पहिल्याच गाण्याला वन्स मोअर आल्यामुळे इज्जत ठेवण्यासाठी ते रिपीट करणं भाग होतं. त्या गाणार्या पोरीकडे चालत गेलो. तिच्या कानाला लागून म्हटलं की "आता तू गाऊ नको.. त्यालाच त्याचं कडवं तेवढं म्हणू दे.." मोगरा आणि पोरींचा ठराविक उग्र वास अशा त्या मिश्रणाला सोडून मी जागेवर परत आलो. येता येता त्या पोराला टोचून खूण करुन आलो. तो लगेचच पेटला आणि सुरु झाला.
तेवढं गाणं कसंतरी निस्तरलं. मग सोलो गाणी होती. त्यांचा बेसूरपणा धकवण्यासारखा होता. तीन चार गाण्यांनंतर एक कसलातरी विनोदी नाट्यप्रवेश होता. म्हणून आम्हाला बराच चांगला ब्रेक मिळाला. घामाघूम होऊन आम्ही स्टेजमागच्या क्लासमधे आलो.
मुळात उकाड्याचेच दिवस होते. पुन्हा मराठेला दिसणे हा एककलमी हेतू असल्यामुळे मी एक गिटारिस्टला शोभेल असं जाड जाकीट घातलं होतं. आदल्या दिवशी मी रात्री दोन अडीचपर्यंत ते जॅकेट घालूनच बसलो होतो. बंद खोलीत आरश्यासमोर ते जॅकेट घालून, हातात गिटार धरुन खूप उत्कट तोंडं करुन पाहिली होती. केस ब्रिलक्रीम लावून उभे केले होते. ओला लूक केसांना यायला हवा होता. मराठेला दुरुनही दिसायला हवं सर्व. दिसण्यावर बरंच काही असतंच.
रात्री गॅद्रिंग संपल्यावर मराठेसोबत तिच्या घरापर्यंत जायचं असं स्वप्न मी पाहून ठेवलं होतं. त्यावेळी तिच्याशी काय बोलायचं याचे पॉईंट्सही रात्री उजळत बसलो. त्यावेळी मी मोका बघून सरळसरळ प्रपोज मारणार होतो. नेमके शब्द मलाही माहीत नव्हते पण त्यावेळी सुचेल तसं बोलणार होतो. तिच्याशी ती वाक्यं बोलताना थोडा खर्ज आवाज लावण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी थोडीशी आधी एक सिगरेट ओढली तर आवाज जास्त भरदार येतो असं कळलं. पण त्या मधल्या वेळात सिगरेट ओढायला मिळेल याची खात्री नव्हती. मला सिगरेटची सवयही नव्हती. पण आवाजासाठी जमलं तर मी ते करणार होतो. मोका एकच होता..त्यासाठी काहीही..
मी स्टेजवर काळा चष्माही घालावा असं परांजप्याने सुचवलं होतं. पण मला रजनीकांत व्हायचं नव्हतं, म्हणून मी तेवढं नाही केलं. परांजप्या मात्र करुणानिधीसारखा त्याच्या बाबांचा गॉगल लावून आला होता.
क्लासरूममधे येऊन आधी ते जॅकेट काढलं. आत घामाने चिंब झालो होतो. ड्रमवाला बेडगीकर आत येऊन बसला. तो वैतागल्याचं चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. त्याला दादाबाबा करुन समजावलं. पुढच्या गाणार्या कँडिडेटला हात जोडून विनंती केली की बाबा, जी काय धरायची ती पट्टी धर, पण शेवटपर्यंत धरुन बस.
तेवढ्यात बाहेर टाळ्यांचा अखंड कडकडाट सुरु झाला. याचा अर्थ पोरांनी तो विनोदी प्रवेश धरुन आपटला होता. कार्यक्रम संपण्याआधीच अखंड टाळ्यांचा अर्थ "आता संपवा" असा होतो. ती प्रवेश करणारी मुलं उतरलेल्या तोंडाने आत आली आणि आम्ही स्टेजकडे पळालो.
त्यातच "ऑर्केस्ट्रा..ऑर्केस्ट्रा" अशा मागणीवजा आरोळ्या ऐकून आम्ही टेन्शनमुळे सर्वांगातून ठिबकलोच.
परांजप्या अचानक म्हणाला, "मला लागलीय.. मी जाऊन येतो..एवढं गाणं तू सांभाळ.."
त्याचा चेहरा आधीच झाल्यासारखा झाला होता.
माझी क्येसं पुन्हा उभी राहिली. परांजप्याला शिव्या घालत मी स्टेजवर चढलो.
