"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!"
पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते.. शेवटी मीच पांढरं निशाण दाखवून उद्या टीफीन मध्ये पोहे द्यायचं कबूल केलं..
दुसरे दिवशी बटाटे पोहे केले.. शेंगदाणे घालून केले अगदी! वर बचक भर कोथिंबीरही घातली. वाटलं.. आज दुपारी लेकरू हसत हसत बस मधून उतरेल आणि पोहे छान केले होतेस असं काहिसं म्हणेल. पण कसलं काय.. लेकरू उतरलं तेच धुसफुसत! "आता काय झालं याला?" माझं स्वगत! मग मोठ्याने.." मनू, पोहे आवडले का आज? खाल्लंस का लंच?".. माझा जरा त्याचा मूड ठिक करायचा केविलवाणा प्रयत्न! प्रचंड मोठं आठ्यांचं जाळं कपाळावर आणून 'काय बावळट आहे आपली आई!' या आविर्भावात पिलूने माझ्याकडे पाहिलं..घरी आल्या आल्या पुन्हा मी तोफेच्या तोंडी!! "यल्लो पोहाज, आई..! व्हाय कान्ट यू अंडरस्टॅन्ड? हे पोहाज आशिष ने आणले होते तसे नव्हते." इति पिल्लू. यल्लो पोहाज?? म्हणजे काय आता? माझे तर्क सुरू झाले..पण समजेना हा नक्की काय म्हणतो आहे ते.. आशिष ने आणले होते, म्हणजे आता आशिष च्या आईला जाऊन भेटले पाहिजे.. (माझ्यातल्या सुगरणीला हे चॅलेंज होतं!) कठीण आहे!
मध्ये आठवडाभर असाच गेला.. आणि एकेदिवशी संध्याकाळी मी चहासोबत खायला म्हणून दडपे पोहे केले होते. आणि पिल्लूला ते बाऊल मध्ये दिल्यावर तो एकदम किंचाळला आणि म्हणाला.."येस्स! यल्लो पोहाज!! यू नो आई.. आय वॉज टॉकिंग अबाऊट धिस्स पोहाज.. कॅन यू सेव सम पोहाज फॉर माय टूमॉरोज लंच? " आत्ता डोक्यात प्रकाश पडला हा यल्लो पोहाज म्हणजे दडपे पोह्यांबद्दल बोलत होता आणि मी त्याला कांदेपोहे, बटाटे पोहे देत होते डब्यात!
" alt="" />
माझ्या पिल्लूलासुद्धा दडपे पोहे इतके आवडताहेत ही नवी माहिती होती त्यावेळी माझ्यासाठी. याच दडप्यापोह्यांनी एकेकाळी माझ्यावरही असंच गारूड केलं होतं. तिन्हीत्रिकाळ मला दडपे पोहे खायला दिले तरी माझी अजिबात तक्रार नसायची. आणि आता माझं पिलू तीच माझी आवड घेऊन माझ्याशीच भांडत होतं. माझं मलाच हसू आलं!
दडपे पोहे! या पोह्यांच्या सोबतीने अनेक रात्री जागून सब्मिशन्स पूर्ण केली आहेत. याच पोह्यांच्या संगतीने, पन्हाळगडावर झाडाखाली बसून भावंडांसोबत गप्पा ठोकल्या आहेत. याच पोह्यांच्या साक्षीने कित्येक गुपितं शेअर केली आहेत मैत्रीणींसोबत. आणि याच पोह्यांसोबत शालेय दिवसांतल्या रविवारच्या सकाळी चटपटीत केल्या आहेत.
