एका डच मैत्रिणीने सुचवले नि आम्ही निघालो बोकरैक गावाला. घरापासून रेल्वेने दोन अडीच तासांवर हे एक खुले संग्रहालय आहे आणि खेड्याशी संबंधित आहे एवढीच माहिती होती. सोबत ३५ वर्षे शिक्षिका म्हणून काम करून निवृत्त झालेली आणि बेल्जियमच्या इतिहासात आकंठ बुडालेली टीना असल्यावर त्या स्थळाची वेबसाईट उघडून बघण्याचीही गरज वाटली नव्हती. रेल्वेत बसल्याबसल्या तिने या ठिकाणची माहिती सांगायला सुरवात केली.
इ.स. १२५२ मध्ये एका फ्रेंच सरदाराने ही जंगल असलेली जमीन एका डच सरदाराला विकली. त्याने तिथे शेती सुरू केली. चौदाव्या शतकात त्या सरदार घराण्याने ती जमीन आपल्या शेतमजुरांना भाड्याने दिली. मजुरांनी तिथे घरे बांधली. एक छोटेसे गावच वसवले. नंतर जमिनीचे मालक बदलत गेले पण वस्ती मात्र शेतकर्यांचीच राहिली. शेतकर्यांची सहकारी संघटना गावचा कारभार पाहू लागली. मग गावच विकत घेतले. आणि शेवटी १९३८ मध्ये त्या शेतकर्यांनी आपले गाव लिम्बर्ग या वतनात स्वतःला सामिल करून घेतले. तेव्हापासून हे गाव अधिकृतपणे बेल्जियमचा भाग झाले.
दुसर्या महायुद्धानंतर या खेड्याची अवस्था फारच बिकट झाली होती. तेव्हा लिम्बर्ग संस्थानाने या खेड्याची ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्याची कल्पना अंमलात आणली. १२ व्या शतकापासून होत असलेले शेती आणि शेतकर्यांच्या जीवनमानातले बदल दाखवणारे स्थळ होते हे. २० वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी हे खेडे चौदाव्या शतकात होते तसे बांधण्यात आले. जुने अवशेष, जुने फर्निचर, शेतीची अवजारे, चित्रे, सैपाकाची भांडी सगळे काही जसे होते तसे ठेवले. घरे बांधण्यापासून शेतीच्या अवजारांपर्यंत कसे कसे बदल होत गेले ते इथे अनुभवायला मिळते.
मार्च ते सप्टेंबर या काळात तिथे नक्की जावे. त्या घरात त्या काळातली माणसंही भेटतात ! तसेच पोषाख, खाणेपिणे, पंचायत, प्रार्थना, नाचगाणी, खेळ सगळे सगळे जिवंत झालेले असते. अगदी कसलेल्या अभिनेत्यांसारखे ते लोक आपल्याच विश्वात राहात असतात. आपण जावे, त्यांना बघावे, प्रश्न विचारावे, गप्पा माराव्या, एखाद्याने दिला हातावर तर ब्रेड खावा आणि एखाद्या चित्रपटात वावरत असल्याचा अनुभव घेऊन आनंदी मनाने वापस यावे.
अचानक रेल्वे थांबली. एका गावाला आमच्या रेल्वेचा एक भाग निघून बोकरैकला जाणार होता नि एक भाग लिम्बर्गला. रेल्वे एक तास एकाच ठिकाणी उभी. काय झाले म्हणून चौकशी केल्यावर कळले की रेल्वेचे डबे एकमेकांपासून दूर जायला तयार नाहीत ! ये हुई ना बात ! आता खरे खेड्यात चालल्याचा फील यायला लागला ! शेवटी तिसर्याच एका गावात आम्हाला उतरवून पेशल झुकगाडीने आम्ही बोकरैकला पोहोचलो.
मोठ्ठे गेट ओलांडुन गेल्याबरोबर नकाशा बघितला. तीन भाग होते. एका भागात घरे, शाळा वगैरे; एका भागात बाजारपेठ आणि एक भाग पंचायत, एका भागात गोठे, तबेले, डुकरांचे गोठे वगैरे..
