किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
9 Sep 2010 - 9:56 pm

' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.

कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर. चार टाळकी एकत्र येऊन इतक्या मोठ्या माझ्या भारतमातेला जेरीस आणत आहेत आणि तिची लेकरे - आम्ही, किडामुंगीसारखे मरण्यापलीकडे काहीच करत नाही.

ज्या दिवशी हल्ला होतो तो सारा दिवस व नंतरचे मोजून चार-सहा दिवस मिडियावाले, घटनेचा चोथा चोथा करून चघळत राहतात. मेलेल्या माणसांच्या नातेवाईकांना, आईला, मुलाला, " कसे वाटतेय तुला? आत्ता तुझ्या मनात नेमके काय चालले आहे? " सारखे भावना-सहानुभूती तर दूरच पण साधे प्रसंगाचे तारतम्यही न ठेवणारे प्रश्न विचारून झालेल्या जखमा आणिकच ओरबाडतात. मरणारे असहायपणे मरून जातात. उरणारे, आज वाचलो रे असे म्हणत चर्चा-आकांत करतात. ( यात मी ही आलेच ) ती चार टाळकी, " कैसे हिंदुस्तानमे घुसके हिंदुस्तानके सिनेमेही खंजीर भोका " चा जल्लोष करतात, अन दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीला लागतात.

पण, यावर वर्षोनवर्षे मी काय करतेय? हे भ्याड वार थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही म्हणून, तडफडाट. हल्ले झाल्यावर सरकार ज्या पद्धतीने स्वत:चे समर्थन करते त्याचा, संताप संताप. एखादा-दुसरा अतिरेकी चुकून पकडला गेलाच तर, " आम्ही बाबा सहिष्णू....... शत्रू असला तरीही न्यायदेवता सगळ्यांना सारखीच असते ना? त्यांनी बेमुर्वतपणे - क्रूरपणे, आमच्या लहान लहान मुलांनाही मारले असेल हो पण आपण त्याला संधी नको का द्यायला? जे काय व्हायचं ते न्यायाने झालं पाहिजे...... " म्हणून त्याला अगदी फुलासारखे जपून कोर्टात महिनोंन महिने केस चालवून, जनतेचाच पैसा वापरून तिच्याच सहनशक्तीचा पुरा अंत पाहून झाला की एकदाची शिक्षा सुनावली जाते........ की, तिची अंमलबजावणी होण्याआधीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना पळवून न्यायचे आणि बदल्यात याला सोडा म्हणायचे. हिंदुस्तानामध्ये प्रत्येक जीवाची वेगवेगळी असलेली किंमत त्यांनी बरोबर हेरली आहे. गरीब हजारोंनी मेले तरी कोणाला काही फरक पडत नाही पण या गरीबांनीच अतिशय मूर्खपणे महान बनवलेला एखादा नेता किंवा त्याचा जावई / साला.... यांचा जीव फार मोलाचा असतो. हे पाहून आलेली, उद्विग्नता.

आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट. त्यांच्या दुर्दैवाने त्यांची नेमकी नको तिथे ड्युटी लागली. मग निदान स्वतःचा जीव वाचवण्याकरिता तरी दोन हात करणे भागच आहे नं? आता, एके फोर्टी सेव्हन समोर साले कुठलेही तमंचे घेऊन येतात. आमचे बच्चे खेळण्यासाठीसुद्धा हातात धरणार नाहीत ते. त्यात वरती मारे बुलेटप्रूफ जॅकेटं घालतात. ज्यांना आधीच स्वार्थाची मोठाली भगदाड पडलेली..... ना ना.... पाडलेली आहेत. कोणी? काय राव, काहीही विचारता? हेच की तुमचे मायबाप राज्यकर्ते. स्वार्थकारण कशात करावे आणि कशात करू नये याचे नियम कोणी शिकवलेलेच नाहीत नं. स्वत:च्या आईलाही विकायला मागे पुढे न पाहणारे, तुम्हाला सोडतील की काय? तर, ही तुमची नेतेमंडळी खोकेच्याखोके पचवून मस्त एसीत बसून ( इलेक्ट्रिसिटीचे बील.... आता त्याचे काय मध्येच? ते कोण भरणार? पागल झालात की दारू ढोसून आलात? कोणाची टाप लागून गेलीये हे विचारण्याची. ) तमाशा पाहत बसतात. मग एकदा का तमाशा पुरा पेटला की खुर्ची बचावण्यासाठी, " अरेरे! काय हे घडतेय. आमची गरीब बिचारी जनता, आमचे शूर जवान.... मेले, मारले गेले " म्हणून गळे काढतात. नंतर मेणबत्त्या, मूक श्रद्धांजल्या वगैरे वाहून झाल्या की डोळ्यावर कातडे ओढतात. त्यातूनही कोणी अतीच आदळाआपट केलीच तर, " वेगवेगळी चक्रेही प्रदान होतात नं? नुकसान भरपाईही दिली जाते नं? कधी व किती ते मात्र नाही विचारायचे...... मग अजून काय हवेय??? "

कुठलाही आतंकवादी हल्ला होण्याआधी ( म्हणजे आधीचे हल्ले होऊन काही काळ लोटल्यानंतर ) व पुन्हा नवीन हल्ला झाल्यानंतर आपल्या मायबाप सरकारची मुक्ताफळे ऐकून ऐकून तर कान किटलेत. जनतेला किती मूर्ख बनवायचे याला काही लिमिट राहिलेलेच नाही. हल्ला होण्याआधी म्हणायचे, " जनतेने संयमाने व धैर्याने वागावे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. पूर्ण बंदोबस्त असून घुसखोर लगेच पकडले जातील. तरीही अतिरेकी कुठल्याही मार्गाने सहजपणे घुसतातच. आम्ही आमच्या भूमीच्या कणाकणाचे रक्षण करू. जमेल तितकी जमीन आम्ही भक्षणच करून टाकू. देशातल्या सगळ्या अतिरेक्यांवर व त्यांच्या हालचालींवर आमची कडक नजर आहे. म्हणजे ते कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे नं... मग पकडा की त्यांना. आमच्या पहाऱ्यामुळे, अतिसावधनतेने अतिरेकी कुठलाही नवीन हल्ला करू शकत नाहीयेत. कसाब आणि साथीदार पार ताजमहालात पोहोचले तरी आम्हाला भनक पण नाय बा पडली. जिथे जिथे हे हल्ले होण्याची शक्यता आहे तिथे तिथे क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कंत्राट, अमुक अमुक नेत्याच्या जावयाला दिले गेलेय. राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य व सूचना यांत उत्तम ताळमेळ आहे. हल्ला झाला की हा उत्तम ताळमेळ परस्पर विरोधी व्यक्तव्यांनी उघडा पडतो. तिथे चालणारी अतिरेकी शिबिरे बंद होत नाहीत तोवर आम्ही पाकिस्तानाशी बोलणी करणार नाही. पाकिस्तानाशी बोलणी होऊ शकतात, शेवटचा निर्णय केंद्राचा. प्रत्यक्षात होत काहीच नाही आणि ही बोलणी होऊन तरी निष्पन्न काय होणार आहे?

