निद्रेची चिरफाड

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
25 Aug 2010 - 7:51 am

निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.

तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात. एकीनं व्यक्ति झोपवली की दुसरी त्या व्यक्तिला उठवण्याचा, जागते ठेवण्याचा प्रयत्न करते.
एकीचं नाव शांता. ती नावाप्रमाणेच शांत झोपेचं वरदान देते. तिला शास्त्रीय परिभाषेत नॉनरैपीड आय मूव्हमेंट स्लीप (नॉनरेम) म्हणायचं.
तर दुसरीला रैपीड आय मूव्हमेंट स्लीप (रेम) अर्थात परखड भाषेत 'चळमुंगळी' म्हणायचं. ही बयाच फार त्रासदायक असते. हीच व्यक्तिला 'जागते रहो'ची साद घालीत सतावते.
नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणाऱ्‍या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायऱ्‍या असतात. म्हणजे शांतेची चौथी स्टेज ही प्रगाढ वा साखरझोप असते. वाढत्या टप्प्याप्रमाणे चौथ्या स्टेजला एकदम परब्रह्म समाधीच लागते, इतकी की काही कोवळ्या नवजात बालकांना किंवा मृत्युशय्येवरील वयस्कांना याचवेळी स्वर्गाची द्वारे खुली होतात! हू नाही की चू नाही, डायरेक्ट मुक्तीच. अशा 'शांते'चं गुणवर्णन करावं तितकं कमीच.
असो.
तर या नॉनरेमच्या चारही स्टेजमध्ये हटकून व्यत्यय आणते ती रेमनिद्रा. ती साधारणतः ५ ते ३० मिनिटे (व्यक्तिपरत्वे) प्रत्येकाला सतावते. याच काळात डोळे गरागरा फिरुन व्यक्ति चाळवली जाते. रेम मध्ये पडलेली वाईट स्वप्ने दिवसाही आठवून भिववतात. हीच चळमुंगळी बया उत्तेजित करुन पुरुषांचे कपडे ओले करण्याचं धारिष्ट्य दाखवते. हिच्यामुळेच व्यक्ति झोपेत बावचळतात. एकंदर हिचं वर्तनच हानिकारक. आणि म्हणूनच जेव्हा या बयेचा ताल बेताल होतो (३० मिनिटांपेक्षा अधिक) तेव्हा आपल्याला नीटशी झोप लागत नसते, आपण अनिद्रेची तक्रार करतो.

आता वाचकांच्या लक्षात आलंच असेल की कसेही करुन या 'चळमुंगळी'चा बंदोबस्त केला की 'शांता' नक्की भेटणार.
तेव्हा रेमचा कार्यकाल कमी करणं हेच शांतेला प्राप्त करण्याचं प्रभावी सूत्र ठरतं. याकामी पुढील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदा होतो-
१) बार्बीच्युरेट्स- फिनोबार्बीटोन, अमायलोबार्बीटोन इ.
२) बेंझोडायझेपाईन्स- डायझेपाम, फ्लूराझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलँम इ. (हेच जास्त वापरले जातात व फायदेशीर ठरतात.)
३) अल्कोहोल- सर्व प्रकार! (पण योग्य प्रमाणात.)
४) अल्डीहाईडस्- पँराल्डीहाईड इ.
५) इथिनामेट
६) इतर- अँटीहिस्टामिन्स (कोडीन- कोरेक्स, सायपॉन इ.),स्कोपोलँमाईन.

नवीन आलेले औषध- झोपीक्लोन (नावपण काय भारी बघा- झोपेचा क्लोन!) सर्वात प्रभावी व सवय लागणार नाही असे आहे.
मात्र यातील कोणतेही औषध तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नये.