रविवारी सकाळी ७.३० ला सुरू होणारी रंगोली तेव्हापासून सुरू झालेला टिव्ही दुपारी १.०० वाजता छायागीत संपल्यावरच बंद व्हायचा. रंगोली, मग हीमॅन, मिकी अॅण्ड डॉनल्ड कार्टून शो, मग रामायण्/महाभारत, असे होत होत मग छायागीत! रंगोली झाली की आमची अंघोळी करण्याची घाई सुरू व्हायची. तो पर्यंत आईने स्वयंपाक घरात कांदा, कोथिंबीर, टॉमेटो, मिरच्या, ओला नारळ, तळलेले पापड अशी पोह्यांची तयारी सुरू केलेली असायची. आणि मध्येच केव्हा तरी चुर्रर्रर्र.. आवाज यायचा आणि शिंकाही यायच्या पाठोपाठ, की लक्षात यायचं आईने त्या पोह्यांवर फोडणी ओतली आहे. मग आणखीनच घाईत सगळं आवरून टिव्ही पुढे येऊन बसायचं की आई त्या लाल टोमॅटो, हिरवी कोथिंबीर आणि शेंगदाण्यांनी सजलेल्या, ओल्या नारळाचा स्वाद असलेल्या आणि शेजारी ठेवलेल्या लिंबाच्या फोडीमुळे खट्याळ वाटणार्या पिवळ्या धमक पोह्यांच्या प्लेट्स घेऊन बाहेर यायची आणि पाठोपाठ आजी एका तसराळ्यात तळलेले पापड घेऊन यायची. संपलं!!! खाली बसून चवीचवीने एक चमचा पोहे आणि त्यावर पापडाचा तुकडा... !! काय पाहिजे हो दुसरं आणिक!! मग ते रामायण, महाभारत संपेपर्यंत त्या लावलेल्या दडप्या पोह्यांची परात पूर्ण रिकामी व्हायची. आपण पोळी-भाजी जशी खातो तसा माझा भाऊ पापड्-पोहे खातो.. अजूनही!!
जितकी वर्षं फक्त दूरदर्शन वाहिनी होती तितकी वर्ष.. रविवार सकाळचा हा सगळा कार्यक्रम ठरलेला होता. टिव्हीचे चॅनेल्स बदलले, कार्यक्रम बदलले, पण दडपे पोहे नाही बदलले. ती आवडही नाही बदलली. या पोह्याचं रूपडंच इतकं सुंदर असतं.. की ती रंगसंगतीच मनाला भुरळ पाडते. लाल, हिरवा, पिवळा, पांढरा... ! या पोह्यांचे प्रकार तरी किती!!
कांदा-टॉमॅटो, आणि फोडणी घालून केलेले, नुसतच हिरवं वाटण म्हणजे मिरची-कोथिंबीर, आलं, लसूण ओला नारळ वाटून लावलेले पोहे, तूपात तिखट्-मीठ, साखर घालून, लावलेले पोहे.. फोडणीमध्येच दही घालून ती फोडणी पोह्यांवर घालून केलेले पोहे.. चिंचेचा कोळ घालून केलेले कोळाचे पोहे. कित्ती वेगवेगळे प्रकार हे!! सगळे लागणारे सगळे जिन्नस पोह्यात घालून ते कशाखाली तरी दडपून म्हणजेच घट्ट झाकून ठेवायचे.. आणि म्हणून त्याला दडपे पोहे म्हणायचं! पूर्वी पाट्या-वरवंट्यातल्या पाट्या खाली झाकून ठेवायचे म्हणे!
या दडपे पोह्यांची गम्मत अशी की, कोणत्याही पद्धतीने ते केले तरी चांगलेच लागतात. नारळाचं पाणी शिंपून केलेले पोहे.. एखाद्या नऊ वारीतल्या शालीन, घरंदाज स्त्री सारखे वाटतात. कांदा-टॉमेटो, मिरचीची फोडणी घातलेले पोहे एखाद्या नुकत्याच तारूण्यात आलेल्या मुलीप्रमाणे अवखळ वाटतात.. हिरवं वाटण लावून केलेले पोहे हे एखाद्या कोल्हापूरी (मी नव्हे! ;)) झटकेबाज स्त्री सारखे वाटतात. कोळाचे पोहे कोकणातल्या एखाद्या , अनुनासिक मधाळ कोकणीत बोलणार्या स्त्रीसारखे वाटतात. ही आपली माझी मतं आहेत.. शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!!
