीतून बाहेर पडण्याचा प्लान, डिसिल्व्हाबरोबर बनवलेला. कोठडीच्या आत तिच्या फुटक्या भिंतीशी टेकून बसलेल्या मंजुळाला गेल्या आठवड्यातला शनिवार आठवला... धोबणहौदावर कपडे धुताना डिसिल्व्हाशी केलेली बातचीत...
"आज सुजाता दिसली नाही.", डिसिल्व्हा म्हणाली.
"तिला पोटात मुरडा उठला सकाळी. सारखं ओकत होती. गेली हॉस्पिटलात.", मंजुळाने परकर आपटीत म्हटले.
"अरे जिजस! खरं की काय?"
"मग. गारण्टी नाय तिची!"
"पण जगली तर?"
"बरं हाय! निदान ह्या पिंजऱ्यातून काही दिवस तर सुटंल. नशीब चांगलं असेल तर पळून बी जाईल!"
"पळून?", डिसिल्व्हा हसली. तिच्या म्हाताऱ्या चेहेऱ्यावर सुरूकुत्या पसरल्या होत्या, "चंदरपूरच्या जेल-हॉस्पिटलात गार्ड असतात तैनात. वॉर्डबॉयला पण कार्ड बघितल्या शिवाय जाऊ देत नाहीत. येणारी जाणारी प्रत्येक गोष्ट चेक करत असतात. पळून जाईलच कशी ती?"
डिसिल्व्हाची भाषा बरीच सुधारलेली होती. जेलमध्ये बसूनच तिनं एम.ए. केलेलं. कदाचित जेलमधली कैद्यांतली ती एकमेव ग्रॅजुएट असावी. नाहीतरी तिचं अवघं आयुष्य जेलमधून सुटणं शक्य नव्हतं. जन्मठेपेची चार जणांची हत्येची शिक्षा होती तिला. हुंडा देत नाही म्हणून शारिरीक छळ करणारे नवरा, सासू, सासरा अन नणंद अशा चार जणांना ख्रिसमसच्या केकमध्ये विष मिसळून मारलेलं तिनं.
मग स्वतःही तोच केक खाल्ला. पण नशीब फुटलं अन ती वाचली. तेव्हापासूनच इथं होती. एवढा खुनी भूतकाळ असूनही ह्या जेलातल्या चार चौघींसारखी मात्र ती खुनशी नव्हती.
"काय बोलते?", मंजुळाने खांदे उडवले.
"मग तर! मेल्याचं नाटक करून मसणात जाऊन तिथून पळून गेली तर जगेल. पण त्या हॉस्पिटलातून पळून जायचा काय चान्स नाही."
डिसिल्व्हाच्या ह्या (अ)शक्यतेवर मंजुळा हसली. डिसिल्व्हा तिची आधीपासूनची जेलातली मैत्रिण. सुरूवातीचे पाच वर्षं दोघी एकत्रच एका कोठडीत होत्या. मग म्हाताऱ्या डिसिल्व्हाला जेलातली कामं मिळण्यास सुरूवात झाली. ती जेलाचे पोस्ट सांभाळायची. जेलातल्या पोलिसांचे कपडे धुवायची. सध्या जेलात फासावर किंवा निसर्गतः मेलेल्यांची डेड बॉडी सांभाळायची तिला ट्रेनिंग देण्यात आली होती. त्यामुळं जल्लादाची नवी पोस्ट तिचीच होती. कित्येक वेळा आरोपी मेल्याचं सर्टीफिकेट डॉक्टरकडून मिळाल्यापासून डेड बॉडीची धर्मानुसार विल्हेवाट लावायचं काम पण तिच करत होती. साठ वर्षांची ही बया ही सगळी कामं करण्यात बरीच तंदुरूस्त होती त्यामानानं. सांधे, मणके, डोळे सगळं व्यवस्थित. अधून मधून मोघेबाईंच्या डोक्याला मसाजही करायची ती. ह्यामुळंच मोघेबाई तिच्याशी अदबीनं वागायच्या.
"काय ग मारिया? मसणातून पळून जायचं शक्य हाये? म्हंजी हिंदू सम्शान तर हास्पिटलाच्या बाजूस हाये ना? तिथंही गार्ड असतीलच की."
