मणीपुर चा शब्दशः अर्थ होतो रत्नांची भुमी. भारताच्या संस्कृतीशी घट्ट नाळेने जोडलेला पण अगदी एकटा पडलेला हा भूप्रदेश. गेल्या दोन दशकापासून मात्र या भूभागावर बंडखोरीचे सावट पडून हे रत्न झाकाळले गेले आहे येथील दिशाभूल झालेल्या लोकांद्वारे केल्या गेलेल्या चळवळी मागील कारणे काहीही असले तरी देशाच्या या रक्तरंजित भूभागामुळे देशाच्या जनतेला अस्वस्थ करून सोडले आहे.
२२३२७ चौ. कि. मी. मध्ये विस्तारले असलेले हे राज्य डोंगराळ भाग व दर्यां चा सखल प्रदेश यात विभागलेले आहे. दर्यां चा सखल भाग हा आकाराने केवळ २२३८ म्हणजे संपूर्ण राज्याच्या केवळ १०% इतका असला तरी राज्याची ५८. ८५% जनसंख्या या भागातच एकवटली आहे. याउलट डोंगराळ प्रदेशातील २००८९ चौ. कि. भागात एकूण जनसंख्येच्या ४१. ५६% लोक राहतात. (२००१ ची आकडेवारी)
स्थानिक जनजातींमध्ये मुख्यतः तीन गट आहेत. यात सर्वात मोठा गट हा मैतीयी या जमातीचा असूनही त्यांना Non-Trible असे गणल्या जाते. ते मुख्यतः सखल भागात राहतात.. अन्य दोन जमाती म्हणजे नागा व कुकी. कुकी हा मीझो जमातीचा उपगट आहे. या दोनही जमाती त्यांच्या २९ उप जातींसह डोंगराळ भागात राहतात.
येथील मुस्लिम समाज हा स्वातंत्र्यापूर्वी पूर्व बंगालमधून व नंतर पूर्व पाकिस्तानातून व नंतरच्या काळात बांगलादेशातून स्थलांतरित झालेला असून त्यांना पंगाल असे म्हणतात. त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण हे ८% असून ते देखील सखल प्रदेशात राहतात. याशिवाय देशाच्या विविध भागातून व्यवसायानिमित्त अथवा इतर काही कारणाने या राज्यात आलेले आहेत. ते देखील Non-Trible असून त्यांना मयांग म्हणजे बाहेरचे असे संबोधिले जाते.
मैतियी येथील मुळ निवासी असले तरी ते वैष्णव असल्यामुळे त्यांना Non-Trible समजून त्यांना घटनेने अनुसूचित जमातींना दिलेल्या विशेष सवलतींपासून वंचित तर ठेवलेले आहेच पण त्यांना राज्याच्या जमीन सुधारणाकायदा अंतर्गत डोंगराळ भागात स्थायिक होण्यास प्रतिबंध आहे. मात्र नागा व कुकी जे बहुतांश ख्रिश्चन आहेत. त्यांना या भागात स्थायिक होण्यास कुठलेही निर्बंध नाहीत. मैतिया विरुद्ध नागा कुकी याच्या मध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्यामधील अनेक कारणापैकी हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.एकंदरीतच पारस्परिक सामंजस्याच्या अभावी हे वेगवेगळे गट आपली विशिष्ट ओळख कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात.
या राज्याला लागून ३५० कि. मी. ची ब्रह्मदेशाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यात पूर्वेला अप्पर बर्मा, तर आग्नेये ला बर्माच्या चीन हिल्स आहेत. याशिवाय उत्तरेस नागालैंड, दक्षिणेस व नैऋत्येस मीझोराम व पश्चिमेस आसाम या राज्यांच्या सीमा आहेत. राज्यात ९ प्रशासकीय जिल्हे असून त्यातील चुराचांदपुर, उखरुल, चंदेल, तामेंगलांग, व सेनापती हे ५ जिल्हे हे डोंगराळ प्रदेशातील तर इंफाल, पूर्व इंफाल, पश्चिम बिशेनपुर व थाउबल हे चार जिल्हे सखल भागात आहेत.
