युवती मना पासून नैना लगाई ले पर्यंत आणि चांदणे शिंपीत जाशी पासून बुगडी माझी पर्यंत अप्रतिहत सहज संचार असलेल्या ह्या सूरसम्राज्ञीला ७७ वर्षे पूर्ण झाली ह्यावर विश्वास बसणे कठिण जाते!
आपल्या आवाजातल्या विविधतेच्या जोरावर तब्बल ६७ वर्षे एखाद्या क्षेत्रात उत्तम काम करीत रहायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हे म्हाराजा! व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार पचवूनही आशाताईंच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. अनेक मानसन्मान मिळूनही साधेपणा टिकवून आहेत त्या. अर्थात त्यांच्याबद्दल इतकं लिहिलं गेलंय की मी अजून काय भर घालणार म्हणा पण आपल्या लाडक्या गायिकेचं कौतुक करायला शब्द नेहेमीच अपुरे पडतात हे ही त्याचवेळी खरं असतं.
अक्षरशः शेकडो गाणी अजरामर करुन ठेवणार्या ह्या महान गायिकेला मानाचा मुजरा.
वाढदिवसानिमित्त आशाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्या शतायु होवोत अशी मंगेशाचरणी प्रार्थना!
http://www.youtube.com/watch?v=SZXZI-3SJLw
(नतमस्तक)चतुरंग
(विशेष विनंती - गाण्यातल्या दर्दी मिपाकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी ह्या धाग्याला सजवून रसिकांना मोलाची माहिती द्यावी आणि आशाताईंच्या गाण्याचा आनंद पुन्हा लुटण्याची संधी द्यावी.)
चित्र जालावरुन साभार
प्रतिक्रिया
8 Sep 2010 - 9:06 pm | मिसळभोक्ता
लेकिन ह्या चित्रपटात, बाळासाहेबांनी बरीच गाणी दीदींना दिली, आणि आशाताईंना एकच दिले: झूटे नैना बोले.
" alt="" />
पण शेवटी हेच गाणे सगळ्यात जबराट ठरले.
माझे आणखी एक आवडते गाणे, दीदी आणि आशाताईंनी एकत्र म्हटलेले: उत्सव चित्रपटातले - मन क्यूं बहका रे बहका...
" alt="" />
दोघींच्याही आवाजाची उंची लक्षात येते.
8 Sep 2010 - 9:15 pm | चतुरंग
ह्यातलं झूटे नैंना बोले जे आहे त्याची सुरुवात विष्णु दिगंबर पलुसकरांच्या कुठल्यातरी एका बंदिशीसारखी वाटते पण कोणती ते लक्षात येत नाहीये.
8 Sep 2010 - 9:23 pm | मुक्तसुनीत
जाओ जाओ जाओ
जाओ बलमा
किन सबतीसंग ...
असे शब्द आहेत. बंदीश भावसरगम मधे ऐकली होती.
अवांतर : आशाबाईंचा वाढदिवस ऑक्टोबर २८ असल्याचे आठवते. १९९३ साली बाई साठीच्या झाल्या तेव्हाचा उत्सव अजून लक्षांत आहे. विकी इत्यादि ठिकाणी तारीख सप्टे. ८ आहे हे खराय. पण अन्य काही ठिकाणी २८ ऑक्टो. ही तारीख दिसते आहे.
8 Sep 2010 - 9:32 pm | मिसळभोक्ता
नी के घूंघरिया
ठुमकत चाल चलत
सत्यशील देशपांडेंनी म्ह्टलेली जुनी बिलासखानी तोडीतील बंदिश आहे.
(माझ्याकडे अजय पोहनकरांची आहे.)
8 Sep 2010 - 9:39 pm | चतुरंग
हीच. पलुसकरांची रेकॉर्ड होती आमच्याकडे. बिलासखानी तोडी बरोब्बर! धन्यवाद मिभो! :)
" alt="" />
8 Sep 2010 - 10:06 pm | शुचि
भावगीतं, भक्तीगीतं, करूण गाणी ही म्हणण्यास जितकं कौशल्य लागतं तितकच किंबहुना जास्त तारेवरची कसरत कॅबरे डान्स ची गाणी म्हणण्यास लागते. कारण यात मादकता, मस्ती तर आली पाहीजे पण भडकपणा नको. गाणं अंगावर यायला नको. ( चोली के पीछे माझ्या मते अंगावर येतं)
आशाबाईंचं "पिया तू अब तो आजा" माझं आवडतं. त्यात ते "आह आह आ आ" सुद्धा फेमिनाइन आणि नशीलं वाटतं. बटबटीत वाटत नाही. हा सट्ल टच खास आशा भोसले टच!
8 Sep 2010 - 9:26 pm | मनिष
सगळीच गाणी म्हणजे सोन्याला सुगंध म्हणावा अशी. गुलजार, आर. डी. आणि आशा...अप्रतिम!
9 Sep 2010 - 3:08 am | बेसनलाडू
गुलजार, आर. डी. आणि आशा...अप्रतिम!
