"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-"परिचय"-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १
मूळ लेखकः श्री पवनकुमार वर्मा अनुवादकः सुधीर काळे
© मूळ लेखकाच्या वतीने: सुधीर काळे
(या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत)
"भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्या जगाच्या बाबतीतही समर्पक आणि प्रसंगोचित आहे.
एकवीसाव्या शतकात प्रत्येक सहा मनुष्यातला एक मनुष्य भारतीय असणार आहे. भारतीय बाजार हा जागतिक बाजारपेठेत दुसर्या क्रमांकावर असणार आहे. त्यात खरेदी करण्याची ऐपत असलेल्या मध्यमवर्गीयांची संख्या ५० कोटीला पोचलेली असेल. खरेदीशक्ती विनिमयाचा दर ध्यानात ठेऊन सारखी केल्यास (purchasing power parity) भारताची अर्थव्यवस्था आताच जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्याबाबतीत (gross national product) भारत पहिल्या दहात आहे. जगात सर्वात विशाल लोकशाही राबविणारा भारत आता अण्वस्त्रसज्ज असून आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान मिळविण्याचा आपला हक्क तो बजावू पहात आहे.
या शिवाय भारतीय उपखंडात दूरगामी व्यापक बदल होत आहेत. फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पदवीधर आज भारतात असून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे. २००४ सालची सॉफ्टवेअरची निर्यात ५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय लोक आज सार्या जगभर पसरले असून अशा तर्हेच्या जगभर पसरलेल्या नागरिकांच्या बाबतीत (Diaspora) भारत चीनखालोखाल दुसर्या क्रमांकावर आहे. भारतीय वंशाचा समाज आज अमेरिकेतील सर्वात जास्त श्रीमंत समाज बनलेला आहे. इंग्लंड आणि मध्यपूर्वेतल्या राष्ट्रांत व इतरत्रही भारतीय समाजाचे वैभव व श्रीमंती वाढत आहे. या नव्या शतकात जगातील जनतेला-मनापासून असो वा मनाविरुद्ध-पण भारतीयांशी संबध ठेवावेच लागतील. म्हणूनच "भारतीय असणे म्हणजे काय?" हे जास्तच सुस्पष्टपणे व प्रामाणिकपणे जाणून घेणे जरूरीचे आहे.
यापूर्वी अशा तर्हेच्या संशोधनात दोन गोष्टींमुळे अडचण येत असे. पहिली होती कीं सारे परदेशातील लोक भारतीयांकडे "एका छापात बनविलेले लोक" अशा नजरेने पहात. आणि भारतीय लोक स्वतःची प्रतिमा जगापुढे कशी मांडत ही दुसरी अडचण होती. भारतात असताना परदेशी लोक भारतीयांकडे एक 'आ' करून तरी पहात रहातात किंवा आवंढा तरी गिळतात. साधारणपणे भारतातल्या श्राव्य व दृश्य अनुभवांमुळे ते पार भारावून जातात. याबद्दल अनेक उदाहरणे देता येतील पण कांहींसे भावनांनी भारावून गेल्याचे एक बोलके उदाहरण पुरेसे व्हावे. मार्क ट्वेन यांनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारताला दिलेल्या आपल्या भेटीनंतर लिहिले आहे, "अद्भुतरम्य स्वप्नांचा, प्रचंड वैभव आणि कमालीचे दारिद्र्य असलेला, भुताखेतांचा, आत्म्यांचा, राक्षसांचा आणि अल्लादीनच्या जादूच्या दिव्यांचा, हत्ती-वाघांचा, शंभर देशांनी बनलेल्या राष्ट्राचा, शेकडो जिभांचा, वीस लाख देव-देवतांचा, मानवतेची जन्मभूमी असलेला, मानवी बोलीभाषेला जन्म दिलेला, इतिहासाची जननी, आख्यायिकांची आजी आणि रूढींची पणजी असलेला हा भारत देश आहे."
साम्राज्यशाहीच्या कालावधीत भारताबद्दलचे समज काहींसे वेडेवाकडे, दिशाभूल करणारे झाले होते. यालाच एडवर्डने पश्चिमेचे पौर्वात्यपुराण (orientalism) असे नांव दिले होते. पाश्चात्यांच्या मते पौर्वात्य देश म्हणजे जगाची अपरिचित अशी 'दुसरी' बाजू होती व त्यांच्या मते तिथे त्यांना परिचित असलेल्या लोकांपेक्षा वेगळे आणि चमत्कारिक लोक तिथे रहात. बहुतेक सर्व इंग्लिश लोकांना भारतीय लोक एक तर खूप आवडायचे किंवा भारतीय लोकांचा धिक्कार करावासा वाटे. पाश्चात्यांना आपला देश न जोडता येण्याइतका विभागलेला, अध्यात्मात प्रगत असलेला, ताब्यात ठेवण्यास अतीशय अवघड असलेला, साधेपणामुळे पूर्णपणे आत्मनिर्भर असलेला, पैशाच्या लोभापायी कुठलेही दुष्कृत्य करायला तयार असलेला, कामातून गेलेला, सर्व ऐहिक गोष्टींबद्दल पूर्णपणे उदासीन असलेला, पूर्णपणे गूढ किंवा अंतरंग पूर्णपणे उघड करणारा असे स्वभावाचे परस्परविरोधी पैलू असलेला देश वाटे. तसेच त्यांच्या मते भारतीय म्हणजे एक तर शताळशी किंवा विस्मय वाटण्याइतके उद्योगी, अतोनात अंधश्रद्ध किंवा असामान्यपणे विकसित, किळस येण्याइतका लांगूलचालन करणारा किंवा नेहमीच बंडखोर असलेला, अतीशय गुणवान किंवा उघड-उघडपणे नक्कल करणारा, अतीशय सुसंस्कृत किंवा अतीशय गरीब, म्हणजेच थोडक्यात सर्वगुणसंपन्न! ब्रिटिशांची हुशारी एकाद्या विशिष्ट गोष्टींबद्दल असे. उदा एकाद्या प्रदेशातल्या वनस्पती किंवा प्राणिजात किंवा भूगोलासंबंधीचे लिखाण. पण बर्याचदा विशिष्ठ गोष्टी लिहिताना असल्या निवेदनांत सहजपणे सर्वसामान्य, न अभ्यासलेली वर्णनेही घुसडली जात. संस्कृतचा गाढा व्यासंगी असलेला आणि हिंदू तत्वज्ञान अभ्यासण्यासाठी सारे आयुष्य भारतात व्यतीत केलेला जर्मन अभ्यासक मॅक्समुल्लर नेहमी "भारतीय लोक अतीशय प्रामाणिक असतात" असा दावा तावातावाने करीत असे.