घरांकडे निघालो. घरांचे तीन प्रकार. एक म्हणजे आपल्याकडे असतो तसा वाडा. संरक्षक भिंती, फाटक, आत गेल्यावर एका बाजुला राहाते घर, दुसरीकडे गोठा,तबेला,खुराडे वगैरे आणि तिसरा भाग शेतीच्या अवजारांसाठी राखीव. श्रीमंत शेतकर्यांची घरं अशी असत. दुसर्या प्रकारात घराची रचना रेल्वेसारखी लांबच लांब असे. त्यातच तीन भागात माणसे, प्राणी आणि शेतीची अवजारे असत. झोपण्याची जागा प्राण्यांच्या जागेजवळ असे. प्राण्यांची ऊब असल्याने थंडी कमी वाटत असे. तिसर्या प्रकारची घरे मजुरांची आणि नोकरांची असत. साधे कुंपण, एक झोपण्याची आणि एक सैपाकाची खोली एवढेच घर.
बोलता बोलता एका घरात शिरलो. आधी तर शिंपलेले अंगण बघून मला भरुनच आले. फक्त त्या अंगणात एक तुळशीवृंदावन नि रांगोळी नव्हती. आत गेल्या गेल्या डाव्या हाताला आड. त्यात पोहरा सोडलेला. मग त्याला लागून यंत्रशाळा नि गोठा. अगदी बुटक्या दारातून राहात्या घरात गेलो. आपल्याकडील कोणत्याही खेड्यात बघायला मिळेल असे घर. तपशिलात थोडा फरक. भिंतीवर ख्रिस्ती संतांच्या तसबिरी, आढ्याला टांगलेले भोपळे, भिंतीवर एक बंदूक. एका बाजुला बसण्यासाठी टेबल खुर्ची. ( सोफा, दिवाण, पलंग, खाट वगैरे प्रकार नाही.) शेकोटीची जागा.
दुसरी खोली सैपाकघर. तिथे एक आजीबाई सैपाक करत होत्या. त्या काळातली हॉटप्लेट आणि ओवन सुद्धा ! फक्त हे सगळे कोळसा लाकूड यावर चालणारे. खमंग वास सुटला होता. आजीबाईंना विचारले "काय बेत आज?" म्हणाली, "लेकाने ससा आणलाय. तो तिथे शिजवून ठेवलाय. त्यासोबत त्याला कांद्याचे सॉस (कोणत्याही ग्रेवीला इथे सॉस म्हणतात ) बनवतेय." मग विचारलं काय काय घातलंय त्यात? तर म्हणे परसदारची रोजमेरी, चार मिरे नि भरपूर लोणी."
अजुन एक दार दिसले म्हणून आत गेलो तर ते कोठीघर होते. धान्य साठवण्याच्या कणगी, मोठमोठी पातेली, कढया आणि एक हातमाग. कोपर्यात एक चरखा सुद्धा होता.
पुढे अजुन एक दार दिसलं. आत एक छोटासा पलंग. त्यावर घोंगडी आणि गादी. खाली लाकडी बूट ठेवलेले. दोन जोड्या. एक लहान मुलाची असावी.
जवळच एक लंबगोल आकाराची विणलेली टोपली. त्यात मऊ अंथरून पांघरूण. तान्ह्या बाळासाठी ! ही टोपली फार महत्त्वाची. बाई बाळंतीण झाली की बाळाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी बाळाला त्या टोपलीत घालून शेकोटीच्या जवळ ठेऊन देत असत. योग्य तेच अंतर असावे याबाबत सुईण फार दक्ष असे. शेकोटीच्या जास्त जवळ बाळाला ठेवले तर मोठेपणी ते फार तापट होणार आणि जास्त लांब ठेवले तर थंड स्वभावाचे होणार असा लोकांचा विश्वास होता. मला ती खोली बघताना माझा जन्म झालेली आजोळची बाळंतिणीची खोली आठवली !
घराबाहेर पडताना आजीबाई काम आटोपून लोकरीचे विणकाम करीत बसल्या होत्या. या घराबाहेर पडून पुढे गेलो तर चर्च लागले. सगळे गावकरी पुरूष जमा झाले होते. फादर हातात बायबल घेऊन उभा होता. आणि सोबत गावचा पोलीसपाटील एक फर्मान वाचून दाखवत होता. म्हणे चर्चचे आवार फार घाण झाले आहे. गावातल्या 'पोरीबाळींनी' स्वच्छतेसाठी आपापल्या बादल्या-झाडू घेऊन शनिवारी सकाळी सात वाजता यायचे आहे. त्याचे सगळे भाषण काही मला समजले नाही. अजून एक विषय होता तो म्हणजे गावातली तरूण मंडळी बाहेरच्या कॉम्रेड्स च्या नादी लागतायत त्यांना समज देण्याबद्दल पालकांना धमकी होती !
