लोक बिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात OPD ची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ४.३० अशी असते. प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना सकाळी ६ वाजताच तपासले जाते. दिवसा, रात्री-बेरात्री येणाऱ्या अत्त्यावस्थ रुग्णांना तात्काळ सेवा पण तितक्याच तत्परतेने दिली जाते. दवाखान्यात सध्यातरी घरचेच ४ डॉक्टर्स डॉ.प्रकाश(बाबा)-डॉ.मंदाकिनी(आई) व डॉ.दिगंत(थोरला भाऊ)-डॉ.अनघा(वहिनी) आहेत. हे चौघही M.B.B.S. आहेत. अनघा ही स्त्रीरोग तज्ञ आहे. आई भूल तज्ञ आहे. दवाखान्यात काम करणारे इतर सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. त्यांना दवाखान्यात काम करण्याचा मुळीच अनुभव नव्हता. पण त्यांची दवाखान्यात काम करण्याची तीव्र इच्छा होती. तीव्र इच्छा तिथे मार्ग असतोच. प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळातील कार्यकर्त्यांना आई-बाबांनी दवाखान्यात काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण दिले. हे सर्व दवाखान्याच्या कामात तरबेज झाले आहेत. म्हणून प्रशिक्षित परिचारिकेची उणीव आम्हाला कधीच जाणवली नाही. कारण ध्येयांनी प्रेरित झालेली ही माणसे आम्हाला कार्यकर्ते म्हणून लाभली आहेत. हे आमचे भाग्यच आहे. हे कार्यकर्ते गेली २५-३० वर्षे या दवाखान्यात काम करताहेत. दवाखान्यात काम करणाऱ्या नवीन पिढीला प्रशिक्षण देण्याचे काम आता हेच कार्यकर्ते डॉ.दिगंत आणि डॉ.अनघा यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. धडाडीचे कार्यकर्ते मिळाल्यानेच आमच्या प्रकल्पाचा फायदा या माडिया आणि गोंड आदिवासी जनतेला झाला आहे. आमटे कुटुंबाच्या सोबतीला असलेल्या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी सेवे मुळेच लोक बिरादरी प्रकल्पाचे कार्य जगाला थोडेफार माहिती झाले आहे.
सुमारे २ लाख आदिवासी बांधवांना आज पर्यंत या दवाखान्याचा लाभ मिळाला आहे. सुमारे १००० आदिवासी पाड्यातून, २०० ते २५० किलोमीटर अंतरावरून आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या तीन राज्यातून जवळपास ४५,००० आदिवासी बांधव दरवर्षी निरनिराळ्या सामान्य व दुर्धर अशा आजारावर उपचार करून घेण्यासाठी आमच्या या दवाखान्यात येतात. दरवर्षी ३५०-४०० छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया इथे होतात. दरवर्षी एकदा नागपुरातील तज्ञ डॉक्टरांचे शस्त्रक्रिया शिबीर येथे रोटरी क्लब च्या वतीने आयोजित केले जाते. दिवसेंदिवस हे कार्य वाढतेच आहे. एखादा जास्तीचा डॉक्टर आम्हाला या कामासाठी मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्या साठी आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्याला यश आले नाही. जंगलात जाऊन सेवा करायची ती पण कमी मानधनात हे गणित कदाचित नवीन पिढीला मान्य नाही. सारासार विचार केला तर या पिढीचे मत बरोबर वाटते. महागाई वाढली आहे. मुलांच्या उच्च शिक्षणाला पण बाहेर शहरात खूप खर्च येतो. आजही या दवाखान्याला कुठल्याही प्रकारचे कायमचे अनुदान नाही. दवाखान्याचा खर्च हा दानशूर लोकांच्या देणगीतून केला जातो. त्यामुळे आम्ही सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. कायम स्वरूपी अनुदान दवाखान्याला मिळाले तर सर्वांना चांगले मानधन देता येईल. किंवा या प्रकल्पासाठी चांगला CORPUS FUND जमा झाला तर त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजातून दवाखान्याचा सर्व खर्च करता येईल.
