फंडा फायबरचा

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
1 Apr 2011 - 1:39 pm

फ्रूट ज्यूसपेक्षा फळ खावं, ब्रेडपेक्षा पोळी खावी इ. आहारातले फायबर वाढवण्यासाठीच्या सूचना आपण ऐकतो किंवा वाचतो. बिस्किटं, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स असे बरेच मल्टी ग्रेन आणि हाय फायबर प्रोडक्टदेखील आज सर्रास मिळतात. पण हे फायबर नक्की काय असतं? आपल्या आहारात त्याचे काय महत्त्व आहे? कुठले पदार्थ मुळात फायबर रीच असतात?
आहारातले फायबर आपल्याला वनस्पतीतून मिळते. फायबर म्हणजे अन्नातला असा पदार्थ, जो शरीरात शोषून घेतला जात नाही किंवा जो पचनक्रियेतून जात नाही. त्याचे मुळात दोन प्रकार असतात सोल्युबल किंवा विद्राव्य आणि इन्सोल्युबल किंवा अद्राव्य. दोन्ही प्रकारचे फायबर आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून ते मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा बर्‍याच विकारांपासून आपले संरक्षण करतात.

सोल्युबल फायबर
हे शरीरातल्या पाण्याला शोषून घेऊन एक मऊ गोळा बनतं. त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. यांनी आहारातल्या कॅलरी कमी करायला मदत होते आणि मेदोवृद्धी कमी होते. या फायबरमुळे शरीरातले इन्सुलिन कमी वेळात जास्त ग्लुकोज रक्तपेशींपर्यंत पोचवू शकते. तसेच कोलेस्टेरॉल पण कमी शोषले जाते. स्रोत: डाळी आणि कडधान्य, ओट्स, अक्रोड, खारीक, सफरचंद, पेर, जांभूळ, संत्रे, गाजर, काकडी, कोबी इ.

इन्सोल्युबल फायबर
या प्रकारचे फायबर आहारातले रफेज किंवा बल्क वाढवते. शरीरात जाणार्‍या अन्नाचा ऐवज वाढवून हे फायबर पचनक्रियेची गती वाढवतं. याचा मुख्य फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेवर हा एकमात्र उपाय आहे. इसबगोलमध्ये पण याच फायबरचे प्रमाण खूप असते (पण जर रोज इसबगोल घेतलं तर अन्नातले बाकी पोषण पण मिळत नाही). दुसरा फायदा म्हणजे ज्या पदार्थांमध्ये इन्सोल्युबल फायबर जास्त असते त्यात कॅलरी पण तुलनेत कमी असतात (जर त्या पदार्थाच्या कृतीत तळणे, खूप मोहन घालणे किंवा गोड पदार्थ नसेल तर!). त्यामुळे कमी कॅलरी खाऊन पण भरपूर जेवल्यासारखं वाटतं. स्रोत: सर्व असोल्या भाज्या (सालं न काढलेल्या उदा. काकडी, बटाटा, गाजर, बीट) व फळे, कडधान्य, कंदमूळ, गहू, लाल तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इ.

आपल्या आहारात रोज २५-३० ग्रॅम फायबर असले पाहिजे. आहारातले फायबर वाढवले की त्याच बरोबर खूप पाणी पण प्यायला पाहिजे नाहीतर पोटात अन्न कोरडे पडून परत बद्धकोष्ठता होईल. आता २५ ग्रॅम फायबर म्हणजे नक्की काय खायचे? साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं. आहारातले फायबर अचानक वाढवले तर अतिवात पण होऊ शकतो. कायम लक्षात ठेवा, आहारात अचानक कुठला पण टोकाचा बदल केलात तर त्रास होतो. नेहमी हळूहळू पोषण वाढवा.

जीवनमानराहणीविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

गवि's picture

1 Apr 2011 - 1:49 pm | गवि

चांगली माहिती..

गणेशा's picture

1 Apr 2011 - 2:06 pm | गणेशा

असेच बोलतो

जाहिरातीत जाड्या बायकांना , फायबर युक्त मारीची भिस्कुटे खाऊन टणाटण उद्या मारताना पाहून, डोळे अमळ पाणावल्या गेल्या होते

प्रचेतस's picture

1 Apr 2011 - 2:06 pm | प्रचेतस

डोळे पाणावले जाउन अंमळ खोबणीतूनच बाहेर यायचे बाकी राहिल्या होते.

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 2:12 pm | वपाडाव

साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं.