मग शाळा लागली. ती ही आपल्या खेड्यातल्या प्राथमिक शाळेसारखी बांधलेली होती. मास्तरची रहाण्याची जागाही तीच असे. त्यामुळे ऑफीस मध्ये हीटर, टेबल-खुर्ची नि एक खाट. वर्गाच्या लहान लहान खोल्या. एका वेळी फार तर २० मुले मावतील एवढ्या. मागच्या भिंतीला कोट अडकवण्याची जागा. समोर शेकोटी, फळा आणि मास्तरचे डेस्क. भिंती धार्मिक चित्रे नि उपदेशांनी नटलेल्या. " तुम्ही जे काही करत आहात ते ईश्वर पाहात आहे " वगैरे सुविचार. एकूणच इथल्या जीवनावर चर्चचा जबरदस्त प्रभाव दिसून येत होता.
बाजुला पंचायत भरण्याची जागा होती. एका मोठ्या वृक्षाखाली पार बांधलेला. तिथे गावातले पाच शहाणे लोक बसत आणि भांडणांचा न्यायनिवाडा करत. अगदी किरकोळ शिक्षा म्हणजे बाजारातल्या खांबाला गुन्हेगाराला बांधण्यात येई. त्याने केलेल्या गुन्ह्याची दंवंडी पिटली जाई. मग दिवसभर गावकरी त्याला येताजाता अंडी टोमॅटो फेकून मारत. गंभीर गुन्ह्यासाठी सुळावर चढविण्यात येत असे.
दुसर्या प्रकारचे घर लागले. तिथे आत एक काका एकटेच पेपर वाचत बसले होते. त्यांना विचारले 'जेवण झाले का ?' तर म्हणे 'बायको गावाला गेलीय ना.. आता सैपाकपाणी काय पुरुषाचं थोडीच कामंय ! शेजारणीने बोलावलंय. जाईन थोड्या वेळाने' म्हणे "तुम्ही कॉम्रेड आहात का ? आमच्या पोरांच्या डोक्यात काहीही खुळ भरवू नका. त्याचे परिणाम वाईट होतील".
त्याच्या शेजारच्या घरात ज्या काकू सैपाक करत होत्या त्यांनीही सांगितले की "शेजारभाऊ जेवायला येणारंय.. "
इथेही खंमंग वास सुटला होता. भाजलेले चिकन, अंडी, टोमॅटो आणि कांदा घातलेला बटाट्याचा रस्सा चुलीवर रटरट शिजत होता. टेबलावर ताजा ब्रेड ठेवलेला होता.
या काकुंची परसबाग फार छान होती.पानकोबी, लाल भोपळे, शेंगा, वांगी लागलेली होती. रोजमेरी, कोथिंबिरीसारखी सेलरी घमघमत होती. काटेकोरांटी, रान गुलाब, झेंडू, शेवंत, अशी ओळखीची फुले दिसत होती. मन खुष झालं एकदम.
पण स्वादिष्ट अन्नाच्या वासाने पोटातली भूक जाणवायला लागली. त्या पेपरवाल्या काकांना विचारले इथे रेस्टॉरंट कुठे आहे तर हे काय नवीन असा चेहरा केला त्यांनी. या प्रश्नाचे उत्तर देईपर्यंत तरी त्यांनी वर्तमानात यावे म्हणून प्रयत्न केला पण नाहीच ! शेवटी इथून जुन्या शहराकडे रस्ता जातो तिथे बाजार आहे असे कळाले आणि आम्ही तिकडे मोर्चा वळवला.
खरोखर बाजार फुलला होता. ताजी फळे, भाज्या, ब्रेड, बिस्किटे, मध, चीज, वाईन आणि मांस अशी दुकाने लागली होती. एका कोपर्यात रोपवाटिका होती. तिथून पर्यटक हौसेने सफरचंद, ऑलिव अशी रोपं घेत होती. आम्ही मग गरम गरम सूप, ताजे अक्रोड आणि जिंजरब्रेड घेतला नि जवळच एका जागी बसून यज्ञकर्म उरकले. रिमझिम पावसामुळे वातावरण गार झाले होते. आता सगुणाही कंटाळली होती. टीनाआज्जीलाही थोडी विश्रांती हवी होती. मग काय समोर एक टांगा आला त्यात बसलो नि मस्त खबडक खबडक करीत आजुबाजूचा निसर्ग न्याहाळू लागलो.