स्वातंत्र्ययुद्धात महात्मा गांधींचे नेतृत्व, जातीय एकोप्याब्द्दलची महात्मा गांधींची वैयक्तिक बांधिलकी आणि ब्रिटिशांना हरविण्याचे डावपेच म्हणून त्यांनी अंगिकारलेले अहिंसेचे व्रत या सर्व गोष्टींमुळे जगात भारताची एक सहिष्णु आणि अहिंसक राष्ट्र अशी नवीन प्रतिमा निर्माण झाली होती. पं. नेहरू खूप वर्षें पंतप्रधानपदी राहिले व या काळात करोडो लोकशाहीवादी भारतीय लोक सांप्रदायिकता सोडून आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची खटपट करत आहेत असे आणखी एक चित्र जगाला दिसले. तरीसुद्धा या देशात स्पष्ट दिसणारे वैविध्य आणि सांस्कृतिक रूढींमधील गुंतागुंत या दोन गोष्टींमुळे भारताबद्दल अचूक आणि सखोल ज्ञान होण्यात अडचणी येत होत्या. नेहरूंचे मित्र असलेले व भारतात राहिलेले अर्थतज्ञ श्री. जॉन गॉलब्रेथ यांनी भारताचे "व्यवस्थित चालणारी अंदाधुंदी" असे वर्णन केले आहे. (कांहीं वर्षांनी मात्र त्यांनी मान्य केले कीं ते सनसनाटी विधान त्यांनी केवळ स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी केले होते.)
१९९१ सालची आर्थिक सुधारणा व १९९८साली केलेली अण्वस्त्रचांचणी या दोन घटनांमुळे भूगोल, अर्थशास्त्र व लोकसंख्याशास्त्र यांच्या सहाय्याने राजकीय डावपेच रचणार्या पाश्चात्यांच्या 'रडार'वर भारताचा ठिपका जरा ठसठशीत दिसू लागला. 'इकॉनॉमिस्ट' या वृत्तपत्राने "शेवटी एकदाचा जागा होऊन बाजारपेठेकडे चाललेला हत्ती" असे भारताचे वर्णन केले. स्टीफन कोहन यांनी एक सुरेख संदर्भासह लिहिलेल्या लेखात "भारत आता सुपरपॉवर बनण्याच्या दृष्टीने वाटलाल करेल कीं नेहमीप्रमाणे येऊ घातलेला" देशच रहाणार असा जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. पण असे अनुभवातून उद्भवलेले प्रश्न सर्वसाधारण पर्यटकांना पडले नाहींत. पण दुर्दैवाने असे पर्यटक जितक्या संख्येने आलेले भारताला आवडले असते तितक्या प्रचंड संख्येत येत नाहींत. जे येतात ते मुख्यतः भारताची प्राचीन संस्कृती आणि निष्काळजीपणे जागोजाग विखुरलेली स्मारके पहायला येतात. अशा पर्यटकांना अध्यात्मिक भारताची ओळख असते आणि ते अशा अध्यात्माच्या खुणा दक्षिणेतील मंदिरांच्या उत्तुंग शिखरात पहातात किंवा गंगेच्या पवित्र पाण्यात डुबक्या घेणार्या यात्रेकरूंत पहातात. भारताच्या पोषाखतील आणि अन्नातील विविधतेने त्यांच्या कॅमेर्यातील चित्रफितींची रिळेच्या रिळे भरतात[१]. भारताला येतांना डोक्यात असलेले अद्भुतरम्य चित्र साठवून ठेवण्यासाठी ते हस्तकलेच्या वस्तु स्वस्तात विकत घेतात. इंग्रजी बोलण्यात प्रवीण असलेल्या भारतीय लोकात आणि शहरातील गगनचुंबी इमारतीत ते अर्वाचीन भारत पहातात. त्यांना फसविणार्या दलालात ते अविकसित देशांत सगळीकडे पसरलेला भ्रष्टाचार पहातात. घाण आणि गरीबी त्यांना घृणास्पद वाटली तरी अशा घाणीचा व गरीबीचा उगम त्यांना अध्यात्मात गढून गेलेल्या भारतीयांच्या परलोकाबद्दलच्या कल्पनांचा परिणाम वाटतो. मग शांतिप्रिय म्हणवून घेणारा हा देश अण्वस्त्रचांचणी कशी करू पहातो याबद्दल वादविवाद त्यांच्यात चालतो. पण तेवढ्यात अशी भेट संपत येते आणि हे पर्यटक "एवढा विशाल देश एकसंध कसा राहिला आहे आणि या देशातील गरीब व धड वस्त्रें न ल्यायलेले लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदानात भाग घेऊन लोकशाही जिवंत ठेवतात" याबद्दल विचार करत स्वदेशी परततात.
परदेशी पर्यटकांच्या अशा तहेच्या समजुती बर्याच प्रमाणात बरोबर असतात. भारतातील सत्य परिस्थिती एकाच वेळी पारदर्शकच आणि अपारदर्शक असते. जे दिसते त्यातही सत्याचा भाग असतो आणि जे दिसत नाहीं त्यातही! परदेशी लोक जे उघड आहे ते पहातात आणि हे पाहिलेले चित्र आपल्या थोर भारतीय संस्कृतीबद्दलच्या आधीपासून बनलेल्या मतांशी जोडतात. या प्रकारात बरीचशा गृहीतकांची चिकित्सकपणे सखोल छाननी होत नाहीं आणि बरेच निष्कर्ष चुकीचे किंवा अंशतः बरोबर असतात.
पण एक वेळ आपण परदेशी पर्यटकांना क्षमा करू शकतो. पण भारतीयांना कशी क्षमा करणार? गेली कित्येक वर्षें भारतीय नेत्यांनी आणि शिकल्या-सवरलेल्या भारतीयांनी मुद्दाम भारताबद्दलची एक चुकीची प्रतिमा जगापुढे उभी केली आहे व ती चुकीची आहे हे माहीत असूनही तिला सजवली आहे आणि चांगले हेतू असलेल्या आणि कांहींशा भोळसट परदेशी निरीक्षकांना व कधीकधी अभ्यासकांनाही ही चुकीची प्रतिमा स्वीकारण्यासाठी मुद्दामहून प्रोत्साहन दिले आहे. याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते स्वतःच या खोट्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ती प्रतिमा चुकीची आहे हे मान्य करायला तयार नाहींत!