मेंदूचा मलेरिया, क्षय रोग, अनिमिया, कॅन्सर, झाडावरून पडून हात-पाय मोडणे, सर्पदंश, जंगली श्वापदांनी हल्ला करून जखमी केलेले रुग्ण, प्रसूती रुग्ण व खायला नीट पौष्टिक आहार न मिळाल्याने झालेले आजार(वेग-वेगळ्या जीवनसत्वांचा अभाव) अशा अनेक वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले रुग्ण या दवाखान्यात कायम येत असतात.
अशाच एका रुग्णाची कथा:
दिनांक १८ ऑगस्ट २०१०. दुपारचे ३ वाजले होते. दवाखान्याची OPD नुकतीच सुरु झाली होती. तेवढ्यात हेमलकसा येथून ३ किलोमीटर दूर असलेल्या भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण-वाहिका लोक बिरादरीच्या फाटकातून आत येतांना दिसली. नक्कीच कोणीतरी अत्यावस्त रुग्ण असणार याची दवाखान्यात काम करणाऱ्या सर्वांना कल्पना आली. बबन-राजू-प्रवीण हे दवाखान्यातील तीन कार्यकर्ते तातडीने स्ट्रेचर घेऊन त्या रुग्णवाहिके जवळ पोहोचले. एक १५-१६ वर्षाचा तरुण मुलगा जवळपास बेशुद्ध अवस्थेत असलेला त्यांना दिसला. सोबत त्याची आई होती. लगेच त्या मुलाला रुग्णवाहिकेतून काढले आणि स्ट्रेचर वर घेऊन त्याच्यासाठी तयार केलेल्या बेड वर आणून ठेवले. रुग्ण-वाहिका त्याला सोडून लगेचच परत गेली. तो मुलगा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला डोळे उघडता येत नव्हते. बोलता पण येत नव्हते. म्हणून डॉ.दिगंत ने त्याच्या आईला काय झाले म्हणून विचारायला सुरवात केली. त्याची आई खूप रडत होती. माझ्या मुलाला कसेही करून वाचवा अशी गयावया करीत होती. त्याच अवस्थेत तिने काय घडले ते सांगायला सुरवात केली. झारेगुडा या गावचे हे रहिवासी. हेमलकसा पासुन ६ किलोमीटर दूर त्यांचे गाव. मध्ये पामुलगौतमी नावाची नदी आहे. त्यावर पूल नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून नद्या भरून वाहताहेत. एका झाडाच्या खोडापासून बनविलेल्या डोंग्यातून-होडीतून ही नदी ओलांडावी लागते. त्यात जास्त हालचाल केली आणि तोल गेला तर होडी बुडण्याची संभवता असते. पण येथील लोकांना हे रोजचेच. असो. त्या मुलाची आई पुढे सांगू लागली. मुलगा रात्री झोपला तेव्हा चांगला होता. त्याने नीट जेवण केले होते. सकाळी जेव्हा तो नेहमीसारखा उठला नाही म्हणून मी त्याला पाहायला गेली तर तो म्हणाला मला चक्कर येतेय, डोळे जड झाले आहेत आणि घसा दुखतोय. त्याची आई खूप घाबरली. तिचा नवरा आधीच कुठल्यातरी आजाराने मरण पावला होता. तिला हा एकच मुलगा. मग तिने आरडा ओरडा करून गावातील ४-५ लोकांना गोळा केले. त्यांनी त्या मुलाला बाजेवर टाकले आणि बाजेला दोरी बांधून त्याची डोली तयार केली. त्या मुलाला खाटेवर उचलून नदीच्या तीरावर आणले. लाकडाच्या होडीत(नाव) ती खाट व्यवस्थित ठेवली आणि जोरात वाहत्या पाण्यातून होडीचा तोल सांभाळत त्यांनी पामुलगौतमी नदी पार केली. पामुलगौतमी नदी पासुन भामरागड चे ग्रामीण रुग्णालय दीड किलोमीटर आहे. आणि आमचा दवाखाना ४ किलोमीटर. तो दवाखाना जवळ म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या मुलाला ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ वाजताच्या सुमारास भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्याला घसा दुखतो म्हणून गुळण्या करवून घ्या म्हणून सांगितले. खोकल्याचे औषध दिले. जसा जसा वेळ जाऊ लागला तशी त्याची तब्येत अजून बिघडायला लागली. त्याचे बोलणे पूर्णपणे बंद झाले. दुपारी २ च्या सुमारास