"ते आहे. पण मागल्या ख्रिश्चन स्मशानभूमीत कुणी येत जात नाही. तिथं बॉडी पेटीत बंद करून बुजवून टाकली की मग तिचा कुणी वाली नाही. पेटीतून बाहेर येवून मग मागल्या फुटानं बाभळीच्या बनातून सीधा राज्याबाहेर. आंध्रात."
"शक्य आहे?"
"३५ वर्षं बघतेय मी. तिथे कुणी फिरकत नाही. नाहीतरी जेलात इन मीन पाच बायका ख्रिश्चन. त्यात कुणीही मरायला आलेलं नाही. मग ख्रिस्ती मसणात गर्दी होईलच कशाला? कोण लक्ष ठवंल तिथं. फक्त तिथं जायला जेलरबाईंची परवानगी लागते. तिच्याकडेच चाबी आहे."
"मग तू कंधी ट्राय नायी केलं?"
ह्यावर डिसिल्व्हा उपहासाने म्हणाली, "मला पळायचे नाही. माझा दीर अजून जिवंत आहे. बाहेर पडेन तसा तो मला गोळी घालेल."
"आगं पन नाहीतरी मरायची काय भीती तुला? आतमहत्या केलेलीस ना!"
"वेडी होते मी तेव्हा. जेलात राहून शिकले. इथे आपल्यापेक्षा वाईट आयुष्य जगलेल्या स्त्रिया पाहिल्या.", असं म्हणून डिसिल्व्हाने मायेनं मंजुळाकडे बघितलं, "तुमच्या मानाने वाटतं हे ईश्वराने दुसरं आयुष्य दिलंय मला. पिंजऱ्यात तर पिंजऱ्यात. लॉर्ड जिजसने फाशी होऊ दिली नाही. तिही एक कृपाच झाली माझ्यावर. फादर क्रास्टॊंनी मला जीवनाचा नवा मार्ग शोधून दिला. शिकले. एम.ए. झाले. आता मृत्यू नैसर्गिक यावा असे वाटते. जिजसच्या पायी पापं घेऊन नाही जायचंय मला."
"अगं पण शिक्षा भोगलीस ना हितं? मग कसलं आलंय पाप?"
"पण बाहेर जाऊन पुन्हा माझ्या दीराच्या हाती होणाऱ्या खुनाचं कारणही मीच ठरेन ना? त्याला हत्या करण्यासाठी मीच प्रवृत्त करेन ना. तेही एक पापंच की."
"बरी देवावर श्रद्धा ठेवते एवढी तू. मी तर देवाची पायरी चढले नाही समद्या २० वर्षांत. तो माझ्यासाठी मेला जेव्हा माझ्या बापानं माझी नथ उतरवली..."
डिसिल्व्हा सुन्न झाली. एवढी वर्षं एकत्र राहत असतानाही तिनं एकदाच मंजुळाच्या तोंडून तिची कहाणी ऎकली होती. आज त्याचं पुनःकथन झालं होतं. एवढे आघात सोसून जेलात सडणाऱ्या मंजुळाविषयी डिसिल्व्हाच्या मनात म्हणून एक हळवा कोपरा लाभला होता. तिची आयुष्यभर झालेली घुसमट डिसिल्व्हाला सल लावून गेली. काहीतरी ठरवून जिजसला मनातल्या मनात माफी मागत ती मंजुळाला म्हणाली,
"पळायचंय इथून?"
डिसिल्व्हाची नजर मोरीतून गटारात गायब होणाऱ्या धुतलेल्या कपड्यांच्या मळीवर लागून राहिली होती.
मंजुळा चमकली. तिनं हातातल्या साडीचा पीळ खाली टाकला. डिसिल्व्हाच्या जवळ जाऊन ती म्हणाली, "काय बोल्ली तू? ... पळून?"
डिसिल्व्हाने उसासा टाकला, "हो! तुला पळायचंय इथून?"
मंजुळानं आजूबाजूस इतर कुणी बघत नाही ना असं पडताळत काही सेकंद घेतली.
"हो!", डिसिल्व्हाकडे न बघता ती म्हणाली, "पण कसं?"
