एक उत्कृष्ट वचन आहे: आपण खड्ड्यात आहोत असं लक्षात आलं तर काय कराल?....आधी खणणं थांबवा..
तेव्हा बोअर मारल्यास वाचन बिंधास थांबवावे.
बाकी डिस्क्लेमर तेच जुने..शिव्या..म्हशीचं शेण वगैरे..
होप यू एन्जॉय..
...............................
जरी मराठे त्या दिवशी फिरायला आली तरी तिने क्लियर हो असं म्हटलं नव्हतं.
मला मात्र तिच्यात इंटरेस्ट आहे हे तिला सांगून टाकून भडबुंज्याच्या कढईतून टाणकन बाहेर उडालेल्या लाहीसारखं हलकंही वाटत होतं आणि सुटल्यासारखंही.
गिटार शिकायची असं मी ठरवलं ते मराठेवर छाप पाडायलाच. परांजप्याचा एक मित्र त्याच्या घरी गिटार घेऊन आला होता आणि "जादू तेरी नजर" वाजवत होता. मी एव्हढा फिदा झालो की तिथेच त्याच्या गिटारच्या सरांचा पत्ता घेतला. मी काहीही करायचं ठरवलं की परांजप्या पण त्यात पडणारच, आणि त्यानं काहीतरी नवीन डोक्यात घेतलं की मीही त्यात जायचोच. म्हणून मग परांजप्याही दुस-याच दिवशी माझ्या ल्युनावर डबलसीट आला गिटार मास्तरांकडे.
गिटार मास्तर पार गावाबाहेर घर घालून बसला होता. तिथे सगळी नवीन वस्ती आणि शेताडी. पावसाचे दिवस होते त्यामुळे शेताडीतला चिखल ल्युनाच्या चाकात जाउन ल्युना जागीच पॅक झाली.
आयमायवरून शिव्या देत मी आणि परांजप्या उभे होतो. तेवढ्यात उसाची गच्च भरलेली बैलगाडी आली. तिच्यात बसून एक पागोटंवाले दादा बैलांच्या ढुंगणात लाथा घालत होते. पागोट्याला रामराम घालून मी त्यांचं खुरपं घेतलं आणि ल्युनाच्या चाकातली राड कोरायला लागलो.
परांजप्या येडझवा मला कामात हात लावण्याचं सोडून तिथे बैलाची शेपूट धरायला बघत उभा होता. त्याच्या पायातच आत्ता बैलाने शेण टाकावं अशी मी फार मनापासून इच्छा केली आणि ती चक्क फळली. परांजप्या उडी मारून पळाला. नंतर काम झाल्यावर बैलगाडी निघून जाता जाता आम्ही एकेक उसाचं कांड पकडून ठेवलं. ते आपोआप हातात येतंच.
ऊस चावून झाल्यावर आम्ही पुढून मागून ल्यूना उचलली आणि चिखलाचा रस्ता संपेपर्यंत तशीच घेऊन गेलो. मग शेवटी गिटार मास्तरचं घर आलं.
गिटारचे सर म्हणजे ऑर्केस्ट्रात वाजवणारा चाळीशीतला बाप्यामाणूस होता. त्याच्या घरात एसटीडी बूथ, झेरॉक्स, स्टिरिओ भाड्याने मिळेल, व्ही.सी.आर. भाड्याने मिळेल वगैरे सतरा धंद्यांचं लोणचं घातलेलं होतं. त्याच्याकडे पाचसहा वेगवेगळ्या प्रकारच्या गिटारी होत्या. एक इलेक्ट्रिक गिटारपण होती. आणि एक १२ तारी गिटार. मी आणि परांजप्या बरेच इम्प्रेस झालो. महिन्याची फी दोनशे रुपये भरून आलो. आठवड्यातून दोनदा क्लास.
एक दोन आठवडे नुसती बोटं तारांवर बसवण्याची कसरत झाली आणि मग जरा जोश यावा म्हणून सरांनी नीले नीले अंबरपे हे पहिलं गाणं शिकावायला घेतलं.
