मी ३३ वर्षे बैंकेची चाकरी केल्यानंतर आपण इतर ही काही समाजाभिमुख करावयास हवे असे मनात आले आणि नोकरीचा राजिनामा दिला. कौटुंबिक कारणामुळे मुळचे अमरावती गाव सोडुन पुण्यास स्थाईक झालो. ते वर्ष होते एप्रील २००८. पुणे खरोखरच बौध्दिक दृष्ट्या खुपच पुढे तर आहेच इथली माणसे ही जिवंत वाटतात खर्या अर्थाने. आमच्या निवृत्त कर्मचार्यांच्या संघटनेने श्री सुनिल देवधर यांचे व्याख्यान ठेवले होते. सलग दोन दिवस आणि विषय होता ईशान्य भारतातील आव्हाने. हा भाग तेंव्हा मला पुर्णतः अनभिज्ञ होता आणि अर्थातच तेथील समस्या देखील. सुनिल देवधरांच्या भाषणादरम्यन मी मंत्रमुग्ध झालो आणि नकळत त्या वातावरणाशी जोडला गेलो. सुनिल देवधरजी १६ वर्षे तिथे राहिले त्यांचा अभ्यास व अनुभव दांडगा तर आहेच पण आपण ही आपला खारीचा वाटा द्यावा हे मनाशी निश्चीत झाले.
सौ. पुनमताई मेहता ह्या पुर्वांचल विभागाच्या प्रमुख संपर्क अधिकारी. त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार रत्नागिरी ला नागालैंड विद्यार्थी वस्तिगृहा ला एक महिना राहिलो. उद्देश हा की त्यांच्याशी व तेथील वातावरणाशी जवळीक निर्माण व्हावी. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असा होता. तेथेच श्री सुनिल मुळे या कार्यकर्त्याशी ओळख झाली. रत्नागिरीतील संघाचा कुठलाही कार्यक्रम असो सुनिल मुळे त्यात हवाच. रत्नागिरीतील प्रत्येक कुटुंबाशी त्याचे स्वयंपाक घरापर्यंत नाते. तिथे मिळालेला आपलेपणा व तेथील लोकांशी झालेलला परिचय हा माझ्या आयुष्यातील एक अमुल्य ठेवा आहे. जवळच होउ घातलेला गोळवली प्रकल्प म्हणजे गुरुजींना वाहिलेली रत्नागिरीकराची आदरांजलीच . तेथे अमरावती चे देशपांडे दांपत्य आपली सेवा देत आहेत. सुनिल मुळेंनी माझी ओळ्ख ॠषी तुल्य जोग दांपत्यांशी करुन दिली. मी नागालैंड ला जात आहे हे कळताच मला जोग काकुंनी पोटभर नाष्टा तर अगत्याने दिलाच पण त्यांचे देखील नगालैंड भेटिचे अनुभव सांगीतले. त्यांचा मुलगा अतुल जोग हा वनवासी कल्याण आश्रमचा पुर्वांचलाचा प्रमुख आहे.
रत्नागिरीच्या अनुभवानंतर नागालैंड ला जाणे निश्चीत झाले. पण अडथळे आले नाहित तर ते कार्य कसले. काही कारणाने नागालैड च्या दिमापुर ला जाणे मला अर्ध्यातच सोडुन नागपुर ला थांबणे भाग पडले. पण मनाशी निश्चय झाला होता. दरम्यान शिलौंग ला सेवा भारती चे काम पहाणारे श्री प्रशांत महामुनी यांच्याशि संपर्क झाला व त्यांनी मला शिलांग ला येण्याचे सुचविले. त्यानुसार २५ एप्रिल २००९ रोजी मी नागपुर ते गुवाहाटी प्लाईट ने गुवाहाटी ला पोचलो.
गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे. दक्षाने शिवपत्नीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने केलेले आत्मदहन व त्यातुन क्रोधित झालेल्या शंकराने हाती सतीचे शव घेउन केलेले तांडव नृत्य पाहुन पृथ्वी भयभीत झाली. विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले ती एकावन्न स्थाने शक्तीपीठे म्हणुन् भारताच्या चारी दिशांना पसरलेली आहेत. गुवाहाटीतील 'कामाख्या'(कामाक्षी) देवीचे मंदीर हे त्यापैकीच एक आहे. कामाख्या देवी चे दर्शन घेउन मी मला माझ्या कार्यात यश देण्याची मनोभावे प्रार्थना केली.
गोहाटि विमानतळावर उतरल्यावर जाणवली ती तेथील् दमट हवा. ब्रम्हपूत्र नद म्हणजे समुद्र्च त्याचा हा परिणाम. गोहाटि ची लोकसंख्या २००१ च्या शिरगणतीनुसार ८ लाख होती. गोहाटी हे शहर इ.स. पुर्वी ६ व्या शतकात अस्तीत्वात असल्याचे येथील पुरातत्व विभागाच्या उत्खननातुन निष्पन्न् झाले आहे. कामरुप राजवटीत गोहाटी हे राजधानी चे शहर होते. या शहराला महाभारत कालीन संन्दर्भ देखील आहेत. महाभारतातील नरक आणि भागदत्त राजांच्या राजधानिचे हे शहर, १२-१५ व्या शतकात कामता राजाच्या नाशानंतर या शहराच्या वैभवाला उतरती कळा लागली. कामाख्या देवीचे प्रसिध्द् शक्ती पीठ, नवग्रह मंदिर् आणी बसीस्ता येथील ऐतिहासीक अवशेष या शहराच्या गत वैभवाचे साक्षीदार् आहेत.