"धुण्याचं काम करत रहा. चेहेऱ्यावर भाव दाखवू नकोस. सांगते मी..." डिसिल्व्हा अन मंजुळा पुन्हा मोरीतल्या दगडावर कपडे आपटू लागल्या.
"इथून बाहेर निघण्यात तीन अडसर आहेत. पहिला मरायचं ढोंग करायचं. दुसरं डॉक्टरचं इन्स्पेक्शन होऊ द्यायचं नाही अन तिसरं दफन व्ह्यायचं ख्रिश्चन म्हणून."
"अगं पन दफन झाल्यावर बाहेर येनार कसं त्या पेटीतून?"
"मी येऊन खोदेन रात्री गुपचुप."
"पन पहिल्या दोन अडचनींचं काय?"
डिसिल्व्हाने दीर्घ श्वास घेतला, "मृत्युशी खेळायचंय. तयार आहेस?"
मंजुळाने डोळे मिटले, "हो!", मंजुळा निश्चयाने म्हणाली.
"तर ऎक. मी माझ्या नवऱ्याला खायला घातलेलं विष कसं बनवायचं हे मला माहित आहे. जर पाव चमचा घेतलंस तर सुरूवातीच्या वांत्यांनंतर बेशुद्ध पडशील. हृदयाचा ठोका मिनिटाला दहावर जाईल. श्वासोछ्वास आणि ब्लड प्रेशर एवढा खाली येईल की साध्या माणसाला तू मेली असंच वाटेल. फक्त जिभेखाली तुरटीचा तुकडा ठेवून विष पी. हळूहळू चार पाच तासात विरघळत मग ती तुरटी पोटात जाऊन तिथलं विष आटवून संपवेल. सकाळी मेल्यावर तू संध्याकाळी पुन्हा शुद्धीवर येशील. मग मी रात्रीच्या प्रहरात येऊन कबर खोदून पेटी काढून तुला सोडवेन. पुढच्या रविवारी रात्री नऊ वाजता गार्ड शिफ्ट बदलेल. तेव्हा पंधरा मिनिटांसाठी कुणाचं लक्ष नसेल या जागेवर. त्यातच सगळं आटपू. मी मुद्दामून तुला उथळ जागेत दफन करीन म्हणजे उरकायला बरं पडेल. त्यानंतर मागल्या वनातून पळून जा."
"हे सगळं तुला.."
"मला असंच वाचवण्यात आलं होतं माझ्या आत्महत्येनंतर. "
"पन खिच्शन न्हायी मी. अन पुन्हा डाक्टरनं तपासून त्याला माझं ठोके सापडलं तर? अन रात्री ते जंगल?"
"जंगलात कोल्ही असतील तेवढीच. हवं तर एक सुरी लपवून ठेव तुझ्याकडं...
पण ... ख्रिश्चन दफन होशील कशी?", डिसिल्व्हा विचारात पडली.
थोडं तिनं धीर एकवटून मग विचारलं, "धर्म बदलशील? फादर क्रास्टो करतील धर्मांतर."
मंजुळा दचकली. तिच्या हातातला साबण निसटला, "काय? आता धर्म पण बदलायचा?", मंजुळा अस्वस्थ झाली.
डिसिल्व्हाच्या चेहेऱ्यावर अपराधीपणाच दाटला होता. पुढले दोन मिनिटं धोबणहौद गप्प होता.
"हो! मी तयार हाये.", मंजुळा नाईलाजानं म्हणाली, "उद्याच सांग फादरना. "
डिसिल्व्हा थोडी आनंदली पण मंजुळाच्या पुढच्या प्रश्नानं पुन्हा गंभीर झाली, "पन डाक्टरच्या तपासणीचं काय?"
कपडे एव्हाना धुवून संपले होते पण प्रश्न जसाच्या तसा होता.
"ठिक आहे मी ह्यावर विचार करते अन सांगते तुला उद्या. इथेच भेट. ह्याच वेळेस. गर्दी कमी असते.", डिसिल्व्हा म्हणाली.
मंजुळा थोडी प्रश्नांकित होतीच. त्याच संदेहात ती तिथून निघली पण थोडी पुढे जाऊन घुटमळली. "मारिया!", मंजुळाने वळून विचारले, "माझी मदत का करतेय तू? तुज्या देवाच्या विरोधात का जातेय? पुन्हा म्या धर्म बदलंल तो इथून सुटण्यासाठी. ही पन लबाडीच ना?"