याच धर्तीवर मराठीत सुरेश भट, बाळासाहेब मंगेशकर आणि आशा...अप्रतिम असे म्हणावेसे वाटते. 'मी मज हरपून बसले गं', 'उषःकाल होता होता काळरात्र झाली', 'केव्हा तरी पहाटे', 'तरुण आहे रात्र अजुनी' .. एकेक गाणे एकेका हिर्यासारखेच आहे.
(आशाप्रेमी)बेसनलाडू
9 Sep 2010 - 9:23 pm | विकास
मला वाटते, "मी मज हरपून बसले गं" हे सुधीर मोघ्यांनी लिहीले आहे. (पक्ष्यांचे ठसे). आत्ता पुस्तक जवळ नाही पण आठवणीवर सांगतोय...
9 Sep 2010 - 10:24 pm | चतुरंग
http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/227.htm
सुरेश भट, बाळासाहेब, आशाताई भन्नाट त्रिकूट!
8 Sep 2010 - 9:33 pm | पाषाणभेद
स्वर्गीय आवाजाच्या सुरसाम्राज्ञीला मिसळपावचा मानाचा मुजरा! कितीतरी सुंदर गाणी गावून आमचे जिवन समृद्ध केले त्यांनी.
8 Sep 2010 - 9:45 pm | अनामिक
आशा माझीही आवडती गायीका... सखी री सुन बोले पपीहा उस पार, वो चांद जंहा वो जाये , आगे भी जाने ना दू, ये क्या जगह है दोस्तों, मेरा कुछ सामान... किती किती म्हणून सांगावे?
गानसम्राज्ञीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
8 Sep 2010 - 9:49 pm | इन्द्र्राज पवार
"अर्थात त्यांच्याबद्दल इतकं लिहिलं गेलंय की मी अजून काय भर घालणार म्हणा...."
~~ ही कबुली विनयशील तर आहेच शिवाय या धाग्यावर प्रतिसाद देऊ इच्छिणार्यांनाही एक प्रेमाची सूचनाही आहे असे वाटते, ती अशी की धागाकर्त्यांना आशाताईंच्या फक्त चांगल्या वा खूप चर्चिल्या गेलेल्या गाण्यांची इथे यादी अपेक्षित नसून त्यांच्या विषयी एक संगीतप्रेमी या नात्याने गाण्याच्या माहितीत अजून काय/किती भर घालता येईल, तसेच मंगेशकर कुटुंबियांच्या कारकिर्दीचा या वाढदिवसानिमित्त आपल्याच शब्दात आढावा घेता यावा.
"उत्सव चित्रपटातले - मन क्यूं बहका रे बहका...दोघींच्याही आवाजाची उंची लक्षात येते."
~~ मिभो...या गाण्यावर थोडे सविस्तर लिहाल का? मी 'उत्सव' डीव्हीडी पाहिली पण नेमके हेच गाणे इतक्या अंधुक प्रकाशात घेतले असल्याचे जाणवले की ऑडिओची सुंदरता त्यात जाणवली नाही. (कदाचित ती डीव्हीडीदेखील खराब असेल.)
रेखावरच चित्रीत झालेले आणि सर्वांनाच वेडावून टाकणारे गाणे म्हणजे..."दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजीये"... कुणाला यात जास्त गुण द्यावे? अदाकारा, संगीतकार, गीतकार, त्या गाण्याचे चित्रीकरण की यापेक्षा ही जबरदस्त ताकतीची गायिका ? काहीही मते असोत, आशाताईंनी यातील सर्वच गाण्यांना जी उंची दिली आहे की त्यापुढे बाकी सर्व घटक दुय्यम ठरावेत. (शेवटच्या वेळेतील "बस एक बार, मेरा कहा मान लिजीये...." यातील आर्जव तर जीवघेणे !)
इन्द्रा
8 Sep 2010 - 9:52 pm | चतुरंग
कलेजा कापून घेऊन जातात! खय्यामने सारंगीचा असला कातिल वापर केला आहे की बस! क्या बात है!!
@डॉ.दाढे/प्रदीप - ह्यातली सारंगी कोणाची आहे?
8 Sep 2010 - 10:39 pm | मिसळभोक्ता
उमराव जान ज्या वर्षी रिलीज झाला, त्याच वर्षी (१९८१) कुदरत नावाचा एक टुकार चित्रपट आला. पण त्यातले एक गाणे "हमे तुमसे प्यार कितना" हे परवीन सुलतानांनी म्हटले होते. त्याला तोड नव्हती. त्यामुळे त्यावर्षीचे बेस्ट फिमेल सिंगरचे फिल्म फेअर अवार्ड चक्क एका अभिजात गायिकेला गेले. पण खय्याम ला उम्राव जान साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर चे अवार्ड मिळाले.
8 Sep 2010 - 10:46 pm | चतुरंग
ऐका कुदरत मधलं गाणं
http://www.youtube.com/watch?v=TDWAWHz6Am0
बेगम परवीन सुलताना ह्या अत्यंत भारित (चार्ज्ड) आवाज असलेल्या गायिका आहेत. श्रोतृवृंदावर एका क्षणात कबजा घेण्याची अफाट क्षमता त्या आवाजात आहे. त्यांचं सवाईमधे ऐकलेलं गाणं आठवतंय.