टैक्सीने गुवाहाटी ते शिलाँग हा प्रवास ४ तासाचा. शिलांग ला जाण्यासाठी आपल्याला दक्षीणे कडे जावे लागते. तसे ईशान्य भारतातील कुठ्ल्याहि राज्यात जाण्यासाठी गोहाटि ला यावेच लागते. परस्पर् एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायला मार्गच नाही इतका हा प्रदेश दुर्गम आहे. गोहाटी ची वेस ओलांडून आपण जरा पुढे आलो की घाट रस्त्याला जी सुरुवात होते, ती थेट तीन साडेतीन तासानंतर् शिलांग येईस्तोवर. घाटाचा चढ सुरु होताच घनराईने गुरफटून टाकलेले डोंगर नजरेला पडतात, हवेतला ब्रम्हपुत्रे काठचा घामटपणा पार निघुन जातो नि एका सुखद गारव्याच्या अनुभवाने आपण मनोमन उमजतो की आपण मेघलयाकडे जात आहोत.अडीच लाखांच्या आस पास शिलांगची लोकवस्ती आहे. हे शहर मेघालयाच्या राजधानीचं देशातील सर्वाधिक पावसाचा हा चिमुकला प्रान्त. इथे वर्षातले आठ महिने तरी सतत आपलं "नभ मेघांनी आक्रमीलेलंच!" साहजिकच जिथं जाल तिथं नी जेंव्हा जाल तेंव्हा सगळीकडेच "हिरवे हिरवे गार् गालिचे , हरित त्रुणांच्या मखमालीचे " असा प्रकार. शिलांग ला उतरल्यावर नेमका पत्ता असल्यामुळे मला कार्यालयात जाण्यास फारसा त्रास झाला नाही. प्रशांत हे जयंतीया हिल्स च्या जोवाई या मुख्याल्याच्या ठीकाणी गेले असले तरी कार्यालयात माझ्या रहाण्याची व्यवस्था करण्यास विसरले नव्हते.
मेघालयात सकाळी ४.३० वाजता चक्क उजाडलेले असते. मेघालयातील् खासी काय् किंवा गारो आणि जयंतीया काय, सगळ्यांचेच इंग्रजी उच्चार् अगदी अधर्, अस्पष्ट. खासी भाषे साठी रोमन लीपी वापरतात्. त्यामुळे अर्थ जरी समजला नाही तरी निदान रोमन स्पेलिंग वरुन् आपण उच्चार तरी करु शकू अशी आपली भोळी समजूत पार् मोडीत निघते. एका पेक्षा एक कठीण शब्द म्हणतांना आपलीच बोबडी वळते.उमनगोट(Umngot) आणी उमस्यू (Umsiew) ही नद्यांची नावं व उमसोसुम (Umsohsum) हे शिलांग शहराच्या एका भागाचे नाव. सर्वच दुर्बोध . इथली नावं त्याहुन ताण .
मात्रुसत्ताक कुटुंब पद्धती ही खासी जीवनशैलीची खासीयत. खासी मुलं आपल्या नावामागं आईच नाव लावतात. सामान्यतः लग्न झाल्यावर नवर्यान आपल्या बायकोच्या घरी रहायला जाण्याची पद्धत आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्री अधिक श्रेष्ठ अशा कल्पनेत रुजलेल्या या मात्रुसत्ताक पद्धतीत संपत्तीच्या वारसाबद्दलही काही संकेत रुढ झालेले दिसतात. खासी घरातल्या सर्वात लहान मुलीला "खात् दूह" म्हणतात. सामान्यत: आईची संपत्ती या कनिष्ट कन्येला मिळ्ते. अर्थात् भावंडांपैकी अन्य कोणी अधिक गरजवंत असेल तर त्या मातृ-संपत्तितला वाटा त्यांनाही देण धाकट्या मुलीवर बंधनकारक मानलं गेलं आहे. एकाच मातुल घराण्यातल्या व्यक्ती एकच आडनाव लावतात. खासी भाषेत मातुल घराण्याला "कुर" असं म्हणतात. या एकाच कुराचं परंपरागत निवासी घर पिढ्यान् पिढ्या जंपलं जातं. खासी - जयंतिया व गारो या तिन्ही जिल्यातील खेड्यात जाण्याचा व तेथील कुटुंबात राहाण्याचा मला योग आला आणी त्यांच्या आदरातिथ्याने मी भारावुन गेलो.खासी धर्म्, खासी उपासना पध्द्ती ही हिंदू धर्माची लहान बहीण आहे असं व्यापक ख्रिस्तीकरणाशी दोन हात करण्याचा चंग बांधलेल्या सेंग खासी चळवळीच्या लोकांचे म्हणणे आहे.
पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील अनेक जनजातींमधील द्र्ष्ट्या महापुरुषांनी संघटना स्थापन केल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये 'डोनी पोलो' पंथाची संघटना आहे, तर नागालँडमध्ये स्वातंत्रसेनानी राणी माँ 'गायडिन्ल्यू' ने स्थापन केलेली 'जेलियांग राँग हराक्का असोसिएशन' ही संघटना हिंदू नागांच्या परंपरा टिकवून ठेवते आहे. हिंदू अंगामींची 'जाफू फिकी फुतसाना' संघटनाही अशीच स्वपंथाच्या रक्षणासाठी कटिबध्द् आहे. मेघालयात तर १८९९ साली याच उद्देशाने 'बाबू जीबनरॉय' व त्यांच्या सहकार्यांनी 'सेंग खासी' ही संघटना स्थापन केली. तर जयंतियांमध्ये 'सेंग राज' ही सघटना स्थापन झाली. आज मेघालयात १७५ वर्षांच्या प्रयत्नांनंतर देखील मिशनरी ७०% पेक्षा अधिक मतांतरण करू शकले नाहीत, याचे प्रमुख कारण या संघटना आहेत. पण ही विषम लढाई आहे. मिशनरीं च्या मागे विदेशातील समृध्द् देशांतुन येणारा अमाप पैसा व तेथील राज्य सरकारांचे पाठ्बळ आहे तर या राष्ट्रीय भावनेनी पछाडलेल्या संस्था तुट्पुज्या पैशात आणी उर्वरित भारतिय आणी केन्द्र सरकारच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षीत अवस्थेत आपल्या अस्मितेची लढाई लढत आहेत.
माझा संघाशी फारसा परिचय नव्हता. समाजकारणाच्या निमित्ताने पुर्वांचलाला भेट दिल्यानंतर मी मेघालयातील, शिलाँग, पेनुर्सला, जोवाई, अरुणाचल प्रदेशातील अतिदुर्गम भाग बोमडिला तसेच नहरलगुन, ईटानगर, नागालैंड मधिल दिमापुर तसेच आसाम मधील तेजपुर, काझिरंगा, व ब्रम्हपुत्रेतील विशाल बेट माजुली येथे फिरण्याचा योग आला. प्रत्येक ठिकाणी संघाचे प्रचारक व त्यांचा दांडगा संपर्क व त्यांचे तेथील कार्य याने भारावुन गेलो. माझ्या संघाबद्दल च्या भाबड्या कल्पनांना तेथेच मुठमाती मिळाली. त्याच्या तेथील प्रचंड कार्याने मी स्तंभीत झालो. हे कार्यकर्ते आपले घर दार सोडून वर्षानुवर्षे तिथे तळमळीने कार्य करित आहेत हे उमजण्यासाठी येथे राहून व आपल्या कल्पना विलासाची परिसीमा गाठुन शक्य नाही. ते तेथेच जाउन उमजावे लागेल.