प्रत्यक्ष घटना घडताना/ घडून गेल्यानंतर, घटनेची जबाबदारी अमुकतमुक ने घेतली आहे. कोणाचेही नाव टाका ना, सिद्ध थोडेच करायचे आहे. सगळे देशवासी एकजूटीने सामना करत आहेत. कुठला दुसरा पर्याय आहे का त्यांना? अतिरेक्यांना सोडणार नाही. दयामाया दाखवणार नाही. आधी पकडा तर आणि ज्यांना पकडलेय त्यांना सजाही द्या. केंद्राकडून हल्ला होणार अशी सूचना होती परंतु कधी व कोठे होणार ही नेमकी माहितीच दिली गेली नाही. पुढच्यावेळी क्रमवार पत्रिकाच हातात देऊ तोवर तुम्ही निवांत राहा. ही सगळी चूक राज्याची ( सरकारची) आहे. अतिरेकी खूप काळ हल्ल्याची तयारी करत होते. मग आमचे हेरखाते काय झोपले होते का? सगळीकडे क्लोज सर्किट कॅमेरे नाहीत व जिथे आहेत ते बरोबर काम देत नाहीत. काय सांगता? अजून कॅमेरे तिथे लटकलेले आहेत??? कमालच झाली. आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडू. कसे? सिंपल.... कोणीतरी खबर दिली, की ते इथे इथे आहेत की... काही लोकांना संशयावरून पकडलेही आहे. काहीतरीच काय. गरीब बिचारे. ते मुळी गुन्हेगार नाहीतच. पुढच्या निवडणुकीला हवीत ना त्यांची मतं..... सोडवा त्यांना ताबडतोब. यापुढे पुन्हा असा हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. ( वल्गना वल्गना.... )

बस इतकेच? मग, त्या अतिरेक्यांनी बळी घेतलेल्या निष्पाप जिवांचे काय? सामना करताना धारातीर्थी पडलेल्या पोलिसांचे काय? त्यांचा बदला कसा पुरा होणार? मी अहिंसावादी आहे, सहिष्णू आहे. तरीही मला हा ' बदला ' पुरा व्हायलाच हवा आहे. पण, तो कधीच होत नाही म्हणून होणारी, तळतळ. आधीच्या घावांवर अतिपातळसा त्वचेचा पापुद्रा ( शेवटी मन तरी कितिकाळ अरण्यरुदन करणार.... त्याचाही नाईलाजच आहे. ते बिचारे मरतमरत जगण्याचा प्रयत्न करते. ) धरायच्या आतच पुन्हा पुन्हा वार होत आहेत. त्यामुळे चिघळलेली जखम उरात घेऊन नाईलाजाने पोटाची खळगी भरण्याकरिता दुसऱ्याच दिवशी मी ट्रेन पकडते खरी पण तिच्यातून जिवंत सहीसलामत उतरेनची शाश्वती नाहीच. या जाणीवेतून आलेली, अगतिकता. या साऱ्यातून पिळवटलेली, खचलेली, क्वचित, षंढ त्वेषाने का होईना दातओठ खाणारी, कसाबला गेटवेसमोर उलटा टांगा अशी मागणी करणारीही मीच. उरात ही आग पेटलेली असली तरीही, प्रत्यक्षात त्याला एक फटकाही माझ्याच्याने मारवला जाणार नाही. पण, इतर मारत असतील ( निदान काहीजण तरी माझ्या इतके दुबळे नसतील ) ते नक्कीच पाहीन. इतके खोलवर घाव झालेत आता की " डोळ्याला डोळा " सारखीच शिक्षा त्यांना झालेली मला हवी आहे आणि माझे डोळे टक्क उघडे ठेवून ते बंद होऊ लागले तर बोटांनी जबरीने त्यांना ताणून, ती प्रत्यक्षात अमलात येताना पाहायचीही आहे. माझ्यासारख्या सामान्य - मध्यमवर्गीय - हतबल माणसाची ही नितांत गरज आहे.

हे दोन्ही सिनेमे, खोटा तर खोटा पण काही काळापुरता तो बदला पुरा करतात. बेंचखालच्या बॉंम्बने त्यांची उडणारी शकले-देहाचे चिथडे मला क्षणभर का होईना, समाधान देतात. हे घडवणाऱ्या त्या ' स्टुपिड कॉमन मॅनमध्ये ' मी स्वत:ला पाहते. वारंवार पाहू इच्छिते. ’ साधू आगाशे ’ खराच आस्तित्वात आहे यावर मला विश्वास ठेवावासा वाटतो. कदाचित काहींना हा दांभिकपणा वाटेलही..... मला नाही वाटत. ' किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना? '

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विलासराव's picture

9 Sep 2010 - 10:14 pm | विलासराव

आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट.