त्यानंतर मग मी घरी बराच वाद घालून एक गिटार घेतलीच. अर्थात परांजप्यानेही घेतली हे सांगायला नकोच. ऑर्केस्ट्राच्या सामानासोबत खास मुंबईहून मागवलेली. गिव्हसनचं एफ कट साधंच मॉडेल होतं. ते कव्हरमध्ये घालून खांद्याला लावून मी जिथे तिथे जायला लागलो.
मराठेसमोर अजून गिटार घेऊन गेलो नव्हतो.. भीती होती लाज जाण्याची. म्हणजे ती जर म्हणाली की वाजवून दाखव, तर? वाजवता कोणाला येत होती? मी तिच्यासमोर गिटार घेऊन जाण्यासाठी खूप खास मोका येण्याची वाट बघत होतो. मला दिवसाच स्वप्नं पडायची की मराठेची बर्थडे पार्टी आहे आणि मी आमीर खानसारखं जॅकेट घालून "पापा केहते है" म्हणत म्हणत वाजवतोय आणि डान्सही करतोय. मग त्याच पार्टीत दिल सिनेमातल्या पार्टीसारखी बियर वाहतेय. बियर मी अजून कधीच घेतली नव्हती. कोणाच्याही पार्टीतही कधी गेलोच नव्हतो. आणि कुठेही नाचण्याच्या नावाने मला धडकी भरायची. तरीही स्वप्नात मात्र तिन्ही गोष्टी हजेरी लावून होत्या. मला वाटतं आपण जसे नाही तसलीच येडझवी स्वप्नं आपल्याला पडतात. एकाच माणसात दोन इतकी वेगवेगळी माणसं कोंबून देवाला काय आनंद मिळतो कोण जाणे.
खास मोक्याची वेळ बघण्याची सवय मला शाळेतच लागली. पाचवीत आमच्या शाळेत एका बेंचवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी भन्नाट स्कीम हेडसरांनी काढली होती. आणि तेव्हा माझं नशीब गांडू नसल्यामुळे वर्गातली सर्वात मस्त मुलगी माझ्या बेंचवर आली होती. पाचवीचं वर्षं खूप छान गेलं. तिनं मला तिचं खोडरबर दिलं. असं सगळं शांतीमध्ये चालू असताना सहावीत परत जागा बदलल्या. त्यावेळी वर्गात डावरे म्हणून पोरगा माझा शत्रू बनला, कारण ती सहावीत त्याच्या शेजारी बसायला गेली होती ते मला अजिबात आवडलं नव्हतं. माझ्या बाजूला चक्क थुंकणारी एक काळी हम्मा मुलगी आली.
मग सातवीत ती हिरॉईन "वडिलांची बदली" अशा नेहमीच्या दुर्धर आजाराने माझ्यापासून दूर निघून गेली. चांगले दिवस संपतात हा धडा घेईघेईपर्यंत पुन्हा मोका आला. आमच्या शाळेच्या ट्रिपसोबत आम्ही तिच्याच नवीन गावी गेलो आणि ती आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटायला एक दिवस आमच्यात आली. माझ्याकडे फक्त एकच फुलपँट होती. बाकी सगळ्या हाप्पँट. आणि मी ती एकुलती फुलपँट ट्रिपचे पहिले दोन दिवस ऑलरेडी वापरली, पोरींवर स्टाईल मारली, आणि ज्या दिवशी ट्रिपमध्ये ती आमच्याबरोबर येणार त्या दिवशी मात्र हाप्पँट घालून बसमध्ये बसलो. डावरे मात्र त्याच दिवशी बरोब्बर फुलपँट घालून तयार होता. नंतर मला खिजवत म्हणाला, "घातली की नाय बरोब्बर वेळी फुलपँट..?"
तेव्हापासून मी स्टाईलसुद्धा मोका बघून मारायची हे शिकलो.
गिटारवर लीड वाजवणं मला जमत नाहीये हे माझ्या लवकरच लक्षात आलं. मग कॉर्डसवर लक्ष लावून धरलं. बरंच झापडिंग केल्यावर मला गिटारच्या कॉर्ड धरून गाणी म्हणता यायला लागली. सी एफ आणि जी अशा तीनच कॉर्डमध्ये बसणारी गाणी शोधून काढली आणि तोंडाने गाऊन साथीला गिटारवर सूर धरायचा असं चालू केलं. नशिबाने अशी गाणी आपल्या हिंदी पिक्चरमधे खूप असतात. नंतर वाजवून वाजवून हात बसला तशा मायनर आणि शार्प कॉर्ड शिकलो. मग मात्र बरीच गाणी त्यात बसायला लागली.