भारतातीलच नव्हे तर जगातील प्रथम क्रमांकाची असलेली बिगरसरकारी, सामाजिक, सांस्कृतिक संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आहे. पूर्वांचलाच्या समस्येच्या बाबतीतही संघ त्या समस्येच्या स्वरुपाचा व गांभीर्याचा सखोल विचार करुन आवश्यक असलेली शक्ती तेथे उभी करण्याचा प्रयत्न करित आहे हे तिथे गेल्यावर लक्षात येते.. मातृभुमीच्या या एकाकी पड्लेल्या अनमोल भागाच्या रक्षणासाटी संघाने गेल्या साठ वर्षामध्ये शेकडो प्रचारक तेथे पाठविले. त्यापैकी अनेकांनी तर स्वतःला संपूर्ण आयुष्यभरासाठी पूर्वांचलात वाहून घेतले. अशाच एका ज्येष्ट कार्यकर्त्याला भेटण्याचा मला योग आला त्यांचे नाव श्री मधुकर लिमये. त्यांनी आपल्या आयुष्याचे ५० वर्षाहुनही अधिक काळ पुर्वांचलासाच्या उद्देशासाठी घालवला. महाराष्ट्रातील मातुलगह गावी १९२७ ला जन्माला आलेले मधुकरजी अंकशास्त्रात एम. एस.सी झाल्यानंतर १९४९ मध्ये आसाम मध्ये प्रचारक म्हणुन गेले आणि आजही ते गुवाहाटी कार्यालयात मार्गदर्शक म्हणुन असतात. ८४ वर्षाच्या वयात ही ते तितकेच कार्यक्षम आहेत. आणि माझ्यासारख्या नव्या माणसालाही ते तितक्याच आत्मियते पुर्वांचलाबद्दल भरभरुन बोलतात.
लोकांमध्ये भारतमातेच्या भक्तीची भावना भिनवणार्या या संघटनेचे कार्य काही सहजपणे पूर्वांचलात पसरले नाही, तर भारतभक्ती जागवणार्या सर्व संस्थांना शत्रू क्रमांक एक मानणार्या अतिरेकी गटांनी संघाला देखील आपल्या 'हिट लिस्ट' वर अग्रक्रम दिला. संघाच्या तीन प्रचारकांच्या आसाममध्ये हत्या झाल्या. २७ जानेवारी १९८९ रोजी उत्तरप्रदेशातुन आसामात प्रचारक म्हणुन गेलेल्या 'स्व. ओमप्रकाशजीं ' ची उल्फाच्या अतिरेक्यांनी, श्रध्दांजली सभेत हात जोडून डोळे मिटलेल्या स्थितीत बसलेले असतांना पाठीमागून गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातून गेलेले प्रचारक 'स्व.प्रमोद दीक्षित' यांनी गुवाहाटीत स्वतः २७ वेळा रक्तदान केले, व स्वकीयांचेच रक्त सांडण्यास प्रवृत्त होत असलेल्या आसामच्या तरुणांना रक्तदानाचे महत्व शिकवून रक्तदाता सूचीचा प्रकल्प चालू केला. १६ ऑगष्ट १९९१ रोजी आसामच्या बरपेटा जिल्ह्याच्या सघ कार्यालयात शिरुन 'उल्फा' ने प्रमोदजींची हत्या केली. तर केरळ मधून आसामात पोचलेल्या 'स्व.मुरलीधरनजीं' ची देखील हालहाल करुन हत्या करण्यात आली. ५० वर्षे रक्त, घाम व अश्रुंचे सिंचन करुन संघाच्या स्वयंसेवकांनी आसामात राष्ट्रभक्ती जागवली. आज आसाममध्ये भारताच्या बाजुने अतिरेक्यांच्या विरोधात असमीया समाजाला संघटितपणे उभे करण्यात संघाला यश मीळतांना दिसत आहे.
.
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 4:35 pm | गणेशा
लिखान वाचताना खुपच भाराहुन गेलो ...
आपले अनुभव .. कार्य खुप मोठे आहे... येथे त्याला काहीप्रमाणात शब्दरुप दिले त्याबद्दल आभार
9 Mar 2011 - 4:47 pm | तुषार घवी
फारच छान लिहिले आहे.
ईशान्य भारतातील सन्घाच्या कामाची माहिती सुद्धा छान वर्णन केली आहे.
ईशान्य भारतातील जनतेला नागा, बोडो, उल्फा या दोन अक्षरी सन्घटनाहून रा. स्व. सन्घ जवळचा वाटू लागला आहे.
परन्तु दुर्दैवाने आपल्या सरकारचे ईशान्य भारताकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे.
9 Mar 2011 - 5:35 pm | ढब्बू पैसा
सुनील देवधरांना मी शाळकरी वयात ऐकले होते. पूर्वांचलातल्या समस्यांची सखोल जाण असणारा आणि अतिशय तळमळीने तिथल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अनेक स्थानिक भाषा त्यांना अवगत आहेत.
पूर्वांचलाला समजून घेण्याची गरज आहे. काश्मीरइतके वलय त्या प्रश्नाला नाही पण गांभीर्य तेव्हढेच आहे!
लेख सुरेखच झालाय. आणि तुम्ही तिथे जाऊन काम केले ह्याबद्द्ल अभिनंदन!
9 Mar 2011 - 9:41 pm | प्रास
संघाच्या ईशान्य भारतातील कार्याचा चांगला लेखाजोखा सादर केलात. तरी तुमच्याकडून घडलेल्या समाजसेवेचा भाग तुम्ही पुढल्या लेखात द्याल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. पुढले लिखाण जरूर येऊ द्या.
संघाचे जे प्रचारक विखारी दहशतवादाला बळी पडले त्यांना अभिवादन!