8 Sep 2010 - 10:51 pm | मिसळभोक्ता
एक लिहायचे विसरलो. त्याच वर्षीचे नॅशनल अवार्ड (पार्श्वगायिकेसाठी) "दिल चीज क्या है" बद्दल आशाताईंना मिळाले.
8 Sep 2010 - 11:25 pm | विकास
>>>उमराव जान ज्या वर्षी रिलीज झाला, त्याच वर्षी (१९८१) कुदरत नावाचा एक टुकार* चित्रपट आला. <<<
मला वाटते त्याप्रमाणेच त्या वर्षी आरडीने संगीत दिलेल्या लव्हस्टोरीतील गाणी देखील बक्षिसाच्या स्पर्धेत होती. कुद्रत आणि लव्हस्टोरी आधी आले होते, गाणी खूप गाजली (येथे त्यांचे गुणात्मक विश्लेषण करत नसून केवळ त्यावेळेच्या जनतेत जे लोकप्रिय झाले तितकेच सांगत आहे). मात्र नंतर उमरावजान आला आणि संगीत काय असू शकते हे पब्लीकला आणि फिल्मफेअरला कळले...
*"कुद्रत" सारख्या चित्रपटाला टुकार म्हणल्याबद्दल तिव्र निषेध. ज्यामधे मानसोपचार तज्ञ संमोहनाने आधीच्या जन्मात पाठवू शकतो हे सिद्ध झाले त्यामुळे पुनर्जन्म सिद्ध झाला तसेच भृगुसंहीतेचा स्पष्ट संदर्भ आला आहे... :-)
8 Sep 2010 - 11:31 pm | मिसळभोक्ता
ज्यामधे मानसोपचार तज्ञ संमोहनाने आधीच्या जन्मात पाठवू शकतो हे सिद्ध झाले त्यामुळे पुनर्जन्म सिद्ध झाला तसेच भृगुसंहीतेचा स्पष्ट संदर्भ आला आहे...
फिल्मफेयरच्या अवार्ड कमिटीवर हिंदुत्त्ववादी होते का ? ;-)
असो, अवांतर होते आहे. (हा खाल्ला शंभरावा उंदीर.)
8 Sep 2010 - 10:57 pm | इन्द्र्राज पवार
"...ह्यातली सारंगी कोणाची आहे?"
~ ती आहे राजस्थानमधील सिकर घराण्याचे उस्ताद सुलतान खान यांची.... ज्यांची ओळख खुद्द लताबाईंनी त्यांच्या "मिर्झा गालीब" या एल.पी.च्या वेळी मुंबईतील संगीतक्षेत्राला करून दिली होती (सन १९६७). या एल.पी.ला संगीत दिले होते ते खय्याम यांनी. त्यामुळे साहजिकच खय्याम यांच्या स्मृतीत सुलतान खान यांचे सारंगी कौशल्य त्याचवेळी ठसले....आणि "उमराव जान" च्या वेळी अर्थातच त्यांनी उस्ताद सुलतान खान यांच्यासमवेत जी जादू केली ती आपण श्रवण करतो आहोतच.
(सध्या उस्ताद सुलतान खान यांची सारंगी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या टीमसमवेत विश्वसंचार करीत आहे.)
इन्द्रा
8 Sep 2010 - 11:00 pm | चतुरंग
उस्ताद सुलतान खान! मग शब्दच संपले!!!
धन्यवाद इंद्रा. :)
8 Sep 2010 - 11:10 pm | मिसळभोक्ता
हम दिल दे चुके सनम, ह्या चित्रपटात, अलबेला साजन आयो रे, ही अहिर भैरवातील पारंपारिक चीज म्हणणारे, ते हेच सुलतान खान, ना ?
8 Sep 2010 - 11:47 pm | चिंतामणी
सारंगीवाले सुल्तान खाँ म्हणजे २००१ साली Piya Basanti (Non-Film) नावाचा अल्बम काढणारे आंणि गाणारे.
हम दिल दे चुके सनम, ह्या चित्रपटात, अलबेला साजन आयो रे, ही अहिर भैरवातील पारंपारिक चीज म्हणणारे सुलतान खॉ वेगळे आहेत. ते शास्त्रीय संगिताच्या मैफलीत गाणारे प्रसिध्द गायक आहेत.
8 Sep 2010 - 11:06 pm | शुचि
धन्यवाद इन्द्र!
मला नेहमी वाटतं - सनईचे सूर जसे मांगल्याचे तरंग घेऊन येतात तसे सारंगी चे कातरता आणि बेचैनी. कोठ्यावरचं वातावरण सारंगी बरोबरच शोभतं.
8 Sep 2010 - 11:13 pm | मिसळभोक्ता
संवादिनी, म्हणजे हार्मोनियम, ही अभिजात संगीताला सध्या सर्रास वापरली जाणारी साथ, ही पश्चिमेकडून (युरोपातून) आलेली आहे. अजीबात अभिजात नाही.
मौखिक अभिजात संगिताला खरी अभिजात साथ, म्हणजे सारंगी. (मुसलमानांची देण.)
8 Sep 2010 - 9:55 pm | संजय अभ्यंकर
आशाताई ह्या भारतीय संगीतातल्या एक अनोख्या आकाशगंगा आहेत.
त्यातले असंख्य तारे म्हणजे त्यांची गाणी. प्रत्येक गाणे आपापल्या जागी तेजस्वी तार्या समान समान.