मलाही असेच वाट्ते.

धमाल मुलगा's picture

9 Sep 2010 - 10:23 pm | धमाल मुलगा

भानसताई, आख्खा लेख वाचुन एकच शब्द येतोय... 'खरंय'!
बस्स...ह्यापुढं काहीच बोलवत नाही...बोलण्यासारखं उरतच नाही ना. :(

वाईट ह्याचंच वाटतं, की कायदा-सुव्यवस्थेसाठी नेमलेल्या बर्‍याचशा शाखांना बरीच माहिती असते, पण केवळ त्यांच्या हाती पुरेसे अधिकार नाहीत आणि सर्वात वर कागदी घोडे नाचवणारे आणि मतपेट्यांवर डोळे लाऊन बसणारे बाजारबुणगे हे सेनापती म्हणुन हिंडत असतात. मिळालेल्या माहितीनुसार टाकोटाक कारवाई केली तर कित्येक दुर्घटना टळु शकतात पण........ हा पणच आडवा येतोय ना. :(

असो,
तुमचा उद्वेग पोहोचला..अगदी मनाच्या गाभ्यापासुन पुर्ण सहमत आहे.
(स्वगतः आता भानसताई तथाकथीत उदारमतवाद्यांच्या कुचेष्टेला बळी पडल्या नाहीत म्हणजे मिळवली. )

बेसनलाडू's picture

11 Sep 2010 - 3:20 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

स्वप्निल..'s picture

17 Sep 2010 - 2:02 am | स्वप्निल..

>>'खरंय'!
बस्स...ह्यापुढं काहीच बोलवत नाही...बोलण्यासारखं उरतच नाही ना. :(

असच ..

अ वेन्सडे मी पण असाच कधीपण बघत असतो

पैसा's picture

9 Sep 2010 - 10:26 pm | पैसा

प्रत्यक्षात काय? अफजल गुरू कुठे आहे? कसाबच्या सुरक्षेसाठी किती खर्च झाला आतापर्यंत?

प्रीत-मोहर's picture

9 Sep 2010 - 10:32 pm | प्रीत-मोहर

वर्च्या सगळ्यांशी सहमत...............

अनामिक's picture

9 Sep 2010 - 10:55 pm | अनामिक

खरं आहे.
जन पळभर म्हणतील... हेच खरं

बाप रे!! खूप तळतळाटातून लिहीलाय हा लेख. जाणवतय. सुन्न झाले वाचून.

नका लिहित जाऊ हो असे काहीतरी, त्रास होतो खूप, वाचून.
त्यापेक्षा मेरा भारत, त्याची महान लोकशाही, कित्ती कित्ती महान आहे असंच लिहित जावा.
नाहीतर पांढरे दहशतवादी खेळ खल्लास करतील हा ? त्यांना तुम्ही/आम्ही/कसाब/अफजल फक्त मतांसाठी जिवंत पाहिजे.

बरं तुमच्या हक्काविषयी,
तुम्हाला दर ५ वर्षांनी एकदाच बटन दाबण्याचा हक्क आहे. तो काय कमी झाला काय ?
(असे आमचे येथील जालावरचे पांढरपेशे लोक शिस्तीत पटवून देतील. कसे ? हे पाहायचे असेल तर सांगा, मी लागलीच कळवितो. मात्र अतिरेक्यांना भारतात कधीही येऊन कितीही लोकांना जीवे मारून सर्वोच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज करण्याचा हक्क आहे.)
आनि त्यांचा हा हक्क बजावायला नुकतेच दोन अतिरेकी मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत.
मुंबईत घुसले दोन दहशतवादी

गांधीवादी's picture

19 Sep 2010 - 3:48 pm | गांधीवादी

कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत आपला हक्क बजावीत आहे.
कसाब उच्च न्यायालयात दाद मागणार

उच्च न्यायालयात दाद मागणार म्हणजे अजून सर्वोच्च न्यायालय बाकी आहे काय ?
इथे ४-५ वर्षे काढले कि मग तिथे, तिथून ४-५ वर्षांनी मग फाईल माननीय राष्ट्रपतींच्या टेबलावर,
(तिथे किती वर्षांचे लिमिट असते ? )