ही प्रतिमा तर्कशास्त्राच्या एका प्रचंड उडीमुळे निर्माण झाली आहे, "काय आहे"च्या जागी "काय असायला हवे" हे घुसवून केलेली एक विचारसरणीची हातचलाखीच जणू! कशी ते पहा! भारताने १९४७ सालापासून संसदीय पद्धतीची लोकशाही राबविली आहे. याचाच अर्थ असा कीं भारतीय लोक हे स्वभावाने व प्रवृत्तीने लोकशाहीवादी आहेत हे कुणीच नाकारू शकणार नाहीं. कित्येक धर्म भारतात जन्मले, फुलले आणि वाढले. म्हणजेच भारतीय लोकांचा दृष्टिकोन नक्कीच अध्यात्मिक आहे. वेगवेगळ्या धर्मांना भारतात आसरा मिळालेला आहे व त्यामुळे भारतीय लोक स्वभावाने खूपच सहिष्णु आहेत. गांधीजींनी केवळ अहिंसेच्या मार्गाचा वापर करून आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणजेच भारतीय लोक शांतताप्रिय आणि हिंसाविरोधी आहेत. हिंदूंचे तत्वज्ञान मर्त्यलोकाला एक तात्पुरते व क्षणभंगूर समजते .त्यामुळे हिंदूंचे मृत्यूनंतरच्या जगाकडे लक्ष असते व ऐहिक वैभवाच्या विचारांबद्दल ते उदासीनच असतात. भारताने अनेक तर्हेची विविधता जोपासली आहे आणि म्हणून भारतीय लोक सर्व धर्मातील चांगल्या बाबी स्वीकारणारे आणि उदारमतवादी असतात, वगैरे वगैरे.
भारत आज खूपच जास्त महत्वाचा देश बनला आहे व येणार्या पुढील कांहीं दशकात त्याचे महत्व लक्षणीयरीत्या वाढण्याची क्षमता भारतीयात आहे. त्यामुळे भारताने अशा मुद्दाम सोप्या केलेल्या कपोलकल्पित दंतकथांत अडकून पडणे योग्य नाहीं. १९४७ साली अशा दंतकथांच्या वाढींना प्रोत्साहन देण्याची कदाचित गरज असेल. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रात जिवंत रहाण्याची, टिकून रहाण्याची क्षमता किती आहे याबद्दल सारेच खूप साशंक होते. आपली राज्य करण्याची क्षमताही अद्याप कमकुवत होती. त्यात फाळणीमुळे जातीय ऐक्य कितपत राहील याबद्दलची आशाही खूप रोडावली होती. आपले राष्ट्र एकसंध राहील याबद्दल छातीठोकपणे सांगणे अशक्य होते. अशा परिस्थितीत सगळीच राष्ट्रे जनतेत ऐक्य निर्माण करण्यासाठी अशा कपोलकल्पित दंतकथा वापरतात. आणि भारताला असे ऐक्य निर्माण करण्याची गरज इतर राष्ट्रांपेक्षा खूपच जास्त होती. पण एका नव्याने जन्मलेल्या व नव्याने उभ्या राहिलेल्या राष्ट्राच्या सरकारासाठी योग्य असलेला हा उपाय नंतर जाणून-बुजून कायमची फसवणूक होऊन बसला. अशा दंतकथांमध्ये कणभर सत्याचा अंश असल्यामुळे हुशार आणि धूर्त निरीक्षकांनाही मूळ वस्त्र आणि त्यावरील विणकाम यातला फरक समजायला कांहीं वेळ लागला. पण प्रतिलेला मूर्तरूप देणार्या व्यवसायिकांनी केलेल्या प्रतिपादनावर फक्त टीका करणे पुरेसे नाहीं कारण ही बाब त्याहून खूपच जास्त गंभीर आहे. सत्यस्वरूपाला मुद्दाम देण्यात आलेले हे विकृत रूप दोन क्षेत्रात भारताच्या लांबच्या पल्ल्याच्या हितांना हानीकारक आहे हे समजून घेणे महत्वाचे आणि म्हणूनच अत्यावश्यक आहे. ती दोन क्षेत्रे आहेत नजीकच्या भविष्यकाळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीयांमधील अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांना आणि त्यांच्या क्षमतेला ओळखणे आणि जोपासणे आणि जगातील इतर लोकांत ऊठ-बस करू पहाणार्या भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेबाबत योग्य मूल्यमापन करणे
भूतकाळातील खोट्या समजुतींचे निर्मूलन परिणामकारकपणे करण्यासाठी मोठे धैर्य लागते कारण असे करणे म्हणजे सरकारच्या प्रस्थापित विचारसरणीला आव्हान देण्यासारखे आहे. पण हे काम लांबणीवर टाकून किंवा थातुरमातुर पद्धतीने उरकून चालणार नाहीं कारण असे करण्याने भारताचे खूप नुकसान होणार आहे. आजच्या परिस्थितीत अशा एका बौद्धिक 'तेजाबा' ची गरज आहे जे आपल्या बेगडी विश्वावर निर्भर रहाणार्या वेडगळ कल्पनांना विरघळवून टाकू शकेल आणि कांहीं पायाभूत प्रश्न स्वतःलाच विचारायची आपल्यावर सक्ती करेल. ५००० वर्षांच्या संस्कृतीच्या मुशीतून बाहेर पडलेल्या भारतीय उच्चभ्रू समाजाने इतक्या सहजपणे गुलामगिरी कशी पत्करली आणि ते मॅकॉलेचे आदर्श विद्यार्थी कसे बनले? केवळ आपल्या अहिंसाप्रिय स्वभावामुळे आक्रमकांना आपल्यावर वारंवार स्वारी करून आपल्यावर विजय मिळविणे शक्य झाले काय? कीं आपल्याहून जास्त शक्तिशाली असलेल्या शत्रूचे वर्चस्व स्वीकारण्याच्या-आणि गरज पडल्यास-त्याच्याबरोबर संगनमत करण्याच्या स्वभावामुळे आपण गुलाम बनलो? आपण भारतीय श्रीमंतांपुढे व शक्तिशाली शत्रूसमोर इतक्या क्षुद्रपणे लोटांगण कां घालतो? तसेच आपल्यातील गरीबांच्या आणि दुर्बलांच्या हाल-अपेष्टांबाबत इतके उदासीन कां असतो?