डिसिल्व्हा फक्त हसली, म्हणाली, " तुझ्या आयुष्यात जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं गं. त्यामुळेच देवावरची श्रद्धा गेली तुझी. इथून सुटलीस ना तर माझ्यासाठी देवावर श्रद्धा ठेवायल सुरू कर! ख्रिस्ती धर्म मान नाहीतर सोडून दे, मला काही फरक पडत नाही. फक्त पुढचं आयुष्य चांगली कामं करत घालव. तुझा देव बघेल तुला अन माफही करेल. पुन्हा गुन्ह्याच्या वाटेवर जाऊ नकोस पण. मला प्रॉमिस कर."
मंजुळाला मात्र डिसिल्व्हाची किव वाटली, देव नावाच्या षंढ शक्तीची अशी दास झालेली पाहून. इथून सुटून देवावर श्रद्धा ठेवायची मंजुळाला अजिबात इच्छा नव्हती. त्या देवापेक्षा बाहेरचं मोकळं जग तिला जास्त साद घालत होतं. तिनं मारियाच्या इच्छेखातर तिला प्रॉमिस केलं.
अगदी खोटं.
डॉक्टरच्या चेक-अपचा अडसर दूर व्हायची वाट बघत मंजुळाने दोन दिवस घालवले. आज पुन्हा तिची डिसिल्व्हाशी गाठ पडली होती, धोबणहौदावर.
"काय सापडलं उत्तर?"
डिसिल्व्हा गप्पच होती. इथून सुटण्याचा प्लान हातातून निसटत चाल्लेला दिसत होता.
"मी भरपूर विचार केला गं!", डिसिल्व्हाला कण्ठ फुटला, "पण काहीच उत्तर मिळत नाही."
"डॉक्टरला लाच देऊन...", मंजुळाने आपल्या स्वानुभवानुसार प्रश्न केला.
डिसिल्व्हाने तिच्याकडे नाराजीतच पाहिले.
"म्हंजी त्याच्याशी साटलोटं करून म्हणत व्होती म्या...", मंजुळाने बोलायचा बाज बदलला.
"नाही! आपला माणूस नाहीय तो. पुन्हा किती पैसे मागेल ह्यासाठी काय माहित? त्यात त्याला विचारून पुन्हा बिंग फुटलं तर? "
"ते पन ठिक.", मंजुळा चिंताक्रांत झाली. इथून निघायचा हा प्लान असाच सोडून द्यायला बराच मोहक होता, "काहीतरी आयडिया असेलच. डॉक्टर कुठेतरी हलगर्जीपना करीलच ना."
ह्यावर डिसिल्व्हा हळूच दचकली, "ओह जिजस! कशी विसरले मी?" अचानक तिच्या चेहेऱ्यावर आनंद दिसू लागला, "तुला आठवतंय. लक्ष्मी सुतार?"
"हो ती मुलं पळवून नेणारी बया. मेली ती हार्ट अटाक ने. तिचं काय?"
"अगं तिला डॉक्टरला दाखवण्यात आली नव्हती..."
"का?", मंजुळा प्रश्नांकित चेहेऱ्यानं डिसिल्व्हाकडे पाहू लागली.
"ती काळकोठडीत मेली."
"काय बोलते? मला वाटलं ती हास्पिटलात मेली म्हणून. तिनं पैसे चोरले व्हते नव्हं का हवालदारिणीचे. म्हनून टाकलं व्हतं तिला १०७ मध्ये. तिथं हार्ट अटाक आला तिला आन मग हॉस्पिटलात नेवून तिथं मेली नव्हं ती?", मंजुळाला अजून कळलं नव्ह्तं.
"तिला हॉस्पिटलात नेलंच नव्हतं. त्याधीच ती १०७ मध्ये पाच दिवस भुकेली राहिल्याने मेली. मेल्यावर तिला डॉक्टरला सुद्ध दाखवलं नव्ह्तं कारण काळकोठडीत कैद्याने आत्मह्त्या केली किंवा त्याचा मृत्यू झाला तर ती जेल प्रशासनाची चूक मानून जेलर वर कारवाई करतात."
"काय बोलते?", मंजुळानं आ वासला होता.