मग भोकरे येऊन "ओ साथी रे" गायला लागला. त्यात एक बरं आहे. "ला ला ला.. ला ला ला ला ला.." अशा इण्ट्रोच्या मागे टणत्कारासारख्या कॉर्डच्या तारा वाजवल्या की भलता भारी इफेक्ट येतो. शिवाय गाणंही फार सेफ आहे. समोरची गर्दीही भावुक होऊन थोडी शांत राहते. याही गाण्याला वन्समोअर आलाच. भोकरे स्वाती पाटीलकडे पाहून गात होता. तो तिच्यासाठी गातोय हे माहीत असल्यामुळे सगळं कॉलेज तिच्याकडे वळून वळून पाहात होतं. स्वाती पाटीलने भोकरेला आधी क्लियर नाही म्हटलं होतं. ते इतर पब्लिकला जास्त पटवण्यासाठी एकदा सामुदायिक रक्षाबंधनात राखीही बांधली. त्या येड्यानेही बांधून घेतली आणि दुनियेला दाखवत तिर्गांव करत हिंडत होता बेण्या. आणि तरीही तिची पाठ सोडत नाही.
परांजप्या आलाच नाही. मराठेला माझी नजर सतत शोधत होती, पण ती दिसलीच नाही. उकाड्याने वेंगलो होतो. एकूण हैराण झालो होतो.
पुढचं गाणं होतं "ओंकारस्वरुपा, सद्गुरु समर्था.." हेबळे गाणार होती.
मला बर्याच गोष्टी पिडत होत्या. इथून निघून जावंसं वाटत होतं.
मराठे आली नव्हती..जाधवने धमक्या देऊन माझ्या मनात शेण कालवलं होतं..मला माझ्या गिटारचा आवाज ऐकू येत नव्हता..गायकाचे शब्द ऐकू येत नव्हते..प्रखर लाईट तोंडावर मारलेले असल्याने उष्णतेने कहर केला होता..समोर पब्लिक बेभान झालं होतं..पोरं चेकाळली होती..माझ्या स्वतःची इज्जत ठेवण्याच्या धडपडीने मी चिंबला गेलो होतो
मला लक्षात आलं की तुम्ही आडवे झालात की परिस्थिती तुमच्यावर चढतेच..भेंचोत..आधी तुम्ही आडवे कशाला पडता..?
मी लाज लज्जा भीड भाड शरम मर्यादा मुर्वत अब्रू हे सर्व सोडून गिटार खाली ठेवली... आधी जॅकेट काढून मागे फेकलं...परत गिटार हातात घेऊन वायर ओढत हेबळेच्या जवळ गेलो..
आता मला तिच्या सर्व ओळी नीट ऐकू येणार होत्या..
हेबळेला म्हटलं, "कर सुरु..बेस्ट्लक"
हेबळे मोठ्ठा श्वास सोडून हलकी हलकी हसली.
तीनदा "ओंकारस्वरुपा"चा गंभीर चढता नाद घुमला. हेबळेचा खर्जातला आवाजही अगदी बरोब्बर लागत होता. मी गिटारवर जबरी घुमावदार कॉर्ड छेडली. समोरचा जमाव एकदम शांत झाला. त्या शब्दांची आणि स्वरांची जादू अशी की कोणाला हुल्लडबाजी करताच येईना.
..आणि तेवढ्यात गर्दीत मला मराठेचा चेहरा दिसला..
माझ्या अंगावर थंड हवेची झुळूक आली..
ती खूप खूप सुंदर दिसत होती. तिने थोडा हात उंचावला.. माझ्याकडे बघून.. जास्त काही केलं असतं तर तिलाही छळायला सुरुवात केली असती. आमचं पब्लिक एकदम बाराचं आहे.
तिच्यावर छाप पाडण्यासाठी इतकावेळ घातलेलं जॅकेट आता अंगावर नव्हतं. आत असलेला टीशर्ट घामाने ओला झाल्यामुळे अंगाला चिकटला होता आणि त्यातून ते माझं सुप्रसिद्ध सुटलेलं पोट दिसत होतं.. ब्रिलक्रीमने उभे केलेले केस पिकल्या उसाचं पीक झोपतं तसे आडवे झाले होते..सगळी स्टाईल उतरली होती.
पण ज्यासाठी एवढा अट्टाहास केला ती गिटार मात्र आता तापली होती..बोटं लोण्यावरुन फिरावी तशी कॉर्ड बदलत होती.
मी जसा आहे तसा तिच्यासमोर उभा होतो. आणि फक्त सूर छेडत होतो.
ती माझ्याकडे बघून हसली....
"ओंकारस्वरुपा सद्गुरु समर्था.. अनाथांच्या नाथा..तुज नमो.."
...
"गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश"ला हेबळेने अफलातून आवाज लावला. आर्त पण चिरका न होणारा..समोरचे टर उडवायला उभे असलेले लोकही स्तब्ध झाले.
शेवटच्या "तुज नमो"ने गाणं संपलं. हेबळेच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सर्व प्रेक्षकांच्या गर्दीत किर्र शांतता झाली होती. सर्वजण भारावून गेले होते. जणू सर्वांचा श्वास रोखलेला..
मला जे हवं ते झालं होतं. आणि त्या शांत क्षणी अचानक "फाड्" करुन आवाज झाला. दचकून त्या दिशेला बघेपर्यंत फाडफाड फडाड् आवाजांची न थांबणारी मालिका सुरु झाली.
ताडपत्रीच्या खाली कोणीतरी फटाक्यांची माळ लपवली होती आणि आता गर्दीत ती शिलगावली होती. त्यावर बसलेल्या पोरी किंचाळत उठल्या. दोन श्वासांमधल्या अंतरात त्या शांत जागी तुडवातुडवीचा गदारोळ उठला.
जाधवाने डाळ नासली होती..तीही मोका साधून..
(टू बी कंटिन्यूड..)
प्रतिक्रिया
1 Apr 2011 - 4:24 pm | स्पा
अफाट ,तुफान, कडक, माइंड ब्लोईंग .......
परांजप्या मात्र करुणानिधीसारखा त्याच्या बाबांचा गॉगल लावून आला होता.
हा हा हा हा , लय भारी
पुढचा भाग लवकर लिहा
1 Apr 2011 - 4:27 pm | प्रास
या टायमालाबी नेहमीप्रमाणेच लय म्हणता लय भारी लिवलंय बगा......
मजा आलीये.....
येऊन्द्या फुढले भाग.....
1 Apr 2011 - 4:28 pm | मेघवेडा
आयला.. भारी!! विंट्रेष्टींग.. पुढे?
1 Apr 2011 - 4:30 pm | sneharani
मस्तच!! पुढे?
1 Apr 2011 - 4:33 pm | असुर
लैच स्पीड आहे की कथानकाला!! मस्तच गविभौ!!
--असुर
1 Apr 2011 - 4:39 pm | गणेशा
अप्रतिम ..
पुडील भाग कधी वाचतो आहे असे झाले आहे ..
1 Apr 2011 - 4:43 pm | प्यारे१
लय भारी.
हुच्च.
1 Apr 2011 - 4:47 pm | अभिज्ञ
क ड क....
अभिज्ञ.
2 Apr 2011 - 6:48 pm | प्रचेतस
सर्व प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभे राहतात.
गविंची गिटार मालिका आणि ५० फक्त यांची तुमचं आमचं या दोन जबराट मालिका चालू असल्याने आम्हा वाचकांना पर्वणीच.
2 Apr 2011 - 6:58 pm | योगेश सुदाम शिन्दे
तुमच लिखाण म्हणजे मेजवानीच बुवा !!!
2 Apr 2011 - 6:59 pm | रेवती
भन्नाट चाललिये मालिका.
वाचतिये.
2 Apr 2011 - 8:55 pm | इरसाल
पुढचा भाग कधी.
प्रत्येक भागाप्रमाणे हाही छान आणि उत्कंठावर्धक.
2 Apr 2011 - 9:18 pm | पिंगू
>>> जाधवाने डाळ नासली होती..तीही मोका साधून..
च्यामारी प्रत्येक लव्हस्टोरीत व्हिलन हा असतोच.. बाकी जाधवचं पुढे काय घातलं.. हे वाचायला आतुर आहे.
- पिंगू
3 Apr 2011 - 9:10 am | ५० फक्त
पुन्हा एकदा अतिशय कडक सलाम तुम्हाला गवि.
आता पुन्हा आलो की भेटतोच तुम्हाला, १० का वाजेनात रात्रिचे.
3 Apr 2011 - 12:49 pm | मनिष
भन्नाट! वाचतो आहेच! :-)
3 Apr 2011 - 4:45 pm | सौप्र
सगळे भाग एकदमच वाचून काढले... मस्त लिहित आहात गवि. मजा येत आहे.
3 Apr 2011 - 11:36 pm | शिल्पा ब
मस्त.
5 Apr 2011 - 1:13 am | आनंदयात्री
बेष्ट. आता हिरोच्या साईडने पण काही घडतय हे वाचुन मस्त वाटले.
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक ..
-
(हागरा)
आंद्या
5 Apr 2011 - 9:21 am | भडकमकर मास्तर
ये ब्बात..मस्त
5 Apr 2011 - 9:51 am | प्रीत-मोहर
पुढे?