त्याला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला. आता तो केव्हाही कोमात जाईल किंवा काहीतरी वाईट घडेल याची भीती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना वाटायला लागली. म्हणून लगेच दुपारी ३ वाजता इथे काही वाईट घडू नये म्हणून त्यांनी त्याला रुग्णवाहिकेत टाकून आमच्या दवाखान्यात आणून सोडले. हे सगळे ऐकल्यावर दिगंत-अनघा ला थोडा रागच आला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन मरणासन्न अवस्थेत पोहोचलेले रुग्ण आमच्या दवाखान्यात आणून टाकण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. अशा वेळेस राग येणे साहजिकच होते. नेमके असे कशामुळे झाले हे त्याला आणि त्याच्या आईलाही माहिती नव्हते. पुढे किंचितही वेळ न दवडता बाबा-आई-दिगंत-अनघा यांनी त्या मुलाच्या चेहेऱ्यावर व शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांवरून आणि अनेक वर्षांच्या अनुभवावरून त्याला मण्यार जातीचा साप चावला आहे हे नक्की केले. मण्यार हा आपल्या देशातला सर्वात विषारी सर्प आहे. हा देशात जवळपास सगळी कडे आढळतो. हा साप भक्षाच्या शोधात रात्रीचा बाहेर पडतो. मुंगी चावल्यावर जितकी आग होते तेवढीच आग मण्यार साप चावल्यावर होते. मण्यार चे विषारी दातही अगदी बारीक असतात. त्याच्या चावल्याच्या खुणा पण शरीरावर दिसणे अवघड असते. त्यामुळे न कळत त्याकडे दुर्लक्ष होते. आदिवासींची गावे जंगलात असतात. ते झोपडीत जमिनीवर झोपतात. तसेच त्यांच्या घरात वीज नसते. जंगलात कंद-मुळे गोळा करतांना, शेतात काम करतांना आणि घरी झोपडीत निवांत झोपले असतांना सुद्धा या भागात सर्पदंश होऊ शकतो. सर्पाच्या शरीरावर न कळत पाय पडला, झोपेत हात लागला किंवा त्याला आपण काडीने डीचवून त्रास दिला तरच तो चावतो.
धावपळ सुरु झाली. लगेच त्या मुलाला कृत्रिम प्राणवायू लावला. घश्यात सक्शन यंत्र लावले. सलाईन सुरु केले. आणि सर्वात महत्वाचे सर्व विषारी सापांवर चालणारे एकमेव इंजेक्शन(anti-snake venom) द्यायला सुरवात केली. त्याच्या रक्ताच्या आणि लघवीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. दुपारी ३ ते रात्री १० या काळात तब्बल ११ anti-snake venom त्या मुलाला देण्यात आले. रात्री १० च्या सुमारास त्यामुलाने पहिल्यांदा डोळे उघडले. आणि सर्वांना आनंद झाला. त्याच्या आईच्या दुखाश्रुंची जागा आनंदाश्रूंनी घेतली होती. अजून काही काळ त्याला इथे दवाखान्यात आणण्यास उशीर झाला असता आणि हे इंजेक्शन दिले गेले नसते तर कदाचित त्याला आपले प्राण चुकीच्या उपचारा अभावी नाहक गमवावे लागले असते. २१ तारखेला सकाळी त्याला दवाखान्यातून घरी जायला परवानगी देण्यात आली. माय-लेक आनंदाने आपल्या गावी परतलेत.
एका anti-snake venom ची किंमत रु.५००/- आहे. पण हे औषध म्हणजे सर्पदंशावर रामबाण आहे. अर्थात सापाने किती विष शरीरात सोडले आहे आणि रुग्णाला किती वेळाने हे औषध दिले गेले आहे या वर सर्व अवलंबून असते. जर तो रुग्ण लवकर दवाखान्यात पोहोचला तर वाचतोच. पण या भागात अशी अनेक पाडी आहेत तिथे आजही आपण पोहचू शकत नाही. ६०-७० किलोमीटर चालत त्या रुग्णाला खांद्यावर उचलून आणावे लागते.पोहोचायला २ दिवस कमीतकमी लागतात. अशा गावातील माणसाला जर विषारी सापाने चावा घेतला तर त्या माणसाचे वाचणे जवळपास अशक्य असते. बरेच वेळा दवाखान्यात उचलून आणतांनाच रस्त्यातच त्याचा प्राण गेलेला असतो.