त्यातील मला सुचलेली काही गाणी...
http://www.youtube.com/watch?v=QDPtyEmSQ1k&feature=related
http://www.youtube.com/watch?v=zWjKnv8ry1E&feature=related
http://www.youtube.com/watch?v=F2NA8e8y_I0
http://www.youtube.com/watch?v=nXFtY8KIVNQ&feature=related
http://www.youtube.com/watch?v=T-1htTfeOSc
http://www.youtube.com/watch?v=JGfP_cYkQak
http://ishare.rediff.com/music/Entertainment/TERE_GHAR_KE_SAMNE_-_DIL_KI...
http://ishare.rediff.com/music/Entertainment/DKP_Jo_Tum_Muskurado/867727
http://www.youtube.com/watch?v=0-twiimiM6g&feature=related
http://ishare.rediff.com/music/others/dkp-jhukti-ghata-gaati-hawa/867725
यादी खूप मोठी होईल..
8 Sep 2010 - 10:19 pm | संजय अभ्यंकर
http://www.esnips.com/doc/ef1a06d6-5852-42ea-8a15-4f0d8d5f2c97/Phagun-Ke...
8 Sep 2010 - 10:26 pm | संजय अभ्यंकर
http://ishare.rediff.com/music/Entertainment/BAGH-MEIN-KALI-KHILI/737666
8 Sep 2010 - 10:08 pm | शुचि
अनेक गाणी आवडतात पैकी जीवघेणं आवडतं म्हणजे - "सांज ये गोकुळी सावळी सावळी .... सावळ्याची जणू साऊली" ...... अवीट गोड गायलं आहे. या गाण्याची गोडी शब्दात मला तरी नाही वर्णन करता येणार. मुक्याला साखरेची वडी देऊन सांगीतलं आता वर्णन कर त्या गोडीचं तर तो बिचारा करू शकेल काय? हृदयात अवर्णनीय मधुर तरंग उमटतात हे गाणं ऐकताना. ...... "पैलघंटा घुमे राऊळी" ऐकताना लहानपणीचं अरण्येश्वराचं संध्यकाळ च्या वेळीचं देऊळ साक्षात मनःचक्षूंसमोर साकार होतं, अगदी आवारातल्या झोपायच्या तयारीत असलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटानी गजबजलेलल्या पिंपळ वॄक्षासकट.
8 Sep 2010 - 10:30 pm | मिसळभोक्ता
त्यातले
माउली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
हे शब्द शांताबाईंचा मास्टरपीस !
ऋतु हिरवा ह्या गाण्यात आशाताईंनी एक अत्युत्कृष्ट अवरोही तान घेतली आहे. (ही अशी तान घेऊन बघा, हगवण होते की नाही ते, असे मी सर्व नवोदित कल्लाकारांना सांगत असतो. असो. अवांतराबद्दल क्षमस्व.)
8 Sep 2010 - 10:35 pm | चतुरंग
हे गीत सुधीर मोघे यांचे आहे. तुम्हाला आशाबाईंचा म्हणायचे असावे.
8 Sep 2010 - 10:47 pm | मिसळभोक्ता
मध्येच "ऋतु हिरवा" आठवल्यामुळे चुकून घोळ झाला. सांज ये गोकुळीचे सुधीर मोघेच कवी आहेत. ऋतु हिरवा शांताबाईंचे आहे. क्षमस्व.
9 Sep 2010 - 10:21 am | मी ऋचा
माउली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
+१
8 Sep 2010 - 10:30 pm | चतुरंग
सांज ये गोकुळी हे अप्रतिमच आहे. श्रीधर फडक्यांचे संगीत अफलातून आहे. आशाताईंच्या किंचित अनुनांसिक आवाजातली खास मींड उमटते आणि आंगावर काटा येतो!
8 Sep 2010 - 10:12 pm | अर्धवटराव
या सुरमयी गळ्यातुन अवतरलेलं कोतवाल साहब चित्रपटातलं "साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ऐकावे आणि पुढचा एक तास दुनीया-जहान विसरुन आपल्या अंतरमनात खोल खोल शिरावे.
हॅट्स ऑफ्फ !!
(आशा फॅन) अर्धवटराव
8 Sep 2010 - 10:16 pm | इन्द्र्राज पवार
"मुक्याला साखरेची वडी देऊन सांगीतलं आता वर्णन कर त्या गोडीचं तर तो बिचारा करू शकेल काय?"
~ ही खरी तारीफ !
(श्री.चतुरंग...तुम्हाला व मला अपेक्षीत आहे सर्वांकडून, ती अशी शुचिताई यांनी शब्दबद्ध केलेली अचूक भावुकता...हवी तर अशी झगझगीत तारीफ ! धन्यवाद शुचिताई.)
इन्द्रा
8 Sep 2010 - 10:24 pm | शुचि
धन्यवाद :)
माझी मूळ उपमा नाही पण. एका अध्यात्मिक पुस्तकात वाचनात आली होती १०/१२ वर्षापूर्वी.
परत एकदा धन्यवाद!!
8 Sep 2010 - 10:32 pm | इन्द्र्राज पवार
"माझी मूळ उपमा नाही पण....."