सफरचंदाची झाडे फळांनी वाकलेली होती. कुरणांमधून गलेलठ्ठ मेंढ्या चरत होत्या. घोड्यांनाही चरायला मोठमोठाली कुरणे ठेवली होती. त्या काळच्या मनोरंजनाची साधने म्हणजे विविध खेळ. आपण विटी दांडू खेळतो न तसा एक खेळ होता, तिरंदाजी, भालाफेक, उंच उड्या , दोरीवरचा मल्लखांब हे ठळक ओळखू आलेले खेळ. एक नृत्यगृह पण दिसले. थोड्या वेळाने खाली उतरून चालायला सुरुवात केली.
या भागातले सर्वात जुने घर बघायला गेलो. ते बंद ठेवले आहे. गवताचे छप्पर असलेले, कुडाच्या भिंती असलेले हे घर एका संताचे होते म्हणे.
इथे एक विशेष गोष्ट समजली. त्या काळी काच नव्हती. त्यामुळे घरात उजेड तर आला पाहिजे पण हवा नको यासाठी डुकराच्या मुत्रपिंडाची त्वचा खिडकीला लावून ती बंद करत. त्या घराबाहेर एका ठिकाणी पालथ्या केलेल्या डालींसारखे काहीतरी दिसले. टीनाने सांगितले ते मधमाश्यांसाठी तयार केलेले घर !
मग जुनी पाणचक्की, बेकरी बघितली.
हस्तकला उद्योग बघितले. गवताची खेळणी, चामड्याचे पट्टे, टोप्या वगैरे प्रकार, लाकडी वस्तू बनवण्याचे लहान कारखाने होते.
बर्याच गोष्टी बघताना नवीन काही दिसत नव्हते. थंडी चांगलीच वाढली होती. टीना नि सगुणा ( वय ६४ नि अडीच ! ) भरपूर थकलेल्या दिसत होत्या. मग त्यांना फार न ताणता परतीच्या वाटेवर लागलो. जाताना चुकीच्या दिशेचे वेळापत्रक बघण्याचा शहाणपणा हातून झाला होता. त्यामुळे ट्रेन चुकली. मग पुढच्या ट्रेन ची वाट बघत टीनाला 'गाण्याच्या भेंड्या' शिकविल्या ! ती डच गाणी म्हणायची नि आम्ही हिंदी मराठी. दिवसभर मोकळ्या वार्यात, थंडीत फिरल्यामुळे ट्रेन मध्ये बसल्याबसल्या डोळे लागत होते. दिवस कसा भुर्र्कन उडून गेला होता.
राहून राहून सारखं मनात येत होतं, बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी !
प्रतिक्रिया
7 Oct 2010 - 11:59 pm | स्वाती२
छान सफर!
8 Oct 2010 - 12:15 am | मृत्युन्जय
मस्त एकदम. तुमच्या प्रवासवर्णनांच्या प्रेमात पडायला लागलो आहे. एक पुस्तक लिहाच आता तुम्ही.
8 Oct 2010 - 12:27 am | रेवती
तू खूप छान रंगवून वर्णन करतेस.
फोटोंमुळे त्या वस्तू कश्या दिसत असतील याचा अंदाज करावा लागत नाही.
भलतीच हौशी पर्यटक दिसते आहेस.
8 Oct 2010 - 1:07 am | अनामिक
असेच म्हणतो.
8 Oct 2010 - 12:58 am | कौशी
हौशी पर्यटक आहात्.............
आणि येउ द्या...
8 Oct 2010 - 1:02 am | प्रभो
मस्त !!
फिरत रहा आणी वर्णन टाकत रहा....
(प्रभ्या, तुझ्या भटकंतीचं वर्णन घे लिहून हिच्याकडून) ;)
8 Oct 2010 - 10:09 am | श्रावण मोडक
नको. घोळ व्हायचा. ;) तुझी नजर वेगळी, तिची दृष्टी वेगळी. ;)
8 Oct 2010 - 1:28 am | प्राजु
एकूणच वर्णन सुरेख.
शेवट अतिशय आवडला. डेरवणला शिवसृष्टी नक्कीच बघण्यासारखी आहे.
8 Oct 2010 - 2:14 am | उपास
छानच.. मजा आली वाचायला आणि फोटो पहायला.
डेमॉइन्स, आयोवा मध्ये Living History Farms आहे, अगदी अस्सच.. आणि जुन्या काळापासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवासही मांडलाय... बरंच मोठंही आहे.