जाधवपेक्षा जितक्या बाबतीत वर चढता येईल तितकं चढायला हवं होतं. काही नाही तर त्याला माझ्यावर चढू द्यायचा नव्हता. कराटे आणि आता गिटार. अजूनही जी काय पडेल ती शाटमारी करुन झळकायला हवंच होतं.
पाऊस संपल्यामुळे आता शेतात राड होत नव्हती आणि त्यामुळे गिटारसरांकडे जायला घाण वाटत नव्हती. मी आणि परांजप्या गॅद्रिंगची वाट बघत होतो. आमच्या कॉलेजात गेल्याच वर्षी हे स्नेहसंमेलन सुरु झालेलं होतं. मधे चारपाच वर्षं कॉलेजात कसल्याही करमणुकीचं नावही नव्हतं. कारण त्यापूर्वी झालेल्या शेवटच्या गॅद्रिंगला चाकू तलवारी घेऊन मारामार्या झाल्या होत्या. मेन कारण पोरी. पाप्या पाटील विरुद्ध संत्या शेडबाळे गँगमधे जाम राडे झाले होते. पाप्या पाटील सात आठ वर्षं कॉलेजातच आहे. तो नेहमी सायकल स्टँडवरच असतो. कोणी कोणी म्हणतात की तो ड्रॉप औट आहे आणि असाच येऊन बसतो. कोणाला वाटतं की नापास होऊन होऊन तो अजून कॉलेजच्या रोलवर आहे. त्याचे बाबा आमदार आहेत. त्याला काडीपण हलवायची गरज नाही. पण त्याला प्रत्यक्ष रक्कस करताना मी कधीच बघितलं नाही. उलट तो एकदम शांत असतो. माझ्याकडे बघून कधीकधी इमानदारीत हसतो पण. तरीसुद्धा जाधवचे त्याच्याशी चांगले संबंध असल्यामुळे पाप्याच्या हसण्यातही मला राडा दिसतो.
जाधव मात्र वेळ जात नाही म्हणून म्हणून सगळीकडेच काड्या करत बसतो भिकारचोट. आणि या वेळच्या गॅद्रिंगमधे आम्ही गिटार वाजवायची ठरवली तर तो नक्की हगणार हे आम्हाला माहीत होतं. पण रिस्क घ्यायला हवीच होती. मराठेसमोर येऊन गिटार वाजवण्याचा हा शेवटचा मोका होता. पुढच्या वर्षी मराठे कुठल्या कॉलेजला जाईल कोण जाणे. नक्कीच मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला जाईल. मग आम्ही बसू तारा खाजवत.
.........
टू बी कंटिन्युड..
(तळटीपः हा दास्तान ए आवारगीचा सिक्वेल आहे.)
प्रतिक्रिया
21 Mar 2011 - 9:11 pm | प्राजु
पुढे काय झालं?
'शाळा' ची आठवण येतेय.
21 Mar 2011 - 9:22 pm | गणेशा
नेहमी प्रमाणे छान लेखन ..
येवुद्या पुढील भाग ...
भाषेतील शिव्या तर आमच्या गावाकडीलच वाटत आहेत डिट्टो
अवांतर : शाळा संपुन केंव्हाच दुनियादारी सुरु झालेली आहे ...
21 Mar 2011 - 11:46 pm | निनाद मुक्काम प...
+१
अवांतर : शाळा संपुन केंव्हाच दुनियादारी सुरु झालेली आहे ...
पु ले शु
21 Mar 2011 - 9:35 pm | पैसा
पुढे काय झालं?
21 Mar 2011 - 9:48 pm | रेवती
पुढचे लेखन मोका साधून येइलच अशी खात्री आहे.;)
21 Mar 2011 - 10:52 pm | इरसाल
झक्कास...................
21 Mar 2011 - 11:11 pm | प्रास
छान सुरुवात......
पुढच्या भागांची वाट बघतोय......
(गिटार शिकायचीच, असं अनेकदा ठरवणारा)
21 Mar 2011 - 11:37 pm | आनंदयात्री
मस्त !! पुढचा भाग लवकर !!