अशा अनेक घटना इकडे घडत असता. 'प्रकाशवाटा' या बाबा (प्रकाश आमटे) च्या पुस्तकात अशा काहीच घटनांचा उल्लेख आहे. पुण्यातील समकालीन प्रकाशनाच्या आग्रहास्तव हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. १९७३ पासुन सुरु झालेल्या या प्रकल्पात अनेक थरारक घटना घडल्यात. त्याची नोंद आई-बाबांनी ठेवली नाही. कारण पुस्तक लिहावे व छापावे अशा गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही. आदिवासी बांधवांना आपला फायदा झाला. त्यांचे दुखः, त्यांच्यावरील होणारा अन्याय कमी करण्यात त्यांना आनंद होता. एका मागून एक असे अनेक आवाहनात्मक प्रसंग रोज पुढे येऊन ठाकायचे. म्हणून अनेक असे प्रसंग विस्मृतीत गेले आहे. जेवढे प्रसंग बाबांना आठवलेत, तेवढे सीमा भानू यांनी 'प्रकाशवाटा' या पुस्तकात शब्दांकित केले आहे.
अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org
Email: aniketamte@gmail.com
प्रतिक्रिया
24 Aug 2010 - 7:17 am | विकास
आपले लेख वाचल्याशिवाय थांबवत नाही...
१९७३ पासुन सुरु झालेल्या या प्रकल्पात अनेक थरारक घटना घडल्यात. त्याची नोंद आई-बाबांनी ठेवली नाही. कारण पुस्तक लिहावे व छापावे अशा गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही.
त्यांना प्रसिद्धी नको, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि संस्काराचा भाग झाला. मात्र अनुभव लिहून, बोलून वगैरे इतरांना सांगितले की त्यातूनच प्रेरणा मिळू शकते असे वाटते.
एखादा जास्तीचा डॉक्टर आम्हाला या कामासाठी मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्या साठी आम्ही प्रयत्न पण केले होते. पण त्याला यश आले नाही.
कधी नव्याने डॉक्टर होणार्याला सहा महीने आमच्या कार्याला दे असे आवाहन करून पाहीले आहेत का? कदाचीत त्यातून यश येईल. कायमस्वरूपी नाही आले तरी त्यातून जाण असलेला एक डॉक्टर तयार झाला तरी काही कमी नाही असे वाटते.
24 Aug 2010 - 9:38 am | अर्धवट
अगदी असेच म्हणतो
24 Aug 2010 - 6:45 pm | प्रभो
बाय डिफॉल्ट सहमत.
24 Aug 2010 - 7:49 am | आळश्यांचा राजा
सहमत.
अशा फोरमवर लिहून काही फरक पडेल अशी आशा करुया! बर्याच डॉक्टरांना/ विद्यार्थ्यांना नीट माहिती नसण्याचा/ दृष्टीआड सॄष्टी असण्याचा संभव आहे.
24 Aug 2010 - 10:52 pm | Pain
वैद्यकीय शिक्षणाचे आभाळात पोचलेले शुल्क आणि प्रत्यक्ष व्यवसाय सुरु होउन उत्पन्न मिळण्यात जाणारी वर्षे पाहता गेल्या काही वर्षात या शाखेला प्रवेश घेणार्यांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याचे एकाकडून कळले. अशा परिस्थितीत सुरुवातीचे सहा महिने कोणी हे काम करणे अवघड वाटते.
ज्यांनी पिढ्यानुपिढ्या आपले आयुष्य समाजसेवेत वाहून घेतले आहे त्या असामान्यांशी असे बोलणे हास्यास्पद आहे खरे, पण सामान्यांचा (माझ्यासकट) विचार करता जे वाटले ते लिहिले आहे.
तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ?