पुलेप्र नि पुलेशु
11 Mar 2011 - 11:58 am | विश्वास कल्याणकर
खरे तर माझे कार्य तेथे हे नगण्य या सदरात मोडेल असे आहे. कारण तेथे आज डॉक्टर्स, शिक्षक, यांची खुप गरज आहे. मी पडलो बैंक अधिकारि केवळ हिशोबाचे काम करणारा. तेंव्हा मी जेव्हा पुनमताइंची भेट घेतली तेंव्हा मी त्यांना हेच सांगितले की मला कला अशी कुठलीच अवगत नाही. पण मी अकाउंटस मध्ये उत्कृष्ट काम करु शकतो. प्रशांत महामुनीनी मला सांगितले की हेही नसे थोडके. तुमच्यासाठी खुप काम आहे. त्यामुळे मला हुरुप आला. प्रथम मी शिलाँग चे अकाउंटस पुर्ण केले. त्यानंतर मला अरुणाचल ला बोलावण्यात आले त्यानंतर नागालैंड चे देखील काम मी करु लागलो. आता त्रिपुरा व मणीपुर ला ही मला बोलावणे आले आहे. ही तशी प्रत्यक्ष समाजसेवा जरी नसली तरी प्रत्यक्ष समाजसेवा करणार्यांचा वेळ मी या निमित्ताने वाचवतो अशी माझी भावना आहे. दरवर्षी मी या निमित्ताने स्वखर्चाने तिकडे वर्षाचे शेवटी जाउन हे काम करित असतो. तेथील राज्यात जावुन व काम आटोपायला मला १-२ महिने लागतात. गेली तिन वर्षे मी तेथे जात आहे. वयाच्या सत्तरी पर्यंत तरी मी हे करिन असा मला आत्मविश्वास आहे. निवृत्ती नंतर मी टैली आत्मसात केले त्याचा मला खुप उपयोग होतो. तेथील प्रत्येक कार्यालयात कॉम्पुटर असतो मी स्वतःचे टैली सोफ्ट्वेअर पेन ड्राईव वर घेउन जातो व काम करतो. त्यानिमीत्ताने तेथील कार्यकर्त्यांशी परिचय होतो व त्यांना ही माझे काम आवडते. त्यांच्या सोबत माझा ही जनसंपर्क तेथे बर्यापैकी झाला आहे.
9 Mar 2011 - 10:37 pm | आनंदयात्री
धन्यवाद. संघाचे कार्य त्या भागात आहे हे माहिती होते, तिथे मुळ संस्कृती टिकवण्यासाठी अजुनही काही संघटना आहेत हे कळुन स्तिमित झालो.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या स्वयंसेवकांना विनम्र श्रद्धांजली.
-
आनंदयात्री
अनुक्रमांक ७२
शिवाजी सायम
10 Mar 2011 - 3:34 am | शेखर
असेच म्हणतो...
अवांतरः विजुभाऊंच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत....
9 Mar 2011 - 11:51 pm | प्राजु
लेख अप्रतिम आहे..
याविषयावर आपले अजूनही लिखाण यावे..
खूप गोष्टी नव्याने समजल्या.
आणखी वाचण्यास उत्सुक. :)
10 Mar 2011 - 12:11 am | विकास
असेच म्हणतो!
10 Mar 2011 - 12:56 am | पुष्करिणी
+२
लेख उत्तम आहेच, या विषयावर अजून वाचायला आवडेल.
दहशदवादाला बळी पडलेल्या स्वयंसेवकांना श्रद्धांजली.
10 Mar 2011 - 7:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आवडला. मिपावर स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2011 - 8:15 am | अवलिया
असेच म्हणतो
17 Mar 2011 - 7:27 pm | विश्वास कल्याणकर
नमस्कार,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. आपल्या साईट वर जाउन आलो. आणी मी देखील भारावलो. आपण ज्या क्षेत्रात आहात तेथून आपण या विषयावर बरेच काम करु शकता. माझा उद्देश कसेही करुन ईशान्य भारत हा विषय अधिकाधीक लोका पर्यंत पोचावा हा असल्याने आपल्यासारख्या प्रसिध्दी च्या झोतात असलेल्यांना हा विषय समजतो आहे आणी त्यांना या बद्दल उत्सुकता वाटते हेच मला वाटते माझ्या प्रयत्नांचे यश आहे.
पुनश्च आभार.
10 Mar 2011 - 12:49 am | विनायक बेलापुरे
विश्वास जी
आपल्या प्रवासाची माहिती वाचून आनंद झाला. संघ प्रचारक नुसते घर दार सोडून नाही तर स्वत:चा जीव धोक्यात घालून "सेव्हन सिस्टर्स " भारताशी एकरूप करण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहेत.
प्रसंगी स्वयंसेवकाना खांबाला बांधून जाळण्यात आले आहे. त्या सर्वांच्या चिकाटीला, त्यागाल आणि समर्पणाला वंदन.
सुनील जी देवधरांनी स्थापन केलेली " माय होम इंडिया " ही संस्था आहे त्याची वेबसाईट खाली देत आहे . जरूर पहावी.
http://myhomeindia.org/index.php?option=com_content&task=view&id=13&Itemid=२८
पूर्वे कडील राज्यातील जनतेला "नेपाळी, चीनी " म्हणून हेटाळणी केली जाते, त्याना मनाने आणि मानाने भारता सोबत जोडून घ्यायचे काम विविध माध्यमातून केले जाते.
मध्यंतरी "सकाळ " मध्येही त्याबद्दल लेख आला होता.
http://72.78.249.126/esakal/20110227/4806348730046594611.htm
माहिती बद्दल धन्यवाद .
11 Mar 2011 - 11:35 am | विश्वास कल्याणकर
मी सुनिल जी देवधर यांच्या माय होम ईडीया बद्द्ल जाणुन आहे. त्यांच्या पूण्याच्या बैठकित शक्य होईल तेंव्हा जात असतो. त्यांच्या मार्गदर्शनाची मला नेहमीच गरज भासत असते.
10 Mar 2011 - 2:26 am | वाटाड्या...
संघाच्या पुर्ण वेळ कार्यकर्त्यांच अभिनंदन.
लेख छानच आहे. भारतभुच्या सेवेसाठी अशी आयुष्य देणारी माणसं अजुन भारताच्या भुमीवर आहेत म्हणुन तो चालु आहे.
भारतमाता की जय !!!
बेलापुरेंचा प्रतिसाद उत्तम.
- (संघाचा एकेकाळचा कार्यकर्ता) वाटाड्या
10 Mar 2011 - 3:48 am | धनंजय
ईशान्य भारताशी उर्वरित भारताची वीण घट्ट करणे हे फारच महत्त्वाचे.
भारताच्या केंद्र सरकारने धार्मिक प्रचाराबाबत उदासीन राहावे हे योग्यच.