"हो! नियमच आहे तो. कैद्यांना अमानुष वागणूक मिळू नये आणि त्याद्वारे कुठला अनुचित प्रसंग त्यांच्यावर ओढावू नये म्हणून करतात असं. त्यामुळे लक्ष्मीची डेड बॉडी मीच जाळलेली गुपचूप. अन इथे सगळ्यांना पोलिसांनी सांगितलं की ती हार्ट अटॅक ने हॉस्पिटलात मेली म्हणून...", डिसिल्व्हा जवळ येऊन मंजुळाच्या कानात कुजबुजली,
"...जेलर बाईंनी स्वतःच कागदपत्र बनवली. सगळी खोटी..."
"!", मंजुळाचा आ वासलेलाच होता.
"कुणाला सांगू नको. इकडे फक्त मोघेबाई, चार पाच हवालदारिण अन मलाच माहित आहे ही गोष्ट.", डिसिल्व्हा भोवती कुणी नाहीना असं पडताळत मंजुळाच्या कानात कुजबुजू लागली, "तू जर काळकोठडीत आत्महत्या करायचं नाटक केलंस तर हे सगळं नीट जमेल. मी ग्यारन्टी घेते."
मंजुळानं विश्वासानं मान डोलावली. तिच्या डाव्या गालात तिरीप पसरली. एक मोठा अडसर तिच्यासमोरून अनायासे दूर झाला होता....
... हे सर्व आठवून मंजुळा गालातल्या गालात हसत होती. चार दिवसांपूर्वी फादर क्रास्टोनी तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. तिच्या बरोबरच्या सगळ्या जेल भगिनी अन आजूबाजूचे पोलिस तिच्या गळ्यातला क्रॉस पाहून आश्चर्य चकित झाले होते. आताही ११३ नंबर मध्ये बसून मंजुळा तो गळ्यात घातलेला क्रॉस हातांशी खेळवत होती. ही कोठडी तिला स्वर्ग वाटू लागली. गळ्यात त्या क्रॉसचं ओझं आत्ताच जाणवू लागलं होतं.
‘आजची रात्र वैराची असणार... आता फक्त सकाळी जेलचा भोंगा वाजायची वाट पहायची आहे. तेव्हा हा लपवून आणलेला विषात बुडवलेला कापसाचा बोळा तोंडात गिळायचा, अन जीभेखाली तुरटी ठेवून छान पैकी ताणून द्यायचं, मृत्युला हुलकावणी देत...’, तिचं तन मन शहारलं होतं. प्रियकराला प्रथमच चोरून भेटणाऱ्या तरूण पोरीसारखं चैतन्य तिच्या अंगात संचारलं होतं. आजची रात्र फक्त वाट बघायची होती...
... सकाळी इन्स्पेक्शन करणाऱ्या कॉन्स्टेबलला मंजुळाचा खोटा मृतदेह ११३ च्या काळकोठडीत सापडला... अन ठरलेल्या प्लाननुसार ती दुपार पर्यंत दफनही झाली होती...
जिवंतपणी दफन व्हायचा तिचा प्लान सक्सेसफूल झाला होता...
....
....
....
....
....
एक वर्षं लोटलं मंजुळाला जेलमधून सुटून. सगळे मंजुळा नावची कुणी गेल्याची एव्हाना विसरले पण होते. एकटी सावित्री खूष होती. तो तिचा सुटण्याचा दिवस. सगळ्यांना भेटली ती त्यादिवशी. शेवटचीच भेट म्हणा. चंदरपूरातल्या जेलात इतकी वर्ष राहून पुन्हा गुन्हेगारीत घुसण्याचा तिचा अजिबात मानस नव्हता. नव्या आयुष्याची तिची स्वप्नं बरीच आल्हाददायक होती.
"अगं जाता जाता आपल्या डिसिल्व्हाबाईंना ही मिठाई देऊन जा... ", मोघेबाई म्हणत होत्या.
"व्हय बाई", सावित्री आनंदात म्हणाली.
न्हाणीघराला डावीकडे वळसा घालून एका जुन्या खपाटीला गेलेल्या खोलीत सावित्री शिरली. समोरच डिसिल्व्हा बसली होती.