१८९१ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी येथे राजाचा राज्यकारभार होता. भारतातील इतर संस्थानांप्रमाणेच ब्रिटिशांनी येथील संस्थानांच्या सवलती कायम ठेवल्या होत्या पण त्यांच्या वसाहतवादाच्या वरपांगी धोरणानुसार, संस्थानाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करण्याचा दिखावा केल्या जात असला तरी आतुन मात्र फोडा आणि तोडा या नीतीचा तेथे अवलंब करण्यासाठी ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा उपयोग करून घेतला गेला. परिणामस्वरुप ब्रिटिश सत्तेच्या झेंड्या पाठोपाठ १८९४ मध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारक येथे प्रवेश करते झाले. त्यांनी वैद्यकीय सेवा व शिक्षण प्रसाराच्या नावाखाली येथील असंतुष्ट जमातींचे धर्मांतरण घडवून आणण्यास सुरुवात केली.
१९०१ च्या जनगणनेनुसार येथे ६०% हिंदू, ३६% जनजाती, ४ % मुस्लिम व केवळ ८ ख्रिश्चन होते. २००५-०६ च्या National Family Health Survey च्या अहवालानुसार २००१ च्या जनगणनेची स्थिती हिंदू ५३. १% मुस्लिम ८. ९% ख्रिश्चन २६. १% व अन्य ११. ९% असे आहे. १९९१ ते २००१ या दशकात राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर हा १२.८६% इतका होता. (source:). याचा अर्थ डोंगराळ भागात राहणारी संपूर्ण जनजाती ही ख्रिश्चन झाली आहे तर हिंदु ची संख्या ही कमी झाली.
भारतीय समाज धर्मांतरणाच्या बाबतीत फारसा जागरूक कधीच नव्हता कारण धर्मांतरण हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे तो मानतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होण्यामागचे काय कारण असावे याबाबत केन्द्रातील सरकारे ही फारसे उत्सुक नव्हते मग त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे दुरच राहीले? ख्रिस्ती धर्मप्रसारक हे धर्मांतरण करताना ते स्थानीय जनजातींना त्यांच्या देशाच्या मुख्य भूमीपासून वेगळेच करत नाहीत तर त्यांनी धारण केलेल्या धर्मामुळे देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहात येण्यापासून त्यांना प्रतिबंधित करतात. यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात हे नवख्रिश्चन देशाच्या सांवैधानिक एकात्मतेच्या मार्गात मोठा अडथळा ठरू पाहत आहेत.
राज्यातील हिंदू माईती व डोंगराळ भागातील ख्रिश्चन जमाती यांच्यातील वाढती सामाजिक व सांस्कृतिक दरी ही त्यांच्यातील सामाजिक व राजकीय वितुष्टाचा मुद्दा झालेली आहे.
ब्रिटिश सोडून गेल्यानंतर १५/१०/१९४९ मध्ये मणीपूर हे भारतीय संघराज्यात part C दर्जाचे राज्य म्हणून विलीन झाले. ब्रिटिशांच्या काळात आधुनिक मध्यम वर्गीय म्हणून जो एक लहान गट उदयाला आला त्याच्याकडे राज्याचे नेतृत्व आले. ईशान्य भारतातील इतर वांशिक गटाप्रमाणेच त्यांना स्वतंत्र भारतातील नवीन लोकशाही राज्यसंस्थेतील सामाजिक व राजकीय गुंतागुंत समजणे कठिण गेले. त्यांच्यात देशाच्या मुख्य भूमीमधील राजकीय नेत्यांबद्दल परके पणाची भावना निर्माण झाली व मग ते आपल्या वांशिक अस्मितेच्या राजकारणामध्येच गुंतून राहिले. त्याच काळात पूर्व पाकिस्तानातून येणारे लोंढे, उत्तर भारतातून व्यवसायासाठी येणारे व्यापारी, मजूर व निम्न मध्यम वर्ग यामुळे तेथील लोकसंख्ये मध्ये होत असलेले असंतुलन यांमुळे, त्यांना आपल्या वांशिक अस्तित्वाबद्दलच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