हे काम स्वयंसेवी संघटनांनी केले तर आंतरिक ऊर्मी, कार्यक्षमता वगैरे अधिक राहीलसे वाटते.
मात्र अन्य प्रकारे, म्हणजे शिक्षण, चलनवलन, अर्थकारण, वगैरे, हे जे काय सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे, त्या प्रकारे सरकारमार्फतही एकात्मता साधली जाणे महत्त्वाचे आहे.
10 Mar 2011 - 9:18 am | सहज
सर्वप्रथम समाजसेवेत आपले आयुष्य वेचणार्या व समाजोपयोगी प्रकल्पात काम करणार्या सर्वांबद्दल आदर आहे.
संघाच्या लोकांकडून काय ख्रिस्ती धर्मांतर इ बाबत कायम वक्तव्य केली जातात. गेले अनेक दशके अश्या धर्मांतर होणार्या भागात काम केले जाते हेही सांगीतले जाते. कामाबद्दल आदर आहेच. पण धर्मांतराबाबत भारतीय संविधानाने भारतीय नागरीकाला काय अधिकार दिले आहेत? धर्मांतर बेकायदेशीर असेल तर सर्वोच्च न्यायालयात, संसदेत जाउन संघाने (किंवा अन्य कोणी) कोणता कायदा, हक्क मिळवला आहे की जेणेकरुन हा ख्रिस्ती चर्च बरोबरची 'अन्य्याय व विषम लढाई' जिंकली आहे? जर आपले सध्याचे कायदे, आपले संविधान हे याबाबत अपूरे असले तर संसदेत नवे विधायक ज्यात अन्यायाविरुद्ध अनेक खासदार एकत्रित का करु शकले नाही? म्हणजे जर अनेक दशके, भारताच्या जन्माअगोदरही (इ.स. १९४७ पूर्व) या विषयावर काम करत असले तर केवढा तरी अभ्यास व बळकट केस असेल नाही? (असा माझा अंदाज.)
>पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी
समजले नाही? आज तुम्ही आम्ही बरेचसे लोक हिंदू पारंपारीक जीवनशैलीशी दूर आधुनिक नागरी जीवन जगत आहोत. आपण कोणाला असुरक्षीत केले आहे? कोणाचा र्हास केला आहे जो कालौघात अन्यथा झाला नसताच? तसेही आज जगात अन्यत्र कमी विकसीत क्षेत्रात जनजातीत ख्रिस्ती धर्मांतर झाले तरी तेथील जमातींच्या जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा, स्त्रियांना दुय्यम वागणूक इ काही बदलले नाही. मग नेमका बदल कोणता तर फक्त देव मानणे इतकाच म्हणावा लागेल बाकी तर सब जैसे थे आहे.
>लोकांमध्ये भारतमातेच्या भक्तीची भावना भिनवणार्या या संघटनेचे कार्य काही सहजपणे पूर्वांचलात पसरले नाही, तर भारतभक्ती जागवणार्या सर्व संस्थांना शत्रू क्रमांक एक मानणार्या अतिरेकी गटांनी संघाला देखील आपल्या 'हिट लिस्ट' वर अग्रक्रम दिला. संघाच्या तीन प्रचारकांच्या आसाममध्ये हत्या झाल्या.
उल्फा अतिरेकी किंवा देशातील इतर सशस्त्र संघटना यांना किंवा तेथील आसपासच्या लोकांना 'भारतभक्तीचे' इंजेक्शन दिल्यास समस्या संपेल हा भाबडा आशावाद आहे इतकेच म्हणतो. उल्फाने अनेक संघाव्यतिरिक्त अनेक लोकांना, पोलीस, सैन्याला मारले आहे. तसेच सैन्याने उल्फाचे अनेक अतिरेकी मारले आहेत. ही समस्या सोडवायची जबाबदारी प्रशासनाची आहे.
>५० वर्षे रक्त, घाम व अश्रुंचे सिंचन करुन संघाच्या स्वयंसेवकांनी आसामात राष्ट्रभक्ती जागवली.
हा दावा पचायला जड आहे. आसाममधे हिंदूंची जनगणना निम्म्याहून जास्त आहे त्यामुळे महाभारत, रामायण, भारतवर्ष इ इ तर जनुकातच असणार. राष्ट्रभक्ती जागवायला एक फुंकर पुरेशी आहे, ५० वर्षे जरा जास्तच होतात असे वाटते.
आसाम रायफल्स, गुवाहाटी, डॉ भुपेन हजारीका, ब्रम्हपुत्रा नदी, काझीरंगा नॅशनल पार्क, अनेक खनिजे असलेले राज्य, चहाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, आसाम गण परिषद, प्रफुल्लकुमार मोहंता (क्षमस्व. मी आधी चुकून बिजू पटनाईक लिहले होते. ते ओरिसाचे. ), बोडो, उल्फा, ते आता अलिकडे आयआयटी गुवाहाटी अनेक संदर्भ आसाम बाबत भारतातील जनतेला माहीत आहेत. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा इ. राज्यांच्या मानाने नक्कीच जास्त. राष्ट्रभक्तीचा अभाव ही समस्या आसामला होती असे वाटत नाही. हां आता जाज्वल्य प्रादेशीक अस्मीता / अभिमान भारतात कुठे नाही हा मात्र अभ्यासाचा विषय असु शकतो.
समाजोपयोगी कार्याला शुभेच्छा!
10 Mar 2011 - 9:03 am | स्पंदना
कल्याणकर साहेब, रिटायरमेंट नंतर आरामा त बागेला पाणी घालत घराभोवती फिरण्याच्या सर्व सामान्य मान्य कल्पनेला तडा देउन , एक स्वयंसेवक म्हणुन काम करण्याची ईच्छा बाळगल्या बद्दल व ती धाडसाने पुरी केल्या बद्दल सर्व प्रथम अभिनंदन!
हा अनुभव इथे लिहुन तुम्ही आम्हाला एक दिशा दर्शविली आहे.
राहता राहिला धर्मांतराचा मुद्दा. तर केरळात काही 'ताम्दुळवाले' ख्रिश्चन आहेत. अज्ञानाचा , गरिबीचा अन श्रद्धेचा फायदा घेउन जी धर्मांतर केली जातात त्याला माझा विरोध आहे अन राहिल.
कोणतेही समाज कार्य करायला तुम्ही मुळ धर्माचा नायनाट केला पाहिजे हा दृष्टीकोणच मलापटत नाही.