~ नसेलही....पण त्यामुळे उपमेतील गोडवा रत्तीभरही कमी होत नाही....आणि त्यातही तुम्हास ती आशाताईंच्या गाण्यासाठी आठवावी यातच त्यांची महती लक्षात येते.
इन्द्रा
8 Sep 2010 - 10:32 pm | अनिल हटेला
आशा भोसले ....
आजही तीतक्याच ताकदीची गायीका...लिस्ट द्यायची झाली तर भली मोट्ठी होइल... :-)
१) http://www.youtube.com/watch?v=K119UH1M6Xc&feature=related
२) http://www.youtube.com/watch?v=IB-mMSySzd0
३) http://www.dhingana.com/play/rutu-hirawa-marathi-movie-film-album/MzQwMz...
सध्या आवरतं घेतोये.........
आशादी चा फॅणोबा :-)
8 Sep 2010 - 11:32 pm | नंदन
अजून असंच एक गाणं म्हणजे बंदिनीमधलं 'अब के बरस'. आपापसांतले मतभेद मिटवून लताबाई आणि एस. डी. बर्मन पुन्हा एकत्र काम करू लागले, त्यानंतरचा हा पहिला चित्रपट ('मोरा गोरा अंग लई ले'), पण यातच दु:खी/आव्हानात्मक गाणी लताकडून गाऊन घ्यायची आणि उडत्या चालीची आशाकडून, ही तेव्हा रूढ झालेली प्रथा या गाण्याद्वारे प्रथम मोडली गेली असं म्हणतात.
8 Sep 2010 - 11:46 pm | मिसळभोक्ता
नंदनशेठ,
ह्या गाण्यात (यूट्यूब दिसत नाही, तरी आठवणीप्रमाणे) काही आव्हानात्मक आहे असे वाटत नाही.
हा एसडी चा ब्रिलियन्स, की जात्यावरचे गाणे अगदी साधे सोप्या चालीतले निवडले.
हां, उडत्या चालीत नाही हे मात्र मान्य.
(थोडे अवांतरः बाबूजींची "ने मजसी ने" ची चाल मला आवडते ती ह्यामुळे. इंग्लंडात शिकायला गेलेला एक कोकणी मुलगा बाळासाहेबांची आव्हानात्मक चाल वापरून समुद्राला विनंती करेल असे अजीबात शक्य नाही. त्याला आपली साधी सोपी ओवीची चालच आठवणार.)
8 Sep 2010 - 11:34 pm | विकास
लता-आशांच्या बाबतीत एकच गाणे आवडते असे म्हणणे पटत नाही. मूडप्रमाणे गाणे आवडते असे वाटते.
आशाची "काही" आवडती / तात्काळ आठवलेली गाणी: (वर आलेल्याव्यतिरीक्त) प्रत्येकात आवाज वेगवेगळ्या पद्धतीने लागलेला आहे...
ही वाट दूर जाते
परवशता पाश दैवी
माझा होशील का
रूप पाहता लोचनी
जीवलगा राहीले दूर घर माझे
मलमली तारूण्य माझे
तरूण आहे रात्र अजूनी
चुरा लिया है तुमने
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है
खाली हात शाम आयी है
कुछ् ना कहो
असो. जीवेत शरदः शतम!
9 Sep 2010 - 12:08 am | मस्त कलंदर
एकतर शांतपणे ऐकण्याचा नाहीतर त्या तालावर थिरकण्याचा!!! तरीही आधीच्या सगळ्या गाण्यांत थोडी भर माझ्याकडूनही.. त्यातही माझी आवड बरीचशी जुन्या गाण्यांचीच.. वरती दिलेली गाणीही आवडतातच. पण पुनरूक्ती नको म्हणून परत देत नाही...
माझा आवडता चित्रपट सांग म्हटले की तीन नांवे ठरलेली.. बंदिनी, चिल्ड्रेन ऑफ हेवन आणि परस्यूत ऑफ हॅपिनेस.. बंदिनीमध्ये नक्की काय छान ते सांगता येणं कठीण आहे. त्यातले ओ रे माझी तर मास्टरपीस आहेच, पण आशाबाईंचं "अब के बरस भेजो भैय्या को बाबूल" या गाण्यालाही तोड नाही.. पडद्यावर शांत, सोज्वळ नूतन... आणि आशाचा तितकाच तलम आणि आर्त स्वर... पुढे वर्णन करायला शब्दही अपुरे ठरतात...
साहब, बिवी और गुलाम मधली बरीचशी गाणी आशा भोसलेंनीच गायली. मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो दूरदर्शनवर निवडणूकीच्या काळात बातम्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट दाखवत तेव्हा.. चौथी-पाचवीत असेन मी. त्यातलं "भँवरा बडा नादान है" गाताना मधूनच लाडिक स्वर असा येतो, की ज्याचे नांव ते!!!