हे कुठं मिळतं ?
बाकी, आम्ही नायलॉन/रेक्झिन का काय (जे काय असेल ते) हे वाचायच्या तयारीने उतरलो होतो...

विंजिनेर's picture

1 Apr 2011 - 2:17 pm | विंजिनेर

येस्स. फायबर आहारात मस्टच असतो!

५० फक्त's picture

1 Apr 2011 - 2:17 pm | ५० फक्त

अतिशय धन्यवाद, एक किचकट गोष्ट अतिशय सहज सोपि करुन सांगितल्याबद्द्ल.

मराठमोळा's picture

1 Apr 2011 - 2:19 pm | मराठमोळा

चांगली माहिती..

थोडेसे अवांतरः
पण प्रत्यक्ष आहारविषयक सुत्रे आयुष्यात आणणे नेहमीच कठीण होऊन बसते.
आपल्या टीपिकल महाराष्ट्रीयन जेवणात आहाराचे नेमके संतुलन साधले गेले आहे असे मला नेहमी वाटते. म्हणजे पोळी भाजी, लोणचे, पापड, कोशिंबीर, थोडासा वरण भात, वर तूप. मट्ठा. एखादा गोड पदार्थ.

आहाराबरोबरच थोडेसे शारिरिक श्रम सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे म्हणा. ;)

प्रचेतस's picture

1 Apr 2011 - 2:30 pm | प्रचेतस

सहमत आहे.

डाळींमध्ये फायबर असते ही नविनच माहिती समजली. डाळींमध्ये नुसती प्रथिने असतात असे आधी माहित होते.

मागे एकदा डायेट करून बघितले होते. सुरुवातीला डीटॉक्स डायट केले होते. ३ दिवसांत २ किलोने वजन कमी झाले होते. पण नंतर परत कधी डीटॉक्स करायचा धीर झाला नाही. प्रचंड बंधने येतात.

आपल्या टीपिकल महाराष्ट्रीयन जेवणात आहाराचे नेमके संतुलन साधले गेले आहे

+ १००

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त.
अवघड माहिती सोप्या शब्दात.

ते चिझ चिली टोस्ट कधी खायला येऊ ? ;)

गवि's picture

1 Apr 2011 - 2:35 pm | गवि

मी पुन्हा सुरमई तुकडी अनलिमिटेड खायला कधी येऊ?

(त्यात फायबर असोत किंवा नसोत. तुमच्या हातची बनते अफलातून टेस्टी..)

सोबत नुस्ता भात टाकला तरी चालेल.. :)

आम्ही अरबट चरबट खाणारी माणसे.
असे काही माहिती प्रधान लेख आले की सुटलेल्या पोटाची काळजी अधिक वाढते आणि टेंशनमध्ये खा खा सुटते.
:(

असुर's picture

1 Apr 2011 - 3:56 pm | असुर

+१
गणपाशी बाडीस!
गणपा, अरे एखादी फायबरयुक्त चमचमीत पाकृ काढ की शोधून!!!
पण लेखातली माहीतीदेखील स्पष्ट आणि सोपी असल्याने गणपा काही शोध लावेपर्यंत फायबरयुक्त बिस्किटं खाईन म्हणतो!

--असुर

मुलूखावेगळी's picture

1 Apr 2011 - 3:45 pm | मुलूखावेगळी

अमिता,
तु चांगली माहिती दिलीस.
पन ह्यात सर्व डाळी आनि कडधान्य येत नसावीत असे वाटते.
आनि डाळी आनि कडधान्य ह्यांचा इन्टेक रात्री नसावा असे ऐकलेय. तु जास्त योग्य सांगशीलच.
ओट्सच्या रेसिपीज टाक ना जमल्यास.

शुद्लेखनाच्या चुका नस्ल्याने हा (^^^) प्रतिसाद फाट्यावर मार्न्यात येत आहे....

खादाड अमिता's picture

8 Apr 2011 - 3:45 pm | खादाड अमिता

डाळी आणि कडधान्य ह्यात साधारण ५-१० ग्राम (प्रती १०० गरम) असे dietary fibre असते. ज्यांची वात प्रकृती असते त्यांनी रात्री कडधान्य खाणे टाळावे. ओट्स च्या पाक्रु पण टाकेन.

धन्यवाद.

"वात प्रकृति", एखादा पदार्थ तब्येतीला "थंड" किंवा "उष्ण" पडणे, वगैरे गोष्टी नवीन मेडिकल सायन्स मानत नाही असे ऐकले होते.

कृपया टिप्पणी द्यावी..

-(अ‍ॅलोपॅथीभक्त) गवि.