सामाजिक आणि आर्थिक पद्धतींत इतके ढळढळीत वैषम्य असूनही स्वातंत्र्यापूर्वी किंवा ते मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारची रक्तलांछित हिंसक राज्यक्रांती भारतात झाली नाहीं. हेसुद्धा आपल्या मूलभूत अहिंसक स्वभावाचे द्योतक आहे काय? कीं त्याचे उत्तर इतरत्र शोधावे लागेल? महात्मा गांधींसारझे उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या देशाला एक सचोटीचे आदर्श म्हणून लाभले आहे त्या देशाने इतक्या अल्पकाळात इतके अविश्वसनीय पातळीवर भ्रष्ट कां व्हावे? आपले ईप्सित आपण योग्य साधनांनीच साध्य करून घेतले पाहिजे या तत्वाचे आपण इतके अवमूल्यन केले आहे कीं आपले ईप्सित साधण्यासाठी कुठलेही बरे-वाईट साधन वापरायला तयार झालो आहोत काय?
आपल्या धर्मातील संख्येने सर्वात जास्त असलेल्या एका समाजावर-दलितांवर-ज्या हिंदूंनी अस्पृश्यता लादली आणि चातुर्वण्याच्या नावाखाली त्या समाजाला दूर ठेवण्याची जगातील एक सर्वात कडक अशी प्रणाली राबविली त्या समाजाला स्वतःला सहिष्णु म्हणवून घ्यायचा दावा करायचा हक्क तरी आहे काय? जर नसेल तर या देशात सर्वधर्मसहभाव का टिकला आहे? आणि येत्या कांहीं वर्षात तो आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो? समाजातल्या श्रेणी आणि स्थान यांच्या महात्म्याबाबत धूर्तपणे मतैक्य बनविणारे आणि अशा विषमतेला स्वीकारणारे आपण स्वतःला लोकशाही प्रवृत्तीचे कसे म्हणवून घेतो? आणि जर म्हणवून घेत नसू तर आपल्या देशात सांसदीय लोकशाही जगलीच नव्हे तर बहरली कशी? ज्या देशातले सुशिक्षित लोक घरकामाला असलेल्या नोकराना ते अर्धमेले होईपर्यंत मारतात, ज्यांच्यावर खटला चालू आहे अशा लोकांकडून कबूलीजबाब काढण्यासाठी त्यांना अंध करतात किंवा जास्त हुंड्यासाठी बायकांना ठार मारतात असे लोक अहिंसक म्हणून कसे मिरवू शकतात? जर नसेल तर गांधीजींचे जुने अहिंसेचे डावपेच कसे काय यशस्वी झाले आणि नेताजी आणि भगतसिंग यांच्यासारख्यांच्या क्रांतिकारी उन्मादाला इतके मूठभरच अनुयायी कां मिळाले?
कुठल्याही पुनर्मूल्यांकनाच्या प्रयत्नामध्ये सर्वात मूलगामी गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्मिक किंवा इहलोकापलीकडला विचार करणारे असे कां समजले जाते? मग आपण अध्यात्मिक कसे आणि ज्या अध्यात्मिकतेची आपण इतकी बढाई मारतो ती आपल्या आयुष्यात कुठली भूमिका पार पाडते? जात, संस्कृती आणि भाषा याबाबत इतकी विविधता असलेला आपला देश अद्याप एकसंध कसा राहिला? तो असा एकसंध राहिला ते भारतीयांचा 'आत्मा' एक असल्यामुळे कीं बळे-बळे जोपासलेल्या भव्यतेऐवजी स्वतःबद्दलच्या आपल्या स्वतःच्या विचारांशी एकरूप असणार्या "सकल-भारतीयत्वा"च्या वाढत्या जाणिवेमुळे, भले मग ती इतकी भव्य-दिव्य नसली आणि आपण जसे आहोत त्या सत्याच्या जवळ असली तरी?
वरील प्रश्नांना थंड डोक्याने उत्तरे देणे जरूर आहे. हे प्रश्न टीकेचे मोहोळ उठविण्यासाठी किंवा कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी विचारलेले नाहींत. त्या प्रश्नाचे तसे मूल्य कांहींच नाहीं, ते केवळ आपले पुनर्मूल्यन करण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तरे देण्याचा जो विचार आम्ही केलेला आहे त्या उत्तरांतच या पुस्तकाचा उद्देश दडलेला आहे आणि त्या उद्देशाचा निष्कर्ष इथे फायदेशीरपणे काढता येईल. भारतीय लोक सत्तेच्या बीजगणिताबाबात अतीसंवेदनाशील असतात. सत्ता मिळविणे म्हणजे आयुष्याची एक कायदेशीर महत्वाकांक्षापूर्ती आहे असे ते समजतात आणि सत्तापदावर रुळण्यात आणि सत्ता कुठे केंद्रित झाली आहे हे शोधण्यात ते आपली खूप हुशारी दाखवितात. सत्तेवर असलेल्यांबद्दल ते आदर बाळगतात आणि त्यांच्याबरोबर स्वार्थापोटी सहकार्य आणि संगनमत करायला उत्सुक असतात. सत्ता मिळविण्यासाठी गटबाजी करायला किंवा कारस्थाने शिजवायला ते एका पायावर तयार असतात. जे सत्तेच्या मोहाचा व प्रलोभनाचा त्याग करतात त्यांचा आदर केला जातो. पण असा आदर त्यांच्या या वृत्तीचे अनुकरण करण्यासाठी नव्हे तर केवळ त्यांच्या अशा मोहावर विजय मिळविणार्या वृत्तीच्या आदरापोटी!
अलीकडील कांहीं बदल ध्यानात घेऊनसुद्धा भारतीय लोकांचा कल अधिकारपदाच्या क्रमवारीला खास करून मान देण्याकडे असतो (याबद्दल चर्चा पुढे केलेली आहे). ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात, त्यांना उपेक्षितात किंवा त्यांची हेटाळणी करतात. त्यामुळे स्वतःचे गौरवास्पद स्थान आणि स्वतःची वैयक्तिक प्रतिमा यांची जाणीव व त्यानुरूप स्वतःबद्दलच्या कल्पना याचे भारतीयांच्या लेखी खूप महत्व असते व ते त्याचे खूप स्तोम माजवतात. उपजतपणे किंवा स्वभावत: ते लोकशाहीवादी नाहींत. इथे लोकशाही इतकी सहजासहजी रुजली याचे कारण या पद्धतीने झटपट मोठे होता येते आणि वैयक्तिक सत्ता, शक्ती आणि वैभव प्राप्त करून घेता येते याची त्यांना झालेली जाणीव!