थोडं अवांतरः त्यातलंच आणखी एक आशाबाईंचं गाणं, "साकिया आज मुझे नींद नहीं आयेगी". हे असंच विनाकारण लक्षात राहिलेलं गाणं. त्यात बूट नवीन असता म्हणून गुरूदत्त हातात घेऊन फिरत असतो. परवा हे गाणं टीव्हीवर लागलं होतं. पाहताना जाणवलं... पूर्ण गाणंभर कॅमेरा कुठूनही मारला तरी कोणत्याही फ्रेममध्ये त्या मागे नाचणार्या एक्स्ट्रॉजच्या चेहर्यावर जराही उजेड नाही. आणि सगळा प्रकाश त्या मुख्य डान्सरवर. गाणं पटकन यूट्यूबवर शोधलं.. पुन्हा पुन्हा पाहिलं, पण एक चुकार चूक सोडली तर सगळीकडे तस्संच!!! आताच्या नवीन तंत्रज्ञानात हे सहज शक्य आहे.. पण हे १९६२ मध्ये करणारा गुरूदत्त, आणि त्याचा कॅमेरामन.. दोघेही महान!!!
आशाबाईंनी सगळ्याच प्रकारची गाणी गायली... त्यांचे अंगूरमधले, "रोज रोज डाली डाली" हे ही एक अवीट असं गाणं.. गाणं गाता गाता चष्मा सावरणारी दिप्ती नवलही गोड दिसते. :)
कधी कधी असा मूड लागतो की कुणाची पर्वा न करता मस्त गळा हवा तितका मोकळा सोडून खुशाल मोठमोठ्यांदा गात सुटावं.. अशा वेळी हमखास मला आठवण होते ती या दोन गाण्यांची:
"बलमा खुली हवा में" आणि " तू कहाँ... मैं यहाँ". "तू कहाँ..." जर कॉलेजच्या फेस्टोव्हलमध्ये चालू असेल तर ओरडणार्या गळ्यांना आणखी छानसा व्यायाम मिळतो. :)
बाकी.. मेरा कुछ सामान हे पद्यात गायलेले गद्य तर ऑल टाईम हिट्ट.. !!!
आशाबाईंबद्दल बोलायचे तर ते उमराव जानच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहिल.... "जुस्तजू जिसकी की" आणि "ये क्या जगह है दोस्तों" ही माझ्या खास आवडीची.. आणि ये क्या जगह है मधल्या "मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है" या ओळी टचकन डोळ्यात पाणी आणणार्या!!!
उमराव जानमधल्याच.. मध्येच कधीतरी येणार्या,
"जब भी मिलती हैं तो अजनबी लगती क्यूँ है, जिंदगी रोज़ नयें रंग बदलती क्यूँ है।
तुझसे बिछडे हैं तो किससे मिलाती हैं हमें? जिंदगी देखिए क्या रंग दिखाती हैं हमें॥" या ओळी कित्येक दिवस माझ्या सेलफोनची रिंगटोन म्हणून वाजत होत्या...
अजूनही पुष्कळ गाणी आहेत.. पण मी इथेच थांबते!!!
9 Sep 2010 - 12:33 am | पुष्करिणी
'नाच रे मोरा' पण खूप आवडतं मला ( व्हिडिओ मिळत नाहीये )
दुसरं खूप आवडणारं, थोडं नवं गाणं म्हणजे साथिया मधल 'चोरी पे चोरी'
( लिंक सौजन्य मस्त कलंदर )
9 Sep 2010 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'नाच रे मोरा' मलाही खूप आवडतं.
नवीन गाण्यांपैकी माझं आवडतं गाणं म्हणजे 'तक्षक'मधलं 'रंग दे'! खालच्या पट्टीतला आशाताईंचा आवाज कितीही वेळा ऐकला तरी तेवढाच फ्रेश वाटतो.
'जानम समझा करो'ही माझं आवडतं गाणं.
9 Sep 2010 - 1:13 am | रेवती
आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गाजलेली गाणी या धाग्यावर ऐकायला मिळतील म्हणून वाचनखूण साठवल्या गेली पाहिजे. :)
9 Sep 2010 - 3:47 am | शुचि
आशाताईंचा आणखी लोभस पैलू म्हणजे "अदाकारी". काही लोकं स्टारड्स्ट लेऊन जन्माला आलेली असतात त्यापैकी त्या एक. मला त्यांची वेशभूषा, पब्लीक पर्सोना आकर्षक वाटतो. आता पुढील गाणच पहा ना - त्या फेअरी गॉड्मदर म्हणून किती शोभतात.
9 Sep 2010 - 6:35 am | सुनील
आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जालावर उंडारताना मिळालेले हे "ही वाट दूर जाते" ह्या गाजलेल्या गीताचे बंगाली रूप! दोन्ही गाणी ऐका -
मराठी
बंगाली
9 Sep 2010 - 1:08 pm | विसोबा खेचर
अत्यंत कष्टानं, मेहनतीनं स्वत:चं अष्टपैलुत्व सिद्ध केलेली एक महान गायिका - आशाताई यांना वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा..!
तशी अनेक आहेत परंतु बाबुजींनी बांधलेलं अशाताईंचं 'जिवलाग कधी रे येशील तू..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं..
संजय अभ्यंकरांनी अगदी नेमकं वर्णन केलं आहे..
माझ्याकडून आशाताईंना वाढदिसानिमित्त ही लहानशी भेट - :)
तात्या.
9 Sep 2010 - 9:28 pm | विकास
अशाताईंचं 'जिवलाग कधी रे येशील तू..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं..