माझं बालपण ज्या ज्या खाद्यपदार्थांनी समृद्ध केलं त्यामध्ये दडप्या पोह्यांचा वाटा खूप मोठा आहे. लग्नानंतर सासरी आले ते दडपे पोह्याची माहेरची पद्धत घेऊनच. सासरी आधीपासूनच दडप्या पोह्याची पाककृती प्रचलीत होती.. किसलेलं आलं आणि सैंधव (शेंदेलोण)थोडंसं घालून केलेले हे पोहे आवडून गेले आणि ओलं खोबरं जसं दडप्या पोह्यात मिसळून जावं तशी मी त्या नव्या घरात मिसळून गेले. हळूहळू इकडून तिकडून अशा कमित कमी दहा प्रकारच्या लावलेल्या पोह्यांच्या पाककृती मी मिळवल्या आणि त्यांचे प्रयोग करू लागले. नुकत्यात आवडलेली एक पद्धत म्हणजे गाजर, बटाटा अगदी बारिक चिरून घ्यावा. नेहमीची मिरच्यांची फोडणी करून शेंगदाणे घालावेत, मग गाजर, बटाटा घालावा आणि थोडंसं झाकून ठेवावं. आच मंद ठेवावी.. मग गाजर आणि बटाटा शिजला की त्यात दही घालावं आणि गॅस बंद करावा. आता ही फोडणी पोह्यांवर घालावी आणि मीठ, साखर, ओला नारळ आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे घालावी. याचं प्रमाण आपल्या तिखट्/गोड्/अळणी खाण्याच्या ऐपतीप्रमाणे ठेवावे. कांदा नाही , टोमॅटो नाही.. त्यामुळे ज्यांच्याकडे तिखटाचा प्रसाद असतो त्यात चालून जातात. मी ही गणपतीच्या दरम्यान अशाच प्रसादामध्ये खाल्ले हे पोहे.
या पोह्यांबद्दल म्हंटलं तर काय लिहायचं आणि म्हंटलं तर बरंच काही लिहिण्यासारखं आहे.. पण तूर्तास इथेच थांबते.
- प्राजु
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 9:27 pm | यकु
भुंगडा नावाचा चुरमुर्याचा प्रकार पण असाच मस्त असतो/दिसतो.
कृती सेम!
24 Nov 2010 - 2:11 am | शुचि
भुंगडा की भडंग?
24 Nov 2010 - 9:15 am | प्राजु
:)
23 Nov 2010 - 9:35 pm | असुर
करावेच लागणार आज! प्रत्येकजण वेलकम - आज संध्याकाळी ७ वाजता माझ्या घरी!
--असुर
23 Nov 2010 - 9:38 pm | प्रभो
पत्ता??
23 Nov 2010 - 9:50 pm | असुर
प्रभ्याजीरावबाजी, तुम गप्रावो. तुझंतर विमानपण दुबै वरुन जाणार आहे! तू पत्ता घेऊन काय करतो? तू दुबैला एअरपोर्टावर पोहे-अल-दडप खा!
--असुर
24 Nov 2010 - 10:01 am | चिंतामणी
पत्ता????????????
23 Nov 2010 - 9:41 pm | अनामिक
पोहे म्हणजे जीव की प्राण! कोणत्याही स्वरुपातले पोहे मला आवडतात, म्हणूनच हा लेखही आवडून गेला.
23 Nov 2010 - 9:43 pm | शुचि
दडपे पोहे, साबुदाणा खिचडी हे माझीही वीक पॉईंट्स होते. दडपे पोहे - भरपूर शेंगदाणे, कोथींबीर घालून शिवाय भरपूर मोहरीची अन हिंग-हळदीची फोडणी दिलेले. अगदी प्रत्येक मोहरीचा दाणा चावत चावत मस्त उपभोग घेत (एंन्जॉय) खायचे. मला व्यवस्थित तळलेली पण न जळलेली मोहरी चावून खायला खूप आवडते.
लेखाने या आठवणी चाळवल्या तर गेल्याच पण आईची खूप आठवण येऊ लागली आहे. लेख छान झाला आहे.
23 Nov 2010 - 9:59 pm | विकास
दडपे पोहे मला देखील कुठल्याही वेळेस खायला आवडतात. लेख आवडला. फक्त दह्या बरोबरची फोडणी असलेले पोहे आवडतील का याबाबत जरा शंका येत आहे...
23 Nov 2010 - 10:03 pm | प्रभो
दडपे पोहे कहाणी मस्तच....
दडपेपोहे(खरंतर गरम गरम कांदापोहासोडून सर्व पोहे) मला हाताने खायला आवडतात...चमच्याने नाही..
23 Nov 2010 - 10:45 pm | माजगावकर
पहिल्यांदाच ऐकतोय हे नाव.. भडंग ऐकले होते.. ते अन् हे एकच तर नाही ना?
23 Nov 2010 - 11:08 pm | कौशी
सुन्दर लिखाण प्राजुताई,
वाचता.वाचता दड्पे पोह्याची चव अगदी जिभेवर अनुभवली.