8 Oct 2010 - 2:58 am | अर्धवटराव
मिपा वर एक "विमुक्त" नावाचे अवलिया यायचे पुर्वी (असेच म्हणावे लागेल... हल्ली कुठला डोंगर/गड सर करायल गेलेत कोण जाणे.. अजीबात पत्ता नाहि त्यांचा) तुम्ही त्यांचे युरोपियन व्हर्जन आहात.
अशेच भटकत रहा आणि आम्हाला सफर घडवत रहा.
अर्धवटराव
8 Oct 2010 - 3:02 am | नंदन
मस्त लेख. पेन्सिल्वानियातल्या लँकेस्टर काऊंटीत एका आमिश गावात मागे गेलो होतो, तिथली घरं, शाळा आठवल्या.
8 Oct 2010 - 8:11 am | सहज
अप्रतिम लेख. झकास वर्णन. युरोपीयन अमीश खेडेच वाटले.
वीज नसलेले खेडे, ओव्हरनाईट ट्रीप करायला पाहीजे खरे तर :-)
मिभो म्हणतात तसे अशी खेडी आपली खेडी असती तर गांधीजींचे म्हणणे बहुसंख्यांनी ऐकले असते :-) पण ईशान्य भारत, हिमाचल इ खेडी काहीशी अशीच असतील असे का कोण जाणे वाटते.
8 Oct 2010 - 5:41 am | शिल्पा ब
खूप छान लेख अन फोटो..मस्त गाव दिसतंय.
8 Oct 2010 - 7:25 am | मिसळभोक्ता
हे मध्ययुगीन आमच्या सद्ययुगीन भारतापेक्षाही जास्त प्रगत वाटते.
8 Oct 2010 - 8:17 am | पाषाणभेद
वाडी एकदम मस्त हाय. फटूमुळे आमीच त्या गावाला गेलतो आसं वाटाया लागलया जनू.
8 Oct 2010 - 10:00 am | निखिल देशपांडे
छान फोटु आणि वर्णन
8 Oct 2010 - 10:36 am | sneharani
मस्त फोटो अन् वर्णनही...!
8 Oct 2010 - 10:44 am | बिपिन कार्यकर्ते
लोक कुठे कुठे फिरायला मिळावे म्हणून पैसे साठवतात, मी मात्र मायाला जगभर फिरता यावे म्हणून पैसे साठवावे असा विचार करतोय.
10 Oct 2010 - 3:41 am | भडकमकर मास्तर
तुमच्या सध्याच्या सफरीवर काही लिहा की...
8 Oct 2010 - 11:27 am | समीरसूर
आपली सगळी प्रवासवर्णने सुंदर असतात. आणि फोटो असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळतो.
वर सुचवल्याप्रमाणे आपण खरच एक पुस्तक (सचित्र) लिहा.
बेल्जियमच्या ब्रसेल्स (की ब्रुसेल्स?) विमानतळावर काही वेळ थांबलो होतो आणि विमानातून खालचा परिसर शक्य तेवढा पाहिला होता; ते आठवले. बेल्जियम खूप सुंदर देश वाटला त्या दृष्यांवरून. आपल्या प्रवासवर्णनातूनही ते जाणवले.
धन्यवाद.
--समीर
8 Oct 2010 - 12:04 pm | सूर्य
पुन्हा एकदा मस्त चित्रे आणि वर्णन. आत्तापासुनच पुढील लेखाची वाट बघतो :)
-सूर्य.
8 Oct 2010 - 2:40 pm | सविता००१
किति मस्त लिहिता हो तुम्ही !!!!
8 Oct 2010 - 6:42 pm | मेघवेडा
वर्णन नेहमीप्रमाणे भारी आहेच! फोटोसुद्धा खास आहेत! त्यामुळे आणखी मजा आली! :)
10 Oct 2010 - 8:08 am | मदनबाण
सुंदर वर्णन... :)
11 Oct 2010 - 3:11 pm | गणेशा
तेथील बर्याच गोष्टी पाहताना, तुला भारतातील आपल्या गावाची आठवण येत असेल ना खुप ..
मस्त वाटले वर्णन नेहमी प्रमाणे ..
11 Oct 2010 - 3:56 pm | गणपा
.
11 Oct 2010 - 3:47 pm | गणपा
मितान एकदम भारी लिहिलयस..
पुढल्या मेजवानीच्या प्रतिक्षेत :)