तुम्ही तुमचे अनुभव अन मिळालेले समाजाचे नवनविन कंगोरे आमच्या पर्यंत आणल्या बद्दल धन्यवाद. शेवटी माणुस कोनत्या तरी ध्येया पोटी काहि तरी करु इच्छितो अन करुन दाखवतो हे कोणत्या ही काथ्या कुटापेक्षा मला मह्तवाचे वाटते.
12 Mar 2011 - 9:07 am | विश्वास कल्याणकर
सर्व प्रथम मला साहेब म्हणु नका. एका फ्रेन्च पत्रकाराने लीहीलेला येथिल लेख तुम्हाला बराचसा माहितीपुर्ण वाटेल.
10 Mar 2011 - 1:36 pm | वपाडाव
धर्मांतराच्या मुद्यावरील वाचन तोकडे आहे. काहीही चर्चा केल्यास भर पडेल.
अवांतर : अशी एक पुर्वांचलच्या मुलांची शाळा पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी १२ वीत होतो. आमचे काका त्या शाळेत आवर्जुन दर आठवड्याला सेवा देण्यास जात.
12 Mar 2011 - 9:56 am | यशोधरा
लेख आवडला. अजूनही माहिती लिहा, वाचायला आवडेल.
12 Mar 2011 - 10:34 am | शिल्पा ब
रोमांचक माहीती...तुमची काम करण्याची जिद्द ही वाखाणण्याजोगीच आहे.
या भागाकडे भारत सरकारचे दुर्लक्ष नेमके कशामुळे झाले आहे?
12 Mar 2011 - 11:57 am | विश्वास कल्याणकर
याला मुख्यता दोन कारणे सांगता येतील एक तर दुरदृष्टिचा अभाव आणि दुसरे म्हण्जे स्वार्थी व क्षुद्र राजकीय नीती. घुसखोरी व धर्मांतरणाचे धोके सरकारला माहित नव्हते असे नाही. पण त्यांना खतपाणी घालून आपले मतांचे राजकारण साधण्याचाच प्रयत्न झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच उपाययोजना केली असती तर आज भस्मासुराप्रमाणे भेडसावणारी ही भयंकर समस्या अस्तित्वात राहिली नसति. त्याचप्रमाणे डोंगराळ प्रदेशात पध्दतशीरपणे चाललेले मतांतरण कायद्याने बंद करणे अत्यंत आवश्यक होते. म. गांधींनी देखील ख्रिश्चन मिशनर्यांना या देशात बंदी घालण्याचा विचार व्यक्त केला होता. घुसखोरी व मतांतरण यांच्या दूरगामी परिणामांचा विचार न करता तत्कालीन लाभासाठी अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्याला उत्तेजन देण्याचे क्षुद्र राजकारण केले. परिणामी संपूर्ण पूर्वांचल आज फुटीरतेच्या आगीत होरपळताना दिसतो आहे.
विविध जनजातींमध्ये निर्माण झालेले 'आयडेंटिटी क्रायसेस' सोडविण्याऐवजी त्यांना खतपाणी घालून ईंग्रजांप्रमाणेच 'फोडा व राज्य करा' या कूट राजनीतिद्वारे तेथे मतांचे राजकारण केले. एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या समान राष्ट्रभाषेचे सूत्र लागू करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. अरूणाचल प्रदेशाचा अपवाद वगळता या सर्व भागात हिंदीचा प्रचारदेखील फार झाला नाही.
13 Mar 2011 - 10:18 am | पंगा
हे नेमके कधी घडले? याबाबत काही तपशील देऊ शकाल काय?
13 Mar 2011 - 1:17 pm | विश्वास कल्याणकर
म . गांधीचे विचार कन्व्हर्शन बद्दल खुपच सुस्पष्ट होते. ते अधिक काळ जगले असते तर वेगळे चित्र आज दिसले असते. येथे त्यांचे या विषयावर विचार आहेत.
13 Mar 2011 - 9:05 pm | पंगा
आपण जो स्रोत दाखवलात, तो दुय्यम स्वरूपाचा, आणि ज्याने कोणी एकत्रित केला आहे त्याचा अजेंडा पुढे ढकलण्यासाठी गांधीजींची (किंवा फायद्याचे असेल तर अन्य कोणाचीही) सोयिस्कर अशी कुठलीतरी वाक्ये संदर्भाबाहेर ('औट-ऑफ-कंटेक्स्ट' अशा अर्थी) एकत्र करण्याचा प्रयत्न वाटला. 'आपल्या कार्यभागासाठी सैतान धर्मग्रंथाचे दाखले देऊ शकतो' अशा अर्थीच्या इंग्रजी म्हणीची या निमित्ताने आठवण झाली. (अशा प्रकारचे संदर्भ हे साधारणतः बौद्धिकांमध्ये खपून जावेत, परंतु विचारार्ह संदर्भ म्हणून त्यांना फारसे महत्त्व नाही, असे मत मांडण्याचा मोह मोठ्या कष्टाने टाळत आहे. तसेच, हल्ली पु.लं.च्या वाक्यांनाही असेच संदर्भाबाहेर उद्धृत होण्याचे भाग्य वारंवार लाभते, हा उल्लेखही केवळ या लेखाच्या आणि या प्रतिसादाच्या विषयाबाहेर असल्यामुळे करू इच्छीत नाही.) याहून अधिक विश्वासार्ह असा एखादा स्रोत - किंवा खुद्द गांधींच्याच लिखाणाचा एखादा तपशीलवार संदर्भ - देऊ शकला असतात, तर अधिक बरे वाटले असते.