25 Aug 2010 - 3:08 am | विकास
तसेच फक्त सुरुवातीचे सहा महिने या ऐवजी नियमित दर वर्षी २ ते ४ आठवडे हा पर्याय कस वाटतो ?
नक्कीच चांगला आहे. किंबहूना त्यात एक प्रकारचे सातत्य आहे... पण मला वाटते असे केवळ डॉ़क्टर्सच्याच बाबतीत का ? इतर जे तुम्ही-आम्ही डॉक्टर्स नाही आहोत त्यांनी देखील कुठल्यान कुठल्या सामाजीक सेवेत कामाचे दान केले पाहीके (नुसतेच दामाचे नाही).
बाकी सर्वच डॉ़क्टर्सना लाखो रुपयांचा खर्च येतो का? हा माहीतीसाठी विचारलेला प्रश्न आहे.
26 Aug 2010 - 2:11 pm | अजया
कुठ ल्याही डॉ़क्टरला दवाखाना फुकट का ढता येतो का?
24 Aug 2010 - 8:16 am | रेवती
ग्रेट!
आमटे कुटुंबियांच्या कार्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील.
24 Aug 2010 - 9:57 am | Pain
तुम्हाला इथे पाहून आश्चर्य वाटल. लहानपणी नेगल वाचून थोडी ओळख झाली होती, जसा मोठा होत गेलो तशी अजून माहिती मिळत गेली. काही दिवसांपूर्वीच तुमच्या पालकांची मुलाखत पाहिली. जूनमध्ये अचानक प्रकाशवाटा मिळाले, तेही वाचले. तुम्ही खूप चांगले काम करत आहात आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे.
आतापर्यंत कुठला साप चावला आहे त्यावरून डॉक्टर उपाययोजना करत, सापांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषांनुसार इलाजही बदलतो; चुकल्यास(किंवा बिनविषारी साप चावला असताही चुकून इंजेक्शन दिल्यास) रुग्ण दगावण्याची शक्यता असते असे ऐकून होतो. अँटी स्नेक व्हेनम या नवीन इंजेक्शनची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद :)
24 Aug 2010 - 10:53 am | चिंतामणी
महासत्ता बनायची स्वप्ने बघणा-या या भारतातील हे वास्तव फारच वेदना दायक आहे.
अनेक वर्षे आपले कुटुंबीय या वेदनेवर फुंकर घालायचे काम करीत आहेत. आपल्या कामाला सलाम.
24 Aug 2010 - 11:28 am | वेताळ
आमटेसाहेबाचे विविध अनुभव पुस्तकात,पेपरमध्ये वाचत आलो आहे. खरोखर मला कायम आश्चर्य वाटत आले कि हा माणुस कशाचा बनला आहे? सर्व सुखाचा त्याग करुन आजन्म फक्त आदिवासी लोकांची सेवा करण्यात घालवले.साधा एक दिवस कुणा मित्रासाठी घालवणे आम्हाला कठिण होते.आज त्याच्या कुंटुबातील एका व्यक्तीकडुन जे त्याचे अनुभव वाचत आहेत ते माझ्यासाठी खुप मौलिक आहेत.माहीतीबद्दल मी तुमचा आभारी आहे. आम्हालाही काही खारीचा वाटा उचलता आला तर खुप आनंद वाटेल.
अॅण्टी स्नेक व्हेनम सर्व सरकारी ग्रामिण रुग्णालयात उपलब्द असते. तिथे ते रुग्णाला मोफत दिले जाते.खाजगी रुग्णालयात त्याची किंमत अव्वाच्यासव्वा लावतात.असा रुग्ण आठळल्यास त्वरीत त्याला सरकारी दवाखाण्यात पोहचवा.
24 Aug 2010 - 1:44 pm | Pain
हे इंजेक्शन कायम फ्रीजमध्ये (विशिष्ट तापमानाला) ठेवावे लागते का ?
24 Aug 2010 - 7:52 pm | वेताळ
सलाईन मधुन ते इंजेक्शन रुग्णाला देतात.माझ्या माहिती प्रमाणे हाफकिन्स संस्था हे अॅव्हे इंजेक्शन बनवते.