23 Nov 2010 - 11:09 pm | रेवती
पोहे हा प्रकार फार्फार ग्रेट आहे.
मीही सगळ्याप्रकारचे पोहे दिवसातल्या कोणत्याही वेळेला खाऊ शकते.
आता द. पो. करायलाच हवेत.
आजकाल ना क्यालरी हा शब्द शाप वाटायला लागलेला आहे.
आपण आपल्या मनानं ठरवून 'हे एवढच खायचं, ते तेवढच खायचं'....श्या...!
लेख आवडलाच आवडला! पोह्यांइतकाच चवदार!
27 Nov 2010 - 11:30 am | शाल्मली
पोह्यासारखाच चवदार लेख !
दडपे पोहे हा माझाही अत्यंत आवडता पदार्थ आहे. त्याचबरोबर मटार पोहे, फ्लॉवर पोहे हेही आवडतात.
खूप दिवसात केले नाहीत दडपे पोहे.. आता करायलाच हवेत.
23 Nov 2010 - 11:49 pm | प्रशु
माझा रविवारचा आवडता नाष्टा म्हणजे पोहे. छान लेख आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा पिल्लु बर्गर, पिझ्झा चा आग्रह न धरता पोह्यासारख्या पारंपारिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चागल्या गोष्टीचा आग्रह धरतोय...
23 Nov 2010 - 11:58 pm | सुनील
वा! पोह्यांइतकाच मस्त लेख!
माझी व्यक्तीशः आवड म्हणजे, प्रथम कोळाचे पोहे आणि मग दडपे पोहे.
24 Nov 2010 - 12:26 am | संदीप चित्रे
दडपे पोहे म्हणजे सॉल्लिड वीक पॉइंट आहे माझा !
नुसता लेख आणि फोटू इथे दाखवून काय होणार !! :)
24 Nov 2010 - 12:59 am | चित्रा
असेच म्हणते
छान लिहीले आहेस.
24 Nov 2010 - 10:04 am | छोटा डॉन
संदीपशी सहमत ...
पोह्यासारखाच मस्त मस्त लेख आहे, पोह्याइतकाच आवडला :)
असेच अजुन येऊद्यात.
- छोटा डॉन
24 Nov 2010 - 2:03 am | स्वाती दिनेश
दडपे पोहे माझेही फेवरिट,त्याबरोबर खमंग,चुरचुरीत सांडगी मिरची आणि मिरगुंड हवीत..
तसाच खमंग लेख, प्राजु..
स्वाती
24 Nov 2010 - 9:28 am | नीधप
वाचून पण तों.पा.सु.
आता उद्या करतेच... बरोबर चुरचुरीत सांडग्याच्या मिरच्या आणि मिरगुंड...
24 Nov 2010 - 3:26 am | स्वाती२
दडपे पोह्यांसारखाच चटकदार लेख!
24 Nov 2010 - 4:48 am | बेसनलाडू
दडपे पोहे म्हटले की मला कणेकरांच्या फिल्लमबाजीतले "आज तुम्हारे लिए दडपा पोहा बनाया है, वहीच दडपो!" हे सगळ्यात पहिल्यांदा आठवते. त्यानंतर दिवाळीच्या अभ्यंगस्नानानंतर फराळासोबतच्या पाच पोह्यांतले एक ते दडपे पोहे. मग शाळेतून/कॉलेजातून/कचेरीतून घरी आल्यावर पोटात भस्म्या उठलेला असताना केलेले आणि अक्षरशः दुष्काळातून उठल्यागत खाल्लेले दडपे पोहे. लेखातला फोटो बघून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेचच खावेसे वाटू लागले आहेत.
लेखन आवडले, हे वेगळे सांगायला नकोच.
(स्मरणशील)बेसनलाडू
24 Nov 2010 - 4:12 pm | नंदन
--- सहमत आहे :), लेख आवडला.
24 Nov 2010 - 8:06 am | आत्मशून्य
आत्ताच खाल्ले.
24 Nov 2010 - 8:32 am | मदनबाण
सकाळी सकाळी खादाडीवाले धागे वाचायचे पाप करु नये ते मी केले आहे... ;)
शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!!