भारतीय नागरिक इहलोकापलीकडचा विचार करणारे कधीच नव्हते किंवा कधीच असणारही नाहींत. त्यांना जगात उपलब्ध असलेल्या ऐहिक सुखसोयींचा प्रचंड सोस असतो आणि ते श्रीमंतांकडे आदराने पहातात. ते नफ्यामागे इतरांपेक्षा जास्त चिकाटीने लागतात. त्यामुळे ते धूर्त व्यापारी किंवा कल्पक आणि चतुर व्यवसायी बनू शकतात. त्यांची पावले खंबीरपणे जमीनीवर असतात आणि डोळे आपल्या जमाखर्चाच्या कीर्दीवर! इहलोकाच्या 'कायद्या'नुसार भारतीय लोक अंतिम यशस्वी निकालाला महत्व देतात, तो मिळविण्यासाठी अनुसरलेल्या मार्गाला नाहीं.
भारतीयांचा अध्यात्मिक कल जरी एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून उदात्त असला तरी भारतीय लोक त्यांचा आपल्या धार्मिक चालीरीतींत केवळ सत्ता आणि वैभव मिळविण्यासाठी समावेश करतात. वाईट काळातून जाताना या तत्वज्ञानाचा उपयोग होतोच कारण त्यामुळे भारतीयांची चिकाटी वाढते. बहुतेक भारतीय इहलोकाच्या पलीकडीचा जो विचार करतात तो केवळ त्यांच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणाबद्दलच्या औदासीन्याचा भाग असतो आणि या वातावरणाचा त्यांच्या थेट फायद्याशी संबंध नसतो..इतरांमधील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्यकारकपणे व सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात म्हणजेच त्यांचा दृष्टिकोन स्वभावतःच अनैतिक असतो. हिंदु धर्मात 'निर्वाणीच्या पापा'ची (ultimate sin) कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि म्हणूनच हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे कारण जोवर लाच देण्याने आपले ईप्सित साध्य होत आहे तोपर्यंत लाचलुचपत चुकीची गोष्ट असे मानलेच जात नाहीं. भ्रष्टाचार पकडला गेला तर त्यावर जो नैतिक गदारोळ उठतो त्याची तीव्रता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात स्वीकारण्याजोगा असतो त्याच्या विषम प्रमाणात असते. उच्च विचारसरणीयुक्त नैतिकतेची कल्पना भारतीयांना एक सैद्धांतिक तत्व म्हणून प्राणप्रिय आहे पण खर्या जीवनक्रमात हे तत्व ते व्यवहार्य समजत नाहींत[२].
नेहरूंच्या किंवा पाश्चात्यांच्या व्याख्येनुसर 'आधुनिकता' म्हणजे कुठल्याही विषयाचा बुद्धीचा वापर करून अभ्यास करणे. अशी आधुनिकता सुशिक्षित भारतीयांचे जाहीर केलेले ध्येय आहे पण खरे सांगायचे तर ते ध्येय हा अंगावर चढविलेला आधुनिकतेची झूल आहे व या झुलीच्या आड भारतीयांवर असलेली रूढींची पकड लपविली जाते असे कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय आणि वस्तुनिष्ठपणे म्हटता येईल. भारतीयात आधुनिकता आणि रूढी ज्या पद्धतीने एकत्र नांदतात ती पद्धती खरोखर अनोखी आहे. शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते केवळ हिंसेच्या मर्यादा समजून घेण्याच्या बाबतीत व्यवहारी आहेत. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात, पण त्या दंगली साधारणपणे ज्या प्रकारे दाखविल्या जातात त्या स्वरूपात त्याना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होण्याची शक्यता असते अशा हिंसेच्या भारतीय साधारणपणे विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी यासारख्या सुनियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल-किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
वर दिलेली स्वभाववैशिष्ट्ये कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये आहेत पण त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.
श्री. पवनकुमार वर्मा
(मूळ लेखक व सध्याचे भारताचे भूतान येथील राजदूत)
प्रतिक्रिया
10 Dec 2010 - 10:21 pm | सुधीर काळे
पहिले प्रकरण सुमारे ५५०० शब्दांचे आहे. एवढा मोठा 'डोस' मला लिहायला आणि वाचकांना वाचायलाही जरा जड जाईल असे वाटले म्हणून या पुस्तकाच्या सर्व प्रकरणांचे २५००-२६०० शब्दांचे विभाग करून प्रकाशित करायचे ठरविले आहे. धन्यवाद.
10 Dec 2010 - 10:32 pm | आत्मशून्य
.
11 Dec 2010 - 2:55 am | निनाद मुक्काम प...
अप्रतिम व परखड मते लेखकाने मांडली आहेत .
ह्यातील पहिला मजकूर हा भारतीय महाशक्ती बद्दल अतिशयोक्ती न करता बाजारीकरणाच्या विश्वात भारतीय सुशिक्षित तरुणाई / व मोठी होणारी बाजारपेठ हेच भारतचे बलस्थान आहे . हे दाखवून दिले आहे .आज कुठल्याही देशाच्या अर्थ पुरवणी भारत व चीन शिवाय सुरु व संपत नाही .आपली गरिबी काढणाऱ्या अमेरिकन ला एकदा मी सुनावले आमचा २० % मध्यमवर्ग तुमच्या नोकर्या घेतो म्हणून बोंबा मारतात .नशीब तुमचे जर उरलेली जनता जरा अजून ४० % जरी मध्यमवर्गीय असती (आजच्या घडीला )तरी तुम्हचे अजून काही लाख लोक रस्तावर असती .सध्या तुमच्या अर्ध्या गोष्टीवर मेंड इन चायना किंवा पूर्व आशियायी देशाचे लेबल असते .काही वर्षात मेड इन इंडिया लागले तर मग रडत बसू नका .
बाकी एक भारतीय ह्या नात्याने हे पुस्तक वाचून स्वताविषयी स्वकीयान्बद्दल अधिक माहिती मिळवण्यात उत्सुक आहे .म्हणजे गोर्यांना व्यवस्थित झोडता येईल (मला भेटणारे अर्धे गोरे हे शहाणे असतात तर उरलेले भारताच्या नावाने उगाच शिमगा करणारे असतात (मग कधी उच्चार असो किंवा भारतीय गरिबी किंवा करप्शन असो )
अर्थात जेव्हा मी त्यांना सुनावतो कि तुमच्या देशाकडे उपग्रह प्रक्षेपित करायची शमता नाही .पूर्वी नासाकडे जायचा आता .आम्ही स्वतात हि कामे तुम्हाला करून देतो .(जर्मन युनिवार्सितीच्या विद्यार्थ्यांनी केलेला उपग्रह इस्त्रोने प्रक्षेपित केला तोही सस्त नि मस्त(पण तेव्हा आमच्या युनिवर्सिटी काय करत आहेत अजून ? हा प्रश्न अस्वस्थ करतो .)