सुहासिनीमधील त्यांची सर्वच गाणी मस्त आहेत. सर्व गाण्यांमधे वेगवेगळ्या वेळचे आर्त स्वर आहेत. "मी तर प्रेम दिवाणी" हे गाणे आशाताईंचे तसेच ललीता फडक्यांनी शास्त्रीय चालीत म्हणलेले पण खूप छान आहे...
9 Sep 2010 - 11:12 am | इन्द्र्राज पवार
श्री.चतुरंग....श्री.चिंतामणी....श्री.मिसळभोक्ता....शुचिताई...आणि अन्य अनेक ज्ञान्/अज्ञात "सारंगी प्रेमी"
~~ उस्ताद सुलतान खान यांच्याविषयी थोडासा गोंधळ झाला ('सारंगीवादक' सुलतान खान आणि 'हम दिल दे चुके सनम' मधील 'अलबेला साजन आयो रे' ही बंदिश गाणारे सुलतान खान ~ हे एकच की वेगवेगळे) असल्याचे वरील प्रतिसादांवरून समजत आहे. ते वाचून असे वाटले की, काल रात्रीच 'उमरावजान' संदर्भात लिहित असताना थोडी जादाची माहिती तिथे देणे गरजेचे होते. पण असो. ती आता इथे देत आहे.
~~ सर्वप्रथम 'उमरावजान' चे सारंगीवादक उस्ताद सुलतान खान आणि 'हम दिल दे चुके सनम' मधील गायक उस्ताद सुलतान खान हे एकच आहेत हेच सांगतो. मुळात त्यांचे वडील उस्ताद गुलाब खान यांनी सुलतान खान यांना लहानपणी गायकीचीच तालीम देण्यास सुरुवात केली होती कारण त्या काळात अभिजात गायकीला साथ म्हणून सारंगी मागे पडत चालली होती व हार्मोनियमने तिथे मानाचे स्थान मिळविले होते. पण पुढे इंदूर घराण्याचे उस्ताद आमीर खान (काय लिहायचे या महान गायकाविषयी...?) यांच्या शागीर्दीत आल्यानंतर सुलतान खान यांनी गायकीच्या तालमीसोबत सारंगीचाही रियाझ चालुच ठेवला ज्यामुळे खुद्द आमिर खान फारच प्रभावित झाले होते. पुढे पुढे तर उस्ताद आमिर खान यानी सुलतान खान यांना देशभरातील आपल्या मैफिलीतून 'सारंगी साथीदार' म्हणूनच पेश केले (पण त्यांची गायकी एका विशिष्ट पातळीपर्यंत चालूच होती.)
लता मंगेशकर या बडे गुलाम अली खान आणि आमिर खान यांना किती मानत असत हे वेगळे सांगायला नको (शास्त्रीय संगीतातील या दोन दिग्गजांसमोर त्या कधीही बसलेल्या नाहीत...त्यांच्यासमवेत त्या जितक्या वेळ सहवासात असायच्या तितक्या वेळ लतादिदी बाजुला उभे राहुनच संवाद करीत...असो तो विषय वेगळा आहे...); तर आमिर खान यांच्यामुळेच त्यांची उस्ताद सुलतान खान यांची ओळख झाली इतकेच नव्हे तर इंदुरहून त्यांनी सुलतान खान यांनी मुंबईला आग्रहाने बोलावून घेतले व त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था आपल्याच घरी केली....व पुढील वाटचाल मी वरील प्रतिसादात दिली आहेच.
लतादिदीनीच त्यांच्या सारंगीची जादू मुंबई चित्रपटसृष्टीला करून दिली व संगीतकार खय्याम, अभिनेत्री मीना कुमारी, गायक महंमद रफी यांनी ती पुढे वाढवित नेली. 'उमराव जान' नंतर ते आणि त्यांची सारंगी सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनले. नंतर उस्ताद झाकीर हुसेन यांच्यामुळे तर त्यांना 'वर्ल्ड एक्स्पोजर' मिळाले व लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्येदेखील त्यांच्या सोलो सारंगी वादनाचा कार्यक्रम झाला. जॉर्ज हॅरिसन, कोलमन, डुरॅन डुरॅन यासारख्या दिग्गजांना साथ आणि वॉशिंग्टन फिलहॉर्मोनिक यांच्यासोबतही त्यांनी सारंगीची साथ केली आहे.
"पिया बसंती" हा सुप्रसिध्द 'इंडीपॉप' आल्बम, आणि 'हम दिल दे चुके सनम' मधील त्यांची गायकी ही उस्ताद सुलतान खान यांच्या आणखीन दोन 'अचिव्हमेंट'. संजय लीला भन्साळी आणि त्या चित्रपटाचे संगीतकार इस्माईल दरबार यांनी चित्रपटाचे कथानक 'राजस्थान' च्या पार्श्वभूमीवर घेतल्याने व त्यातही नायिकेचे वडील हे शास्त्रीय गायक दाखविले असल्यान जाणीवपूर्वक उस्ताद सुलतान खान यांच्याकडूनच ती प्रसिद्ध बंदिश स्वरबद्ध केली.
इन्द्रा
9 Sep 2010 - 11:46 am | समंजस
त्यांच्या गायन प्रतिभेची तारीफ करणार्या वरील सर्व प्रतिसादांशी सहमत!