सेंट परसेंट सहमत... ;)
आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... आय वॉन्ट येल्लो पोहाज... ;)
(खादाड)
24 Nov 2010 - 8:37 am | स्पंदना
प्राजु पोहे लेखमाला सुरु कर. मला यातला एकच प्रकार माहीत आहे, तो नारळाच पाणी शिंपुन केलेला. बाकिचे सव्विस्तर लिही ना.
थांब जरा , पाणी सुतलय तोंडाला!
24 Nov 2010 - 8:48 am | चिंतामणी
वाचून भूक लागली.
24 Nov 2010 - 9:18 am | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार!!
अपर्णा , अगं इथे पोह्यांच्या खूप पाकृ आहेत अगं. मागची पाने चाळलीस तर नक्की मिळतील. मी ही मला जसा वेळ मिळेल तश्या लिहिन. पण, माझ्या पाकृंवर फार अवलंबून राहू नको असाच (फुकटचा)सल्ला देईन. ;)
हे पोहे प्रकार आहेच असा काय करणार. जरा सात्विक खायचं तर दूध-गूळ्-पोहे , दही पोहे.. पण पोहे हवेच. :) होना?
27 Nov 2010 - 1:19 pm | शाहरुख
दडप्या पोह्यांना कृतीचे बंधन नाही असे अपर्णा ताईंना नम्रपणे सांगु इच्छितो !
24 Nov 2010 - 9:29 am | नीधप
मस्त लिहिलंय गं.
कोळाचे कसे करतात?
24 Nov 2010 - 3:59 pm | सुनील
कोळाचे कसे करतात?
चिंच-गूळ अधिक नारळाचे दूध यांचा कोळ बनवायचा आणि तो वाफवलेल्या पोह्यांसोबत खायचा. (कुणीतरी फोटोसहित पाकृ द्या हो!)
दडप्या पोह्यासाठी पातळ पोहे वापरतात (नाहीतर दडपले जाणार नाहीत!) तर कोळासाठी मात्र जाड पोहे वापरले जातात.
वसई भागात इस्ट-इंडियन (मराठी ख्रिस्ती) मंडळीत भुजिंग हा भाजलेल्या कोंबडीचे तुकडे घालून केलेला पोह्याचा सुरेख प्रकार करतात.
24 Nov 2010 - 9:39 am | नगरीनिरंजन
सुरेख लिहीलंय. आवडलं. दडपे पोहे खाऊन फार वर्षं झालीत पण हा लेख वाचून जिभेवर ती चव पुन्हा जिवंत झाली.
24 Nov 2010 - 10:23 am | गवि
आजीची आठवण झाली.
विशेषतः आता तिच्या नसण्याची जाणीव झाली.
बकी लेख मस्तच.
24 Nov 2010 - 10:56 am | बद्दु
( कागदावरचे) दडपे पोहे आवडले.
असेच येउ द्या आणखी..आणि हो, तेवढे तळलेले पापड ही आणा हो....
24 Nov 2010 - 12:19 pm | जागु
प्राजु पोह्यांचा खमंग वास सुटलाय.
24 Nov 2010 - 12:31 pm | sneharani
मस्त पोहे मस्त लेख!
24 Nov 2010 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
हे पोहे दडपुन खायच्याच चवीचे असतात. त्यामुळेच बहुदा त्यांना दडपे पोहे म्हणत असावेत ;)
आपली फ्यावरेट डिश आहे ही.
प्राजुतै पुन्हा एकदा लिहायला लागली हे बघुन आनंद झाला. (प्राजुतै पुन्हा अॅक्टिव झाली आहे हे कोणितरी आमच्या कोदाला कळवा रे !)
24 Nov 2010 - 4:37 pm | प्राजक्ता पवार
दडपे पोहे मला कुठल्याही वेळेस खायला आवडतात. लेखदेखील पोह्यांप्रमाणेच खमंग झाला आहे.
25 Nov 2010 - 12:28 am | रमणरमा
तोंडाला पाणी सुटले !
आमच्या शेजारच्या काकू कोल्हापुरच्या आहेत त्यानी एकदा हळद ना टाकता केले होते
नारळाच्या दुधात भिजवून... त्याची पण चव मस्त होति
25 Nov 2010 - 3:43 am | प्राजु
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. :)
हॅप्पी थॅंक्स गिविंग!! हॅप्पी हॉलिडेज! :)
25 Nov 2010 - 5:59 am | गवि
लेखाची ताकद इतकी जबरदस्त आहे की अस्मादिकांनी रात्रीच्या जेवणात ऑलरेडी चार प्लेटा भरुन दडपे पोहे दडपले आहेत.आमच्यकडेही त्यात हळद नसते.