आता 'निद्रानाश' चर्चेला घेऊयात...
निद्रानाश अर्थात निद्रादेवीची अवकृपा म्हणजे व्यवस्थित झोप न लागणे, जागता पहारा सुरु राहणे, रात्रभर स्वप्नेच पडणे, मांजर-कुत्र्यासारखी क्षणिक डुलक्यांची माळ लागणे, डोळे उघडे असल्याप्रमाणे टक्क दिसत राहणे इ. लक्षणे ही निद्रानाशाची- इन्सोम्नियाची असतात.
हा दोन प्रकारचा-
(१)साधा निद्रानाश-
(३ दिवस ते ३ आठवड्यांपेक्षा कमी)-
यामध्ये झोपेची वेळ घटणे, भयंकर स्वप्नांची रात्र असणे, सकाळी ताजेतवाने न वाटणे अशी लक्षणे आढळतात.
याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे-
१.जीवनमानातील बदलामुळे (नोकरी, व्यवसाय, हवापाणी, प्रदेश बदलणे) आलेले ताण, तणाव.
२.जीवनातील आर्थिक, सामाजिक अस्थिरता, बेरोजगारी.
३.पूर्वेकडून पश्चिमेकडे किँवा उलट जगप्रवास करणे, उदा. पर्यटक, वैमानिक इ.
४.शारीरिक कारणे- वेदना, अस्थमा, ज्वर किँवा आजाराचे औदासिन्य.
५.मानसिक कारणे- विरह, वियोग यांमुळे आलेली उदासिनता.
६.औषधांमुळे निद्रानाश- १)उत्तेजके- एफेड्रीन, कॅफीन (कॉफी)
२)भुकेसाठीची औषधे- व्हायट्यझाईम्स, एन्झाईम्स
३)नाक चोंदणे कमी करणारी औषधे- फेनिलेफ्रीन, फेनिलप्रोपीलॅमाईन
४)मनोविकारावरील काही औषधे
५)क्लोरोक्विन, मेट्रोनिडॅझोल, फ्लुरोक्युनोलोन्स.
म्हणून वरील सर्व कारणे टाळली असता शांतेचे धनी होता येते.
या साध्या निद्रानाशाचेच आणखी दोन उपप्रकार देता येतील-
१.प्राथमिक निद्रानाश-
हा बहुतेक वेळा खूपच तात्पुरत्या कालावधीचा असतो. पुढील पथ्ये व नियम आचरणात आणले तर नक्कीच निद्रादेवी प्रसन्न होईल-
1.दिवसाची झोप टाळावी.
2.झोपण्यापूर्वी काही तास घाम येईपर्यँत व्यायाम करावा.
3.झोप लागलेली असतांनाच लवंडावे, उगाच आढे मोजीत निजू नये.
4.शयनमंच फक्त त्याच 'कामा'साठी वापरावा, तिथेच जेवणे, टीव्ही पाहणे टाळावे.
5.तंबाखूजन्य पदार्थ, कॉफी वर्ज्य.
6.मानसिक ताण देणाऱ्‍या गोष्टी झोपेच्या वेळी करुच नयेत.
२.वयोमानानुरुप येणारा निद्रानाश-
याचा त्रास बहुतांश वृद्धांना हमखास होतो. जसे आपले वय वाढते तशी चळमुंगळी (रेम) झोपही वयात येऊन छळू लागते. तिचा कार्यकाल बऱ्‍यापैकी वाढत जातो. यावर थोडी बहुत मात करण्यासाठी पुढील उपाय योजावेत-
1.संध्याकाळनंतर पाणीच पिऊ नये म्हणजे वारंवार उठावे लागणार नाही.
2.कोणाला वाटते ग्लासभर दूधाने झोप येईल. परंतु दूधातील ट्रिप्टोफॅन मुळे झोप लवकर येत नसते.
3.स्नायूशैथिल्याचा प्रयोग उपयुक्त.
4.योगोपचार फायदेशीर ठरतात, उदा. शवासन.

(२) तीव्र निद्रानाश-
३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ झोप आली नसेल तर ट्रीटमेंटची नितांत गरज असते. या प्रकारात निद्रेचा नाश करण्याकामी कोणत्यातरी चिँतेचा पाश कारणीभूत ठरतो हे नक्की जरी असले तरी पुढील काही गोष्टीँमुळेही तीव्र निद्रानाश संभवतो- अतिऔदासिन्य, मनोविकार, तीव्र मानसिक ताण तणाव इ.
या प्रकारचा निद्रानाश मात्र तज्ञांकडूनच सोडवून घ्यावा लागतो.

सर्वांना 'शांता' लाभो...

औषधोपचारजीवनमानविज्ञानलेखसल्लामाहिती

प्रतिक्रिया

डॉ.श्रीराम दिवटे's picture

25 Aug 2010 - 8:03 am | डॉ.श्रीराम दिवटे

अभ्यासपूर्ण धागा टाकायला थोडासा वेळ लागला खरा परंतु हा अभ्यास करायला उद्युक्त केल्याबद्दल अस्सल कोल्हापूरकरांचे आभार.
त्यांच्या बॉर्न अॅज इन्सोम्नियक या धाग्यावर अनेक मिपाकरांनी उत्तम उपाय सुचवले असले तरी शास्त्रीय दृष्टीकोनातून ही निद्रतेची चिरफाड करुन ठेवली आहे. ज्याला जो भाग योग्य वाटेल, पटेल तो उचलावा.

अत्यंत उपयोगी लेख....शवासनाचा मलातरी नेहमीच उपयोग होतो..

सुनील's picture

25 Aug 2010 - 8:19 am | सुनील

चिरफाड चांगली जमलीय. तसा आम्हाला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे त्याबद्दल नो कमेन्ट्स.