ब्रिटिश काळात राज्यकर्ती असलेली माइती जमात या नवीन राजकीय वातावरणात आपण मागे पडण्याच्या आशंकेने धास्तावली याच काळात केंद्रातील सत्ताधारी नेते, देशाच्या विभाजनामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांना तोंड देण्यात गुंतलेले असल्याने या भागाच्या सांस्कृतिक व सवैधानीक स्थितीची राष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहासोबत सांगड घालण्याच्या दृष्टीने योग्य ते लक्ष देऊ शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की येथील समस्या अधिक तीव्र झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, लोकशाही पध्दतीने निवडुन आलेल्या सरकारने मणीपुर चा राज्यकारभार हाती घेतला. १९५६ मध्ये या राज्याला केन्द्र शासीत प्रदेश चा दर्जा मिळाला व २१/१/१९७२ मध्ये हे स्वयंपुर्ण राज्य म्हणुन घोषीत झाले. विधान मंडळाचे ६० सदस्य राज्याचा शकट चालवितात त्यात १९ जागा ह्या अनुसुचित जमातिंसाठी राखीव असतात.या राज्यातुन २ खासदार हे लोकसभेत व १ राज्यसभेत प्रतिनिधीत्व करतात. पण तीन वांशीक जमातींच्या सामाजिक व सांस्कृतिक मागण्यांचे राजकारण, त्यात विवक्षित गटाच्या नेत्यांचे व्यक्तिगत हितसंबध आणी सरकारातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचारामुळे आर्थिक विकासाची गती ही मुंगीच्या चालीची झाली यामुळे येथील समस्या अधिकाधिक गुंतागुंतिच्या होउ लागल्या. या परिस्थीतीचा फायदा घेण्यासाठी परदेशीय हितसंबधीत शक्ती पुढे सरसावल्या आणी त्यांनी येथील युवकांची दिशाभुल करुन राष्ट्रविरोधी कारवायांची मोहीम सुरु केली. या युवकांनी पुढे भारत सरकारविरोधी शस्त्र हाती घेउन आपला भुप्रदेश भारतीय कब्जातुन सोडविण्याचा चंग बांधला.
मणीपुर मधील बंडखोरी ही तीन वांशीक गटात म्हणजे मइती, नागा व कुकी. यांमध्ये विभागली गेली आहे. मइती बडखोरांचा मुख्य उद्देश हा भारतापासुन त्यांचा ब्रिटिश कालाच्या आधी असलेला संस्थानाचा प्रदेश पुन्हा स्वतंत्र करण्याचा आहे तर मणिपुर च्या नागा बंडखोरांना आपल्या नागालीम चे सार्वभौमत्व संपादन करावयाचे आहे. या नागालिम मध्ये बर्मा, आसाम, अरुणाचल प्रदेश व मणीपुर मधिल नागा बहुसंख्य असलेल्या प्रदेशाचा समावेश आहे. कुकी बंडखोरांना स्वतंत्र कुकी लैंड हवा आहे यात बर्मातील कुकी प्रदेशाचा देखील समावेश आहे.यासाठी बर्मामधील कुकी देखील संघर्ष करित आहेत.
भारताच्या शांती प्रस्तावाला मात्र फारसे येश येत असलेले दिसत नाही कारण त्यात इच्छाशक्तीचा अभाव ठळक पणे जाणवतो.. परकिय विरोधी शक्तींना दोष देउन ही समस्या सुटण्यासारखी नाही. पक्षीय राजकारणाच्या पुढे जाउन राष्ट्रीय प्रवाहात येथील लोकांना आणण्यासाठी तेथील लोकांच्या मनात, सरकारबद्दल विश्वासार्हता निर्माण होणे व त्या दृष्टीने सरकारकडुन प्रयत्न होणे गरजेचे आहे...
प्रतिक्रिया
5 May 2011 - 5:05 pm | नरेशकुमार
आपन छान लिहिता. आपले लेखन वाचले आहे.
खुप मुद्दे आहेत. मिपावरचे जेष्ठ लोकं भर घालतील.