Try without it,its even better.
25 Nov 2010 - 10:54 am | जयवी
प्राजू.....तू ज्या आत्मीयतेने दडप्या पोह्यांबद्दल लिहिलं आहेस.....त्याला तोड नाही.
एक सांगू...... कदाचित तुझा विश्वास बसणार नाही...... पण मी हे पोहे कधीच चाखले नाहीयेत गं.
बघूया...कोणाला दया येते का माझी ;)
25 Nov 2010 - 11:39 am | Pain
जळवा, जळवा अजून.
25 Nov 2010 - 1:17 pm | तिमा
प्राजुताई, लेख उत्तम.
दडपे पोहे कधीही एक प्लेटवर समाधान होतच नाही. पण त्यातही तासभर पोहून आल्यावर मग खाऊन पहा, पातेलं रिकामं कराल.
26 Nov 2010 - 9:33 pm | ईन्टरफेल
काय खाता ? ताई / .........
बाजरीचभाकर अन! लाल मीरची लसुन टाकुन
खाऊन बघा?
कसी चटकदार लागते ति
तिखट खेडवळ
27 Nov 2010 - 12:25 am | शैलेन्द्र
अत्यंत खुस्खुशीत, साधा तरीहि रुचकर, संपुच नये अस वाटणारा लेख... पोह्यांसारखाच..
27 Nov 2010 - 1:37 am | प्राजु
पुन्हा एकदा मनापासून आभार!! :)
27 Nov 2010 - 2:01 am | इंटरनेटस्नेही
मस्त लेख! टोण्डाला पाणी सुटलं!
27 Nov 2010 - 5:40 am | निनाद
काय झकास लिहिलय आणि चित्रे पण!
अगदी भूकच लागली हे सकाळी सकाळी वाचून... आता करावे लागतील मला. :)
27 Nov 2010 - 1:07 pm | शिल्पा ब
पोहे...आवडता पदार्थ..पण मी कधीच दडपे पोहे खाल्ले नाहीत...आता प्रयत्न करुन बघेन पोहे करायचा
27 Nov 2010 - 9:28 pm | मस्त कलंदर
यापूर्वी मेघनाने 'सुगरणीच्या सल्ला' मध्ये पोह्यांचे वेगवेगळे प्रकार दिले होते. त्याआधी काही धागे निघाले असतील तर माहित नाही. तेव्हा मिपा सुगरणींना आणि सुगरणांना विनंती की त्यांनी आधीच्या धाग्यात भर घालावी अथवा नवीन धागा काढून त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पोह्यांची पाकृ द्यावी.
प्राजुला दहा प्रकारचे पोहे माहित आहेत, शाल्मलीने सांगितलेले फ्लॉवर पोहे आज पहिल्यांदाच वाचले तेव्हा अशा वेगळ्या प्रकारांची सचित्र माहिती आली तर फारच बरं होईल. त्याचं काय आहे, पोहे हा अंमळ भारीच हळवा कोपरा आहे.
27 Nov 2010 - 9:49 pm | रेवती
सहमत.
फ्लॉवर, मटार, वांगी या भाज्या मिक्स किंवा एकेक आवडीप्रमाणे फोडणीत परतायच्या आणि पोहे नेहमीप्रमाणे करायचे.
सगळे प्रकार छानच लागतात. अगदी वांगीपोहेसुद्धा!
मला कोळाच्या पोह्यांची कृती माहित नाही. कोणी पायरीपायरीने देत असेल तर बरे होइल.
पोहे हा माझाही हळवा कोपरा आहे. माझ्या इथे ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या इतक्या बंडल असतात कि तिखटपणा नावालाच असतो. पण भारतात खूप छान मिरच्या मिळतात, त्याचा स्वाद मस्तच!
28 Nov 2010 - 12:14 am | शिल्पा ब
थाई चिली नावाने आपल्याकडच्या मिरच्या मिळतात त्या वापरा
28 Nov 2010 - 6:22 am | रेवती
माहितीबद्दल धन्यवाद!
28 Nov 2010 - 11:38 am | अवलिया
मस्त लेख !!
:)