[त्यांच्या गायन प्रतिभेबद्दल तर बोलायलाच नको ती निर्वीवाद आहे. मला त्यांचा जो व्यक्तीगुण सर्वात जास्त आवडला तो म्हणजे त्यांची जगण्याची वृत्ती. बेफिकीर, जगाला फाट्टयावर मारणारी, सदाआनंदी, हसरी, सगळ्यांना तसेच संगिताच्या सगळ्याच प्रकारांना सामावून घेणारी आणि कसलाही मोठेपणा न मिरवणारी. त्यांच्या सारख्या आयुष्यातील कठीण प्रसगांना, समस्यांना, व्यावसाईक स्पर्धेला जर दुसरा कोणी व्यक्ती यशस्वीपणे सामोरा गेला असता तर नक्कीच अबोल किंवा माणूसघाणा किंवा तिरस्कार करणारा किंवा चक्रम किंवा अहंकारी झाला असता ]
9 Sep 2010 - 1:52 pm | दिपक
आशाताईंच्या गाण्याचे आम्ही पंखे... त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
9 Sep 2010 - 3:43 pm | चिगो
आशाताईंच्या गाण्यांबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे...
त्यांची गाणी ऐकून सुचलेल्या ह्या काही ओळी
तुझ्या सूरांनी बाल्य उमलले
तुझ्या सूरांनी यौवन फूलले
आईची साद तूच गं
प्रेयसीची लडीवाळ हाक तू...
मायेचे बंध तुझ्या स्वरांत
अन प्रियेचा बाहूपाश तू
सूरात तुझ्या आस मिलनाची
दुराव्याचा विजनवास तू...
तुझ्या सूरांनी क्लेष विसरलो
तुझ्या स्वरांनी दु:खात भिजलो
गितांनी तुझ्या झेपावलो आवेगी
तुझ्या सुरांत मी क्लांत निजलो....!
9 Sep 2010 - 7:33 pm | प्रदीप
इथे दिलेली गाणी पाहिली/ऐकली, सहज एक चाळा म्हणून त्यांच्या, मला अफाट आवडणार्या काही गाण्यांची अगदी थोडक्यात यादी केली (कठीण काम, अर्थातच ही लिस्ट परिपूर्ण नाहीच) ती इथे देत आहे:
१. पूछो न हमे हम उन के लिये (संजय अभ्यंकरांनी यू ट्यूबचा दुवा दिलाय).
२. आईये मेहरबाँ
३. नदी नाले न जाओ श्याम पैंयाँ पडूं
४. इतनी बडी महफिल और इक दिल किस को दूं
५. सच हुवे सपने तेरे
६. आँखो मे क्या जी रूपहला बादल
७. छोड दो आँचल जमाना क्या कहेगा
८. दिवाना मस्ताना हुवा दिल जाने कहाँ से ये बहार आई
९. मै जब भी अकेली होती हूं, तुम छुपके से आ जाते हो
१०. पान खाऊ सैया हमारो
मराठी:
१. कानडावो विठठलू
२. नाच रे मोरा
३. नक्षत्राचे देणे
४. चाळ माझ्या पायात
५. सोनियाच्या ताटी
६. का रे दुरावा
७. रिमझिम पाऊस पडे सारखा
८. मागे उभा मंगेश
त्यांनी एस. डी. बर्मनकडे गायिलेली अवखळ गाणी मला विशेष आवडतात. वर 'अब के बरस भेजो' चा उल्लेख आला आहे, असे सांगितले जाते की त्या गाण्याच्या काळात त्यांचे त्यांच्या माहेराशी संबंध तुटलेले होते, अशा वेळी हे गाणे म्हणणे कसोटी होती.
तशी कसोटी त्या त्यांच्या करीयरच्या सुरूवातीपासूनच देत आलेल्या आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, कसलाही आधार नाही, कुणीही गॉड फादर नाही, अशा ह्या दोन्ही मराठी बहिणींनी , पंजाबी व बंगाल्यांची घट्ट पकड असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीवर नुसतीच आपली मोहोर उमटवली असे नाही, तर त्या दोघींनी तिच्यावर ५०+ वर्षे साम्राज्यच केले. त्यांच्या मागे त्यांच्यावर कुणी काहीही म्हणोत, त्यांची वट एव्हढी की तोंडावर काही म्हणण्याची कुणाची हिम्मत झाली नाही, अजून होत नाही. आणि उगाच कुणी कालपरवाचा कुणी काहीतरी बोलून गेलाच तर 'उसको थप्पड मारो' असे आशाबाईंनी म्हणायचा अवकाश, ते पोर त्यांच्या पायाच पडायचं काय ते बाकी होतं! ही वट अशीच शेवटपर्यंत राहो !!
9 Sep 2010 - 9:17 pm | चतुरंग
ह्या धाग्यावरती अतिशय उत्साहाने प्रतिसाद देणार्या, सोबत आशाताईंच्या अनेक उत्तम गाण्यांचे दुवे देणार्या आणि बरीच मौलिक माहिती पुरवणार्या सर्व मिपाकरांचे मी आभार मानतो. शतशः धन्यवाद! :)
चतुरंग