वाट पाहतोय पुढील भागाची
11 Dec 2010 - 7:50 am | सुधीर काळे
निनाद,
या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतल्याचे नमके हेच कारण आहे. लेखक भारतीयांचे प्रतिबिंब फारच स्पष्टपणे ( कधी-कधी जरा बोचणार्या स्पष्टपणेच!) लिहितात, पण शेवटी त्यामुळे भारतीयांना फायदाच होईल असे वाटते.
वर्मांनी असे कांही शब्द हुडकून वापरले आहेत कीं भाषांतर करताना आधी अनुमान केले होते त्यापेक्षा अंमळ जास्तच वेळ लागत आहे. उदा: 'money, wealth, prosperity' असे शब्द उपलब्ध असताना त्यांनी वापरलेला 'pelf ' हा शब्द आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या पहाण्यात आला. आधी तर स्पेलिंगची चूक तर नाहीं ना असे वाटले.
11 Dec 2010 - 6:52 am | मदनबाण
सुंदर...परत एकदा वाचीन हा लेख.
जाता जाता :--- मार्क ट्वेन यांनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारताला दिलेल्या आपल्या भेटीनंतर लिहिले आहे, "अद्भुतरम्य स्वप्नांचा, प्रचंड वैभव आणि कमालीचे दारिद्र्य असलेला, भुताखेतांचा, आत्म्यांचा, राक्षसांचा आणि अल्लादीनच्या जादूच्या दिव्यांचा, हत्ती-वाघांचा, शंभर देशांनी बनलेल्या राष्ट्राचा, शेकडो जिभांचा, वीस लाख देव-देवतांचा, मानवतेची जन्मभूमी असलेला, मानवी बोलीभाषेला जन्म दिलेला, इतिहासाची जननी, आख्यायिकांची आजी आणि रूढींची पणजी असलेला हा भारत देश आहे."
मार्क ट्वेन यांची आत्मकथा त्यांच्या मॄत्युच्या तब्बल १०० वर्षांनी प्रकाशित होत आहे...
अधिक माहिती इथे वाचा :--- http://www.saamana.com/2010/November/21/Link/Utsav4.htm
11 Dec 2010 - 7:00 am | अरुण मनोहर
सुधीरजी, खूप धन्यवाद.
एक अतिशय सखोल आणि मार्मिक लिखाण आम्हाला वाचायला दिल्यासाठी तुमचे कितीही आभार मानले तरी पुरेसे नाही.
लेखक श्री. पवनकुमार वर्मा ह्यांची निरीक्षण शक्ती आणि विस्तारात पसरलेले शेकडो मुद्दे एकत्र सुसुत्रपणे वाचकांसमोर ठेवण्याची खुबी वाखाणण्याजोगी आहे. पुढचे वाचायला खूप उत्सुक आहे.
11 Dec 2010 - 9:52 am | गांधीवादी
भारतीयांचे चित्र नव्याने पुढे येत आहे.
>>या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतल्याचे नमके हेच कारण आहे. लेखक भारतीयांचे प्रतिबिंब फारच स्पष्टपणे ( कधी-कधी जरा बोचणार्या स्पष्टपणेच!) लिहितात, पण शेवटी त्यामुळे भारतीयांना फायदाच होईल असे वाटते.
असेच होवो.
आपल्याला शतश: धन्यवाद. पुढचे वाचायला उत्सुक आहे.
11 Dec 2010 - 10:04 am | पिवळा डांबिस
भयानक सर्कारी बोअर मारला!!!!!
एखाद्या सनदी अधिकार्याने रिपोर्ट लिहावा असंच अवाचनीय लिखाण आहे...
आता भिस्त फक्त तुमच्यावर आहे का़ळेकाका!!! :)
तुम्ही आता तुमचं भाषांतरकाराचं स्किल वापरुन जर हे लिखाण वाचनीय कराल तर खरं!!!:)
(वाचा: पिग्मॅलियनचं भाईकाकांनी केलेलं भाषांतर, ती फुलराणी!!!)
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व!!!!
13 Dec 2010 - 10:20 am | विश्वनाथ मेहेंदळे
अवांतर :- ती फुलराणी हे पिग्मॅलियनचं भाषांतर नाही. रुपांतर म्हणता येईल. काही ठिकाणी संवाद बरेचसे सारखे आहेत म्हणे, पण ते भाषांतर नाही.
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व!!!! :-)
11 Dec 2010 - 10:48 am | सुधीर काळे
स्पष्टोक्तीबद्दल धन्यवाद! माझी क्षमता आहे तितके मी सोपे करतोच आहे. पण 'भाई' कुठे आणि मी कुठे!! तरी होता होईल तितका नक्कीच प्रयत्न करेन. मूळ इंग्रजी पुस्तक वाचल्यास ते मी आधीच किती सोपे केले आहे ते लक्षात येईल.
पण हे लिखाण ज्यांना या विषयात रस आहे त्यांनाच आवडेल. सगळ्यांना कदाचित् आवडणार नाहीं.
11 Dec 2010 - 10:58 am | पिवळा डांबिस
मूळ इंग्रजी पुस्तक वाचल्यास ते मी आधीच किती सोपे केले आहे ते लक्षात येईल.
बापरे!! हे मराठी वाचतानाच बोअर मारून दम उखडला तर मूळ इंग्रजी पुस्तक कशासाठी वाचायचं?
बाकी या विषयात जरूर रस आहे पण हे लिखाण वाचनीय करा एव्हढंच विनम्र मागणं आहे....
बाकी तुमची मर्जी....
:)
11 Dec 2010 - 11:18 am | सुधीर काळे
Feedback बद्दल आभार!
मी पुरेपूर प्रयत्न करेन. आपल्यासारखे चोखंदळ वाचक असल्यावर लेखकाला नक्कीच जोश येतो. पुनश्च धन्यवाद.
12 Dec 2010 - 8:45 am | पिवळा डांबिस
थेंन्क्यू!!!
काळेकाका, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती!! अभिनंदन!!
:)
एनिवे, ह्या होऊ घातलेल्या कलाकृतीला माझ्या मनापासून शुभेच्छा!!!
11 Dec 2010 - 11:50 am | विलासराव
तुम्ही लिहा. आम्ही आहोतच वाचायला.