"मारीयामावशी मिठाई आणलीय. आज सुटतेय म्या. पुन्हा भेट होणार न्हाई." तिनं डिसिल्व्हाला मिठाई दिली पण डिसिल्व्हाच्या हातून ती पडली, सावित्रीने सुन्न मनाने ती पुन्हा उचलली, "समदं ठिक हुईल. ह्यो गुर्जरबाबाचा अंगारा घे. आज बराबर एक वरीस लोटलं त्या दिवशीला. मला बी आठवोय तो भयानक दीस. माझी नरडी मंजुळाने घोटली तोच. डाक्टर काही म्हनतील पन तू धीर नगं सोडूस... काळ कसा येतो बघ..." सावित्रीने डोळ्यांना पदर लावला, "जाते मी.." अन ती मागल्या वाटेनं निघून गेली.
खुर्चीत निपचित पडलेली मारीया मनातल्या मनात रडत होती... मंजुळा काळकोठडीत गेली अन त्याच दिवशी मारियाला लकवा मारला. बोलणं, हलणं सारं बंद झालं. डॊळे शून्यात गेले. अशा अवस्थेत मंजुळाला पाच फीट जमिनीत दफन करायचं काम स्वतः जेलर बाईंनी केलं होतं...
...प्रत्येक क्षणागणिक कॉफिनमध्ये वाट बघणाऱ्या मंजुळाचा भाबडा चेहेरा मारियाच्या मनात काहूर माजवून जात होता...
....... आज कित्येक वर्षांनी त्याच मंजुळाच्या कबरीवर एक बाभळीचं रोपटं फोफावलंय.
-- विनीत संखे
आधारित - Alfred Hitchcock- Final Escape (सौजन्य आदिजोशी)
:)
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 12:37 pm | पियुशा
व्वा !
मस्त !
लिखान फार फार आवड्ले :)
5 Apr 2011 - 12:38 pm | sneharani
गुढकथा मस्त रंगवलीत! मस्तच!!
5 Apr 2011 - 12:41 pm | स्पा
एकदम जबराट
5 Apr 2011 - 12:44 pm | ५० फक्त
मस्त रे , छान आहे कथा, येउ दे अजुन
तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
5 Apr 2011 - 1:17 pm | प्रीत-मोहर
मस्त!!!!!
5 Apr 2011 - 1:18 pm | साबु
मस्त कथा... अजुन येउ दे....
5 Apr 2011 - 1:32 pm | स्वछंदी-पाखरु
छान लिखान आहे............
एकादमात शेवट पर्यन्त श्वास रोखुन वाचली कथा.....
स्व पा
जेलच्य नावानेच हुडहुडीच भरलि.....
5 Apr 2011 - 1:51 pm | विनीत संखे
धन्यवाद मित्र मैत्रिणींनो.
5 Apr 2011 - 1:59 pm | पिलीयन रायडर
अजुनही धड धड होतय मला...
5 Apr 2011 - 2:24 pm | दीप्स
गुढकथा मस्त रंगवलीत! मस्तच!!
5 Apr 2011 - 2:38 pm | क्राईममास्तर गोगो
गोगोचा घागरा पिवळा पडला...
मंजुळा वाट बघतेय.....
5 Apr 2011 - 2:41 pm | यशोधरा
बाप्रे!
5 Apr 2011 - 3:24 pm | सविता००१
एकादमात वाचली.
झक्कास
5 Apr 2011 - 3:50 pm | डीलर
कथा छान!
माफ करा प्रश्ना बद्दल पण, हा कुठल्या कथेचा स्वैर अनुवाद आहे का ?
5 Apr 2011 - 4:22 pm | क्राईममास्तर गोगो
मला पण हेच वाटलेलं ... मीही काही वर्षां आधी ह्याच प्रकारची कथा ईमेल वर वाचली होती असे वाटते... पण गूढकथांचा प्रिमाईस नेहेमी कुठेतरी वाचल्यासारखाच वाटतो... जशी हॉलिवूडवरची "द अदर्स" मतकरींच्या "पलिकडचे" मध्ये सापडते.
5 Apr 2011 - 5:23 pm | आदिजोशी
Alfred Hitchcock Hour ह्या भन्नाट टिव्ही मालिकेतील Final Escape ह्या भागावर बेतलेली आहे की कथा.