एखादा पदार्थ तब्येतीला "थंड" किंवा "उष्ण" पडणे, वगैरे गोष्टी नवीन मेडिकल सायन्स मानत नाही असे ऐकले होते.- हे बरोबर ऐक्ले आहे.

पण एखादा पदार्थ flatulent असू शकतो हे वेस्टर्न मेडिकल सायन्स पण सांगतं.

गवि's picture

8 Apr 2011 - 4:23 pm | गवि

पटले.. धन्यवाद..

आत्मशून्य's picture

3 Apr 2011 - 2:22 am | आत्मशून्य

.

मदनबाण's picture

3 Apr 2011 - 7:56 am | मदनबाण

चांगली माहिती,असेच अजुन येउ दे. :)

विनायक बेलापुरे's picture

3 Apr 2011 - 1:04 pm | विनायक बेलापुरे

चांगली माहिती .

विषय फायबरची होडी, फायबरचा गणपती, फायबरचे कारंजे तसा फायबरची एखादी पाकृ असेल असा समज झाला होता.

( महागाइ काय वाढलीये ... पर्याय शोधतोय तोंडी लावायला. )

पंगा's picture

3 Apr 2011 - 2:10 pm | पंगा

आपण काचसुद्धा खाता?

विनायक बेलापुरे's picture

4 Apr 2011 - 12:54 am | विनायक बेलापुरे

अद्याप ट्राय नाही केली, भातातले दगडच खातोय अजुन... ;)

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2011 - 9:18 pm | पिवळा डांबिस

नाय म्हंजे फायबर पायजेच आहारांत, त्यात काय वाद नाय...
पन,
साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं.
म्हंजे चार जनांच्या फॅमिलीला (हां, आमी त्ये कुटुंबनियोजन पाळलंय!!!) रोजच्याला दीड ते दोन किलो भाजी आनि १०-१२ फळं?
कसं परवडायचं हो? कोन खातो आसं ह्ये?
मिपावर हाय का कोनी?:(
जरा गायडन्स करा की....

खादाड अमिता's picture

8 Apr 2011 - 3:54 pm | खादाड अमिता

जर तुम्ही:

ब्रेकफास्ट ला: १.५ वाटी उपमा (कांदा टोमाटो घालून) + १ फळ

जेवणात: १ वाटी भाजी (बटाटा नाही), १ वाटी पालेभाजी, १ वाटी कोशिंबीर व सोबत पोळ्या (हा आपला पारंपारिक मराठी आहार आहे, बरोबर?)

संध्याकाळी: १ व्हेजिटेबल sandwich

रात्री च्या जेवणात: १ वाटी भाजी, १ वाटी कोशिंबीर आणि आमटी भात व पोळी
जेवणा नंतर: १ फळ

असा खाल्लं तर? झालं न ४०० ग्राम भाजी आणि दोन फळं शिवाय पोळी आमटी भात?
तुमचा प्रश्न साहजिक आहे, कारण आपल्या पैकी बहुतांश लोक कोशिंबीर रोज खात नसतील. पाले भाजी चा तर मग प्रश्नच उद्भवत नाही! :)

भाजी आमटीच्या वाटीतली वाटी केवढी?
रोज दोन भाज्या काही खाणं होत नाही.
कोशिंबीर नियमीत पण एक भाजी (पाला किंवा फळ) असेच करणे होते.
केले तरी खाणार कोण? त्यावर उपाय म्हणून एक दिवस पालेभाजी तर एक दिवस फळभाजी हा प्रकार मानवण्याजोगा आहे.

खादाड अमिता's picture

10 Apr 2011 - 4:07 pm | खादाड अमिता

१ वाटी = १५० मिली लिटर

रेवती's picture

10 Apr 2011 - 9:05 pm | रेवती

धन्यवाद!

चांगली माहिती.

(पिवळा डांबीस यांच्यासारखेच म्हणतो) ते जरा प्रमाणांचे बघा ना.

थोडे रासायनिक वर्णन अधिक करून :
सोल्युबल फायबरचे पचन लहान आतड्यात होत नाही, पण मोठ्या आतड्यातील जीवजंतू त्याचे पचन पुष्कळ प्रमाणात करतात.
इनसोल्युबल फायबरचे पचन लहान आतड्यात तर होतच नाही, मोठ्या आतड्यातही फारसे होत नाही.

इसबगोलात इनसोल्युबल फायबर खूप आहे हे खरेच. पण सोल्युबल फायबरही मोठ्या प्रमाणात आहे.

जागु's picture

8 Apr 2011 - 4:22 pm | जागु

खुपच छान माहीती.