11 Dec 2010 - 12:48 pm | इन्द्र्राज पवार
मी प्रस्तावनेच्या प्रतिसादात म्हटले होते की मुळात श्री.सुधीर काळे यांच्या मनातीलच विचार श्री.वर्मा यांच्या इंग्रजी लिखाणात त्याना सापडल्याने ते केवळ For the sake of translation करीत नसून एकप्रकारे आपल्याच विचाराना इथे मूर्त स्वरुप देत आहेत, इतके ते सकस उतरले आहे. एका सुंदर पुस्तकाच्या वाचनाचा लाभ होईल यात संदेह नाही.
श्री.वर्मा यानी उल्लेख केलेल्या "पण दुर्दैवाने असे पर्यटक जितक्या संख्येने आलेले भारताला आवडले असते तितक्या प्रचंड संख्येत येत नाहींत. जे येतात ते मुख्यतः भारताची प्राचीन संस्कृती आणि निष्काळजीपणे जागोजाग विखुरलेली स्मारके पहायला येतात" या विधानांची प्रचिती मी कित्येकदा प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्याला प्रमुख कारण आजही भारत सरकारच्या टूरिझम डिपार्टमेन्टची अक्षम्य बेपर्वाई. भारतात येणारा परदेशा पर्यटक हा फक्त ताजमहाल आणि खजुराहोची शिल्पे पाहाण्यास येतो इतपतच यांच्या ज्ञानाची भरारी असल्याने ते नेमत असलेले गाईडही त्याच मुशीतील असतात. आज भारताची वैज्ञानिक आणि आर्थिक क्षेत्रातील भरारी पाश्चिमात्य नेत्यांच्या काळजीचा विषय होत चालला असताना ही ठिकाणे खरे तर पर्यटकांचे आकर्षण बनली पाहिजेत. इथल्या किती टूरिस्ट कंपन्या बाहेरून आलेल्यांना पुणे, बंगलोर, हैद्राबाद येथील आय.टी.पार्क्स तसेच बहरून गेलेली विद्येची प्रांगणे दाखविण्यास उत्सुक असतात? का दाखवू नये युरोपियन्सना या क्षेत्रात भारत सुपर पॉवर का होत चालला आहे? फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पदवीधर भारतात आहेत हे श्री.वर्मा म्हणतात....मग ही बाब फ्रान्सच्या पर्यटकाला समजली तर त्याला इथल्या शैक्षणिक विश्वाविषयी आदरच वाटेल ना? पण दुर्दैवाने या खात्याकडून या पर्यटकांना वरील दोन स्थळे दाखविल्यानंतर पुढे दाखविले जाते ते 'पुंगी वाजवून नागाला डोलायला लावणारा गारूडी..." आणि लोककलेच्या नावाखाली कुठल्यातरी खेड्यातील आदिवासी नृत्ये ! मग त्यावर किल्कक्लिक करत फोटोंची रिळे संपविली जाणारच ! दोन दिवसात अमेरिकन आणि युरोपिअन पर्यटक कंटाळून जातात इथे असली दृष्ये पाहून. महिनाभराचे प्लॅनिंग केलेले असल्याने उरलेली तीन आठवडे मग पणजीत येऊन बीअर ढोसत पडून राहतात बीचवर....!
इन्द्रा
(एक शंका : श्री.सुधीर काळे यांच्यासाठी -- तुम्ही वर एका प्रतिसादात "श्री.वर्मा यानी उदा: 'money, wealth, prosperity' असे शब्द उपलब्ध असताना त्यांनी वापरलेला 'pelf ' हा शब्द आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या पहाण्यात आला." असे म्हटले आहे. त्यानी वापरलेली ही टर्म नेमक्या कोणत्या संदर्भात घेतली आहे, याबद्दल काही माहिती मिळेल? म्हणजे मला असे म्हणायचे आहे की "Pelf" ही संज्ञा प्रामुख्याने अवैध मार्गाने जमा केलेल्या वा मिळविलेल्या संपत्ती आणि मानाविषयी वापरली जाते. उदा. Daud Ibrahim possesses pelf in abundance. पण असे आपण बिल गेट्सच्या संपत्तीबद्दल म्हणू शकत नाही.)
11 Dec 2010 - 3:53 pm | सुधीर काळे
http://www.merriam-webster.com/dictionary/pelf या दुव्यावर या शब्दाचा अर्थ money, riches एवढाच दिला आहे पण त्यासोबत दिलेल्या उदाहरणात 'तसा' वास येतो!
मी जी on line dictionary वापरतो त्यात उदाहरणही दिलेले नाहीं.
पण मुख्य मुद्दा हा होता कीं हा शब्द मला पहिल्यांदाच भेटला आणि हे मी उदाहरण म्हणून दिले. असे अनेक शब्द मला या पुस्तकात भेटत आहेत!.
11 Dec 2010 - 6:10 pm | इन्द्र्राज पवार
वेबस्टरसारख्या प्रतिष्ठित आणि दर्जाच्या समजल्या जाणार्या कोषाने सटीप अर्थ न देता इतक्या गोंधळात टाकणार्या, आणि सहसा कमी वापरात्त असलेल्या शब्दाचा वरवरचा अर्थ देणे मला आश्चर्याचे वाटते सुधीर जी. [त्यातल्या त्यात तिथे उदाहरण तरी मूळ अर्थाच्या जातीतील दिले आहे.]
अमेरिकन हेरिटेज डिक्शनरीमध्ये Pelf चा अर्थ दिला आहे : Wealth or riches, especially when dishonestly acquired. तर...
सेंच्युरीमध्ये आहे : Money; riches; as a contemptuous term.... ill-gotten wealth.
शिवाय उदाहरण म्हणून दिलेले खालील वाक्य अगदी अचूक आहे Pelf नजरेसमोर आणते :
John is playing the dirtiest political game sacrificing national security for pelf and power. He should be called to prove or booked under National Security Act.
असो.
इन्द्रा
11 Dec 2010 - 8:32 pm | सुधीर काळे
मी न्यूक्लियर डिसेप्शन करताना आणि आताही http://khandbahale.com/englishmarathi.php? ही on line English-Marathi Dictionary वापरतो. त्यात जर एकादा शब्द नसला तर ही वेबसाईटच इतर संदर्भ देते. या शब्दाच्या बाबतीत तो प्रश्न आलाच नाहीं कारण 'पेल्फ' हा शब्द होताच!