(नेपोलियन) सुनील

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

25 Aug 2010 - 10:05 am | जाई अस्सल कोल्हापुरी

इत्केच म्हणु शकते!
छापुन एन्लार्ज करुन भिंतीवर लावावे असा विचार आहे.
त्यातले काय आणि कशा पद्ध्तीने अनुसरले तर उपयोग होतो हे व्य. नि. मध्ये कळवेनच्.(अर्थात आप्ली पु.परवानगी असेल तर)
परवा दिवशी लागलेली १५ तास झोप हा निव्वळ योगायोग होता हे काल रात्री उघडकीस आलेले सत्य.!
कारण काल नेहमीसारखीच जाग लागली होती. ;)

विलासराव's picture

25 Aug 2010 - 11:40 am | विलासराव

मला झोप पटकन लागते. काही दिवस योगा करत होतो. त्यामुळे शवासन माहीती झाले.
मि त्याचा उपयोग करतो. त्याचा फायदा होतो असा अनुभव आहे.

chipatakhdumdum's picture

26 Aug 2010 - 11:14 am | chipatakhdumdum

तुम्ही जे करत होता, त्याला योगासन किंवा योगासने म्हणतात. योगा हा शब्दप्रयोग पूर्ण चुकीचा आहे.

शिल्पा ब's picture

26 Aug 2010 - 11:16 am | शिल्पा ब

विन्ग्र्जीत त्याला योगाच म्हनत्यात...

विलासराव's picture

26 Aug 2010 - 10:39 pm | विलासराव

माफ करा दादा. पण शब्दाचे खेळ खेळण्यात मला काहिच स्वारस्य नाही. मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजले असेलच. पन नाही समजले असे गृहीत धरले तरी फारसा फरक पडत नाही. कारण मी फक्त मी काय करतो ते सांगितले. मी कुणालाही कुठ्लाच उपदेश केलेला नाही.

डॉक लेख उत्तम आहे शंकाच नाही.
पण आम्हा याचा उपयोग नाही.

झोप कमी करण्याचे काही उपाय असतील तर सांगा. मेलं सकाळी पांघरुणातुन निघावसच वाटत नाही. :(
रोज लेट होयत कचेरीला.

आळश्यांचा राजा's picture

25 Aug 2010 - 5:14 pm | आळश्यांचा राजा

असंच.

(जांभई देणारा)

चांगले माहितीपूर्ण लेखन!
काल रात्री झोपण्याआधी वाचले आणि झोप आली नाही.;)
झोपेचे विचार येत राहिले.

अरुंधती's picture

25 Aug 2010 - 5:59 pm | अरुंधती

निद्रानाशावर पुष्पौषधींचा (फ्लॉवर रेमेडीज) चांगला उपयोग होतो असे ऐकून आहे, विशेषतः पॅसिफ्लोरा ह्या औषधीचा.

देशी उपाय म्हणजे रात्री गरम दुधात जायफळ घालून घेणे!

आयुर्वेदानुसार आणि योगशास्त्रानुसारही झोपेचे किंवा निद्रेचे प्रकार सांगितले आहेत. त्या प्रकारांची व निद्रानाशावरील त्यातील उपायांची कोणी येथे विस्तृत माहिती देऊ शकेल काय?

http://www.holistic-online.com/remedies/sleep/sleep_ins_ayurveda.htm

अर्थात नीट वाचून त्यातला सत्यांश समजून घ्यावा लागेल.

(निद्रादेवीचा लाडका)नीजरंग

शिल्पा ब's picture

25 Aug 2010 - 8:28 pm | शिल्पा ब

मला पण झोपेचा त्रासच आहे...सकाळी योग करताना शवासन केले कि छान तासभर झोपल्यासारखे होते..
तशी दुपारी एक डूलका काढते, मग रात्रीची झोप पण मधल्या वेळेत काही झोपच येत नाही..काय करू?

बेसनलाडू's picture

26 Aug 2010 - 12:06 am | बेसनलाडू

उत्तम, माहितीपूर्ण लेख. आवडला.
(झोपाळू)बेसनलाडू

चिंगुसविकॄतजोशी's picture

26 Aug 2010 - 12:56 am | चिंगुसविकॄतजोशी

अहो पण ज्यांना जास्त झोप येते त्यांचं काय? मी सध्या बारावीत आहे, आणि मला अभ्यासाचे पुस्तक समोर धरले (खासकरून physics) की भयानक झोप येते. त्यावर काही उपाय सुचवाल तर ' मेरी मा की दुवायें आपको मिलेंगी' ;) ;-) :wink:

वरील उपायांमधे physics पुस्तक समोर धरणे हा उपाय valid & aplicable आहे.