24 Aug 2010 - 2:58 pm | अनिकेत प्रकाश आमटे
प्रकाल्पाला मदत करायची असल्यास मेल करावा...प्रतिक्रियान बद्दल आभारी आहे...
25 Aug 2010 - 10:53 pm | संपादक मंडळ
आमटे यांच्या लेखामुळे लोकांना उत्तम लोककार्याची ओळख झाली आहे, होते आहे, व होत रहावी अशी इच्छा आणि आशा आहे. मिपा या व्यासपिठाचा उपयोग अशा प्रकारे समाजाला उपयुक्त कामासाठी व्हावा, हे मिपाच्या दॄष्टीने गौरवाचे आहे. तरीही एक टिपणी यानिमित्ताने सर्वांच्या माहितीसाठी करीत आहोत.
मिपावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कुठच्याही संस्थेला किंवा व्यक्तिला धनादेश किंवा रक्कम देण्याच्या व्यवहारासंबंधी पूर्ण जबाबदारी हा व्यवहार करणार्या सदस्यांची स्वतःची असेल. या देवघेवीशी मिसळपावच्या प्रशासनाचा काही संबंध नाही.
धन्यवाद,
संपादक मंडळ
25 Aug 2010 - 10:57 pm | धनंजय
सुयोग्य खुलासा.
(असा खुलासा मूळ लेखातही देण्यास प्रत्यवाय नसावा. मात्र साहाय्याचा थेट उल्लेख प्रतिसादांतच झालेला आहे, हेसुद्धा खरेच.)
25 Aug 2010 - 12:15 am | धनंजय
दूरस्थ वाचकांसाठी दोन महत्त्वाचे दुवे श्री. अनिकेत आमटे यांच्या लोकबिरादरी वेबसाईटवरून येथे देत आहे :
(इंग्रजी दुवा)
(मराठी दुवा)
25 Aug 2010 - 9:12 am | प्रचेतस
धन्यवाद अनिकेत, आपण येथे आलात. असेच लेख लिहित जा. आम्हालाही सर्व कार्याची माहिती होईल.
25 Aug 2010 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll
छान लेख.
कोकणाची आठवण झाली . कोकणातही अनेक ठीकाणी अशीच परिस्थिती आहे. तिथली शासनयंत्रणा ठप्प झाल्यात जमा आहे. रत्नागिरीत अशा एका संस्थेत काम करणार्या एकाने सांगितले कि तिथली परिस्थिती फारच गंभीर आहे तेव्हा ते मला असे वाटले की हे उगाचच नकारात्मक आहेत सरकारी यंत्रणेविषयी पण आताशा झी २४ तास, आयबीएन ७ वर रीपोर्ट पाहतो तेव्हा वाटते की सांगणारी व्यक्ती उगाचच निगेटीव्ह नव्हती सरकारी यंत्रणेबद्दल. एक धक्कादायक माहीती अशी समोर आली की तिथली सरकारी यंत्रणा खाजगी हॉस्पीटले वगैरेंवर दबाव आणते आणि सांगते डेंग्यू किंवा मलेरियाचा रुग्ण आहे असे ऑफिशियली पेपर बनवताना लिहायचे नाही कारण डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठीची औषधे वाटण्यासाठी प्रचंड निधी तिथली शासन यंत्रणा खर्च (?) करत असते आणि तरीही यश का येत नाही असे विचारले जाऊ शकते. यावरून लक्षात येईल की ते पैसे नक्की कुठे खर्च होत असतात ते.
अनिकेत तुमचा लेख छान आहे. खरंच दीपस्तंभ आहे बाबांनी स्थापन केलेली संस्था.
25 Aug 2010 - 11:08 pm | ऋषिकेश
प्रकाश आमटे दर वर्षी एका आठवड्याचा डॉक्टर्सचा ऑपरेशन मेळावा आयोजित करत असत. त्यात अनेक नामांकीत डॉक्टर्स आपला आठवडा आदिवासी रुग्णांना देत. ती व्यवस्था अजून चालु आहे का? ही वा तत्सम सोय तपासणीसाठी वर्षात अधिक वेळा केल्यास रुग्ण व डॉक्टर्स दोघांना सोयीचे पडावे.
बाकी कार्यास शुभेच्छा!