Their spiritualism, although lofty in its metaphysics, is in religious practice mostly a means to harness divine support for power and pelf. या वाक्यात हा शब्द आलेला आहे व त्यात पैसा गैर मार्गाने मिळविणे असा अर्थ कांहींसा दूरान्वयानेच आहे. मला तरी त्यात गैरमार्गाचा 'वास' आला नव्हता. आता सत्ताच वाईट असे धरले तर तसा अर्थ काढता येईल. पण मला तरी इथे तो 'तसा' वाटला नव्हता.
शेवटी पुन्हा एकदा सांगतो कीं मी ते केवळ एक उदाहरण म्हणून दिले होते. वर्मांची फारसे प्रचलित नसलेले शब्द वापरायची आवड बर्याच ठिकाणी दिसते व त्यामुळे अनुवादाला वेळ लागत आहे इतकेच.
पण pelf बद्दल सखोल चर्चा झाल्याचा फायदा झाला त्याबद्दल धन्यवाद.
11 Dec 2010 - 8:51 pm | सुनील
सर वॉल्टर स्कॉट यांची पेट्रिऑटिझम ही कविता शाळेत असताना वाचली होती (बहुतेक रेन अँड मर्टिन ह्या व्याकरणाच्या पुस्तकात चुभुद्याघ्या). त्यात पेल्फ हा शब्द आहे. त्यानुसारे ह्या शब्दाचा अर्थ अवैध मार्गाने मिळालेली संपत्ती असा काढता येतो.
Breathes there the man with soul so dead,
Who never to himself hath said,
'This is my own, my native land!'
Whose heart hath ne'er within him burn'd
As home his footsteps he hath turn'd
From wandering on a foreign strand?
If such there breathe, go, mark him well;
For him no Minstrel raptures swell;
High though his titles, proud his name,
Boundless his wealth as wish can claim;
Despite those titles, power, and pelf,
The wretch, concentred all in self,
Living, shall forfeit fair renown,
And, doubly dying, shall go down
To the vile dust from whence he sprung,
Unwept, unhonour'd, and unsung.
बाकी, भाषांतर वाचतोच आहे..
11 Dec 2010 - 4:17 pm | विजुभाऊ
परकीय आक्रमणे भारताने सहजपणे स्वीकारली
ज्या ज्या वेळेस शक्य झाले त्या वेळेस भारतीय समाजातील उच्चभ्रुंनी " बाबा वाक्यं प्रामाण्यं " हे भारतीय जनमानसावर ठसवले.
प्रश्न विचारू नका / गुरू सांगेल तेच श्रेश्ठ / पुरातन रुढीना आव्हान देऊ नका असे सांगत इथल्या समाजाची बंडखोर चिकित्सक बुद्धी ठेचून टाकली. संशोधकाना शूद्रांच्या पातळीवर बसवले आणि पढतमूर्ख पोपटाना वंद्य मानले.
प्रत्यक्ष उत्पादन करणाराना जगण्याचा दर्जा नाकारला.
वर्णव्यवस्था हीच या समाजाचा आधार आहे असे सांगत अनेकाना शिक्षणच नाकारले. ते कसे योग्य आहे असे सांगणार्या स्मृती लिहवल्या .
या मुळे या देशात भौतीक चिकित्सेपेक्षा आदीभौतीक चिकित्सा वाढीस लागली.
या मुळे अधीकार पदावरील व्यक्तीस जाब विचारण्याचा हक्कच नाही असे लोकांच्या मनात ठसले. धर्माबद्दल चिकित्सा तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नाकारलीच आहे. त्यामुळे इथल्या समाजाचे एक डबके बनले.
त्यामुळे स्वतन्त्र बुद्धीने वागणे कसे असते हे इथला समाज विसरत चालला.
एखादा शिवाजी , एखादे गुरु गोविन्दसिंह एखादा राणाप्रताप चमकले ते अपवाद.
समुद्र उल्लंघन हे रौरव किंवा पयान्तकाच्या शिक्षेसम पात्र आहे अशा खुळचटआ कल्पनांमुळे नव्या दिशा शोधण्यासंबन्धी देखील वाटा बंद केल्या गेल्या.
हा समाज या सगळ्या रुढींमधून हळूहळू बाहेर पडत आहे. स्वतःच्याच इतिहासाचे ओझे अडचणी उचलत प्रगतीच्या दिशेने निघाला आहे. ठेविले अनन्ते तैसेची रहावे या मनोवृत्तीतून बाहेर येत आहे.
ही खरोखर उत्तम गोष्ट आहे.
11 Dec 2010 - 5:33 pm | सुधीर काळे
अगदी हेच या पुस्तकात सांगितले आहे. पुढील भागांची प्रतीक्षा करा.
11 Dec 2010 - 4:22 pm | निनाद मुक्काम प...
@मग ही बाब फ्रान्सच्या पर्यटकाला समजली तर त्याला इथल्या शैक्षणिक विश्वाविषयी आदरच वाटेल ना?
म्हणूनच फक्त आय टी नाही तर इतर संशोधक शेत्रासाठी भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी फ्रांस ची अहमिका लागली आहे .(येथ वर्षात भारतीय विद्यार्थांचे आपल्या देशात प्रमाण तिप्पट व्हावे म्हणून प्रयत्न चालले आहेत ) जर्मनीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी विसा व पुढे स्थायिक होण्यासाठी विसा नियम शिथिल केले आहेत (देशाच्या प्रगतीसाठी कुशल उच्चशिक्षित लोक त्यांना हवी आहेत )युके सर्वात आधी ऑस्टेलिया पासून पोळलेले सर्व विद्यार्थी आपल्याकडे आकृष्ट केले आहेत .(त्याच वेळी तेथे तैम पास करणाऱ्या) विद्यार्थ्यांना माघारी पाठवले आहे . अजून अनेक देश युरोपातले भारतीय विद्यार्थ्यांसाठी आपले द्वार येत्या काळात मोकळे होतील (तेव्हा पालकांनी पाल्यांना परकीय भाषा कॉलेज जीवनात शिकवली पाहिजे ,)
'
11 Dec 2010 - 5:36 pm | सुधीर काळे
अगदी बरोबर, निनाद!
विजूभाऊंनी लिहिलेल्या परिस्थितीतून बाहेर पडून भारत आता स्वतःचे स्वत्व जागृत करू लागला आहे.
12 Dec 2010 - 2:18 pm | सुधीर काळे
Pelf या शब्दाबद्दल मला माहीत नसलेली माहिती दिल्याबद्दल इंद्रा-जींचे आणि सुनिल-जींचे मनःपूर्वक आभार!