तरीही, या अशा प्रकारच्या स्रोतांतून का होईना, उघडकीस आलेले गांधींचे विचार मोलाचे आहेत, याबद्दल संदेह नाही. 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम्|'
वास्तविक या स्रोतात मांडलेले गांधींचे विचार तसे सर्वपरिचित असावेत. इतर धर्मांतील तत्त्वांपासून त्यांनी अनेकदा स्फूर्ती घेतली असली ('एका गालावर कोणी थप्पड मारल्यास दुसरा गाल पुढे करावा' या ज्या तत्त्वाचा वारंवार उल्लेख करून खाजगीमध्ये गांधींची टिंगल करण्याचा संघिष्ठांचा आवडता छंद असतो, ते तत्त्व गांधींनी स्वतः निर्माण केलेले नसून ख्रिस्ती धर्मातील तत्त्व आहे.), तरी त्यांची हिंदुधर्मावरील श्रद्धा अढळ होती, ते स्वतःला 'सनातनी हिंदू' म्हणवत आणि धर्मांतराचा विचारही त्यांच्या मनात नव्हता (किंबहुना व्यक्तिगतरीत्या असे धर्मांतर करण्याचे काही कारणही त्यांना दिसत नव्हते) ही माहिती कोणत्याही प्रकारे नवीन नाही. तसेच, 'धर्मांतर' ही एकंदर संकल्पना आणि ख्रिस्ती मिशनर्यांची धर्मांतराची पद्धत आणि त्यामागील विचारसरणी ही त्यांना पटत नव्हती यातही अमान्य करण्यासारखे काहीच नाही. तसेच, ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यपद्धतीस (ख्रिस्ती धर्मास किंवा ख्रिस्तास नव्हे!) त्यांचा तात्त्विक विरोध होता, आणि त्यांच्या कार्यपद्धतीस कोणतेही न्याय्य स्थान असण्याचे त्यांना काहीच कारण दिसत नव्हते, याबद्दलही संदेह नाही.
मात्र, 'ख्रिस्ती मिशनर्यांना या देशात (कायद्याने) बंदी घालावी' असे मत त्यांनी कोठेच मांडल्याचे दिसून येत (किंवा आठवत) नाही. स्पष्टच सांगायचे झाल्यास, हा त्यांच्या विचारसरणीचा (आपल्या अजेंड्याच्या लाभार्थ केलेला) विपर्यास वाटतो.
हे राम!
गांधींना संपवणार्या व्यक्तीची विचारसरणी लक्षात घेता, त्याच विचारसरणीशी निगडित संघटनेच्या कार्याच्या संदर्भात हे वाक्य अतिशय दांभिक वाटते.
असो.
(काहीसे अवांतर: बाकी, आपण दिलेल्या स्रोतावर गांधींच्या संदेशाचा इस्लामी आणि मिशनरी दहशतवादाशी लावण्यात आलेला संबंध रोचक वाटला. गांधींनी दहशतवादाच्या बाबतीत 'हिंदू दहशतवाद', 'इस्लामी दहशतवाद', 'ख्रिस्ती दहशतवाद' असा भेदभाव केला असता असे त्यांची एकंदर विचारसरणी लक्षात घेता निदान मला तरी वाटत नाही. तसेच, 'त्यांनी केवळ स्वतःचे धर्मांतर न केल्याने त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही' हे तेथे मांडलेले मतही, बाकी काही सोडा, पण किमान 'कॉन्स्पिरसी थिअरी' छापाचे वाटले. अशा प्रकारची मते जेथे मांडली जातात, अशा स्रोतांवर विश्वास ठेवण्यास मन सहसा धजत नाही, परंतु तेथे मांडलेले गांधींचे विचार स्वतंत्रपणे गांधींच्याच साहित्याच्या खुद्द नवजीवन प्रेसने - कोणत्याही टिप्पणीशिवाय - केलेल्या संकलनात कधी काळी वाचलेले असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असो.)
15 Mar 2011 - 6:17 pm | नितिन थत्ते
>>म . गांधीचे विचार कन्व्हर्शन बद्दल खुपच सुस्पष्ट होते. ते अधिक काळ जगले असते तर वेगळे चित्र आज दिसले असते.
अरेच्चा... पण ते अधिक काळ जगले असते तर देशाचे की राष्ट्राचे काहीतरी अनेक तुकडे की काहीतरी झाले असते म्हणून की काहीतरी त्यांचा खून की काहीतरी केला असे काहीतरी ऐकलंय ब्वॉ.
म्हणजे ईशान्येतल्या आजच्या परिस्थितीला नथुरामला जवाबदार म्हणावे का काय?
19 Mar 2011 - 12:03 am | चिंतामणी
मराठीत अनेक समर्पक म्हणी आहेत. त्यातील "पराचा कावळा करणे" अथवा "कात्रज दाखवणे" (या म्हणीच्या उगमाचा संबंध शिवाजी महाराजांशी आहे. पुण्याशी नव्हे याची याची नोंद घ्यावी.) यांचा अर्थ असल्या प्रतिक्रीयतुन दिसला.
आपल्या सारख्या वरीष्ठ सभासदाने मुळा मुद्द्यावर न लिहीता फक्त प्रतिसादावर विस्तृत लिहीणे म्हणजे
वरील म्हणीतुन येणारा अर्थ स्पष्ट करणे असे आहे. (पंगासाहेबांनीसुध्दा याची नोंद घ्यावी)
19 Mar 2011 - 8:27 am | नितिन थत्ते
मूळ लेखावर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असा आग्रह नसावा.
लेखकाच्या विचारसरणीस अनुसरून लेखक जे करत आहे त्याचे वर्णन केले आहे. मला पटत नाही म्हणून "वा वा !!!" अशी प्रतिक्रिया देता येत नव्हती. पटत नसले तरी विरोधी प्रतिक्रिया प्रत्येकच ठिकाणी द्यायला नको म्हणून प्रतिक्रिया दिली नव्हती.
प्रतिसादातल्या वाक्यावर प्रतिसाद द्यावा इतके ते वाक्य गंभीर वाटले. ज्या विचारधारेत* गांधी हे हिंदूत्वाच्या प्रमुख शत्रूंपैकी एक मानले जातात त्या विचारधारेशी निष्ठा सांगणार्या व्यक्तीने पुन्हा हिंदुत्वाच्याच संदर्भात गांधी असते हिंदुत्वाचे हित झाले असते असे म्हणणे भलतेच विरोधाभासी वाटले म्हणून प्रतिसाद दिला.
*सदर लेखक संघाचे कार्यकर्ते असल्याचे सांगतात. संघ गांधींना (१९६९ पासून) प्रातःस्मरणीय पुरुष मानत असला तरी हे विधान सत्य आहे.
19 Mar 2011 - 11:25 am | विश्वास कल्याणकर
मी संघाचा कार्यकर्ता नाही हे स्पष्ट करु इच्छीतो. इशान्य भारत व त्यातील समस्या याच्याशी निगडीत झाल्याने आणी तेथे काम करित असतांना तेथे मला संघाचे व त्यांच्या एन.जी.ओ चे प्राबल्य जाणवले.सतत त्यांच्याशी संबंध आल्याने परिचय वाढत गेला. कुटुंबापासुन वर्षानुवर्षे वेगळे राहुन सातत्याने कार्यात मग्न असलेले लोक मला ऋषी तुल्य वाटले. जे चांगले वाटले त्याबद्द्ल लिहिल्यास त्यात काही वावगे असावे असे वाटत नाही. तेथील ख्रिस्तिकरण व बांगलादेशी घुसखोरी या ज्वलंत समस्या असतांना त्यावर आपला दृष्टिकोण जाणुन त्यावरील उपाय याबाबत आपले मत जाणुन घ्यावयास आवडेल. त्याभागात इतर समाजसेवी संस्था आपल्या माहितीत असल्यास त्यांचे सोबत काम करावयासही मला आवडेल.