5 Apr 2011 - 4:02 pm | असुर
विनीत, लै भारी रे!! सुपरफाष्ट स्पीड आहे कथेला!!! आणि काहीतरी उलटसुलट व्हायच्या अपेक्षेने वाचत असूनही शेवटल्या ट्विस्टला दचकायला झालं! झकास्स!!
--असुर
5 Apr 2011 - 4:29 pm | धमाल मुलगा
शेवटाला एकदम गर्रकन फिरवली गोष्ट! मजा आली ब्वा. :)
मित्रा,
एकुण वातावरणनिर्मिती जमली आहे, फक्त थोडंसं त्या त्या वातावरणाच्या भाषेचा लहेजा पकडशील तर जास्त मजा येईल असं मला वाटतं. :) बघा काही प्रयत्न करता आला तर पुढच्या कथेमध्ये!
5 Apr 2011 - 4:32 pm | कुसुमिता१२३
छान्,रोचक कथा आहे!
5 Apr 2011 - 4:34 pm | स्पंदना
आई ग्ग!!
5 Apr 2011 - 5:21 pm | आदिजोशी
कथेचा अनुवाद केलात तर तसे लिहा की प्लीज.
Alfred Hitchcock Hour ह्या भन्नाट टिव्ही मालिकेतील Final Escape ह्या भागावर बेतलेली आहे की कथा.
पुढल्या वेळी कॄपया असं नका करू. मूळ लेखकाला श्रेय द्या. मिपाच्या लिखाण विषयक नियमांत बसत नाही हे.
5 Apr 2011 - 5:50 pm | विनीत संखे
डन.
5 Apr 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा
नक्की काय? कथा बेतलेली आहे, की अनुवाद आहे?
मला वाटतं, बेतलेली असणं, कथासुत्र घेऊन आपल्या पध्दतीनं फुलवत नेणं ह्या गोष्टी तथाकथीत मान्यवर लेखकांनीही बक्कळ केल्या आहेत. तेव्हा तसं असल्यास फार ओरडा होण्याची गरज नसावीच.
हां, अनुवाद असेल किंवा जशीच्या तशी मराठीत ओतली असेल तर मात्र मुळ लेखकाचे श्रेय नाकारणे चूकच ठरेल.
मिपाच्या लेखनविषक धोरणामध्ये, कलम क्र. २ अंतर्गत
असे म्हणले आहे. ही कथा जर कोणत्या पुस्तकात प्रकाशीत झाली असेल आणि त्या लेखक्/प्रकाशनसंस्थेच्या परवानगीशिवाय इथे टाकली असेल, किंवा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये/मासिकात प्रसिध्द झाली असेल आणि त्या वर्तमानपत्र/मासिकाची आणि/किंवा लेखकाची परवानगी न घेता जर अशी दिली गेली असेल तर मात्र तो नियमाचा भंग ठरेल. अन्यथा तसा भंग ठरु नये असा माझा कयास आहे.
5 Apr 2011 - 6:07 pm | विनीत संखे
आल्फ्रेड हिचकॉक यांचा फायनल एस्केप विषयी इथे माहिती पाहा ...http://www.hulu.com/alfred-hitchcock-hour
मी शाळेत असताना आमच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली होती तेव्हा मला ही कुणाची आहे हे माहित नव्हतं. आदिजोशी यांचे धन्यवाद मला ते सांगितल्याबद्दल.
मी एकच चूक केली की सुरूवातीला आधारित असे लिहिले नाही.
त्याबद्दल मिपाकरांचे क्षमस्व.
त्यात मला आणखीन एका गोष्टीची खंत वाटते की आल्फ्रेड हिचकॉक ह्यांचा मी प्रचंड फॅन असूनही ही कथा त्यांची आहे हे मला आजतागायत कळले नाही.
ते लक्षात आणून दिल्याबद्दल आदिजोशी यांचे पुन्हा आभार.
5 Apr 2011 - 6:09 pm | धमाल मुलगा
नविन आहात, तर थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. :)
येलकम टू क्लब. :)
मिष्टर अॅड्या जोश्या,
धन्यवाद. माझी शंका मिटली.
5 Apr 2011 - 6:07 pm | आदिजोशी
कथा बेतलेली आहे, की अनुवाद आहे?