प्रकाश घाटपांडे's picture

10 Sep 2010 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे

असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा यंत्रणा फिकि असते.जगात सर्वत्र शांतता नांदावी अस स्वप्न साकारणे कठीण. लेख उत्तम संवेदनशील आहे. सामान्य माणसाचे चित्रण त्यात आहे.
भिउ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणार्‍या स्वामीभक्तीत तो बुडुन जातो. ही श्रद्धा त्याला जगण्याला बळ देते.
जेव्हा ही हानी नैसर्गिक आपत्तीतुन असते तेव्हा तो कुणाला जबाबदार धरणार? आपल्याच पुर्वसंचिताचे फळ म्हणुन नशीबाला दोष देत बसणार.
ज्याच जळत त्याला कळत या उक्तीत असणार व्यक्तिसापेक्ष दु:ख विश्लेषणापलिकडे असते.

स्पा's picture

10 Sep 2010 - 10:59 am | स्पा

खरय..........
हे सर्व कधी थांबणार.. काहीच कळत नाहीये .....
मन सुन्न होतं असा काही वाचलं कि...

अब् क's picture

10 Sep 2010 - 1:03 pm | अब् क

:(

हे असच चालू राहाणार आहे.
किंबहुना यापेक्षा वाईट दिवस येणार आहेत.

रेवती's picture

11 Sep 2010 - 3:25 am | रेवती

काय लिहावं सुचत नाही.

भानस's picture

16 Sep 2010 - 11:00 pm | भानस

विलासराव, धमाल मुलगा, बेसनलाडू, पैसा, प्रीत-मोहर, अनामिक, शुचि, गांधीवादी, प्रकाश घाटपांडे, स्पा, अब क, Pain, रेवती मनःपूर्वक आभार.

असह्य असाहयता धड ना जगू देते ना मारू देतेय.... फक्त मरणेच ते काय हाती उरलेयं. तेही हे असं... कधीही, कुठेही, अचानक... किडामुंगीपेक्षाही बत्तर.... :(

गांधीवादी's picture

17 Sep 2010 - 7:20 am | गांधीवादी

अहो, एवढे असहाय होऊ नका राव.
असे तुम्ही असहायतेचे जंतू पसरवायला सुरुवात केलीत तर सगळे हळूहळू असहाय होतील.
काहीतरी मार्ग शोधा. इथे मांडा. सगळे विचार करू. पण असहाय होऊ नका.
आपल्या पेक्षा कितीतरी भीषण परिस्थितीत लोक जगत आहेत. दिवसा काठी ५०-६० रुपये कमावून लोक आपले पोट भरत आहेत. त्यांचा पण विचार करा, ते कसे जगत असतील.

आणि मरणाच्या गोष्ठी करू नका.
वेळ आली तर एक दोन अतिरेक्यांना मारा/मारु. माणूस कधीही, कुठेही, अपघातात सुद्धा मारु शकतो. मग त्याला काय करणार ? जीवन हे क्षणभंगुर आहे. मरायचं तर प्रत्येकाला आहे.

मदनबाण's picture

17 Sep 2010 - 7:26 am | मदनबाण

हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.
अगदी असंच वाटतं...

अविनाशकुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 8:08 am | अविनाशकुलकर्णी

नका त्रास करुन घेवु..पाक व चिन आता नाहितर काश्मीर..अरुणाचल..आसाम चा काहि भाग..बंगालचा काहि भाग .घेणारच आहे..अन त्या बदल्यात भारत पाक व चिन अतिरेकी कारवाया करणार नाहि अशि हमी त्यांच्या कडुन घेईल..मग कमी होतिल हल्ले..तो पर्यंत सहन करा

गांधीवादी's picture

17 Sep 2010 - 9:00 am | गांधीवादी

पाक-चीनला, पुणे सोडून काहीही द्या, आपली काहीही हरकत नाय.