19 Mar 2011 - 11:58 am | चिंतामणी
तेथील ख्रिस्तिकरण व बांगलादेशी घुसखोरी या ज्वलंत समस्या असतांना त्यावर आपला दृष्टिकोण जाणुन त्यावरील उपाय याबाबत आपले मत जाणुन घ्यावयास आवडेल.
सहमत
त्याच प्रमाणे त्याभागात इतर समाजसेवी संस्था आपल्या माहिती घ्यायला आवडेल.
19 Mar 2011 - 11:59 am | नितिन थत्ते
विश्वास कल्याणकर आणि रणजित चितळे यांच्याबाबत* माझ्या मनात गोंधळ उडून कल्याणकर यांना संघाचे कार्यकर्ते म्हटले. त्याबद्दल माफी मागत आहे.
*दोघेहीजण काही ऐतिहासिक कारणांनी भारतात सामील झालेल्या प्रदेशांतील डेमोग्राफिक बदलांबाबत लिहित असल्याने असे झाले असावे.
.
.
.
.
(लज्जित)
19 Mar 2011 - 12:00 pm | चिंतामणी
मूळ लेखावर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असा आग्रह नसावा.
माझ्या म्हणण्याचा अर्थ त्यात नोंदवलेल्या समस्येबद्द्ल आणि त्यावर आपणास योग्य वाटेल त्या उपायाबद्दल लिहावे असे माझे म्हणणे होते आणि आहे.
19 Mar 2011 - 8:45 am | पंगा
मराठीत अनेक समर्पक म्हणी आहेत याबाबत सहमत आहे. किंबहुना गेला बाजार सातएकशे वर्षे वापरात असलेल्या एखाद्या समृद्ध भाषेत अनेक समर्पक म्हणी असणे ही इतकी सामान्य बाब आहे, की तिची नोंद घेण्याचे काही विशेष कारण जाणवत नाही.
बाकी चालू द्या.
12 Mar 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर लेखन.
संघकार्याबद्दल कायमच आदर वाटत आला आहे.
12 Mar 2011 - 1:41 pm | वेताळ
हेच विचार व आचार जर संघाशी साधर्म्य बाळगलेले सनातनी संस्थेंनी अमंलात आणले तर भारत एक महासत्ता नक्की बनु शकतो.
13 Mar 2011 - 11:17 am | चिंतातुर जंतू
ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी जोर-जबरदस्ती किंवा फसवणूक करून धर्मांतर केले हे खरे, पण त्याआधीची मूळ संस्कृती ही सरसकट हिंदू होती असे मानणे कितपत सयुक्तिक आहे, याविषयी शंका आहे. इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा विषयांच्या अभ्यासकांच्या मते अनेक स्थानिकांची संस्कृती हिंदू धर्माहून वेगळी आहे. वर्णव्यवस्था, जातींची उतरंड वगैरेंचा अभाव, मातृसत्ताक पद्धती, दैवते, ऑस्ट्रो-एशिआटिक भाषा (इंडो-आर्यन भाषांऐवजी) किंवा मैतेयींची तिबेटो-बर्मन भाषा अशा गोष्टींच्या त्याला आधार दिसतो. विशेषतः डोंगराळ भागातले छोटेछोटे समुदाय हिंदू संस्कृतीबाहेर राहिले असे इथे म्हटले आहे.
History, religion and culture of north east India - T. Raatan हे पुस्तकही गूगल बुक्सवर काही अंशांत पाहता येईल.
19 Mar 2011 - 12:11 am | चिंतामणी
आपला "ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान" हा लेख वाचल्यावरच मला मा.सुनील देशमुखानी म.टा.साठी लिहीलेल्या लेखमालेची आठवण झाली आणि मी ती येथे पटलावर ठेवायला सुरवात केली.
या भागात तुम्ही त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. मी त्यांचे लिखाण आणि भाषण दोन्हिही अनुभवले आहे. ऑर्कुटवर ते लिखाण ठेवतान फोनवर त्यांचेशी एका मित्राच्या माध्यमातुन बोललोसुध्दा होतो.
या महान कार्यात अंग झोकुन काम करणा-या संघाच्या ज्ञात-अज्ञात स्वयंसेवकाना शतशः प्रमाण..
" बाल की खाल" काढणा-यांना यातुन काहितरी बोध होईल अशी (भाबडी) आशा आहे.
19 Mar 2011 - 2:14 am | रेवती
बापरे! हे मला पहिल्यांदाच समजते आहे. आपल्या व संघाच्या कार्याबद्दल आदर वाटतो.
मलाही जमेल तेंव्हा समाजकार्य करीन पण दुर्गम भागात तेही इतक्या लांब नाही जाऊ शकणार.
तुम्ही ग्रेट आहात.
शहरीकरण झालेल्या भागात या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते.
राजकारणी लोकांनी शहरीकरण करताना जे काही कडबोळं केलेलं आहे ते आपण पाहतोच पण देशाच्या दुर्गम भागात, सीमेवर ज्याप्रकारे आपलेच लोक देशाला कुरतडत राहतात त्याचे परिणाम लगेच कळणारे नसतात.
22 Mar 2011 - 8:43 am | निनाद
तुमची या वयात काम करण्याची उर्मी स्फूर्तिदायक आहे!
पूर्वेच्या राज्यांविषयी हा चांगल्यापैकी माहितीपूर्ण लेख आहे.
यातली काही माहिती तुम्ही मराठी विकीवर देऊ शकाल का?
'खासी', 'सेंग खासी चळवळ' अशी नवीन पाने बनवले तरी चालावे.
मग त्यात अजून माहिती घालता येईल. तुम्हीच ती तेथे लिहिली अजून उत्तम पण ते शक्य नसेल तर मी मदत करू शकेन.
22 Mar 2011 - 6:11 pm | विश्वास कल्याणकर
या विषयावर मी उपक्रम या जाला वर बरेच लेख लिहिले आहेत.