बेतलेली आहे असं म्हटलं कारण मूळ कथा स्टार्ट टू एंड तशीच आहे. मराठीकरण केल्याने अर्थातच इंग्रजी संदर्भ बदलले गेले आहेत. मूळ कथेत आणि ह्या कथेतला एक लहानसा फरक म्हणजे इथे मावशीला लकवा मारतो तिथे त्याल मदत करणारा मरतो. पण बाकी टाकोटाक सेम आहे.
मला वाटतं, बेतलेली असणं, कथासुत्र घेऊन आपल्या पध्दतीनं फुलवत नेणं ह्या गोष्टी तथाकथीत मान्यवर लेखकांनीही बक्कळ केल्या आहेत.
त्या मान्यवरांनी आपल्या प्रेरणास्त्रोताची माहितीसुद्धा स्वतःहून दिली आहे. जसे रामू ने सरकार सिनेमा सुरू व्हायच्या आधी तो गॉडफादर वर बेतल्याचे स्पष्ट सांगितले तसे.
5 Apr 2011 - 6:12 pm | धमाल मुलगा
वरच्या प्रतिसादात माझी बाजू मांडली आहेच. :)
>त्या मान्यवरांनी आपल्या प्रेरणास्त्रोताची माहितीसुद्धा स्वतःहून दिली आहे.
प्रचंड असहमत.
उदाहरणं शोधली तर बक्कळ सापडतील. मराठीतल्या कित्येक कथा-कादंबर्या अशा आधारीत आहेत हे बर्याच लोकांना ठाऊकही असतंच की.
5 Apr 2011 - 6:19 pm | क्राईममास्तर गोगो
हं आता मला पण आठवलं... पण इथे प्रयत्न चांगला केला आहे. तसं खूप वेगळंही नाही. पण मला रुपांतरण आवडलं.
अनुवाद पेक्षा आधारित बरोबर वाटते.
6 Apr 2011 - 9:39 pm | क्राईममास्तर गोगो
आज पाहिली मी फायनल एस्केप. बापच कथा ती.
पण विनीतभाऊंची भट्टी पण मस्त जमलीय... जेलच्या चार भिंतींमध्ये लपलेले प्रकार मस्त सुचवलेत. तसं ओरिजिनल स्टोरीत नाही आणि मारियाला जगवून जन्मभर मनातल्या मनात नरकयातना सोसायचं पण अगदी थरारक.
विनीतभाऊ लिवा फुडं.. मंजुळाचं भूत तुमच्या पाठीशी हाय!
5 Apr 2011 - 5:21 pm | विशाखा राऊत
शेवट वाचुन भयंकर वाट्ले...
5 Apr 2011 - 9:57 pm | निनाद मुक्काम प...
जबर दस्त
मूळ कथेचे भारतीयकरण मस्तच जमले आहे .
बाकी ह्या प्रकारावरून माझे दैवत धारपांची आठवण झाली .
माझ्या बायकोचे दैवत स्टीफन किंग ह्यांच्या गाजलेल्या टेली फिल्म इट व ग्रंडमा ह्या दोन्ही कथा धारपांनी अश्याच मराठी बाजात सादर केल्या .
मूळ कथा मराठीत वाचल्याने पत्नीसोबत तू नळीवर ह्या दोन्ही फिल्म पाहतांना धमाल आली .
अवांतर
ग्रंड्मा ह्या कथेत धारपांनी थोडा बदल केला आहे पण तो काय हे मी सांगत नाही .
लहान मुलांच्या भावविश्वातून भयकथा सादर करणारे किंग व मराठी रसिका पर्यत त्या पोहोचवणाऱ्या धारप ह्यांचे मनापासून आभार
5 Apr 2011 - 10:53 pm | मराठे
मस्त!
6 Apr 2011 - 10:01 pm | प्राजु
बापरे!!!! सुन्न झाले वाचून.
जबरदस्त लिहिलं आहे.
7 Apr 2011 - 8:15 am | विनीत संखे
धन्यवाद गोगो आणि प्राजु.
7 Apr 2011 - 8:30 am | शिल्पा ब
हिचकॉक माझा आवडता लेखक/ दिग्दर्शक...भन्नाट कथा आहे. अनुवादही छान केलाय.