22 Mar 2011 - 2:06 am | शिल्पा ब
लै भारी..
22 Mar 2011 - 5:21 am | नगरीनिरंजन
झक्कास! जबरदस्त वातावरण निर्मिती करण्यात तुमचा हातखंडा आहे.
-(गिटार घेऊन भ्रमनिरास झाल्याने विकून टाकणारा) वादनबिगारी
22 Mar 2011 - 10:14 am | हरिप्रिया_
मस्त !!!
22 Mar 2011 - 10:28 am | मृत्युन्जय
च्यायला गवि क्रमशः ची लागण झाली तुम्हालापण. साले सगळे चांगले लिहिणारे क्रमशः का लिहितात? :)
छानच लिहिले आहे . पुढच्या आणि अंतिम भागाच्या प्रतिक्षेत.
22 Mar 2011 - 10:39 am | sneharani
मस्त!! पुढे?
22 Mar 2011 - 10:47 am | पिलीयन रायडर
आधि सगळ वाचला ,मग वर जाउन लेखक कोण ते पाहिल... मग लग्गेच समजला कि इतका का आवडल....
तुमचा तो पायलट लोकान्च्या मानसिकतेवर लिहिलेला लेख वाचुन मी इथे सदस्य झाले...
तुह्मी फार भारी लिहीता............
22 Mar 2011 - 12:21 pm | नन्दादीप
मस्त...!!!!
पुढे....??????????????? पु.भा.ल.टा.
22 Mar 2011 - 2:45 pm | वपाडाव
मला 'शिरोडकर' आठवली, अन तिच्या विचारांनी मी अंमळ हळवा झालो.....
- (प्रेमात गुरफटलेला) जोशी.
22 Mar 2011 - 2:56 pm | मेघवेडा
वा वा! झकास लेखन हो गवि! पुढला भाग लौकर येवू द्या!
22 Mar 2011 - 3:41 pm | VINODBANKHELE
मस्त खाजवलं,
आपलं लिहीलयं.
मज्जा.............
22 Mar 2011 - 6:46 pm | अभिज्ञ
झक्कास.
वाचतोय.
अभिज्ञ.
अवांतर : ते क्रमशः टाकणे बंद करा.
22 Mar 2011 - 11:13 pm | ५० फक्त
मी माझ्या मराठे बरोबर पेटी शिकायला जायचो आणि भुप रागात नी वाजवायचो, तिचं नावच निर्मला होतं म्हणुन. जाधव सराकडच्या लई आठवणी जागा केल्या गवि तुम्ही. आज फोन करेन माझ्या पोराच्या निर्मलाआत्येला.
लई भारी सुरुवात, पुढचा भाग लवकर टाका.
23 Mar 2011 - 7:28 am | विंजिनेर
लयच भारी गवि! फुडच्या भागांची वाट बघतोय. मराठे विंप्रेस होते का नाय त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
ह्याचा दुवा कुटं हाये?
आणि जाधव कोण?
23 Mar 2011 - 8:20 am | प्रीत-मोहर
गवि मस्तच!!!
पुभालटा ...
23 Mar 2011 - 10:24 am | पियुशा
छान सुरुवात !
येउ द्या पटापट
:)
23 Mar 2011 - 3:24 pm | मनीषा
interesting दास्तान ..
24 Mar 2011 - 1:13 am | भडकमकर मास्तर
जाधव अचानक घुसला काय?
भारी आहे लेखन..
वाचतोय..
लवकर टाका पुढचा भाग
24 Mar 2011 - 10:37 am | खादाड अमिता
खूपच छान.. वाचता वाचता हसू आवरत नव्हतं! आणि पेशल शब्द 'हगणार', 'भिकारचोट', 'शाटमारी' वाचून तर आणि मजा आली!
24 Mar 2011 - 10:59 am | नि३
मस्त रे!!! पुढचा भाग लवकर टाकावा ही विनंती.
24 Mar 2011 - 12:23 pm | llपुण्याचे पेशवेll
छान. वाचतो आहे.
24 Mar 2011 - 12:47 pm | स्पंदना
तार लागली की लेखाचा अंत का होतो?
ठिक आहे आमची तार ताणुन ताणुन तुटण्या पुर्वी पुढचा भाग टाका?